शब्दात अर्ध-होकार
ओठात लाजूनी आला
स्वप्नाच्या हिंदोळ्यावर
जीव घाबरा झाला
मज सांग आई, तू सांग
हा खेळ असे कि नाते
ज्या वाटेवर मी फुलले
ती वाट पोरकी होते
गांव आता बदलेलं
मिळतील नवी मज नाती
काळीज मात्र व्याकुळ
तुटतुटेल तुमच्यासाठी
अडखळेल पाऊल हळवे
मी सोडून जाता, जाता
राहील उभा नि:शब्द
मग वाटेवरती दादा
मज स्मरेल जेव्हा घर हे
श्रमसरत्या शांत दुपारी
मी बघेन देव्हार्यात
पितळेचा कृष्णमुरारी
बांधीली गाठ शेल्याशी
हातात हात मी घेते
पाण्यास अर्पिले दिप
ती नदी कुठे गं नेते ?
प्रतिक्रिया
26 Feb 2009 - 2:09 pm | जागु
वा छान मनोगत मांडले आहे तुम्ही.
26 Feb 2009 - 2:33 pm | मनीषा
मज स्मरेल जेव्हा घर हे
श्रमसरत्या शांत दुपारी
मी बघेन देव्हार्यात
पितळेचा कृष्णमुरारी ...खूपच छान
सुंदर कविता .....
26 Feb 2009 - 2:48 pm | अनिल हटेला
छान मांडलये मनोगत !!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
26 Feb 2009 - 4:16 pm | राघव
खूप छान लिहिलेत. येऊ देत अजुन!
अडखळेल पाऊल हळवे
मी सोडून जाता, जाता
राहील उभा नि:शब्द
मग वाटेवरती दादा
स्वानुभवाने असेच वाटते दादाला हे सांगू शकतो.
(हळवा भाऊ)मुमुक्षु
27 Feb 2009 - 3:38 am | मिसळपाव
'पाण्यास अर्पिले दिप
ती नदी कुठे गं नेते ?'
दोन ओळीत केवढा आशय आहे.
27 Feb 2009 - 5:26 am | प्राजु
शेवट तर अतिशय हळवा..!
खूप खूप आवडली कविता.
अभिनंदन. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
27 Feb 2009 - 6:28 am | मुक्तसुनीत
कविता वाचताना संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.
वृत्ताचे वजन काही ठिकाणी साधले गेले नाही. जुन्या प्रकारच्या काव्यात हे खटकते. कविता नव्या जाणीवांची , छंदाला एकूण झुगारणारी असती तर याबद्दल बोललो नसतो.
कवितेतल्या जाणीवा निश्चितच काही दशके जुन्या आहेत. त्यामधे हळवेपणा आहे , आयुष्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या व्यक्तीच्या मनातली चलबिचल आहे. शेवटाचे कडवे तर कातर बनवणारे आहेच. परंतु एका सरलेल्या काळाची छाया या सार्यावर आहे याची सतत जाणीव होत होती. अर्थात कवितेत अमुकच काळाच्या जाणीवा नोंदायला हव्यात आणि ती हळवी असता कामा नये असे नाहीच. पण शेवटाचे कडवे सोडून असलेल्या ओळी फार काव्यदृष्ट्या दाद द्याव्याशा वाटल्या नाहीत.
पुढील कवितेबद्दल शुभेच्छा.
27 Feb 2009 - 7:04 am | रामदास
बांधीली गाठ शेल्याशी
हातात हात मी घेते
पाण्यास अर्पिले दिप
ती नदी कुठे गं नेते ?
असं वाटलं की ह्या चार ओळीत बरंच काही आहे.
हातात हात मी देते असं आहे का?
27 Feb 2009 - 9:11 am | विसोबा खेचर
मज स्मरेल जेव्हा घर हे
श्रमसरत्या शांत दुपारी
मी बघेन देव्हार्यात
पितळेचा कृष्णमुरारी
बाळकरामा, अप्रतीम काव्य रे!
जियो...!
तात्या.
27 Feb 2009 - 10:20 am | आकाशी नीळा
मस्त आहे कविता ..
आवडली.
27 Feb 2009 - 1:03 pm | दत्ता काळे
ते खरंतर तुम्ही म्हणता त्याप्रमाणेच आहे. पण टंकताना चूकलो आणि परत वाचून बघितली नाही.
27 Feb 2009 - 1:04 pm | दत्ता काळे
प्रतिसाद देणार्या सर्वांना धन्यवाद.
27 Feb 2009 - 2:40 pm | लक्ष्मणसुत
लक्ष्मणसुत उवाच्
तुझ्यासारखा अप्रतिम काव्य करणारा मित्र मला आहे,
याचा मला अभिमान वाटतो.
28 Feb 2009 - 5:02 pm | नाना बेरके
आजकाल पुर्वीसारखं काहीसुध्दा राहिलं नाही , त्यामुळे कविता काही फारशी परिणामकारक वाटली नाही.