पालघर डोंगररांगेतला सर्वात उत्तरे कडला किल्ला "असावा" बघण्याचा प्लॅन केला. आज सोबत कोणीच नव्हते, त्यामूळे एकला चालो रे ला पर्याय नव्हता. बोईसर स्टेशनला उतरलो आणि पुर्वेकडे नजर गेल्यानंतर सपाट माथ्याच्या डोंगराचे दर्शन झाले. हाच असावा गड असणार याची खुणगाठ बांधून स्टेशन बाहेर आलो आणि चिल्हार फट्याकडे जाणारी सहा आसनी रिक्षा पकडली आणि निघालो आणखी एका मोहिमेवर. किल्ला पुर्वेला असला तरी चिल्हार फाट्याकडे जाणार्या बस किंवा सहा आसनी रिक्षा बोईसर पश्चिमेकडुन सुटतात हे ध्यानात ठेवावे.
असावा किल्ल्याला यावयाचे झाले तर दोन मार्ग आहेत. १ ) मुंबई - अहमदाबाद रेल्वेरूट्वर धावणार्या पॅसेंजरने किंवा विरार - डहाणु लोकलने बोईसरला ( पश्चिम ) उतरायचे व चिल्हारकडे जाणार्या बस किंवा ट्मटमने वरांगडा गावी उतरायचे.
२ ) बसने यायचे असेल तर मुंबई - अहमदाबाद हायवे वरून मनोरनंतर चिल्हार फाट्यावरून डाव्या बाजुला वळायचे व सुर्यानदीवरचा पुल ओलांडला कि वरांगडा गाव लागते.
रिक्षात बसल्या बसल्या परिसराकडे नजर गेली आणि इथल्या दुर्ग उभारणीचे कारण समजले. प्राचीन डहाणु ( किंवा नाशिक लेण्यातील शिलालेखात उल्लेख केल्याप्रमाणे डहाणुका बंदर ) बंदर व सागवानी जंगलाचे वैभव मिरविणारा प्राचिन अशेरी गड यांच्यातील व्यापारावर नजर ठेवण्यासाठी एका लष्करी ठाण्याची गरज होती आणि हे ओळखून माहिमच्या बिंब राजाने या गडाची निर्मीति केली असे मानले जाते. १०७० फूट ( समुद्रसपाटीपासून ३५० मी )उंचीच्या या गडाचा ताबा पुढे पोर्तुगीज राज्यवटीकडे आला. शिवकाळातही याच्यावर पोर्तुगीजांचा ताबा होता. पुढे संभाजी महारांज्याच्या काळात १६८३ मधे हा किल्ला मराठ्यानी घेतला, मात्र पोर्तुगीजानी लगेचच त्याचा ताबा मिळविला. त्यानंतर चिमाजी अप्पाच्या वसई मोहिमेत १७२७ मधे हा किल्ला घेउन या भागातल्या पोर्तुगीज सत्तेचा कायमचा शेवट केला. शेवटी १८१८ मधे ईतर किल्ल्यांप्रमाणे कॅप्टन डिकीन्सनने याचा कायमचा ताबा घेऊन युनियन जॅक फडकविला. याला असावा तसेच विसावागड असाही काही ठिकाणी उल्लेख आढळतो.
हा इतिहास मनात घोळवित मी वरंगडा या गावी उतरलो. इथे एम. आय. डी. सी. आहे त्यामुळे बर्याच कंपन्याच्या शेड दिसतात. त्यापैकी विराज प्रोफाईल लि. या फॅक्टरीजवळून चालायला सुरुवात केली. महागाव कडूनही या किल्ल्यावर जाता येते, पण ते थोडे लांब पडते. वरांगड्यामधून बारीपाडा हि छोटी आदिवासी वस्ती गाठायची . इथे सुर्या नदीचा कॅनोल आलेला आहे, या कॅनोलवर तीन पुल आहेत. या तिनही पुलावरून गडावर जाण्यासाठी वाटा आहेत.
१) सगळ्यात पहिल्या पुलावरून वाट जाते ती किल्ला आणि शेजारची डोंगरसोंड यांच्या मधल्या घळीतून वर चढते, हा शॉर्ट्कट आहे पण यासाठी स्थानिक वाटाड्या सोबत हवा. सकाळी सकाळी या मंडळींची कालची उतरल्याची खात्री नसल्याने तो पर्याय बाद केला.
