उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर १० : ओस्लो नगरी (१)

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
29 Mar 2013 - 11:09 pm

====================================================================
उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३ (समाप्त)...

====================================================================

...विमान वेळेवर आले आणि आम्हाला पोटात घेऊन त्याने ऑस्लोच्या दिशेने भरारी घेतली...

ओस्लोचा विमानतळ शहरापासून बराच दूर आहे. बस शहरात शिरेपर्यंत एक तास जातो. हॉटेलवर पोहोचेपर्यंत तीन साडेतीन वाजले असतील. शॉवर घेऊन खाली स्वागतकक्षात येऊन संध्याकाळच्या मोकळ्या वेळात काय करता येईल याची चौकशी केली. ओस्लोच्या एका नकाश्यावर काही ठिकाणांवर खुणा करून बाहेर पडलो. मात्र त्या बाबाने दिशा सांगताना उजवी-डावीकडे असे सांगण्याऐवजी पूर्व-पश्चिम-दक्षिण-उत्तर या भाषेतच सांगण्याचा आग्रह कायम ठेवला होता. आता पाच वाजून अंधार पडल्यानंतर या शहरात नवखा असलेला माणूस "हॉटेलमधून बाहेर पडल्यावर पूर्वेकडे जा" या माहितीच्या आधारावर असा शोध घेणार? शेवटी "चला बाहेर तर पडू. मग बघून घेऊ" असे म्हणून बाहेर पडलो.

अरुंद पण आखीवरेखीव उत्तम अवस्थेतील स्वच्छ रस्ते, जुन्या युरोपीय धाटणिच्या इमारती आणि तुरळक रहदारी. ओस्लोचे हे संध्याकाळचे लोभस रूप पाहून गोष्टींत वाचलेल्या आटपाट नगरीची आठवण झाली.

.

साधारण मुंबईच्या फोर्ट विभागात दिसतात तशाच इमारती सगळीकडे होत्या. सिमेंटकाँक्रिटचे जंगल नसलेल्या पण तरीही भारदस्त वाटणाऱ्या इमारती असलेल्या आणि निऑनचा फार झगमगाट नसणाऱ्या रस्त्यावरून फिरायला मला जास्त मजा वाटते. हॉटेलच्या स्वागतकक्षातून मिळालेल्या पूर्व-पश्चिम दिशादर्शनाचा फार फायदा नव्हताच. मग जसा रस्ता खुणावेल तसा भटकायला लागलो. थोड्या वेळात दुरून काहीसे आपल्याकडच्या लोकसंगीतासारखे अगदी गावात सणसमारंभांना जसे गायले जाते तसे काहीसे सुर ऐकू आले आणि आश्चर्याने पावले आपोआप त्या दिशेने वळली. १५०-२०० मीटर चालून गेल्यावर त्या सुरांचा शोध लागला...

एका मोठ्या चौकाच्या मध्यभागी असलेल्या उघड्या स्केटींग रिंकच्या मध्ये असलेल्या मनोऱ्यातून ते स्वर येत होते. शब्द नॉर्वेजियन वाट होते पण सूर जवळचे वाटत होते... किर्केनेसमध्ये न्याहरीच्या वेळेचे स्वागतिकेचे शब्द आठवले... जे काही थोडेसे नॉर्वेजियन संगीत ऐकले त्यात तालाच्या ठेक्यापेक्षा सुरांना जास्त महत्त्व दिसत होते. त्या चौकाच्या आजूबाजूला अनेक प्रेक्षणिय इमारती दिसल्या. मग बराच वेळ त्यांचे निरिक्षण करत आजूबाजूला बर्फ भरलेल्या अरुंद रस्त्यांवरून आणि त्यांना जोडणाऱ्या रुंद पादचारी मार्गांवरून भटकत राहिलो. त्यावेळी टिपलेली हि काही चित्रे...

.

.

.

