"तो माझ्या घरात राहील. त्याच्या घरचे देव माझ्याच घरचे नाहीत का? तसे पण देव्हार्यात एकदा देवाची प्राणप्रतिष्ठा केली की ते हलवता येत नाहीत. हलवले तर त्यांचे विसर्जनच करावे लागते. आई खुप वेळा लग्नाचा विषय काढते पण माझ्या मनाच्या देव्हार्यात अभिची मुर्ती विराजमान आहे, ती कशी हलवू?" आदेशने पुढे होऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला, तशी ती वास्तवात आली. तनूकडुन अभिचा पत्ता घेवुन आदेश निघुन गेला.
देव्हारा...७
अभिजीतने कार्डवरचे नाव वाचले आणि तो चटकन उठुन बाहेर आला.
"आदेशऽ" अत्यानंदाने त्याने पुकारले. आदेश मंदपणे हसत होता. दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले. अभिजीत त्याला घेऊन केबिनमधे गेला. आदेशने त्याला आपल्या बँकेची सर्व माहीती दिली. अभि़जीतला बरे वाटले. आदेशला त्याने सर्व परिस्थिती कथन केली.
"आदेश, हे देव आहेत. तुच काही तरी कर, पण मला पाहीजे तेवढी रक्कम मिळवुन दे."
"ठीक आहे, अभि. मी बघतो काय करायचे ते! तू काळजी करु नकोस."
"पण मला सांग, तुला माझा पत्ता मिळाला कसा? " अभिने आश्चर्याने विचारले.
"आमची बँक नेहमी कंपन्यांचा सर्व्हे करत असते. अशाच एका सर्व्हेमधे तुझे नाव दिसले. मग पत्ता शोधणे अवघड नव्हते!" आदेशने ठोकुन दिले.
"...आणि तनू? कुठे ? कशी आहे? " अभिच्या स्वरात अधीरता होती. 'सांगावे की न सांगावे.' यात आदेश जरा घुटमळला.
"तनूच्या घरचे कुठेतरी शीफ्ट झाले. ती पण नंतर काही भेटलीच नाही." अभिचा चेहरा हिरमुसला. आदेशने त्याच्या मांडीवर थाप मारली.
"मग? लग्न वगैरे केलेस की नाही? का अजुन एकटाच फिरतोस?"
"लग्न ! बघुया, अजून तरी काही विचार नाही. तनूचा पत्ता तुला तरी माहीत असेल असे वाटत होते, पण...!"
"छोड यार! बिझनेसमन झाला आहेस तू! रांग लागेल पोरींची!"
अभिजीतकडचे देव घेऊन आदेश शहरात परतला. तनूच्या प्रॉपर्टीवर अभिला हवे होते तेवढे कर्ज सहज मिळाले. आदेशने चेक नेवुन अभिला दिला.
"थॅंक्स आदेश. हप्ते मी वेळच्या वेळी भरेन."
"हप्ते तू माझ्याकडेच पाठवत जा. पुढचे मी बघेन."
"ओके. आता थोडे दिवस रहा इथेच." अभि म्हणाला.
"राहिलो असतो पण जॉब आहे. मी परत येईनच."
अभिजीतच्या घरचा देव्हारा तनूच्या बंगल्यात विराजमान झाला होता. तिच्या आईला हे जरा जोखमीचे वाटत होते, पण तनूने तिला समजावले. कर्ज मिळाल्याबरोबर अभिने आधी कुलभुषणचे सर्व मुद्द्ल व्याजासह परत केले. कुलभुषण जरा गडबडला पण तो काही करु शकला नाही. बंगल्यावर गेला की देव्हार्याची रिकामी जागा अभिला अस्वस्थ करत असे. म्हणुन त्याने कृष्णाची एक मुर्ती आणुन तिथे स्थापन केली. त्याचा अस्वस्थपणा थोडा कमी झाला. बॅकेचे हप्ते तो ठरावीक तारखेला आदेशकडे पाठवत असे.
