====================================================================
उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३ (समाप्त)...
====================================================================
... जे काय बघितले ते अवर्णनीय होते... अनेक वर्ष टोचणी देणारे मन तृप्त झाले आणि आज पूर्ण समाधानाने झोप आली.
आजचा ट्रुम्सोमधला तिसरा दिवस. कालच्या ऑरोराच्या दर्शनाने सकाळचा वेळ जरासा तरंगतच होतो ! लवकर उठून न्याहारी करून तयार झालो. कारण आजचा पूर्ण दिवसाचा कार्यक्रम होता आणि तो सकाळी ८:४५ लाच सुरू होणार होता. हॉटेलबाहेर पडलो तेव्हा बऱ्यापैकी अंधारलेले होते. बसने साधारण दीड तास दूर असलेल्या बर्फावरच्या बाइकच्या (स्नोमोबाइल) सफारीच्या 'कँप टामोक' या ठिकाणाकडे आम्ही निघालो. रात्री निरभ्र असणारे आकाश परत ढगांनी पूर्णपणे झाकोळून गेले होते. रात्री बरीच बर्फवृष्टी झालेली दिसत होती.
टामोक कँप पर्यंतच्या रस्ताभर बर्फाळ प्रदेशाच्या सौंदर्याचे केवढे तरी नमुने बधायला मिळाले. एकरंगी बर्फ पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात पडला की किती सुंदर किमया करू शकतो ते स्वतःच्या डोळ्यांनी बघितल्याशिवाय कळणे कठीण आहे...
.
.
.
.
मधूनच नुकत्याच क्षितिजावर डोकावणाऱ्या सूर्याची कोवळी किरणे पडून बर्फाच्छादित डोंगरांची शिखरे रक्त-सोनेरी रंगांनी चमकत होती...
जसजसे आम्ही किनारपट्टी सोडून नॉर्वेच्या अंतर्भागात जाऊ लागलो तशी गोड्या पाण्याची गोठलेली तळी दिसू लागली...
हे सगळे नवीन प्रकारचे सृष्टीसौंदर्य पाहत दीड तास कसा संपला ते कळलेच नाही. टामोक कँप समुद्रसपाटीपेक्षा २५० मीटर उंच डोंगराळ भागात आहे. येथून सुरू होणारा सफारी ट्रॅक १५ किमी वरील समुद्रसपाटीपेक्षा ८५० मीटर अधिक उंचीवरघेऊन जातो. हे टामोक कँपचे पहिले दर्शन, इथे बसमधून उतरून साधारण १०० मीटर पायी जायला लागते...
येथे सगळ्यात प्रथम प्रत्येकाला त्याच्या आकारमानाप्रमाणे खास थंडी निरोधक ओव्हरऑल, स्नो बूट, ग्लोव्ह्ज, गरम माकडटोपी आणि हेल्मेट मिळाले. हे सगळे चिलखती सामान अंगावर चढवताना सगळ्यांचीच होणारी त्रेधातिरपीट पाहून बरीच करमणूक झाली. अर्ध्या तासांत हे सगळे घालून तयार झाल्यावर स्नोमोबाइल चालविण्यावर एक प्रात्यक्षिकासह वर्ग झाला. तसे हे वाहन अवजड असले तरी चालवायला फार शिक्षणाची जरूरी नाही. गियर नसलेल्या ल्युनासारख्या वाहनाला चालविण्यासाठी लागणारे ज्ञान पुरे असते... पण ही तुलना येथेच संपते. स्नोमोबाइलचे गियर ऑटोमॅटिक व इंजिन खूप शक्तिमान असते. अॅक्सलरेटर नीट ताब्यात ठेवला नाही तर गाडी बाँडपटात दाखवतात तशी उडी मारते ! शिवाय बर्फासारख्या गुळगुळीत पृष्ठभागावरून चालवायची असल्याने वळणावरून व चढण-उतरणीवरून फार काळजी पूर्वक आपल्या शरीराचा भार डावी-उजवीकडे करावा लागतो... हे जमले नाही तर गाडी सहजपणे बाजूवर लोळण घेते ! गाड्यांच्या दर गटाबरोबर एक प्रशिक्षित गाईड असतात. ही गाडी चालवायला ड्रायव्हिंग लायसेंस आणा असे सांगितले होते. पण त्याची खात्री न करता एका डिस्क्लेमरवर सही केली तरी ठीक आहे असे सांगितले.
