शाहिस्तेखानाने चाकणच्या भुईकोटाचा ताबा पंचावन्न दिवसांच्या तिखट प्रतिकारानंतर मिळवला (१४ ऑगस्ट १६६०) आणि या कोटाचे हवालदार काहीसे हताश होउन राजगडाच्या पायर्या चढत होता, आता राजे काय शिक्षा सुनावताहेत या चिंतेने ग्रासलेला हा किल्लेदार राजांसमोर उभा राहिला आणि राजांनी त्यांना शिक्षा सुनावली, आदिलशाही सरहद्दीवरच्या भुपालगडाची किल्लेदारी. हे किल्लेदार होते फिरंगोजी नरसाळा. राजांना अश्याच ह्ट्टी किल्लेदाराची आदिलशाही सरहद्दीवर आवश्यकता होती.शिवाजी राजांनी हा गड अफजलखानाच्या वधानंतर १५ नोव्हेंबर १६५९ ते मार्च १६६० या दरम्यान ताब्यात घेतला असावा.
पुढे मात्र याच फिरंगोजींवर आणि भुपालगडावर एक बिकट प्रसंग ओढावला. स्वराज्याचे युवराज संभाजी राजे शत्रुला मिळाले. सातार्याजवळच्या संगम माहुलीजवळ नावेने नदी ओलांडून ते दिलेरखानाच्या छावणीत सामील झाले. कडव्या दिलेरखानाच्या मनात मात्र शंका असावी. हा संभा खरेच आपल्याला मिळालाय कि हि बाप-बेट्यांची एखादी चाल याची पडताळणी त्याने करायची ठरविले. आणि स्वारीसाठी गड निवडला, "किल्ले भुपाळगड". दिलेरखान आणि संभाजीराजांच्या फौजा भुपाळगडावर चालुन आल्या. ( २ एप्रिल १६७९) सुरवातीला फिरंगोजीनी तिखट प्रतिकार केला. मोघलांची प्रचंड हानी झाली. अल्प शिबंदी असुन हा मराठा लढतोय हे पाहून दिलेरखानाने संभाजी राजांना पुढे केले. स्वामीभक्त फिरंगोजींपुढे मोठा पेच पडला. युध्द करावे तर समोर साक्षात युवराज आणि शरणागती पत्करावी तर दिलेरसारखा कट्टर शत्रु उभा ठाकलेला. संभाजी राजांनी किल्ला खाली करायचा हुकूम केला अन्यथा मोठा हल्ला होईल असा निरोप दिला. अखेरीस फिंरगोजी ,किल्ल्याचे सबनीस विठ्ठलपंत भालेराव यांच्यासोबत रातोरात गड सोडून रायगडाला निघून गेले. किल्लेदारच निघुन गेल्यावर हा गड पडायला किती वेळ लागणार? (१७ एप्रिल १६७९) पण पठाणी डोक्याच्या दिलेरखानाचे ईतक्यावर कसले समाधान होणार होते. त्याने शरण आलेल्या सातशे मावळ्यांचा एक हात कलम करायची आज्ञा दिली. बाकीच्यांना कैद तरी केले गेले किंवा गुलाम तरी केले. संभाजी राजांना हा साराच प्रकार असह्य झाला, पण निमुटपणे पहाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. रायगडावर महाराजांना हे समजतातच ईतर गडांना पत्रे पाठ्विली गेली, "गड लढवावा, अणमान करो नये". याचे वर्णन बसातीनुस्सलातीन, तारीखे दिल्कुशा या मुघल ग्रंथकारांची आणि मल्हार रामराव चिटणीस यांच्या बखरीत आहे.
हा गड ताब्यात घेतल्यानंतर दिलेरखानाने त्याची तटबंदी पाडून टाकली असे जे सांगितले जाते ते चुकीचे असावे. अर्थात या घटेनेनंतर हा गड मोघलांच्या ताब्यात फार काळ राहिला नसावा. कारण सभोवतालचा प्रदेश आदिलशाही आणि मराठ्यांच्या ताब्यात होता. आणि मोघलांचा सगळीकडे पराभव होत होता.
