http://www.misalpav.com/node/40963
http://www.misalpav.com/node/41040
नानांचे भाऊ कधीच त्यांच्या कारभारपणाच्या आड आले नाहीत.
नाना तीन नंबरचे, पण सगळे भाऊ त्यांच्याशी अदबीने वागत. धाकटा तात्या अजून पण त्यांच्या समोर थांबत नाही.
भावजयांची त्यांच्या समोर एक शब्द बोलायची टाप नव्हती.
मोठ्या दोन भावांनी मागच्या वर्षीच कचरेवाडीला कायमचा टाटा बाय बाय केला आहे.
पुतणे मात्र सगळे चमत्कारिक. नेहमी धोतराला पाण्यात पाहत. वरवर जिव्हाळा दाखवत.
नानांनी कारभारपणात पैसा ढापला, वरलाकडची चांगली जमीन स्वतःच्या वाट्याला घेतली आणि पावण्याचे पोर्र्र उरावर आणून बसवले हे त्यांचे नेहमीचे आरोप.
बुलेटवर फिरणाऱ्या "माउलीने" उभ्या आयुष्यात एक जुडी लुगडं आणि चोळीचा ख्खन म्हातारीला घेतलेला मी पाहिला नाही. सोन्याचा फुटका मणी तर दूरची बात. नेहमी सुधारकाच्या भाषेत बोलायचे "हे कापडवाले अन सोनार लुटायलाच बसल्यात."
म्हातारीने शेवट पर्यंत भावांनी दिवाळीत घेतल्या नव्वारीवर जीवनाची सांगता केली. मेली तेव्हा हजाराच्या तीन नोटा काढून नानांनी बाळू मामाला इरकल आणायला लावली. पण शेवटीची साडी माहेरची असते असे कोणीतरी सांगितले म्हणून ती भागुबाईला देऊन टाकली. दहाव्याला ११ सुवासणीना १-१ ग्रॅमचे मणी वाटले. शेरडं विकून म्हातारीने स्वतः केलेल्या साडे तीन तोळ्याच्या घंटणला मात्र चितेवर तसेच जळून दिले. कोणाला ही त्याला हात लावून दिला नाही. सावडताना (तिसरा दिवस) गुंजभर पण सोने सापडले नाही.
मग ढापलेल्या पैसा गेला कुठे?
नानांनी भावांच्या मिळून एकूण १३ पोरींची लग्न लावून दिली ती पण स्व-खर्चाने. प्रत्येक पोरीला लग्न झाल्यावर ३-४ वर्ष तेला-मिठा पासून ते जावयांच्या कपडालत्ता पर्यंत जपलं. प्रत्येकीच्या लग्नात गोदरेजच कपाट आणि खैताणचा फॅन घेण्याचा त्यांचा शिरस्ता होता. त्या काळात हे खूप मोठे अप्रुब होतं.
कारभारी असल्यामुळे पहिल्यापासून सोयरिकीतली सुपारी, साखरपुडे, लग्नें, बाराशे, मैती, दहावे आणि श्राद्धे सगळे नानाच्या गळयात. याचा हिशोब काढला तर कोटीत खर्च जाईल.
बाहेरगावच्या प्रत्येक पाहुणा जेवल्या शिवाय आणि आसपासचा कोणता पण ऐरा गैरा चहा पिल्या शिवाय सोडला नाही. आजच्या घडीला पण घरात २ माणसाचा आगाऊ स्वयंपाक असतोच. यात नानांचं एवढं कर्तृत्व नव्हते म्हणा, इंदाबाईच "अन्नपूर्णा" होती. याला काय थोडा पैसा गेला असेल व्हय!
हे सगळं नाना वायले राहिल्या नंतरच सांगतोय...!