आमच्या गटात अंदाजे पंधरा गाड्या आणि दोन गाइड होते. मी थोडा मागे राहिलो होतो ते पथ्थ्यावरच पडले. कारण एका गाडीवर दोन जण बसवत होते आणि जातानाचे १५ किमी पहिल्याने गाडी चालवायची आणि परतीचे १५ किमी दुसर्याने असा नियम होता. माझा नंबर आला तेव्हा मी एकटाच उरलो होतो. गाइड म्हणाला, "आता तुम्हालाच एकट्याला सर्व वेळ गाडी चालवावी लागेल." मी त्याला "नो प्रॉब्लेम." म्हणालो पण एकट्याच्या हातात सर्वकाळ गाडी राहणार या कल्पनेने मनात मात्र फार खूश झालो होतो ;). एकटाच गाडी चालवत असल्याने फोटो मात्र जरा कमी काढायला मिळाले. अर्थात त्याची कसर मधे मधे आमच्या सहप्रवाशांनी बर्फात (गाडीसह) लोळण घेऊन आणि गाडी थांबवून फोटो काढण्याला फुरसत देऊन काही प्रमाणात भरून काढली +D.
पहिल्या पाच मिनिटातच ही पहिली आडवी झालेली गाडी...
मग अजून पाच मिनिटात दुसरीने लोळण घेतली...
सफरीचा मार्ग खरोखरच अॅडव्हेंचर सफारी असावी असाच निवडला होता. झाडाझुडुपातला अरुंद मार्ग, चढण-उतरण, ३०-४० अंशातल्या टेकडीचा उतार, वगैरेंनी हि नवखी गाडी चालवताना पहिल्यांदा बरेच दडपण आले. सगळीकडे भुसभुशीत बर्फ. थोडेसे नियंत्रण जाऊन चिंचोळा ट्रॅक सोडून गाडी बाहेर गेली की लोटांगण नक्की. पहिला थांबा साधारण ५ किमी वर होता. तोपर्यंत बराच धीर चेपून मजा यायला सुरुवात झाली होती. आडवी झालेल्या गाडीला सरळ करण्यात हातभार लावता लावता पटकन फोटो काढायला थोडासा वेळ मिळायचा...
.
अस्मादिक...
पाच किमीवरचा पहिला "पिट् स्टॉप"… येथे मुख्य गाइडने परत एकदा गाडी-लोळण-विरोधक सूचना दिल्या...
आणि आमची सफारी परत मार्गाला लागली...
तोपर्यंत मंडळी बर्यापैकी सरावली होती. गाइडने सफारीचा वेगही वाढवला. आता झाडाझुडुपाच्या रस्त्यावर व चढण उतारावर मजा यायला सुरुवात झाली होती. मात्र एका टेकडीच्या उतारावरच्या ४० अंशाच्या तिरक्या आडव्या रस्त्याने रक्तातले अॅड्रीनॅलीनचे प्रमाण वाढवले, कारण डाव्या बाजूला दोन मीटरवर एक अंदाजे ५० मीटर खोल दरी होती! (म्हणजे ५० मीटर खोलीवर बर्फ दिसत होते... बर्फ किती खोल आहे ते माहित नाही ! +D ) मात्र तो रस्ता संपेपर्यंत पूर्ण धीर चेपला होता आणि गाडीवरही चांगला ताबा आला होता. आता जरा मोकळीक मिळाली की गाडी ६०-७५ च्या वेगाने हाणायला मजा येऊ लागली होती. मग मात्र १५ किमी कसे संपले ते कळलेच नाही !
