महाराष्ट्रातील गड कोट म्हणले कि आपल्याला शिवराय आठवितात. एका किल्ल्यावर जन्मलेला, किल्ल्यांच्या आधाराने आयुष्यभर राजकारण केलेला आणि एका किल्ल्यावर चिरविश्रांती घेणार्या या योध्द्याची प्रत्येक मराठी व्यक्तिला कोणत्याही गड कोटावर आठवण यावी हे स्वाभाविकच आहे. पण एका किल्ल्याने संभाजी राजांचा आयुष्यातले आनंदाचे आणि दुखाचे असे दोन्ही क्षण अनुभवले आहेत. हा बुलंद किल्ला आहे, श्रुंगारपुरचा पहारेकरी "प्रचितगड".
प्रचितगड, उचितगड, राग्वा अशी काही नावे याला आहेत. भौगोलिक्दृष्टया सांगली जिल्ह्यात हा किल्ला येत असला तरी रत्नागिरी जिल्ह्यातुन जाणे सोयीचे आहे. कोल्हापुर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी अश्या चारही जिल्ह्यांच्या सीमा जिथे मिळतात तिथे हा भक्कम गड एखाद्या रखवालदारासारखी छाती ताणुन उभा आहे.
पुर्वी या गडावर जायचे म्हणजे अनेक वाटा होत्या. मात्र सध्या चांदोली जंगलाचे सह्याद्री व्याघ्रप्रकल्पामधे रुपांतर झाल्याने फक्त श्रुंगारपुरमधूनच खड्या, घसरड्या आणि अतिशय कठीण वाटेने गडावर जाता येते.
ईतिहासाविषयी बोलायचे तर पाच पातशाह्यानी पुर्ण महाराष्ट्र आपसात वाटुन घेतला असला तरी या अंधारात काही संस्थाने पणतीसारखी स्वताचे अस्तत्व राखुन होती. शृंगारपुरचे सुर्वे त्यापैकी एक. प्रचितगडाच्या भरोश्यावरच ते असे वेगळे अस्तित्व राखु शकले. मलिक उत्तेजारने हि छोटी संस्थाने बुडविण्यासाठी आक्रमण केले तेव्हा याच सुर्वे व विशाळगडकर मोरे यांनी त्याचा पाडाव केला. पुढे आदिलशहाचे शृंगारपुरचे सरदार सुर्वेंच्या ताब्यात १६६१ साली मंडणगड,पालगड हे किल्ले होते. उंबरखिंडीत कारतलबखानाचा पराभव केल्यावर शिवाजी महाराज दाभोळकडे निघाले. वाटेत मंडणगड किल्ला होता. शिवाजी महाराज येत आहेत हे समजताच सुर्वेंची तारांबळ उडाली व मंडणगड सोडून आपली जहागिरी असलेल्या शृंगारपूरला पळून गेला. महाराजांनी श्रृंगारपुरवर हल्ला केला. त्यावेळी दळवींचे कारभारी (दिवाण) पिलाजी शिर्के यांची योग्यता पाहून महाराजांनी त्यांना स्वराज्यात सामिल करुन घेतले. २९ एप्रिल १६६० ला शिवाजी महाराजांनी शृंगारपुर ताब्यात घेतले. त्यावेळी तानाजी मालुसरे यांनी शृंगारपुरच्या बाजुने चाल करुन प्रचितगड ताब्यात घेतला. ईथे महाराजांना गुप्तधनाचे हंडे सापड्ल्याचे सांगितले जाते. कोकणातल्या घाटवाटा सारख्या खराब व्हायच्या म्हणून तानाजीला महाराजांनी घाटवाटा दुरुस्त करण्यासाठी याच परिसरात तैनात केले.
पुढे पिलाजीची मुलगी जिऊबाई उर्फ़ राजसबाई (येसुबाई) यांच्यांशी संभाजी महाराजांचा विवाह झाला. तसेच शिवाजी महाराजांची मुलगी राजकुंवरबाई हिचा विवाह पिलाजींचा मुलगा गणोजी यांच्याशी झाला. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला निघाले तेंव्हा त्यांनी संभाजी महाराजांची शृंगारपूरचा सभेदार म्हणुन नेमणुक केली. शृंगारपूरच्या निसर्गरम्य वातावरणात संभाजी महाराजांमधील लेखक , कवी जागा झाला. त्यांनी "बुधभूषणम" हा संस्कृत ग्रंथ लिहिला. "नायिकाभेद", "नखशिक", "सातसतक" हे ब्रज भाषेतील तीन ग्रंथ लिहिले. थेट उल्लेख नसला तरी या काळात संभाजी राजे प्रचितगडावर नक्की येउन गेले असणार. पुढे मात्र या गडाने एक करुण प्रंसग पाहिला. मुकर्बखानाने संगमेश्वरला संभाजी राजाना पकडून शक्य तितक्या त्वरेने घाटावर न्यायचे ठरविले. मात्र प्रचितगड तर मराठ्यांच्या ताब्यात, त्यामुळे शेजारच्या मळे घाटाने संभाजी राजाना कराड-वडूज मार्गे पेडगावला नेले. हि विटंबणा खिन्नपणे प्रचितगड पहात राहिला.
पुढे मात्र ईंग्रजांचा सह्याद्रीवर वरवंटा फिरेपर्यंत प्रचितगड मराठ्यांकडे राहिला. अखेरीस १० जुन १८१८ ला कनिंगहॅम याने प्रचितगडाचा ताबा चतुरसिंह यांच्या कडून मिळविला. या लढाईतच प्रचितगडाचा दरवाजा आणि पायर्या नष्ट झाल्या.
प्रचितगड परिसराचा नकाशा
या अतिशय दुर्गम अश्या किल्ल्यावर जाण्यासाठी पुर्वी अनेक वाटा होत्या.
१) कोयनेजवळचा भैरवगड करुन प्रचितगड करायचा असेल तर पाथरपुंज या गावातुन एक वाट थेट प्रचितगडावर येते तर एक वाट वळसा घालून रुंदीव या सध्या उठ्विलेल्या गावामार्गे प्रचितगडावर येते होती.
२ ) नायरी-तिवरे या शृंगारपुरजवळ्च्या गावातून तिवरे घाट या सोप्या पण लांबच्या रस्त्याने प्रचितगडाला वाट होती.
३ )कोल्हापुर- रत्नागिरी या रस्त्यावर मलकापुर-आंबा यांच्या मधे एक रस्ता उदगिरी या जंगलातील शेवटच्या वस्तीकडे जातो. इथून एक वाट तिवरे प्रचितगड रस्त्याला मिळते. तसेच देवरुख -कुंडीजवळचा महिमतगड पाहून तिथुनही एक वाट याच वाटेला मिळते. या वाटेवर "कलावती राणीची विहीर" नावाचे ठिकाण आहे.
४ ) नेर्देवाडी गावातून तुलनेने सोप्या मळे घाटाच्या वाटेने वर येउन पाथरपुंज-प्रचितगड वाटेला येउनसुध्दा प्रचितगडावर येता येत असे.
५ ) आणखी एक थोडा लांबचा पण फारसा कोणाला माहिती नसलेला पर्याय म्हणजे ढेबेवाडी खोर्यातील वाल्मिकी पठारावर पाणेरी नावाचे गाव आहे. इथून आधी कंधार डोह आणि मग प्रचितगड पहाता येईल.