यानंतर मात्र एका वेगळ्याच कारणासाठी या गडाचा उल्लेख येतो. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या प्रयत्नात सुरवातीपासून साथ दिलेले जोडीदार, बहिर्जी नाईक. अफजल वध असो, लालमहालातील कामगिरी असो, सुरतेवर स्वारी असो किंवा आग्र्याहून सुटका या सर्वच थरारक घटनांमधे बहिर्जींचे योगदान मोलाचे होते. या बर्हिंजींचा शेवट या भुपालगडावर झाला. यामधे तीन मतप्रवाह आहेत.
काहीजणांच्या मते भुपाळगडावर हेरगिरी करताना ते पकडले गेले आणि शत्रुने त्यांना मारुन टाकले.
तर दुसरा मतप्रवाह सांगतो कि बहिर्जी लढाईत जखमी होउन ईथे आले आणि ईथे त्यांनी प्राणोत्क्रमण केले.
तर काही बखरींच्या मते, इथे बर्हिजी झाडीत लपलेले होते, शत्रुने भाल्याने झाडी तपासताना, भाला लागून त्यांचा मृत्यु झाला.
ईतिहास काहिही असला तरी बहिर्जी नाईकांच्या अस्थी भुपालगड आज शिरावर मिरवतोय. 'बुसातिन-उस-सलातिन' या साधन ग्रंथानुसार छत्रपती शिवरायांनी मांजर्या नजीकच्या पर्वतावर एक मजबूत किल्ला बांधून त्यास भूपाळगड नाव दिले.तर एका लोककथेनुसार भूपालसिंह राजाने हा गड बांधला म्हणून या गडाचे नाव पडले, "भुपाळगड". शिवाजी महाराजांना विजापूरवर लक्ष ठेवण्यासठी एका किल्ल्याची आवश्यकता होती. बाणुरगडाचा हा डोंगर शिवरायांच्या मनात भरला व तेथे किल्ला बांधण्याचा निर्णय शिवरायांनी घेतला. सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी व कवठे महांकाळ तालुका व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका अशा चार तालुक्यांच्या सीमारेषेवर भूपाळ्गड उभा आहे. शिवकालात स्वराज्याच्या सीमरक्षेच्या दृष्टीने भूपाळगडास अनन्यसाधारण असे महत्व होते.
या ईतिहासप्रसिध्द परंतु काहीशा दुर्लक्षित किल्ल्यावर जायचे तीन मार्ग आहेत.
१) पुणे-बेंगळुरू महामार्गावरील कराडहुन विटा-खानापुर-भिवघाट-पळशी-भुपालगड असे येता येईल. विट्यावरून दिवसाला तीनवेळा थेट भुपालगड साठी सकाळी ८.३०,११.३० व ४.०० अश्या तीन बसही आहेत.वाटेत रेवणसिध्दाचे मंदिरही पहाता येईल.
२ ) सांगली-तासगाव-भिवघाट-पळशी-भुपालगड असा पर्यायही आहेच. या मार्गे आरवड्याचे हरे कृष्ण मंदिरही पहाता येईल.
३ ) जत-पाचेगाव-भुपालगड असेही येणे शक्य आहे.
भुपालगड परिसराचा नकाशा
भुपालगड पहातानाच पळशीला थोडावेळ थांबुन मंदिरे आवर्जुन पाहिली पाहिजेत. भुपालगड आणि कोळदुर्ग येथील कोरीव दगड वापरून हि मंदिरे उभारली आहेत असे सांगितले जाते.पळशीवरून भुपालगडकडे जाताना आधी कोळदुर्ग लागतो. आज सर्व काही हरवून बसलेला हा किल्ला भुपाळगडचा संरक्षक दुर्ग म्हणून उभा केला गेला.
