उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर १२ : ओस्लो नगरी (३, मुक्तसफर)

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
1 Apr 2013 - 12:10 am

====================================================================
उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३ (समाप्त)...

====================================================================

बस आम्हाला परत घेऊन आली तरी ओस्लोतल्या सगळ्या प्रेक्षणीय स्थळांची यादी संपली नव्हती. पण आता ओस्लो ओळखीचे शहर झाले होते. परतीच्या प्रवासात गाइडशी चर्चा करून एक मार्ग ठरवून घेतला आणि उरलेल्या अर्ध्या दिवसात स्वतःच जिवाचे ओस्लो करायचे ठरवून सिटी हॉलशेजारी बसमधून उतरलो.

सकाळी सिटी हॉलच्या व्हरांड्यातली भित्तिचित्रे बघून झाली होती. आता शोरूम इतकी छान आहे तर गोडाउन किती सुंदर असेल असे म्हणत मुख्य दरवाज्यातून आत शिरलो.

२००५ साली ओस्लोचा सिटी हॉलची ओस्लोमधली शतकातली सुंदर इमारत (Oslo's Structure of the Century) म्हणून निवड झाली आहे. दरवर्षी १० डिसेंबरला (आल्फ्रेड नोबेलच्या पुण्यतिथीच्या दिवशी) याच ठिकाणी नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्याच्या समारंभाचे आयोजन केले जाते.

आत गेल्या गेल्या आपण एका प्रशस्त (४०-४५ मी लांबीरुंदी आणि २०-२५ मी उंची) हॉलमध्ये शिरतो. याच्या चारी भिंतींवर मोठमोठी चित्रे रंगवली आहेत. एक एक चित्र बघायला फक्त मान वळवणे पुरेसे नाही, किमान १५-२० मीटर चालत जावे लागते ! या चित्रांतून ओस्लोच्या समाजजीवनाचे, इतिहासाचे, सामाजिक तत्त्वज्ञानाचे कधी सरळपणे तर कधी नवचित्रकलेच्या सांकेतिक तंत्राने चित्रण केलेले आहे.

.

.

.

या इमारतीच्या प्रत्येक खोलीत इतक्या कलाकृती आहेत की ही एक शासकीय इमारत आहे की संग्रहालय आहे असा प्रश्न पडतो...

.

.

मुख्य म्हणजे काहीही आडकाठी न करता या सर्व इमारतीतून प्रवाशांना फिरण्याची मुभा आहे... सभा चालू नसेल तर अगदी सभागृहातही जाता येते...

सभेसाठी आलेल्या सभासदांसाठी बसायची व्यवस्था...

तेथून बाहेर पडून पाच-दहा मिनिटात चालत जाऊन नॉर्वेच्या लोकसभेजवळ पोहोचलो. आणि ध्यानात आले, "अरे काल रात्री तर हिचा छान दिसणारी इमारत म्हणून फोटो काढला होता. आज त्या इमारतीपुढे काही कलाकारांचा व्हलेंटाईन डे निमित्त संगीताचा कार्यक्रम चालला होता...

संध्याकाळची वेळ होती. घराकडे जाण्यासाठी लोकांची लगबग चालू होती. रस्त्यावरून माणसे, बस आणि, ट्रॅम आणि तुरळक खाजगी गाड्या यांची गर्दी ट्रॅफिक जॅम न करता धावत होती...

तेथून जवळच असलेले ओस्लो ऑपेरा हाउस बघायला गेलो. २००७ साली पूर्ण झालेल्या या इमारतीला २००८ साली World Architecture Festival मध्ये व २००९ मध्ये European Union Prize for Contemporary Architecture ही बक्षिसे मिळाली आहेत. या इमारतीकडे जाताना नॉर्वेसारख्या सामाजिक जाणिवेबद्दल प्रसिद्ध असलेल्या देशातही फुटपाथवर झोपलेला माणूस दिसला आणि आश्चर्य वाटल्याशिवाय राहिले नाही...

हे ऑपेरा हाउसचे झालेले पहिले दर्शन...

ही इमारत अगदी समुद्रालगत आहे...

या इमारतीच्या छतावरही जाता येते पण भरपूर बर्फवृष्टीमुळे रस्ता निसरडा झाला होता आणि वर जायला मज्जाव होता...

इमारतीच्या आतली रचना मात्र पाहण्यासारखी होती...

.

तेथून पुढे कूच केले आणि ह्या वॉकींज प्लाझाच्या गर्दीत मीही सामील झालो...

चालताना ही पाटी बघितली आणि थबकलोच !