२ ) दुसर्या पुलावरून जाणारी वाट थेट डोंगर्सोंडेवर चढून माथ्याजवळ पोहचविते. मात्र या दोन्ही वाटा पावसाळ्यात टाळाव्यात. या वाटांनी आपण अवघ्या पाउण तासात गडावर पोहचतो, पण सोबत माहितगार असेल तरच.
३) बारीपाड्यातुन गडाकडे पाहिल्यास डावीकडे कातळ्माथा दिसतो तर समोर एक लांब डोंगररांग आडवी पसरलेली दिसते. आपल्याला या डोंगरसोंडेवर आधी चढाई करायची आहे हे लक्षात ठेवायचे. यासाठी तिसर्या पुलावरून कॅनोल ओलांडुन सरळ शेताडीतुन एक वाट उजवीकडे डोंगरावर चढत गेलेली दिसते, नंतर हिच वाट डावीकडे म्हणजेच पुर्वेकडे वळून गडमाथ्याच्या दिशेने जाते. आधी एक टेकडी लागते, इथे दुसर्या पुलावरून आलेली वाट मिळते. इथून समोरच गडमाथा दिसु लागतो. मस्त गर्द झाडीतून चढण्यार्या ह्या वाटेने गेल्यास १ ते १.५ तासात आपण गडावर पोहचतो. या वाटेने यावयाचे असल्यास वाटाड्या नसला तरी चालेल इतकी ठळक आहे.
किल्ल्याचे गावातुन होणारे प्रथम दर्शन
हा कॅनोलवरचा तिसरा पुल
हि डोंगरसोंडेवरची ठळक पायवाट, लांबवर असावागडाचे शिखर दिसत आहे.
वाट चढून या टेकडीवर येते
सुरवातीला तटबंदीचे हे अवशेष दिसतात. वर पोहचल्यानंतर बरीच सपाटी नजरेला पडते.
यातुन प्रवेश केल्यानंतर मध्यभागी एका इमारतीचा चौथरा दिसतो. हे किल्लेदाराचे घर असावे.
ह्याच्या कडेने पुढे जाउया.
तसेच थोडे पुढे म्हणजे उत्तरेला गेल्यानंतर कातळ सपाटीला असलेल्या उताराचा फायदा घेउन दोन कातळ कोरीव टाकी एका खाली एक येतील अशी बांधली आहेत. वरच्या टाक्यातून खालच्या टाक्यात ओव्हरफ्लो झालेले पाणी वाहून जावे यासाठी चॅनेल तयार केला आहे.
शिवाय पावसाळ्यात खडकावरून पाणी वाहून येताना, बरोबर असलेला गाळ टाक्यात पडू नये यासाठी खडकातच असे कोरीव खड्डे पहाण्यास मिळतात.
यानंतर या किल्ल्याचे वैशिठ्य म्हणजे उत्तर टोकाशी असलेला हा अर्धा बांधीव व अर्धा कोरीव हौद. बहुधा किल्ला बांधताना, किल्ल्याच्या ह्या बाजुला असणार्या नैसर्गिक कपारीचा वापर करून बराचसा भाग कोरुन आणि जिथे आवश्यक आहे तिथे भिंत बांधून हा प्रंचड हौद उभारला आहे. हा पावसाळ्यात एकदा भरल्यानंतर वर्षभर किल्ल्याची तहान भागवत असणार. हा हौद हे किल्ल्याचे मुख्य आकर्षण आहे. सहसा पुर्ण बांधीव तरी किंवा पुर्ण कोरीव अशी टाकी पहाण्यास मिळतात. ( अपवाद - रायगडावरचा हत्ती तलाव)
मात्र सध्या त्याची एका बाजुची भिंत थोडी पडली आहे,
तिथून पाण्याची गळती होत असल्याने हौद नंतर कोरडाच रहातो.