हा अर्ध्या सफारीवरचा थांबा...
ह्या सफारी थांब्याचे ठिकाणाचे विशेष म्हणजे ते नॉर्वे, स्वीडन आणि फिनलंड या तीन देशांच्या सीमा एकमेकाला भिडतात त्या ठिकाणापासून अगदी काही किमी वरच आहे.
खालच्या चित्रात दिसणार्या डोंगरांच्यापैकी डावीकडची जवळची टेकडी नॉर्वेमध्ये आहे तर दूरवर दिसणार्या डोंगरांपैकी उजवीकडचे स्वीडनमध्ये व डावीकडचे फिनलंडमध्ये आहेत...
आतापर्यंत फक्त चित्रपटांत पाहिलेले नाक आणि मिशीवर जमणारे बर्फ माझ्या चेहर्यावरही जमा झाले होते हे चेहरा पुसताना ध्यानात आले. थोडावेळ निसर्गसौंदर्य बधून व फोटो काढून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. यावेळी थोडी वेगळी वाट करून गाइडने आम्हाला चारी बाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या एका संपूर्ण गोठलेल्या तळ्यावर नेले आणि सांगितले की, "अजून दुसरी एवढी सुंदर सपाट जागा तुम्हाला येथे मिळणार नाही. अगदी वेगाने गाडी चालवा आणि काय करामती करायच्या असल्या तर करून घ्या. फक्त त्या पलीकडच्या उंच डोंगराच्या उतारावर जाऊ नका. तेथे बरेच भुसभुशीत बर्फ आहे, अडकून पडाल. "मग काय मजाच मजा ! तळे साधारण ३ किमी X २ किमी आकाराचे असावे. तळ्याच्या सपाट पृष्ठभागावर गाडी ९०-९५ च्या वेगाने हाणतानाची आणि बाजूच्या टेकड्यांच्या ३०-४० अंशाच्या उतारावरून नेतानाची मजा पुरेपूर उपभोगली.
तळ्याच्या दुसर्या टोकावरून काढलेला आमच्या सहप्रवाशांचा फोटो (दूरवर दिसणारे ठिपके ते तेच, एकाच्या गाडीचा हेडलाईट चालू आहे) ...
गाइडने नको म्हटले असतानाही दोन वीर त्या उंच डोंगरावर चढाई करू लागले... एकजण वीसेक मीटर वर जाऊन आडवा झाला तर दुसरा पहिल्या पाच मीटर मध्येच गारद झाला ! मात्र गाइडने फार चिडाचीड न करता त्याचे कौशल्य वापरून त्यांना सोडवले...
या टेकडीच्या उतारावरून ७०-७५ च्या वेगाने जाताना खूप मजा आली...
४५ मिनिटे अशी मजा केल्यावर आमची तुकडी परतीच्या मार्गाने कँपकडे परत निघाली...
आतापर्यंत स्वतःच स्वतःला स्नोमोबाइल चॅम्पियन असल्याचे सर्टिफिकेट देऊन त्याला साजेशी गाडी दामटवायला सुरुवात केली होती... झाडाझुडूपातला रस्ता, चढउतार, टेकड्या सगळे मजेशीर वाटायला लागले होते.
आमच्या गटातल्या एकाने ठिसूळ बर्फात घुसवलेली गाडी काढायला एकदा मदत केली... आतापर्यंत बर्याचदा गाइड हे काम करत असताना केलेले निरीक्षण कामाला आले +D . सफारीमध्ये जाऊन-येऊन ३० आणि तळ्यावर कमीतकमी २०-२५ म्हणजे ५० किमी पेक्षा जास्त गाडी चालवूनही तिच्यावरून उतरायला जीव होत नव्हता :( . पण नाइलाज होता. सरळ सामी तंबूत जाऊन कॉफीचा आधार घेतला तेव्हा जरा बरे वाटले...