पण सध्या ह्या सर्व वाटांनी जाण्याला बंदी आली आहे, कारण हा परिसर सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात येतो. फक्त प्रचितगड हा व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीबाहेर असल्याने तिथे जायला परवानगी लागत नाही. मात्र मनुष्यप्राण्याच्या वावराला पुर्ण बंदी घातल्याने ईथे काही वन्य प्राण्यांच्या शिकारीच्या काही घटना घडल्या आहेत. वास्तविक स्थानिक आणि ट्रेकर्स यांना काही मर्यादा आणि नियम घालून इथे जाण्याची परवानगी दिली तर वावर राहून काही चुकीच्या बाबी दिसल्या तर वनखात्याला त्याची सुचना मिळू शकेल. सध्या वनखात्याने या सर्व परिसरात कॅमेरे बसवल्याने अभयारण्यात वावरताना सापडल्यास पन्नास हजाराचा दंड आणि तीन वर्षाची कैद अशी शिक्षा आहे असे समजले. मात्र आता या अभयारण्यातून केरळच्या धर्तीवर ट्रेकिंग रुट तयार करण्याचे वन खात्याचे नियोजन असल्याचे समजते. तसे झाले तर हा किल्ला अनेक दुर्गप्रेमीना सहजी बघता येईल व कलावतीराणीची विहीर सारखी दुर्गम स्थळेसुध्दा पुन्हा पहायला मिळतील अशी आशा वाटते.
यावरून लक्षात आले असेल कि हि गड पहाणे किती दुर्गम झाले आहे. वर नकाशात लाल रंगात दाखविलेल्या वाटा आता जाण्यासाठी उपलब्ध नाहीत. आता एकच पर्याय उरला आहे तो म्हणजे कसबा संगमेश्वर मार्गे शॄंगारपुर गाठणे व तिथून ७० ते ८० अंशाचा खडा चढ चढून गड पहाणे. शृंगारपुरमार्गे गडावर जायचे दोन पर्याय आहेत.
१) उत्तरेकडची लांब वाट जी प्रचितगडाच्या खिंडीत जाते. मात्र हि वाट सध्या काही ठिकाणी मोडली आहे , ईथे आता शिड्या बसविल्या आहेत. पण अवघड मार्गामुळे हा त्यामुळे हा पर्यायही फार योग्य नाही.
२ ) शेवटचा पर्याय म्हणजे प्रचितगडाच्या दक्षिण टोकाशी चढणारी धबधब्याची वाट. आपण याच मार्गे कसे जायचे ते पाहु.
अर्थात या वाटेन जायचे तर माहितगाराशिवाय पर्याय नाही. शॄंगारपुरमधे दोधे जणच हे गाईडचे काम करतात. १) मनोज म्हस्के २ ) विनायक म्हस्के.
पैकी जर कंधार डोह पहायचा असेल तर फक्त विनायक म्हस्केच नेउ शकतात. या दोघांचेही लँड्लाईन नं. माझ्याकडे होते पण सध्या ते बंद आहेत. कोणाकडे यांचे मोबाईल नंबर असतील तर जरुर पोस्ट करा.
फक्त प्रचितगड बघायचा असेल तरी दोन दिवसाची सवड हवी आणि कंधार डोह ( स्वजबाबदारीवर ) पहायचा असेल तर किमान तीन दिवसाची तयारी करावी लागते. प्रचितगडावर कोणताच आडोसा नाही, त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी बरोबर टेंट घ्यावेत, म्हणजे गैरसोय होणार नाही. प्रचितगडावर जाण्याच्या घसरड्या वाटा विचारात घेता, इथे दिवाळीनंतर म्हणजे नोव्हेंबर ते मार्च अखेरपर्यंत जाणे योग्य होईल. एप्रिल आणि मे महिन्यात अचानक येणारा वळवाचा पाउस विचारात घेता त्या काळात न जाणेच योग्य होईल.
शृंगारपूर ह्या किल्ल्याच्या पायथ्याच्या गावाला जाण्यासाठी तीन पर्याय उपलब्ध आहेत. खाजगी वाहन असल्यास मुंबई गोवा महामार्गा वरील चिपळूण गाठावे. चिपळूणच्या पुढे आणि संगमेश्वरच्या अलिकडे २ किमीवर कसबा संगमेश्वर आहे. (मुंबई पासून अंतर २९५ किमी) येथे महामार्ग सोडुन आत जाणाऱ्या रस्त्याने १६ किमीवर शृंगारपूर गाव आहे.
एसटी बसने जाणार असल्यास मुंबई पुण्याहुन संगमेश्वर गाठावे. संगमेश्वर एसटी स्थानकातून शृंगारपूरला जाण्यासाठी बसेस आहेत. बसचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे ७.४५,१०.४५,१२.४५,३.४५(दु), ५.१५(सं), ७.००(मुक्कामी) तर शॄंगारपुरमधून परत जाण्यासाठी ७.००,९.००,११.४५,१.४५,४.४५(दु)
कोकण रेल्वेने संगमेश्वर पर्यंत येउन एसटीने शृंगारपूरला जाता येते.
शृंगारपूर गावातून उत्तर दक्षिण पसरलेला प्रचितगड दिसतो. गावातील शाळेपर्यंत बसने जाता येते. पुढे गावातून वाहाणार्या ओढ्याच्या बाजूने जाणाऱ्या सिमेंटच्या रस्त्याने गावातली वस्ती संपेपर्यंत चालत गेल्यावर पायवाट लागते. या पायवाटेने अर्धा तास दाट जंगलातून चालल्या नंतर ओढा आडवा येतो. ओढा ओलांडून पलिकडे गेल्यावर गावाच्या आणि किल्ल्याच्या मधे असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी आपण पोहोचतो. डोंगराची दाट झाडीतली खडी चढण चढुन पठारावर पोहोचायला १ तास लागतो. पठारा वरुन १० मिनिटे चालल्यावर पुन्हा खडा चढ लागतो. साधारणपणे पाउण तासात आपण सुकलेल्या धबधब्या जवळ येतो. इथे एका गिर्यारोहकाची स्मृती शिळा बसवलेली आहे. पुढच्या टप्प्यात ठिकठिकाणी ८ शिड्या बसवलेल्या आहेत. त्यातील दोन मोठ्या शिड्यांवरुन चढताना छोटे छोटे दगड निसटुन खाली येतात त्यामुळे सांभाळून चढावे लागते. शिड्यांचा टप्पा पार केल्यावर आपण गडाच्या दक्षिण टोकाजवळ पोहोचलेलो असतो. येथून गडाच्या दक्षिण टोका खालुन उत्तर टोकाकडील दरवाजा खालील शिडी पर्यंत आडवी चढत जाणारी वाट पार करायला १ तास लागतो. या वाटेवर खूप घसारा (स्क्री) असल्याने खूप जपून चढाव आणि उतराव लागते.
हि घसार्याची वाट संपल्यावर आपण उत्तराभिमुख दरवाजा खालील शिडी पाशी पोहोचतो. या मोठ्या शिडीच्या पायऱ्या आणि कठडा तुटलेला आहे त्यामुळे जपून शिडी चढावी लागते. शिडी चढुन गेल्यावर आपला गडावर प्रवेश होतो.
शृंगारपूर गावातून प्रचितगडावर जाण्यासाठी ४ तास लागतात. गड फिरण्यासाठी १ ते दिड तास आणि गड उतरायला ४ तास लागतात. अशाप्रकारे शृंगारपूर गावातून निघून गड पाहून परत यायला साधारणपणे ९ ते १० तास लागतात. गडावर जाणारी वाट जंगलातून आहे. तसेच या वाटेवर गावकऱ्यांचा वावर फारच कमी आहे. त्यामुळे गावातून वाटाड्या नेण आवश्यक आहे . तसेच प्रचितगडावर झालेल्या अपघातांमुळे गावातल्या लोकांनी ग्रामपंचायतीत एक नोंद वही ठेवलेली आहे. त्यात नोंद करुन जाणे आवश्यक आहे.
