सांगली आणि सातारा या जिल्ह्यांच्या सीमेवर, नरसिंहाचे प्राचीन भुयारी देवस्थानाच्या आणि कॄष्णेच्या एन पात्रातील बेटाची सोबत असलेला एक अतिशय सोपा पण रम्य परिसर लाभलेला किल्ला म्हणजे मच्छिंद्रगड. आज याचीच भटकंती करायची आहे. या किल्ल्याबरोबरच परिसरातील सागरेश्वर अभयारण्य, नव्याने विकसीत केलेले पर्यटनस्थळ चौरंगीनाथ हेही पहाता येतील. या सर्वांची माहिती या धाग्यात घ्यावयाची आहे.
मच्छिंद्रगड परिसराचा नकाशा
गड जरी भौगोलिकदॄष्ट्या सांगली जिल्ह्यात असला तरी ईथे येण्याचे सोयीचे ठिकाण म्हणजे कॄष्णा-कोयना नद्यांच्या प्रितीसंगमावर वसलेले कराड. या किल्ल्यावर येण्यास तीन मार्ग आहेत,
१ ) कराड-तासगाव रस्त्यावरून थेट किल्ले मच्छिंद्रगड या गावासाठी फाटा फुटलाय, तेथून थेट गड पायथा गाठता येईल, किंवा कॄष्णा सहकारी साखर कारखान्यामुळे प्रसिध्द असलेल्या रेठरे( बुद्रुक) गावातून सुध्दा किल्ले मच्छिंद्रगड गावात जाता येते.
२ ) ईस्लामपुरवरून बहे -बोरगावमार्गे किल्ले मच्छिंद्रगड मार्गे किंवा बेरडमाचीमार्गे किल्ल्यावर जाता येईल.
३ ) थेट पुणे-बेंगळूरू महामार्गावरून कराडजवळच्या वाठारगावातून रेठरे( खुर्द) मार्गे रेठरे(बुद्रुक ) व तेथून किल्ले मच्छिंद्रगड असेही शक्य आहे.
ईतिहासात डोकावल्यास, शिवाजी महाराजांनी अफझलखानाचे पारिपत्य १० नोव्हेंबर १६५९ ला केल्यानंतर १३ नोव्हेंबर १६६९ ते फेब्रुवारी १६६६० या दरम्यान मंच्छिंद्र्नाथाचा डोंगर व आजुबाजुची ठाणी ताब्यात घेतली पण महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकल्यानंतर सिध्दी जोहरने हि ठाणी पुन्हा ताब्यात घेउन या भागात आदिलशाहीचे बस्तान बसविले. पुढे १६७०-७१ च्या दरम्यान या भागातील मुलुख जिंकून घेतला. चिटणीसाच्या बखरीप्रमाणे, "(आदिलशाहीचे) निंबाळकर, गाडगे (घाटगे) वगैरे पुंडपणा करुन होते. त्यास दबावाखाली जागाजागा किल्ले नवेच बांधिले.त्यात मच्छिंद्रगड हे नवेच बांधिले". इ.स.१६७६ च्या सुमारास स्वराज्यास बळकटी आणण्याकरता म्हणून छत्रपती शिवरायांनी जी दुर्गशृंखला बांधली त्यापैकी मच्छिंद्रगड हा शेवटचा किल्ला. मच्छिंद्रगड किल्ला कमळभैरवाच्या डोंगराशेजारील एका वाटोळ्या टेकडीवर उभा आहे. पुढे इ.स. १६९३ मध्ये हा गड मोगलांच्या ताब्यात होता त्यावेळी याचा किल्लेदार देवीसिंग होता. १२ नोव्हेंबर १६९३ रोजी औरंगजेब तख्त्तेखांवर बसून मच्छिंद्रगडाजवळ पोहोचला, तेव्हा मच्छिंद्रगडाचा किल्लेदार त्याच्या स्वागतास गड उतरून गेला, त्यावेळी औरंगजेबाने गडावरील तोफा उडवून देण्याचा हुकूम दिला व येथून पुढे तो वसंतगडास गेला. औरंगजेबाच्या म्रुत्यूनंतर हा गड परत मराठ्यांनी जिंकून घेतला. पेशवाईत १८१० साली बापु गोखल्यांनी हा गड पंतप्रतिनिधींकडून घेतला. पुढे इ.स.१८१८ मध्ये कर्नल हेविट या इंग्रज अधिकाऱ्याने हा गड जिंकून घेतला
गडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत.