सामी म्हणजे नॉर्वे, स्वीडन, फिनलंड आणि रशियाच्या कोला पेनिन्सुला या उत्तर ध्रुवीय प्रदेशांतील मूळ रहिवासी. त्यांना लाप आणि या भूमीला लापलँड किंवा साप्मी असेही संबोधले जाते. हे लोक येथे अगदी १०,००० पेक्षा जास्त वर्षांपासून वस्ती करून आहेत. साप्मीची जमीन अनेक खनिजांनी आणि खनिज तेलाने समृद्ध आहे... आणि याचा मोठा वाटा नॉर्वेच्या समृद्धीमध्ये आहे. नॉर्वेजियन सामी लोकांची स्वतःची लोकसभा (सामी पार्लमेंट) आहे. सामी पार्लमेंटने पास केल्यानंतरच सामी लोकांसंबंद्धीचे कायदे नॉर्वेच्या राष्ट्रीय पार्लमेंटमध्ये मांडले जातात.
टामोक कँप सामी लोक चालवतात. तेथे प्रवाशांची सोय पारंपरिक सामी तंबूत केलेली होती आणि गाइडही पारंपरिक वेषभूषेत होते. तंबू मात्र आता रेनडियरच्या कातड्यापासून न बनवता अधिक थंडी निरोधक कृत्रिम कापडाने बनवतात. मध्यभागी शेगडी असलेले हे तंबू बरेच उबदार असतात. तसेच त्या शेगडीचा चहा-कॉफी गरम ठेवण्यासाठीही दुहेरी उपयोग होतो...
सामी तंबू... बाहेरून...
आणि आतून...
सामी गाइड
या तंबूत आम्ही चहा-कॉफी-सूप-ब्रेडचा आस्वाद घेत आराम केला. यावेळी सकाळी बसमध्ये ओळख झालेल्या एक जर्मन लेखिके बरोबर गप्पा मारत वेळ मजेत गेला. या बाईसाहेबांनी जवळ जवळ तीन दशकांपूर्वी लहान मुलांकरिता गोष्टी आणि प्रवासवर्णने लिहायला सुरुवात केली. आता आर्थिक मंदीमुळे लहान मुलांच्या संबद्धीचे साहित्य मागे पडल्याने सद्द्या त्या अॅडव्हेंचर टूरिझमबद्दल लिहितात. त्यांसंबंधातच त्या टामोक कँपमधील मुख्य गाइडची मुलाखत घेण्यासाठी आलेल्या होत्या. त्यांच्या भ्रमंतीतले मजेदार अनुभव ऐकत तासभर वेळ मजेत गेला.
मग गाइडने दिलेले स्नो शूज घालून "स्नो शूईंग" करायला निघालो. ही खास बर्फात चालाण्याची पादत्राणे जरी नवीनच पडलेल्या भुसभुशीत बर्फावरून चालायला मदत करत असली तरी ते जरा जिकिरेचच काम आहे. मात्र ती पायात घालून कँपातल्या जंगलात गेलो आणि घेतलेल्या कष्टाचे चीज झाले...
.
.
.
.
दोन तास सहप्रवाशांबरोबर मस्ती करत, बर्फात स्नो शू मध्ये पाय अडकून पडत-धडपडत, एकमेकाला आधार देऊन उभे करत बरीच दमणूक करून घेतली. काही जणांच्या लोटांगणांनंतर आम्ही शोध लावला की स्नो शू ला ‘रिव्हर्स गिअर’ नसतो ! तेव्हा उलट जायचे असेल तेव्हा गोलाकार चक्कर मारून जा ! या लाबलचक पादत्राणाचा मागचा भाग पुढच्यापेक्षा खूपच लांब असतो आणि तो पाय उचलल्यावर वजनाने जरासा खालीच राहतो. म्हणून मागे पाऊल टाकायला गेले की तो बर्फात रुतत जातो आणि आपण बर्फात लोटांगण घालतो. इतके सगळे कळले तरी फोटो काढताना योग्य कोन आणि चौकट साधण्यासाठी जरा मागे पाय टाकला की आपण काय विसरलो हे आपली पाठ बर्फाला स्पर्श करण्या अगोदर कळते... पण तितक्यातही बर्याचदा खूप उशीर झालेला असतो ! पण याचा एक फायदा झाला. मुद्दाम बर्फात लोळलो असतो तर लोकांनी विचित्र नजरेने पाहिले असते. या निमित्ताने मात्र सगळ्यांनी बर्फात लोळण्याचा आनंद घेतला !