प्रचितगड किल्ल्याची भ्रमंती अशाप्रकारे करता येइल :-
मुंबई पुण्याहून रात्रीचा प्रवास करुन संगमेश्वर गाठावे. संगमेश्वरला सकाळी ७.४५ वाजता शृंगारपूरला जाणारी पहिली एसटीआहे. ती ९.०० वाजता पोहोचते. त्यामुळे किल्ला पाहून परत येण्यास संध्याकाळचे ७.०० / ८.०० वाजतात. त्यावेळी परतीची व्यवस्था नसल्याने गावातच मुक्काम करावा लागतो. गावातल्या काही घरात मुक्कामाची आणि जेवणाची सोय व्यवस्थित होते. त्या दिवशी गावात मुक्काम करुन दुसऱ्या दिवशी सकाळी ७.०० ची बस पकडून कसबा संगमेश्वर गाठावे. येथे संभाजी स्मारक आणि प्राचीन कर्णेश्वर मंदिर आहे. ते पाहून चिपळूण गाठावे. चिपळूण शहरातील गोवळकोट किल्ला पाहावा. चिपळूणहुन परतीची बस पकडावी.
खाजगी वाहन असल्यास पहिल्या दिवशी प्रचितगड, दुसऱ्या दिवशी महिमतगड आणि भवानीगड आणि तिसऱ्या दिवशी गोकळकोट किल्ला पाहाता येइल. यासाठी वेळेचे काटेकोर व्यवस्थापन करावे लागेल.
हि सर्व माहिती माझ्याकडे होती. अश्या ह्या अति दुर्गम प्रचितगडाचा प्लॅन विकासने माझ्या समोर ठेवला. खरेतर लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गोव्याचे बुकिंग झाले होते. पण प्रचितगडाचा मोह मला आवरला नाही. गोव्याला जाण्याआधी केवळ चार दिवस आधी ट्रेक होता, आजारी पडलो असतो तर बोलणी खाणे नक्की होते. पण तरीही एकच नारा दिला,"चलो प्रचितगड".
प्रचितगडाचा नकाशा
भल्या पहाटे पाच वाजताच आम्ही शॄंगारपुरात दाखल झालो. पण काही जण रात्री उशिरा ड्युटी संपवून पुण्यातून आम्हाला जॉईन होणार आहेत असे समजले. गावात एतिहासिक म्हणावे अशी एकच वास्तु आहे, "शिर्के वाडा", पण तीची खुप पडझड झाली आहे. अखेरीस नउ वाजता चौघेजण गाडीतुन उतरले आणि ओळखपरेड होउन आम्ही मनोज म्हस्केच्या नेतॄत्वाखाली निघालो. चैत्राच्या उन्हाने प्रताप दाखवायला सुरवात केलीच. कोकणची दमट हवा त्यात भर घालत होती. गावाबाहेरचा ओढा लागला. विशेष म्हणजे अजुनही त्यात पाणी होते आणि बायका कपडे धुत होत्या. गर्द झाडीतुन जाणारी हि वाट एक टेकडी चढू लागली आणि आमच्या छातीचे भाते जोरात चालु लागले.
समोर उभा पसरलेला प्रचितगड खिजवतोय असे वाटत होते. आजच्या दिवसात चांगलीच वाट लागणार याची मला खात्री पटली. थोडावेळ झाला की विश्रांतीची गरज भासू लागली. अधेमधे जांभळे, करवंदे यांचा मेवा मिळत होता. पण खरा प्रश्न पाण्याचा होता. कारण पाणी गडावर पोहचल्याशिवाय मिळणार नव्हते.
जवळपास ७०-८० अंशाची चढाई कस पहात होती. चिंचोळी वाट, घसारा आणि चढते,तापते उन यामुळे थांबायची सोय नव्हती. वाटेत नावालाही सावली नव्हती आणि भरीला एका मागोमाग येणारे अवघड रॉक पॅच. कसेबसे प्रचितगडाच्या दक्षिण टोकाशी पोहचलो. आता मात्र खरी परिक्षा होती कारण समोर सात-आठ फुटाचा पावसाळी धबधबा होता. त्यात कसेबसे पाय रोवून आणि एखाद्या कपारीचा आधार घेउन चढायचे होते. जनसंख्या तीसच्या आसपास होती त्यामुळे खुप वेळ लागत होता. तो पर्यंत घसरड्या वाटेवर नुसते उभा रहायचे म्हणले तरी दिव्य होते. अखेरीस माझा नंबर आला. अॅक्शनच्या ट्रेकिंग शुजला असलेल्या ग्रीपमुळे धबधब्याचा कातळ टप्पा तर पार पडला पण अजुन खरा थरार बाकी होता. वाट घसरड्या मुरुमाने भरली होती. साधारण वीस फुटाची हि चढण कारवीच्या वाळलेल्या झाडांचा आधार घेऊन अक्षरशः गुढगे आणि कोपर घासत कसाबसा चढलो. हात सटकला असता तर माझ्या हातून हे लिहीले जाण्याचीही शक्यता नव्हती.
अखेरीस मुरमाड चढ चढून वरच्या सपाटीवर बसलो आणि सॅकमधून मोबाईल काढून आधी बायकोला खुशाली सांगितली. सकाळी ९.३० ला सुरवात झालेली हि वाटचाल संध्याकाळी ५.०० वा माथ्यावर संपली. प्रचंड दमणे म्हणजे काय याचा अनुभव आला. "बास झाले ट्रेकिंग" असाही विचार मनात आला (सुदैवाने फार काळ टिकला नाही ;-) ).
समोर वानरटेंभा सुळका जणु अंगठा दाखवून खुणावत होता. सुर्यास्ताची वेळ जवळ आली. कॅरी मॅट पसरूनच त्यावर पड्ल्या पडल्या सुर्यास्ताचा आनंद घेता घेता डोळे कधी मिटले ते कळालेच नाही. मात्र कोणीतरी चहा तयार झाल्याची वर्दी घेउन उठवायला आले आणि चहाला अमृत का म्हणतात ते कळाले. आठला जेवण केले आणि झोपलो ते पहाटे थंडीने कुडकुडतच उठलो.
एन मार्च महिन्यात थंडी तर होतीच पण पुर्ण दरी धुक्याने भरून गेली होती. गड बघायला बाहेर पडलो. आम्ही झोपलो होतो त्या दक्षिणेकडच्या बाजुला थोडकी सपाटी आहे . गडावर मुक्काम फक्त याच बाजुला करता येतो.
इथे एक पडझड झालेला वाडा आहे. याची दुरुस्ती केल्यास येणार्या दुर्गयात्रींची चांगली सोय होईल.
वाड्याच्या मागच्या बाजुला थोडकी तटबंदी आहे.
याच सपाटीच्या एका बाजुला उंबराचे झाड आहे.
इथुन गडाच्या माथ्यावर गेल्यास आपण पत्र्याच्या शेड मध्ये बांधलेल्या भैरी भवानीच्या देवळापाशी येतो. देवळाच्या परिसरात ५ तोफा ठेवलेल्या आहेत. देवळात तीन मूर्ती आहेत. मधली मुर्ती भैरी भवानीची असून बाजूच्या दोन्ही मूर्ती भैरोबाच्या आहेत. प्रचितगडावरील भवानी पंचक्रोशीतील लोकांची कुलदेवता असल्यामुळे गडावर अधुनमधुन लोकांचा वावर असतो. मंदिर पाहून पुढे गेल्यावर कारवीच्या झाडीत लपलेले घरांचे चौथरे पाहायला मिळतात. या चौथऱ्या मधून जाणाऱ्या वाटेने पुढे गेल्यावर पायऱ्या लागतात.