आठ वाजत आले तेव्हा थंडीचा कडाका खूपच वाढला. रहदारीही कमी होऊ लागली होती. भुकेनेही 'चला परत' अशी सूचना देणे सुरू केले होते. हॉटेलकडे जाण्यासाठी परतिच्या रस्त्याचा शोध घेताना ध्यानात आले की इकडे तिकडे फिरताना रस्त्यांचे ध्यान ठेवले नव्हते आणि अनेकदा नकाशावरच्या खुणा पडताळून पाहाव्या लागत होत्या. अशाच एका वेळेस त्या चौकात असलेल्या दोन पोलिसांनी स्वतःहून, "कुठे जायचेय सर ? काही मदत करू शकतो का? " अशी विचारणा केली. हॉटेलचे नाव सांगितले तर "हे काय त्या दिशेला १०० मीटरवर आहे. " म्हणून हात करून दाखवले. दूरवर खरंच हॉटेलची पाटी दिसत होती. त्यांचे आभार मानून त्या दिशेने निघालो आणि हॉटेलच्या एक चौक अगोदर हे दिसले...

जिभेने पाय आपोआप तिकडे वळवले. मलिक नावाच्या मूळचा पाकिस्तानी गृहस्थ २५ वर्षांपासून येथे हे रेस्तरॉ चालवित आहे.
त्याच्याशी बोलता बोलता नोर्वेजियन राजकारण आणि पद्धतीबद्दल एक चपखल वाक्य तो बोलून गेला. "अच्छा काम नही किया तो एम पी का कॉलर पकडके पूछ सकते है" या एकाच वाक्यात सामान्य नॉर्वेजियन नागरिकाची आपल्या "योग्य हिताच्या" आणि "हक्कांच्या" जाणीवेची ओळख पटली. यामुळेच नॉर्वेची लोकशाही जगातल्या सर्वोत्तम लोकशाह्यांमध्ये गणली जाते.

मलिक "तिखट चिकन आवडेल का?" म्हणाला. अर्थातच हो म्हणालो. पण ते नॉर्वेजियन पद्धतीचे तिखट (म्हणजे बहुतेक तिखट असावे असा संशय यावा इतपत तिखट) होते.

पण इतक्या दिवसांनी मसाल्यांचा स्पर्श झालेले खाणे मिळाले याचाच खूप आनंद झाला. हॉटेलवर परतून मस्तपैकी ताणून दिली.

====================================================================

सकाळी जरा आरामात उठलो कारण ओस्लो नगरीची अर्ध्या दिवसाची सहल १०:१५ ला सुरू होणार होती. त्यामुळे थोडा उशीराच न्याहरीला गेलो. टेबलावर एक नॉर्वेजियन व्यक्तीने केलेल्या स्मितहास्याला प्रतिसाद देऊन झाल्यावर जरा इकडतिकडच्या गप्पा सुरू झाल्या. नॉर्वेजियन मत्स्यव्यवसायिकांची राष्ट्रीय वार्षिक सभा त्या हॉटेलात चालू होते त्याकरिता ते सरकारी बाजू सांभाळायला तेथे आलेले होते. मत्स्यव्यवसायाला नॉर्वेच्या अर्थव्यवस्थेत फार महत्त्व आहे. पण कितीही सुविधा पुरवल्या तरी लोकांच्या मागण्या आणि तक्रारी काही कमी होत नाहीत हे 'वैश्विक' मत नॉर्वेसारख्या अत्यंत लोकाभिमुख राष्ट्रात ऐकायला मजा वाटली. मी भारतीय आहे हे समजल्यावर हिंदू आणि बौद्ध धर्माबद्दल खूप प्रश्न विचारले. माझ्या अल्प माहितीने मी जेवढे सांगता येईल ते जाणकाराचा आव आणत सांगितले. हिंदू धर्मात मिशनरी नाहीत आणि धर्मप्रसाराकरिता प्रयत्न करणारी काहीच यंत्रणा नाही ही माहिती त्यांच्याकरिता आश्चर्यकारक होती. आजची न्याहारी मजेत खेळीमेळीत गप्पा मारत झाली. शेवटी सहलीची वेळ झाली म्हणून मला त्यांची रजा घेऊन उठायला लागले.

