अभियांत्रिकीच्या पद्व्युत्तर शिक्षणासाठी जर्मनीत कसे जायचे?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
6 Jun 2017 - 11:48 am

प्रिय मिपाकरांनो,

ह्या वर्षी आमचे मोठे चिरंजीव बी.ई. इंस्ट्रुमेंटेशन होतील.

त्याला पुढील शिक्षण जर्मनीत घ्यायचे आहे.

आपल्या मिपा कुटुंबातील सदस्यांना ह्या विषयी काही माहिती असल्यास विचारावे म्हणून हा धागा प्रपंच.

आपलाच,
मुवि.

शिक्षणमाहितीचौकशीमदत

प्रतिक्रिया

ह्या लिंक वर काही माहिती मिळते का बघा. त्यांची अपॉईंटमेंट घ्या, बर्‍यापैकी माहीती मिळेल.

विजुभाऊ's picture

7 Jun 2017 - 2:13 pm | विजुभाऊ

मु वि. फोन करा.
९९२०८८४०६५

http://www.misalpav.com/node/35531

या लिंक वर हि उपयुक्त माहिती मिळेल.

सगळ्यात आधी जर्मनचा क्लास सुरू करायला सांगा. जितक्या लवकर भाषेवर प्रभुत्व मिळवता येईल तितके चांगले.

क्लास लावण्याइतपत ठीक आहे, प्रभुत्व मिळवायलाच हवं असा अट्टाहास नको. ती ऑनगोईंग प्रोसेस आहे.

बरोबर आहे. व्यवस्थित समजायला, बोलता यायला हवी असे म्हणायचे होते.

गॅरी ट्रुमन's picture

8 Jun 2017 - 4:06 pm | गॅरी ट्रुमन

इथे मी एक जनरल प्रतिसाद लिहित आहे. इन्स्ट्रुमेन्टेशन इंजिनिअरींगसाठी किंवा जर्मनीसाठी नाही तर कोणत्याही शाखेसाठी आणि कोणत्याही देशासाठी हे लिहित आहे.

माझ्या मते सगळी प्रक्रिया पुढील पायर्‍यांमध्ये पार पाडावी:

१. पदव्युत्तर पदवी ही साध्या पदवीपेक्षा अधिक फोकस्ड असल्यामुळे आपल्या पदवीच्या क्षेत्रातील नक्की कोणते विषय आपल्याला आवडतात हे नक्की करून त्या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवीसाठी प्रयत्न करायचे नक्की करावे. ही सगळ्यात महत्वाची पायरी आहे. कारण सगळे यावरच अवलंबून असते. आपल्याला एखादा विषय खरोखरच आवडतो याचे लक्षण कोणते? समजा एखाद्या विषयातील एखादी नवी गोष्ट शिकल्यावर 'अरे मला ही गोष्ट कालपर्यंत माहित नव्हती. ती गोष्ट मला आज समजली आहे' याचे एक समाधान (किंबहुना आनंद) वाटायला हवे आणि पुढे काय असेल ही उत्सुकता चाळवली गेली पाहिजे. एखाद्या विषयाविषयी असे समाधान वारंवार वाटू लागले तर तो विषय आपल्या खरोखरच आवडीचा आहे याची खात्री होईल.

२. एकदा नक्की कशात पदव्युत्तर पदवी घ्यायची हे ठरविले की मग त्या विषयाशी संबंधित चांगली विद्यापीठे कुठची याचा शोध घ्यावा. ही विद्यापीठे कुठल्याही देशात असू शकतात. त्यासाठी सगळ्या विद्यापीठांच्या त्या डिपार्टमेन्टच्या संकेतस्थळांवर जाऊन त्या विद्यापीठांमधील प्राध्यापक नक्की काय काम करत आहेत आणि ते आपल्या आवडीशी मिळतेजुळते आहे का हे बघावे. एखादे विद्यापीठ कितीही चांगले असेल तरी आपल्या आवडीच्या विषयाशी तिथे काम चालत नसेल तर तिथे अर्ज करण्यात काहीच अर्थ नाही. विद्यापीठांच्या विविध डिपार्टमेन्टच्या संकेतस्थळांच्या बाबतीत अमेरिका आणि कॅनडातील विद्यापीठे नक्कीच 'युजर फ्रेंडली' आहेत. युरोपमधील विद्यापीठांमध्ये मात्र डिपार्टमेन्टमधील प्राध्यापकांचे रिसर्च इंटरेस्ट, विविध प्रयोगशाळा, प्राध्यापकांनी लिहिलेले पेपर इत्यादी इत्यादी माहिती गोळा करायला त्यामानाने जास्त कष्ट पडतात. विविध प्राध्यापकांनी केलेले काम स्कॉलर.गुगल.कॉम या संकेतस्थळावर किंवा 'पब्लिश ऑर पेरीश' यासारख्या डेस्कटॉप अ‍ॅपमधून समजेल. https://harzing.com/resources/publish-or-perish

३. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या विद्यापीठांचा दर्जा अगदी क्षयज्ञ पासून एम.आय.टी, स्टॅनफर्ड, कॉर्नेल, बर्कले पर्यंत असतो. आपल्या प्रोफाईलसाठी नक्की कुठली विद्यापीठे टारगेट करायची याचा अंदाज घ्यावा. म्हणजे आय.आय.टीत चांगल्या ग्रेड, चांगले पेपर प्रेझेन्टेशन, चांगले प्रोजेक्ट इत्यादी गोष्टी नसतील तर स्टॅनफर्ड सारख्या विद्यापीठात प्रवेश मिळणे फारच कठिण असते. तर क्षयज्ञ विद्यापीठात नव्या मुंबईत अगदी प्रत्येक स्टेशनवर असलेल्या दोन वर्षापूर्वी सुरू झालेल्या, धड इमारती, प्राध्यापक इत्यादी काहीही नसलेल्या कॉलेजातल्या काठावर पास झालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळू शकतो. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की विद्यापीठांच्या दर्जामध्ये आणि त्यांच्यामध्ये प्रवेश मिळणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये कितीतरी फरक असू शकतो. तेव्हा आपले प्रोफाईल लक्षात घेऊन आपण या 'स्पेक्ट्रम' मध्ये नक्की कुठे आहोत हे लक्षात घेऊन त्याप्रकारे विद्यापीठांना अर्ज करावेत. यासाठी विविध फेसबुक ग्रुप, गुगल ग्रुप, https://thegradcafe.com/ यासारखी संकेतस्थळे उपयोगी पडतील. या वेगवेगळ्या ठिकाणांवरून वेगवेगळ्या ठिकाणी प्रवेश मिळणार्‍या विद्यार्थ्यांचे नक्की प्रोफाईल कसे असते त्याचा अंदाज येईल.

४. एकदा विद्यापीठे नक्की झाली की मग त्यांच्या प्रवेशप्रक्रियेप्रमाणे काय काय गोष्टी लागतात हे बघून त्या पध्दतीने तयारी सुरू करावी. अमेरिकेतल्या विद्यापीठांमध्ये स्टेटमेन्ट ऑफ परपज, लेटर्स ऑफ रेकमेन्डेशन (शिफारसपत्र), जी.आर.ई, टोफेल या परीक्षा लागतातच. त्या दिशेने तयारी सुरू करावी. माझ्या मते चांगल्या विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवायला भारतातील मार्कांबरोबरच स्टेटमेन्ट ऑफ परपज आणि शिफारसपत्रे खूपच महत्वाची असतात.

स्टेटमेन्ट ऑफ परपजमध्ये आपल्याला नक्की कोणत्या विषयात पुढचे शिक्षण घ्यायचे आहे, त्या विषयाची आवड आपल्याला नक्की कशामुळे निर्माण झाली, त्यासाठी नक्की कोणते प्रयत्न आपण केले आहेत आणि हे शिक्षण घेऊन भविष्यात काय करायची इच्छा आहे या गोष्टी लिहिणे अपेक्षित असते. म्हणजे मी सध्या 'अ' या बिंदूवर उभा आहे आणि मला 'ब' या बिंदूवर जायचे आहे. आणि या दोन बिंदूंना जोडणारा हे शिक्षण हा एक पूल आहे हे त्या स्टेटमेन्ट ऑफ परपजमधून दाखवता आले तर फारच उत्तम. तसेच अर्ज त्या विद्यापीठाकडेच का केला जात आहे म्हणजे त्या विद्यापीठाकडून आपल्याला अपेक्षित असणारे काय मिळणार आहे हे पण लिहायचे असते.

