...."सांभाळेल, सांभाळेल. तुला नको काळजी! " अभि आदेशला डोळा मारत म्हणाला.
"मी कशाला काळजी करु? ती पण तुझी!" ती नाक उडवत म्हणाली.
लेक्चरची वेळ झाली म्हणून तिघेही उठले.
देव्हारा...३
वार्षीक परिक्षा संपली तसे सगळेजण इकडे तिकडे विखुरले. अभिजीत त्याच्या घरी निघुन गेला. आदेश आणि तनूने स्पेशल क्लास जॉइन केले. सुट्टी भुर्रकन संपली. कॉलेजच्या पहील्याच दिवशी सर्वजण हजर होते. परत रुटीन सुरु झाले. अभिजीत दरवर्षी प्रमाणे टॉपलाच होता. या वर्षी प्रोजेक्ट, प्रॅक्टीकल्स बरेच उपदव्याप करायचे होते.तनू करता प्रपोजल येत होती. पण ग्रॅज्युएशन झाल्याशिवाय काही नाही असे तिच्या घरच्यांनी पण ठरवले होते.
एके दिवशी ते कट्यावर बोलत बसले असताना दोन माणसे त्यांच्याकडे आ़ली.
"हॅलोऽ अभि!" एकजण गॉगल काढत म्हणाला.
"हॅलोऽ" अभि औपचारीकपणे म्हणाला.
"आम्ही कंपनीच्या कामासाठी आलो होतो. म्हटले तुला भेटावे. जरा चलतोस का बरोबर?" त्यांनी विचारले. अभिला जायची इच्छा दिसली नाही पण तो त्यांच्यासोबत गेला. तनू आणि आदेश, तो गेला तिकडे बघतच राहीले.
"कोण होते रे ते?" तनूने आदेशला विचारले.
"कोणास ठाऊक? पण बहुतेक त्याच्या गावाकडचे असावेत."
एकंदरीत अविर्भावावरुन तनूला ती माणसे आवडली नव्हती. अभि त्यांच्याबरोबर गेल्यामुळे ती अधिकच अस्वस्थ झाली. दोन दिवस अभि कॉलेजला आलाच नाही. तनूने लकडा लावल्यामुळे आदेश तिला घेऊन सकाळी सकाळीच अभिच्या फ्लॅटवर पोहोचला. बेल वाजवल्यावर नोकराने येवून दार उघडले. तो आदेशला ओळखत असल्यामुळे, अभिजीत बेडरुममधे आहे असे सांगुन किचनमधे गेला. तनू फ्लॅटचे निरीक्षण करत होती. एक दोन पेंटींग भिंतीवर लावलेली होती. हॉलमधुन तिची नजर आतल्या रुममधे भिरभिरली. तिथे पडलेल्या रिकाम्या बाटल्या, ग्लास कशाचे आहेत? याचा वेगळा विचार करण्याची गरज नव्हती.
आदेश आल्यामुळे अभिजीत झोपेतुन उठला. रात्री त्याने ड्रिंक घेतले असावे, हॅगओव्हर अजून होता. आदेशशी बोलतच तो हॉलमधे आला. आदेश बरोबर तनू पण आली आहे याची त्याला कल्पना नव्हती. तिला पाहुन तो तट्कन थांबला. तनू धारदार नजरेने त्याच्याकडे पहात होती.
"हिला कशाला घेऊन आलास?" अभिने आदेशला विचारले.
"का? फार त्रास झाला का मला इथे पाहून?" तनूने धारदार आवाजात विचारले.
"मला कशाला त्रास होईल! तसंही तुझे बोलणे मी मनावर घेत नाही." अभि पण वैतागला होता.
"कशाला घेशील? आम्ही शत्रुच आहोत तुझे! तसेही तुला कुठे शिकुन नोकरी करायचीय म्हणा! घरचे गडगंज आहे, तेवढे सांभाळले तरी पुरे!"
"तनू!" आदेश मधेच बोलला.
"माझे मी बघेन काय करायचे ते! आणि मला तुझ्या उपदेशाची अजिबात गरज नाहीये. डबक्यात राहण्याची मनोवृत्ती तुमची! मिडलक्लास मेंटॅलीटी म्हणतात ना ती हिच! स्टेटस वगैरे तुमच्या बसची बातच नाही." आज कधी नव्हे ते अभिजीत पण प्रत्येक बोलण्याला कापत होता.
"अभि, तू पण...! " आदेश या दोघांच्या वाकयुध्दात होलपाटत होता. मिडल क्लासचा उल्लेख केल्यामुळे तनू चांगलीच तापली.
"आणि तुमच स्टेटस कशात असते? दारु, पार्ट्या, गाडया उडवणे, दुसर्याला तुच्छ लेखणे, पैसा उडवणे याला जर स्टेटस सिंबल मानत असशील तर असले स्टेटस नकोच आम्हाला!"