बस ओस्लोच्या सिटी हॉलपासून सुरू होणार होती. काल रात्रीच हे ठिकाण अगदी चालत पाच मिनिटाच्या अंतरावर असल्याची माहिती काढली होती. रस्त्याची माहितीही घेऊन ठेवली होती... या वेळेस नशिबाने मार्गवळणे 'पूर्व-पश्चिम' या भाषेत न सांगता 'डावी-ऊजवी बाजू' च्या भाषेत सांगणारा मार्गदर्शक मिळाला होता. बाहेर पडून पहिला चौक ओलांडला आणि बघतो तो काय काल चक्कर मारलेल्या भागातून मार्ग जात होता. काल एकच चौक ओलांडून पुढे गेलो असतो तर सिटी हॉलवर पोचलो असतो. बसच्या वेळेच्या बर्‍याच अगोदर थांब्यावर पोचलो.

ओस्लो सिटी हॉलची इमारत...

.

या इमारतीच्या चारी बाजूला प्रशस्त रस्ते आहेत आणि तीन बाजूला गोलाकार व्यावसायिक इमारती आहेत, पण सर्व रचना अशी आहे की ते एक संकुल म्हणूनच बांधले आहे असे वाटते. हीच सौंदर्यदृष्टी नॉर्वेत जागोजागी दिसते...

सहलीपूर्वीच्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी इमारतीच्या भोवती एक फेरी मारली. एका बाजूच्या भितीवरचे शिल्प...

मागच्या बाजूने जाणारी ओस्लोची ट्रॅम...

त्या पलीकडील ओस्लो बंदर...

सिटी हॉल आणि बंदरामधील जागेतले एक उद्यान आणि त्यातले एक आई आणि मुलांचे शिल्प...

सिटी हॉलची मागची बाजू... ओस्लोमध्ये कुठल्याच सरकारी इमारतीला कुंपण अथवा खास सुरक्षारक्षक दिसले नाही...

परत थांब्यावर आलो तरी पंधरा मिनिटे बाकी होती. सिटी हॉलच्या इमारतीत शिरायचा मोह आवरला नाही. केवळ व्हरांड्यातून एक फेरी मारण्यापुरताच वेळ होता. पण हा निर्णय नक्कीच सार्थकी लागला. व्हरांड्यात एकूण सोळा भित्तिचित्रे आणि काही शिल्पे आहेत... जणू एका लघुप्रदर्शनच ! ही त्यातली काही चित्रे...

.

.

.

दर्शनी भागातले हंसांचे शिल्प आणि भिंतीवरचे घड्याळ...

थोडा वेळ वेळेचा विसर पडला होता. बसच्या वेळेला दोनच मिनिटे असताना ध्यानात आले आणि धावतच थांब्यावर पोचलो. बस प्रवाश्यांना घेऊन ओस्लो नगरीच्या निवडक आकर्षणांच्या सहलीला निघाली.

(क्रमशः )

====================================================================
उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३ (समाप्त)...

====================================================================

प्रतिक्रिया

रुस्तम's picture

29 Mar 2013 - 11:20 pm | रुस्तम

ज ब र द स्त...!!!

वा! ओस्लो नगरीचा परिचय आवडला!!!!

आधीच्या सगळ्या भागांप्रमाणेचे - अप्रतिम.. अवर्णनीय फोटु आणि माहिती..

प्यारे१'s picture

30 Mar 2013 - 12:37 am | प्यारे१

छानच!

नेहमीचेच कौतुक समजून घ्यावे. घड्याळाचा फोटू मस्त वाटला.

शिल्पा ब's picture

30 Mar 2013 - 7:16 am | शिल्पा ब

आवडलं.

यशोधरा's picture

30 Mar 2013 - 8:32 am | यशोधरा

एकदम झकास!

प्रचेतस's picture

30 Mar 2013 - 8:44 am | प्रचेतस

खूपच छान.