पायऱ्यांनी खाली उतरल्यावर उजव्या बाजूला कातळात खोदलेल खांब टाक पाहायला मिळत. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.
हे टाक २ खांबावर तोललेल असून टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्या कोरलेल्या आहेत . याठिकाणी एकूण पाण्याची ५ टाक असुन त्यापैकी ३ टाक पायऱ्यांच्या उजव्या बाजूला व २ टाक डाव्या बाजूला आहेत.
या टाक्याचे निळसर पाणी सकाळच्या उन्हात चमकत होते.
या टाक्याचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे टाक्याच्या आत एका कोपर्यात आणखी एक टाके कोरलेले आहे. कदाचीत टाक्याच्या पाण्यात विष मिसळल्यास हे दुसरे टाके रिझर्व्ह स्टॉक म्हणून वापरता येईल हा उद्देश असावा. टाक पाहून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला (दरीच्या बाजूला ) तटबंदी आणि बुरुजांचे अवशेष पाहायला मिळातात.
यानंतर गडाच्या उत्तर टोकाशी निघाल्यावर प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला एक बुरूज आहे.
किल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला पाण्याचे मोठे टाक आहे. पण त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. टाक्याच्या बाजूने वर चढून टाक्याला वळसा घातल्यावर आपण प्रवेशव्दाराच्या पुढे असलेल्या डोंगराच्या नाकाडावर पोहोचतो.
किल्ल्याचा उत्तर दक्षिण पसरलेला डोंगर आणि बाजुचा डोंगर यामधे खिंड तयार झालेली आहे. या खिंडीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि प्रवेशव्दारावर येणाऱ्या शत्रूवर मारा करण्यासाठी येथे बुरुजाची योजना केलेली आहे.
किल्ल्याच्या पायर्या ईंग्रजांच्या कॄपेने उध्वस्त झाल्यामुळे विश्वास सहकारी साखर कारखान्याच्या सहकार्याने ईथे लोखंडी शिडी उभारलेली आहे. हा जीना डगमगत असतो पण त्यावरुन जाण्याशिवाय गत्यंतर नसते.
काल चढाईच्या मार्गावर असलेले रॉक पॅच पाहून तिथून उतरायला कोणीच तयार नव्हते, त्यामुळे थोडा लांबच्या पण सोप्या अश्या मळे घाटाने जाण्याचे ठरले.
खिंड चढून मागे वळून पाहिले आणि वर्षानुवर्षे प्रचितगडाचा हाच फोटो पहात असल्याची आठवण झाली. या ठिकाणी दोन वाटा फुटतात, उजवी वाट कंधार धबधब्याकडे जाते आणि डावी वाट पाथरपुंज गावाकडे जाते. ह्याच वाटेला मळे घाटाची वाट छेदते.
दाट जंगलातून वाट जात होती.
मधेच एक सडा आला. सडा म्हणजे मोठ्या प्रमाणात जांभ्या दगडांचा पसरलेले मोकळवण. असे सडे चांदोली अभयारण्यात मोठ्या प्रमाणात आहेत. यात मधूनच वाट गेलेली असते.
वाटेत एका ठिकाणी पाण्याचे टाके लागले. वाट कधी दाट झाडीतुन जाते तर कधी कधी कड्याच्या शेजारुन जाते. अचानक एक मोठे मैदान सामोरे येते.
इथे आपली सरळ वाट पाथरपुंज गावाकडे जाते तर, उजवी कडून येणारी वाट खाली उतरुन नेर्देवाडीकडे जाते. या वाटेलाच मळे घाट म्हणतात. याच वाटेने मुकर्बखानाने संभाजी राजांना नेले होते. पुर्वी पाथरपुंजकडून आपण थेट प्रचितगडावर येउ शकत होतो पण आता गावाच्या बाहेर वनखात्याची चौकी आहे यामुळे हा मार्ग बंद झाला आहे.
आम्ही मळे घाट उतरायला सुरवात केली
आणि जवळपास दोन तासाच्या उतराइनंतर नेर्देवाडीच्या विहीरीचे पाणी पिउन ताजेतवाने झालो आणि गाडीत बसून परतीचा प्रवास सुरु केला.
पायथ्यातून प्रचितगड आणि त्याची खिंड सगळ्या आठवणी ताज्या करीत होती.
प्रचितगड भेटीच्या वेळी कंधार डोह पहाण्याचे राहिल्याने पुन्हा पुढच्या वर्षी नियोजन करून विनायक म्हस्केना फोन केला आणि पुन्हा रात्रीच शृंगारपुरात दाखल झालो.
या खेपेला थेट खिंडीची दिशा पकडून वाटचाल सुरु केली. मोजकेच जण असल्याने अवघड मार्ग निवडता आला. खिंडीतून वर पोहचलो आणि मागच्या ट्रेकच्या आठवणी जाग्या झाल्या. आता दाट झाडीतून मार्गक्रमणा सुरु झाली. आजुबाजुला वन्य प्राण्यांचे आवाज होत होते. पण त्याच्यापेक्षा भिती कोणी वनखात्याचा कर्मचारी समोर येईल हि होती.
एकदम समोर प्रंचड पसरलेला सडा आला. हे सडे म्हणजे ह्या अभयारण्याचे सौंदर्यच म्हणायला हवे. यातून वाट तर दिसत नव्हती पण वाटाड्या नेईल तसे जाणे हाच मार्ग. जर गडबडीत कोणी चुकले तर ह्या वनसागरात सापडणे कठीण.
सडा ओलांडून पुन्हा दाट झाडीत शिरलो आणि तासा दिड तासाच्या थोडे खाली उतरल्यानंतर वाटचालीनंतर उठविलेले "रुंदीव" गाव आले.
पुर्वी प्रचितगड-कंधार डोह ट्रेकमधे हा फार मोठा आश्रय होता. आता मात्र पुर्ण धोका स्विकारुनच कंधार डोहाला जावे लागते.
खाली खुप खोलवर वारणा नदीचे पात्र दिसत होते.
बरीच वाटचाल केल्यानंतर अचानक दरीमधे कंधार डोहाचे आणि धबधब्याचे दर्शन झाले. त्या क्षणाचे वर्णन अशक्य आहे. अत्यानंद होणे म्हणजे काय ते अनुभवले.
याच्यासाठी केला होता अट्टाहास
ट्रेकींग नवीन नव्हते किंवा धबधबेही बरेच पाहिले होते, पण अत्यंत दुर्गम असलेले आणि कधी जाउ शकु कि नाही, असे ते ठिकाण पहाताच रोमांच आले. उत्साहात खाली उतरून गेलो. कंधार डोहाविषयी अनेक अफवा एकल्यात, कोणी म्हणतात ईथे संशोधनासाठी सोडलेली पाणबुडी पुन्हा वर आलीच नाही, इथे पोहायला जाणारे कायमचे गायब होतात हे ही एकले होते. मात्र अलिकडेच चांदोली धरणाच्या पाण्यात मगरीने दर्शन दिल्याची बातमी आणि फोटो पाहिल्याने कोणालाही पाण्यात उतरू दिले नाही. अंधार जवळ जवळ पडत आलेला. पाण्यापाशी थांबणे धोक्याचे होते, एक तर वन्य प्राणी पाणी प्यायला येणार आणि गस्तीची नावही येण्याची शक्याता होती. घाइघाईने रुंदीवपाशी चढून आलो. केवळ संख्या कमी आणि सगळेच कसलेले ट्रेकर्स म्हणूनच आम्ही हे करु शकलो. लाकडे पेटवून चुल केली आणि डोळ्यात जाणार्या धुराकडे न लक्ष देता खिचडीवर ताव मारला. तिन्ही बाजुने शेकोट्या पेटवून, काही झाले तरी दोघांनी जागे रहायचे, असे ठरवून आळीपाळीने झोपी गेलो. प्रांण्याच्या आवाजाने तशीही झोप येणे कठीणच होते. कोणत्याही कारणाने एकट्याने आजुबाजुला जायचे नाही हे ठरवूनच घेतले होते.