वरलाकडची जमिनीचा बांधकरी फराट्याचा संज्या होता. 'दाढी'वाल्यांची आर्थिक बाजू सांभाळणारा बिनपगारी अन निल अधिकारी सचिव. त्याचा बाप नानांचा हार्ड वैरी. भावांची आणि पुतण्यांची कर्तबगारी माहित असल्यामुळे, त्यांच्या हयातीत कोणी फराट्याशी व्यवहार करू नये म्हणून त्या बाजूची १० एकर जमीन स्वतःच्या नावावर ठेवली होती.
पावण्याच्या पोराला आणून धोतराने एक दगडात बरीच पाखरं घायाळ केली होती. कोणताच पक्षी मरून देणे त्यांच्या हिताचे नव्हते.
----
म्हातारी गेल्यावर नानांनी माळवादाचे घर सोडून १०० पावलांवर असणारी गोठ्यातली खोली पकडली. त्या खोलीतले सगळे भंगार १२० रुपयात विकून टाकले वरून भंगारवाल्याला चहा पाजला.
वूडनची फरशी टाकली, त्यावर गालिच्याची डिजाईन असलेले कार्पेट टाकले, आमच्या लग्नात मिळालेला बेड नेला, एक सेकंड ह्यांड टीव्ही आणि तरंगचा म्युसिक सिस्टिम घेतला. पेन ड्राईव्ह मध्ये भीमसेन जोशी ते फडके, सातारकर ते इंदुरीकर आणि शिंदे ते सुरेखा पुणेकर सगळं १६ जीबी फुल्ल केले होते. देवघर पण तिकडेच हलवले.
म्हातारी गेल्यामुळे प्रपंचावरचे लक्ष आता गावकरभाराकडे पुन्हा वळले होते.
पण चहा घेऊन जायचे आमचे आंतर वाढले होते कारण बाय माणसाला गोठ्याच्या खोलीत यायची सहसा परवानगी नव्हती.
राजकीय घडामोडीसाठी हे छोटेखानी ऑफिस सुसज्ज झाले होते..!
-----
९ सदस्यांची बॉडी असल्याकारणाने कचरेवाडीच्या वाटायला ३ सीट आल्या होत्या. त्यात एक महिला राखीव, एक मागास प्रवर्ग आणि एक साधारण उमेदवार. जनतेतून सरपंच वेगळाच.
शांताराम मामाला दाढीवाल्यानी ६ महिन्यापूर्वी झालेल्या सोसायटीच्या इलेक्शनला फोडले होते. नाना त्याच्यावर चिडले होते आणि त्याच्या बायकोसमोर आयामायावरून शिव्या पण दिल्या होत्या. वाटले होते की तो सुधरेल पण त्याने मीटिंग होण्याच्या आधीच दाढीवाल्यांकडून उमेदवारी जाहीर केली होती.
त्याची पण चूक नव्हती म्हणा. नानांच्या थोरल्या भावाचा ह्या धाकल्या चिरंजीवाला गेली १० वर्ष ग्रामपंचायत सदस्यत्वला हुलकावणी बसत होती.
कारण स्वाभाविक नानाच होते.
घराणेशाहीचा डाग पांढऱ्याशुभ्र धोतरावर नको होता. का फक्त स्वतःची इमेज जपायची होती हे त्यांनाच माहित!
"शांत्याचा किडाच बसवतो." बीपीची गोळी खात मला म्हणाले.
"कालचं शेंबड पोरगं त्या दाढीवाल्यांच्या मागं चालय. कुठे इकून खातील त्याला कळणार पण नाही."
दुसरी गोळी पाकिटातून फाडून काढायला लागले तसे मी म्हंटले " दोन दोन गोळ्या का खाताय?"
" काल एक गोळी हुकली होती."
तरीच म्हंटलं फटफटी एवढी तापली कशी.
"माझा स्वतःचा पोरगा असता तर एवढी बिशाद नसती झाली माझ्या विरोधात जायची त्याची.!!"
नानाच्या हंडाभर उत्साहात मिठाचा पहिला खडा पडला होता.
----
नानांच्या मोठ्या भावाची पहिलीच पित्रं होती.
