गेल्या आठवड्यात आपण तुंगारेश्वराच्या जंगलातला कामणदुर्ग पाहिला. याच डोंगररांगेला संमातर असणार्या रांगेत असाच एक टोलेजंगी शिखरावर वसविलेला किल्ला आहे, "गुमतारा किंवा गोतारा". या डोंगराच्या उत्तरेला, वज्रेश्वरी आणि गणेशपुरी अशी सुप्रसिध्द पर्यटन स्थळे असूनही हा किल्ला तसा दुर्लक्षितच आहे. अगदी क्वचितच ट्रेकर्सची पावले इकडे वळतात.
गुमतारा असे काहीसे गुढ नाव असलेल्या हा किल्ला इतिहासाबाबतही मुग्ध आहे. हा किल्ला कोणी बांधला हे ज्ञात नाही. या किल्ल्याच्या परिसराचा प्रथम उल्लेख इ.स.१६८९ मध्ये आढळतो. इ.स.१६८९ मध्ये छत्रपती संभाजी महाराज पकडले गेल्याचे समजताच नाशिकचा मुघल सुभेदार मातबरखान नाशिकहून माहुलीवर चालून गेला आणि दोन तीन महिन्यात नाना युक्त्या करून त्याने मराठ्याच्या ताब्यातील माहुली, भिवंडी ,दुगाड, मलंगगड व शेवटी कल्याण हि सर्व ठिकाणे एका मागून एक कब्जात आणली. गोतारा हा उल्लेख पूर्वीच्या भिवंडी तालुक्याच्या नकाशात ही आहे तसेच याचा उल्लेख About twelve kilometres north of bhivandi rising gently form the west is the hill of Dyahiri (525 metres) across a saddle-back ridge lies the OLD MARATHA FORT OF GOTARA (584 metres). असा आला आहे.
सन १७३१-३२ मधे मराठा व पोर्तुगीज यांच्यात लढाई झाली. या युध्दात मराठ्यानी चंद्रवाडी (तांदुळवाडी) , टकमक, कामणदुर्ग व बडागड ताब्यात घेतले. यातील बडागड म्हणजेच गोतारा असावा. पायथ्याच्या दुगाड गावावरून दुगाडगड व पुढे अपभ्रंश होउन बडागड झाले असावे किंवा अनुवाद करताना चुक
झाली असावी.
मार्चच्या सुरवातीत फिरंगणावरची मसलत मुऋर झाली. काही सहकारी चिमणाजी भिवराव, रामचंद्र हरी, कृष्णाजी केशव वैगरे सरदाराना त्यांनी साष्टी वसईकडे रवाना केले. त्याप्रमाणे १६ दिवसांनी म्हणजेच १६ मार्च १७३७ रोजी गुडीपाढवा करून दुसऱ्या दिवशी १७ मार्च १७३७ गुरुवारी रात्री त्यांनी स्वत: फिरंगणावर कूच केली. मराठयांच्या फौजेचे मुख्य दोन टोळ्या केल्या होत्या एक शंकराजी केशव फडक्याच्या हाताखाली व दुसरी खंडोजी माणकरांच्या हाताखाली, एकाच वेळी साष्टी व वसईवर हल्ला करण्याचा बेत ठरला. या दोन फौजेपैकी ठाण्यास जाणाऱ्या फौजेची बिनी खंडोजी माणकर व होनाजी बलकवडे, शंकराजी केशव वगैरे लोकांवर सोपवली होती. साष्टीवर जाणाऱ्या फौजेने राजमाची (राजमाची किल्ला) खाली दब्यास बसावे व वसईत जाणाऱ्या फौजेने माहुली किल्याच्या रानात दब्यास बसावे असे ठरले व ठरल्या दिवशी गंगाजी नाईक याने आपले दोघे भाऊ व त्यांच्याबरोबर फकीर महंमद जमादार, धाकनाक परवारी व शिवाय १५० लोक आणि कोळी देऊन त्यास राजमाचीहून बावा मलंगच्या (मलंगगड) वाडीस रवाना केले व स्व:त आपली टोळी घेऊन तो घोटवड्याखालील कोशिंबड्यावर(कोशिंबडे