काही महीने व्यवस्थित गेले. एका महीन्यात तो कामाच्या गडबडीत हप्ता पाठवायचाच विसरला. लक्षात आले तेव्हा तारीख टळुन गेली होती. हप्ता भरण्यासाठी लागणारे डिटेल्स त्याच्याकडे नव्हते म्हणुन त्याने आदेशला मेल पाठवला आणि डिटेल्स मागवले. पण आदेशने त्याला उलट मेल पाठवला कि 'तुला शक्य असेल तेव्हा पैसे पाठव, हप्त्याची काळजी करु नकोस.' आदेश स्वतःच हप्ता भरेल म्हणुन अभि स्वतःच, त्याच्या शहरात असलेल्या त्या बॅकेच्या शाखेत गेला. लोन डिपार्टमेंटला जाऊन त्याने लोन अकाउंटची चौकशी केली. बराच वेळ शोधून, त्याच्या किंवा त्याच्या कंपनीच्या नावाने असलेले एक ही लोन अकाउंट सापडले नाही. तो बुचकळ्यात पडला 'असे कसे काय शक्य होते?' आदेशला भेटल्याशिवाय ह्या गोष्टीचा उलगडा होणार नव्हता. हाताखालच्या लोकांना सुचना देवून तो तडक निघाला.
तो आदेशच्या अॅफिसमधे पोहोचला.
"अभिऽ ये ना." आदेशने त्याचे स्वागत केले.
"आदेश, तुझ्याकडे थोडे महत्वाचे काम होते." अभिजीतचा स्वर गंभीर होता.
"बोल ना!" आदेशने त्याच्यासमोर बसत म्हटले.
"आदेश, मी तुझ्या बँकेत चौकशी केली. पण माझ्या नावावर लोन घेतलेलेच नाहीये. हा काय प्रकार आहे? तू दुसर्या कुठल्या बँकेडून कर्ज घेतलेस का?" आदेशने सुरवातीला टाळायचा प्रयत्न केला, पण अभि ईरेला पडला होता.
"आदेश, मी तुझ्यावर फार विश्वास ठेवतो. तू माझ्या विश्वासाचा गैरफायदा तर घेत नाहीस ना? " त्याच्या डोळ्यांत दुखावल्याचा भाव बघितल्यावर आदेशला सत्य सांगणे भाग पडले.
"तनू इथेच आहे? हे तू मला आत्ता सांगतो आहेस? एक एक क्षण मी तळमळत होतो. तुम्हा दोघांना माझी अवस्था कळली नाही! फार दुष्ट आहात तुम्ही दोघे!" तो उद्वेगाने बोलला.
"अभि, शांत हो. तुझे लग्न ठरले आहे म्हणुन तनू तुला भेटली नाही."
"कुणी सांगीतले हे?"
"तुझ्या भावांनी आणि कुलभुषणने!"
"हा त्यांचा प्लॅन होता. पण कुलभुषणशी मी कुठलाच संबंध ठेवला नाही आणि ठेवणार नाही. त्यांनी मला मदत केली होती. त्याचा आधार घेवून ते जर मला ब्लॅकमेल करणार असतील तर ती मदत काय कामाची? ते जाऊ दे. मला तनूला भेटायचे आहे, आत्ता!"
दोघेही आदेशच्या ऑफिसमधुन बाहेर पडले.
तनू घरात शिरली आणि हॉलमधे बसलेल्या आदेशला पाहुन चकीत झाली.
"आदेश, असा अचानक?" तिने विचारले
"तनू, तसेच महत्वाचे काम निघाले. अभि...!" अर्धवट बोलुन तो थांबला तसे तनू चमकली.
"अभि? काय झाले? आदेश, तो ठिक आहे ना?" तिने धास्तावलेल्या स्वरात विचारले.
"हो, पण त्याचा हप्ता थकलाय."
"हप्ता ना! मग त्यात एवढे गंभीर होण्यासारखे काय आहे? मी भरते. किती आहे रक्कम?" चेकबुक घ्यायला ती आतल्या रुमकडे वळली आणि चौकटीत उभा असलेला अभि तिला दिसला.
