महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे. तपस्येच्या काळात संसारीक अडचणी नकोत व साधनेत कुणाचा व्यत्यय नको यासाठी बर्याच संतानी गिरीशिखरांचा किंवा कुहरांचा आश्रय घेतलेला दिसतो. योगी चांगदेवानी हरिश्चंद्रगडावर तप केले, एकनाथांचे गुरू जनार्दन स्वामी देवगिरी किल्ल्यावर किल्लेदार होते, गोरखनाथांनी गोरखगडावर तप केले असे मानले जाते, तुकारामांनी भंडारा डोंगरावर तप केले, तर रामदासांच्या निरनिराळ्या घळी प्रसिध्द आहेतच, पण त्यांनी समाधीही सज्जनगडावर घेतली. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मणदुरे गावचे श्रीपाद पाटणकर म्हणजेच गगनगिरी महाराज, जेव्हा दॄष्टांत झाला, तेव्हा तप करण्यासाठी योग्य जागा शोधू लागले, त्यांना अपेक्षित एकांत एतिहासिक गगनगडावर भेटला. पुढे दाजीपुर जंगलात काही काळ तप केले, जे शिवगडाच्या भेटीत आपण पाहिले, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील, राजापुर तालुक्यातील आंबोळगडा जवळ एका कोरीव गुंफेतही त्यांनी तप केले. आज त्याठिकाणीहि आश्रम आहे. अर्थात यामूळे काहीश्या दुर्लक्षित अशा गगनगडावर अनेक बांधकामे उभारली गेली, भक्तगणांची गर्दी वाढू लागली, यात गडाचे गडपण मात्र गेले. तरिही थोडेफार अवशेष आजही अस्तित्व दाखवित उभे आहेत, चला तर आज जाउया गगनगडावर.
गगनगिरी महाराजांमुळेच गडाला गगनगड नाव पडले असा गैरसमज आहे, परंतु आहे उलटे. करवीर प्रांतातून दळण वळणाच्या सोयीसाठी कोकणात जे घाट उतरतात, त्यात करूळ घाट आणि भुईबावडा घाट हे महत्वाचे घाटमार्ग. पैकी करूळ घाट तुलेनेने सोपा आहे. या घाटावर देखरेख करण्यासाठी गगनगडाची उभारणी विक्रमादित्य भोज शिलाहारानी (दुसरा ) सन ११७८ ते १२०९ दरम्यान बांधला. कोल्हापुर परिसरात त्याने जे पंधरा किल्ले उभारले त्यापैकी हा एक. पुढे सिंदण यादवाने भोज राजाचा १२०९ मधे पराभव करुन हा भाग यादवांच्या अमंलाखाली आणला. नंतर बहामनी साम्राज्याचा हिरवा ईथे फडकला. मात्र बहामनी राजवटीचे तुकडे झाल्यानंतर इथे आदिलशाही राजवट सुरु झाली.
पुढे शिवाजी महाराजांच्या ताब्यात हा किल्ला कधी आला याची नोंद नाही. पण कोल्हापुरपासूनचे जवळ अंतर व सोप्या घाटवाटा यावरून १६५९ ते १६६६ दरम्यान महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेउन त्याची दुरुस्ती केली. यानंतर हुकुमतपन्हा रामचंद्रपंत आमात्य यांच्या स्वामी निष्ठेवर प्रसन्न होउन छ्त्रपती राजाराम महाराजांनी गगनगड किल्ला व गगनबावड्याची जहागिरी त्यांना बहाल केली. स.न. १८१८ ला मराठ्यांचा प्रतिकार खर्या अर्थाने संपून महाराष्ट्रावर ईंग्रजाचा अंमल सुरु झाला. मात्र अचानक १८४४ ला गगनगड, सामानगड यांच्या गडकर्यानी बंड केले, त्याचा प्रतिकार करताना ईंग्रजानी तटबंदीची बरीच पाडापाड केली. त्यानंतर गडाची बरीच वस्ती गगनबावडा गावात येउन राहू लागली.