गाव५) गेला. आता वसईत पाठवलेली फौज माहुलीच्या रानात दब्यास बसली होती. २४ मार्च १७३७ रोजी गुरुवारी ती टोळी त्या रानातून बाहेर निघाली व पहाटेस २५ मार्च १७३७ रोजी घोटवड्याच्या रानांत आली. तो सबंध दिवस त्यांनी तेथे रानातच घालविला दिवस उन्हाळयाचे व प्रदेश अतिशय गर्मीचा त्या रानात पाण्याचा टिपूसही मिळण्याची मारामार त्यामुळे पाण्यावाचून हैराण होऊन त्या टोळीतले दोन चार लोक मेलेही. त्याच रात्री म्हणजेच शुक्रवारी लोक पुढच्या पल्यास निघाले ते पहाटे तुंगार कामणच्या रानात येऊन राहिले. तुंगार पासून पुढे त्यानी राजवळी येथे मुक्काम करून नंतर वसईच्या मोहिमेतील पहिला मोर्चा त्यांनी बहाद्दूरपूर येथे लावला. पुढे ही टोळी वसईच्या लढाईत सहभागी होऊन त्यांनी वसईवर विजय मिळविला. ( संदर्भ :- वसईची मोहिम, भाग २, पृष्ट क्रं- ९)
या किल्याच्या पायथ्याशी असलेल्या दुगाड या गावी इ.स.१७८० (८ ते १२डिसेंबर) मध्ये मराठा सरदार रामचंद गणेश व इंग्रज सेनापती कर्नल हार्टले यांच्यात झालेल्या लढाईत रामचंद्र गणेश हरी ठार झाले व मराठ्यांना पराभव पत्करावा लागला. तरी ब्रिटीश सैन्यातील लेफ्ट.ड्र्यू, लेफ्ट.कूपर, लेफ्ट.कोवन आणि लेफ्ट.पिअरसन हे सुद्धा ठार झाले होते. मराठ्यांना मदत करणारा पोर्तुगीज अधिकारी सिग्रीअर नरोन्हा हा जबर जखमी झाला होता. रामचंद्र गणेश वीस हजाराची फौज घेऊन ब्रिटीशांवर चाल करून आला होता. दुगाड परिसरात या लढाईत वापरण्यात आलेले तोफा व दगडी तोफगोळे आढळतात.
तब्बल १९४९फुट (मीटर ५८५) उंचीच्या या किल्यावर जाण्यासाठी चार वाटा आहेत.
१.एक वाट प्रसिद्ध वज्रेश्वरी मंदिरा पासून १ किमी अंतरावर असलेल्या भिवाळी गावापासून हायवे जवळ उसगाव धरणातून जाते. येथून किल्ल्यावर पोहचण्यासाठी ३ तास लागतात.
२.दुसरी वाट ही घोटवडा(घोट्गाव) मधील गोठण पाडा गावातून जाते येथून किल्ल्यावर पोहचण्यासाठी अडीच ते ३ तास लागतात.(सह्याद्री प्रतिष्ठानने मुख्य हायवे पासून घोटवड(घोट्गाव) गोठण पाडा गावातून किल्यावर जाणाऱ्या वाटेवर दिशा दर्शक दाखवले आहेत.) मिपाकर योगेश आलेकरी याच मार्गाने गेल्याचे त्यांच्या ह्या धाग्यात आहे.
३.तिसरी वाट ही दुगाड गावातून पिराची वाडी येथून जाते येथून अडीच ते तीन तास लागतात. हि वाट थोडी अवघड व निसरडी आहे.
४.चौथी वाट भिवंडी वाडा रोड वरील दुगाड फाट्यापासून ५ किमी अंतरावर मोहिली गाव आहे.येथून किल्ल्यावर पोहचण्यास साधारण दीड ते दोन तास लागतात. या वाटेवर गावापासून दिशा दर्शक फलक लावलेले आहेत
५. भिंवंडी- पारोळ रस्त्यावरील चिंबीचा पाडा येथे उतरूनसुध्दा पुर्वेकडच्या गुमतार्यावर जाता येईल. चिंबीच्या पाड्याहून खडकी मार्गे गुमतारा गाठायला तब्बल ४.५ ते ५ तास लागतात, तसा हा लांबचा मार्ग आहे. खडकीहुन "डेरी" या डोंगरमाथ्यावरही जाता येईल. डेरी हा ही किल्ला आहे असे मानतात, पण त्यावर कसलेही अवशेष नाहीत आणी महत्वाचे म्हणजे पाणीही नाही.वरच्या ईतिहासात याचा उल्लेख Dyahiri असा आला आहे. यामार्गे स्थानिक वाटाड्या आवश्यक. कामणदुर्ग देवकुंडीकडे चढुन जर कुहे गावाकडे उतरून तिथून चिंबीचा पाडा आणि शेवटी गुमतारा, असा जंबो ट्रेक करता येईल.