१ ) किल्ले मच्छिंद्रगड गावातून गडावर जाण्यासाठी पायऱ्यांची वाट केलेली असून या वाटेने साधारण अर्धा तास चढाई केल्यानंतर आपण मच्छिंद्रगडाच्या माथ्यावर येवून पोहोचतो. या शिवाय गावातूनच कच्चा गाडी रस्ता वरपर्यंत गेलेला आहे. मात्र रस्त्याचे स्वरुप बघता फक्त बाईक सारखे वाहन असेल तरच या रस्त्याचा उपयोग करणे योग्य होईल. तसाही गड अर्ध्या तासात चढून होतो.
२ ) गडाच्या दक्षिणेअंगाच्या बेरड माची गावातून पायर्यांची वाट मागच्या बाजूने माथ्यावर येते. बेरडमाची गावात जाण्यासाठी रेठरे-कोळे नरसिंगपुर रस्त्यावरुन फाटा आहे.
मच्छिंद्रगडाचा नकाशा
किल्ले मंच्छिंद्रगड गावातून गेल्यास उत्तर दरवाज्यातून आपला प्रवेश होतो. गडाचे प्रवेश्द्वार नष्ट झाले असले तरी त्याची गोमुखी बांधणी डोळ्यात भरते. गोमुखी दरवाजा, माची ह्या सर्व शिवनिर्मीत गडाची वैशिष्ठे ईथे पहाण्यास मिळतात.
कोणत्याही रस्त्याने गड माथ्यावर पोहचल्यानंतर माथ्याच्या बरोबर मध्यभागी मच्छिंद्रनाथांचे मंदिर आहे.
मंदिर प्रशस्त असून विविध शिल्पांनी सजविलेले आहे. येथे भाविकांचा नेहमी राबता असतो.
मंदिरामधे नवनाथ महिमा सांगणारा हा माहितीफलक लावलेला आहे.
बाहेर पार असून त्यात एक देवनागरी लिपीतील शिलालेख दगड म्हणून चिणून टाकलाय. ईतक्या महत्वाच्या एतिहासिक पुराव्याची हि हेळसांड योग्य वाटत नाही. पण कदाचित त्यामुळेच हा शिलालेख सुरक्षित राहिला आहे.
या शिलालेखाच्या अक्षराचे वळण कोळे नरसिंहपुरातील नरसिंह मंदिरातील शिलालेखासारखेच आहे.
मंदिरा समोर तोफा मांडून ठेवल्या आहेत.
काही तोफा चक्क जमीनीत गाडल्या आहेत.
येथून देवळाच्या पिछाडीस एक मोठी कोरडी विहीर आहे, नंतर तटाकडेने पुढे गेल्यावर जुन्या काळातील समाध्या दिसतात.
मंदिराच्या वायव्येस बांधीव पाण्याचे टाके आहे. पाणी मात्र खराब आहे.
मंदिराच्या द्क्षिणेला सती शिळा आहे.
जवळच वाड्याचे भग्नावशेष आहेत.
दक्षिण टोकाला बुरुज आणि दरवाज्यातून वाट खाली उतरते. हि वाट बेरड माची गावात जाते. गडाला दोन माच्या आहेत,
पुर्वेकडची लवणमाची,
आणि पश्चिमेकडची बेरडमाची. गडाच्या पुर्व उतारावर नव्याने जीर्णोध्दार केलेले दत्त मंदिर आहे जवळच झरा आणि खडकात खोदलेले कोरीव टाके आहे.
गडाची तटबंदी बर्यापैकी शाबुत आहे. त्यावर दगडफुल वाढल्याने सर्व दगड पांढरेशुभ्र बनले आहेत.
सध्या या गडाचा समावेश 'क' वर्ग पर्यटन स्थळात झाल्यामुळे बरीच नवीन कामे झाली आहेत. यात गडावर फिरण्यासाठी पदपथ बांधले आहेत.
पश्चिम बाजूला पर्यटकांना बसण्यासाठी सिमेंटच्या छ्त्र्या उभारलेल्या आहेत.
गडावर सतत वहाणारे वारे, उसाच्या शेतीमुळे समॄध्द झालेला परिसर, नागमोडी वहात मोठा वळसा घेतलेली कॄष्णा नदी, कराड-सांगली दरम्यान धावणारी ईटूकली निळ्या रंगाची रेल्वे, पुर्वेला दिसणारी सागरेश्वर अभयारण्याची रांग, त्यातच नवीनच विकसीत झालेले "चौरंगीनाथ" हे पर्यटनस्थळ, उत्तरेला दिसणारा सदाशिवगड आणी लांब दक्षिणेला दिसणारा विलासगड उर्फ मल्लिकार्जुन, शिवाय संध्याकाळी दिसणारे कराड आणी ईस्लामपुरचे दिवे आणि हायवेवरून धावणार्या गाड्यांचे लपाछपी करणारे लाईट, एकंदर खुपच सुखद अनुभव देणारा हा ट्रेक आहे.