कोळदुर्गावरचे कोरीव दगड आणि तट-बुरूज पाहिले कि हा गड शिवपुर्वकालीन असावा आणि आदिलशाही राजवटीने त्या भागात किल्ला बांधण्याची शक्यता कमी होती. कोळदुर्गाची उभारणी भुपालगडासोबत झाली हे दोन्ही किल्ल्याच्या तट-बुरुजाची बांधणी पाहिली तरी लक्षात येते. आणि हे तट-बुरूज आजही बर्यापैकी अवस्थेत आहेत. बाणुरगड गावात असे काही लोक आहेत ज्यांनी दरीला लागून असणारी येथील दरवाज्याची कमान पाहिली आहे. आज हि कमान पुर्ण नष्ट झाली आहे. काही दगड तेथेच विखुरले आहेत तर काही पळशीला नेण्यात आले आहेत.
कोळदुर्गाचा वरचा पसारा खुपच आटोपशीर असून गडाला तिन्ही बाजुने बर्यापैकी नैसर्गिक संरक्षण आहे. सध्या किल्ल्यातील तलाव बुजलेला असला तरी किल्ल्याजवळ बारमाही वहाणारा झरा आहे. शिवाजी महाराजांनी काही किल्ले शत्रु दुरुपयोग करतो म्हणून पाडून टाकले, उदा- शिरवळचा सुभानमंगळ. पण हा किल्ला नक्कीच शिवाजी महाराजांनी पाडला नसावा कारण तसे करायचे असते तर तट-बुरुज पार जमीनदोस्त केले असते. पण हे खरे कि शिवकाळानंतर कोळदुर्ग फार लवकर किंवा १८ व्या शतकाच्या सुरवातीला ओस पडला असेल.
कोळदुर्ग पाहून आपण पुन्हा डांबरी रस्त्यावर यावयाचे आणि थोडे अंतर गेल्यानंतर डावीकडे शुकाचार्यची पाटी दिसते. आट्पाडी आणि परिसर तसा दुष्काळी भाग, पण बारमाही झरा आणि झाडीभरला दरा, याने हा परिसर म्हणजे काश्मीरच म्हणले पाहिजे.
"शुकासारखे वैराग्य ज्याचे", असे ज्या शुकमुनींबाबत लिहीले गेले आहे त्यांची हि समाधी असे मानले जाते. गाडी पार्क करून पायवाटेने खाली निघायचे.
डाव्या हाताला जांभ्या दगडाच्या मोठ मोठ्या शिळा कड्याशी रेललेल्या आहेत. पाच मिनीटात आपण शुकाचार्य मंदिरापाशी पोहचतो.
परिसर झाडीभरला आणि अतिशय रम्य आहे. बरोबर डबा आणला असेल तर ईथे सोडायला हरकत नाही मात्र वानरांपासून जपायला हवे. सकाळी लवकर किंवा सुर्यास्ताच्या आसपास ईथे पोहचलो तर मोर पहाण्यास मिळतात
मंदिर परिसरात बारमाही वहाणारा झरा आहे.
शेजारी एक गुंफा असून तिथे शुकाचार्यांची पाठ आहे, कारण रंभा तपोभंग करायला आल्याने त्यांची पाठच दिसु शकते असे भाविक म्हणतात. अर्थात धार्मिक श्रध्दा थोड्या बाजुला ठेवल्या तर पाठ समजला जाणारा भाग हा लवणस्तंभ आहे हे लक्षात येते. वरच्या पाषाणात असणार्या क्षारांमुळे आणि पाझरणार्या पावसाच्या पाण्याने असे लवणस्तंभ तयार होतात. पण ह्या लोककथाच हि अशी निसर्गनवल हानी होण्यापासून जपतात, तेव्हा या श्रध्दा न मोडलेल्याच बर्या अन्यथा भविष्यात एकही लवणस्तंभ पहायला मिळणार नाही.
हे निसर्ग लेणे पाहून जाउया भुपालगडाकडे. समोर दिसणारी टेकडी म्हणजे भुपालगड. डांबरी रस्ता थेट गडावर असलेल्या बाणुरगड गावात गेलेला आहे. आपले वाहन किंवा बस ईथपर्यंत येते.