"पैसा उडवायला जवळ असला तर पाहीजे? चार टिकल्या कमवायच्या, दोन घरात खर्चायच्या, एक बँकेत ठेवायची, एक कर्ज फेडायला द्यायची, झाला यांचा संसार!"
"तू किती टिकल्या कमावतोस तेच बघायचय मला! शुन्यातून उभे राहातो आम्ही! तोंडात सोन्याचा चमचा घेउन जन्माला आलेल्यांना काय माहीती, कर्तृत्व काय असते! स्वतःच्या हिंमतीवर काहीतरी बना!"
"प्यायलो मी दारु! तू कोण मला विचारणारी ? "
अभिचा तो प्रश्न एका क्षणात तिला परके बनवून गेला. वेदनेने तिचा चेहरा पिळवटला.
" मी कुणीच नाहिये! बरे झाले, मला आठवण करुन दिलीस." वळून ती वेगाने बाहेर निघुन गेली.
"अभि..."
"आदेश, प्लिज. मी खुप डिस्टर्ब आहे."
"तू आराम कर. मी निघतो."
आदेश त्याचा निरोप घेउन खाली आला, तोपर्यंत तनू निघुन गेली होती. दुसर्या दिवशी ती कॉलेजला आलीच नाही. अभिने तिची बराच वेळ वाट पाहीली. आदेशला मात्र ते जाणवू दिले नाही.
"तनू का आली नाही काय माहीती!" आदेश स्वतःशीच पुटपुटला. अभिने ऐकले असुनही मुद्दाम विचारले.
"तनू!"
"अभि, तू काल तिला फार बोललास."
"फार काय? जेव्हा तेव्हा उपदेश करत असते. त्या दिवशी ते दोघेजण इथे आले होते ते माझ्या मोठ्या भावाचे मेव्हणे! ते कंपनीच्या कामासाठी आले होते. माझ्याच फ्लॅटवर राहीले. त्यांना अटेंड करणे मला भाग पडले. ते आमचे फायनान्सर आहेत. ड्रिंकसाठी पण कंपनी द्यावी लागली, हे रितीरिवाज पाळावे लागतात.यांचा आमच्या नात्यापेक्षा बिझनेसवर जास्त प्रभाव पडतो. तनूला काय माहीती हे सगळे!" आदेशने अभिच्या खांद्यावर हात टाकला.
"सुरक्षीत घरट्यातले पिल्लु आहे रे ते! जगातले टक्केटोणपे अजुन तिला माहीत नाहीत. तू खरंच तिला खुप दुखावलस!" आदेशच्या बोलण्यावर अभि काहीच बोलला नाही.
तनू कॉलेजमधे आली आणि सरळ क्लासरुममधे जाऊन बसली.
"हाय तनू!" आदेश म्हणाला.
"हाय आदेश!" ती हसली पण शेजारीच असलेल्या अभिकडे तिने चुकुनही बघीतले नाही. तो ही निर्विकारपणे मागच्या बेंचवर जाऊन बसला. आदेश पण त्याच्याजवळ जाऊन बसला. दोन दिवस हाल होणार हे तो गृहीत धरुन होता. आदेशला दोन दिवसात संपेल असे वाटलेले भांडण चांगलेच लांबले. दोघेही हार मानायला तयार नव्हते. आदेशने दोघांनाही समजावले पण दोघेही आपलाच मुद्दा धरुन बसले होते. दोघांमधला अबोला पूर्ण कॉलेजमधे चर्चेचा विषय झाला होता. हे भांडण कसे मिटवावे? आदेश याचा विचार करत होता. तनू आणि अभिला पण भांडण मिटावे असे वाटत होते. पण पहीले कोण बोलणार हा प्रश्न होता. तनूने आपल्याला नेहमी प्रमाणे मनवावे असे अभिला वाटत होते. आणि चूक अभिची आहे तर अभिने पहील्यांदा बोलावे असे तनूला वाटत होते.
काही दिवस असेच गेले.एक दिवस तनू एकटीच कट्यावर बसली होती.
"हाय तनू!" तिच्यासमोर कुणाल उभा होता.
"हाय कुणाल!"
"अभिचं आणि तुझ भांडण झाले का?" कुणालच्या प्रश्नावर तनूच्या डोळ्यांत पाणी आले. ती काहीच बोलत नाही असे पाहुन कुणाल तिच्याशेजारी बसला.
"तनू, मला नाही माहीत की तुमच्या दोघात काय वाद झालाय. पण तुला एक गोष्ट सांगतो. अभिचे तुझ्यावर खुप प्रेम आहे." तनू अविश्वासाने कुणालकडे पाहु लागली.
"कस शक्य आहे?"
"हे खरं आहे. त्याच्या डोळ्यांत बघ."
आदेश आणि अभिजीत क्लासरुमकडुन कट्याकडे येत होते. तनूबरोबर कुणाल बसलेला बघुन अभिजीतच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ताडताड येउन त्याने कुणालची कॉलरच पकडली.