कोळे नरसिंगपुरचे नरसिंह मंदिरः-
या मंदिराचे उल्लेख अतिशय प्राचीन मानले जातात. महाभारत पुर्वकालात वेद व्यासांचे पिता पराशरमुनींना या ठिकाणी मुर्तीचे दर्शन झाले असे मानले जाते. पुढे ई.स. १०७ मधे कौंडिण्यपुर( आजचे कुंडल ) राजा भीमदेव यांचे कडून मुर्तीचा शोध व स्थापना झाली. इ.स. ११२४ मधे नामदेव महाराजांचे वंशज यदुशेठ रिळे गावातून ईथे देवदर्शनासाठी आले. ई.स. १२७३ मधे देवगिरीचे रामदेवराव यादव यांनी हेमाडपंतांकडून भुयारी मंदिराचे बांधकाम पुर्ण.
ई.स. १४४९ मधे गुरुचरित्रातील १५ व्या अध्यायातील ७५ व्या ओवीमधे या क्षेत्राचा उल्लेख आहे.
महालक्ष्मी कोल्हापुरासी । दक्षिण काशी करवीरसान्निध असे बरवा ।
कोल्हग्रामी नृसिंहदेव । परमात्मा सदाशिव तोचि असे प्रत्यक्ष ॥
असे नृसिंहस्वरस्वती यांनी या देवस्थानाचे वर्णन केले आहे. पुढे ई.स. १६२६ मधे विजापुरचा बादशहा महमद आदिलशहाने देवस्थानाला जमीन ईनाम दिली. ई.स. १६६२ मधे समर्थ रामदास स्वामीनी या स्थानाला दोनदा भेट दिली. ई.स.१७१८ मधे शाहु छत्रपतींनी अग्रहार जमीन ईनाम दिली. कोल्हापुर संस्थानाचे राजगुरु यांनी पुजारी मंडळींवर होण्यार्या अन्यायाची दाद नाना फडणवीसयांचे कडे मागितली, त्यात पुजार्यांचा पक्ष विजयी झाला.
कोळे नरसिंहपुरगावात उतरले कि रस्त्याच्या पश्चिमबाजुला दगडी नरसिंहाचे मंदिर नजरेत भरते. दिंडी दरवाज्यातून प्रवेश केला कि प्रथम दोन वृंदावने लागतात. मुर्ती हि जमीनी खाली भुयारात असल्याने वायुविजनासाठीची सोय ह्या तुळशीवॄंदावनाला आतुन झरोका असून त्याचे तोंड थेट मुर्ती असलेल्या गाभार्यात उघडते. त्यामुळे या वॄंदावनात नाणे टाकले कि ते थेट नरसिंहाच्या मुर्तीच्या पायी पडते. हि वॄंदावने पाहून पुढे निघालो कि एक दरवाजा पश्चिमेला उघडतो, तिथून भर्राट वारा आत येत असतो.
दरवाज्यातून डोकावले कि मंदिराच्या दक्षिण दिशेने कॄष्णेचे विस्तृत पात्र दिसते. कदाचित पुर आलाच तर मंदिराचे रक्षण व्हावे म्हणून पाच बुरुजी तटबंदी मंदिराला केलेली आहे. नदीचे पात्र पाहून पुन्हा आत यायचे. एक जिना खाली उतरताना दिसतो. त्याचा सुरवातीलाच एक देवनागरी शिलालेख दिसतो. पायर्या उतरून खाली गेल्यानंतर एक प्रशस्त गाभारा आहे. याच्या एका कोपर्यात एक छोटा दरवाजा आहे, त्याला सहाण म्हणतात. परचक्र आल्यास हा दरवाजा बंद करून मुर्तीचे रक्षण करता येत असेल. दरवाज्यातून वाकून आत गेल्यानंतर थोडे खाली उतरून घोटाभर पाण्यातून चालत भुयारी मार्गातून आत गेल्यानंतर एकदाचे आपण गाभार्यात पोहचतो.ईथे ज्यासाठी आट्टाहास करून आपण ईथंवर आलो ती ज्वाला नरसिंहाची रौद्र सुंदर मुर्ती पहाण्यास मिळते.
