उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर ०३ : ट्रुम्सो - नीलप्रकाशातली मासेमारी सफारी

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
5 Mar 2013 - 10:47 pm

====================================================================
उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३ (समाप्त)...

====================================================================

...परतताना डॉग स्लेडींगच्या मजेचा आनंद मानायचा की ऑरोराने धोका दिला म्हणून दु:ख करायचे याचा निर्णय होत नव्हता. पण अजून दोन दिवस ट्रुम्सोमध्ये आहेत आणि शिवाय दोन दिवस क्रूझचे आहेत असे मनाला समजावले. आता मात्र गेल्या ३० तासांच्या दगदगीने डोळे जड होऊ लागले होते आणि हॉटेलवर परतल्यावर गादीवर पडल्या पडल्या गाढ झोप लागली.

आजचा ट्रुम्सोमधला दुसरा दिवस. आज सकाळी नीलसागरात मासे पकडायला जायचे होते. बोटीवर जरा उशीरा म्हणजे १० वाजता पोचायचे होते आणि बंदर हॉटेल पासून अगदी जवळ म्हणजे पायी पाच मिनिटांच्या अंतरावर होते. त्यांमुळे उशीरापर्यंत झोपलो आणि जरा रमत गमत सकाळची कामे आटपली. नऊ वाजता न्याहारीला आलो तरी बाहेर अंधुकच प्रकाश होता. खिडकी शेजारची जागा पकडून बसलो. बाहेर बर्फ भुरभुरत होता. कापसासारखे हलके असलेले हिमस्फटिकांचे पुंजके सरळ वरून खाली न पडता जास्त करून हवेच्या झोतांबरोबर आडवे तिडवे उडत होते. रस्त्यापलीकडले दुकान अजून उघडले नव्हते आणि त्याच्या सजवून ठेवलेल्या काचेच्या खिडक्यांतले दिवे अजून चालू होते. त्याच्यापलीकडे अगदी रस्त्याला लागून एक जिमखाना होता. त्याला काचेच्या भिंती होत्या आणि बरीचशी व्यायामाची उपकरणे रस्त्याकडे तोंड करून होती. तेथे मात्र वर्दळ सुरू झालेली दिसत होती. -८ ते -९ सेल्सियस तापमानात सकाळी सकाळी घरातून बाहेर पडून जिमवर येऊन व्यायाम करणार्‍या लोकांबद्दल अतिशय आदर वाटला.

काल संध्याकाळच्या श्वानकेंद्रावरच्या तुटपुंज्या जेवणामुळे चांगलीच भूक लागली होती. न्याहारीवर आडवा हात मारला. रूमवर परत येऊन कालच्या सारखीच सगळी थंडी निरोधक कवचकुंडले चढविली आणि बाहेर पडलो. पॅसेजमधून इलेव्हेटरकडे जाताना लक्षात आले की या पॅसेजला पूर्ण उंचीच्या दोनतीन मोठ्या (साधारण ५ मी X ३ मी ) खिडक्या आहेत. एकीतून सकाळी सकाळी बर्फाने न्हालेल्या ट्रुम्सो शहराचे मनोहारी दर्शन झाले...

तर दुसर्‍या खिडकीतून ट्रुम्सो बंदर दिसत होते...

आणखी एका खिडकीतून शेजारच्या बेटावरचे अजूनही बर्फाळलेल्या टेकड्यांच्या कुशीत झोपलेले गाव दिसत होते. जमिनीवर बराच अंधार असला तरी बर्फाळलेल्या टेकड्यांच्यावर आकाशाला उजाळी आली होती आणि क्षितिजावर तरंगणार्‍या विरळ ढगांच्या पुंजक्यांवर लाल-गुलाबी छटा आल्या होत्या.

अरे, कालचे दाट ढग जाऊन आकाश बरेच साफ झाले होते की! असाच मोसम कायम राहिला तर आज ऑरोरा बघायची संधी आहे! सहलीचा विचार मनात आला आणि एकदम ध्यानात आले की बोटीवर जायची वेळ होऊन गेली आहे. गडबडीत खाली आलो आणि जवळ जवळ धावतच बंदरावर आलो आणि जेमतेम दहाला बोटीत शिरलो. आमची Sørøya कंपनीची ही बोट माझीच वाट पाहत उभी होती.