(पर्यटकांनी आपल्या सोई नुसार वाट निवडावी मदत लागल्यास प्रतिष्ठानच्या सदस्याशी संपर्क साधावा श्री अमोल पाटील ९८२३१६६१०४,श्री दत्ता खैमोडे
९८९०१४९३३५,श्री प्रशांत देशमुख ९२७१९४३३३९)
एस टी बस प्रवास
१.वज्रेश्वरी मंदिर – वज्रेश्वरी वरून रिक्षा उपलब्द आहेत.मोहिली गावात जाण्यासाठी सैतानी पूल –घोटगाव– वेढे पाडा- वेढे गाव- दुगाड- मोहिली गाव.
२.मुंबई – पश्चिम रेल्वेने वसई किवा विरार रेल्वे स्थानक गाठावे येथून अर्धा पाऊन तासाने बस वज्रेश्वरी मंदिराकडे जाणारे बस आहेत बसने १ तासात तुम्ही वज्रेश्वरी मंदिर येथे उतरावे व तेथून रिक्ष्याने मोहिली गावात पोहचता येते.
किवा वसई विरार वरून –कल्याण भिवंडीला जाणाऱ्या बस मार्गे दुगाड फाटा वर उतरून तेथून ५ किमी अंतरावर मोहिली गावात जाता येते.
३.ठाणे-कल्याण- ठाणे कल्याण वरून एस टी बस उपलब्द आहे. वाडा,भोईसर,डहाणू,पालघर,गणेशपुरी या सर्व बस भिवंडी मार्गे जातात येथून दीड तासात दुगाड फाटावरून ५ किमी मोहिली गाव आहे.
४.पुणे- पुणे वरून येणाऱ्या शिवप्रेमींनी कल्याण-ठाणे या मार्गे एस टी बस ने प्रवास करू करावा.
आदल्या दिवशीचा कामणदुर्गचा दमवीणारा ट्रेक संपवून मी भिंवंडीतुन गणेशपुरी बस पकडली आणि वज्रेश्वरीच्या दिशेने म्हणजेच अंबाडी फाट्याकडे निघालो.
साधारण पाउण तासाने डाव्याबाजुला एका गोल माथ्याच्या शिखराने दर्शन दिले. हाच गुमतारा असणार असा मी तर्क केला. थोड्यावेळात दुगाड फाटा आला.
ईथे उतरलो, तो समोर कोशंबे गावची प्राथमिक शाळा दिसली
आणि पुढे बंजरंग बलीने दर्शन दिले. आज हा किल्ला चढण्याचे बळ दे अशी प्रार्थना करून मी निघालो.
आदल्या दिवशी कामणदुर्ग केल्याने शरीरात थकवा जाणवत होता. दुगाड फाट्यावरुन एक रिक्षा करुन मी दुगाड गावात पोहचलो. एकटे वर जाण्यापेक्षा गावातून एखादा वाटाड्या बरोबर घ्यावा म्हणून चौकशी सुरु केली, तर मुळात गावात फक्त बायकाच आणी लहाने मुले होती, एका बाईने सहजपणे सांगितले कि तीचा नवरा आला असता, पण त्याची सकाळची अजून उतरली नाही. कपाळावर हात मारून मी पुन्हा एकदा एकटाच किल्ल्याकडे निघालो. पुढे थोडी वस्ती लागली, हि होती पिराची वाडी. इथून डावीकडे फुटणार्या वाटेने अर्धा कि.मी चालल्यानंतर वाट एका ओढ्यातून पहिल्या टेकडीवर चढली. पहिल्या टेकडीवर फार झाडी नाही, त्यात सकाळचे चढते उन व कोकणातली दमट हवा, त्यात आदल्या दिवशी कामणदुर्गाने कस बघितलेला. या सर्व भन्नाट कॉम्बिनेशनने जीव मेटाकुटीला आला, तरी प्रत्येक पाउल निश्चयाने उचलत चढाई सुरु ठेवली. कशीबशी पहिली टेकडी चढुन वर आल्यानंतर तीन वाटा फुटल्या. डावीकडची वाट मोहिलीकडून
(वाट क्रं-४) येते व टेकडीला डावीकडून वळसा घालीन वर चढते, सरळ वाट थोड्या खडा चढाने माथ्यावर जाते. उजवीकडची वाट दाट झाडीतून पुढे सरकते व
दहा पंधरामिनीटातच तीला एक डाव्या हाताला फाटा फुटतो, सुरवातीला अस्पष्ट असणारी हि वाट नंतर ठळक होउन वर चढते. केवळ अनुभवाच्या जोरावर हि वाट मी शोधू शकलो. सरळ वाट पुढे घोटगाव ( वाट नं-२) किंवा भिवाळीकडे ( वाट नं-१) जाते.