मधूनच जंगलाच्या ट्रेलवरून जाणारी ही डॉगस्लेड दिसली...
मीटरभर खोल बर्फातून डोके बाहेर काढून सुचिपर्णी वृक्षाची काही इवलीशी पोरं त्या बर्फाला वाकुल्या दाखवत अभिमानाने मान वर करत होती, त्यांची पाठ थोपटली...
.
जसे दुपारचे अडीच तीन वाजले तसे लापलँडची संध्याकाळ झाली आणि अस्ताला गेलेल्या सूर्याची क्षितिजावर रेंगाळणारी किरणे बर्फाच्छादित पर्वतशिखरांना सोन्याने मढवू लागली...
थोड्यावेळाने सूर्य बराच खाली गेला आणि पर्वतशिखरांवरची आरास क्षितिजाजवळ रेंगाळणार्या ढगांवर गेली...
बर्यापैकी अंधार झाला आणि आम्ही सगळे परत सामी तंबूत गोळा झालो. त्यांत ऑरोरा बघायला आलेल्या नवीन चमूची भर पडली. सगळ्यांना सूप, ब्रेड, लोणी, जॅम, चहा, कॉफी असले साधेच जेवण दिले गेले.
नंतर खास ऑरोरा स्पेशियालिस्ट गाइड आला. तो आम्हाला १०० -२०० मीटर दूर जरा उंचीवर ऑरोरा दिसण्यासाठी जास्त योग्य अशा ठिकाणी घेऊन गेला. आणि आम्ही त्या बेभरवशी निसर्गचमत्काराची वाट बघत बसलो. गाइड ऑरोराच्या गोष्टी सांगून आमचे मनोरंजन करत असला तरी सगळ्यांचे डोळे आकाशाकडेच लागलेले होते. बराच वेळ वाट पाहायला लागल्यानंतर गाइडने एक धूसर उजेड दाखवून तो ऑरोरा आहे असे सांगितले. कालची आतिषबाजी पाहिलेली असल्याने प्रथम मला ती गाइडची चलाखी वाटली. पण कॅमेरा तर धूसर हिरवा प्रकाश दाखवत होता... जवळच्या गावातला ढगांवर प्रतिबिंबित झालेला प्रकाश फोटोत पिवळा-नारंगी दिसतो.
मग मात्र आशा वाढली. आता रोषणाई सुरू होईल मग रोषणाई सुरू होईल असे करत करत कुडकुडत दोन अडीच तास काढले. मध्ये एकदा जवळच्या सामी तंबूत जाऊन गरम हवा खाऊन आलो. दोनदा गाइडने एका स्थानिक बेरीचे गरम गरम चवदार पेय प्यायला दिले. आमच्या कालच्या अनुभवाच्या कहाण्यांना मात्र भरपूर भाव मिळाला ;) पण ऑरोराने मात्र निराशा केली. आजचा आणि पहिल्या दिवसाचा अनुभव जमेस धरून ऑरोराच्या बेभरवशी कारभाराची पूर्ण खात्री पटली आणि कालचा दिवस किती भाग्याचा हे आज नीट कळले.