भटकायची धुंदी कमी झाली आणि भुकेची प्रकर्षाने जाणीव झाली. अर्थातच पोटाने पायांचा ताबा घेतला. रेस्तरॉचे वातावरण एकदम हिंदुस्तानी (बॉलीवूड नाही) संगीतासह भारतीय होते...

मेन्यू बघितला आणि दिल खूश हुवा ! तडक हे जेवण मागवले...

दणकून ताव मारला हे काय सांगायला पाहिजे काय ? जेवणानंतर बडीशेप तोंडात टाकून नॅशनल आर्ट गॅलरी बघायला बाहेर पडलो. अंधार्‍या दर्शनी भागामुळे इमारतीला दोन फेर्‍या मारल्यानंतर एका कनवाळू नॉर्वेजियनच्या मदतीने दार शोधून काढले. बंद होते. पण गाइडने सांगितले होते की संग्रहालय उशीरापर्यंत उघडे असते. मग काय जोर लावून ढकलले आणि अहो आश्चर्यम दरवाजा 'तिळा तिळा दार उघड' असे न म्हणताही उघडला. जरासा दबकतच आत शिरलो आणि जराशी हालचाल दिसली. दोन पावले अजून आत गेलो तर डावीकडे स्वागतकक्ष दिसला. मग मात्र जोरात जाऊन तिकीट मागितले. तिकिटाचे पैसे द्यायला खिशात हात घातला तर स्वागतिका म्हणाली, आज मोफत आहे आणि शून्य नॉर्वेजियन क्रोनरचे तिकीट माझ्या हाती दिले. जरा आश्चर्य वाटले पण संग्रहालय बंद होण्याआधी इथले चित्रांचे मोठे संकलन शक्य तेवढे सगळे बघायचे होते त्यामुळे संग्रहालयाचा नकाशा घेऊन कामाला लागलो. सगळ्यात पहिला मोर्चा रूम २४ कडे... याच खोलीत नॉर्वेचा जगप्रसिद्ध चित्रकार एडवर्ड मंच (Edvard Munch) याची चित्रे आहेत ही माहिती बसमधल्या गाइडकडून अगोदरच काढली होती. मला तसे नवचित्रकलेतले फारसे काही कळत नाही... पण ओस्लोला येऊन मंचचे the Scream न बघता गेलो असतो तर मनाला नक्कीच रुखरुख लागली असती. तर हीच ती जगप्रसिद्ध "किंचाळी"...

आता मला या चित्राचे रसग्रहण करायला सांगू नका :) . मात्र या चित्राने मंचला कलाक्षेत्रात अपरिमित कीर्ती मिळवून दिली आहे हे मात्र खरे आहे. मंच आणि इतर नावाजलेल्या चित्रकारांची अजूनही बरीच चित्रे आहेत. शांतपणे बघायची तर अख्खा दिवस कमी पडेल. एक दोन खोल्यांत अंधार होता. परत जाताना कळले की वातानुकूल यंत्रणेतल्या बिघाडामुळे पाणी गळून काही खोल्यांतला वीजपुरवठा बंद झाला होता आणि म्हणूनच ९० टक्के संग्रहालय छान चालू असूनही संपूर्ण दुरुस्ती होईपर्यंत प्रवेश विनामूल्य होता.

बाहेर पडून मोर्चा राजवाड्याकडे वळवला. आता ओस्लोच्या वाटा पायाखालच्या वाटत होत्या. नकाशा न वापरता बरोबर पोचलो...

कुंपण नसलेली आणि एका बाजूला अगदी लागून रस्ता असलेली हि इमारत राजवाडा आहे हे सकाळी बसमधून जाताना गाइडने सांगितले होते म्हणूनच समजले. ना उंच भिंती, ना रक्षकांचा ताफा, ना इतर फुकाचा बडेजाव !

तेथून पुढे ओस्लो बंदराच्या दिशेने वळलो. वाटेत नोबेल पीस सेंटर लागले...

या इमारतीत नोबेल शांतता पुरस्कारासंबंद्धी आणि नोबेल शांतता पुरस्कारीत मंडळींबद्दल आणि एकंदर जागतिक शांततेसंबद्धी वर्षभर प्रदर्शने चालू असतात. आतासुद्धा महात्मा गांधींवर एक प्रदर्शन चालू होते...

 ..................

येथूनच पुढे सुरू झालेल्या ओस्लो बंदराच्या बाजूच्या दुकानांत आणि रेस्तराँमध्ये रात्रीचा झगमगाट सुरू झाला होता...

.

.