सगळे प्रवासी अगोदरच जमा झालेले होते. मी आल्या आल्या कप्तानाने सर्वांचे बोटीवर स्वागत करून "निघूया काय? " अशी विचारणा केली. सगळ्यांनी अर्थातच सहमती दर्शविली. आपली बोट खोल समुद्रात बंदरापासून १० किमी दूर मासेमारीसाठी उत्तम जागेवर नेणार असल्याचे कप्तानाने सांगितले आणि तो बोटीचे सारथ्य करायला ब्रिजवर (नियंत्रण कक्षांत) निघून गेला आणि आमची सफर सुरू झाली.

सगळ्यात पहिल्यांदा गाइडने आमचे कॉफी आणि चॉकलेट्स् देऊन स्वागत केले आणि या भागातील समुद्राची जुजुबी माहिती दिली. थंडीच्या मोसमात येथे सूर्यप्रकाश फिकट निळ्या रंगाचा असतो आणि त्यामुळे सागराचा रंगही फिकट निळा ते गर्द निळा असा दिवसाच्या वेळेप्रमाणे बदलत जातो. त्यावरून या क्रूझचे नाव नीलप्रकाशातील मासेमारी सफारी (Fishing in the Blue Light Safari) असे ठेवले होते. या सहलीत आम्ही सहा जण सामील होतो. एक ब्रिटिश दांपत्य, एक शांघईवरून आलेली चिनी मुलगी, दोन ऑस्ट्रेलियाहून आलेल्या मुली (यातली एक मूळ भारतीय होती) आणि मी. सगळे जण मनमोकळे होते त्यामुळे पहिल्या पाच मिनिटात एकमेकाची ओळख करून घेऊन अगदी जुने मित्र असल्यासारख्या गप्पा सुरू झाल्या.

बोट बंदरातून बाहेर पडू लागली आणि गाइड म्हणाली, "तिकडे बघा एक पाणबुडी उभी आहे!" आम्ही सगळेच खिडक्यांकडे धावलो. एक मध्यम आकाराची पाणबुडी धक्क्याजवळ ध्वज फडकावून उभी होती. बघतो तर काय तो ध्वज भारताचा होता!

केबिनच्या बाहेर धावत जाऊन आमची बोट वेगाने बंदराबाहेर पडेपर्यंत फोटो काढून घेतले...

तिरंग्यावरून भारतीय पाणबुडी आहे हे नक्की झाले होते पण तिसर्‍या फोटोत देवनागरीमध्ये लिहिलेला नामफलकही पकडला! ती होती भारतीय नौदलाची "सिंधुरक्षक" पाणबुडी... आणि नॉर्वेच्या उत्तर ध्रुवीय प्रदेशातील ट्रुम्सो बंदरात दिमाखाने तिरंगा फडकावत उभी होती!

या अनपेक्षित घटनेने आश्चर्य आणि आनंद तर झालाच पण सहप्रवाशांच्या चेहर्‍यावरचे भाव पाहून कॉलरही ताठ झाली +D !

या सफारीची खोल समुद्राकडे जाणारी फेरीही बरीच रमणीय होती. दूर समुद्रातून दिसणार्‍या जमिनीवरच्या गोष्टी जरा वेगळ्या आणि सुंदर दिसतात. निळेशार पाणी, ट्रुम्सो बंदर, त्याच्या आजूबाजूचा शहराचा भाग, त्यातून उठून दिसणारे आमचे हॉटेल रॅडिसन ब्लू, या सर्वांच्या मागे विखरू लागलेल्या ढगांची निळी-गुलाबी नक्षी आणि त्यामागचे निळे आकाश...

काही ठिकाणी किनारपट्टी केवळ हिमाच्छादित डोंगरांनी बनली होती...

तर काही ठिकाणी बर्फाने झाकलेल्या जंगलांनी भरलेले डोंगर आणि त्यांच्या पायथ्याशी असलेली टूमदार गावे होती.

.

.

अर्ध्या-पाऊण तासांच्या प्रवासानंतर आम्ही मासेमारीसाठी योग्य स्थानावर पोहोचलो आणि कप्तानाने नांगर टाकून बोटीला एका जागी स्थिर केले. नंतर "गळ वापरून करायची मच्छीमारी" या विषयावर प्रात्यक्षिकासह वर्ग झाला. अश्या तर्‍हेने आम्हाला तरबेज मच्छीमार बनवून कप्तानाने प्रत्येकाला सगळी आयुधे देऊन शुभेच्छांसह "करा हल्ला. मी आहेच तुमच्या मागे. " असे आवाहन केले. मग आम्हीही हर हर महादेव म्हणत आपापली आयुधे चालवायला सुरुवात केली...