या वाटेने चढताना अखेर कारवीतुन गुमतार्याचे माथ्याने दर्शन दिले.
जवळपास पाउण तासाने मी दुसर्या टेकडीच्या माथ्यावर पोहचलो, इथे झाडी आहे, पण बसण्यासाठी सोयीची जागा नसल्याने टेकडी उतरून पुढे निघालो. खर तर इतके चढल्यानंतर पुन्हा थोडे उतरायचे म्हणले तरी अंगावर काटा आला होता, कारण गुमतार्याचा माथा अजून खुप लांब होता. वाट थोडी उतरल्यानंतर सपाटी तर आलीच . पण इथे एक प्रचंड उंच आंब्याचे झाड आहे. त्याच्या गर्द सावलीत बसून भुकलाडू, तहानलाडूवर ताव मारला आणि थोडी विश्रांती घेतली.
परत उठून चढाई सुरु केली, तो डावी कडून मोहिलीची वाट येउन मिळाली. ह्यानंतरची चढाई बांबुच्या गर्द वनातून आहे. गारव्यामुळे चढण थोडी सुखद
झाली.
शेवटी एकदाचा माथा जवळ दिसला आणि हुश्श केले.
मागे वळून पाहिले असता, कसला खडा चढ आपण चढून आलो ते समजले.
माथा उजवीकडे ठेवत घसरड्या वाटेवरून चालत पुढे निघालो. नंतर परत माथ्याकडची कारवी दिसु लागली. इथे वर चढणारी वाट किल्ल्याच्या माथ्याकडे जाते तर सरळ पश्चिमेकडे जाणारी वाट खाली उतरून चिंबीचा पाडा या गावाकडे जाते.( वाट क्रं- ५)
इथून वाट प्रचंड घसरडी आहे. कारवीचा आधार घेत ,शरीर खेचत कसबसा माथ्याच्या कातळाजवळ आलो, ते पुढची वाट बघून मटकन खालीच बसलो. वाट एका खड्या नाळेतून मोठ्या दगडावरुन वर चढत होती. अखेरीस मनाचा हिय्या करून उठलो, इथून परत जाण्यात काहीच अर्थ नव्हता.
बर्यापैकी वर चढल्यानंतर हे कातळ दिसतात.
या कातळांच्या कडेने गेल्यास पश्चिमबाजुला हे कपार लागते, या कपारीत पाण्याचा नैसर्गीक साठा आहे. या मधुर पाण्याची चव आणी थंडावा अक्षरशः मेंदुपर्यंत पोहचला. (प्रकाशचित्र आंतरजालावरून साभार)
ताजातवाना होउन माथ्या कडे निघालो .आधी गोल बुरुजाने हात केला.
नंतर डावीकडे वळविलेले गोमुखी शैलीचे प्रवेश्द्वार दिसले. वास्तविक शिवाजी महाराजीनी बांधलेल्या किल्ल्याचे हे वैशिष्ठ्य इथे कसे हे आश्चर्यच आहे. बहुधा नाळेच्या नैसर्गिक रचनेमुळे असे बांधकाम केले असावे. दरवाज्याची मात्र कमानही अस्तित्वात नाही, फक्त उंबर्याच्यी पायरी पाहण्यास मिळते.
