किल्ले म्हणले कि बहुतेकदा ईतिहासाचा आणि एतिहासिक गोष्टींचा संदर्भ येतो. पण काही किल्ल्यांचा संदर्भ वर्तमानातल्याच वेगळ्याच गोष्टीशी येतो आणि आपल्याही थक्क करणारी माहिती सामोरी येते. असाच एक किल्ला म्हणजे चंदगडजवळचा कलानिधीगड. थोडेसे काव्यात्मक नाव असलेल्या ह्या किल्ल्याला साहित्यिक संदर्भ आहे. आपल्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व, पु.ल.देशपांडे यांचे मूळ आडनाव कलानिधीगडकर असे होते. त्यांचे पूर्वज या किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यांचे मूळ गावही चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी हे होते. या गावावरुनही त्यांना जंगमहट्टीकर या नावाने ओळखले जाई, म्हणूनच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पु.ल. देशपांडे यांना कलानिधीगडकर या नावाने हाक मारीत असत. गणगोत या पु.लं.च्या पुस्तकात तुम्ही हा संदर्भ पाहु शकता.
सभासद बखरीतील उल्लेखानुसार हा किल्ला शिवरायांनी वसविलेल्या १११ किल्ल्याच्या यादीत आहे. हेरेकर सावंत भोसले, तांबूळवाडीकर सावंत यांचा या किल्ल्याशी प्रामुख्याने संबंध आला. गडाच्या दक्षिण बाजूकडील तटबंदीच्या मजबुतीकरणा संबंधात करवीरकर छत्रपतींच्या कागदपत्रात या गडाचा उल्लेख आलेला आहे. पोर्तुगिज दप्तरातही कलानिधीगडाचा वारंवार उल्लेख येतो.
इथे जायचे दोन मार्ग आहेत.
१ ) चंदगड-बेळगाव रस्त्यावर पाटणे हात फाटा आहे, तिथून पाट्णे मार्गे तिलारीकडे जाणार्या रस्त्यावर कोळीवडे फाटा आहे. कालिवडे गाव कलानिधिगडाच्या पायथ्याशी आहे. स्वताचे वाहन असेल तर हा मार्ग सोयीचा. थेट कालिवडे गावापर्यंत डांबरी रस्ता जातो. खरे तर दुरसंचार विभागाचा टॉवर गडावर असल्याने कच्चा रस्ता थेट गडमाथ्यावर गेलेला आहे. पण हा रस्ता खुप लांबचा वळसा घालून जातो. त्यामुळे विनाकारण पेट्रोल आणि वेळ वाया घालविण्यापेक्षा पायी किल्ला चढलेला चांगला.तसेही गडाची उंची खुप कमी आणि झाडीभरला रस्ता असल्याने फार त्रास न होता आपण गड चढू शकतो.
पाटणेहात -कालिवडे फाटा या रस्त्यावर बर्यापैकी बससेवा आणि खाजगी जीप ये-जा करीत असल्याने स्वताचे वाहन नसले तर गडावर जाण्यासाठी चांगला पर्याय.
२) ज्याना पारगड पाहून कलानिधीगडावर यायचे आहे त्यांनी थेट चंदगड-हेरे-पाटणे रस्त्यावर ईसापुर-पारगड फाटा फुटतो, तिथून डावीकडे तिलारीच्या रस्त्याला वळावे व मोटणवाडी-पाटणे -कालिवडे गाठावे.
चंदगडवरुन पाटणेला जाण्यासाठी पुढील प्रमाणे एस.टी. बसेसची सेवा आहे. सकाळी ६.००, ९.५० आणि ४.००.
कलानिधीगड परिसराचा नकाशा
पारगडावरून परतीची बस पकडून मी चंदगड-हेरे -तिलारी रस्त्यावर, ईसापुर फाट्याला उतरलो. आता पाटणेकडे जाणार्या बसची वाट पहायची होती.