कारण गव्यांचा कळप एकवेळ परवडला पण अस्वलाशी गाठ पडली तर शंभरीच भरायची.
पहाटेच उठून चहा केला आणि चुल विझवून परतीच्या वाटेला लागलो. मधेच थोडा रस्ता भरकटला पण थोडी शोधाशोध केल्यावर सापडला. जिथे वाटाड्या रस्ता चुकतो तिथे आपली गत काय हा प्रश्न पडल्यावाचून राहिला नाही. थोडी अवघड वाट असली तरी सदस्य मोजके आणि अवघड वाटा उतरण्याची सवय असलेले होते त्यामुळे आल्यावाटेने उतरण्यावर एकमत झाले.
तरी घसरड्या वाटेने उतरताना तारांबळ उडत होती. एकाबाजुला दिसणारी दरी आणि पायाखालुल बॉल बेरिंग पळावे तसे खडे घसरत होते. एरवी कोणताही गड पटकन उतरुन होतो, इथे मात्र उतरायलाच फार वेळ लागत होता. अखेरीस शृंगारपुरात पोहचलो आणि सुटकेचा निश्वास सोडला. कंधार डोह आणि प्रचितगड बघणे हे प्रत्येक ट्रेकरचे स्वप्न असते. बरेच दिवस ज्या गोष्टींचे स्वप्न पाहिले होते ते पुर्ण झाले होते.
समाधानाने परत निघालो. अजुन थोडा वेळ हाताशी असल्याने कसबा संगमेश्वरला थांबलो. संभाजीराजांना ज्या वाड्यात पकडले त्या वाड्याच्या चौथर्याचे आज फक्त अवशेष उरलेत.
नाही म्हणायला गावाच्या मुख्य चौकात हा अर्धपुतळा बसविला आहे. तीच काय ती आठवण.
कसबा हे गाव समुद्र किनाऱ्यालगत नाही, पण तेथील नव्वद ते पंच्याण्णव टक्के घरांमधील तरुण हे होड्या बांधणीचे काम करतात. कसब्याची ती एक महत्त्वपूर्ण ओळख आहे.
‘कसबा’ या फारसी शब्दाचा अर्थ ‘वस्ती’. ‘संगमेश्वर’ गावाचे खरे नाव ‘नावडी’. इसवी सनापूर्वी महाराष्ट्रामध्ये जैन आणि लिंगायत धर्मीय राज्ये होती, त्यांपैकी जैन पंथीयांची राजधानी कपिलतीर्थ (कोल्हापूर) येथे होती, परंतु संगमेश्वर हे त्यांचे राज्यकारभाराचे प्रमुख केंद्र होते. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सूर्यवंशी घराण्याचे राज्य आले. त्यांच्यापैकी एका राजाची राजधानी संगमेश्वर येथे होती.
राष्ट्रकूट वंशातील राजांनी चालुक्य घराण्याचा नाश सन ७५३ मध्ये करून येथे सुमारे दोनशे वर्षें राज्य केले. पुन्हा चालुक्य घराण्यातील काही राजांनी राष्ट्रकुटांचा पराभव केला. त्यांदची सन ९७३ पासून सन ११३० पर्यंत सत्ता होती. इसवी सन ११३० च्या सुमारास कपिलतीर्थ येथील जैन राजा शोणभद्र याने चालुक्य राजांचा पराभव करून संगमेश्वरचे राज्य त्याच्या राज्याला जोडले. नंतर पुन्हा चालुक्य राजांनी राजा शोणभद्र याच्या वंशजांचा पराभव करून त्याचे राज्य प्रस्थापित केले, ते १४७० पर्यंत! त्या घराण्याचा शेवटचा राजा ‘जाखुराय’ याचा मुसलमानांनी पराभव केला आणि संगमेश्वर येथे मुसलमानांचा प्रवेश झाला. ती मुसलमानी सत्ता पुढे सुमारे एकशेएक्याण्णव वर्षें म्हणजे १६६१ पर्यंत होती. त्या सुमारास शिवाजी महाराजांनी तेथे स्वारी करून विजापूरकरांचे अंकित सरदार शिर्के, दळवी, सुर्वे, सावंत, मोहिते इत्यादींचा पराभव केला व मराठी राज्याची सत्ता स्थापन झाली. पुढे, संगमेश्वर मराठा सत्तेतच राहिले. मराठी सत्तेमध्ये संभाजी महाराज पकडले गेले, ते कसबा संगमेश्वरमध्ये. तावडे बंदरात मुकर्रबखानाचा मुलगा इखलासखान याने संभाजी महाराजांना अटक केली. त्या घटनेने संगमेश्वरचे नाव दु:खद, संतापजनक व तितक्याच दुर्दैवी घटनेने इतिहासात नोंदले गेले. ती तारीख होती, ३ फेब्रुवारी १६८२.
मराठी राज्यामध्ये त्या भागाची महसूल व्यवस्था ज्या सरदेसाई घराण्याकडे होती त्या सरदेसाई घराण्याचे वंशज कसब्यात आहेत. संभाजी महाराज सरदेसाईंच्या ज्या वाड्यामध्ये पकडले गेले त्या वाड्याच्या खाणाखुणा, त्याच्या मागील बाजूस असलेली काही शिल्पे, भग्नावस्थेतील काही शिवमंदिरे पाहण्यास मिळतात!
कर्णेश्वर मंदिर
या शिवाय या गावामधे आणखी एक आकर्षण आहे," कर्णेश्वर मंदिर". आम्ही प्रचितगड फेरीत कर्णेश्वर मंदिर पाहिले असले तरी फक्त हे मंदिर पहावयाचे असल्यास, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (एन. एच. १७) ने चिपळूणहून संगमेश्वरकडे येताना संगमेश्वर एस. टी. स्थानकाच्या २ कि.मी. अलीकडे शास्त्री पूल लागतो. शास्त्री पूल ओलांडल्यावर लगेचच डावीकडे वळल्यास जो रस्ता सुरु होतो तेथून १ कि.मी. अंतरावर कसबा गाव लागते. तिथे "जनता सहकारी बँक" जवळ डावीकडे वळल्यास पुढे ३०० मीटर वर श्री कर्णेश्वर मंदिर आहे.
गुजरातचा चालुक्य (चौलुक्य) राजा कर्ण त्या ठिकाणी इसवी सन १०६४ च्या सुमारास राज्य करत होता. तो कदंब राजांचा जावई होता. त्याने त्या काळात दहा हजार सुवर्णमुद्रा खर्च करून तेथे शिवमंदिर बांधले. ते त्याच्या नावाने 'कर्णेश्वर शिवमंदिर' म्हणून ओळखले जाऊ लागले. ते मंदिर शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे. मंदिराची रचना हेमाडपंथीय असल्याचे म्हटले जाते. मात्र हेमाद्री तथा हेमाडपंडीत तेराव्या शतकातील आहे. त्यामुळे ते मंदिर हेमाडपंथी असू शकत नाही. प्रत्यक्षात ते भूमीज शैलीतील मंदिर आहे. श्रीकर्णेश्वर मंदिर सुमारे हजार वर्षांनंतरही सुस्थितीत पाहण्यास मिळते. सुमारे चारशे चौरस मीटर क्षेत्रात काळ्या पाषाणात कोरीव काम केलेले असे ते मंदिर कसब्याचे पौराणिक महत्त्व टिकवून आहे.