गडाकडे निघाले कि सुरवातीला एक तळे लागते.
या तळ्याला "श्रावणबाळाचे तळे" म्हणतात. इथे दशरथ राजाने श्रावणबाळाचा वध केला असे गावकरी मानतात. पुराव्यासाठी समोरची श्रावणबाळाची टेकडी, जिथे श्रावणबाळाने प्राण सोडले
आणि समोर दरीत दिसणारे "कावडीचे डोंगर" दाखविले जातात. अर्थात या कथात फार काही अर्थ नाही. आपण हे तळे पाहून गडावर निघायचे. गडावर कच्चा गाडी रस्ता लांबुन गेला आहे तर पायर्यांच्या वाटेने आपण दहा-पंधरा मिनीटात वर पोहचतो.
गडाची बरीचशी तटबंदी नष्ट झाली आहे, तरीसुध्दा थोडीफार अजुनही पहाण्यास मिळते.
तटबंदीत २ ते ३ दिंडी दरवाजे (चोर दरवाजे) आहेत. याशिवाय मराठ्यांच्या गडावर असणारी अपरिहार्य गोष्ट म्हणजे मारुती मंदिर आहे.
पण सुस्थितीत असणारे बाणलिंग मंदिर आणि समोरच असणारे बहिर्जी नाईकांच्या समाधीचे वॄंदावन हे महत्वाचे अवशेष.
शेजारी माहिती फलकही लावलेला आहे.
अर्थात ही समाधी बहिर्जी नाईक यांची असल्याची नोंद इतिहासात कागदपत्रात कोठेच नाही. या ठिकाणी गडफेरी संपते. गडमाथ्यावर उभारल्यास उत्तरेकडे आटपाडी परिसर, ईशान्येकडे सांगोला तालुका, तर द्क्षिणेकडे तासगाव तालुका नजरेत येतो. एकूण निरिक्षणाची चौकी म्हणून आदर्श अश्या ईतिहास प्रसिध्द भुपालगडाची फेरी आटोपून आपण याच परिसरातील ईतर अनवट जागा पाहू, पुढच्या धाग्यात.
(सर्व प्रकाशचित्रे आंतरजालावरून साभार )
तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची
संदर्भ ग्रंथः-
१) सांगली जिल्हा गॅझेटियर
२ ) शोध शिवछत्रपतींच्या किल्ल्यांचा- सतिश अक्कलकोट
३ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
४ ) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
५ ) www.discoversahyadri.com हि वेबसाईट
६ ) http://sahyadripratishthan.com हि वेबसाईट
प्रतिक्रिया
6 Oct 2017 - 11:01 am | चाणक्य
तुमची ही अनवट किल्ल्यांची माहिती देणारी मालिका भन्नाट आहे. धन्यवाद या लिखाणाबद्दल.
6 Oct 2017 - 12:43 pm | एस
नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट लेख. पुभाप्र.
8 Oct 2017 - 4:00 am | यशोधरा
सुरेख लेख. आवडला.
8 Oct 2017 - 9:04 am | प्रचेतस
हाही भाग उत्तम.
8 Oct 2017 - 8:45 pm | पैसा
वाचते आहे
10 Oct 2017 - 7:18 am | किल्लेदार
मस्तच........
10 Oct 2017 - 7:19 am | किल्लेदार
मस्तच........
10 Oct 2017 - 7:19 am | किल्लेदार
मस्तच........
10 Oct 2017 - 7:19 am | किल्लेदार
मस्तच........
10 Oct 2017 - 7:19 am | किल्लेदार
मस्तच........
10 Oct 2017 - 5:08 pm | किसन शिंदे
सुरूवातीला वाचलेली गडाबद्दलची माहिती रोचक आहे.
11 Oct 2017 - 2:41 pm | हेमंत ववले
सर्व लेख वाचायला हवेत आता. धन्यवाद