( प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार )
एकुण सोळा हातापैकी चार हात भग्न झालेले आहेत. हि मुर्ती ई.स. २ र्या शतकातील आहे, मुर्तीच्या डाव्या हातात ढाल-वज्र- धनुष्य-पाश अशी आयुधे आहेत तर एका हाताने हिरण्य कश्यपुचे डोके धरलेले आहे. एका हाताची नखे त्याच्या पोटात घुसवली आहेत. मुर्तीच्या उजवीकडील हातामधे मुरली-कमळ-परशू-चक्र ही आयुधे आहेत. एका हाताने हिरण्यकश्यपुचा पाय पकडून एका हाताने त्याचे पोट फाडले आहे. विस्फारलेले डोळे, विस्कटलेली आयाळ, ताठ कान व उघड्या तोंडातून लवलवणारी जीभ यामुळे मुर्ती भयाकारी वाटते. या मुर्तीच्या मागच्या प्रभावळीत मस्त्य,कूर्म, वराह, वामन, नरसिंह, परशुराम्,कॄष्ण्,राम, बुध्द व कलंकी असे अवतार कोरलेले आहेत, मात्र आधी कॄष्ण आणि मग राम असा क्रम चुकलेला आहे. मधोमध किर्तीमुख व बाजुला मकरमुख आहेत.
( प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार )
अत्यंत सुंदर अशी एकाच पाषाणातील मुळ मुर्ती मात्र फुलांच्या आरासी खाली दडलेली दिसते. भल्या पहाटे पुजेच्या वेळीच मुळ मुर्ती पहाण्यास मिळते.वैशाख शुध्द चतुर्दशी म्हणजे बुध्द पौर्णिमेच्या आदल्या दिवशी ईथे नरसिंह जयंतीचा उत्सव थाटात साजरा केला. तसेच नरसिंह नवरात्र देखील साजरे केले जाते.
बहे बोरगावच मारुती आणि रामलिंग बेटः-
मच्छिंद्रगड आणि नरसिंहपुरच्या भेटीत आणखी न चुकता बघण्याचे आणखी एक ठिकाण म्हणजे रामलिंग बेट.
कोळे नरसिंगपुरपासून अवघ्या दोन कि,मी.वर कृष्णेच्या विस्तृत नदीपात्रावर पुल आहे. नदीच्या मधेच रामलिंग बेट आहे.
मोठ्या पुलाच्या एका बाजुला पायपुल आहे. सध्या तिथे पर्यटकांसाठी निरीक्षण चबुतरा उभा केलेला आहे.
बेटावर जाण्यासाठी पायपुल वरच्या मोठ्या पुलाच्या कमानीखालून गेला आहे.
दुतर्फा नदीचे खडकाळ पात्र लागते. पात्रात मोठ्या प्रमाणात रांजणकुंड दिसतात, यावरून नदीचे आत्ताचे पात्र किती रोडावले आहे याचा आपण अंदाज करु शकतो.
मधोमध शंकराचे देउळ आहे आणि मागे समर्थ स्थापित मारुती मंदिर आहे.
या मारुती संदर्भात एक आख्यायिका प्रचलित आहे. ती अशी- रावणचा पराभव करून श्रीराम आयोध्येला परत जात असताना कॄष्णेच्या वाळवंटात स्नानसंध्या करण्यासाठी गेले असताना एकाएकी कॄष्णानदीला पुर आला. तेव्हा आपले दोन्ही बाहू उभारून हनुमंताने पुराच्या पाण्याचे दोन भाग केले. पाणी दोन्ही अंगाने वाहिल्यामुळे मधोमध बेट तयार झाले. बाहुमुळे पाणी विभागले गेले म्हणून नाव पडले "बाहे". त्याचेच अपभ्रंश होउन बहे असे गावचे नाव पडले.
पुढे समर्थ या परिसरात फिरत आले असता, या बेटावर त्यांना हनुमानाचे दर्शन घडेल असे वाटले. मात्र मुर्तीरुपात हनुमंत आढळले नाहीत, म्हणून त्यांनी मारुतीरायाचा धावा केला. तेव्हा त्यांना मागच्या डोहातून त्यांना हाका एकु आल्या. समर्थांनी डोहात उडी मारली, मुर्ती बाहेर काढली आणि तीची स्थापना येथे केली. याचे वर्णन त्यांनी असे केले.
हनुमंत पहावयासी आलो,
दिसेना सखा थोर विस्मीत झालो ।
तयाविण देवालये ती उदासे,
जळातून बोभाईला दास दासे ॥
बेटावर एक-दोन घरे आहेत, अगदी महापुरात देखील हे लोक बेट सोडून गेले नाहीत.