महाद्वारातून आत आल्यानंतर डाव्या हाताला सपाटी दिसते, याठिकाणी पाण्याची दोन टाकी आहेत, अर्थातच फक्त पावसाळ्यातच यात पाणी असते. यानंतर उजव्या बाजुला निघायचे
इथे पाण्याची सात कोरिव टाकी एकत्रच कोरलेली आहेत. त्यापैकी एका टाकीत पाणी आहे. पाणी असलेल्या टाकीची खोली ६ फुट असून रुंदी ६.५ फुट आहे व लांबी ८ फुट आहे. इतर टाक्या पूर्णपणे मातीने बुजला आहेत. त्या टाक्यांची लांबी ८ फुट लांब व ५ फुट रुंद आहेत.
या भागातच थोडीफार तटबंदी आहे. दरवाज्याच्या वरच्या बाजूने पुढे चालत गेले असता पुढे एक सुस्थितीत असलेला बुरुज आहे त्याची उंची साधारण २४ ते २५ फुट आहे. किल्यावर कोरीव टाक्यांच्या वर बालेकिल्ल्या कडे जाणाऱ्या वाटेवर एक लहान मंदिर आहे या मंदिरा जवळ जाणाऱ्या चार ते पाच पायऱ्या कातळात कोरलेल्या आहेत.
इथून सर्वोच्च माथ्यावर पोहचल्यानंतर काही जोती पहाण्यास मिळतात. हा भाग समुद्र सपाटीपासून ५८५ मी. आहे. इथून उत्तरेला टकमक किल्ला, नैऋत्येला
माहुली किल्ला व अलिकडे भिवंडी शहर दिसते.
वायव्येला हा तुंगारेश्वराचा डोंगर दिसतो.
तर पश्मिमेला कामणदुर्गाच्या माथ्याने दर्शन दिले.
गुगल मॅपवरून घेतलेला हा परिसराचा फोटो
हा सगळा ट्रेक करायला मला तब्बल चार तास लागले. मात्र थोडी लवकर आणी अनुकुल वातावरणात हा ट्रेक केल्यास ३ ते ३.५ तासात माथा गाठता येतो. माथ्यावर फार सपाटी नाही, तसेच पाणी हि जवळ नाही हे लक्षात घेता इथे मुक्काम न करणेच योग्य होईल, फार तर पायथ्याच्या दुगाड गावातल्या शाळेत मुक्काम केलेला चांगला. तुंगारेश्वराच्या जंगला बिबटे, कोल्हे, तरस आदी हिंस्त्र पशुंचा वावर असल्याने सावधगिरी बाळगली पाहिजे. नुसता गुमतार्याचा ट्रेक करण्यापेक्षा वज्रेश्वरी देवीचे, चिमाजी अप्पानी एखाद्या किल्ल्ल्यासारखे बांधलेले मंदिर, अकलोलीची नैसर्गिक चमत्कार असणारी गरम पाण्याची कुंडे आणि गणेशपुरी येथील नित्यानंद महाराजांची समाधी आणि तपोवन हे सर्व पहाण्यासारखे आहे. गणेशपुरी आणि वज्रेश्वरीला राहण्याची अणि जेवणाची चांगली सोय होते.
जवळपास २.५ तासाची थकविणारी उतराई करून मी दुगाड गावाबाहेरच्या वीट भट्टीवर पोहचलो. तिथे काही आंब्याची झाडे व त्याला चौकोनी कट्टे केले आहेत. प्रंचड दमल्याने सॅक बाजूला फेकून, धुळीची पर्वा न करता त्या मातीच्या कट्ट्यावर आडवा झालो. पंधरा मिनीटे फक्त श्वासच काय तो चाली होता, शरीराची
कोणतीही हालचाल करण्याच्या मनस्थितीत मी नव्हतो. अखेरीस अर्ध्या तासाने, थोडे खाउन व ईलेक्ट्रॉल घेउन दुगाड गावात पोहचलो. तिथे बरेच भजीचे स्टॉल दिसले. मला पहिल्यांदा हा काय प्रकार आहे ते समजेना आणि अचानक सकाळचा तो प्यालेला महानुभाव आठवला आणि डोक्यात प्रकाश पडला कि हि रात्रीची तयारी होती. कधी हे आदिवासी पाडे या दारूच्या चक्रातून मुक्त होणार कोण जाणे ?