कर्णराजाने कर्णेश्वराच्या पूजाअर्चेच्या वेगवेगळ्या कामांसाठी सात गावे दिली होती. धर्मकार्यार्थ-धर्मपूर (धामापूर), सुपारीसाठी गुणवल्लिका, भेट म्हणून देवजी भूचल, तुपासाठी शिवनी (शिवने), यज्ञासाठी लवल (लोवले), फळांसाठी धमनी (धामणी), धर्मसेवकांसाठी करंबव (कळंबस्ते), निवासार्थ आम्रवल्ली (अंत्रवली). त्यां पैकी गुणवल्लिका आणि भूचल या गावांचे संदर्भ सापडत नाहीत. कर्णराजाने कर्णेश्वर मंदिराच्या निमित्ताने त्यावेळी तीनशेसाठ प्रासाद म्हणजे मंदिरे बांधली होती. त्यांतील काही मंदिरे त्या ठिकाणी पाहण्यास मिळतात. त्यांमध्ये कुंभेश्वर, सोमेश्वर, काशीविश्वेश्वर, रावणेश शंकर, जलयुक्त नंदिकेश (संगम मंदिर) व कालभैरव यांचा समावेश आहे. कोकण परिसरात वैष्णवपंथीयांचे प्रमाण अधिक आहे. त्यांनी नंतरच्या काळात कर्णेश्वर मंदिराला कळस चढवला असावा. कारण सबंध मंदिर एका दगडात आहे. कळस दगड, माती आणि विटा यांनी बांधलेला आहे. त्या काळात देवळे दगडात कोरली जात होती, त्यांचे कळस माती-विटांनी तयार झालेले नसत. वैष्णवपंथीयांनी बांधलेल्या देवळांना कळस उंच असतात. पण दक्षिणेकडील शैवपंथीयांनी बांधलेल्या मंदिरांना तसे उंच कळस नसतात. कर्णेश्वर मंदिरात पावसाचे पाणी गळत होते, म्हणून २००३-०४ या वर्षी मंदिराच्या तीन छोट्या कळसांमध्ये थोडी दुरूस्ती करण्यात आली. तेव्हा ते कळस दगडमाती, विटांचे आहेत आणि त्यांना गूळ आणि चुना यांचे प्लास्टर करण्यात आले आहे ही बाब स्पष्ट झाली.
कर्णेश्वर मंदिरात आतील बाजूच्या दगडात देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आढळतात. मंदिरावर जे चार कळस आहेत ते खालच्या बाजूने झुंबरासारखे कोरण्यात आले आहेत. मूळ मंदिर हे कळसरहित होते. नंतरच्या काळात कधीतरी त्यावर कळस चढवण्यात आले. त्यातून पावसाचे पाणी गळते, म्हणून त्या कळसांचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्याखेरीज त्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याची वेळ आलेली नाही. ते मंदिर आहे तसेच सुबक दिसते.
सह्याद्री खंडातील वर्णनाप्रमाणे कसबा क्षेत्राच्या आठ दिशांना आठ तीर्थे होती. पूर्वेला कमलजा तीर्थ, गोष्पदतीर्थ, दक्षिणेला अगस्तीतीर्थ, आग्नेयेला गौतमीतीर्थ, नैऋत्येला एकवीरातीर्थ, पश्चिमेला वरुणतीर्थ, वायव्येला गणेशतीर्थ, उत्तरेला मल्लारी मयतीर्थ व ईशान्येला गौरीतीर्थ अशी त्यांची नावे आहेत. त्यांपैकी आग्नेय दिशेचे गौतमीतीर्थ युक्त असे ते तीर्थ भैरवाने व्यापले आहे (त्या ठिकाणी स्नान करून व ते जलप्राशन करून मनुष्यप्राणी ब्रह्मलोकाला जातो अशी समजूत) व त्याच्या पश्चिमेला ज्ञानव्यापी या नावाने विख्यात महातीर्थ अशी तीर्थे त्या ठिकाणी पाहण्यास मिळतात. दक्षिणकडे डोंगरात वसलेले सप्तेश (सप्तेश्वर) हे ठिकाणही कसब्याचे वैभव म्हणावे असे आहे. रामक्षेत्रामध्ये पवित्र अशी दहा क्षेत्रे सांगितली आहेत. त्यांपैकी सहा विशेष श्रेष्ठ आहेत. त्यांची नावे- गोकर्ण, सप्तकोटीश, कुणकेश, संगमेश्वर, हरिहर आणि त्र्यंबकेश्वर. म्हणजेच, रामक्षेत्रात सांगितलेल्या पहिल्या सहा श्रेष्ठ अशा क्षेत्रांत चौथे क्षेत्र ‘संगमेश्वर’ आहे.
कसबा संगमेश्वराचे आध्यात्मिक महत्त्वही सर्वोच्च आहे. कार्तिकस्वामी व सूर्यनारायण अशी अभावाने आढळणारी दोन मंदिरे कसब्यात आहेत. चालुक्य घराण्यातील शेवटचा राजा ‘जाखुराय’ याच्या नावावरूनच त्या गावाच्या ग्रामदेवतेचे नाव ‘जाखामाता’ असे पडले असावे असा एक समज आढळतो. मात्र जाखमाता ही स्त्रीदेवता आहे आणि पुरूषाची स्त्री देवता होत नाही. त्यामुळे तो अंदाज चुकीचा असल्याचा तर्क करता येतो. जाखामातेचा ‘शिंपणे’ उत्सव महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
चालुक्या़चा पुत्र कर्ण याची राजधानी कोल्हापूर येथे होती. त्याने इ.सनाच्या दुसर्या शतकात संगमेश्वर ही नगरी वसवली.
या नगरीत शास्त्री, वरुणा आणि अलकनंदा या नद्यांच्या संगमावर कर्णेश्वराचे मंदिर बांधले. मंदिर ४ फूट उंच जोत्यावर बांधलेले आहे. जोत्यावर फुलांची नक्षी काढलेली आहे. या पुर्वाभिमुख मंदिराला तीन प्रवेशद्वारे आहेत. मुख्य प्रवेशद्वारावर चार कोपर्यात चार कोपर्यात चार खांबावर शिव-पार्वती, गणेश, सरस्वती अश्या सुबक मुर्ती आहेत.
प्रवेशद्वाराच्या छतावरील वर्तुळात दशावतार कोरलेले आहेत.
सभामंडपाच्या द्वारावर शेषशायी विष्णु तर मंदिराच्या सर्व बाजुना नृत्यांगणा, किन्नर , गजराज, असे समुह शिल्पाद्वारे जिंवत केले आहेत.
मंदिराचे गर्भगृह व प्रवेशमंडप असे दोन भाग असून प्रवेशमंडपाच्या बाहेरच्या भिंतीवर काही मुर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या बाहेरील बाजूस (प्रवेशमंडप सोडून) कोणतेही कोरीव काम केलेले नाही.
मंदिराच्या गर्भगृहात छताखाली शंकराची पिंड आहे. मंदिरासमोर दगडी दिपमाळ आहे. मंदिर परीसरात एक वैशिष्ट्यपूर्ण "गध्देगाळ" पाहायला मिळतो. या "गध्देगाळावर वरच्या व खालच्या बाजूला देवनागरीत मजकूत लिहिलेला आहे.