सध्या कोल्हापुरातून कोकणात उतरायचे म्हणजे अत्यंत सोपा व कमी वेळेचा मार्ग म्हणजे करुळ घाट. त्यामुळे यामार्गे बर्याच एस. टी. बस जातात सगळ्या बस चहा पाण्यासाठी इथे थांबतात. खवय्यांसाठी महत्वाचे म्हणजे इथल्या स्टँडच्या कँटिनचा "कट वडा" आख्या होल ईंडियात फेमस आहे, त्याचा जरुर आस्वाद घ्या. गगनबावड्याला महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणतात. तब्बल ६५० इंच पाउस ईथे पडतो. ढग संपुर्ण गडावर उतरलेले असतात. घाटातल्या प्रत्येक वळणावर फेसाळणारे धबधबे पडत असतात. अर्थात यावेळी गडदर्शन मात्र मनासारखे होत नाही. म्हणून एका निवांत दिवशी मी गगनगडाचा बेत आखला. काळ, प्रत्येक विवाहीत पुरुषाला थोडीफार मानसिक शांतता लाभते तो, म्हणजे अर्थातच मे महिना होता. सौ माहेरी गेल्यामुळे घरात शांतपणे बसणे शक्यच नव्हते. मस्तपैकी बाईक काढली आणि तांदुळवाडी जवळचा बहादुरवाडीचा भुईकोट पाहून कोल्हापुरामधे न जाता, थेट रंकाळामार्गे गगनबावडा रस्त्याने निघालो. पहिले लक्ष्य होते, "पळसंब्याची मंदिरे". विचारत विचारत फाट्यावर पोहचलो, तो एक महाविध्यालयीन तरूण चालत गावाकडे चालला होता, त्याला पळसंब्यात सोडले आणि मंदिराकडे जाणारा रस्ता विचारून घेतला.
हा भाग जरी कोल्हापुर जिल्ह्यात येत असला, तरी कोकणचा प्रभाव ईथे जाणवतो. सगळी जमीन जांभ्या दगडाच्या मातीमुळे तांबडी होती. जांभळाच्या झाडाखाली बियांचा सडा पडला होता, तर फणसाच्या झाडावर बाळ फणस लटकले होते.
गाडी रस्ता खुप जवळ जाउन थांबतो, गाडी पार्क केली आणि पायर्या उतरून ओढ्याकडे निघालो.
ओढ्याच्या पात्रात पुर्ण उतरून गेलो तो समोर आलेल्या दृष्याने थक्कच झालो. समोर अखंड खडकात कोरलेलं मंदिर दिसत होत.
वास्तविक ओढ्यात वाहून आलेल्या प्रचंड मोठ्या शिळांना कोरून हि मंदिरे तयार केली होती. श्रावणात आणि महाशिवरात्रीला ईथे जत्रा भरते.
तामिळनाडूमधे मालल्लापुरम ईथली एकाच अखंड पाषाणात कोरलेली मंदिरे जगप्रसिध्द आहेत, मात्र याच प्रकारची पाषाण मंदिरे महाराष्ट्रात आहेत हे अनेकांना माहिती नाही. मालल्लपुरम ईथली मंदिरे वालुकाश्मात म्हणजे सँडस्टोनमधे असल्याने बारीक कोरीवकाम शक्य झाले आहे, मात्र पळसंब्याची मंदिरे बेसाल्ट्मधे कोरल्याने , बेसाल्टच्या अंगभूत काठीण्याने फार कोरीवकाम करता आलेले नाही, तरीही या मर्यादेत राहून जे काही केले आहे ते अफलातून आहे.
यामंदिरांमधे मुर्ती मात्र नाही. अशी तिन मंदिरे एकवर एक आहेत. हि मंदिरे कोणी उभारली आहेत आणि ती इथेच का? याचा मात्र उलगडा होत नाही.
मधेच दगडाच्या कपारीत हे शिवलिंग आहे. ईथला गारवा आणि वातावरण पहाता थोड जपून वावरणे आवश्यक आहे नाहीतर एकाद्या सर्पराजाची गाठ पडायची.
शिवाय दगडावर या पादुका कोरल्या आहेत.
एक अनोखे आणि सर्वसामान्य पर्यटकांपासून दुर असलेल ठिकाण बघून मी निघालो गगनगडाकडे. ईथली निरव शांतता आणि स्वच्छ परिसर पाहून ईथे धुडघुस घालणार्या आणि सेल्फी छाप मडंळीची वक्रदृष्टी न पडो व असा निसर्ग असाच राहो अशी व्यक्त करून मी पुन्हा कोल्हापुर - गगनबावडा रोडवर आलो. अर्ध्या-पाउण तासातच मी स्टँडवर पोहचलो. जवळच्या एका हॉटेलमधे भोजन घेतले. गगनबावड्याला कोकणात जाणार्या गाड्या स्टॉप घेतातच कारण यानंतर असणारा घाट आणि नंतर लगेच मोठे गाव नाही, त्यामुळे ईथे गाड्या आणि माणसे तब्येती तपासून घेतात. गावातून डांबरी सडक थेट गडापर्यंत जाते.
एक दोन वळणे घेतली कि सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटावलेला गगनगड दर्शन देतो. ईथे पडणार्या महामुर पावसाने रस्ते खराबच आहेत. गड पायथ्याला आपले चारचाकी किंवा दुचाकी पार्क करुन पायर्यांच्या मार्गाने गडदर्शन करायला निघूया. गड सध्या गगनगिरी महाराजांच्या मठाच्या ताब्यात असल्याने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंतच ये जा करण्यास खुला असतो.
