====================================================================
उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३ (समाप्त)...
====================================================================
...आजच्या रात्रीला हे खेकडे आणि कोळ्यांनी पकडून आणलेल्या इतर खास सागरी खजिन्याची मेजवानी होती. ओळखीचे आणि अनोळखी अनेक प्रकार होते. त्यावर आडवा हात मारला आणि केबिनमध्ये येऊन आडवा झालो.
क्रूझची दुसरी सकाळ उजाडली. आजूबाजूच्या बर्फाचे प्रमाण वाढले होते. नॉर्वेजियन आणि बॅरेंट समुद्रच्या संगमाचा भाग सुरू झाला होता. प्रथमच समुद्राच्या पाण्यात तरंगणारे बर्फाचे तुरळक तुकडे दिसले...
न्याहारी करून थोडावेळ बोटीत इकडे तिकडे फेर्या मारल्या तेवढ्यात किर्केनेस दिसायला लागले...
.
आज सकाळीच बोटीची सफर संपून किर्केनेस मध्ये प्रथम बॅरेंट सफारी करून त्यानंतर स्नो हॉटेलमध्ये जायचे होते. बोट परतीच्या प्रवासाला निघणार असल्याने सगळे सामान घेऊनच बाहेर पडा आणि सफारीच्या गाडीत ठेवा असे सांगितले होते. थोड्या वेळेतच ट्रोलफ्योर्डचा निरोप घेऊन आम्ही बाहेर पडलो...
जशी बस आम्हाला घेऊन सफारीच्या ठिकाणाकडे निघाली तसे आजूबाजूचा निसर्ग झपाट्याने बदलून हिवाळ्याचे वेगळे रूप दिसू लागले. गल्फ स्ट्रीमचा असर कमी होत असल्याने समुद्रातल्या बर्फाचे प्रमाण वाढू लागले...
ट्रुम्सो आणि तेथून इथपर्यंत फक्त टामोक कँपाचा एक अपवाद वगळता इतर सगळीकडे झुडुपांच्या आकारांचीच विरळ झाडी दिसत होती. किर्केनेसच्या परिसरात मात्र जरा जास्त उंचीच्या झाडांची गर्दी रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणि इतरत्र दिसत होती. हिवाळ्यामुळे निष्पर्ण असलेल्या झाडांवर साठलेल्या बर्फाने निसर्गाचे एक वेगळे रूप पुढे येत होते...
.
वाटेत जगातील सर्वात उत्तरेकडील लोहमार्ग दिसला. नॉर्दर्न आयर्न नावाच्या खाजगी मालकीच्या लोखंडाच्या खाणीच्या कंपनीने ही रेल्वे १९१० मध्ये लोहखनिजाच्या वाहतुकीसाठी सुरू केली. सुरुवातीचा काही काळ ही रेल्वे मोफत प्रवासी वाहतूकही करत असे. दुसर्या महायुद्धात या लोहमार्गाचे खूप नुकसान झाले. युद्धानंतर कंपनीने परत पुन्हा मार्गाची बांधणी केली. आता त्याच्या उपयोग फक्त खनिजाच्या वाहतुकीसाठीच होतो. येथील लोहखनिजाची चीनला निर्यात होते.
सफारीच्या ठिकाणी पोहोचलो तर स्नो मोबाईल्सची एक लांब रांग आमची वाट पाहत उभी होती...
जेव्हा टूर बुक केली तेव्हा बॅरेंट सफारी म्हणजे बॅरेंट समुद्रात चक्कर मारून आणतील असे वाटले होते. पण सहलीला निघताना इटिनेररी परत एकदा नीट वाचली तर ही स्नोमोबाईल सफारी होती हे कळले. तेव्हा एकाच प्रकारची सफारी दोनदा गळ्यात मारली म्हणून आमच्या टूर मॅनेजरचा जरासा राग आला होता. पण काही बदल करण्याची वेळ निघून गेली होती. मात्र ट्रुम्सोमधल्या स्नोमोबाइल सफारीनंतर ही सफारी बाद करता आली नाही हे फार चांगले झाले असेच वाटत राहिले :).
आता मी जरा अनुभवी स्नोमोबाइल सफारीबहाद्दर झालो होतो. या वेळेला मी मुद्दाम सगळ्यात मागे राहिलो आणि कर्मधर्मसंयोगाने या वेळेलाही प्रवाशांची संख्या विषम होती. अर्थातच गाइडला, "नाइलाज आहे. तुम्हाला एकट्यालाच गाडी चालवावी लागेल." असे म्हणावे लागले आणि मलाही, "आता काय, नाइलाज आहे. पण हरकत नाही." असे म्हणायला लागले +D शेवटी ही गाडी मला एकट्याला चालवावी लागली ;) ...
