देव्हारा...५

विनिता००२'s picture
विनिता००२ in जनातलं, मनातलं
15 Apr 2017 - 1:39 pm

कंपनी सेक्रेटरी भारद्वाज उठुन उभे राहीले.
"जंटलमन, सहायसरांची अवस्था आपण जाणताच. त्यांच्या इच्छेनुसार 'अभिजीत सहाय' यांची कंपनीचे नवे मॅनेजींग डायरेक्टर म्हणुन नियुक्ती करत आहोत. कंपनीचे सर्व निर्णय त्यांच्या परवानगीनेच घेतले जातील." भारद्वाजांच्या खुलाशानंतर तिथे शांतता पसरली.
फायनान्सर्सना डुबणार्‍या कंपनीत काही इंटरेस्ट नव्हताच. सर्व हक्क अभिला दिल्यामु़ळे अभिराम आणि रघुराज जबाबदारी घेण्यातुन मोकळे झाले.

देव्हारा...५

अभिने रोज अ‍ॅफिसमधे यायला सुरवात केली. पण अननुभवी अभिवर कोणी विश्वास ठेवत नव्हते. रोज संध्याकाळी तो देव्हार्‍यात दिवा लावायचा. तिथे असेल तितका वेळ त्याला असीम शांतीचा अनुभव यायचा. पण बाहेर आल्यावर परत पैशांची विवंचना त्याला भेडसावू लागायची. अभिराम आणि रघुराजने हस्तक्षेप करु नये म्हणुन अभिजीतने त्यांच्या सह्या घेऊन कंपनीतून त्यांना बाजुला केले. बंगला पण गहाण पडला होता. त्यामुळे त्याच्यावरचा हक्क पण त्यांनी सोडला.

काही ऑर्डर्स त्याच्या हातात होत्या. पण प्रोडक्शनला त्याला भांडवल नव्हते. त्याने सप्लायर्सशी बोलणी केली. काही जण तयार झाले. पण मटेरीयलला पैसा कुठुन येणार? लिगल अ‍ॅड्व्हायझर कपिलला हाताशी धरुन त्याने निरनिराळ्या उद्योगपतींना भेटण्याचा सपाटा लावला. कालच तो एक उद्योगपतीना भेटुन आला होता. कुलभुषण स्वतः मोठे उद्योगपती होतेच पण निरनिराळ्या कंपन्यात त्यांचे शेअर्स होते. अडलेल्या मालकांना पैसे पुरवून कंपनी टेकओव्हर करणे त्यांचा पेशा होता अभिजीतसाठी त्यांनी वेगळाच प्लॅन केला होता. त्यांची एकुलती एक मुलगी राजलक्ष्मी आता उपवर झाली होती आणि अभिजीत त्यांना पहील्या नजरेत आवडला होता. त्याला मदत करुन आधी ते मिंधा बनवणार होते, नंतर जावई करुन घेणार होते.

कुलभुषणशी अभिजीतची दुसरी मिटींग झाली तेव्हा त्यांनी आढेवेढे घेतच होकार दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार अभिने त्यांना पार्टनर करुन घ्यायचे होते व दर वर्षी एक ठरावीक हिस्सा द्यायचा होता. पण अभिने त्यांना पार्टनर करुन घ्यायला स्पष्ट नकार दिला. दर वर्षी द्यायची नफ्याची रक्कम त्याने ठरवून घेतली. कुलभुषणने मोठेपणा दाखवत या गोष्टीला मान्यता दिली. दरम्यान ते आपल्या मुलीला घेऊन अभिच्या घरी पण जाऊन आले. त्याच्या भावांजवळ आपल्या येण्याचे सुतोवाच करुन ठेवले. अभिच्या भावांना त्यात आनंदच वाटला. कुलभुषणकडुन पैसा कसा लाटावा? याचा ते विचार करु लागले. अभिला या गोष्टींची कुणकुण लागली होती. पण जोपर्यंत हा मुद्दा उघडपणे समोर येणार नव्हता, तोवर तो काही बोलणार नव्हता.