या ठिकाणी समुद्र ४० ते ४५ मीटर खोल होता. नितळ निळ्या पाण्यात दहा एक मीटरपर्यंत खोलवरचे दिसत होते. साडेदहा वाजले असावे. आता सूर्यमहाराजही क्षितिजावर प्रकट होऊ लागले होते...

पहिल्या दोनतीन मिनिटातच आमच्या ऑस्ट्रेलियन सहप्रवाशिणिच्या गळाला पहिला मासा लागला, वजन ३.४ किलो...

कप्तान कसलेला व्यावसायिक होता... प्रत्येक पकडलेल्या माशाचे वजन करून सांगत होता!

आम्हीही फार मागे राहिलो नाही... भारताच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न होता, राजे! +D. ही पहिली शिकार, कॉड मासा, वजन ३.७ किलो...

आणि परत दहा मिनिटाने दुसरी शिकार, या वेळेसही कॉडच, ३ किलो, ...

आमच्या चिनी सहपवाशिणिने सगळ्यात मोठा ७ किलोचा कॅटफिश पकडला. बरेच छोटे मासेही पकडले गेले पण नॉर्वेच्या नियमाप्रमाणे ते कप्तानाने परत पाण्यात सोडून दिले. कप्तानाने म्हटल्याप्रमाणे तेथे बरेच मासे होते. कारण प्रत्येक प्रवाशाने कमीतकमी तीन चार मोठे मासे पकडलेच. कोणी मासा पकडला की सगळेच मोठी मर्दुमकी गाजविल्यासारखा जल्लोष करत होते. मधूनच कुडकुडलेले हात गरम करायला आणि कॉफीचे घुटके घ्यायला उबदार केबिनमध्ये जात होतो. सुरुवातीला कडाक्याची थंडी होती (-६ डिग्री) पण सूर्य ढगांच्या मागून बाहेर आला तशी ती कमी (-४ डिग्री) झाली होती... झालो, केवळ दीड दिवसातच मी अर्धा "नॉर्वेकर" झालो... -४ डिग्री तापमानाला "कमी थंडी" म्हणायला लागलो +D!

दुपारचे बारा वाजले... सूर्य बराच वर आला होता... म्हणजे हा येsssssssssssवढा, क्षितिजाच्या जेमतेम दोन अंगुळे वर +D (?!)

इथून पुढे आता तो परत खाली जाऊ लागणार होता ! आता प्रकाशातली निळाई जाऊन पडलेल्या स्वच्छ उन्हात दूरपर्यंत स्पष्ट दिसू लागले होते. किनाऱ्यावरच्या छोट्याछोट्या वस्त्या, त्यांतली निष्पर्ण झाडे व त्यांच्या पार्श्वभूमीवरच्या बर्फाच्छादीत टेकड्या आणि बरेच निरभ्र झालेले नितळ निळे आकाश... सगळे कसे अगदी कसबी चित्रकाराने काढलेल्या सुंदर चित्रासारखे दिसत होते...

.

सुंदर देखावा पाहून जेवढा आनंद झाला तितकाच, किंवा काकणभर अधिकच आनंद निरभ्र आकाशामुळे ऑरोरा दिसण्याच्या वाढलेल्या शक्यतेने झाला. (आता हा बदमाश ऑरोरा दिसल्याशिवाय काय मनाला स्वस्थता मिळणार नाही... अर्थात लहानपणापासून ढुशी देणारे स्वप्न आता इथे आल्यावर चैनीने थोडेच राहू देणार होते?)

आतापर्यंत बरेच मासे गळाला लागले होते :). सगळ्यांचे हात गारठून तक्रार करू लागले होते. कप्तानाने मासे कापून साफ करायला सुरुवात केली होती. कसबी शेफसारखे सफाईने माशांची कातडी आणि काटे काढून 'फिले / फिये' कशा बनवायच्या याचे उत्तम प्रात्यक्षिक आम्हाला त्याने दाखवले आणि "हेच मासे वापरून गाईड तुमच्या करता लंच बनवणार आहे" असे म्हणाला.

