देव्हारा...४

विनिता००२'s picture
विनिता००२ in जनातलं, मनातलं
14 Apr 2017 - 11:29 am

दुसर्‍या दिवशी आदेश आणि तनू नेहमीप्रमाणे क्लासरुममधे आले. पहिल्या बेंचवर बसून अभि त्यांचीच वाट पहात होता. तो रोज लेक्चर अटेंड करु लागला. वेळ वाया घालवणे त्याने बंद केले होते. त्यातला हा बदल तनूसाठी खुप सुखावह होता. त्याला पाहिले की तिचे मन प्रेमाने जास्तच गहीवरुन यायचे. सहा महीने या प्रेमालापात कसे गेले ते दोघांनाही कळले नाही. पण आदेशला त्यांनी एकटे पडु दिले नव्हते. त्याला सोडुन ते दोघे कधीच कुठे ऐकटे गेले नाहीत. दोघांना एकत्र पाहुन आदेशला खुप आनंद व्हायचा. तनूसाठी अभि परफेक्ट आहे हे त्याने जाणले होते.

देव्हारा...४

दार वाजले म्हणुन आदेशने दार उघडले. बाहेर अभिजीत उभा होता.

"काय रे, एवढया रात्री?" आदेशने धास्तावुन विचारले.

अभिचा चेहरा व्यग्र होता.

"आदेश, मी घरी जातोय. पप्पांची तब्बेत बरी नाहीये. गावावरुन एकजण निरोप घेउन आलाय. तनूला भेटणे शक्य नाही. पण तिला सांग, मी लवकरच परत येईन."

" माझी काही मदत लागली तर सांग." आदेश त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.

" नक्कीच.निघु?"

आदेशला घट्ट मिठी मारुन अभिने त्याचा निरोप घेतला. तो खुपच डिस्टर्ब दिसत होता. त्याचे गाव मध्यप्रदेशात होते. आदेश थोडा वेळ तो गेला तिकडे पहात राहीला. मग परत घरात आला.

दुसर्‍या दिवशी त्याने कॉलेजमधे तनूला अभिचा निरोप दिला. तनू जरा उदास झाली. पण अभि लवकरच परत येणार आहे हा विचार करुन ती अभ्यासाला लागली. बघता बघता फायनल एक्झाम आली. अभिचा अजून काही पत्ता लागत नव्ह्ता. आदेशने त्याच्या घरी फोन लावायचा बराच प्रयत्न केला. पण नंबर बदलला असल्याने त्याचा काही उपयोग झाला नाही. अभिची काही खबर मिळत नसल्याने तनूची तगमग होत होती. शेवटी तिने स्वतःला अभ्यासात बुडवून घेतले. फायनल एक्झाम झाल्या झाल्या. आदेश आणि तनूने निरनिराळया ऐंन्ट्रंस देण्याचा धडाका लावला. आदेशला एका इंटरनॅशनल बँकेत मॅनेजमेंट ट्रेनी म्हणुन ऐंट्री मिळाली. तनूला लॉसएंजलिसमधे फायनांसच्या पुढचा अभ्यासासाठी जायची संधी मिळाली. या वातावरणातून तिला बाहेर निघायचे होते. पण घरात तिच्या लग्नाची चर्चा सुरु झाली होती.

"तनू, तुझे शिक्षण पुर्ण झाले आहे. आता लग्नाचा विचार करायला हवा." तिची आई म्हणाली. डोळ्यांत येणारे अश्रू तनूने प्रयासाने परतवले.

"आई, मी एवढा कोर्स पुर्ण करुन येते. अशी संधी परत परत मिळत नाही. आल्यावर लग्नाचे बघुया." आई वडिलांची समजुत घालुन तनूने जायची तयारी केली. जाण्यापुर्वी ती आदेशला भेटली.

"आदेश, अभिची काही बातमी?" आदेशने नकारार्थी मान हलवली. तनूने एक सुस्कारा सोडला.

"कुठे गेला हा? एक निरोप नाही त्याचा! तो ठीक तर असेल ना रे?"

"तनू, तो ठीक असेल. काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल म्हणुन तो परत येवू शकत नाही. पण तो नक्की परत येईल." आदेश तिला धीर देत म्हणाला.

"घरचे फार दिवस थांबणार नाहीत, आदेश....आणि कशाच्या भरवशावर ते थांबतील. मी ज्याची वाट बघतेय, तो कुठेय? ते पण मला माहीत नाहीये."

तनूचे म्हणणे खरे होते. ती लॉसएंजलिसला निघून गेली. आदेश पण स्वतःच्या जॉबमधे बिझी झाला. ते ज्याची वाट पहात होते तो अभिजीत त्यावेळी अनेक आघाडयांवर एकटाच लढत होता.

तातडीने बोलावले म्हणुन तो घरी आला होता. त्याला घ्यायला कार आली होती. ड्रायव्हर बराच जुना माणुस होता. त्याने थोडेफार सांगितले. त्याच्या वडीलांना अर्धांगवायुचा झटका आला होता. घरातले वातावरण काहीसे तंग वाटत होते, कंपनीची स्थिती फार वाईट होती.

तो आल्याआल्या वडीलांच्या दालनात गेला. वडील बोलु शकत नव्हते. पण त्यांची नजर अपेक्षेने अभिजीतकडे पहात होती. दोन भाऊ वरच्या रुममधे होते. ते औपचारीकता म्हणुन बाहेर आले. वातावरणात मोकळेपणा नव्हता. तो आपल्या रुमकडे वळला. नोकराने चहा नास्टा आणुन ठेवला. एकट्यानेच बसून त्याने तो संपवला. 'काय झाले आहे' हे त्याला जाणून घ्यायचे होते.