तर शिफारसपत्रांमध्ये या शिक्षणासाठी लागणारे कष्ट करायची आणि मुख्य म्हणजे ते शिक्षण घ्यायची संबंधित विद्यार्थ्याची पात्रता आहे की नाही याविषयी प्राध्यापकांनी भाष्य करणे अपेक्षित असते. अमेरिकेत तरी ही शिफारसपत्रे खूप म्हणजे खूपच गांभीर्याने घेतात. अगदी पी.एच.डी झाल्यानंतर प्राध्यापकांच्या नोकरीसाठीही ही शिफारसपत्रे विचारात घेतली जातात. त्यातही शिफारसपत्र लिहिणारा कोण आहे यावरही बर्‍याच गोष्टी अवलंबून असतात. उदाहरणार्थ शिकॅगोमधील बूथ स्कूल ऑफ बिझनेसमधून एखाद्याकडे रघुराम राजन यांचे चांगले शिफारसपत्र असेल तर त्या अर्जाला खूपच वजन प्राप्त होते हे वेगळे सांगायला नकोच. तेव्हा जितक्या अधिक नावाजलेल्या व्यक्तीकडून शिफारसपत्र घेता येईल तितके चांगले.

बहुतेक वेळा भारतीय विद्यार्थ्यांकडून या सगळ्या प्रक्रियेत पुढील चुका होतात (आणि या सगळ्या चुका मी स्वतः केलेल्या आहेत आणि माझे हात यात पोळले आहेत)

१. आपली आवड नक्की कशात असते हेच माहित नसते. इतर सगळे जी.आर.ई देत आहेत म्हणून मी ही जी.आर.ई दिली असे अनेकदा होते. वर म्हटल्याप्रमाणे आपण नक्की कुठे आहोत ('अ') आणि आपल्याला कुठे जायचे आहे ('ब' बिंदू) हेच माहित नसेल तर सगळ्या गोष्टी अंधारातला गोळीबार ठरतात.

'जी.आर.ई' हे करिअर ऑब्जेक्टिव्ह असणारे अनेक विद्यार्थी बघायला मिळतील. एकेकाळी मी पण त्यातलाच होतो. पण जी.आर.ई हे करिअर ऑब्जेक्टिव्ह असू शकत नाही. मला माझ्या आवडीच्या विषयात काम करायचे आहे म्हणून त्यादृष्टीने अमुक तमुक विद्यापीठातील तमुक तमुक प्रयोगशाळेत अबक हा प्राध्यापक काम करतो त्याच्या हाताखाली काम करायचे आहे हे मिड-टर्म करिअर ऑब्जेक्टिव्ह असू शकते. पण जी.आर.ई हे करिअर ऑब्जेक्टिव्ह कसे होईल? जी.आर.ई हे त्या उद्दिष्टापर्यंत नेणारे वाहन झाले. ते उद्दिष्ट होऊ शकणार नाही. जी.आर.ई हे करिअर ऑब्जेक्टिव्ह आहे असे म्हणणे आणि मला डेक्कन क्विनला जायचे आहे (पुण्याला नाही तर डेक्कन क्विनला) यात गुणात्मक फार फरक नाही. अजिबात अतिशयोक्ती नाही पण जी.आर.ई हे करिअर ऑब्जेक्टिव्ह आहे असे म्हणणारे अनेक विद्यार्थी बघायला मिळतात.

२. भारतात बर्‍याचदा प्राध्यापक विद्यार्थ्यालाच शिफारसपत्र लिहायला सांगतात. आपण लिहिताना एकाच प्रकारच्या भाषेचा वापर अनेकदा करतो. (त्यातून अगदी मिपावरचे ड्यु.आय.डी पकडणेही शक्य होईल :) ) त्यामु़ळे विद्यापीठातल्या प्रवेश प्रक्रियेतील लोकांना तीनही शिफारसपत्रे एकाच माणसाने लिहिलेली आहेत हे शोधून काढता येणे फार कठिण नसते. या शिफारसपत्रांना खूपच महत्व असते हे वर लिहिलेले आहेच. तेव्हा 'जेन्युईन' शिफारसपत्रे नसणे हे विद्यार्थ्याला प्रवेश नाकारायचे मोठे कारणच असते. तेव्हा प्राध्यापकांनी शिफारसपत्रे लिहायला सांगितली असली तरी आपण मुद्दे लिहून ते दुसर्‍या कोणाच्या शब्दात लिहून घेणे अधिक चांगले ठरेल.

३. मित्राचे स्टेटमेन्ट ऑफ परपज घेऊन त्यात थोडेफार बदल करून आपले स्टेटमेन्ट ऑफ परपज म्हणून खपविणे.