या कर्णेश्वाराबाबत काही आख्यायिकाही आहेत. कोणी हे मंदिर पांड्वानी आपला मोठा भाउ कर्ण याची आठवण रहावी म्हणून एका रात्रीत बांधल्याचे सांगतात. तर कोणाच्या मते परशुरामाने हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. कसबा गावात पुर्वी ३००-४०० मंदिरे असल्याच्या नोंदी आहेत, सध्या मात्र मोजकीच मंदिरे शिल्लक आहेत.
या मंदिरासंदर्भात एक मजेशीर अख्यायीकाही सांगितली जाते. कर्ण राजाच्या पणानुसार हे मंदिर पांड्वाना एका रात्रीत बांधायचे होते. बांधकाम पुर्ण झाल्यानंतर पांडव जेवायला बसले, पण तितक्यात पहाट झाली. आता कसले जेवायचे म्हणून त्यांनी ताटे पालथी घातली.
पांडवाची पाच व कर्णाचे एक अशी साधारण चार फुट व्यासाची सहा दगडी ताटे पालथी कोरलेली मंदिरात पहाण्यास मिळतात.
पैकी मंदिराच्या तीन दरवाज्यासमोर तीन, शिवपिंडीखाली एक मंदिराच्या मध्याभागी एक अशी ताटे असून त्याखाली गुप्तधन आहे आणि मंदिराच्या द्वाराखाली पांडवानी दोन ओळींचा शिलालेख लिहून ठेवलेला आहे, त्याचा अर्थ समजल्यास ताटाखालचे गुप्तधन मिळू शकेल अशी ईथल्या भाविकांची श्रध्दा आहे.
मंदिराच्या पुर्वदिशेला असलेल्या प्रवेशद्वारावर शिवपंचायत आहे तर डाव्या बाजुला नरकासुर तर उजव्या बाजुला किर्तीसुराच्या मुर्ती आहेत. या दोन्ही राक्षसांचे शंकराबरोबर युध्द झाले, त्यात त्यांचा पराभव झाल्याबरोबर आपल्याला शिवाच्या पायाशी स्थान मिळावे असा त्यांनी वर मागितला. त्यामुळे मंदिरात येताना यांना पाय लावून येण्याची प्रथा आहे.
महादेवाच्या पिंडीचे तिर्थ शक्यतो गोमुखातून बाहेर पडण्याची सोय मंदिरात दिसते, पण ईथे मात्र मकरमुखातून तिर्थ बाहेर पडते.
कर्णेश्वर मंदिराच्या बाहेर, वाईच्या महागणपतीशी साम्य असणारी गणेशाची छोटी मुर्ती आहे.
कर्णेश्वर मंदिराच्या जवळ नदीपात्राच्या पलिकडे काही उन्हाळी म्हणजे गरम पाण्याचे झरे असल्याचे गावकर्यांनी सांगितले. अप्रतिम कलाकुसरीचा नमुना असलेल्या या मंदिराला भेट दिल्यानंतर महामार्गाला लागूनच असलेल्या आरवली, राजावाडी आणि गोळवली येथील गरम पाण्याच्या कुंडांनाही भेट देता येते. जवळच असलेल्या बुरबांडच्या प्राचीन मंदिरालाही जाता येते.
धोदावणे धबधबा
या शिवाय तिवरे गावात धोदावणे हा बारमाही वहाणारा धबधबा हे ठिकाण न चुकविण्यासारखे आहे. नायरी-तिवरे छोटय़ाशा वस्तीवरून एक रस्ता सरळ आत जंगलात जातो. गाडीरस्ता संपला की पुढे फक्त जंगलातून चालत जायचे. प्रचितगड आणि टिकलेश्वराच्या डोंगररांगांच्या मधून हा रस्ता पुढे पुढे जात असतो. वाटेत अगदी एखाद दुसरे घर लागते. आपल्याला सोबत छोटय़ा नदीची असते आणि हा रस्ता जिथे जाऊन संपतो तिथे ५० फूट उंचावरून पडणारा धोदावणे धबधबा आपली वाट पाहत असतो. काही अंतर आधीपासूनच त्याचा आवाज ऐकू येत असतोच. नायरी तिवरे इथला हा धोदावणे धबधबा बारमाही आहे. शक्यतो सरत्या पावसात इथे जावे. ऐन पावसाळ्यात जर गेले तर धबधब्यापर्यंत जाताच येत नाही. नदीचे पात्र एवढे विस्तारलेले असते की पुढे रस्ताच बंद होतो. पण सरत्या पावसात गेले तर मात्र मोठा धबधबा बघता येतो. एक मोठे कुंड या धबधब्यासमोर तयार झालेले आहे. गर्द झाडी, अतिशय शांतता, आणि समोर प्रचितगडाचा अजस्र डोंगर. सगळे वातावरण अत्यंत रमणीय झालेले असते. प्राचीन काळी देशावर जाण्यासाठी तिवरे घाट वापरात होता. आता मात्र ही वाट मोडलेली आहे.
एकंदरीत एतिहासीक गडभ्रंमती, जंगलानुभव, धबधब्यात आंघोळीचा आनंद, गरम पाण्याच्या झर्यांची गंमत आणि प्राचीन कोरीव कामाच्या मंदिराचे दर्शन असे बरेच काही आपल्याला प्रचितगड आणि परिसर देतो.
( सर्वच प्रकाशचित्रे आंतरजालावरून साभार )
तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची
संदर्भ ग्रंथः-
१) सांगली जिल्हा गॅझेटियर
२ ) रत्नागिरी जिल्हा गॅझेटियर
३ ) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
४ ) आव्हान- आनंद पाळंदे
५ ) कोकणचे पर्यटन- प्र.के. घाणेकर
६ ) शोध शिवछत्रपतींच्या किल्ल्यांचा- सतिश अक्कलकोट
७ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
८ ) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स
प्रतिक्रिया
8 Sep 2017 - 11:54 am | सस्नेह
बापरे ! किती तपशीलवार आणि साग्रसंगीत वृत्तांत !
चित्रे बाकी खुळावून टाकणारी गोड आहेत !
8 Sep 2017 - 12:15 pm | थिटे मास्तर
ll देश धरम पे मिटनेवाला शेर शिवा का छावा था ll
ll महापराक्रमी परमप्रतापि एकहि शंभु राजा था ll
8 Sep 2017 - 12:18 pm | पाटीलभाऊ
नेहमीप्रमाणेच मस्त भटकंती.
एवढ्या खोलात जाऊन तपशीलवार वर्णन केल्याबद्दल _/\_
8 Sep 2017 - 12:47 pm | संजय पाटिल
भरपूर माहितीपूर्ण लेख.. पण या गडावर सहकुटूंब जाउ शकतो का?
8 Sep 2017 - 1:23 pm | सिरुसेरि
माहितीपूर्ण , तपशीलवार लेखन . +१००
8 Sep 2017 - 1:25 pm | दुर्गविहारी
स्नेहांकिता ताई, थिटे मास्तर, पाटीलभाऊ आणि संजय पाटील सर्वांचेच प्रतिसादा बध्दल मनापासून आभार!
किल्ला खुपच अवघड आहे. कुटूंबासमवेत जाण्यासारखा नक्कीच नाही. शक्यतो आधी थोडाफार ट्रेकिंगचा अनुभव असल्याशिवाय या किल्ल्याच्या वाटेला जाणे योग्य होणार नाही. एकदा सहकुटूंब फिरण्याजोगे किल्ले असा वेगळा धागा काढतोच.
धाग्यात कसबा संगमेश्वरमधल्या कर्णेश्वर मंदिराची माहिती दिलेली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करताना जर कधी या परिसरात गेल्यास आवर्जुन हे मंदिर पहा. सविस्तर माहिती दिलेलीच आहे.