गारठलेले सगळेजण केबिनमध्ये येऊन कॉफी आणि चॉकलेट बरोबर गप्पा मारू लागलो. थोड्या वेळात गाईड-कम-शेफ़ने बनवलेले माशांचे सूप, उकडून गार्नीश केलेला माश्यांचा मेन कोर्स, उकडलेले बटाटे आणि पाश्च्यात्य पद्धतिच्या उकडलेल्या मिश्र भाज्या असे जेवण समोर आले. बेत बेताचाच होता, पण नुकतेच स्वतः पकडलेले ताजे मासे-- आणि त्यातही कॉड सारखा चवदार मासा-- यामुळे मजा आली. शिवाय मासे पकडताना झालेल्या गंमतीही तोंडी लावायला होत्या... त्यांनीतर जेवणाची रंगत अजूनच वाढवली.

जेवण संपले आणि कप्तान "आता परत जायची वेळ झाली, निघूया का? " असे विचारायला आला तेव्हा ध्यानात आले की सफारीचे चार तास संपले ! येवढ्या लवकर चार तास संपले? इथे हिवाळ्यात दिवस लहान होतो, तसे तास आणि मिनिटेपण लहान होतात की काय?

परतीचा प्रवास पण आमच्या गप्पांत पटकन संपला. प्रवासात कधी कधी असा मस्त गट जमतो की जसे काही सगळे मित्र घरापासून एकत्र सफरीला आलो आहोत ! आणि असा प्रवास मनात कायम घर करून राहतो.

परतीच्या प्रवासात टिपलेली काही दृश्ये...

.

हा ट्रुम्सोचा पूल... त्याच्याखालून मोठमोठी जहाजे आरामात पलीकडे जाऊ शकतात इतका उंच आहे.

परत बंदरावर पोचलो तेव्हा दुपारचे दोन वाजले होते आणि ट्रुम्सोची संध्याकाळ सुरू झाली होती... सावल्या लांब होऊ लागल्या होत्या. माझा पुढचा कार्यक्रम परत त्याच बोटीने रात्री आठ वाजता "नॉर्दर्न लाइटस् डिनर क्रूझ" हा होता. म्हणजे सहा तास मोकळे होते. तडक हॉटेलवर जाण्याऐवजी जरा ट्रुम्सोमध्ये चक्कर मारायचे ठरवले. काल अंधारात अनोळखी वाटणारे नवीन शहर दिवसाच्या उजेडात आज जरा ओळखीचे आणि मैत्रिपूर्ण वाटू लागले. हा ट्रुम्सोचा हमरस्ता, जिथे मी काल रात्री हातमोजे खरेदी केले होते.

दिवसाच्या उजेडात तो अधिक आकर्षक दिसत होता. काँक्रिटच्या जंगलांपेक्षा हे असले मूळ संस्कृतीशी नाते सांगणार्‍या इमारती असलेले रस्ते मला जास्त मोहवतात...

.

.

दोन तास असंच गावभर भटकत राहिलो. जसा सूर्य क्षितिजाखाली गेला तसे तापमान वेगाने खाली येऊ लागले. -२ अंशापर्यंत वर आलेले तापमान आता तीन चार अंशांनी नक्कीच खाली गेलं असणार. कुडकुडणारी पावले आपोआपच हॉटेलच्या दिशेने वळली. रूमवर आलो तेव्हा साडेचार वाजले होते. अजून बराच वेळ मोकळा होता. थोडा थकवा आला होता आणि रात्रीच्या ऑरोरा क्रूझसाठी ताजेतवाने राहता यावे यासाठी दोन तास झोप घेण्याचा निर्णय घेतला.

(क्रमश: )

====================================================================
उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३ (समाप्त)...

====================================================================

प्रतिक्रिया

अतिशय सुंदर वर्णन आणि छायाचित्रे.. धन्यवाद..!
हे सर्व पाहून नॉर्वेला जाण्याची इच्छा प्रबळ झाली आहे.. :)

अजया's picture

5 Mar 2013 - 11:02 pm | अजया

पुढचे भाग पण असेच लवकर टाका, बर झाले वाढत्या उन्हाच्या दिवसात तुम्ही थन्ड्गार सफर चालु केलीत !

राही's picture

5 Mar 2013 - 11:09 pm | राही

हाही भाग पहिल्या दोन भागांप्रमाणे आवडलाच.आता पुढच्या भागात ऑरोरा दिसणार की नाही अशी उत्सुकता वाटतेय.