दुगाडमधे रिक्षाची काही व्यवस्था होणार नाही हे लक्षात आल्याबरोबर दुगाड फाट्याच्या दिशेने निघालो. मोहिलीकडून एक रि़क्षा येताना दिसली, त्याला
लांबून हात केला, पण तो बहुधा संध्याकाळच्या मुडमधे असावा. लक्ष न देताच निघुन गेला. आता ३ कि.मी. चालातच दुगाड फाटा गाठावा लागणार हे सत्य
स्विकारून पुन्हा सगळी ताकत गोळा केली आणि फरफट सुरु ठेवली, तो अचानक मागुन एक स्विफ्ट आली, ट्राय तरी करु म्हणून हात केला आणि अपेक्षा नसताना तो थांबला. ए.सी. च्या गारव्यात आणि मउ कुशनवर टेकल्यानंतर विलक्षण बरे वाटले. सुदैवाने तो भिंवडीला जाणार होता. पायथ्याच्या गावातला असूनही तो एकदाही गुमतार्यावर गेला नव्हता. पायथ्याच्या गावात एक समजुत मला एकायला मिळाली कि किल्ल्यावर भुत असून ते लोकांना वरून ढकलून देते. अर्थातच मला या भुताने काही दर्शन दिले नाही कि ढकलूनही दिले नाही. मात्र याआधी एक मुलगी तटावरून पडली असे त्या स्विफ्ट मालकाने सांगितले. नंतरही दोन वर्षापुर्वी एका डोंबिवलीच्या एका ट्रेकरचा गुमतार्यावरून पडून मृत्यु झाल्याची बातमी वाचली. बहुधा तटबंदीशेजारी सेल्फीच्या नादात हे होत असावे. असो.
टीपः- ह्या किल्ल्याची अधिक माहिती सह्याद्री प्रतिष्ठानचे श्री. गणेश रघुवीर यांनी मोठ्या आस्थेने दिली, तसेच हि माहिती इथे वापरण्यास परवानगी दिली, ज्यामुळे अधिकाधीक ट्रेकर्स पर्यंत पोहचून सुरक्षितपणे गुमतार्याचा ट्रेक करता येईल.
त्यांच्या कार्याविषयी थोडे लिहीतो. सह्याद्री प्रतिष्ठानने या किल्यावर जवळपास १० हून अधिक दुर्ग संवर्धन मोहिमा घेऊन श्रमदान केले आहे. किल्यावर जाणाऱ्या अवघड वाटा सोयीस्कर करणे,टाके स्वच्छता,दिशा दर्शक नकाशा व इतिहास माहिती फलक (मुख्य हायवे पासून बाले किल्ल्या पर्यंत),दरवाजा वरील दगड व बुरजावरील योग्य ठिकाणी ठेवणे,किल्याच्या आजूबाजूच्या परिसरात वृक्षा रोपण करणे,किल्यावर नैसर्गिक जलस्त्रोत्र पासून बालेकील्या पर्यत दिशा दर्शक दाखवून किल्यावर बाराही महिने पाणी साठा उपलब्ध आहे हे शिवप्रेमी पर्यंत पोहचवले, आजूबाजूच्या दहा गावामध्ये किल्याच्या माहितीचे पत्रक(पाम्प्लेट) वाटण्यात आले,भिवंडी मधील प्रसिद्ध वज्रेश्वरी मंदिर येथे किल्याचा माहिती व नकाशा फलक लावण्यात आला आहे.तसेच मंदिराच्या ट्रस्टी श्री अरुण शेवाळे यांनी मंदिर परिसरात किल्याचा नकाशा व माहिती फलक लावण्याची परवानगी दिली व स्थानिक शिव्प्रेमिंनी मोहिमेत सहभागी होऊन प्रचंड प्रतिसाद दिला आहे. स्थानिक गावकऱ्यासोबत दुर्ग संवर्धन व स्थानिक ्रामपंचायत सदस्य यांना किल्याच्या पर्यटना विषयी महत्व समजावून बैठका घेण्यात आले. वन विभाग व भूमी लेख अधिकारी यांनी कामाची पाहणी करून पुढील कार्याला सहकार्य करण्याची ग्वाही दिली. किल्यावर जर गिर्यारोहक किवा पर्यटक यांना आपात्कालीन स्थितीत मदत करण्यासाठी (रेस्कू ऑपरेशन) या साठी भिवंडी विभागातील पदाधिकारी सज्ज असून त्यांचे संपर्क क्रमांक पायथ्याशी फलकावर देण्यात आले आहेत.
सह्याद्री प्रतिष्ठानचे श्री. गणेश रघुवीर यांचा मी अत्यंत ऋणी राहीन.