संध्याकाळच्या जेवणासाठी हा भाग फार प्रसिद्ध आहे असे गाइड म्हणाली होती. पण जयपूर इंडियन रेस्तरॉमुळे ती गरज आता राहिली नव्हती. थोडा वेळ तेथे भटकून परत फिरलो. वाटेत हा सायकलच्या टायरमध्ये हवा भरण्यासाठी रस्त्याशेजारी असलेला सार्वजनिक पंप दिसला. नॉर्वे शासन प्रदूषणाच्याबद्दल केवळ गप्पा न मारता कार्यही करत आहे याचा हा पुरावा...

हॉटेलमध्ये रूमवर पोहोचलो तर व्यवस्थापनाने ही व्हॅलेंटाइन डे भेट खोलीत ठेवून आमच्यावरील प्रेम व्यक्त केलेले होते.

(क्रमशः )

====================================================================
उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३ (समाप्त)...

====================================================================

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

1 Apr 2013 - 12:40 am | धमाल मुलगा

द्येवा...काय पृथ्वीवरच होता की स्वर्गातली सफर करायला गेला होतासा?
डोळे निवले राव एकेक फोटू पाहून. आणि लिहिलंय देखील झक्कास! आपण तर तुमच्या प्रवासवर्णनांचा फ्यानच झालोय! :)

और भी लिख्खो भाई! बहुत दम हय तुम्हारे क्यामेरेमें, लेखणीमें आउर भटकंतीमें! :)

- (घरकोंबडा) धम्या

बॅटमॅन's picture

1 Apr 2013 - 12:55 am | बॅटमॅन

+१.

हा भाग वाचून तर नॉर्वेचा अजूनच फ्यान झालोय आपण!!!! इतक्या एक्स्ट्रीम थंडीत हे सगळे कवतिक उभे करणे म्हंजे काही खाऊ नाहीये. नॉर्वेजियन्सना मानले ब्वॉ एकदम.

अभ्या..'s picture

1 Apr 2013 - 1:05 am | अभ्या..

हे पण भारीच. वरिजिनल स्क्रीम बघितलात तुम्ही म्हणजे भारीच. आम्च्या प्रत्येक पुस्तकात हे प्रिंट असायचेच.
बाकी जयपूर आणि सिटी हॉलमधले पेंटींग सारख्या इतर गोष्टीपण मनोरंजक आहेतच.

अभ्या..'s picture

1 Apr 2013 - 1:07 am | अभ्या..

हे पण भारीच. वरिजिनल स्क्रीम बघितलात तुम्ही म्हणजे भारीच. आम्च्या प्रत्येक पुस्तकात हे प्रिंट असायचेच.
बाकी जयपूर आणि सिटी हॉलमधले पेंटींग सारख्या इतर गोष्टीपण मनोरंजक आहेतच.

चौकटराजा's picture

1 Apr 2013 - 9:51 am | चौकटराजा

माझ्या आतापर्यंत वाटचालीत मी श्रीमंती कशी भोगायची याची अक्कल नसलेली माणसे पाहिली.पैसे खर्च करण्यासाठी नवनवीन फ्लॅटस, सोने कपडे व हादडने असे सर्व साधारण त्यांचे प्लानिंग असते. आपल्या या धाग्यात असलेल्या पैशाचे
सार्थक कसे करायचे काय काय भोगायचे याचा एक मस्त धडा आपण घालून् दिलेला आहे. आदाब ! नेहमी प्रमाणे फोटोग्राफी मस्त .मिपावरच्या पोटोग्राफीतील जवळ जवळ सर्वोत्तम. आपल्यासाठी www.xaxor.com या साईटची शिफारस करीत आहे .जवळ जवळ दहा लाख फोटू आहेत तिथे. विन्ट्ज फोट्ग्राफीही पाहायला मिळेल तिथे. ईस्ट युरोपही पहाण्यासारखे आहे म्हणतात !

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Apr 2013 - 4:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

@ चौकटराजा :
माझ्या या छंदाला एवढे मोठे पारितोषिक मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. त्यासाठी धन्यवाद व्यक्त करायला शब्द सुचत नाहीत. जो तो आपापल्या आंतरीक ओढीने काहीना काही ना काही करत आणि साठवत असतोच... काहिना ते सुख फ्लॅट्मध्ये तर काहीना कपडे-दागिन्यात सापडते... मला भटकंती करून नवीन भूभाग, तिथली माणसे, निसर्ग, संस्कृती, इ. पाहण्यात, अनुभवण्यात, ते मनात साठविण्यात फार मजा वाटते, इतकंच. "खयाल अपना अपना" असं काहीसं कोणीतरी म्हणून गेला आहेच ना !

