संध्याराणी

शार्दुल_हातोळकर's picture
शार्दुल_हातोळकर in जे न देखे रवी...
6 May 2017 - 2:26 pm

निष्पाप कळी तुटताना गहिवरली संध्याराणी
हलक्याच प्रकाशामध्ये डोळ्यांतुन झरले पाणी

पानांची सळसळ नाही थिजलेली अवघी सृष्टी
अन् उनाड वेडा वारा निमिषातच झाला कष्टी

थरथरल्या दुःखी फांद्या भ्रमरांची खंडीत गाणी
संध्येच्या ह्रदयामधली अगतिकता पानोपानी

अनिवार बुडाल्या शोके लतिकाही लेकुरवाळ्या
कोमेजुन झुकल्या खाली सुंदरशा उंच डहाळ्या

फुललेली हजार पुष्पे आक्रंदती मुक बिचारी
नटलेल्या वनराईच्या ही कशी अवकळा दारी

विणलेली अपार स्वप्ने संध्येने कळीच्याभवती
दुष्टांच्या पुरवित मोहा नियतीला पर्वा नव्हती

गतिमान परि काळाची अविरत धावती चाके
सारुन पुन्हा तिमिराला तेजोमय प्रकाश फाके

संध्येची बनली रजनी उधळीत तमाच्या लाटा
क्षितिजाला येता किरणे उजळुन निघाल्या वाटा

हळुवार पुन्हा वेलीला कलिकांची कोंबे फुटली
रुसलेली अवघी सृष्टी जोमात नव्याने नटली

मावळत्या सूर्यप्रकाशी कोंबाचीच कलिका झाली
फुलवित पुन्हा पुष्पांना क्षितिजावर संध्या आली

संध्येच्या नयनांमधली कलिका ती लोभसवाणी
दिसल्यावर पानांमध्ये मग हसली संध्याराणी

शोधुन नव्यात स्मृतींना ही दुनिया चालत राही
ही रीत खरी सावरते गहिवरल्या संध्येलाही

ही ऐसी करुण कहाणी कित्येक नशीबी असते
रुसवुन मनांना साऱ्या ती नियती पुन्हा हसते

- शार्दुल हातोळकर

माझी कविताकविता

प्रतिक्रिया

शार्दूलपंत, मिपाचे 'बालकवि' असे आपणास म्हणावेसे वाटू लागले आहे.
ठोमर्‍यांची प्रतिभा २०१७ मध्येही जिवंत आहे म्हणा की

संदीप-लेले's picture

6 May 2017 - 7:39 pm | संदीप-लेले

सहमत. अप्रतिम रचना. मान गाये उस्ताद !

शार्दुल_हातोळकर's picture

6 May 2017 - 11:15 pm | शार्दुल_हातोळकर

अभिजीतदादा, आपण खुप मोठ्या मनाने कौतुक केलेत, खरोखर धन्य वाटले !!
बालकवींची उंची गाठणे अगदी अशक्य आहे..... माझा आपला साधासा प्रयत्न.....

पैसा's picture

6 May 2017 - 3:48 pm | पैसा

सुंदर लिहिलीय कविता!

मितान's picture

6 May 2017 - 5:21 pm | मितान

छान कविता !
ते 'हर्षाचे सजती पताके' थोडं अडकत आहे ! ते दुरुस्त करता आलं तर ब्येष्ट होईल बघा !

गौरी कुलकर्णी २३'s picture

6 May 2017 - 9:00 pm | गौरी कुलकर्णी २३

तरल, भावविभोर ' संध्याराणी ' ! कवीराज तूमच्या काव्यप्रतिभेला मानाचा मूजरा !! कविता खूप काही सांगून जाते अन् शेवटच्या दोन ओळी विचार करायला अक्षरशः भाग पाडतात ...!!!

शार्दुल_हातोळकर's picture

6 May 2017 - 11:19 pm | शार्दुल_हातोळकर

धन्यवाद पैसाताई, मितानजी आणि गौरी!

मितानजी, आपण सुचवलेली सुधारणा अगदी योग्य आहे..... मलासुद्धा तसेच वाटत होते....

साहित्य संपादकांना एक विनंती....

कृपया
"सारुन पुन्हा तिमिराला हर्षाचे सजती पताके"
याच्याऐवजी
"सारुन पुन्हा तिमिराला तेजोमय प्रकाश फाके"
असे संपादित करता येईल का?

पद्मावति's picture

7 May 2017 - 5:36 am | पद्मावति

अतिशय सुरेख.

सत्यजित...'s picture

7 May 2017 - 6:19 am | सत्यजित...

>>>पानांची सळसळ नाही थिजलेली अवघी सृष्टी
अन् उनाड वेडा वारा निमिषातच झाला कष्टी

थरथरल्या दुःखी फांद्या भ्रमरांची खंडीत गाणी
संध्येच्या ह्रदयामधली अगतिकता पानोपानी

अनिवार बुडाल्या शोके लतिकाही लेकुरवाळ्या
कोमेजुन झुकल्या खाली सुंदरशा उंच डहाळ्या>>>

ग्रेस इफेक्ट?? मला तर तोच जाणवतो आहे नक्की!(वै.म.) वाचता-वाचताच 'पाऊस कधीचा पडतो,झाडांची हलती पाने' आठवलं!आणि ऐकतंच प्रतिसाद लिहितो आहे!

कविता पुढेही वाचत गेलो,पण सांज-रात्रीच्या त्या अगम्य-रम्य गूढतेतच जीव गुंतुन पडला आहे!पुढचा प्रकाशाचा शोध म्हणजे उद्विग्न मनाची समजूत फक्त!
कविता इथेच थांबली असती तर ती रम्य गूढता कायम ठेवून कमालीच्या ताकदीची आणि कितीतरी 'मोहक' राहिली असती!बरोबर! एखाद्या पडद्याआड थांबलेल्या सुंदरीप्रमाणे!(ये जो चिल्मन है,आठवतंय!)
पुढच्या भागासही (जरा कमी-अधिक करुन) अश्याच एखाद्या रम्य कवितेत ढाळणेही आपणांस सहज वाटते!
अर्थातच,ही सगळी माझी वैयक्तीक मतं आहेत!
(पण केवळ कवितेबद्दल कविता म्हणून नाही!)
अभिनंदन!पुलेशु!

शार्दूल, अभिनंदन !

शार्दुल_हातोळकर's picture

7 May 2017 - 8:06 pm | शार्दुल_हातोळकर

धन्यवाद पद्मावती, संजयजी, सत्यजीत !!

अत्रुप्त आत्मा's picture

7 May 2017 - 11:28 pm | अत्रुप्त आत्मा

@शोधुन नव्यात स्मृतींना ही दुनिया चालत राही
ही रीत खरी सावरते गहिवरल्या संध्येलाही ››› सलाम घ्या हो मालक!

@ही ऐसी करुण कहाणी कित्येक नशीबी असते
रुसवुन मनांना साऱ्या ती नियती पुन्हा हसते ››› __/\__

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 May 2017 - 12:46 pm | ज्ञानोबाचे पैजार

फारच सुरेख, अतिशय आवडली कविता.
पैजारबुवा,

देशप्रेमी's picture

9 May 2017 - 2:00 pm | देशप्रेमी

अप्रतिम.. मनाला भिडणारी कविता...

प्रसंग अगदी जिवंत उभा केलात..

मी मागे विनंती केल्याप्रमाणे आपली पुढील कविता महाराष्ट्रावर असेल अशी अपेक्षा करतो.

किसन शिंदे's picture

9 May 2017 - 3:48 pm | किसन शिंदे

सुंदर लिहीलीये कविता.

शार्दुल_हातोळकर's picture

9 May 2017 - 11:29 pm | शार्दुल_हातोळकर

गुरुजी, पैजारबुवा, देशप्रेमी, किसनजी मनापासुन धन्यवाद.

@देशप्रेमी - आपण आणि इतरही काही मिपाकर मंडळींनी सुचविल्याप्रमाणे मी नक्कीच महाराष्ट्रावरची कविता लिहुन पुर्ण करण्याचा प्रयत्न करेन....

प्राची अश्विनी's picture

11 May 2017 - 6:36 pm | प्राची अश्विनी

किती सुरेख! पुन्हा पुन्हा वाचावी अशी कविता.

हतोळकरांचा प्रसाद's picture

12 May 2017 - 9:46 pm | हतोळकरांचा प्रसाद

खूप छान, मस्त जमून आलीये!

शार्दुल_हातोळकर's picture

13 May 2017 - 1:15 pm | शार्दुल_हातोळकर

धन्यवाद प्राचीजी आणि प्रसाद !!

अनिंदिता's picture

17 May 2017 - 3:28 pm | अनिंदिता

खूपच सुरेख !!!
२०१७ मध्येहि बालकवींची प्रतिभा जिवंत आहे , सहमत आहे मी या मताशी .

मुरारबाजी's picture

19 May 2017 - 5:27 pm | मुरारबाजी

मावळत्या सूर्यप्रकाशी कोंबाचीच कलिका झाली
फुलवित पुन्हा पुष्पांना क्षितिजावर संध्या आली

संध्येच्या नयनांमधली कलिका ती लोभसवाणी
दिसल्यावर पानांमध्ये मग हसली संध्याराणी

शोधुन नव्यात स्मृतींना ही दुनिया चालत राही
ही रीत खरी सावरते गहिवरल्या संध्येलाही

खरच कविता भिडतय थेट मनाला _/\_

मुरारबाजी's picture

19 May 2017 - 5:28 pm | मुरारबाजी

मावळत्या सूर्यप्रकाशी कोंबाचीच कलिका झाली
फुलवित पुन्हा पुष्पांना क्षितिजावर संध्या आली

संध्येच्या नयनांमधली कलिका ती लोभसवाणी
दिसल्यावर पानांमध्ये मग हसली संध्याराणी

शोधुन नव्यात स्मृतींना ही दुनिया चालत राही
ही रीत खरी सावरते गहिवरल्या संध्येलाही

खरच कविता भिडतीय थेट मनाला _/\_

राघव's picture

14 Jun 2017 - 10:59 pm | राघव

कविता खूप आवडली! :-)

शार्दुल_हातोळकर's picture

15 Jun 2017 - 11:47 pm | शार्दुल_हातोळकर

प्रतिसादाबद्दल धन्यवाद अनिंदिता, मुरारबाजी, राघवजी !!