लांब पुर्व क्षितीज्यावर डोक्यावर टॉवरचा तुरा ल्यालेला कलानिधीगड लक्ष वेधून घेत होता. ईतक्यात फेव्हीकॉलच्या जाहिरातीची आठवण व्हावी अश्या तर्हेने पासिंजरने खचाखच भरलेली जीप माझ्यासमोर उभी राहिली. आधी तर मला चक्रधर कोण आहेत हेच कळेना. कसेबसे दोन पाय गाडीच्या बॉडीत खुपसून शरीर झेंड्यासारखे हवेत फडफडत महाराज सफाईने ड्रायव्हिंग करत होते. अक्षरशः खचाखच भरलेल्या त्या गाडीत कुठे बसायचे याचा प्रश्नच पडला. पण चालक साहेबांनी तो चुटकीसरशी सोडवला. कालीवडे फाट्याला उतरल्यानंतर सर्व हाडे जागेवर आहेत याची खात्री करून कालिवडे गावाच्या दिशेने निघालो. वाट मस्त काजुच्या बागा, आंब्याची आणि फणसाची झाडे आणि आजुबाजुला तांबडी माती अशी चाललेली होती. गाव ओलांडून एक कि.मी.वर धनगरवाडा आहे तिथून वर जाते. गडावर पाण्याची अडचण असल्याने पाणी या धनगरवाड्यावर किंवा कालिवडे गावातच भरुन घ्यायचे.
वाटेत वीजेच्या तारा आणि खांब सोबत करीत असतात. गडावर जाणार्या वाटेची हि ठळक खुण.
या वाटेने साधारण पंधरा-वीस मिनीटे चाललो कि डावीकडे जांभ्या दगडात तयार केलेला रस्ता लागतो. हा खुप लांब वळसा घालून गडावर गेलाय , त्यामुळे आपण वीजतारांची संगत सोडायची नाही. ईथे मला गडावरच्या दुरसंचार ऑफिसमधे काम करणारे काका भेटले. राम राम करुन गप्पा सुरु झाल्या. गावापासून चालत
साधारण १५ मिनीटांनी उजव्या हाताला दाट झाडीत तुळशी वृंदावनासारखा घडीव दगड दिसतो, बहुधा कोणाची समाधी असावी. (प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार)
थोडे पुढे गेले कि अनगड रचाई असणारा वनदेव दिसतो. अर्थात बरोबर स्थानिक व्यक्ति असल्याशिवाय हे अवशेष सहजा सहजी सापडणार नाहीत. आता ह्या वाटेवर "दुर्गवीर" या स्वयंसेवी संस्थेने दिशादर्शक फलक लावलेले आहेत. पुढे उजवीकडे एक वाट वळत होती. ह्या वाटेने गेल्यास "तोफेचा माळ" हे ठिकाण ज्या ठिकाणी काही तोफा पडलेल्या आहेत व जवळच चाळोबा या देवाची मुर्ती आहे व उतरताना ते पहाण्याचा सल्ला दिला.
साधारण अर्धा तास चालले कि हि नैसर्गिक खिंड दिसते. बहुधा या पहार्याचे मेट असावे.
पुढे पायवाट मुख्य दरवाज्याकडे जाते.
दरवाज्याच्या अलीकडे काही पायर्या आहेत, त्या चढून पुर्वाभिमुख दरवाज्यातून गडाच्या सपाटीवर पोहचलो.
आत प्रवेश केल्यानंतर एक भिंत घालून गडाचे दोन भाग केलेले आहेत. गडावर येणार्या दुर्गभटक्यांचा दुरसंचार ऑफिसला त्रास नको म्हणुन केलेली हि सरकारी व्यवस्था.
आधी उजव्या बाजुचा म्हणजे पश्चिमबाजुचा परिसर पहाण्याचे ठरविले.
आत गेल्यानंतर समोरच एका भिंतीने बंदिस्त केलेल्या आवारात दोन छोटी मंदिरे अशी रचना दिसली. ईथे एक मंदिर गडाची अधीष्ठाती भवानी देवीचे मंदिर पहाण्यास मिळते.
तर शेजारी शिवमंदिर आणि भैरवाची मुर्ती आहे.
जवळच हा गोल आकाराचा देवनागरी शिलालेख आहे. मात्र अक्षरे अस्पष्ट झालीत, त्यामुळे वाचता येत नाही.
हि मंदिरे उतरत्या छ्पराची आणि अनोख्या शैलीची आहेत. थोडीफार भुदरगडासारखीच मंदिरांची रचना आहे.
इथेच बाहेर उघड्यावर श्री गजाननाची अतिशय देखणी मुर्ती आहे, पण हि अशी उघड्यावर का, असा प्रश्न पडल्यावाचुन रहात नाही.
हि मंदिर पाहून गडाच्या पश्चिम टोकाला निघालो.
ईथे काही बर्या अवस्थेतील ईमारतीचे अवशेष दिसतात.