पार्किंगच्या जागेपासूनच मठाची ईमारत दिसते.
मुळ दरवाजा नामशेष झाला असला तरी हे नवीन महाद्वार उभारेलेले आहे.
ईथून आत शिरल्यानंतर महिषासुराचे मंदिर दिसते. समोर त्याचे वाहन रेड्याची मुर्ती दिसते. हे मंदिर ईथे का? हे ही एक गुढच आहे. असो. पायर्या चढून वर आलो. कि समोर गगनमहाराजांनी तप केलेली प्रचंड गुहा समोर दिसते. आतमधे बर्याच मुर्ती आहेत. मात्र फोटो काढायला परवानगी नाही. दर्शन घेऊन पुन्हा पायर्या चढून आपण माची सारख्या सपाटीकडे निघतो.
वाटेत डावीकडच्या दगडावर हा शिलालेख दिसतो. प्रयत्न करूनही याचा अर्थ मला उलगडला नाही.
पुढे सपाटीवर भव्य दत्तमंदिर उभारले आहे. उजव्या बाजुला भक्तनिवास आहे. मठाधिकार्यांच्या परवानगीने आपण तिथे राहू शकतो.
मंदिरात मागे दत्तगुरुंची मुर्ती व पुढे गगनगिरी महाराजांची तप करताना बैठी मुर्ती सुंदर आहे.
दर्शन मागच्या बाजुला गेलो तर समोर हि तोफ दिसली. तोफेवरचे सिंह नंतर बसविले असावेत.
ईथून खालचा तपगुंफेचा परिसर दिसत होता.
मंदिराच्या एका कोपर्यात गगनगिरीमहाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. घोड्याचे दोन्ही पाय उंचावले आहेत. अश्वारूढ मुर्ती कशी असावी याचे परदेशात काही संकेत पाळले जातात. आपल्याकडे मात्र हा विचार होत नाही.
पुढे सपाटीवर डाव्या बजूला ध्यान मंदिर आहे आणि उजव्या बाजुला प्राचीन महादेव मंदिर आहे. याठिकाणी भक्तगण खायला देत असल्यामुळे हि वानरसेना जमा झालेली होती.
ईथून पुढे आपण जाणार आहोत खर्या एतिहासिक महत्व असणार्या गगनगडाकडे. कारण महाराजांच्या वस्तव्यामुळे आणि सध्याच्या मठामुळे गड जागता, स्वच्छ राहिला आहे व व्यवस्थित साफसफाईही ठेवली जाते आहे तरी याभागाचे गडपण मात्र गेले आहे.
पुढे चालायला सुरवात केली कि डाव्या बाजुला हि तटबंदी दिसते.
त्यानंतर पायर्या चढून आपण बालेकिल्ल्याकडे जातो.
बालेकिल्ल्याचा हा बुरुज अजून कसाबसा तग धरून उभा आहे.
पायर्यांची वाट उध्वस्त दरवाज्याच्या कमानीतून आत जाते.
वर आल्यानंतर किल्लेदाराच्या वाड्याचा चौथरा दिसतो.
निशान बुरुज बर्या अवस्थेत आहे.
हे आहे नवनाथांपैकी गैबीनाथांचे समाधी मंदिर. याला गैबी पिराची कबर म्हणून ओळखतात. हि अशीच आक्रमणे आपल्याच देवदेवतांवर आपण पचवित आलो आहोत. मंलगगडाचे मलंगनाथ असोत, लोहगडावरचा दर्गा असो कि शनिवार वाड्याची शेखसल्ल्याची कबर असो, हिंदु देवताना चक्क बाटवून त्यांचे धर्मांतर केलेले दिसते.
यानंतर आणखी एक मंदिर आहे "विठ्ठलाई देवीचे मंदिर".
याशिवाय हि बांधीव विहीरही पहाण्यास मिळते.
गडावरुन बाकीचे किल्ले दिसत नाहीत, दक्षिणेला दाजीपुर अभयारण्य दिसते. याच बाजुला "मोरजाई गड" दिसतो. तिथे जायचे म्हणजे गगनबावडा- राधानगरी" रस्त्यावरच्या बोरबेटला जायला हवे. वर मोरजाई देवीचे मंदिर आहे.
हा सर्वोच्च माथा जवळ जवळ अडीच हजार फुट उंच आहे. चोहोबाजुला कोकणचे अतिशय विहंगम दृष्य दिसते. भर्राट वारा सर्व शीण हलका करतो.
तळात दक्षिण बाजुला वैभववाडीकडे जाणारा करूळ घाट दिसतो.
तर उत्तरेला खारेपाटणला उतरणारा हा भुईबावडा घाट. पावसाळ्यात ढग ईथे उतरलेले असताना दृष्य अफलातून असते.