आदूबाळ's picture

5 Mar 2013 - 11:15 pm | आदूबाळ

वा वा वा!

ट्रुम्सो मस्त 'ट्रुमदार' आहे!

सिंधुरक्षक पाणबुडीचा फोटो विशेष आवडला...

स्मिता.'s picture

5 Mar 2013 - 11:23 pm | स्मिता.

काय गंमत बघा, आजच्या दिवसाची सुरुवार ग्रीसच्या निळ्या समुद्राचे फोटो बघून झाली तर शेवट नॉर्वेचा निळा समुद्र बघून! तापमान आणि एकूणच भौगोलिक परिस्थिती पूर्णतः वेगळी असली तरी निळा समुद्र कुठेही सुंदरच...

मासे कापतानाच्या फोटोच्या आधीचे आणि नंतरचे समुद्र-किनार्‍यावरची गावे यांचे फोटो वेड लावतील असे आहेत.

मोदक's picture

5 Mar 2013 - 11:37 pm | मोदक

मस्त फोटो..

वाचतोय.

अशोक सळ्वी's picture

6 Mar 2013 - 12:41 am | अशोक सळ्वी

अप्रतिम फोटो आणि छान वर्णन...मजा आली!

अशक्य ग्रेट चाललीये सफर!
आपली पाणबुडी काय, मासेमारी काय, मजा आहे एकेक!
वरून २० वा फोटू चित्र असावे इतका चांगला आलाय.
एखाद्या रहस्यकथेसारखेच ऑरोराचे गुपित ठेवण्यात तुम्ही यशस्वी झाला आहात. ;)
क्यामेरा कोणता आहे हे सांगाल का?
मासे मिळाल्यावरचा आनंद अगदी याऽऽहू करायला लावणारा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Mar 2013 - 1:02 am | डॉ सुहास म्हात्रे

खर तर ऑरोराच्या ओढीने गेलो. बराच वेळ मोकळा आहे म्हणून इतर सफारी बुक केल्या पण त्यांनी सहलीचा आनंद व्दिगुणित केला.

कॅमेरा : Sony Cyber-shot DSC TX7.

रेवती's picture

6 Mar 2013 - 1:14 am | रेवती

ओक्के. आभार.

अशक्य भारी आहे ब्वॉ सगळं!!!!

(तुमच्यागत गॉथम सोडून कधी हिंडायला मिळेल या प्रश्नाने ग्रासलेला) बॅटमॅन.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Mar 2013 - 1:14 am | डॉ सुहास म्हात्रे

(तुमच्यागत गॉथम सोडून कधी हिंडायला मिळेल या प्रश्नाने ग्रासलेला) बॅटमॅन.

तुम्हाला कायपण कठीण नाय बगा... नुसता टेलिफोन बूथमध्ये घूसून बॅटमॅनचा ड्रेस घातला की चालले ऊड्डाण करून ;) ! (ह घ्या)

आयला ती जुनी सीरियल तर नै ना म्हणत आहात??? अप्रतिम होती बगा एकदम :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Mar 2013 - 3:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

पण जुनी कशी काय... अजूनही छोट्यामोठ्या बॅटमॅनच्या रुपाने घरोघरी ताजी टवटवटवीत आहे !

फक्त बॅटमॅनला जगाला वाचवायच्या कामातून स्वतःकरता जरा कमीच मोकळा वेळ मिळतो हाच एक प्रॉब्लेम आहे :)

बॅटमॅन's picture

6 Mar 2013 - 3:32 pm | बॅटमॅन

अगदी!

पण क्रिस्तोफर नोलानने त्याच्या बॅटपटत्रयीच्या शेवटी ब्रूस वेनला बॅटमॅनपणातून कायमची मुक्ती दिलीय, शिवाय छोकरीपण दिलीय :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Mar 2013 - 1:08 am | डॉ सुहास म्हात्रे

सव्यसाची, अजया, राही, आदूबाळ, स्मिता., मोदक, अशोक सळ्वी : आपणा सर्वांना उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल मनःपुर्वक धन्यवाद !