गाइडला असे निराश झालेले प्रवासी पाहण्याची सवय होती. त्याने गेल्या काही वर्षांमध्ये काढलेल्या खास फोटोंच्या सीडीज प्रवाशांना "उत्तेजनार्थ बक्षीस" म्हणून देऊन त्यांचे सांत्वन केले. नाईलाजाने सर्वजण परतीच्या बसमध्ये चढले.
ही आहेत त्या सीडीमधली काही चित्रे...
.
.
.
(क्रमशः )
====================================================================
उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३ (समाप्त)...
====================================================================
प्रतिक्रिया
11 Mar 2013 - 12:37 am | नानबा
कमाल हो... खरंच नुसते फोटो बघूनसुद्धा नि:शब्द व्हायला होतं... खूप सुंदर वर्णन.. पुनःपुन्हा वाचत आणि बघत रहावं असं वाटतं...
11 Mar 2013 - 1:01 am | मोदक
जबरा..
हेवा वाटतोय तुमचा..
यावेळी सकाळी बसमध्ये ओळख झालेल्या एक जर्मन लेखिके बरोबर गप्पा मारत वेळ मजेत गेला. या बाईसाहेबांनी जवळ जवळ "तीन शतकापूर्वी" लहान मुलांकरिता गोष्टी आणि प्रवासवर्णने लिहायला सुरुवात केली.
"दशक" म्हणायचे आहे का..?
11 Mar 2013 - 1:20 am | डॉ सुहास म्हात्रे
मुद्राराक्षसाचा दोष दूर केला आहे.
11 Mar 2013 - 1:05 am | धन्या
तुमच्या लेखांमधील फोटो पाहिले की डोळ्यांचं पारणं फीटतं.
अर्थात तुमचं लेखनही तितकंच रंजक आणि खिळवून ठेवणारं असतं हेवेसांनल. :)
11 Mar 2013 - 1:07 am | बॅटमॅन
ती जर्मन लेखिका- तीन शतके की तीन दशके?
बाकी तोंडाचा "आ" निव्वळ वासला गेला आहे, जेलसीने पुरते पेटल्या गेलो आहे. स्नोमोबिल सफारी तर केवळ अशक्य!!!!!!!!!!! टिपिकल बाँडपटांची आठवण होतेय. किंवा स्टा वॉर्स एपिसोड ५- दि एंपायर स्ट्राईक्स बॅक ची सुरुवात आठवते.
ऑरोराचे फोटो पाहूनच कसलं गूढरम्य वाटतं, प्रत्यक्ष तर कसलं शब्दातीत भारी वाटत असेल. आर्यांचे मूलस्थान वैग्रे गोष्टी उगीच मनात घर करू लागल्या हे फटू वैग्रे पाहून. :)
बाकी नकाशावरील देवनागरी नकसकामही आवडले. अजून जळवा आम्हाला, प्रतीक्षेत आहे ;)
11 Mar 2013 - 1:27 am | डॉ सुहास म्हात्रे
मुद्राराक्षसाचा दोष दूर केला आहे.
आर्यांचे मूलस्थान वैग्रे गोष्टी उगीच मनात घर करू लागल्या हे फटू वैग्रे पाहून.
हेही महत्वाचे कारण होतेच तिथे जायचे आकर्षण असायला. लोकमान्य टिळकांनी गितारहस्यात आर्यांचा ध्रुवप्रदेशाशी (सहा महिन्यांच्या दिवस / रात्रीमुळे) संबंध आहे हे लिहीले आहे समजल्यावर तर तेथे जाणे नक्की झाले होते. सामींचे काही पुर्वज हे मध्यआशियातून तेथे गेले असा इतिहास आहे.
11 Mar 2013 - 1:40 am | बॅटमॅन
:) अगदी खरंय. सामींचा इतिहास कधी नै वाचला आजपर्यंत. ते जर मध्यआशियातून ध्रुवापर्यंत गेले असतील तर रोचक आहे.