४. जी.आर.ई ला गरजेपेक्षा अधिक महत्व देणे. जी.आर.ई स्कोर हा पूर्ण अ‍ॅप्लिकेशन पॅकेजमधील एक भाग असतो. त्यापेक्षा अधिक महत्वाचे भारतातील मार्क, शिफारसपत्रे आणि स्टेटमेन्ट ऑफ परपज असतात. प्रत्येक विद्यापीठाची जी.आर.ई स्कोरची एक अट असते. ती पूर्ण करता येईल इतके मार्क जी.आर.ई मध्ये असले की झाले. स्टेटमेन्ट ऑफ परपज गंडलेले असेल तर जी.आर.ई मध्ये अगदी सगळेच्या सगळे मार्क आहेत या कारणावरून कोणतेही चांगले विद्यापीठ प्रवेश देणार नाही. बरेच भारतीय विद्यार्थी जी.आर.ई वर जितकी मेहनत घेतात त्याच्या १०% ही इतर गोष्टींवर घेत नाहीत. तेव्हा स्टेटमेन्ट ऑफ परपज अधिक चांगले रिफाईन करणे (म्हणजेच आपल्याला नक्की काय हवे आहे, कशाकरता वगैरेचा अधिक विचार करणे), संबंधित विषयात जास्त प्रोजेक्ट वगैरे करून प्रोफाईल अधिक चांगले बनविणे हे नक्कीच जास्त महत्वाचे आहे.

तुमच्या चिरंजीवांना शुभेच्छा. या सगळ्या गोष्टी मी माझ्या (आणि फसलेल्या) अनुभवातून लिहिलेल्या आहेत. कदाचित ही माहिती जुनी असेलही. तरीही यापेक्षा अजून काही माहिती देता आली तर तसे करायला नक्कीच आवडेल.

गॅरी ट्रुमन's picture

8 Jun 2017 - 4:12 pm | गॅरी ट्रुमन

यात एक गोष्ट लिहायची राहिली. या सगळ्या गोष्टी चांगल्या विद्यापीठांमध्ये प्रचंड महत्वाच्या असतात. पण दुसर्‍या किंवा तिसर्‍या दर्जाच्या विद्यापीठांमध्ये तितक्या महत्वाच्या नसतात. मीच माझी तीनही शिफारसपत्रे लिहिली होती आणि माझ्याच मित्राच्या स्टेटमेन्ट ऑफ परपजमध्ये थोडेफार बदल करून माझेच स्टेटमेन्ट ऑफ परपज म्हणून मी खपविले होते तरीही मला एका नॉट सो गुड विद्यापीठात प्रवेश मिळालाच होता :)

पण चांगल्या विद्यापीठांना अर्ज करताना मात्र या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत.

फार उपयुक्त माहिती. धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Jun 2017 - 11:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

अनुभवाचे बोल !

गॅरीभाऊंच्या प्रतिसादात थोडी भर (आणि काही ठिकाणी असहमती.)
_______

माझ्या व्यावसायिक क्षेत्राचा आणि विद्यापीठाचा संबंध इंजिनियरिंग आणि जर्मनी दोन्हीशी नाही. पण आमच्या क्षेत्रातली ही अग्रगण्य युनि आहे. (हे म्हणजे डाव्या पायाच्या करंगळीच्या नखाचा स्पेशालिस्ट डॉक्टर असण्यासारखं आहे, पण तरी.) तर या युनिकडे जे प्रवेश अर्ज येतात त्याच्या छाननी प्रक्रियेत माझा सहभाग असतो. हे काम उत्साहाने करण्याची दोन कारणं. एक तर युनिप्रति असलेला आदर आणि जिव्हाळा. आणि दुसरं स्वार्थी कारण म्हणजे युनितून बाहेर पडणारे विद्यार्थी हे एकाप्रकारे युनिची जाहिरात करत असतात. त्यामुळे फक्त गुणवंत विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणं हे आमच्या सगळ्यांच्याच दृष्टीने हितावह आहे.