श्रिया's picture

1 Apr 2013 - 10:58 am | श्रिया

खूप भारी झाली आहे, हि सफरसुद्धा! रात्रीचा झगमगाट छान वाटत आहे.

जाम म्हणजे जाम म्हणजे जामच भारी. रंगीबेरंगी फोटु मस्तच. आणि जयपूर रेस्टॉरंट ऑस्लो मध्ये म्हणजे तर येकदमच ब्येष्ट.. :)

तुम्ही स्क्रीम पेंटीग पाहीले अन आम्हालाही दाखवले याबद्दल धन्यवाद.
चौकटराजांशी सहमत. असलेली श्रीमंती नुसतीच बडेजाव करण्यात घालवायची अन अशा सुंदर अन वेगवेगळ्या गोष्टी सोडुन द्यायच्या हे मलापण काही समजत नाही. असो.

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

योगी९००'s picture

1 Apr 2013 - 12:35 pm | योगी९००

तुमच्या लेखाने नॉर्वेच्या आठवणी जाग्या झाल्या. मी येथे चार वर्षे राहिलो. खुप छान शहर आहे.

इथे १०-१२ भारतीय हॉटेल्स आणि हो मराठी मंडळ सुद्धा आहे. (http://marathimandal-norway.no/)

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Apr 2013 - 3:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

धमाल मुलगा, बॅटमॅन, अभ्या.., चौकटराजा, श्रिया, प्रथम फडणीस, शिल्पा ब आणि योगी९०० : आपल्या उत्साहवर्धक प्रतिक्रियांसाठी अनेकानेक धन्यवाद !

@ योगी९०० : नॉर्वेत इतकी मराठी मंडळी असतील असे वाटले नव्हते. पण नंतर कळले की चार हजारावर मराठी माणसे एकट्या ओस्लोत आहेत असे कळले ! अजून एक द ग्रेट ईंडिया नावाचे रेस्तरॉ माझ्या हॉटेलपासून जवळच दिसले होते.

चेतन माने's picture

1 Apr 2013 - 4:56 pm | चेतन माने

चौरांशी एकदम सहमत.
बाकी जेवणाचा फोटू ५-६ वेळा बघितला!!!!
त्रिवार छान :) :) :)

राही's picture

1 Apr 2013 - 6:50 pm | राही

उत्कृष्ट फोटो आणि त्यांना साजेशा सुंदर वर्णनामुळे नॉर्वेला न जाताही नॉर्वे पाहिल्याचे समाधान मिळाले.
सर्वच भाग उत्तम झाले आहेत.

फारच गोड फोटू आहेत. बाकी कौतुक नेहमीचेच. चौरांशी सहमत.

५० फक्त's picture

2 Apr 2013 - 7:09 am | ५० फक्त

पुन्हा एकदा आभार आणि चौराकाकांशी सहमत,मी आयुष्याची शेवटची दोन वर्षे काय करावं याबद्दल मार्गदर्शन मि़ळ्तंय त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

फोटो पाहून अन वर्णन वाचून थक्क .
काय हो एक्काराव, तुम्ही डॉक्टर आहात की व्यावसायिक फोटोग्राफर की हौशी प्रवासी ? का तिन्ही ?अ

मस्त! नॉर्वेच्या लोकसभेचा फोटो आवडला.

आतिवास's picture

2 Apr 2013 - 8:19 am | आतिवास

तुमचा प्रवास आवडतो आहे.

सुमीत भातखंडे's picture

2 Apr 2013 - 11:09 am | सुमीत भातखंडे

प्रत्येक भागात इतके मस्त फोटू आणि वर्णन आहे की प्रत्येक वेळा भारी-भारी प्रतिक्रिया कुठून आणायच्या राव!
असो...पुन्हा एकदा धन्यवाद, एव्हढंच म्हणतो. तुम्ही लिहित रहा, आम्ही वाचत राहूच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Apr 2013 - 4:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

चेतन माने, राही, रेवती, ५० फक्त, स्नेहांकिता, यशोधरा, आतिवास आणि सुमीत भातखंडे : आपल्या सर्वांना सुंदर प्रतिक्रियांसाठी अनेक धन्यवाद !

प्यारे१'s picture

2 Apr 2013 - 9:19 pm | प्यारे१

छान लिहीताय.
अ‍ॅज युज्वल.

-ऑस्लोमध्ये एक मित्र असलेला प्यारे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Apr 2013 - 11:05 am | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

मनिमौ's picture

7 Aug 2017 - 2:10 pm | मनिमौ

फार फार भाग्यवान आहात