11 Mar 2013 - 2:07 am | डॉ सुहास म्हात्रे
मध्य आशिया म्हणजे आताचा मिडल इस्ट नव्हे तर आताचा कझाकीस्तान वगैरे भाग जो प्राचीनकाळी शिवपुजक कुशाणांनी व्यापला होता. शिवाय बहुतेक सर्व उत्तर ध्रुवीय जमातींप्रमाणे त्यांच्यात मंगोलियन वशांचा प्रभावही आहे.
11 Mar 2013 - 6:49 pm | बॅटमॅन
ऑफ कोर्स :) मध्य आशिया म्हंजे मध्यपूर्व नव्हे हे माहिती आहेच. कझाकस्तान वैग्रे भाग त्यात येतो हे माहिती आहे :)
इंडो-युरोपियन प्रसरणाप्रमाणे तिथेही लोक त्याच भागातून गेले हे जरा रोचक वाटले. पण तसेही तो भाग काय लय दूर नाही म्हणा. असो.
11 Mar 2013 - 1:23 am | nishant
हा भाग पण आवडला...
11 Mar 2013 - 1:33 am | डॉ सुहास म्हात्रे
प्रथम फडणीस, मोदक, धन्या आणि nishant : सुंदर प्रतिक्रियांसाठी धन्यवाद !
11 Mar 2013 - 1:47 am | Mrunalini
वाचन चालु आहे.... :D
11 Mar 2013 - 2:02 am | आदूबाळ
भारीच! (वेगळे शब्द सुचत नाहीयेत म्हणून इतकंच!) पुभाप्र...
11 Mar 2013 - 6:06 am | रेवती
मस्त फोटू आणि मजेदार वर्णन आहे. बर्फाचे खेळ खेळायला आधी धास्ती वाटते पण एकदा त्यातील मजा समजली की नुसता दंगा असतो. कितीतरी मिपाकर (मीही)बर्फवृष्टी होणार्या प्रदेशांत राहतात. हा ऋतू आमच्यासाठी नवीन असताना तुम्ही करताय तसे निरिक्षण जमायचे, आता मात्र फक्त विंटर म्हणून त्याकडे पाहिले जाते. विंटरची पहिली, दुसरी बर्फवृष्टी जरा बघितली जाते पण नंतर रोजचेच असते. पर्यटक म्हणून त्याकडे बघणे, फोटू काढणे हे जास्त आनंददायी वाटले. आत्ता आम्ही बर्फात असूनही तुम्ही केलेले हे वर्णन आवडले. स्नोमोबील चालवून बघावीशी वाटतेय.
ऑरोराची आधीची चित्रे जास्त चांगली होती.
11 Mar 2013 - 8:34 am | प्रचेतस
लै भारी हो.
इतर काही लिहायला शब्दच सुचत नाहीयेत.
11 Mar 2013 - 12:59 pm | वैशाली हसमनीस
अप्रतिम--शब्द सुचत नाहीत.
11 Mar 2013 - 3:01 pm | सानिकास्वप्निल
वाचत आहे :)
11 Mar 2013 - 3:07 pm | डॉ सुहास म्हात्रे
Mrunalini, आदूबाळ, रेवती, वल्ली, वैशाली हसमनीस आणि सानिकास्वप्निल : आपल्या सुंदर प्रतिक्रियांसाठी अनेकनेक धन्यवाद !
11 Mar 2013 - 4:38 pm | स्मिता.
हासुद्धा भाग छान झालाय. स्नोमोबिलवरच्या गमजा पाहून हेवा वाटला :)
11 Mar 2013 - 6:39 pm | डॉ सुहास म्हात्रे
स्नोमोबिलवरच्या गमजा पाहून हेवा वाटला
+D11 Mar 2013 - 7:03 pm | मिहिर
हाही भाग सुंदरच!
11 Mar 2013 - 10:05 pm | इशा१२३
फोटो आणि वर्णन सुंदरच!