त्यांनी लिहीलेली गुमतारा किल्ल्याची माहिती यंदाच्या "दुर्ग" या मासिकाच्या दिवाळी अंकात आली आहे.
गुमतारा किल्ल्याचा नकाशा
गुमतारा परिसराचा नकाशा
संदर्भ ग्रंथः-
१ ) दुर्गसंपदा ठाण्याची- सदाशिव टेटविलकर
२ ) शिवछत्रपतीच्या दुर्गाचां शोध - गुरुसिध्द अक्कलकोट
३ ) ठाणे जिल्हा गॅझेटिअर
४ ) डोगंरयात्रा- आनंद पाळंदे
५ ) www.sahyadripratishthan.com हि वेबसाईट
प्रतिक्रिया
12 May 2017 - 2:23 pm | एस
अप्रतिम! बराच दुर्गम दिसत आहे. हे नकाशे तुम्ही स्वतः बनवले आहेत का? कसे बनवले त्याचीही माहिती दिल्यास आभारी राहीन.
14 May 2017 - 2:21 pm | दुर्गविहारी
किल्ला तितकासा दुर्गम नाही, फक्त शेवटीची चढाई धसार्यामुळे त्रासदायक आहे. कोकणातले दमट वातावरण लक्षात घेता हि भटकंती नोव्हेंबर ते जानेवरीपर्यंतच करणे योग्य होईल. मात्र मी फेब्रुवारीच्या शेवटी गेलो होतो आणि आदल्या दिवशी कामणदुर्गाची चार तासाची चढाई यामुळे फार त्रास झाला.
सुरवातीच्या काही धाग्यात हाताने काढलेले नकाशे पोस्ट केले होते, पण माझे दिव्य अक्षर ओळखले नाही तर वाचकाना अडचण येउ नये यासाठी आता कोरल ड्रॉ या सॉफ्टवेअरमधून नकाशे तयार करून त्याची .jpeg फाईल तयार करून धाग्यात टाकतो. नकाशा शक्य तितका अचुक व्हावा यासाठी wikimapia वरुन स्क्रिनशॉट धेउन कोरल मधे पेस्ट करतो व हि ईमेज लॉक करून फ्रि हँड टुलने त्यावर नकाशा तयार करतो.
16 May 2017 - 5:24 pm | एस
वा! छान.
18 May 2017 - 9:02 am | अभ्या..
ही परफेक्ट आयडिया आहे नकाशा काढायाची. शार्प आणि अचूक येते इमेज.
रेफरेन्स मैप लॉक करून त्यावर ड्रा करने आवडले.
.
ट्रेकिंग जमत नसले तरि अपिरिचित किल्लयांची माहिती होतीय. धन्यवाद.
12 May 2017 - 3:23 pm | कंजूस
सर्वसंपूर्ण लेख झाला आहे. फोटो,नकाशे छान.
12 May 2017 - 3:35 pm | किसन शिंदे
सुंदर चाललीये ही भटकंती.
12 May 2017 - 7:20 pm | यशोधरा
भा हा री ही ही!
12 May 2017 - 9:33 pm | पद्मावति
+१००
14 May 2017 - 12:04 pm | पैसा
खूप छान लिहिताय!
14 May 2017 - 2:24 pm | दुर्गविहारी
एस सर ,किसन शिंदे, कंजुस काका, यशोधरा, पद्मावती आणि पैसा ताई तुम्ही अगदी पहिल्या धाग्यापासून कौतुक करताय त्याबध्द्ल खरच धन्यवाद.
14 May 2017 - 2:27 pm | इरसाल कार्टं
कोहोज नंतर हा मला सगळ्यात जवळचा किल्ला. २०१० मध्ये या किल्ल्यावर गेलो होतो. तीव्र चढाव आणि दगड गोट्यांचा निसरडा रास्ता फार दमछाक करतो.
हे अगदी खरंय, पायथ्याच्या गावांनाही हा डोंगर म्हणूनच ज्ञात आहे.
हा अनुभव घेण्याची संधी मलाही मिळाली होती. उन्हाळ्यातही हे पाणी चालू असते.
आम्ही गेलो होतो तेव्हा अख्ख्या वाटेल रानकेळ्यांची भरपूर झाडे होती तिथे अन बांबूचं जंगलही दात होतं.
तुमचं वर्णन वाचून पुन्हा जायची इच्छा व्हायला लागलीय.