पाव्हणं म्हणून मला पूजेला बसवलं.
शांतारामच्या थोरल्या भावाचं पोरगं, सचिन नानांना जेवायला बोलवायला गेला.
उभ्या आयुष्यात स्वतःच्या भावाबरोबर कधी भांडले नाही, ते मेल्या नंतर त्याच्या पित्राला जेवायला येणार नाही असे होणार नव्हते.
शांतीमामा एका कोपऱ्यात मान खाली घालून बसला होता.
" नाना, शांताराम म्हणतोय खरं उभा राहणार म्हणून पण त्याच्या मनाची ९०% च तयारी आहे. १०% अजून तळयात मळ्यात आहे." पीडब्लूडी मध्ये अधिकारी लेव्हलचा आणि रिटायर होण्याला आलेला शांतारामचा भाऊ २ नंबरचा बाळूमामा म्हणाला. २ नंबर म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा!
नानांनी नोकरीला चिटकवलेला पहिला आणि शेवटचा माणूस. त्यांच्या मते आयुष्यात केलेली खूप मोठी घोडचूक.
जन्म, मृत्यू, पुनर्जन्म, पाप पुण्यावरून विषय ग्रामपंचायत निवडणुकीवर पर्यंत येऊन पोहचला.
"ग्रामपंचायत निवडणुकीत विकासाचा मुद्दा सोडून ह्याला कुचवायचा, त्याची जिरवायची एवढाच अजेंडा असतो."- वाटून-घाटून केलेली हिरवी आमटी पीत पीत पुणेरी ज्ञान वाटले.
"बरोबर आहे." नोकरी नाही म्हणून ५ वर्षापूर्वी पुतणीला देण्याला नकार देणाऱ्या पुणेकराने त्याला दाद दिली. तशी आपल्याला कचऱ्याची पोरगी करायचीच नव्हती म्हणा. असो.
" फराटेवाडीची लोकसंख्या, सेक्स रेशो (सचिन ने लगेच डोळे टवकारले होते), इथला लिटरसी रेट, घरकुल, शौचालय आणि इतर सोशिओ-इकॉनॉमिक डेटाचे मी प्रेसेंटेशन बनवले आहे." आम्ही आमचे मार्केटिंग कसब बयान केले.
"कशासाठी बनवले आहे हे का ...?"
" टाईमपास म्हणून, ऑफिस मध्ये वेळ जात नव्हता."
"असं कर व्हाट्सअप वरून मला त्याची पी डी एफ पाठव." बाळूमामांनी आपल्या सरकारी हिस्सेदारीची चुणूक दाखवली.
" मी हा डेटा गावात कोणाला हवा असेल तर पन्नास हजाराला विकणार आहे. तुम्ही घरचे आहात म्हणून तीस हजारात सौदा करू."
नानांना गऱ्याची खीर भलतीच आवडलेली दिसली. खीर ओठांच्या कडांना लागल्यामुळे त्यांचे स्मित फक्त मलाच दिसले.
बाळूमामांनी स्वतःच्या पोराच्या नोकरीतले किस्से सांगणास चालू करून विषय भरकटवला आणि सौदा अर्धवट राहिला.
पोळी -गुळवणी, भजी, खीर, पितरांच्या भाज्या संपवून शेवटच्या भात- आमटीवर सगळे आले असताना बाळूमामांची गाडी पुन्हा ग्रामपंच्यात जवळ येऊन हॉर्न वाजवायला लागली.
"शांतारामचं तळयात मळ्यातले १० % मन फिरवण्यासाठी आपण वाडीत मिटिंग घेऊन टाकू."
नानांनी आमटीत बचुकभर मीठ टाकून घटाघटा पिले आणि हात धुवून गोठ्याच्या खोलीत तरातरा निघून गेले.
मिठामुळे बी पी अजून वाढणार नाही ना याची मला चिंता लागून राहिली...!!
---
क्रमश:
((सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.. जागा, पात्रे, सर्व काल्पनिक.))