जवळच एक खोल खड्डा दिसतो. हि विहीर आहे. या परिसरातील बाकीच्या किल्ल्यासारखी हि विहीरही खोल तर आहेच
पण विहीरीत पुन्हा दोन खोल चौकोनी विहीरी आहेत.
पैकी एका विहीरीत झाडे वाढली आहेत. तर दुसर्यात अजुन पिण्यायोग्य पाणी आहे. मात्र या विहीरीला फक्त रहाट बसविला आहे. बादली नाही. बादली हवी असेल तर दुरसंचार खात्याच्या कर्मचार्यांची मिनतवारी करायची. ईतकी तकतक करण्यापेक्षा आपणच खालून गावातून पाणी आणलेले चांगले.
दुसर्या विहीरीत कैदी ठेवले जायचे असे म्हणतात, पण त्यात काही तथ्य नाही.
हे विहीरसंकुल पाहून पुर्व तटबंदीपाशी जायचे. या ठिकाणी अजुन एक दरवाजा होता, पण आता तो बुजला आहे. इथून टोकाशी निघालो.
वाटेतील तटबंदी उत्तम अवस्थेत होती.
गडावर येणारा रस्ता तटबंदी फोडून वर आणला होता.
या रस्त्याने थोडा खाली उतरलो आणि बाहेरून तट , बुरुज न्याहाळून घेतले. नुसतेच सरळ रेषेत तट न बांधता थोडी कलाकुसर केली असल्याने हि तटबंदी गडाचे नाव "कलानिधी" हे सार्थ करते.
टोकाकडच्या बुरुजावरून प्रचंड मोठा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. दक्षीणेकड्चा तिलारीनगरचा परिसर व लांब पारगड परिसरावर नजर ठेवण्यासाठी हि आदर्श जागा.
टेकडीसारख्या असलेल्या या गडाच्या चारही बाजुला घनदाट वनाची चादर पसरलेली आहे. ईथे वनखात्याने या जंगलावर नजर ठेवण्यासाठी वॉच टॉवर उभा केला आहे. मात्र उन्हाने तो तापला असल्याने मला वर चढायचा नाद सोडावा लागला.
इथे मला एक भुयार पहाण्यास मिळाले. आता गडाच्या पश्चिम भागाकडे निघालो.
भिंतीपलीकडे गेल्यानंतर जुन्या ईमारतींची डागडु़जी करून त्या सरकारी ऑफिससाठी वापरलेल्या आहेत.
ईथे गडाची माहिती देणारा फलक लावलेला होता.
तसेच हे वृंदावनही दिसले.
दारुगोळा कोठाराचे रुपांतर गोडाउनमधे केले आहे.
तसेच तटात लपविलेले शौचकुप व काही तोफेसाठी असलेल्या खिडक्या दिसल्या. त्यातून दुरवरचा परिसर दिसत होता. वायव्येला गंधर्वगड तर नैऋत्येला महिपालगड ओळखता आला. खाली जंगमहट्टी, जेलुगडे, पाटणे हि छोटी धरणे दिसत होती. दाट झाडीच्या पार्श्वभुमीवरचे निळे पाणी निसर्गचित्रात छान रंग भरत होते.
आता उत्सुकता लागली होती ते तोफेचा माळ व चाळोबाची मुर्ती पहाण्याची . त्यासाठी त्या काकांनी सांगितले होते तसे पुन्हा त्या खिंडीसारख्या भागापर्यंत उतरुन आलो. शक्यतो या दोन्ही गोष्टी गड उतरताना पाहिलेल्या चांगल्या.
उतरताना डावीकडे एक पाउलवाट फुटली आहे. त्याने दहा मिनीटे चालले कि एक झाडे असलेला चौथरा लागतो. ईथे एक जिवंत झरा आहे. या चौथर्याच्या पायथ्याशी भग्न झालेली चाळोबा या देवाची भग्न झालेली मुर्ती पहाण्यास मिळते.
यानंतर तोफेचा माळ हे शेवट्चे आकर्षण होते. मात्र त्या काकांच्या सांगण्यानुसार बराच लांबवर तो परिसर होता. घनदाट झाडीतून वाट तुडविल्यानंतर गडाला बराच वळसा घातल्यानंतर अखेर मोकळवण आले.