16 May 2017 - 5:47 pm | जगप्रवासी
चला मग प्लान करा आम्हीपण येऊ
14 May 2017 - 5:46 pm | स्पा
जबरदस्त सुरु आहे लेखमाला
14 May 2017 - 6:04 pm | स्वच्छंदी_मनोज
मस्तच.. असेच अजून आडवळणाचे किल्ले येऊदेत..
पण गुमतारा म्हटले की आम्हाला आमच्या नारायण चौधरी काकांचीच आठवण येते :( :(
14 May 2017 - 7:27 pm | प्रचेतस
हा लेख सुद्धा जबरीच. नकाशामुळे परिपूर्ण झाला आहे.
वज्रेश्वरी, गणेशपुरीची उन्हाळी पाहिली होती खूप पूर्वी.
15 May 2017 - 2:39 pm | पाटीलभाऊ
सुंदर लेख आणि फोटो.
अशीच भटकंती आणि लेखमाला सुरु ठेवा.
15 May 2017 - 8:05 pm | दुर्गविहारी
ईरसाल कार्ट, स्वंछदी मनोज, स्पा, वल्लीदा आणि पाटीलभाउ सर्वांचे मनापासून आभार . _/\_
आता पुढच्या आठवड्यापासून राणादाच्या कोल्हापुर जिल्ह्यातील दुर्गभ्रमंती सुरु करणार आहे.
चालतयं नव्ह !
16 May 2017 - 5:07 pm | सरल मान
चालतयं की !
16 May 2017 - 8:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपले सर्वच लेखन माहितीपूर्ण, उत्तम तपशील उत्तम छायाचित्रे यांनी परिपूर्ण आहेत. लेखमालिका वाचतोच आहे.मन:पूर्वक शुभेच्छा !!!
ता.क. मला फोटो जरा लंबुकळे वाटलेत.
-दिलीप बिरुटे
16 May 2017 - 11:44 am | दुर्गविहारी
धन्यवाद सर . मोबाईलवर तसे का दिसताहेत हे मलाही समजत नाही, तरी यावर काही मार्ग आहे का?
16 May 2017 - 5:22 pm | एस
फोटो दुरुस्त केले आहेत. फोटोंची लिंक देताना आपल्याला त्यात width आणि height टॅग दिसतात. त्यातला एकच टॅग द्यायचा.
फोटो आडवा असेल तर width="640" द्यायची, आणि height द्यायची नाही.
फोटो उभा असेल height="480" द्यायची, width द्यायची नाही.
16 May 2017 - 5:27 pm | प्रचेतस
आता width आणि height टॅग द्यायची गरज नाही. आपोआप अॅडजस्ट होतो ह्या थीममध्ये.
16 May 2017 - 7:41 pm | दुर्गविहारी
येत्या धाग्यापासूनच करून पाहतो.
17 May 2017 - 11:21 pm | एस
फोटोचा आकार जर ३:४ किंवा ४:३ या प्रमाणात नसेल तर या थीममध्ये height आणि width दोन्ही दिल्यास तो आडवा-उभा ताणला जातो. जसे ह्या धाग्यातले फोटो आधी दिसत होते. फोटो वेबसाठी अपलोड करताना आधीच शक्यतो 640 x 480 pixels ह्या आकारात रिसाईझ करून अपलोड केलेले बरे पडतात. मग ते कुठल्याही ब्राऊजरमध्ये वा मोबाईलवर व्यवस्थित दिसू शकतात. तेव्हा लांबी-रुंदी नाही दिली तरी चालते.
16 May 2017 - 5:50 pm | जगप्रवासी
नकाशासोबत इतक्या तपशीलवार माहिती लिहिल्यामुळे गडावर जायला सोपे पडेल
18 May 2017 - 10:21 am | विशाल कुलकर्णी
जबरी लेख देवानू ! धन्यवाद ...
18 May 2017 - 2:29 pm | अप्पा जोगळेकर
किती सुंदर फिरणे आहे हे. एकट्यानेच जाता काय काका ?
असे एकट्यानेच ट्रेकिंग करावे असे वाटू लागले आहे.
23 May 2017 - 10:28 pm | चौथा कोनाडा
गुमतार्याची भन्नाट भटकंती !
सुंदर लेखन, समर्पक फोटो अन नकाश्यांमुळे लेख सुपर्ब झालाय !