संध्याकाळी आपोआप त्याचे पाय देवघराकडे वळले. देवापुढे दिवा लावुन त्याने हात जोडले. सर्व देव मंदपणे हसत होते. अभिला खुप बरे वाटले. वाडवडीलांच्या काळापासून चांदीचा देव्हारा आणि देव त्यांच्या घराण्यात चालत आले होते. संध्याकाळी तो त्यांच्या लिगल अ‍ॅडव्हायझरना भेटला.

"अभिजीत, तुला आता सत्य सांगणे भाग आहे. गेल्या काही वर्षापासुन तुझे भाऊ अभिराम आणि रघुराज तुझ्या वडिलांबरोबर काम करत होते. आपलीच मुले आहेत या भावनेने सहायसरांनी त्यांना सर्व अथॉरीटी प्रदान केल्या. हातात पैसा खेळु लागल्यावर अभिराम आणि रघुराजला वेगवेगळ्या चैनीच्या सवयी लागल्या. घराण्याचे संस्कार विसरुन ते अनेक उद्योगात गुंतले. कंपनीतुन पैसा मिळाला नाही तर कंपनीच्या नावाखाली त्यांनी अनेक वैयक्तीक उधार / उसनवार्‍या केल्या. बिझनेसकडे लक्ष नाही आणि भरमसाठ खर्च ! परिणाम हा झाला की कंपनीवर आज दिवाळखोरीची वेळ आली आहे." ते बोलायचे थांबले. अभि विचारमग्न झाला होता.

"किती कर्ज आहे कंपनीवर?" त्याने शांतपणे विचारले.

"अंदाजे चाळीस करोड!"

"काही मार्ग?"

"काहीतरी चमत्कारच व्हायला हवा. काही उद्योगपती असे आहेत जे कर्ज देवू शकतील पण सध्या बिझनेस डबघाईला आला आहे. अशा परिस्थितीत हा जुगार कोणी खेळेल असे वाटत नाही."

"अभिराम आणि रघुरामचे काय म्हणणे आहे?"

"ते हात वर करुन मोकळे झालेत. कारण तो पैसा जरी त्यांनी घेतला असला तरी सर्व व्यवहार कंपनीच्या नावावर केलाय."

"ठीक आहे अंकल. मी जरा विचार करतो."

अभिजीत घरी येवुन सरळ वडिलांच्या रुममधे गेला.

"पप्पा, कंपनीची हालत काय आहे ते तुम्हाला माहीतच आहे. सर्व व्यवहार तुम्हाला माहीत आहे. मी काय करु?"

वडिलांनी खुणेने कपाटाकडे निर्देश केला. त्याने उठुन कपाट उघडले. एक फाईल समोरच ठेवलेली होती. त्याने ती उचलुन घेतली. वडिलांनी मानेनेच होकार दिला. रुममधे येउन त्याने दार लावले अणि तो फाईल बघण्यात गुंग झाला. फाईल पुर्णपणे बघुन झाली तेव्हा त्याने एक सुस्कारा सोडला. कंपनीची कंडीशन चांगली नव्हती आणि वडिल त्याच्याकडून कंपनी चालवायची अपेक्षा करत होते. तो वडिलांच्या रुममधे गेला.

"पप्पा, मी फाईल बघीतली. तुम्ही माझ्याकडुन जी अपेक्षा करताय, त्या अपेक्षेवर मी खरा उतरण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही काही काळजी करु नका." वडिलांनी त्याच्या डोक्यावरुन हात थरथरता हात फिरवला. त्यांच्या डोळ्यातून अश्रु ओघळले.

अभिने दुसर्‍या दिवशी सर्व फायनान्सर्सची, डायरेक्टरची मिटिंग बोलावली. कंपनीचा अहवाल सर्वांसमोर होता. फायनान्सर एकही पाऊल पुढे सरकायला तयार नव्हते. डायरेक्टरर्समधे अभिराम आणि रघुराज मुख्य होते. ते कंपनी दिवाळखोरीत काढावी याच विचाराने बोलत होते.

कंपनी सेक्रेटरी भारद्वाज उठुन उभे राहीले.

"जंटलमन, सहायसरांची अवस्था आपण जाणताच. त्यांच्या इच्छेनुसार 'अभिजीत सहाय' यांची कंपनीचे नवे मॅनेजींग डायरेक्टर म्हणुन नियुक्ती करत आहोत. कंपनीचे सर्व निर्णय त्यांच्या परवानगीनेच घेतले जातील." भारद्वाजांच्या खुलाशानंतर तिथे शांतता पसरली.

फायनान्सर्सना डुबणार्‍या कंपनीत काही इंटरेस्ट नव्हताच. सर्व हक्क अभिला दिल्यामु़ळे अभिराम आणि रघुराज जबाबदारी घेण्यातुन मोकळे झाले.

(क्रमशः)

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

14 Apr 2017 - 1:31 pm | पद्मावति

मस्तच. वाचतेय. पु.भा.प्र.

शलभ's picture

14 Apr 2017 - 4:23 pm | शलभ

वाचतोय..पुभाप्र..

पैसा's picture

14 Apr 2017 - 4:41 pm | पैसा

वाचत आहे. वेगळी कलाटणी.

५० फक्त's picture

14 Apr 2017 - 4:49 pm | ५० फक्त

देव देव्हा-यात नाही
देव नाही देवालयी

या जमान्यात पैसा आणि सत्ता हे दोनच देव उरलेत.

स्टोरी मस्त झाली आहे, प्रेमाच्या गावातुन पैशाच्या तमाशाकडे.

विनिता००२'s picture

14 Apr 2017 - 5:07 pm | विनिता००२

धन्यवाद मित्रमैत्रिणींनो ___/\__

तुम्हांला कथा आवडतेय याचा आनंद आहे.