स्थिर नजरेने तो तिच्याकडे पहात होता. ती तशीच उभी राहीली. मनात भावनांचा कल्लोळ माजला होता. नक्की तिला काय वाटत होते ते तिलाही कळत नव्हते. अभि हळुहळु तिच्या जवळ आला. हलक्या पावलांनी आदेश दुसर्या रुममधे निघुन गेला. बघताबघता तिच्या डोळ्यांतुन अश्रु पाझरु लागले. अभिचे डोळेही पाणावले.
"एकटे सोडुन गेलीस ना मला? मी तुला न भेटता गेलो म्हणुन!" तनूने त्याला घट्ट मिठी मारली. आज तिचा अभि तिला परत मिळाला होता. मनाच्या देव्हार्यात देव परत आला होता.
(समाप्त.)
रसिक वाचकांनो,
मी ज्या कथा लिहिते, त्यात फार व्टिस्ट, रहस्य नसते. साध्या सरळ आपल्या आजुबाजूला घडणार्या घटना त्यात असतात. फार उघडेनागडे वास्तव पण मी मांडत नाही, कारण त्या उबग आणणार्या गोष्टी आपण आजुबाजूला बघत असतो, त्या नकोत असे वाटत असतांना त्याच परत लिखाणात मांडणे मला आवडत नाही. कथा हि मनाला फ्रेश करणारी, पॉझीटीव्ह विचार देणारी असावी असे मला वाटते. आपल्याला माझी कथा आवडली याचे समाधान आहे. धन्यवाद!!
प्रतिक्रिया
19 Apr 2017 - 10:51 am | बापू नारू
छान आहे कथा ,मस्त लिहिलत. थोडस व्टिस्ट, रहस्य टाकलत कि आणखी मनोरंजक होतील.
19 Apr 2017 - 11:48 am | राजाभाउ
मस्त कथा. आवडेश.
19 Apr 2017 - 12:34 pm | विनिता००२
धन्यवाद ___/\___
19 Apr 2017 - 1:10 pm | पद्मावति
मस्तच. कथा आवडली.
19 Apr 2017 - 2:27 pm | संजय क्षीरसागर
कथा हि मनाला फ्रेश करणारी, पॉझीटीव्ह विचार देणारी असावी असे मला वाटते.
जमेगी खूब जमेगी !
19 Apr 2017 - 2:40 pm | पैसा
खूप छान! लिहीत रहा. ओढून ताणून डार्क मूड आणलेले, विकृतींचे चित्रण करणारे कितीतरी काय काय आपल्या मनावर सगळीकडे आदळत असते. हे असे साधे सहज लिखाणही पाहिजे.
19 Apr 2017 - 2:51 pm | विनिता००२
धन्यवाद ___/\___ :) बापू नारु,राजाभाऊ, संजयजी, पैसाताई, पद्मावति,
19 Apr 2017 - 6:31 pm | Ranapratap
साधी सरळ सोपी कथा, छान वाटले वाचताना. पुढील कथेच्या प्रतीक्षेत
19 Apr 2017 - 6:33 pm | सुमीत
सगळे भाग वाचल्या नंतर प्रतिसाद देत आहे, निर्मळ कथानक आणि पात्रे. सुरेख लिहिले आहे.
19 Apr 2017 - 6:45 pm | एस
छान होती कथामालिका.
20 Apr 2017 - 9:03 am | विनिता००२
धन्यवाद ___/\___ राणाप्रताप, सुमीत, एस :)
20 Apr 2017 - 4:40 pm | इशा१२३
छान कथा ! आवडली.
20 Apr 2017 - 4:44 pm | दशानन
सुरेख कथानक!
आवडले!
21 Apr 2017 - 9:03 am | विनिता००२
धन्यवाद ___/\___
21 Apr 2017 - 9:59 am | priya_d
छान होती कथा. आवडली. असे साधे सहज सोपे काहीतरी वाचायला छान वाट ते कधी कधी.
पुलेशु