सगळा जामानिमा पेहरून आणि "स्नोमोबाइल कशी चालवावी" यावर एक वर्ग झाल्यावर आम्ही निघालो. वर्गात कळले की हा समोर दिसतोय तो बर्फ जमिनीवरचा नाही. तो गोठलेला बॅरेंट समुद्र आहे आणि त्याच्यावरून आम्हाला ही सफारी करायची आहे. तेव्हा हे प्रकरण जरा खासच आहे हे ध्यानात आले. मनातल्या मनात टूर मॅनेजरला ही सफारी बुक केल्याबद्दल आणि नशिबाला ती बाद करता येऊ नये अशी परिस्थिती निर्माण केल्याबद्दल धन्यवाद दिले.
हा फ्योर्डमध्ये थिजलेला बॅरेंट समुद्र...
"घाबरू नका. हा बर्फ जवळ जवळ एक दीड मीटर जाड आहे आणि ४० टनी ट्रकचे वजन सहन करू शकेल." गाइडने आमची चिंता दूर केली. शिवाय गाइड स्वतः सगळ्यात पुढे असणार होता, म्हणजे तो खरंच बोलत असणार नाही का ? +D
आमची सफारी निघाली...
ह्या सफारीचा रस्ता समुद्रावरचा असल्याने अगदी सरळसोट होता. कुठल्याही अडथळा अथवा चढ-उतार नव्हता. मात्र येथे 'पुढच्या गाडीच्या मागेच राहा' असे बंधन नव्हते. 'पुढची गाडी रेंगाळत चालत असली तर सरळ बाजूने ओव्हरटेक करून पुढे जा' असा मंत्र खुद्द गाइडनेच दिला होता. आणि हे करायला भरपूर जागा होती. कारण हा ट्रॅक म्हणजे अर्धा ते एक किमी रुंद संपूर्ण थिजलेली फ्योर्ड होती ! मग काय आमच्या जुन्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग केला हे सांगणे न लगे ! साडेसात किमी गेल्यावर गाइडने थांबण्याचा इशारा केला...
अजून पुढे बर्याच अंतरापर्यंत गोठलेला समुद्र दिसत होता. पण पुढे समुद्रावरचा बर्फ पातळ होत जातो आणि याच्या पुढे जाणे धोक्याचे ठरू शकते असे गाईड म्हणाला. अर्थातच त्याला आक्षेप घेण्याचा वेडेपणा कोणीच केला नाही. परतीचा प्रवास पहिलेच नियम वापरून झाला. स्नोमोबाइल चालवण्याची ही शेवटची संधी म्हणून अर्थातच संधिचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न झाला यात नवल ते काय?.
परतल्यावर सामी तंबूत गाइडने आमची सामी कहाण्या सांगून करमणूक केली. खास सामी डफाच्या साथीने एक सामी गाणेही म्हणून दाखविले...
ब्रेड, बटर आणि सूप असे स्टॅंडर्ड सामी तंबूतले जेवण झाल्यावर आम्ही किर्केनेसकडे परत निघालो...
.
बसने आम्हाला दुपारी एक वाजता किर्केनेसच्या आर्क्टिक हॉटेलमध्ये आणून सोडले...
या हॉटेलमध्ये सगळ्या मोठ्या बॅगा ठेवून फक्त एका रात्रीला लागणारे सामानच स्नो हॉटेलमध्ये घेऊन जायचे होते. स्नो हॉटेलमध्ये नेणारी बस संध्याकाळी सहा वाजता येणार होती. म्हणजे पाच तास इथेच घालवायचे होते. जरासा वेळ हॉटेलच्या उबदार वातावरणात बसल्यावर मग कंटाळा आला आणि बाहेर पडलो.
किर्केनेसचा चौक...
बर्याच वयस्कर स्त्रिया ही छोटी स्लेड लहान मुलांच्या तिचाकी गाडीसारखी बर्फावरून ढकलत फिरत होत्या. हे त्यांचे नेहमीचे वाहन दिसत होते.
सगळीकडे बर्फाचे साम्राज्य पसरलेले होते...
.
.
.
सतत वरून पडणारा बर्फ साफ करण्यार्या गाड्या जागोजागी काम करताना दिसत होत्या... माणूस आणि निसर्गाची चढाओढच चालू होती म्हणा ना!...
.