इथुन खालच्या बाजुला आपण आलेले वरांगडा गाव व एम.आय.डि.सी.मधल्या कंपन्या दिसत असतात. हवा स्वच्छ असेल तर पश्चिमेला डहाणू , बोईसरचा परिसर दिसतो, इशान्येला अशेरी, दक्षिणेला काळदुर्ग व देवखोप तलाव दिसतो तर नैरुत्येला पालघर परिसर दिसतो. पुर्वेला लांबवर सुर्या नदी व पायथ्याशी गुंडाळे गाव व पाझर तलाव दिसतो. तसेच सध्या प्रसिध्द झालेले मैत्रेय समुहाचे "मामाचा गाव" दिसते. किल्ल्यावर रहाण्याची किंवा खाण्याची काहीही सोय नसली तरी त्याबाजुने खाली उतरुन ( नकाशात हा रस्ता दाखविला आहे ) या मामाच्या गावाचा पाहुणचार घेता येतो. (त्यासाठीचे संपर्क क्रमांकः- (022) 65008724, 26630044, Mob: 9619878500, 9619878400, 8652776611 )
ह्या मानव निर्मित वास्तु पाहिल्यानंतर एक निसर्गाचे आश्चर्य बघुया.
यासाठी हौदासमोरुनच पुर्वेला वाट खाली उतरते.
काही पहारेकर्यांच्या देवड्याचे चौथरे
कातळात कोरलेल्या पायर्यांवरून जपुन उतरावे. पावसाळ्यात हा मार्ग टाळलेलाच बरा.
थोडे खाली उतरल्यानंतर "गणेश गुंफा" म्हणुन ओळखली जाणारी हि प्रचंड गुहा नजरेस पडते. हवा असल्यास इथेही मुक्काम करता येतो.
किती प्रचंड गुहा आहे बघा ही
मामाचा गाव या रिसॉर्टपासून दिसणारा असावागड
हि गुहा बघून झाल्यानंतर एक तर आल्यामार्गे परत जाऊ शकतो किंवा याच वाटेने पुढे उतरून मामाच्या गावाचा पाहुणचार घेउन तसेच बोईसर - चिल्हार रस्त्याला पोहचून ट्रेक पुर्ण करता येईल.
असावा किल्ल्याचा नकाशा
असावा गड परिसराचा नकाशा
पालघर डोंगररांगेचा हे गुगल मॅपवरून घेतलेला अफलातून फोटो. यात तांदुळवाडी, काळदुर्ग व असावा तिन्ही किल्ले दिसत आहेत.
नव्याने झालेल्या पालघर जिल्ह्यातले पाच किल्ले आपण पाहिले. याशिवाय बल्लाळगड, सेगवाह, कण्हेरी, तांदुळवाडी, टकमक हे डोंगरी किल्ले तर डहाणु , तारापुर, माहिम, शिरगाव, केळवे, भवानगड, दंडा हे सागरी किल्ले बघायचे आहेत. पण वर्णनातला तोच तोच पणा टाळण्यासाठी राहिलेल्या या किल्ल्यांची माहिती मी पुन्हा केव्हा तरी लिहीन.
पुढच्या आठवड्यात आपण जाणार आहोत वसईजवळच्या तुंगारेश्वराच्या जंगलात. कामणदुर्ग उर्फ कामण्या.
या किल्ल्याच्या निमीत्ताने इतकेच म्हणेन कि आतापर्यंत या लेखमालिकेला मिपाकरांनी छान प्रतिसाद दिला आहे, असाच लोभ या पुढेही "असावा".
प्रतिक्रिया
28 Apr 2017 - 6:27 pm | यशोधरा
वा, वा सुरेखच!
हिरवा रंग, पाण्याची टाकी, फारच देखणे आहे सर्व.
तुमच्यामुळे अनवट ठिकाणांची ओळख होत आहे, धन्यवाद दुवि!
28 Apr 2017 - 11:47 pm | एस
बाडिस!
29 Apr 2017 - 8:02 am | इरसाल कार्टं
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण वर्णन.
माझ्याच शेजाराची नव्याने ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
29 Apr 2017 - 9:32 am | प्रचेतस
उत्कृष्ट लेखन.
पावसाळ्यातील फोटोमुळे देखणेपण अधिकच वाढले आहे. अर्थात सह्याद्री पावसाळ्यात टिपा नाहीतर उन्हाळ्यात, तो सर्वच ऋतूंत सुंदरच भासतो.
29 Apr 2017 - 9:51 am | पैसा
फार आवडलंय! या एका जन्मात हे सगळे बघायचे आहे. खरे तर मला युरोप अमेरिकेचेसुद्धा आकर्षण नाही. आपल्या घराच्या अंगणातलेही सगळे अजून आपण पाहिलेले नाही याची पदोपदी जाणीव होत आहे.