गगनगडावर असणार्या दळणवळणाच्या सोयी , गडावर असलेली रहायची व्यवस्था आणि वर्दळ यामुळे वर्षभरात केव्हाही आणि कोणत्याही ॠतुत जाता येईल.
गडफेरी करून खाली आलो. मोरजाईगडावर जायचा बेत होता, पण गावात पोहचे पर्यंत ट्पोरे थंब पडु लागले, म्हणून फिर कभी असा विचार करून गुमान कोल्हापुर रोडला लागलो.
वाटेत बावडेकर सरकारांचा हा बंगला पाहिला. महेश कोठारे दिग्दर्शित आणि भरत जाधव, श्रेयस तळपदे, दिलीप प्रभावळकर यांची भुमिका असणारा "पछाडलेला" या मराठी चित्रपटात तुम्ही हा पाहिला असेलच. पावसाने कॅमेरा बाहेर काढू दिला नाही, त्यामूळे आंतरजालावरचा फोटो टाकला आहे.
तुफान पावसाला सुरवात झाली. मात्र बर्याच दिवसानी लाडक्या सह्याद्रीचा सहवास लाभला होता. त्यामूळे खुषीतच रस्ता संपला आणि नखशिखांत चिंब भिजून घर गाठले, ते पुढच्या ट्रेकचे प्लॅनिंग करूनच.
गगनगडाचा नकाशा.
गगनगड परिसराचा नकाशा.
संदर्भग्रंथः-
१ ) कोल्हापुर जिल्हा गॅझेटीयर
२ ) शिवछत्रपतीच्या दुर्गाचां शोध -सतीश अक्कलकोट
३ ) डोगंरयात्रा- आनंद पाळंदे
४ ) कोल्हापुर जिल्ह्याचे दुर्गवैभव- भगवान चिले
५ ) करवीर रियासत- स.मा.गर्गे
६ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
प्रतिक्रिया
2 Jun 2017 - 4:24 pm | सूड
नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख!!
उदाहरणार्थ?
2 Jun 2017 - 7:53 pm | दुर्गविहारी
मी वाचलेल्या माहीतीनुसार अश्वारूढ व्यक्तीच्या पुतळ्यात जर घोड्याचे दोन्ही पाय उंचावले असतील तर ती व्यक्ती रणांगणात वीरगती प्राप्त झालेली असते. एकच पाय उंचावलेला तर रणांगणात जखमी आणि नंतर कालांतराने मृत्यू आणि चारही पाय टेकवलेले असतील तर नैसर्गिक मृत्यू. पण इथे गगनगिरी महारांजाच्या पुतळ्यात घोड्याचे दोन्ही पाय उंचावलेले आहेत. मागे मी बहुतेक मिपावरच असा काही धागा वाचलेला आठवतोय.
2 Jun 2017 - 5:53 pm | स्वच्छंदी_मनोज
नेहेमीप्रमाणे मस्तच आणि माहीतीने खचाखच भरलेला लेख..अतीशय उत्तम चाललीय हे लेखमाला.
2 Jun 2017 - 7:47 pm | दशानन
आई शप्पथ, तुम्ही माझे शालेय जीवन माझ्या समोर ठेवले ही, आमच्या नुमावीची सहल किमान तीनदा झाली इकडे.
2 Jun 2017 - 10:32 pm | एस
खूपच छान. करूळघाट उर्फ गगनबावडा घाट खूप सुंदर आहे आणि सुस्थितीत आहे. घाट चढून वर आलो की पळसांब्यापासून ते थेट कोल्हापूरपर्यंत रस्ता बेकार आहे.
2 Jun 2017 - 11:03 pm | यशोधरा
गगनबावडा अगदी आवडता घाट. अतिशय नयनरम्य. सुरेख लिहिलेत दुवि.
3 Jun 2017 - 2:37 am | निशाचर
हा भागही आवडला.
5 Jun 2017 - 10:02 am | प्रचेतस
करुळ घाटातून कोकणात जात असता हा किल्ला घाटवाटेच्या रस्त्याने दुरुनच पाहिला होता.
गडाचे जुने अवशेष छान आहेत. आश्रमामुळे मात्र गडाचं गडपण गेलंय.
5 Jun 2017 - 12:45 pm | किसन शिंदे
करुळ कि करोल घाट.
करुळ घाटातून कोकणात जात असता हा किल्ला घाटवाटेच्या रस्त्याने दुरुनच पाहिला होता. +१
5 Jun 2017 - 2:39 pm | प्रचेतस
करुळ.
घाट उतरल्यावर लगेच करुळ गाव लागतं.
माझे आवडते लेखक मधु मंगेश कर्णिकांचं ते गाव.
8 Jun 2017 - 10:47 pm | यशोधरा
करुळ गाव सुंदर आहे अगदी!
5 Jun 2017 - 4:56 pm | पाटीलभाऊ
नेहमीप्रमाणेच मस्त