पैसा मिळाल्याबरोबर अभिने प्रोडॅक्शन सुरु केले. रात्रंदिवस तो फॅक्टरीत राबु लागला. पण कुठेतरी काहीतरी चुकत होते. त्याचे बजेट बिघडू लागले तसा तो सावध झाला. आपला सेक्रेटरी त्याने जुन्या मुनीमांच्या मुलाला, कैलासला नेमले होते. कैलासने अभिकडुन काही दिवसांची मुदत मागुन घेतली. कंपनीत अभिराम आणि रघुराजचे जुने हितसंबंधी होते. त्या वेळचे उद्योग ते अजुनही करतच होते. चोरुन माल विकणे, खोटी बिले सादर करणे हा त्यातला एक भाग होता. कैलासने या सर्वांचा पत्ता लावला आणि आपला रिपोर्ट अभिला सादर केला. अभिने तडकाफडकी सर्वांची हकालपट्टी केली. नविन कामगार भरण्यात त्याचा काही वेळ मोडला पण आता त्याचे काम सुरळीत चालू झाले. कुलभुषणचे हप्ते मात्र तो न चुकता पोहोचते करत होता. राजलक्ष्मी कधीकधी त्याच्या ऑफिसमधे येऊन बसायची. अभिजीतशी आपले लग्न होणार या गोष्टीची तिला पुर्ण खात्री होती.

बघता बघता दोन वर्ष कशी उलटली ते अभिला कळलेही नाही. थोडी उसंत मिळताच तो मॅनेजमेंट कॉलेजमधे जाऊन आला. ओळखीचे काहीजण भेटले. आदेश ट्रेनींगसाठी बाहेर गावी गेला होता. तनूचे कुटुंब पण त्या शहरातुन दुसरीकडे शिफ्ट झाले होते. त्यांचा पत्ता पण कुणाला माहीती नव्हता. हताश मनाने तो परत घरी आला.

तनूचा कोर्स पूर्ण होता होताच तिला एका मल्टीनॅशनल कंपनीत जॉब मिळाला. ती घरी परत आली आणि काही दिवसांतच तिच्या वडिलांचे निधन झाले. परत आल्यावर आदेशला भेटायला पण तिला वेळ मिळाला नाही. तोच तिला भेटायला आला. तिचे कुंटुंब तिच्या नोकरीच्या शहरात शिफ्ट झाले होते. दोघांमधे फार बोलणे झाले नाही.

तनू एका जबाबदार पोष्टवर होती. फायनान्स मॅनेजर म्हणुन कंपनीचे गुंतवणुकीचे व्यवहार तिच पहात असे. एके दिवशी तिच्या बॉसने तिला बोलावले.

"तनिष्का, एक चांगले प्रोजेक्ट आपल्याकडे आले आहे. एका कंपनीशी पार्टनरशीप करण्याचा प्रस्ताव आहे. ती कंपनी जरा अडचणीत दिसतेय. तेव्हा आपण तिला सहज टेकओव्हर करु शकतो. हे प्रोजेक्ट तू जरा अभ्यास. त्या कंपनीत जाऊन ये. आपल्याला वरती रिपोर्ट द्यायचा आहे."

"यस सर! "

तनिष्काने फाईल उचलली आणि ती केबीनमधे परत आली. सर्व प्रोजेक्ट तिने व्यवस्थित अभ्यासले. कंपनी चांगली होती. आणि आर्थिक बाब सोडली तर मार्केटमधे तिला चांगले नाव होते. तनूच्या कंपनीकडे अफाट पैसा होता. तिने बॉसला फोन लावला.

"सर, मी सर्व फाईल अभ्यासली. होप्स आहेत. मला त्या कंपनीच्या अ‍ॅथॉरीटी पर्सनन्सना भेटायला मिळाले तर बरे होईल."

"तुला मि. कुलभुषण या बाबतीत मदत करतील. ते या कंपनीचे फायनांसर आहेत आणि त्यांनीच हा प्रस्ताव आपल्याकडे आणलाय."

"ठिक आहे, सर. मी त्यांची अपॉन्टमेंट घेते."

तनूने कुलभुषणशी बोलुन भेट ठरवली. त्यासाठी तिला त्यांच्या शहरात जाणे आवश्यक होते. ती तिथे संध्याकाळी पोहोचली, तेव्हा कुलभुषणची कार तिला रिसिव्ह करायला आली होती. ती सरळ कुलभुषणच्या बंगल्यावरच पोहोचली.

"वेलकम मॅडम, प्रवास कसा झाला?"

"चांगला झाला. आपण कसे आहात?" तिने औपचारीकपणे विचारले.

"ठीक आहोत, आपण आराम करा. आम्ही बाहेर जाऊन येतो. मग आपण बोलुयात!"

"ठीक आहे." तनू उत्तरली.

तिची रहायची व्यवस्था कुलभुषणने आपल्या बंगल्यावर केली होती. ती रुममधे जाऊन फ्रेश झाली. 'कुलभुषणशी काय आणि कसे बोलायचे.' याचा ती विचार करत होती.

(क्रमशः)

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

16 Apr 2017 - 1:27 am | संजय क्षीरसागर

तनू आणि अभी पुनर्मिलन होणार !

विनिता००२'s picture

17 Apr 2017 - 8:54 am | विनिता००२

: )