(प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार)
ईथे दोन भग्न तोफा पडलेल्या दिसल्या. या तोफा इथे कश्या याचे उत्तर सापडले नाही. कारण तोफा गडासारख्या उंच ठिकाणी नामजद कराव्या लागतात, खाली सपाटीवर त्यांचा काहीही फायदा नसतो. आता दुर्गवीर संस्थेने या परिसरात जाण्यासाठी दिशादर्शक बाण व बोर्ड लावले आहेत. तरीही एखादी स्थानिक व्यक्ती बरोबर असल्यास कमी वेळात सर्व ठिकाणे पाहून होतात.
तोफांचा माळ किंवा चाळोबा हि आधी न एकलेली ठिकाणे पाहुन पुन्हा एकदा कालिवडे फाट्यावर आलो. पण आज बस नशिबातच नव्हती कि काय न कळे. पुन्हा एकदा खाजगी जीप पुढ्यात उभारली, सुदैवाने फारशी भरली नव्हती. मागच्या जागेत जागा करुन बसलो आणि जीप निघाली. लांबवर कलानिधीगड मागेमागे जाताना दिसत होता.
माथ्यावर असलेला टॉवर व एकून आकार पाहून मला सिंहगडाची आठवण झाली. जणु त्याची छोटी प्रतिकॄतीच. ज्याने कोणी "कलानिधीगड" हे कलात्मक नाव दिलय त्याच्या रसिकतेला खरच मुजरा करावासा वाटला.
कलानिधीगडाचा नकाशा
संदर्भग्रंथः-
१ ) कोल्हापुर जिल्हा गॅझेटीयर
२ ) डोगंरयात्रा- आनंद पाळंदे
३ ) कोल्हापुर जिल्ह्याचे दुर्गवैभव- भगवान चिले
४ ) करवीर रियासत- स.मा.गर्गे
५ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
६ ) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स
७ ) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा- सतिश अक्कलकोट
प्रतिक्रिया
11 Aug 2017 - 6:15 pm | एस
नेहमीप्रमाणेच विस्तृत माहिती आणि छान भटकंती.
13 Aug 2017 - 1:29 am | हृषीकेश पालोदकर
उत्तम माहिती.
एकदम हटके किल्ल्याची माहिती दिलीत.
पुढील भटकंती साठी शुभेच्छा !
13 Aug 2017 - 1:32 am | हृषीकेश पालोदकर
सांगाती सह्याद्रीचा हवे आहे मला. आऊट ऑफ प्रिंट आहे. कसे मिळवावे याबाबत काही माहिती असल्यास निरोप देणे..
15 Aug 2017 - 3:03 pm | दुर्गविहारी
"सांगाती सह्याद्रीचा" हे आता कुठेच उपलब्ध नाही. कदाचित एव्हरेस्ट मोहिमेचे नेते ऋषिकेश यादव यांना फेसबुक वर संपर्क करून विचारणा करता येईल. ते या पुस्तकाचे मुख्य लेखक आहेत.
बाकी बरीच माहिती आता कालबाह्य झाली आहे. १९९५ च्या तुलनेत सह्याद्रीत बरेच बदल झालेत.
13 Aug 2017 - 8:46 am | प्रचेतस
पुन्हा एकदा जबरदस्त माहिती.
14 Aug 2017 - 11:44 am | पाटीलभाऊ
नेहमीप्रमाणे सुंदर वर्णन
15 Aug 2017 - 3:05 pm | दुर्गविहारी
सर्वच वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार. या आठवड्यात पावसाळी भटकंती साठी जाउ या तिकोन्यावर
17 Aug 2017 - 3:55 pm | II श्रीमंत पेशवे II
वरील लेख उत्तम .........
तिकोना चे प्लानिंग काय आहे
मी उत्सुक आहे सविस्तर ( कुठून निघणार आहेत ) माहिती मिळाल्यास मी नक्की सामील होईन
17 Aug 2017 - 4:52 pm | दुर्गविहारी
माफ करा. आपला गैरसमज झाला आहे. मी तिकोन्याला चाललेलो नाही. पण तिकोन्याच्यी माहिती देणारा धागा उद्या सकाळी पोस्ट करेन. तुम्हाला जायचे असल्यास धाग्यातील माहिती उपयोगी पडेल अशी आशा वाट्ते.
बाकी तिकोना सोपा आहे आणि सध्या अनेक कुटूंब तिथे किल्ला पहाण्यास येतात. उद्या धागा वाचून तुम्ही नियोजन करून जाउ शकता.
17 Aug 2017 - 7:25 pm | वरुण मोहिते
नेहमीप्रमाणेच उत्तम लेख