8 Sep 2017 - 1:43 pm | चाणक्य
तुम्ही या अनवट किल्ल्यांची ओळख करून देत आहात याबद्दल धन्यवाद.
8 Sep 2017 - 3:32 pm | प्रचेतस
जबरदस्त लेख. अत्यंत तपशीलवार, मुद्देसूद, आदर्श असा.
टाक्यांची रचना बघता किल्ला प्राचीन दिसतोय.
कंधार डोहाबद्दल खूप ऐकलं होतं. अतिशय सुंदर आहे ते.
कर्णेश्वराचं मंदिर भूमिज शैलीतले म्हणता येणार नाही. त्याचे सध्याचे शिखर तर नागर शैलीत (चुन्यात रंगवलेला भाग) आणि काहीसे मिश्र पद्धतीचे आहे. भूमिज पद्धतीचे शिखरांची उदाहरणे म्हणजे अंबरनाथ, गोंदेश्वर आदी मंदिरे.
11 Sep 2017 - 1:10 pm | दुर्गविहारी
प्रतिसादाबध्दल धन्यवाद. मुळात प्रचितगडाचे नेमके स्थान, त्याची एकूणच भौगिलिक रचना आणि संगमेश्वरातील प्राचीन मंदिर लक्षात घेता प्राचीन यात शंका नाही. गडावरचे खांब टाके तेच सांगते,मात्र इतिहास याबाबत मुग्धच आहे.
बाकी कर्णेश्वराच्या शिखराबाबत मलाही शंका आहे.
8 Sep 2017 - 5:24 pm | एस
खूप छान लिहिलंय. चांदोली अभयारण्याचा परिसर अफाट जंगलाचा. रुंदीव, कंधार डोह, पाथरपुंज, वारणा आणि अजून एक नदी (नाव विसरलो) यांचा संगम, मळे घाट, पांढरपाणी, वाल्मिकी, प्रचितगड हा सगळा परिसर अत्यंत घनदाट जंगलाचा आहे. कंधारडोह तर आयुष्यात एकदा तरी पहावा अशी जागा आहे. या जंगलात वन्य श्वापदे खूप आहेत. गवे (ज्यांना स्थानिक लोक म्हसगव म्हणतात) त्यांची संख्या खूप आहे. कर्णेश्वर मंदिर वगैरे हा सर्व भाग भटक्यांसाठी तीर्थक्षेत्रच आहे. संगमेश्वर गावातूनच संभाजीराजे आणि कवी कलश यांना पकडलं गेलं असेल आणि याच वाटेनं त्यांना नेलं गेलं असेल भावना तो मळे घाट चढताना दाटून येते. मळे घाटातल्या मराठ्यांच्या चौक्यांनी मुकर्रब खानाला विरोध केला पण गणोजी शिर्क्याच्या मार्गदर्शनाखाली मुघल सैन्य संभाजी महाराजांना घेऊन जाण्यात यशस्वी झाले.
प्रचितगडाची सध्याची वाट अतिशय खड्या चढणीची आणि धोकादायक आहे. त्यामुळे सहकुटुंब जाण्यासारखा हा किल्ला नाही.
11 Sep 2017 - 1:04 pm | दुर्गविहारी
प्रतिसादा बध्दल धन्यवाद. तुमच्या आणि वल्लींच्या आग्रहाखातर हा धागा मी काढला. आपणही हा परिसर फिरलेले आहात का?
हि नदी बहुधा राम नदी असेल असे वाटते. अचाट आहे हा सगळाच परिसर.
13 Sep 2017 - 2:32 pm | एस
विनंतीला मान देऊन इतका सुंदर धागा काढल्याबद्दल खूप खूप आभार! हो, या परिसरात फिरलेलो आहे. कंधार डोहाचा धबधबा मी पाहिला तेव्हा बराच रुंद होता, या फोटोत आटल्यासारखा दिसतो आहे. त्या दुसऱ्या नदीचे नाव बहुतेक निवळी की तेरणा असे काहीतरी होते. डायरीतल्या जुन्या नोंदी आता सापडेनात. त्या डोहात किमान दोन मगरी मी स्वतः पाहिल्या आहेत. चांदोली अभयारण्य झाल्यापासून या परिसरात जाणे अशक्य झाले आहे. परंतु व्याघ्रगणना जेव्हा असते, तेव्हा वनखात्याकडून आवश्यक ती पूर्वपरवानगी घेऊन स्वयंसेवक म्हणून आपण या कोअर भागात प्रवेश करू शकता. या भागात सर्वात जास्त त्रास कशाचा होतो तर तो जळवांचा! तिथले लांबच लांब पसरलेले अग्निजन्य खडकांचे सडे फारच सुंदर दिसतात. त्या सड्यांवर तुम्ही एक फोटो दिला आहे तशी कुंडे आहेत, बहुतेक कोरडी पडलेली असतात. टिपूर चांदण्या रात्री त्या सड्यांवर गव्यांचे कळप विश्रांती घेत असताना क्वचित दिसतात, ते दृश्य अविस्मरणीय असते. बाकी अस्वलाचा किंवा वाघाचा माग आम्हांला लागला नाही. पण इतकं महामूर घनदाट जंगल सह्याद्रीत इतरत्र क्वचितच पाहायला मिळतं.
तुमचा लेख अतिशय सुरेख आहे. वाचनखूण साठवली आहे.
8 Sep 2017 - 9:12 pm | यशोधरा
किती सुरेख लिहिलंय! धन्यवाद!
8 Sep 2017 - 10:25 pm | पैसा
फारच सुरेख! सध्या रत्नागिरीत असल्याने बघण्याचे नेक्श्ट ठिकाण संगमेश्वर-कर्णेश्वर फिक्स!
11 Sep 2017 - 1:00 pm | दुर्गविहारी
बघून आल्यानंतर त्याविषयी नक्कीच लिहा. बाकी प्रतिसादाबध्दल धन्यवाद.
10 Sep 2017 - 7:48 pm | दोसत १९७४
खूप फोटो छान आहेत!
10 Sep 2017 - 7:53 pm | दोसत १९७४
You are now bear grylls!
11 Sep 2017 - 12:57 pm | दुर्गविहारी
पालीला डायनॉसॉर म्हणण्यासारखे झाले हो हे. :-)
तितके वाहून घेणे मला जमण्यासारखे नाही.आम्ही आपला जीव सांभाळत होता होईल ते करतो. असो.
पण आपल्याला माझे लिखाण आवडल्याबध्दल आणि ईतकी मनमोकळी प्रतिक्रिया दिल्याबध्दल धन्यवाद. ___/\___
10 Sep 2017 - 9:10 pm | माम्लेदारचा पन्खा
किती इनो घ्यायला हवा ते तरी कळेल . . . . .
काय ते वर्णन . . . . नमस्कार करतो इथूनच !
11 Sep 2017 - 12:54 pm | दुर्गविहारी
:-) प्रतिसादाबध्दल मनापासून धन्यवाद. मी हि सामान्य संसारी मनुष्य आहे हो. अलीकडे मलाही फारसे ट्रेकला जाणे जमले नाही. दिवाळीनंतर होईलच सुरु. पण मि.पा.वर लिहीण्यानिमीत्त माझ्या जुन्या ट्रेकच्या आठवणी ताज्या होतात, त्याबध्दल मि.पा.वाचकांचे आभार.
11 Sep 2017 - 1:15 pm | पद्मावति
फारच सुरेख.
13 Sep 2017 - 3:32 am | जुइ
प्रचितगडाची केलेली भटकंती आणि सचित्र वर्णन प्रथमच पाहत आहे.