तर प्रक्रिया अशी काहीशी असते. प्रवेशेच्छुक विद्यार्थी खालील गोष्टी अपलोड करतो:
१. शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्रं आणि ट्रान्स्क्रिप्ट्स
२. रेझ्युमे (कारण हा अनुभवी लोकांसाठीचा कोर्स आहे)
३. दोन शिफारसपत्रं (एक अ‍ॅकेडेमिक आणि एक प्रोफेशनल)
४. स्टेटमेंट ऑफ पर्पज (एसओपी)
५. इतर काही कागदपत्रं (विद्यार्थ्याला पाहिजे असल्यास)

छाननीची पहिली पायरी म्हणजे युनिची "अ‍ॅडमिशन्स टीम" सगळं तपासते. म्हणजे सगळी कागदपत्रं आहेत का, पाहिजे त्या फॉर्म्याटमध्ये आहेत का, शैक्षणिक अर्हतेचं बेंचमार्किंग (उदा० आयएलएस लॉ कॉलेजमध्ये मिळालेले ६८% आणि झंगूलाल मंगू विद्यापीठात मिळालेले ९७% यात श्रेष्ठ कोण, वगैरे.) हा मुख्यतः फॅक्चुअल असतो.

मग वरची पाच डॉक्युमेंट्स आणि अ‍ॅडमिशन्स टीमकडून आलेला रिपोर्ट मला (आणि त्या पॅनलमधल्या साताठ जणांना) पाठवला जातो. हे ब्लाईंड टेस्टिंग असतं. माझ्याव्यतिरिक्त इतर पॅनल मेंबर्स कोण आहेत हे मला माहीत नाही. त्यांचं या विशिष्ट माणसाबद्दल काय मत आहे हेही माहीत नाही. मग मी सगळं वाचून एक रिपोर्ट देतो. यात मी माझं मत मांडतो. (फॅक्ट आधीच मुक्रर झाले आहेत - त्यामुळे परत तेच तपासत बसण्यात हशील नाही.)

तिसरी पायरी म्हणजे आमच्या युनिमधले प्राध्यापक अ‍ॅडमिशन्स टीमचा रिपोर्ट आणि या 'मतप्रदर्शक पॅनल'चा रिपोर्ट हे सगळं घेतात आणि फायनल निर्णय घेतात. (तो निर्णय मला कळवला जात नाही. आपलं काम पाणी घाल म्हटलं की पाणी घालायचं - काय लोंबतंय ते विचारायचं नाही.)

___________

तर माझ्या बाजूने मी ज्या गोष्टी बघतो, ज्या डोक्यात जातात त्या पुढीलप्रमाणे:

१. सातत्यः एसओपीमध्ये आपल्याला या विषयाचं किती प्रेम आहे याचे लय गोडवे गायलेले असतात, पण बाकी कुठल्याच कागदपत्रांत ते जाणवत नाही. तत्संबंधी विषयांत मार्क कमी असतात, नंतरचा व्यावसायिक अनुभव भलत्याच क्षेत्रात असतो, विषयाशी संबंधित कॉन्फरन्स अटेंड केलेल्या नसतात, काही लेखन केलेलं नसतं, या विषयांमध्ये रुची आहे असं शिफारसपत्रांत म्हटलेलं नसतं. अशा स्थितीत हा मनुक्ष या कोर्समधून सुखरूप सुटेल याची खात्री वाटत नाही. त्यामुळे, आपली सगळी कागदपत्रं एक सातत्यपूर्ण स्टोरी सांगणं गरजेचं आहे. फक्त एसोपी किंवा फक्त शिफारसपत्रं यांकडे सुट्टं सुट्टं न बघता साकल्याने बघायला पाहिजे.

२. जडजंबाल भाषा: भाऊ - मला इंग्रजी येतं. मोठे शब्द अंगावर फेकून मारलेस तर तू भारी ठरत नाहीस. शशी थरूर ष्टेल "Exasperating farrago of distortions" वाली भाषा आली की त्यावरून त्वरित नजर घसरते. जे काही सांगायचंय ते साध्या भाषेत सांग राव.

३. ढापलेली एसोपी: गॅरीभाऊंशी पूर्ण सहमत आहे. ढापाढापी लगेच लक्षात येते. आणखी एका प्रकारची ढापाढापी असते. त्याबद्दल खाली लिहितो.

४. अर्धवट तयारी / निष्काळजीपणा: शिफारसपत्रं आणि विशेषतः एसोपी किमान तीनशे वेळेला वाचावी आणि वॉचमनपासून ते मित्राच्या दूरच्या काकांपर्यंत सगळ्यांकडून वाचवून घ्यावी. त्यात टायपो, चमत्कारिक वाक्यरचना, वाईट फॉर्म्याटिंग असणं हे महत्पाप आहे. ते दर्शवतं की तुम्ही सिरियस नाही आहात. एका युनिची एसोपी दुसर्‍या युनिला खपवू नये. (मी वाचलेल्या एका एसोपीत "बॉस्टनमध्ये राहून माझी क्षितिजं कशी विस्तारतील" यावर एक परिच्छेद होता. आमची युनि युरोपात आहे.) if you are failing to prepare, be prepared to fail हे लक्षात ठेवावं.