12 Mar 2013 - 1:29 pm | चेतन माने
12 Mar 2013 - 1:30 pm | चेतन माने
फोटू एकदम झक्कास आले आहेत. बाकी तुम्ही जी काय मज्जा केलीयेत त्याबद्दल काय म्हणावे!!!!! (हेवा वाटतोय )
पुभाप्र (नेहमीप्रमाणे )
:) :) :)
(अवांतर: अहो संपादक मंडळ निदान लेख वाचून प्रतिसाद तर देउद्या कित्ती वेळा अडकतेय मिपा :( )
12 Mar 2013 - 1:51 pm | चेतन माने
फोटू एकदम झक्कास आले आहेत. बाकी तुम्ही जी काय मज्जा केलीयेत त्याबद्दल काय म्हणावे!!!!! (हेवा वाटतोय )
पुभाप्र (नेहमीप्रमाणे )
:) :) :)
(अवांतर: अहो संपादक मंडळ निदान लेख वाचून प्रतिसाद तर देउद्या कित्ती वेळा अडकतेय मिपा :( )
12 Mar 2013 - 4:01 pm | सुमीत भातखंडे
हाही भाग अप्रतिम झालाय..
12 Mar 2013 - 7:42 pm | अनन्न्या
फोटो तर खिळ्वूनच ठेवतात. एवढ्या थंड हवामानात काही त्रास नाही जाणवला? आपल्याला सवय नसते.
12 Mar 2013 - 9:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
थंड हवामानाशी जुळवून घ्यायला मला इतका त्रास होत नाही. शिवाय रुपा थर्मलवेअर आणि इतर जामनिमा होताच ना... तो तर अत्यंत जरूर. म्हणूनच पहिल्या भागात त्या सगळ्या तयारीचा फोटो दिला आहे.
12 Mar 2013 - 9:19 pm | डॉ सुहास म्हात्रे
मिहिर, इशा१२३, चेतन माने आणि सुमीत भातखंडे : आपल्या सर्वांना उत्साहवर्धक प्रतिसादासाठी अनेक धन्यवाद !
13 Mar 2013 - 3:55 am | प्रिया ब
मी आजच सगळे भाग वाचले .... छान वर्णन केले आहे... खूप आवडले.
14 Mar 2013 - 1:19 pm | दिपक.कुवेत
फोटो तर निव्वळ अप्रतीम. पांढरा शुभ्र बर्फ किती पाहु आणि किती न्को अस झालयं
15 Mar 2013 - 4:11 am | किसन शिंदे
तुम्ही काढलेल्या फोटोसोबत सिडीतली शेवटची ३-४ छायाचित्र अप्रतिम आहेत.
लेखमालेबद्दल धन्यवाद!
15 Mar 2013 - 12:57 pm | डॉ सुहास म्हात्रे
प्रिया ब, दिपक्.कुवेत, किसन शिंदे : आपल्या प्रतिक्रियांसाठी अनेक धन्यवाद !
15 Mar 2013 - 3:44 pm | सव्यसाची
निःशब्द झालो आहे..
16 Mar 2013 - 11:55 pm | श्रिया
नेहमीप्रमाणेच छान आहे प्रवासवर्णन!
17 Mar 2013 - 1:43 am | डॉ सुहास म्हात्रे
सव्यसाची आणि श्रिया : अनेक धन्यवाद !
20 Apr 2013 - 2:42 pm | कोमल
खरंच आहे.. सर्वच फोटू आणि लिखाण भारी आहे.. ऑफिस मधे असल्याने "alt+tab" करून वाचताना बॉस ने पाहीलं आनि तोही तुम्चा पंखा झाला आहे..
5 Aug 2017 - 12:27 am | रुपी
हाही भाग मस्तच... लेखाच्या शेवटी दिलेले फोटो आवडलेच.. बर्फातली मजाही मस्तच.
या ओळीखालचा फोटो फारच आवडला.
9 Dec 2017 - 12:57 am | भटक्या फोटोग्राफर
बर्फात गाडी चालवणे लोळणे काय मजा आली असेल