मिसळ's picture

6 Mar 2013 - 1:31 am | मिसळ

फोटो देखिल मस्त. पु. भा. च्या प्र.

nishant's picture

6 Mar 2013 - 2:34 am | nishant

मस्त..मस्त..मस्त..!!
मासा डोक्यावर उचलुन धरलेला फोटो सर्वात जास्त आवडला!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Mar 2013 - 5:14 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

स्वतः पकडलेला मासा खाताना अधिक गंमत वाटली का?
थंडगार देशात, निळ्या रंगाच्या एवढ्या नैसर्गिक शेड्स दिसत असताना काही घरांचे उबदार रंग रोचक आहेत.

कोणेएकेकाळी अगदी आर्क्टीक वृत्ताच्या उत्तरेला जाऊनही ऑरोरा बघायला थंडीत कुडकुडण्याची माझी हिंमत नव्हती. दिवसाउजेडी बाहेर असताना नशीब ** होतं.

मस्त फोटोज. आजच बाकि सगळे भाग वाचले. आमच्याशी शेअर केल्याबद्दल धन्स!

पुन्हा एकदा मस्त आणि धन्यवाद.

यानंतर पुएमध एवढाच प्रतिसाद दिला जाईल, फोटोतल्या थंडीनं बोटं आखडतात माझी.

नानबा's picture

6 Mar 2013 - 9:08 am | नानबा

सुंदर! सुंदर!! सुंदर!!! (प्रत्येक सुंदरनंतर एक चिन्ह जास्त आहे यावरून तुमचा लेख किती आवडलाय याची कल्पना येईल). ऑरोरांच्या फोटुंच्या प्रतिक्षेत....

प्रचेतस's picture

6 Mar 2013 - 9:30 am | प्रचेतस

खूप सुंदर.

श्रीरंग_जोशी's picture

6 Mar 2013 - 9:52 am | श्रीरंग_जोशी

या सफरीबद्दल मनापासून धन्यवाद!!

आनन्दिता's picture

6 Mar 2013 - 10:19 am | आनन्दिता

निळशार पाणी डोळ्याचं पारणं फेडतय!! खुप सुंदर!!

अग्निकोल्हा's picture

6 Mar 2013 - 10:39 am | अग्निकोल्हा

मुळातच बर्फ बघायची सवय नसल्याने घरांचे काही फोटो तर सिजी एफेक्टच भासले. विषेशतः दुसरा फोटो.

तुमचा अभिषेक's picture

6 Mar 2013 - 10:51 am | तुमचा अभिषेक

सुंदर छायाचित्रे
वृत्तांत फुरसतीने वाचतो, तीनही भाग.. तुर्तास वाचणखूण..

ट्रुम्सोदार आय मीन टुमदार चित्रे आणि वर्णन! :)

या ठिकाणांच्या प्रेमात पडलो आहोत आम्ही सर्वजण... :)

जाण्याचा योग येईल, न येईल. पण तुम्ही सफर घडवून आणलीत त्याबद्दल धन्यवाद..

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Mar 2013 - 3:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

इच्छा तेथे मार्ग निघतोच... तुमची सफर जुळून येण्यासाठी शुभेच्छा !

आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Mar 2013 - 11:31 am | डॉ सुहास म्हात्रे

मिसळ, nishant, ३_१४ विक्षिप्त अदिती, aparna akshay, ५० फक्त, प्रथम फडणीस, वल्ली, श्रीरंग_जोशी, आनन्दिता, ग्लिफ, तुमचा अभिषेक आणि ऋषिकेश : आपणा सर्वांना सुंदर प्रतिक्रियांबद्दल अनेकानेक धन्यवाद ! असाच लोभ असू द्यावा.

@ ५० फक्त : यानंतर पुएमध एवढाच प्रतिसाद दिला जाईल, फोटोतल्या थंडीनं बोटं आखडतात माझी. :))

स्पंदन..'s picture

6 Mar 2013 - 12:09 pm | स्पंदन..

हाहि भाग अतीशय उत्तम्....
भारतीय पाणबूडी बघून तुम्हाला खूपच आनंद आणि अभिमान वाट्ला असेल...
फोटों ची तारिफ करुन तर आता शब्द्च संपले माझे...
ऑरोरांची खूप उत्सुकता लागलीय्...पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघतोय....

वैशाली हसमनीस's picture

6 Mar 2013 - 1:06 pm | वैशाली हसमनीस

छान फारच छान.