29 Apr 2017 - 11:17 am | अत्रे
भारी लेख आणि फोटो!
हे खड्डे नैसर्गिक नसतील कशावरून? यासंबंधी अजून वाचायला कुठे मिळेल?
29 Apr 2017 - 11:19 am | अत्रे
सॉरी, कॉपी पेस्ट करण्यात चूक झाली. कोणी admin कृपया एडिट करून देतील का?
29 Apr 2017 - 11:21 am | प्रसाद_१९८२
अतिशय सुंदर ट्रेकवृतांत, खुप आवडले.
तो गुगल मॅप वरुन घेतलेला फोटो खरच अफलातून आहे.
29 Apr 2017 - 12:53 pm | दुर्गविहारी
ईतका उत्फुर्त प्रतिसाद दिल्याबध्द्ल सर्वाचेंच मनापासून आभार.
पैसाताई अगदी माझ्यामनातले बोललात. आपण लांब काश्मीर, सिमला, कुलु मनाली किंवा केरळ, तामिलनाडू पाहिलेले असते, पण बुडबुड्याची गंमत दाखविणारे बोम्बाडेश्वराचे मंदिर कुठे आहे हे माहित नसते, आपण खजुराहोची शिल्पकला पाहिलेली असते, पण नाशिक जिल्ह्यातले महाराष्ट्राचे खजुराहो, देवळाणेचे जोगेश्वर मंदिर माहिती नसते, नायगरा महिती असतो पण गोकाकजवळचा मिनी नायगरा माहिती नसतो. अगदी मी हि अजुन विर्दभातले किल्ले बघितले नाहित. असो.
ईरसाल कार्ट, आपल्याच आजुबाजुच्या गोष्टी माहिती नसतात, त्यांची ओळख व्हावी हाच या लेख मालिकेचा हेतु.
अत्रे, तुमची शंका योग्य आहे, पण मी यापुर्वीच वर धाग्यात लिहील्याप्रमाणे पावसाळ्यात पाण्याबरोबर येणारा गाळ खड्यात थांबावा व फक्त स्वच्छ पाणीच पुढे टाक्यात जावे यासाठी असे खड्डे कोरले जातात. हे तुम्हाला अनेक किल्ल्यावर पहाण्यास मिळेल. याशिवाय इशार्याच्या मशाली रोवण्यासाठी याचा उपयोग होत असावा ( उदा- कोकणदिवा ).
नैसर्गिक असे खड्डे ज्याला राजंणकुंड म्हणतात ते पाहण्यास मिळतात पण नदीपात्रात उदा- निघोजची रांजणकुंडे, पुणे -लोणावळा रेल्वेमार्गावरील शेलारवाडी स्टेशनशेजारी नदीपात्रात, मोरगावजवळ कर्हानदीच्या पात्रात.
29 Apr 2017 - 2:05 pm | कंजूस
धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. मोजकेच चांगले फोटो.
29 Apr 2017 - 10:24 pm | जयंत कुलकर्णी
मस्तच !
30 Apr 2017 - 5:33 pm | गजानन५९
उत्कृष्ट लेखमाला...
1 May 2017 - 12:35 pm | अजया
वाचनीय आणि माहितीपूर्ण लेखमाला.
2 May 2017 - 11:37 am | चित्रगुप्त
वा . अति सुंदर. आपण हे काहीच न बघितल्याची खंत जाणवत आहे. अजून जमेल का ? असा विचार करतो आहे.
2 May 2017 - 12:45 pm | दुर्गविहारी
जयंत कुलकर्णी काका, अजयाताई, गजानन ५९ आणि चित्रगुप्त सर मनापासून धन्यवाद. योग्य काळ बघून आणि आपली नेमकी क्षमता लक्षात घेउन ट्रेकींग कोणत्याही वयात करता येते. अत्यंत आंनद देणारा हा छंद आहे.
3 May 2017 - 2:58 pm | पाटीलभाऊ
आपली अनवट भटकंती अशीच सुरु ठेवा...पुलेशु
8 May 2017 - 7:59 am | हकु
8 May 2017 - 8:00 am | हकु
8 May 2017 - 8:00 am | हकु