तासभर भटकल्यावर थंडी भरून आली. परत हॉटेलवर आलो. सफारीच्या तुटपुंज्या जेवणाची गॅरंटी संपली होती. भूकेने पावले आपोआप हॉटेलातील रेस्तरॉकडे वळली. वेट्रेस म्हणाली, "रात्रीच्या जेवणाला वेळ आहे. आता सूप, ऑम्लेट असेच काय ते मिळेल." मेन्युकार्डवर किर्केनेसचा खास पदार्थ म्हणजे 'राजखेकड्याचे सूप' दिसले. ताबडतोप मागवले. आश्चर्य म्हणजे तेथे ते सूप छानपैकी मसालेदार बनवले होते...
खूप दिवसांनी मसालेदार पदार्थ खायला मिळाला होता. राजखेकडाही चवदार होता. मजा आली. तरतरीत होऊन हॉटेलच्या लॉबीत आलो. तेथे माझ्यासारखेच अनेक लोक स्नो हॉटेलच्या बसची वाट पहात बसले होते. जबरदस्तीने तासभर न कळणारा नॉर्वेजियन टीव्ही कार्यक्रम बधितला. मग पाय मोकळे करायला हॉटेलच्या लॉबीत आणि व्हरांड्यांत चकरा मारल्या. स्वागतकक्षातील कर्मचार्यांना बस येइपर्यंतच्या वेळात "जवळ काही बघण्यासारखे काही आहे का?" असे वारंवार विचारून भंडावून सोडले. तरी वेळ संपायचे नाव घेत नव्हती. मग परत बाहेर एक चक्कर मारायचे ठरवून बाहेर पडलो. पाच वाजले होते. बाहेर अंघार पडला होता. मगासचाच परिसर खूपच वेगळा दिसायला लागला होता...
माणसांची रहदारी कमी झाली होती. त्याऐवजी आता चारचाक्यांनी गर्दी केली होती...
मोठ्या उत्साहाने बाहेर पडलो होतो पण माणसांची रहदारी कमी का झाली होती पहिले पाउल हॉटेलबाहेर टाकले तेव्हाच कळले. अगोदर थंडी होतीच पण सूर्यप्रकाश कमी झाल्यानंतर तिचा कडाका प्रकर्षाने वाढला होता. अर्ध्या तासातच हॉटेलच्या उबेत परत आलो आणि बसची वाट पाहत बसलो. पावणेसहाला स्नो हॉटेलचा गाइड येउन सगळ्यांची व्हाउचर्स तपासून गेला. बस बरोबर सहाला आली आणि आम्ही स्नो हॉटेलच्या दिशेने निघालो.
(क्रमशः )
====================================================================
उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३ (समाप्त)...
====================================================================
प्रतिक्रिया
18 Mar 2013 - 1:19 am | मोदक
पटापट भाग येत असल्याने वाचायला मजा येत आहे. धन्यवाद! :-)
त्या बर्फ साफ करणार्या गाड्यांचा व्हिडीओ काढला असेलच. तो पण द्या की इथे. ( व्हिडीओ काढला असावा हा माझा अंदाज आहे... ;-) )
18 Mar 2013 - 11:56 am | डॉ सुहास म्हात्रे
त्या गाड्यांचा व्हिडिओ नाही काढला. तिथे जागोजागी हाच प्रकार चालू असल्याने की काय पण राहून गेला.
शिवाय आमच्या येथे तूनळि आणि तत्सम व्हिडिओ दाखविणारी संस्थळे ब्लॉक केलेली आहेत. भारतात सुट्टीवर आल्यावर सगळे व्हिडिओ चिकटवायचा विचार आहे.
18 Mar 2013 - 4:13 am | रेवती
छान. वर्णन व फोटू आवडले.
दोन आज्ज्यांनी वापरलेली छोटी स्लेड मजेदार आहे.
आता आमच्याकडील हिवाळा संपत आलाय ही जाणीव होऊन बरे वाटले. ;)
पण पावसाळाही लगेच असतो म्हणून खर्या उन्हाळ्यासाठी आणखी थोडी वाट पहावी लागेल.
सगळ्यात नावडती गोष्ट म्हणजे मध्येच दोनेक दिवस तापमान चांगले असते. आपल्याला "झाला वाटतं उन्हाळा सुरु!" अशी आशा वाटते तोच पुन्हा बर्फ चालू होते. असे दोन चार वेळा झटके दिल्यावर पावसाळा सुरु होतो.हवामान तपासण्याचाही नंतर नंतर कंटाळा येतो. असो.
18 Mar 2013 - 7:18 am | साऊ
किती फोटो ते ! छान आहेत.
18 Mar 2013 - 8:03 am | ५० फक्त
पुएलभा. धन्यवाद.
18 Mar 2013 - 6:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
सही 'सही' आहे !
18 Mar 2013 - 8:05 am | सव्यसाची
सारखे सारखे तेच काय म्हणायचा हा प्रश्न पडला आहे :)
18 Mar 2013 - 12:28 pm | बॅटमॅन
एग्झॅक्टलि!! हेच म्हणतो. लैच भारी :)
18 Mar 2013 - 9:18 am | प्रचेतस
बर्फाच्या हाटेलात जायची वाट बघत आहे.
18 Mar 2013 - 10:03 am | मदनबाण
वा... इतका बर्फ आणि फोटो क्रमांक ८ पाहुन मला माझे डेन्मार्कचे दिवस आठवले.
डेन्मार्क :---
18 Mar 2013 - 12:02 pm | डॉ सुहास म्हात्रे
फोटो दिसत नाही... गुगल फोटोवरून टाकल्यास दिसेल. संपूर्ण स्कँडेनेव्हिया तसा फारच सुंदर भूभाग आहे असे ऐकून आहे आणि तो तिथल्या लोकांनी तसा काळजीपूर्वक जपला आहे हे जास्त महत्वाचे.
18 Mar 2013 - 7:31 pm | मदनबाण
फोटो दिसत नाही... गुगल फोटोवरून टाकल्यास दिसेल.
बहुतेक तुमच्याकडे फ्लिकर बॅन आहे,म्हणुन फोटो दिसत नसावा !
18 Mar 2013 - 7:38 pm | डॉ सुहास म्हात्रे
फोटो मस्त आहे... आवडला.
बहुतेक तुमच्याकडे फ्लिकर बॅन आहे
होय.18 Mar 2013 - 10:27 am | मिहिर
मस्त चाललीय लेखमाला!
18 Mar 2013 - 10:35 am | अक्षया
लेखमाला आणि फोटो अप्रतिम. :)
18 Mar 2013 - 11:59 am | डॉ सुहास म्हात्रे
रेवती, साऊ, ५० फक्त, सव्यसाची, वल्ली, मदनबाण, मिहिर आणि अक्षया : आपल्या सर्वांना अनेक धन्यवाद. असाच लोभ असू द्यावा.
18 Mar 2013 - 3:06 pm | अस्मी
सर्व फोटो आणि लेखन सुंदर!!
पहिले दोन आकाशी फोटो एकदम मस्त...एकदम छान वाटलं ते दोन्ही फोटो पाहून :)
18 Mar 2013 - 4:11 pm | हरिप्रिया_
आत्ताच सर्व भाग वाचून काढले.
अप्रतिम वर्णन आणि फोटोसुद्धा एकदम भारी!!
पुभाप्र
18 Mar 2013 - 4:55 pm | स्मिता.
अगदी वेगळा प्रदेश आणि तिथल्या सहलीचे वर्णन वाचून मजा येतेय. पण आमच्याकडचा एव्हरलास्टिंग हिवाळा संपायचं नावच घेत नसल्याने बर्फाचे फोटो बघून धडकीच भरतेय ;)
18 Mar 2013 - 5:01 pm | दिपक.कुवेत
सूप एकदम टेंप्टिंग दिसतयं. थंडि वीरोधक कपडे तर असतातच पण अशा मसालेदार खाण्याने थंडि कमी वाजते का? आय मीन नॉनव्हेज खाल्याने हुडहुडी कमी भरते का?
18 Mar 2013 - 5:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
सूप खरंच मस्त होतं. नॉर्वेत पहिल्यांदा मसालेदार पदार्थ खायला मिळाल्याने आश्चर्य आणि मजा दोन्ही वाटले. मसाले किंवा सामिष यांच्यापेक्षा गरम गरम काहीतरी पोटात गेलं हेच थंडी कमी करायला खूप आहे. त्यांत जिभेचे लाडही होणार असतील तर काय एकदम "सोनेपे सुहागा" +D
18 Mar 2013 - 5:04 pm | डॉ सुहास म्हात्रे
अस्मी, हरिप्रिया_, आणि स्मिता. : आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद !
18 Mar 2013 - 5:43 pm | Mrunalini
मस्त लेख.... पू.भा.प्र. :)
18 Mar 2013 - 5:51 pm | चेतन माने
गोठलेला समुद्र आणि त्यावर गाडी चालवणे एकदम भन्नाट !!!
भाग, फोटू, मस्त, झकास , छान , सुरेख, वर्णन , इ. शब्दांची वेग वेगळी कॉम्बिनेशन करून प्रतिक्रिया वाचावी!!!
पुभाप्र :)
18 Mar 2013 - 7:14 pm | nishant
वाचतोय... :)
19 Mar 2013 - 10:48 am | डॉ सुहास म्हात्रे
Mrunalini, चेतन माने आणि nishant : धन्यवाद !
19 Mar 2013 - 2:11 pm | वैशाली हसमनीस
दोनही भाग खूप आवडले.नवीन भाग केव्हा टाकताय?
19 Mar 2013 - 2:22 pm | सानिकास्वप्निल
लेखमाला छान चाललीये
वाचायला मजा येत आहे :)
19 Mar 2013 - 2:29 pm | पैसा
तुमचा लेख नेहमी २ वेळा बघावा लागतो. एकदा वाचायला आणि एकदा निव्वळ फोटो बघायला!
19 Mar 2013 - 2:31 pm | अभ्या..
अत्यंत सुरेख लेखमाला एक्कासाहेब. फोटो आणि लिहिण्याची खुमासदार शैली छानच असते. फक्त एक छोटीशी रिक्वेस्ट आहे.
फोटो जमल्यास जर्रासे कमी रेझोल्युशनचे (उदा.:३०० लांबी) किंवा थंबनेल्स दिले आणि ओरिजिनल फोटोची लिंक दिली तर आमच्यासारख्या स्लो नेटवर्क वाल्याना पण तुमच्या लेखमालेचा आनंद घेता येईल.
(ही सूचना सर्वच अप्रतिम पण जास्त फोटो असलेल्या धाग्यासंदर्भात आहे. वल्लीदादाकडूनपण याचा विचार व्हावा ही नम्र विनंती ;) )
19 Mar 2013 - 8:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
अभ्याजी, आपल्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद !
फोटो मी मूळ आकारापेक्षा जरा कमीच करून टाकतोय. अनेक प्रयोग करून मगच हा आकार ठरवला आहे. कारण खूप कमी आकार केला तर फोटोतील बारकावे कमी होऊन ते निरस होतात. माझ्या लिहिण्याच्या पद्धतीत फोटो हे अतिरिक्त गोष्ट नसून लिखाणाचा भाग म्हणून येतात. मी लिखाणात काय सांगतो आहे ते सलग असलेल्या फोटोत दाखवायचा प्रयत्न करतो. ते चित्रात स्पष्ट दिसले नाही तर मग मला आपल्याला माझ्याबरोबर सहलीला कसे नेता येइल ? आशा आहे आपण समजू शकाल.
20 Mar 2013 - 1:41 am | अभ्या..
चालेल, अशा सुंदर लेखमालेसाठी थोडेसे जास्त बाईट आणि वेळ गेला तरी चालेल. काही हरकत नाही.
फोटोतूनच तुम्ही आम्हाला ही सहल घडवून आणताय याची पूर्ण कल्पना आहे.
सो खूप धन्यवाद आणि पुढील सहलीकरिता खूप खूप शुभेच्छा. :)
अवांतर: अभ्याला जी कशाला उगीच? ते पारलेलाच राहू द्या. ;)
19 Mar 2013 - 3:19 pm | ऋषिकेश
छानच.. वाचतोय!
19 Mar 2013 - 8:26 pm | डॉ सुहास म्हात्रे
वैशाली हसमनीस, सानिकास्वप्निल, पैसा आणि ऋषिकेश : आपल्या सर्वांना अनेक धन्यवाद !
19 Mar 2013 - 8:34 pm | स्वाती दिनेश
सफर आवडते आहे..
स्वाती
19 Mar 2013 - 10:15 pm | प्यारे१
ह्या निमित्ताने माणसाच्या वेगवेगळ्या प्रदेशात जाऊन स्थायिक होण्याचं, त्या त्या हवामानाशी जुळवून घेण्याचं, त्यानुसार तंत्राचा वापर करण्याचं आणि बरोबरीनं झगडण्याचं नि जगण्याचं कौतुक वाटतं.
अवांतरः एस्पिकचा एक्का हे नाव का घेतलं हो?
20 Mar 2013 - 11:38 am | डॉ सुहास म्हात्रे
स्वाती दिनेश आणि प्यारे१ : अनेक धन्यवाद !
एस्पिकचा एक्का हे नाव का घेतलं हो?
माझं पहिलं नाव अगोदरच बुक झालेल होतं. म्हणून हे नाव घेतलं. विशेष काही नाही.