अक्षया's picture

30 Mar 2013 - 10:02 am | अक्षया

खुप छान लेखन आणि फोटो.

अस्मी's picture

30 Mar 2013 - 11:39 am | अस्मी

नेहमीप्रमाणेच मस्त :)
ओस्लोचे संध्याकाळचे फोटो एकदम सही!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Mar 2013 - 11:59 am | डॉ सुहास म्हात्रे

निलापी, बॅटमॅन, प्रथम फडणीस, प्यारे१, रेवती, शिल्पा ब, यशोधरा, वल्ली, अक्षया आणि अस्मी : आपणा सर्वांना सुंदर प्रतिसादांबद्दल अनेक धन्यवाद !

लई भारी, ते एलिडि लावल्यानं पेटल्यागत दिसणारी झाडं जाम आवडली.

टायरांना चेनी लावुन चालवली जाणारी एखाद्या चारचाकीचा फटु आहे का सर.?

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Mar 2013 - 12:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

टायरांना चेन लावून चालणारी चारचाकीचा मी नॉर्वेत अगर इतर कुठेच पाहिली नाही. पण मोदकाने मागच्या एका भागाच्या प्रतिसादात चेन लावलेल्या एका टायरचा फोटो दिलेला आहे.

दिपक.कुवेत's picture

30 Mar 2013 - 12:57 pm | दिपक.कुवेत

सुंदर पाकॄनां पाहुन दरवेळि जसे लिहिण्याचे शब्द सुचत नाहित तसेच तुम्हि काढलेले फोटो आणि वर्णन पाहुन होत. प्रत्येक वेळि नवीन काय लिहायच हा प्रश्न पडतो :) नेहमीप्रमाणेच झकास (हे वाक्य तुमची लेखमाला संपेपर्यत कायम!)

चेतन माने's picture

30 Mar 2013 - 3:46 pm | चेतन माने

ओस्लोचा परिचय आवडला. ती चिकन ची भेळ पण छान दिसतेय !!!
पुभाप्र :)

चौकटराजा's picture

30 Mar 2013 - 5:22 pm | चौकटराजा

आता नॉर्वेला जाता येईल की नाही माहित नाही पण योरपचे पाचेक देश तरी यात्रा कंपनी न वापरता पहायचा प्लान डोक्यात आहे कधीपासूनचा. आपले सारे धागे व फोटो मस्त असतात. मी आताच ऑस्लोला जाउन आलो. तुमचा पासपोर्‍ट विजा व खिसा वापरल्याबद्द्ल सॉरी बरं का !

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Mar 2013 - 6:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

दिपक्.कुवेत, चेतन माने आणि चौकटराजा : अनेक धन्यवाद !

@चौकटराजा : मी आताच ऑस्लोला जाउन आलो. तुमचा पासपोर्‍ट विजा व खिसा वापरल्याबद्द्ल सॉरी बरं का !
+D
सॉरी कशाबद्दल ? ती सहल तुम्हाला करता यावी म्हणून तर हा सगळा उपद्व्याप चाललाय :). ती अशीच पुढे चालू ठेवा.
तुमच्या युरोपच्या सहलीसाठी शुभेच्छा !

अशोक पतिल's picture

30 Mar 2013 - 9:29 pm | अशोक पतिल

अतिशय सुरेख ! तुमच्या वर्णन शेलीला दाद द्यावी का सुरेख फोटोग्राफीला दयावी ? तुमच्या सारखे होशी पर्यटक विरळाच ! काहि फोटो वालपेपर म्हणुन घेवु शकतो का ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Mar 2013 - 10:58 am | डॉ सुहास म्हात्रे

तुम्हाला आवडलेले कोणतेही फोटो तुम्ही घेऊ शकता.

नेहमीप्रमाणेच सुरेख सहल घडवून आणलीत आपण.
(असेच जगाच्या पाठीवर फिरायला मिळो अन आम्हालाही फिरवून आणा या शुभेच्छा!)

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Mar 2013 - 10:58 am | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !