अगरीयांच्या शोधात

अमृता गंगातीरकर's picture
अमृता गंगातीरकर in जनातलं, मनातलं
14 Jun 2017 - 12:22 pm

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका डॉक्युमेंटरी फिल्मच्या संदर्भात मध्य प्रदेश आणि छत्तीसगढच्या आदिवासींचा रहिवास असलेल्या जंगलात भटकण्याचा अनुभव मिळाला. खनिज वितळवून लोह मिळवणाऱ्या अगरीया नावाच्या आदिवासी जमातीला हुडकून त्यांच्या ह्या पुरातनकालापासून चालत आलेल्या पद्धतीवर फिल्म बनवण्याचा घाट आम्ही घातला होता. पूर्णपणे शहरात जगलेल्या वाढलेल्या मला ह्या आदिवासींकडून आणि त्यांच्या जगावेगळ्या लोखंड गाळण्याचा पद्धतीकडून काय अपेक्षा ठेवावी हेच कळत नव्हते. ह्या फिल्मची रिसर्चर आणि असिस्टन्ट डिरेक्टर असलेल्या मला माझा रिसर्च मला खूप वेगवेगळ्या प्रकारचे परस्परविरोधी पुरावे देत होता. तिथे गेल्यावर काय वाढून ठेवलय ह्याची फारशी कल्पना नसल्याने फिल्मचा दिग्दर्शक आणि मी, आम्ही दोघे काहीश्या साशंक मनानेच रेकी करण्यासाठी निघालो. प्रवासात ट्रेनच्या खिडकीशी बसून मी आणि माझ्या दिग्दर्शक मित्राने एक सुंदर कथाच लिहून काढली होती. आमच्या शंका कुशंकांना फाटा देऊन एक अतिशय सरधोपट गोष्ट आम्ही लिहिली. ह्या गोष्टीत आम्ही दोघं अगदी विनासायास जंगलात पोहोचतो. अगरिया आदिवासींना भेटतो आणि त्यांच्याबरोबर अगदी स्क्रीप्टबरहुकूम शूट संपवून घरी सुद्धा परततो. कोणत्याही प्रकारच्या अस्मानी वा सुलतानी संकटांचा मागमूसही नव्हता त्या स्क्रिप्ट मध्ये. स्वतःवर खूष होऊन, शहरी शहाणपणाची झापड लावून इतरांना कमी लेखून आपली कॉलर टाईट करण्याची सवय असतेच आपल्यासारख्या लोकांना.

मुंबई ते जबलपूर असा ट्रेन प्रवास आणि त्यापुढचा मांडलापर्यन्तचा जीपचा प्रवास आटोपून आम्ही गेस्ट हाउसमध्ये पोहोचलो तेव्हा नर्मदेच्या संध्याकाळच्या आरतीची वेळ झाली होती. नर्मदेचं विशाल पात्र डोळे भरून पाहिलं आणि त्यापल्याड दिसणारं गर्द जंगल आम्हाला खुणावू लागलं. नर्मदा सहस्रधारांनी जणू आम्हाला बोलवत होती. ज्यांनी नर्मदेचं दर्शन घेतलं आहे त्यांना नद्यांना मानवी दर्जा आणि मानवाचे अधिकार देण्यास पुढाकार घेणाऱ्या सुप्रीम कोर्टाचं कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही. नर्मदेकडे एकटक बघत असतांना एका बाजूला मनात विचारांची गर्दी झाली तर दुसरीकडे आत कुठेतरी खूप शांत शांत वाटलं. युगानुयुगांपासून नर्मदातीरी राहणाऱ्या आदिवासींचा राहून राहून हेवा वाटला आणि त्यांच्याशी एकरूप होऊन त्यांच्या जीवनावर रिसर्च करून त्यांच्यासमवेत आयुष्य घालवणाऱ्या वेरीयर एल्वि्नबद्दलच्या कुतुहलानी मन भरून आलं.

नर्मदातीराच्या आदिवासींबद्दल अभ्यास करतांना एक नांव सतत कानावर पडते ते म्हणजे वेरीयर एल्विन. धर्मप्रसाराच्या कार्यासाठी एकोणीसशे सत्तावीस साली भारत गाठलेला एल्विन नर्मदातीरी येतो काय आणि इथल्या एका आदिवासी मुलीशी लग्न करतो काय. सगळाच अजब. एल्विनबद्दलच्या अनेक चांगल्या वाईट गोष्टी इथे कानावर पडतात. पण त्याबद्दल पुन्हा कधी तरी सांगेन.

दुसऱ्या दिवशी सकाळी रेकी साठी निघताना मन खूप शांत झालं होतं. नर्मदेच्या आशीर्वादाचा तर परिणाम नव्हता ना! शहरापासून दूर जसजसं जंगलात आत आत जायला लागलो तसातसा जंगलाचा मूड सुद्धा बदलत गेला. मानवी वर्चस्वाच्या पाऊलखुणा मागे राहिल्या आणि निसर्गाचं आधिपत्य आम्ही स्वीकारलं. अशा ह्या जंगलात एक इंग्रज येऊन आदिवासी बायकोबरोबर राहतो ह्याचं आश्चर्य वाटत होतं. त्याच्या जोडीला आमच्या वाटाड्याचं अखंड जंगलपुराणही चालू होतं. हा वाटाड्या म्हणजे मांडलाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खास आमच्या सोबतीला दिलेला गाईड. जंगलातल्या आदिवासींपासून ते तिथे येणाऱ्या चित्रविचित्र अनुभवांपर्यंत अनेक विषयांवर अस्खलित हिंदीत तो मनुष्य बोलू शकत होता. “आप समझ रही है ना मैडमजी” अशा प्रश्नाने सुरु होणाऱ्या त्याच्या सुरस व चमत्कारिक कथा व माझ्या उत्तराची वाट न पाहता त्याचं चाललेलं पुराण ह्या सगळ्यामध्ये खिडकीबाहेरच दृश्य मात्र खूप काही सांगत होतं.

शहर काय छोटी छोटी गावंदेखील आता मागे पडली होती. त्यांची जागा आता गर्द झाडांनी घेतली होती. कच्चा लाल मातीचा एकपदरी रस्ता तोसुद्धा कुठे कुठे गायब होत होता. शर्ट आणि पान्त घातलेले गावकरी जाऊन भडक रंगाच्या सुंदर साड्या नेसलेल्या, अंगभर गोन्दलेल्या, शिडशिडीत बायका आणि उंच, काटक, डोक्याच्या एका बाजूला केसांचा अंबाडा घातलेले हंड्सम पुरुष जागोजागी दिसू लागले. त्यांना अगदी आवर्जून हंड्सम म्हणावे इतके ते तुकतुकीत आणि चपळ. आमच्या गप्पिष्ट वाटाड्याने आमची ओळख करून दिली एका अत्यंत इंटरेस्टिंग आदिवासी जमातीशी ती म्हणजे बैगा. बैगा स्त्री-पुरुषांचे जंगलाविषयीचे ज्ञान, त्यांचे डोळ्याचे पाते लवते न लवते तेच जंगलात गायब होण्याची कला ह्यामुळे दंतकथांना पोषक वातावरण निर्माण झाले नसते तर नवलंच. अशा दंतकथांच वलय लाभलेली ही सुंदर (खऱ्या अर्थाने) जमात आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे हे आपलं केवढं दुर्भाग्य.

आमच्या सुंदर प्रवासात मिठाचा खडा पडला जेव्हा आम्ही अगारिया लोकांच्या पाड्यावर एकदाचे पोहोचलो. बाजारात लोखंड, स्टील सहज विकत मिळत असतांना आम्ही कशाला बुवा काबाड कष्ट करून वितळवून लोखंड काढू असा खडा सवाल आम्हाला विचारला गेला आणि आमची बोलती बंद झाली. आमच्या प्रोड्युसरचा रागीट चेहरा माझ्या डोळ्यासमोर तरळला. भाषा कळत नसूनही आमच्या उतरलेल्या चेहऱ्यावरून एका म्हताराबांनी आमचा काहीतरी बिनसलंय असं ताडलं. मग चार पाच म्हातारबांना पाचारण करण्यात आले. मोहाच्या फुलांची दारू पिऊन तर्र झालेल्या त्या सगळ्यांनी काहीतरी खलबत केलं. म्हातारबा नंबर १ आमच्या जवळ येउन काहीतरी सांगू लागले. गप्पिष्ट वाटाड्यानी म्हातारबाच्या आदिवासी बोलीच हिंदीत भाषांतर केला आणि आमच्या जिवात जीव आला.

म्हाताराबाच्या मते अगरिया जमातीने मोठ्या प्रमाणावर लोखंड निर्मिती थांबविली असली तरी छोट्या प्रमाणात लोखंड विताळवण आजही चालू आहे. हे लोखंड वापरल जातं लहान बाळांना दृष्ट लागू नये म्हणून, आजारी माणसाला बरा करण्यासाठी. हे लोखंड घराच्या उंबऱ्यावर ठोकल जातं वाईट प्रवृत्तींना घराच्या बाहेर ठेवण्यासाठी. आणि असं लहान प्रमाणावर लोखंड वितळवण्याचं काम करणारे अगारिया अजूनही आहेत असं म्हातारबा ठासून म्हणाले. म्हातारबांनासुद्धा नक्कीच कुठेतरी कधीतरी बॉस असावा. त्यांची ही मौलिक माहिती ऐकून आमचा आनंद गगनात मावेना. आता एकच काम करायचे होते ते म्हणजे लोखंड वितळवण्याचं काम करणाऱ्या ह्या अगरीयाला शोधून काढायचे होते. ट्रेनमध्ये लिहिलेल्या कपोलकल्पित स्क्रिप्टला नर्मदेत विसर्जित करून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला लागलो.

बुडणाऱ्याला काडीचा आधार असतो हे खरे आहे. कोणत्यातरी एका पाड्यावर कुणीतरी एक अगारिया तुमची मदत करू शकेल अशा अत्यंत जुजबी माहितीवर आम्ही पुढे कूच केलं. देवासारख्या धावून आलेल्या त्या म्हतारबांनाही आम्ही आमच्या गाडीत बसवलं. आपल्या व्याह्यांकडे लग्नानिमित्त मुक्कामासाठी आलेल्या म्हतारबांनीसुद्धा क्षणाचाही विचार न करता आमच्याबरोबर यायची तयारी दाखवली हे आमचा नशीब. पण हा निर्णय मोहाच्या फुलाच्या दारूच्या नशेत घेतलेला नसावा आणि नशा उतरल्यावर त्यांनी आपला विचार बदलला नाही म्हणजे मिळवली असा देवाचा धावा करत आम्ही निघालो. जसजसं आम्ही जंगलाचे रस्ते गाडीच्या चाकाखाली तुडवले तसतशा वाटा अजून निमुळत्या होत गेल्या. मुंबईत फिल्म इंडस्ट्री पावसाळ्यात जरा सुस्त असते. पण आमच्या रेकी साठी मात्र आम्ही पावसाळा का निवडला असा प्रश्न मनात येऊनही आम्ही तो एकमेकांना विचारायची हिम्मत केली नाही. अधून मधून पडणारा पाऊस, जंगलातल्या दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, निसरडे रस्ते आणि त्यात सतत अडकणारी आमची छोटी गाडी ह्यासर्वांमध्ये अगरीयाचं अस्तित्व आम्हाला जाणवत होत हे नक्की. कधी रस्ता दाखवण्यासाठी तर कधी लिफ्ट घेण्यासाठी हे अगारिया सतत आजूबाजूला वावरत होते. पण अजूनही लोखंड वितळवण्यचं काम करणारे कुठे दृष्टीपथात नव्हते.

अगारीयाच्या शोधात आम्ही सीमा ओलांडून मध्य प्रदेशमधून छत्तीसगढमध्ये आलो. जंगलाची आता चांगली ओळख झाली होती. रस्त्यावरच्या टपऱ्यांवर मिळणाऱ्या सामोसे, पोहे आणि जलेबी बरोबरच पेट्रोल विकत घेण्यात काही विशेष वावगं वाटत नव्हतं. एक रात्र वाटाड्याच्या घरात म्हताराबांबरोबर काढली. फिल्म प्रोडक्शनच्या रोखठोक सवयीमुळे दुसऱ्या दिवशी तत्परतेने एका रात्रीच्या राहण्याचे आणि जेवणाचे पैसे देऊ केले तर आमच्या गप्पिष्ट यजमानांनी ते चक्क नाकारले. “मैडम आप समझ रही है ना, बहुत रात हो गयी थी तोह आप हमारे घर ठेहेर गये तोह इसमे क्या बडी बात है?” इति वाटाड्या
रात्री बारा वाजता उठून पाच माणसांसाठी स्वयंपाक करणाऱ्या त्याच्या बायकोला त्रिवार नमन करून आम्ही पुढे निघालो.

छत्तीसगढमध्ये आपला भ्रमनिरास होणार नाही अस उगीचच वाटत होतं. वाटाड्यानं ऐकवलेल्या जंगलातल्या चमत्कारिक गोष्टींमुळे म्हणा किंवा जंगली प्राण्यांच्या सहवासामुळे जागृत झालेल्या सिक्स्थ सेंसमुळे म्हणा आपण आपल्या ध्येयाच्या खूप जवळ पोहोचलो आहोत असा सारखं वाटत होतं.

प्रकाश परतेच्या दाराशी आमची गाडी थांबली तेव्हा टिपिकल आदिवासीच्या घरी आलोय असं वाटलंच नाही. विटांनी बांधलेलं घर, आजूबाजूला थोडीशी शेती. हातात मोबाईल मिरवणारा, शर्ट पान्ट घातलेला, तीन मुलांचा बाप असलेला २३ वर्षांचा पोरगेलासा प्रकाश जेव्हा समोर आला तेव्हा हे प्रकरण काही तरी वेगळच आहे असा मला जाणवलं. प्रकाशचा कॉन्फिडन्स आणि त्याची समज ही आम्ही आतापर्यंत भेटलेल्या कोणत्याही अगरिया पेक्षा वेगळी होती. आणि ह्याचं कारण समजायला आम्हाला फारसा वेळ लागला नाही. पिकाची कापणी झाल्यावर प्रकाश गावातल्या त्याच्यासारख्याच इतर तरुण मुलांबरोबर ट्रेन पकडतो, विना तिकीट प्रवास करून थेट मुंबई गाठतो. मुंबईत कामाठीपुरातल्या दहा बाय दहाच्या पत्र्याच्या झोपडीत आठ दहा इतर मुलांबरोबर राहून, गवंडी काम करून, जीवाची मुंबई करून पाच सहा महिन्यांनी पेरणीसाठी परत गावी येतो. प्रकाशच्या आई वडिलांना आणि तीन लहान मुलांमागे पाळणाऱ्या लहानश्या बायकोला ना कामाठीपुऱ्याची काही माहिती व ना प्रकाशच्या मुंबईतल्या कामाची काही कल्पना. त्यांना अप्रूप मुंबईच्या उंच बिल्डीन्गांचे आणि तिथे मिळणाऱ्या पैशाचे.

प्रकाशच्या डोक्यात "प्रकाश" पडायला फार वेळ लागलं नाही. आम्हाला नक्की काय हवय हे त्याला पटकन समजलं. “आप शुटींग के लिये आजाओ मैडम. मै सब कुछ करवा दूंगा.” असं तो अगदी आत्मविश्वसानी म्हणत राहिला. पण लोह वितळवण्याची प्रोसेस याची डोळी बघता येईल का असा प्रश्न विचारल्यावर मात्र त्याने नन्नाचा पाढा सुरु केला. एव्हढ्या जवळ येऊनही हाती काहीच न लागल्याची खंत करावी कि ह्या पोरागेल्याश्या मुलाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मुंबईला जाऊन अख्ख्या क्रूला घेवून यावं ह्या गोंधळात त्याच्याशी पैशाचं काहीही न बोलता आम्ही मुकाट परत यायला निघालो. परतीच्या प्रवासात माझा मित्र व मी एकमेकांशी एकही शब्द बोललो नसू. पावसापाण्यात, अख्खं जंगल तुडवून अगरीयांना शोधून काढल्याबद्दल आनंद मानायचा कि सरतेशेवटी कोणत्याही पुराव्याशिवाय परत आल्याबद्दल दुख: व्यक्त करायचं ह्या विचारातच आम्ही मुंबई गाठली.

मुंबईत आमचं जंगी स्वागत करण्यात आलं. आम्ही घालवलेला वेळ आणि केलेला खर्च बघता आम्ही नक्कीच खूप मोठा तीर मारून आलोय असं गृहीतच धरून “आता शूटची पटकन तयारी करा आणि निघा” असा सज्जड दम प्रोड्युसरने दिला आणि आम्ही परत कामाला लागलो. सगळ्यात आधी प्रकाशला फोन लावला. फोन लागेल कि नाही अशी धाक धुक तर होतीच मनात. प्रकाशकडून निघताना घाई घाईने टिपून घेतलेला नंबर बरोबर आहे कि नाही ह्याची खात्री करण्याची तसदही मी घेतली नव्हती. जंगलात भटकून सरतेशेवटी मिळालेला एकमेव नंबर सुद्धा नीट लिहिता येऊ नये ही एखाद्या असिस्टंट डायरेक्टर ची किती गंभीर चूक आहे हे समजायला काही कोणी ज्ञानी पुरुष असणे गरजेचे नाही. मोबाईल नंबर लिहून घेताना फक्त नऊ अंक लिहिले गेले होते हे मला कळल तेव्हा माझ्या पायाखालची जमीन हादरली.

दहावा आकडा काय असेल ह्या विवंचनेत दहा मिनिटे काढल्यावर मी पुढची दहा मिनिटे दहा वेगवेगळे नंबर लावले. ० ते ९ पर्यंतचे सगळे नंबर लावून दहा वेगवेगळ्या राँग नंबरवर बोलल्यावर मग मात्र माझा धीर सुटला. आता आपल्या खर्चानी परत जाऊन प्रकाशचा नंबर घेवून यावं कि काय असा विचार मनात आला आणि डोळे भरून आले. डोळ्यात अश्रूंची आणि डोक्यात विचारांची गर्दी झाली कि त्यावर एक रामबाण उपाय माझ्याकडे आहे. चहा. चहाचा एक घोट घश्याखाली गेल्यावर जरा हुशारी वाटू लागली आणि तेवढ्यात माझा फोन वाजला. हा नक्की आईचा असणार. आज काय जेवलीस असा रोजचा प्रश्न विचारायला फोन केलं असणार. तिरमिरीतच मी फोन उचलला.
“हेल्लो मैडमजी. वोह आपके लिए जो शूटिंग करवाना है ना उसका पच्चीस हजार रुपिया होगा.” प्रकाश बोलत होता
त्याने केलेल्या अव्वाच्या सव्वा मागणीवरून त्याचे कान उपटू कि त्याच्याशी संपर्काचं कोणतही साधन माझ्याकडे नसताना त्याने फोन केल्याबद्दल त्याचे आभार मानू हे कळत नव्हतं. पण त्यापुढचे दोन दिवस मात्र मला खूप शिकवून गेले. कोणत्याही प्रकारचा मोबदला, पैशांचा व्यवहार, पगार, प्रमोशन ह्याबद्दल कधीही बार्गेन न करू शकणारी मी प्रकाशसारख्या एका आदिवासी मुलाची बार्गेनिंग स्कील बघून स्तिमित झाले. हा पठ्ठा आमच्या खमक्या प्रोड्युसरलाही पुरून उरला. त्या दोन दिवसात प्रकाशच्या बुद्धिमत्तेची चुणूक आम्हा सर्वांनाच दिसली. शेवटी लोह वितळवण्याचा तामझाम करायचे, त्यासाठी अख्ख्या गावाला बोलावून जेवू घालायचे २५००० आणि हे करण्यापूर्वीच्या भट्टीच्या आणि अग्निदेवतेच्या करावयाच्या पूजेच्या प्रसादासाठी एक शेळी कापायचे २००० असा सौदा पटला.

पण स्क्रिप्टचे काय? प्रकाशबरोबर झालेल्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होती कि आदिवासींचा पारंपारिक समारंभ ज्यात त्यांचे गाणे नाचणे असते तो तर होणार होता पण ज्यासाठी हा सगळा समारंभ आयोजित करण्यात आला होता त्या लोह वितळवण्याच्या विधीचे काय? लोहाच्या खनिजाचे दगड भट्टीत टाकून खरंच निघेल का लोखंड? ह्या कशाचीच उत्तरं आमच्याकडे नव्हती. आमच्या आधीच्या स्क्रिप्टचे तर तीन तेरा आधीच वाजले होते. मग आता कोणाची गोष्ट सांगायची? आधुनिक जीवन जगायला उत्सुक असलेल्या आदिवासींची की त्यांच्या जवळजवळ नष्ट झालेल्या निरुपयोगी पद्धतीची. की आपण गोष्ट सांगावी आपल्या प्रवासाची? अगरीयांना शोधून काढतांना आपल्याला आलेल्या अनुभवांची? ठरलं तर मग. हि फिल्म असणार होती एका दिग्दर्शकाच्या आणि त्याच्या टीम च्या शोधकार्याची. त्यांना आलेल्या अनुभवांची आणि त्यातून त्यांनी शोधलेल्या वाटेची! नाव ठरलं “In search of the Agaria” म्हणजे अगारियाच्या शोधात.

ठरलं तर मग. आम्ही ज्या मार्गाने जाऊन प्रकाशाचं घर शोधलं होतं तोच मार्ग कॅमेऱ्यात पकडायचा असा ठरलं. वाटेत आलेले आदिवासी, मोहाची उंच झाडं, जंगलातल्या नदया, प्रकाश, म्हातारबा सगळेच आता आमच्या गोष्टीतली पात्रं होती. कॅमेऱ्याच्या मागे राहणारा दिग्दर्शकच आता कॅमेऱ्यापुढे आला आणि अगरीयांच्या शोधात निघाला. पण ह्यावेळी हि सगळी मंडळी एव्हढ्या सहजासहजी आमचं सगळं ऐकणार होती असा तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची चूक आहे. आता पावसाने चांगलाच जोर धरला होता. ह्याआधी तुडवलेले रस्ते चिखल आणि डबक्यांच्या रांगोळीने भरले होते. अनेक रानवाटा नाहीश्या झाल्या होत्या. जंगलातले कितीतरी छोटे छोटे पूल धो धो वाहणाऱ्या नद्यांखाली दिसेनासे झाले होते. एका महिन्यापूर्वी आम्ही ह्याच भागात येऊन यशस्वीरीत्या रेकी करून गेलोय हे आमच्या क्रूलासुद्धा अविश्वसनीय वाटत असावं. पण कुणी काही बोललं नाही. गप्पिष्ट वाटाड्यालासुद्धा आपण कुठे ह्या मुंबईच्या वेड्या लोकांसोबत फसलो असं वाटत असावं. एका रात्री मोहाच्या दारूच्या नशेत त्याने आम्हाला जंगलातल्या एका शोर्ट कट ने थेट आमच्या गेस्ट हाउसच्या दारात नेऊन सोडलं. ज्या अंतरासाठी आम्ही अख्खी दुपार खर्च केली होती ते अंतर केवळ अर्ध्या तासात पार करून. वरून तो आम्हाला म्हणतो काय तर,
“क्या है न मैडमजी, यह जंगले है न, इसे आप अपना बनालो तोह वह खुदही आपको राह दिखायेगा. समझ रही है न आप”

वाटाड्याने नशेत बरळलेल्या त्या वाक्याने कसं काय माहित पण एक जादूच झाली. इतका वेळ हातचं राखून वावरणाऱ्या क्रूमध्ये एकदम आकस्मिक परिवर्तन झालं. साध्या शब्दात सांगायच झालं तर त्यांची भीड चेपली. जंगलाला आणि जंगलातल्या लाल मातीला त्यांनी आपलसं केलं. ज्या जंगलात बसून सर रुडयार्ड किप्लिंग ह्यांनी मोगलीला कागदावर उतरवला त्या जंगलाला आम्ही आमच्या कॅमेऱ्यात बंदिस्त केलं. उंच खडकांमधून खळाळत वाहणाऱ्या नद्या, लाल मातीत प्राण्यांच्या पावलांचे उमटलेले ठसे, आमच्या कॅमेऱ्याकडे कुतूहलानी बघत खुदुखुदू हसणारे आदिवासी, त्यांची घरे, त्यांचा रंगीबेरंगी आठवडी बाजार असं शूट करत करत आम्ही त्यांच्यातलेच एक होऊन गेलो.

अशाच एका बाजारात आम्हाला सुदेश भेटला. इतर अनेक अगरीयांप्रमाणेच सुदेशाही आता लोहाराचं काम करत होता. त्यासाठी लागणार लोखंड घ्यायला तो बाजारात आला होता. गावातल्या देवीच्या मूर्तीची शस्त्रास्त्र त्याच्याच घरून बनवून घेतली जायची. अशा ह्या सुदेशाने आमच्या समोर पेटत्या ज्वाळातून काढलेल्या लाल लाल लोखंडी सळईला आपल्या जीभेनी चाटून दाखवलं. आमची मात्र ते सर्व बघून दातखीळ बसली.

मोटारसायकल चालवणारा, घरी डिश टीवी असलेला सुदेश मला आदिवासींच्या नव्या पिढीचा आरसा वाटला. आपला व्यवसाय चालवणारा, नव्या जगाच्या बरोबरीनं नवीन स्वप्नं बघणाऱ्या सुदेशला भेटून एक वेगळाच आदिवासी आम्हाला दिसला. अगरीयांनी ह्याआधीच नाकारलेल्या, आजच्या जगाशी विसंगत असलेल्या त्यांच्या लोखंड वितळवण्याच्या कालबाह्य झालेल्या पद्धतीला आपण का शोधत फिरतोय असही मनात आलं. पण आपल्या शहरी मनाला आदिवासींच्या आदिवासी असण्याचं फार अप्रूप वाटतं. आपण कितीही प्रगत असलो तरीही आपल्याला आदिवासींना अजूनही शरीर गोंदवून, रंगीबेरंगी कपडे घालून, शेकोटीभोवती नृत्य करत डिस्कवरी चानेल वर बघायलाच आवडतं हेसुद्धा तेवढच खरं आहे.

मजल दरमजल करत आम्ही प्रकाशच्या गावी पोहोचलो. संध्याकाळचे ५ वाजले होते. मातीच्या छोट्या भट्टीची सगळी तयारी केली गेली होती. एक काळी शेळीसुद्धा आणून बांधून ठेवली होती. आपल्या डॉक्युमेंटरीमुळे हिचा हकनाक जीव जात आहे असा काहीसा विचार माझ्या मनात येऊन गेला. पण मी तो अंगावरची पाल झटकावी तसा झटकून टाकला. जसजसा सूर्य मावळायला लागला तसा अख्खा गाव भट्टीभोवती जमा झाला. आम्ही आमचा कॅमेरा आणि लाईट्स नीट सेट केले. माईक नीट चेक केला आणि शूटिंग सुरु करायला सज्ज झालो. बरोब्बर मावळतीला प्रकाशच्या वडिलांनी आणि काकांनी भट्टीची पूजा केली. त्यानंतर मग त्या शेळीचं कोकरण बंद झालं. तिच्या रक्तानं भरलेल्या थाळीत तिचं मुंडकं ठेवून भट्टीला तिचा प्रसाद चढवण्यात आला. कोळसे पेटवून प्रकाशच्या काकाने पायांनी भाता हलवायला सुरुवात केली. काकांनी भट्टीत टाकलेले दगड बघता ह्यातून अजून काही वेळानी लोखंड खरच बाहेर येणार आहे असं सांगितलं असतं तर त्यावर माझा काही विश्वास बसला नसता. पण आम्ही सर्वांनीच थोडा संयम दाखवून काय होतंय ते बघायचं ठरवलं.

काकांनी जसे भात्यावर पाय चालवायला सुरुवात केली, तसा आजूबाजूला बसलेल्या आदिवासी बायकांनी आपला सूर लावला. जशीजशी रात्रं चढत गेली, म्हाताऱ्या कोताऱ्यांनी आपल्या बिडया काढल्या आणि मोहाच्या दारूचे घोट घ्यायला सुरुवात केली. आदिवासींच्या गाण्यात असलेला एक प्रकारचा करकरीतपणा आणि मोहाच्या दारूमुळे चढलेली झिंग ह्याचं अफलातून मिश्रण आम्ही अनुभवत होतो. कोणतीही दारू न पिता आणि चिलीम न ओढता आम्हालाही ती नशा अनुभवयला मिळाली.

इकडे काकांचा भाता जोरात चालू होता. सहा फुटाचा तो माणूस एकहाती जवळ जवळ गेले ८ तास भाता चालवत होता. भात्याच्या तालावर गात होता, नाचत होता.
दोन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर, शेकडो किलोमीटर्सच्या प्रवासानंतर, आज अखेर ती वेळ आली होती ज्याची आम्ही अधीरतेनी वात पाहत होतो. रात्री २ वाजता अखेर काकांनी भाता थांबवला. एक थेंबभर वितळलेल लोखंड बाहेर आलं. ह्याला भ्रमनिरास म्हणायचा कि मिळालेलं यश साजरं करायचं ह्याचा विचार करण्याचही त्राण आमच्यात नव्हतं. रोख २७००० रुपये प्रकाशच्या हाती सोपवून, आमचा संसार आवरून आम्ही तेथून जे निघालो ते हॉटेलच्या पलंगावर जाऊन कोसळलो.

मुंबईला परत आल्यावर मी फायनल स्क्रिप्ट लिहून काढली. लोखंड वितळवण्याचं हे पुरातनकालीन क्राफ्ट कसं नामशेष झालाय आणि ते आजच्या जगात किती विसंगत आहे अशा आशयाची माझी स्क्रिप्ट माझ्या प्रोड्युसरनी अक्षरशः भिरकावून दिली. तिच्या मते माझ्या स्क्रिप्टला गोड शेवट (HAPPY ENDING) हवा होता. नामशेष होणारं क्राफ्ट आपण जगवायला पाहिजे अशा आशयाचं काहीतरी तिला हवं होतं. फिल्मच्या प्रेक्षकांना सकारात्मक फिलिंग यावी म्हणून. मी अर्थातच माझ्या अन्नादात्याच्या शब्दाबाहेर नव्हते. हे क्राफ्ट कसं सुंदर आहे आणि ते कसं टिकवलं पाहिजे, आदिवासींना आदिवासीच कसं ठेवलं पाहिजे अशा आशयाची स्क्रिप्ट लिहून मी प्रोड्युसरला सुपूर्द केली. आपल्या रिसर्चचं बाड फाईलमध्ये कोंबून मी नव्या फिल्मच्या कामाला लागले.

टीप: काही दिवसांनी कुणीतरी आम्हाला फोन करून सांगितलं की प्रकाशनं ८ तास जीवाचं रान करून भाता चालवणाऱ्या आपल्या काकांची फक्त ८०० रुपयांवर भलामण केली होती. उरलेले सगळे पैसे स्वतःकडे ठेवून त्यानं काकांना हाकलून लावलं होतं.

चित्रपटप्रकटनलेखअनुभव

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

14 Jun 2017 - 12:39 pm | सुबोध खरे

छान लेखन

अचाट आहे! लेखात छायाचित्रांची उणीव प्रकर्षाने जाणवली. बादवे, हा माहितीपट आम्हांला कुठे पाहायला मिळू शकेल?

मोदक's picture

14 Jun 2017 - 1:07 pm | मोदक

"अचाट" हेच बोलतो... असे चाकोरीबाहेरचे काम करणार्‍यांबद्दल प्रचंड आदर आहे.

तुम्ही गेला होतात तेथे नक्षलवाद्यांचा त्रास झाला नाही का..?

अमृता गंगातीरकर's picture

14 Jun 2017 - 4:08 pm | अमृता गंगातीरकर

अजिबात नाही. आम्ही एका लुप्त होणाऱ्या आणि कोणाचाही काडीचाही इंटरेस्ट नसलेल्या अशा क्राफ्टचा अभ्यास करायला गेलो होतो त्यामुळे नक्षलवादीच काय पोलीसानासुद्धा आमच्यात फारसा इंटरेस्ट नव्हता.

अबोली२१५'s picture

14 Jun 2017 - 12:46 pm | अबोली२१५

खुप छान... अजुन मज्जा आली असती जर डॉक्युमेंटरी फिल्मचा काही भाग बघायला मिळाला असता तर...

अमृता गंगातीरकर's picture

14 Jun 2017 - 1:01 pm | अमृता गंगातीरकर

दुर्दैवाने फिल्मचे कॉपीराईट प्रोड्युसर कडे असल्याने मी ती इथे अपलोड करू शकत नाही. पण छायाचित्रे टाकण्याचा प्रयत्न करते.

धन्यवाद. बरेच उपद्व्याप करावे लागतात तर!
फिल्मचे नाव आणि कुठे/ कधी प्रदर्शित होणारेय तेही कळवावे.

अमृता गंगातीरकर's picture

14 Jun 2017 - 4:11 pm | अमृता गंगातीरकर

ही फिल्म २०१०/११ मध्ये बनवली गेली आणि त्याचं सुमारास नाशनाल जिओग्राफिक च्या एका चानेल वर दाखवली

आनंदयात्री's picture

14 Jun 2017 - 7:11 pm | आनंदयात्री

in search of agaria असे शोधल्यावर हि डॉक्युमेंट्री सहज मिळाली. हीच आहे का?

हा लेख अतिशय आवडला. verrier elwin बद्दलही आपण अवश्य लिहावे हि आग्रहाची विनंती.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Jun 2017 - 9:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा त्या डॉक्युमेंटरीचा दुसरा भाग (तूनळीवरून साभार)...

योगी९००'s picture

15 Jun 2017 - 9:22 am | योगी९००

हीच ती डॉक्युमेंटरी असावी... शेवटी अम्रुता यांचे नाव दिसते.

अमृता गंगातीरकर's picture

15 Jun 2017 - 10:57 am | अमृता गंगातीरकर

हो हीच. हि फिल्म यौतुंबे वर आहे हे मलासुद्धा माहित नव्हते. फिल्म च्या वोईस ओवर आर्टिस्ट ने पोस्ट केली आहे.

बिछडे लाडले पाहून निरुपा 'आईंना' जो आनंद वाटतअसेल तसेच काहीसे अमृताला 'तू नळी' पाहून झालेले असेल तर नवल नाही!

खतरनाक, जबरदस्त अनुभव, तितकेच जबरदस्त लेखन.
मस्तच.

फिल्मचा दिग्दर्शक आणि मी, आम्ही दोघे काहीश्या साशंक मनानेच रेकी करण्यासाठी निघालो.

म्हणजे? "रेकी" हा कसला शॉर्टफॉर्म आहे का?

अमृता गंगातीरकर's picture

14 Jun 2017 - 4:02 pm | अमृता गंगातीरकर

रेकी हा reconnaissance ह्या फ्रेंच शब्दाचा शॉर्टफॉर्म आहे. म्हणजे आधी जावून माहिती गोळा (टेहळणी) करून येणे. हा शब्द फिल्मी भाषेत खूप वापरला जातो.

अभ्या..'s picture

14 Jun 2017 - 5:19 pm | अभ्या..

रेकी हा नॉर्मल शब्द आहे बराचसा. आमचे डिलर्सचे अन डिस्ट्रीब्युटरचे फ्लेक्स बोर्ड बसवण्यासाठी आधी रेकी करतात म्हणजे स्पॉटचे पत्ता, फोटो बिटो आणि साईजेस नोट करुन आणतात. अडाणी फिटर्सना पण हा शब्द चांगलाच माहीते. त्याची पीपीटी करुन एस्टीमेशनला जोडावी लागते.
"ओ रेकीचे पन चार्ज पडनार बघा" हे टिपिकल घोषवाक्य असते. ;)

स्वच्छंदी_मनोज's picture

14 Jun 2017 - 6:33 pm | स्वच्छंदी_मनोज

रेकी हा आम्हा ट्रेकर्समधल्या भाषेतपण वापरला जाणारा प्रचलीत आणि अगदी कॉमन शब्द आहे. अपेक्षीत अर्थही तोच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Jun 2017 - 7:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा मुळातला सामरिक/सैनिकी शब्द आहे. शत्रूवर हल्ला करण्याच्या अगोदर, सैन्याची एक छोटी तुकडी शत्रूच्या भूभागाची आणि तयारीची टेहेळणी करून येण्यासाठी पाठवली जाते, त्याला reconnaissance (शॉर्टफॉर्म: recce उर्फ रेकी) म्हणतात.

अत्रे's picture

15 Jun 2017 - 6:52 am | अत्रे

अरेच्चा! गंमतच आहे. एकच इंग्लिश (का फ्रेंच) शब्द फिल्म शूटिंग वाले, अडाणी फिटर्स आणि सैनिक वापरतात त्यांच्या त्यांच्या slang मध्ये.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jun 2017 - 7:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

युद्धशास्त्रातले जाणारे बरेच शब्द रोजच्या व्यवहारात आणि विशेषतः उद्योगधंदे-व्यवसायतंत्रात (बिझनेस मॅनेजमेंट) इतके रुळलेले आहेत की त्यांचा मूळ स्त्रोत सहज विसरल जातो... असाच एक शब्द स्ट्रॅटे़जी हा आहे, इंग्लिशमध्ये इतके सहज नाही पण मराठीतले व हिंदीतले "रणनीति" हे त्याचे रूप त्याचे मूळ उघड करते !

अभ्या..'s picture

15 Jun 2017 - 9:57 pm | अभ्या..

"फायर" कसकाय विसरला?
शूट, टारगेट.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jun 2017 - 9:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

सैनिकी मूळाचे पण सर्वसामान्य व्यवहारात सहजपणे वापरले जाणारे शब्द शेकड्यांनी आहेत. "रणनीति" असे भाषांतर असतानाही "स्ट्रॅटेजी" हा शब्द सैनिकी आहे हे सांगितल्यावर आश्चर्य वाटलेले चेहरे अनेकदा दिसतात, यासाठी जास्त अवांतर होऊ नये म्हणून तोच एक शब्द इथे सांगितला :)

"military terms and phrases in common use" दाखवा असे गुगलबाबाला विचारणे मनोरंजक ठरेल !

सुमीत भातखंडे's picture

14 Jun 2017 - 4:47 pm | सुमीत भातखंडे

जबरदस्त अनुभव.

चांदणे संदीप's picture

14 Jun 2017 - 4:49 pm | चांदणे संदीप

पण जरा घाईघाईत मांडल्यासारखा वाटला...असो, पुलेशु!

Sandy

अमृता गंगातीरकर's picture

15 Jun 2017 - 11:00 am | अमृता गंगातीरकर

खरंय तुमचं. लेखाची लांबी कमी करण्याच्या प्रयत्नात बरीच काटछाट करावी लागली त्यामुळे घाई झाल्यासारखे वाटत असेल.

मुक्त विहारि's picture

14 Jun 2017 - 5:55 pm | मुक्त विहारि

तुम्ही बरेच लेखन केले असावे असे वाटते.

मिपावर स्वागत....

अप्पा जोगळेकर's picture

14 Jun 2017 - 6:16 pm | अप्पा जोगळेकर

रोचक.

स्वच्छंदी_मनोज's picture

14 Jun 2017 - 6:31 pm | स्वच्छंदी_मनोज

अत्यंत वेगळे अनुभव आणि खिळवून ठेवणारा लेख. वरती तुम्हीच म्हटल्या प्रमाणे काही कॉपिराईट फ्री फोटो देता आले तर पहा.
आपल्याच देशात असे काही आहे याची नागर लोकांना जाणीव करून देणारा लेख.

प्रकाशच्या वागण्याचेच आश्चर्य नाही वाटले. कदाचीत मुंबईत राहून राहून शहराकडूनच शिकलेला हा डँबिसपणा असेल.

संजय क्षीरसागर's picture

14 Jun 2017 - 7:13 pm | संजय क्षीरसागर

त्याची परिणिती जर ही असेल :

मुंबईला परत आल्यावर मी फायनल स्क्रिप्ट लिहून काढली. लोखंड वितळवण्याचं हे पुरातनकालीन क्राफ्ट कसं नामशेष झालाय आणि ते आजच्या जगात किती विसंगत आहे अशा आशयाची माझी स्क्रिप्ट माझ्या प्रोड्युसरनी अक्षरशः भिरकावून दिली. तिच्या मते माझ्या स्क्रिप्टला गोड शेवट (HAPPY ENDING) हवा होता. नामशेष होणारं क्राफ्ट आपण जगवायला पाहिजे अशा आशयाचं काहीतरी तिला हवं होतं. फिल्मच्या प्रेक्षकांना सकारात्मक फिलिंग यावी म्हणून. मी अर्थातच माझ्या अन्नादात्याच्या शब्दाबाहेर नव्हते. हे क्राफ्ट कसं सुंदर आहे आणि ते कसं टिकवलं पाहिजे, आदिवासींना आदिवासीच कसं ठेवलं पाहिजे अशा आशयाची स्क्रिप्ट लिहून मी प्रोड्युसरला सुपूर्द केली. आपल्या रिसर्चचं बाड फाईलमध्ये कोंबून मी नव्या फिल्मच्या कामाला लागले.

तर एकूण प्रकार फार खेदजनक आहे.

एनी वे, तुमच्याकडे वाचकाला गुंतवून ठेवणारी लेखनशैली आहे हे नक्की. लिहीत राहा.

गामा पैलवान's picture

14 Jun 2017 - 7:16 pm | गामा पैलवान

अमृता गंगातीरकर,

तुमचा अनुभव खरंच भन्नाट आहे. कोण कुठले मुंबईचे दूरवर जंगलच्या कोपऱ्यात जाऊन अस्तंगत होणारं वनवासी तंत्रज्ञान चित्रित करू पाहतात !! सगळंच चकित करणारं.

अवांतर : लोखंड वितळवण्यावरून आठवलं की भारतातली स्टीलसाठी लोखंड वितळवण्याची लोहारांची पारंपरिक पद्धत अनधिकृत आहे. ब्रिटिशांनी तिच्यावर बंदी घातली होती. कारण उघड आहे. ती बंदी आजही चालू आहे बहुतेक. तर त्या पद्धतीसाठी वापरायचं लोखंड या वनवासी पद्धतीतून मिळवलेलं असेल काय?

आ.न.,
-गा.पै.

अवांतर : लोखंड वितळवण्यावरून आठवलं की भारतातली स्टीलसाठी लोखंड वितळवण्याची लोहारांची पारंपरिक पद्धत अनधिकृत आहे. ब्रिटिशांनी तिच्यावर बंदी घातली होती. कारण उघड आहे. ती बंदी आजही चालू आहे बहुतेक. तर त्या पद्धतीसाठी वापरायचं लोखंड या वनवासी पद्धतीतून मिळवलेलं असेल काय?

त्या लिंकेतनं काहीही कळलं नाही. ELI5 (Explain like I'm 5) करू शकाल का?

अमृता गंगातीरकर's picture

15 Jun 2017 - 11:08 am | अमृता गंगातीरकर

ब्रिटिशांनीच काय आपणही जंगलात युगानुयुगे राहणाऱ्या आदिवासींवर सर्व प्रकारची बंधनं घातली आहेत. हि बंदीही त्यातीलच एक असावी.

वरुण मोहिते's picture

14 Jun 2017 - 7:21 pm | वरुण मोहिते

अजून असे काही अनुभव येउदेत . आणि एक आठवलं . अश्याच आदिवासी जमाती वेगवेगळ्या रतलाम च्या पुढे झाबुवा ला आहेत . तोच रोड जो इंदोर वरून वडोदरा ला जातो आतला . रात्री एक गाडी पास होत नाही त्या रोड ला .

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Jun 2017 - 8:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

भन्नाट, चित्तथरारक अनुभव ! अभिविवेषरहित असलेला हा लेख विशेषतः त्याच्या साध्या सोप्या, 'जसे झाले तसे' या शैलीमुळे मनोवेधक झाला आहे !

तुमचे इतर अनुभव वाचायला नक्की आवडतील.

अश्या अनुभवाचे वास्तव प्रदर्शन करण्याऐवजी, जबरदस्तीने गोग्गोड शेवट करण्याचा धोपट मार्ग चोखाळण्यार्‍या तुमच्या प्रोड्युसरच्या मानसिकतेचा खेद वाटला ! :(

अमृता गंगातीरकर's picture

15 Jun 2017 - 11:11 am | अमृता गंगातीरकर

हि प्रोड्युसर ची चूक नव्हे तर प्रेक्षकांची आहे. शेवटी मागणी तसा पुरवठा ह्या सूत्रानुसार प्रोड्युसरला तेच दाखवाव लागता जे लोकांना पहायचा आणि ऐकायचं आहे. टीआरपी की जय हो.

नेत्रेश's picture

17 Jun 2017 - 3:13 am | नेत्रेश

हे म्हणजे 'सरळ मार्गानी कष्ट करुन खुप कमी पैसे मीळतात, जास्त पैसे मिळवायला लबाडी किंवा चोरीच करायला हवी' असे म्हणण्या सारखे आहे.

चार पैसे जास्त मिळवण्यासाठी तद्दन व्यावसायीक चित्रपटाआम्ही प्रेक्षकांना हवे ते देतो म्हणतात. आणी सत्य परीस्थीतीचे चित्रण असलेल्या डॉक्युमेंटरीही तेच म्हणत असतील तर त्यांची विश्वासार्हता काय ? डॉक्युमेंटरीत दाखवलेले कीती खरे आणी कीती खोटे?

अमृता गंगातीरकर's picture

24 Jun 2017 - 11:52 am | अमृता गंगातीरकर

तुम्ही खूपच योग्य प्रश्न विचारला आहे. थोडक्यात आधी कोंबडी कि अंड असा काहीसा प्रश्न आहे. माझ्या अनुभवत अतिशय चांगल्या आशयाच्या अनेक मालिका टीआरपी नसल्यामुळे बंद कराव्या लागल्या आहेत. अगदी जवळच उदाहरण घ्यायचं तर उंच माझा झोका. रमाबाईचं कार्य दाखविलेल्या भागांपेक्षा त्यांना इतर बायकांनी दिलेला त्रास दाखवणाऱ्या भागांचे टीआरपी जास्त असायचे असे ऐकिवात आहे.
त्यामुळे कोणताही कलाप्रकार मग डॉक्युमेंटरी क असेना हा व्यावसायिक फायद्यासाठी सुद्धा बनविलेला असतो हे समजून तो बघणे आवश्यक आहे.

दीपक११७७'s picture

5 Jul 2017 - 11:47 am | दीपक११७७

रमाबाईचं कार्य दाखविलेल्या भागांपेक्षा त्यांना इतर बायकांनी दिलेला त्रास दाखवणाऱ्या भागांचे टीआरपी जास्त असायचे असे ऐकिवात आहे

या बाबतीत समाज बेधुंद-बेफाम होत चालला आहे आणि माध्यम त्यात तेल-पेट्रोल असे वाट्टेल ते ज्वाला ग्रही पदार्थ त्यात ओतत आहेत.

पण मग इंग्रजीमध्ये एवढ्या भारी डॉक्युमेंटरीज कशा बनतात? त्यांच्या प्रोड्युसर ना सेम प्रॉब्लेम येत नाही का?

अमृता गंगातीरकर's picture

24 Jun 2017 - 12:00 pm | अमृता गंगातीरकर

इंग्रजी डॉक्युमेंटरी बनवणार्यांना सुद्धा सेम प्रोबेल्म येतो. अगदी परखड मत व्यक्त करणाऱ्या फिल्म्स शक्यतो एखाद्या न्यूज चानल वर किंवा एखाद्या फेस्टिवल मध्ये दाखवल्या जातात. तिथे त्यांना हवा तो प्रेक्षक मिळतो. पण तिथेसुद्धा तुम्ही नक्की काय म्हणताय हे त्या प्रेक्षकांवरच अवलंबून असते. टीवी वर दाखविल्या जाणाऱ्या फिल्म्स बहुतेक एकाच पठडीतल्या असतात. फिल्मचा शेवट चांगला करा हा धमकीवजा सल्ला प्रोड्युसर ला सहसा चानल कडूनच दिला जातो.

रिपोर्ताज शैलीत आलेले सहज सोपे लेखन खूप आवडले. तुम्ही अजून लिहिलेले वाचायला आवडेल :)

सानझरी's picture

15 Jun 2017 - 7:04 am | सानझरी

+1.. असंच म्हणते..

जबरदस्त लेख आहे! मिपावर लिहीत रहा!

पैसा's picture

14 Jun 2017 - 9:59 pm | पैसा

फारच सुरेख लिहिलय. लिहित रहा.

प्रमोद देर्देकर's picture

14 Jun 2017 - 10:06 pm | प्रमोद देर्देकर

मस्त अनुभव. पदर्पणातच तुम्ही चेंडू पार बाहेर टोलवलात.

येवू द्या अजुन असे रोचक अनुभव.

इडली डोसा's picture

14 Jun 2017 - 10:27 pm | इडली डोसा

प्रभावी लेख.

प्रीत-मोहर's picture

14 Jun 2017 - 10:44 pm | प्रीत-मोहर

जब्बरदस्त!!! अश्याच लिहित रहा. आवडेल वाचायला

रातराणी's picture

14 Jun 2017 - 10:53 pm | रातराणी

जबरदस्त लेख! सुंदर लिहिलंय!

अमितदादा's picture

15 Jun 2017 - 12:52 am | अमितदादा

भारीच...उत्तम लेख

ज्ञाना's picture

15 Jun 2017 - 1:20 am | ज्ञाना

रोचक आणि माहितीपूर्ण लेख. वाचकाला खिळवून ठेवणारी सहज सुंदर आणि ओघवती लेखन शैली. कृपया अजून लिहा आणि लिहीत राहा.

खूप छान आणि सहजपणे केलेले लेखन.. फार आवडले.

अत्रे's picture

15 Jun 2017 - 6:47 am | अत्रे

लेख आवडला!

आदिवासींसोबतचे शूटिंगचे अनुभव वाचताना वाचताना डेव्हीड अटेनबरोच्या Life on Air पुस्तकाची आठवण आली. फरक एवढाच की त्यांना शूटिंग साठी पैसे द्यावे लागले नाहीत.

योगी९००'s picture

15 Jun 2017 - 9:21 am | योगी९००

अमृता गंगातीरकर, तुमचा अनुभव खरंच भन्नाट आहे. फार छान शब्दात मांडला आहे.

युट्युब वर तुमची डॉक्युमेंटरी पाहीली आणि मला आवडली सुद्धा...

पिशी अबोली's picture

15 Jun 2017 - 9:34 am | पिशी अबोली

लेख प्रचंड आवडला.

स्मिता चौगुले's picture

15 Jun 2017 - 9:51 am | स्मिता चौगुले

मस्त अनुभव, जबरदस्त लेख!
लिहीत राहा, आणखी वाचायला आवडेल

अनन्त्_यात्री's picture

15 Jun 2017 - 11:17 am | अनन्त्_यात्री

...उ॓दीर बाहेर आला त्याची कहाणी !

लोनली प्लॅनेट's picture

15 Jun 2017 - 11:45 am | लोनली प्लॅनेट

अतिशय छान लेख
मला लहानपणी पासून माहितीपटाची जबरदस्त आवड आहे त्यामुळे वाचताना एक सेकंदही लक्ष विचलित झाले नाही बाकी माहितीपट निर्माते सुद्धा वास्तव वर्णन करण्यापेक्षा करमणुकी लाच प्राधान्य देतात

नंदन's picture

15 Jun 2017 - 11:56 am | नंदन

शब्दशः वेगळ्या वाटेवरचा लेख. अतिशय आवडला. अनुभवांची मांडणी, वेळोवेळी स्वतःच्या प्रतिक्रिया तपासून पाहणे आणि कुठल्याही अभिनिवेशाशिवाय हे सारे वाचकापर्यंत नेमकेपणाने पोचवणे - हे सारे खासच.

सुज्ञ माणुस's picture

15 Jun 2017 - 4:08 pm | सुज्ञ माणुस

लेख आवडला..जबरदस्त अनुभव!

अनिंद्य's picture

15 Jun 2017 - 5:56 pm | अनिंद्य

@ अमृता गंगातीरकर,

एका वेगळ्या दुनियेची सफर घडवली तुम्ही. जबलपूर-मंडला, नर्मदा ही नावे वाचून खूप आनंद झाला - माझे जन्मगाव आहे जबलपूर.

आणि त्या लोखंड वितळवण्याच्या रात्रीची खुमारी तुमच्या शब्दांवरून ओघळून वाचकांपर्यंत बरोबर पोचली आहे,

बेस्ट,

अनिंद्य

आदूबाळ,

भारतात पारंपरिक पद्धतीने जे स्टील बनवण्यात येत असे त्याच्यासंबंधी इथे माहिती आहे. त्यानुसार सर रिचर्ड बर्टन नामक व्यक्तीने नोंद केलीये की १८६६ च्या सुमारास इंग्रजांनी या स्टीलच्या व्याप्रावर बंदी घातली. यावरून तर्क बांधता येतो की ब्रिटीश स्टीलचा खप अबाधित ठेवण्यासाठी ही बंदी लागू केली असणार.

मी ऐकलंय त्यावरून आजही भारतात पारंपरिक पद्धतीने स्टील बनवणे अनधिकृत आहे. हे जर खरं असेल तर ब्रिटीशांची बंदी आजतागायत चालू आहे असं म्हणता येईल.

भारतात पूर्वी जे उच्च दर्जाचं स्टील निर्माण होत असे, त्यासाठी मंत्रसंस्कारित असं उच्च दर्जाचं लोखंड उपलब्ध असायला हवं. हा लेख वाचून जाणवलं की प्रस्तुत वनवासी पद्धतीत मंत्रसंस्कार आहेच. तसेच वनस्पतीदेखील टाकल्या आहेत. म्हणजेच निर्माण होणारं लोह संस्कारित असावं. कदाचित हेच लोह पुढे स्टील बनवण्यात कामी येत असेल.

विकी वगळता बाकी सर्व माहिती माझे अंदाज आहेत.

आ.न.,
-गा.पै.

तसेच वनस्पतीदेखील टाकल्या आहेत. म्हणजेच निर्माण होणारं लोह संस्कारित असावं

संस्कारित =))

बाबाजीची कृपा!

बाय द वे, तुम्हाला ते "माझे" विमान मिळाले का? इकडे ट्रॅफिक खूप आहे हो!!!

मंजूताई's picture

15 Jun 2017 - 8:00 pm | मंजूताई

तुमची लेखनशैली आवडली!

आपल्याला वाटतात तितके आदिवसी किंवा ग्रामिण भागातिल लोकं एवढि भोळि नसतात, एवढे खरे.

लेख खूप आवडला. सहजसुंदर लेखन!

शैलेन्द्र's picture

17 Jun 2017 - 10:21 am | शैलेन्द्र

भन्नाट लिहिलंय, खूप आवडला हा प्रवास

माहितगार's picture

17 Jun 2017 - 6:30 pm | माहितगार

लेखन रोचक आहे

अमृता गंगातीरकर's picture

18 Jun 2017 - 6:14 pm | अमृता गंगातीरकर

माझ्या पहिल्याच पोस्टला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल खूप आभार. मराठीत लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे आणि तुमच्या उत्तेजनामुळे तो पुढे चालू ठेवायचा विचार आहे.
मिसळ पावच्या सगळ्या वाचकांचे आणि प्रमुखांचे आभार.

गामा पैलवान's picture

19 Jun 2017 - 1:51 am | गामा पैलवान

अमृता गंगातीरकर,

तुम्ही इतर भाषांतही लिहिता का?

आ.न.,
-गा.पै.

अमृता गंगातीरकर's picture

20 Jun 2017 - 5:56 am | अमृता गंगातीरकर

इंग्रजी मध्ये. पण कामासाठी.

मनिमौ's picture

19 Jun 2017 - 12:12 pm | मनिमौ

अनुभव. तुमचा लेख आल्यावर अशी काही माणसे आहेत हे समजले. अनवट माहिती आवडली

अमृता गंगातीरकर's picture

20 Jun 2017 - 6:27 am | अमृता गंगातीरकर

जगात खरंच खूपच चित्र विचित्र प्रकारची मानसं आहेत हे कळल्यावर आपण त्याच त्याच लोकांबरोबर, त्याच विषयांवर, त्याच त्याच गप्पा मारत आला दिवस ढकलत असतो ह्या विचारान जरा अस्वस्थ होतं. पण मग बर सुद्धा वाटत.

पुंबा's picture

19 Jun 2017 - 4:10 pm | पुंबा

मस्त लेख. प्रकाशच्या वागण्याचे आश्चर्य वाटले नाही. पण त्या भाता चालवणार्‍या गृहस्थाचे वाईट वाटले.

अमृता गंगातीरकर's picture

20 Jun 2017 - 5:57 am | अमृता गंगातीरकर

मलापण खूप वाईट वाटले. त्या प्रसंगानंतर दोघा भावात काय घडले माहित नाही आणि जाणून घ्यायची भिती वाटते.

माधुरी विनायक's picture

20 Jun 2017 - 12:20 am | माधुरी विनायक

अम्रुता, भन्नाटच आहेत तुमचे अनुभव. आणि तुम्ही इतकं सहज, ओघवतं लिहिलंय की तुमचे आणखी अनुभव वाचावेसं वाटू लागलंय.. लिहित्या राहा...

प्राची अश्विनी's picture

20 Jun 2017 - 8:22 am | प्राची अश्विनी

बढिया!

अरूण गंगाधर कोर्डे's picture

23 Jun 2017 - 12:42 pm | अरूण गंगाधर कोर्डे

प्रतिसादाला शब्द नाहीत. एकूण वर्णन सुंदरच , एवढेच म्हणता येईल. वाचताना कुठेही कंटाळा येत नाही.

Anand More's picture

23 Jun 2017 - 1:11 pm | Anand More

सुंदर लेख.
काकांना प्रकाशने दिलेला मोबदला वाचून वाटाण्याच्या अक्षता लावण्याची प्रथा आदिवासींमध्येदेखील आहे हे कळले.

प्रसाद प्रसाद's picture

6 Jul 2017 - 4:07 pm | प्रसाद प्रसाद

तुम्ही दिलेली लिंक छान आहे. अमृताजींच्या माहितीपटाची लिंक पण आहे त्यात.
अमृताजी खूपच छान लेख.

पद्मावति's picture

5 Jul 2017 - 2:11 am | पद्मावति

जबरदस्त लेख. तुमची लेखनशैली फार छान ओघवती आहे. अजुन लिहीत जा मिपावर प्लीज.

वीणा३'s picture

6 Jul 2017 - 10:43 pm | वीणा३

खूप छान लेख !!!

शिव कन्या's picture

11 Jul 2017 - 8:48 pm | शिव कन्या

बर्याच दिवसांनी इथे वाचण्यासारखं मिळालं.
नवी माहीती. नवी परिभाषा.
लिहीलंय पण सुरेख डिटेलवार.
धन्यवाद.

बॅटमॅन's picture

11 May 2018 - 12:45 am | बॅटमॅन

कसला सुंदर लेख आहे राव. लयच भारी, कडक सलाम. _/\_

diggi12's picture

26 Aug 2024 - 12:16 pm | diggi12

खूप छान लेख

धर्मराजमुटके's picture

26 Aug 2024 - 7:25 pm | धर्मराजमुटके

लेख पुन्हा एकदा वाचून छान वाटले. असले लिखाण आताशा मिपावर दुर्मिळ झाले आहे. "जाने कहा गये वो दिन" असे म्हणण्याची पाळी आली आहे.
ज्याप्रमाणे भाजपात मुळ भाजपेयी दिसत नाहीत किंवा काँग्रेसमधे गांधींच्या म्हणण्याबाहेर वागणारे नेते दिसत नाहित, राष्ट्रवादीत बिजनेसमन नसलेला नेता दिसत नाही, सेनेत डरकाळी फोडणारा नेता राहिला नाही तद्वतच मिपावर कसदार लेखन आताशा नजरेस पडत नाही.
उपमा पण राजकीय द्यावा लागत आहेत आता :)

कंजूस's picture

26 Aug 2024 - 7:52 pm | कंजूस

लेख आवडला.

यावरून आठवलं. भारतात पूर्वी नीळ बनत असे ती व निर्यात होई. मग कृत्रिम रंग बनू लागल्यावर ती प्रक्रिया मागे पडली तरी एक दोन कुटुंबे अजूनही ती करत आहेत. महाग पडते पण चालू आहे.