चेतन माने's picture

6 Mar 2013 - 2:01 pm | चेतन माने

तिकडचा सूर्य खास आवडला आमच्यासारखाच आळशी आहे!!!
बाकी फोटू मस्त आलेत
मेन इवेन्ट अजून बाकी आहे :)
पुभाप्र :) :) :)

शिद's picture

6 Mar 2013 - 2:39 pm | शिद

मस्त चालली आहे तुमची सफर...Enjoy!!!

दिपक.कुवेत's picture

6 Mar 2013 - 2:52 pm | दिपक.कुवेत

खुप सुंदर फोटो आणि वर्णनहि तेवढेच खास. तीकडे निशांतच्या ग्रीसच्या फोटोनी पण असच वेड लावलय! पुढिल फोटो बघण्यास अतीउत्सुक!

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Mar 2013 - 3:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्पंदन.., वैशाली हसमनीस, चेतन माने, शिद, दिपक्.कुवेत : सर्वांना उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल खूपखूप धन्यवाद !

चौकटराजा's picture

6 Mar 2013 - 4:17 pm | चौकटराजा

सर्व फटो वावा आहेत. रात्रीचा सूर्य वगैरे चा चानस आहे का तुमच्या कारेक्रमात ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Mar 2013 - 6:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

रात्रीचा सुर्य उन्हाळ्यात दिसतो... उत्तर ध्रुवीय प्रदेशात २१ जूनला व दक्षीण ध्रुवीय प्रदेशात २१ डिसेंबरला.

मात्र तो काळ आकाशात सतत २४ तास उजेड असल्याने ऑरोरा बघायला एकदम बाद ! त्यामुळे या दोन गोष्टी एकादम करणे शक्य नाही !

तुमच्याकडे सगळे एक्केच आहेत वाट्ट ! ;) म्हणजे एकसे एक ठिकाणी भ्रमंती केलीत म्हणुन वाटले. :)
सुरेख लिहीत आहात,असेच लिहीत रहा. :)

(पर्यटन प्रेमी):)

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Mar 2013 - 4:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

अनेक धन्यवाद !

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Mar 2013 - 4:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

अनेक धन्यवाद !

पैसा's picture

8 Mar 2013 - 7:34 pm | पैसा

फारच सुरेख!

अनन्न्या's picture

8 Mar 2013 - 7:36 pm | अनन्न्या

अप्रतिम फोटो!! ते मासे परत सोडलेत ना?

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Mar 2013 - 12:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

फक्त लहान मासेच परत पाण्यात सोडले. बाकीच्यांना माझ्या आणि सहप्रवाश्यांच्या पोटात मानाचे स्थान मिळाले :)

मृत्युन्जय's picture

9 Mar 2013 - 11:32 am | मृत्युन्जय

लैच भारी

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Mar 2013 - 11:47 am | डॉ सुहास म्हात्रे

पैसा, अनन्न्या, मृत्युन्जय : आपणा सर्वांना अनेक धन्यवाद !

वॉव !!! ग्रेट तुमच्या नशिबाचा हेवा वाटला मला,खुप सुरेख वर्णन अन सुंदर मनमोहक प्रकाशचित्रे ,सफर संपुच नये असे वाटते :) पु.भा.प्र. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Mar 2013 - 1:39 am | डॉ सुहास म्हात्रे

असाच लोभ असू द्या.

सिंधुरक्षक पाणबुडीचा फोटो पाहून छान वाटले. ऑगस्ट २०१३ ला स्फोट होऊन बुडलेली पाणबुडी हीच ना?

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Dec 2013 - 1:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

दुर्दैवाने ते खरे आहे. मी फोटो काढला त्यावेळेस ती रशियात नविनिकरण करून परतताना ट्रुम्सो बंदरात उभी होती.

चौकटराजा's picture

21 Dec 2013 - 6:02 pm | चौकटराजा

काँक्रिटच्या जंगलांपेक्षा हे असले मूळ संस्कृतीशी नाते सांगणार्‍या इमारती असलेले रस्ते मला जास्त मोहवतात..
.
यासाठीच आयुष्यात एकदाच परदेश प्रवास करायचा तर -- -----तर --- इस्तंबूल- सोफिया- अथेन्स-ब्रिडिसी- रोम व्हेनिस- मिलान -पिसा - मार्सेलि- बार्सिलोना- पॅरिस.

फोटो तर सुरेखच आहेत. वर्णनही भारी !