प्रतिक्रिया
16 Oct 2017 - 5:52 pm | एस
वाचतोय. पुभाप्र.
16 Oct 2017 - 6:21 pm | पगला गजोधर
आयला ३ रा भाग येता येता चान्गलीच ग्रीप धरली की रं मर्दा ...
16 Oct 2017 - 6:25 pm | पगला गजोधर
आनी हव, म्हाताऱ्याला म्हणावं, बीपीची गोळी रात्री झोपण्यापूर्वी घेवं ...
अन गोळी हुकली की तरीबी दुसऱ्या दिवशी एकाचं घेव म्हणव, तेज्यायला
उगा अचाट शक्तीचं पुचाट प्रयोग नगो करू म्हणावं नानाला ...
16 Oct 2017 - 7:08 pm | मार्मिक गोडसे
जबरदस्त लिखाणशैली.
16 Oct 2017 - 7:37 pm | पैसा
हाहाहा! मस्त रंगत चाललीय कथा!
17 Oct 2017 - 10:41 am | विशुमित
धन्यवाद आणि सर्वांचा आभारी आहे !
17 Oct 2017 - 1:34 pm | शलभ
मस्त लिहिलय विशुमित..पुढील भाग वाचण्यास उत्सुक..
18 Oct 2017 - 10:28 am | विशुमित
धन्यवाद..!!
भाग -३ टाकायला थोडा उशीर झाला. कालपासून झालोय मोकळा. लवकरच टाकतो पुढील भाग.
17 Oct 2017 - 7:43 pm | संग्राम
चित्रदर्शी लेखनशैली ...
तुम्हाला आजपर्यंत फक्त काही धागे आणि बर्याच :-) प्रतिक्रियांमधून वाचलं आहे .... लिहित राहा .....
खूप छान लिहलं आहे ... पु ले शु
18 Oct 2017 - 10:31 am | विशुमित
संग्रामभाऊ आभारी आहे..!!
17 Oct 2017 - 10:08 pm | शाम भागवत
मस्तच लिहिताय हो.
प्रसंग डोळ्यासमोर उभे राहताहेत.
व्यक्तिचित्रण सुरेखच.
नानांबद्दल आदर वाटायला लागलाय. त्याला कसर नाही लागली म्हणजे मिळवली.
18 Oct 2017 - 7:01 am | नाखु
दिवाळीच्या खरेदीसाठी बिझ्झी असतील असे वाटलं,पण टायमावर आले, यष्टी संपात अडकले नाहीत
पुभाप्र
18 Oct 2017 - 11:02 am | विशुमित
खरे तर निवडणुकीच्या रियल टाईम प्रोसिजर मधेच सगळे लेख टाकायचे होते पण लिहण्याचा एवढा आवाका नसल्या कारणाने नाही जमले.
--
पर्वा निवडणूक होती आणि काल निकाल होता म्हणून २ दिवस ऑफिसाला दांडी मारली होती. आज सकाळी प्रायव्हेट गाडीने आलो त्यामुळे एसटी संप नाही जाणवला.
---
दिवाळीची खरेदी काय फक्त किराणा आणून टाकून दिला घरी. बच्चे कंपनीचे ड्रेस उद्या घायचे आमच्या नेहमीच्या फॅमिली कापडवाल्याकडून (फक्त दिवाळीतच घेतो त्यांच्या कडून कपडे) आणि महिलांनी दसऱ्यालाच आपले कपडालत्ता घेऊन -शिवून टाकले आहेत.
बापे लोक कोणीच दिवाळीला नवीन कपडे घेत नाहीत. घराची परंपराच आहे ती आमच्या असे समजा.!!
18 Oct 2017 - 8:59 am | नाखु
दिवाळीच्या खरेदीसाठी बिझ्झी असतील असे वाटलं,पण अ ज्जा त टायमावर आले, यष्टी संपात अडकले नाहीत
पुभाप्र