"हाऊ डेअर यू?"
तनू कावरी बावरी झाली. आदेश अभिचा पवित्रा बघुन थक्क झाला. पण कुणाल शांतपणे उठुन उभा राहीला.
"काय झाले अभि?" त्याने विचारले.
"तुझी हिंम्मत कशी झाली तनूशी बोलायची?"
"हा तिचा आणि माझा प्रश्न आहे. तुझा संबंधच कुठे येतो?" कुणालच्या प्रश्नाने अभिचा चेहरा लालबुंद झाला.
"माझा काय संबंध आहे हेच जाणुन घ्यायचे आहे ना तुला! आय लव्ह हर! ओके?"
तो बोलल्यानंतर तिथे एकदम शांतता पसरली. कुणाल मंदपणे हसत होता. आदेश आश्चर्याने अभिकडे पहात होता आणि तनू डोळे फाडफाडुन अभिकडे आणि कुणालकडे पहात होती.
"मी तनूला तेच समजावत होतो. तुला खोटे वाटत असेल तर विचार तिलाच!" कुणाल तनूकडे इशारा करत म्हणाला, तसे अभि तिच्याकडे वळला. लाजून तिचा चेहरा आरक्त झाला होता. अभि तिच्यासमोर उभा राहिला तसे तिने वर पाहीले. त्याने तिचे दोन्ही हात हातात घेऊन हृदयाशी धरले.
"तनू, आय अॅम सॉरी!"
"अभिऽ" तनूने त्याचे हात घट्ट दाबले. दोघांना एकमेकांशी खुप बोलायचे होते पण शब्द सापडत नव्हते.
"चल!"
आदेश आणि कुणालला बाय करत दोघेही बाईकवर सुसाट कॉलेजबाहेर पडले. थोड्या अंतरावर असलेल्या गणपतीच्या मंदिरात ते पोहोचले.
"देवाच्या समोर मी तुला वचन देतो, आपण दोघे एकच आहोत. तुला वाईट वाटेल असे मी कधीच वागणार नाही. तुझा आनंद तो माझा आनंद आणि तुझे दु:ख ते माझे दु:ख असेल."
"अभि, मी पण तुला वचन देते, माझे जे काही आहे आणि असेल ते सर्व तुझे आहे." देवाचा आशिर्वाद घेउन ती बाहेर आली. आज दोघे ही एकमेकांना जणू नव्याने ओळखत होते. बाजुच्या एका पारावर दोघे ही बसले. अभि दुरवर बघत बोलु लागला.
"तनू, आमच्या घरी पण खुप छान देव्हारा आहे. खुप जुना! आमचे देव पण पुरातन आहेत. पण बघितल्यानंतर एवढे प्रसन्न वाटते ना! तू जेव्हा आमच्या घरी येशील तेव्हा बघशीलच!" तनू एकाग्रपणे त्याचे बोलणे ऐकत होती.
दुसर्या दिवशी आदेश आणि तनू नेहमीप्रमाणे क्लासरुममधे आले. पहिल्या बेंचवर बसून अभि त्यांचीच वाट पहात होता. तो रोज लेक्चर अटेंड करु लागला. वेळ वाया घालवणे त्याने बंद केले होते. त्यातला हा बदल तनूसाठी खुप सुखावह होता. त्याला पाहिले की तिचे मन प्रेमाने जास्तच गहीवरुन यायचे. सहा महीने या प्रेमालापात कसे गेले ते दोघांनाही कळले नाही. पण आदेशला त्यांनी एकटे पडु दिले नव्हते. त्याला सोडुन ते दोघे कधीच कुठे ऐकटे गेले नाहीत. दोघांना एकत्र पाहुन आदेशला खुप आनंद व्हायचा. तनूसाठी अभि परफेक्ट आहे हे त्याने जाणले होते.
प्रतिक्रिया
12 Apr 2017 - 1:57 pm | शलभ
छान आहे. खूप स्कोप होता अजून गोष्टिमधे.
12 Apr 2017 - 3:03 pm | संजय क्षीरसागर
नेहेमीच्या विषयात तुम्ही रंगत आणू शकता हे कौशल्य आहे.
14 Apr 2017 - 11:32 am | विनिता००२
धन्यवाद संजयजी ___/\__
13 Apr 2017 - 5:44 pm | स्रुजा
आईंग, संपली का कथा?
13 Apr 2017 - 7:24 pm | पैसा
कथा आवडली. संपली का? देव्हार्याचा फक्त एक उल्लेख आला. त्याचा विशेष संदर्भ लागला नाही.
14 Apr 2017 - 11:32 am | विनिता००२
लागेल संदर्भ...कथा अजून बाकी आहे.
14 Apr 2017 - 8:54 am | पुनवेचा चन्द्र
खूप मस्त
14 Apr 2017 - 11:23 am | विनिता००२
माफ करा, क्रमशः राहून गेला. अजून कथा बाकी है मेरे दोस्त!!