५. शिफारसपत्रं: शिफारसपत्रं कायम जेन्युईन असावीत. ज्यांच्याबरोबर खूप काम केलंय त्यांच्या शिफारसपत्राला जास्त वजन दिलं जातं. ते शिफारसपत्र फक्त रघुराम राजन यांच्याकडून आलं आहे म्हणून नाही. (कदाचित ररा त्या विद्यार्थ्याच्या पप्पांचे मित्र असतील आणि मित्रकर्तव्य म्हणून ते दिलं असेल. अशा परिस्थितीत त्याची किंमत काहीही नाही.)

गॅरी ट्रुमन's picture

9 Jun 2017 - 2:16 pm | गॅरी ट्रुमन

जडजंबाल भाषा:

याचे कारण आहे. जी.आर.ई परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी साडेतीन-चार हजार इंग्लिश शब्द केले असतात (अनेकांनी रट्टा मारला असतो). तो मोड नंतरची चालूच असतो :) जी.आर.ई परीक्षेनंतर इंग्रजी शब्दांच्या वापरात कसा फरक पडतो याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे:

१. सामान्य माणूस म्हणतो: birds of same feather flock together तर जी.आर.ई चा विद्यार्थी म्हणतो: members of avian species with identical plumage tend to congregate.

२. सामान्य म्हणतो: don't cry over spilt milk तर जी.आर.ई चा विद्यार्थी म्हणतो: it is futile to get lachrymose over precipitately decanted lacteal fluid इत्यादी इत्यादी

ज्यांच्याबरोबर खूप काम केलंय त्यांच्या शिफारसपत्राला जास्त वजन दिलं जातं. ते शिफारसपत्र फक्त रघुराम राजन यांच्याकडून आलं आहे म्हणून नाही.

शिफारसपत्रे जो मनुष्य आपल्या कामाविषयी आणि पात्रतेविषयी टिप्पणी करू शकतो अशा माणसाकडूनच घेणे अपेक्षित असते. उगीच काकाच्या मामाकडून शिफारसपत्रे घेऊन (जर तो आपल्या कामाविषयी आणि पात्रतेविषयी टिप्पणी करू शकत नसेल तर) काहीच उपयोग नाही. त्यात शिफारस करणारा माणूस जर त्या क्षेत्रात खूप नावाजलेला असेल तर नक्कीच फरक पडतो. रघुराम राजन मला शिफारसपत्र देऊ शकणार नाहीत कारण ते मला ओळखत नाहीत त्यामुळे ते माझ्याविषयी काहीच टिप्पणी करू शकणार नाहीत. पण एखाद्याबरोबर काम केले आहे अशा दोन व्यक्ती असतील--- एक रघुराम राजन आणि दुसरे गल्लीतल्या कॉलेजात आयुष्यात इतर काही करता आले नाही म्हणून प्राध्यापक बनलेला मनुष्य तर त्या दोन शिफारसपत्रांमध्ये रघुराम राजन यांच्या शिफारसपत्राला कितीतरी जास्त गांभीर्याने घेतले जाईल हा उद्देश आहे. मी इंजिनिअरींगमधला एक नंबरचा बत्थड पी.एच.डी विद्यार्थी होतो आणि मला पी.एच.डी झेपली नव्हती म्हणून पी.एच.डी सोडून पळून आलो होतो हे मी मिपावर लिहिलेच आहे.तरीही मला पी.एच.डी ला प्रवेश मिळालाच होता. त्यावेळी अर्ज करताना एम.एस च्या एका प्राध्यापकांना मला पी.एच.डी प्रवेशासाठी शिफारसपत्र द्याल का असे विचारले होते. तेव्हा त्यांनी "I don't think I know you well enough to be able to write a Recommendation Letter for you" असेही सांगितले होते. तेव्हा शिफारसपत्र लिहिणार्‍या माणसाने संबंधित विद्यार्थ्याला प्रोफेशनली ओळखले पाहिजे ही अट असतेच.

जर्मनीत फिरताना हायडेलबर्गमधे ती सुंदर नदी अन तो युनिव्हर्सिटी रोड पाहिला आणि जितका भटकलो तितका त्या स्वप्नवत् गावाच्या प्रेमात पडलो. जरुर पाठवा पोराला जर्मनीतल्या हायडेलबर्गमधे...