आजुबाजुला असलेली झाडी, पक्ष्यांची किलबील आणि नदीपात्रात पाय सोडून निवांत अनुभवलेला सुर्यास्त आपल्याला वेगळ्याच विश्वात घेउन जातो.
या शिवाय सवड असल्यास परिसरातील सागरेश्वर अभयारण्य आणि चौरंगीनाथ हे सुध्दा पहाता येतील.
तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची
संदर्भ ग्रंथः-
१ ) सांगली जिल्हा गॅझेटियर
२ ) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा-सतिश अक्कलकोट
३ ) आडवाटेवरचा महाराष्ट्र- प्र. के. घाणेकर
४ ) www.sahyadripratishthan.com हि वेबसाइट
प्रतिक्रिया
27 Oct 2017 - 3:47 pm | हेमंत ववले
pratyek veli naveen kahi taree mahitee milate tumachya likhanatun
27 Oct 2017 - 5:09 pm | सिरुसेरि
नेहमीप्रमाणेच +१ लेख , माहिती आणी फोटो .
28 Oct 2017 - 6:44 am | प्रचेतस
उत्कृष्ट लेखन.
गडावरील वीरगळ पाहून हा गड शिवनिर्मित नसावा असे वाटते. ह्याची निर्मिती शिलाहारांच्या काळात झाली असावी.
नृसिंह मंदिरातील मूर्ती टिपिकल होयसळ शैलीतील आहे. साधारण ११/१२ वे शतक. कदाचित यादवांनी केलेल्या स्वारीतून ती कर्नाटकातून येथे आणली गेली असावी.
1 Nov 2017 - 12:23 pm | दुर्गविहारी
प्रतिसादाबध्दल धन्यवाद. गडावरचे वीरगळ कदाचित पायथ्यावरुन गडावर आणले असतील असे वाटते. तसाही गड उंचीला अत्यल्प आहे. नाव घ्यावे असे मोठे युध्द झालेले नाही.
मात्र शिवकालपुर्व या गडाचे कोणतेही उल्लेख आढळत नाहीत. अगदी अफझलखानाच्या पराभवानंतर महाराजांनी जे आदिलशहाचे किल्ले घेतले त्यात याचा उल्लेख नाही. सिद्दी जोहरच्या स्वारीतही याचा गड म्हणून उल्लेख नाही. शिवाय भोजराजाने जे पंधरा किल्ले या परिसरात बांधले त्यात याचे नाव नाही. मुख्य दोन्ही दरवाजे भग्न झालेले असले तरी, गोमुखी बांधणी स्पष्ट करते कि गडाची उभारणी शिवकाळात झाली असावी. चिटणीसाची बखर हा फार विश्वसनीय पुरावा मानला जात नसेल तरी गड शिवाजी राजांनी बांधला असे अनुमान काढता येते.
नरसिंहाच्या मुर्ती बाबत मात्र सहमत/
30 Oct 2017 - 10:24 pm | mayu4u
उत्कृष्ट लेख.
31 Oct 2017 - 11:51 am | पाटीलभाऊ
नेहमीप्रमाणेच मस्त भटकंती आणि उत्तम लेख
31 Oct 2017 - 3:46 pm | निशाचर
नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख. नरसिंहाची मूर्ती अप्रतिम आहे.
31 Oct 2017 - 4:29 pm | arunjoshi123
मस्त.
31 Oct 2017 - 11:04 pm | एस
हा परिसर नक्कीच भेट देण्यासारखा आहे. नेहमीप्रमाणेच उत्तम लिखाण.
31 Oct 2017 - 11:04 pm | एस
हा परिसर नक्कीच भेट देण्यासारखा आहे. नेहमीप्रमाणेच उत्तम लिखाण.
1 Nov 2017 - 12:27 pm | दुर्गविहारी
Hemantvavale, सिरुसेरि, एस, वल्ली, mayu4u, पाटीलभाऊ , निशाचर, arunjoshi123 आणि असंख्य वाचकांचे मनापासून आभार. अनवट किल्ले मालिकेत पुढचा धागा सांगली जिल्ह्यातील किल्ल्यांचा अखेरचा धागा असेल.
6 Nov 2017 - 4:47 pm | चावटमेला
छान लेख. बहे- नरसिंगपूरचा परिसर अतिशय रम्य आहे. लहानपणी बर्याचदा गेलो आहे. पुढचा लेख भूपाळगड का?
8 Nov 2017 - 6:03 pm | चौथा कोनाडा
सुंदर लेखन अन अप्रतिम फोटोज ! शेवटचा तर क्लासिकच !