अनवट किल्ले २: शिलाहारकालीन अशेरीगड

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
7 Apr 2017 - 6:15 pm

गेल्या आठवड्यात आपण गंभीरगडाची सफर केली.
संध्याकाळी गंभीरगड उतरुन कासा उधवा रस्त्यावर उभे राहिलो. या रस्त्यावर
वाहतुक आहे कि नाही याची मला शंकाच होती. व्याहळीपाड्याचे रुप बघुन तिथे
मुक्काम करणे शक्यच नव्ह्ते. जानेवारी महिना असल्याने काळोख लवकर पडला,
आम्ही उभे असलेल्या जागेमागे स्मशानाची शेड होती. मला भीती वाटत होती कि
एकून आमचा अवतार बघून एखाद्या वाहनचालाकाला आम्ही भुते वाटुन अ‍ॅटॅक वगैरे
येतोय कि काय ? पण तसे काहीही न होता, एक जीप थाबंली, पण ती बापगाव पर्यंतच
जाणार होती. थोडे जादा पैसे देउन आम्ही त्याला चारोटी नाक्यावर सोडण्यास
सांगितले. एका लॉजवर मस्त आराम केला. सकाळी खिडकीतून बाहेर डोकावलो तर
महालक्ष्मी सुळक्याचे भेदक दर्शन झाले. पटकन आवरुन अशेरीकडे निघायची तयारी
केली. अशेरीचे पायथ्याचे गाव आहे "खोडकोना", हे अशेरीच्या दक्षिण पायथ्याला
आहे, तर उत्तर पायथ्याला आहे "बुर्हाणपुर". पण बुर्हाणपुर पासून बरेच
लांबचे अंतर कापावे लागत
असल्याने खोडकोनाकडुनच जावे. खोडकोना मुंबई- अहमदाबाद हायवे पासुन थोडे आत
आहे. अशेरी महामार्गापासून जवळ असला तरी लांब पल्ल्याच्या बसगाड्या
खोडकोना फाट्यावर थांबत नाहीत. तेव्हा लोकल बस किंवा खाजगी जिपगाड्या हाच
पर्याय उरतो. स्वताची गाडी असेल तर मस्तान नाका आणि चारोटीच्या मधे असलेली
खिंड हि ठळक
खुण लक्षात ठेवावी
आम्हीही एका आधीच खच्चुन भरलेल्या सहाआसनी रिक्शात कसेबसे स्वताला
कोंबून खोडकोनाकडे निघालो.
ash1
मुंबई -अहमदाबाद हायवे वरुन होणारे अशेरीचे दर्शन
आम्ही तिथे पोहचे पर्यंत आपण अशेरीगडाच्या इतिहासात डोकावूया. ईतिहासकाळात
हा गड महत्वपुर्ण स्थान पटकावून होता. उत्तर कोकणात शिलाहारांचे वर्चस्व
असताना, भोज राजाने हा दुर्ग बांधलेला आहे असे मानले जाते. म्हणजे गडाचे
आयुरमान सुमारे ८०० वर्षे. पुढे १४ व्या शतकात माहिमच्या बिंब राजाने कोळी लोकापासून जिंकून घेतला. अशेरीभोवती
सागवानाच्या झाडांचे आफाट जंगल आहे. हि सागवानाची झाडे पुर्वी इमारती व
जहाज बांधणी साठी उपयोगी असल्याने इथली झाडे कापून त्याचा व्यापार चालायचा,
या व्यापारावर देखरेख ठेवण्यासाठी अशेरी गडाची निर्मीति झाली.
गुजरातचा सुलतान खोजा अहमद कडुन पोर्तुगीजानी हा गड १५५६ मधे काही पैसे लाच
देउन घेतला. यामुळे सहा परगणे व अडतीस गावे यावर पोर्तुगीज अंमल प्रस्थापित
झाला. अशेरीच्या उत्तरे -पुर्वेला चंदहारचे राज्य होते, दक्षिणेला निजामशाहीचा वचक होता, व
पाय्थ्याच्या घनदाट जंगलात कोळी राजांचे राज्य होते. या तिघाना शह द्यायला पोर्तुगीजानी किल्ला
मजबुत केला. किल्ल्यावर येण्याचे अनेक मार्ग बंद करुन, नव्याने तटबंदी उभारली, मोक्याच्या ठिकाणी
मेढेंकोट बांधून त्यावर तीन तोफा तैनात केल्या. पोर्तुगीज काळात गडावर सैनिक, स्त्री, पुरुष, मुले व कैदी असा सुमारे सहा,
सातशे जणाचा राबता होता, एवढ्या लोकांसाठी घरे, वाडे , खुले चर्च आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली
होती.
पुढे शिवकाळात इ.स. १६५७ मधे मराठ्यानी कल्याण भिवंडी घेतले. त्यावेळी
मुलुखाची लुटालुट दादोजी व सखो क्रुष्ण लोहोकरे या बधुनी पोर्तुगीजाना शरण यायला भाग पाडले. परंतु
हि लढाइ आदिलशहाविरुध्द होती. पण पोर्तुगीज साधनात या तहासंबधी काहीच येत
नाही. फक्त "त्याने ( शिवाजी महाराजानी ) आमच्या उत्तर विभागातल्या
मुलुखाला उपद्रव दिला" इतकाच उल्लेख व्हाईसरायने पोर्तुगीज राजाला १६५८
रोजी पाठविलेल्या पत्रात केला आहे. अशेरी १६७१ मधे पोर्तुगीजाच्या ताब्यात
होता, शिवाजी राजांकडे नव्हता. पुढे संभाजी महाराजानी १६८३ मधे
पोर्तुगीजाविरुध्द मोहिम उघडुन अशेरी ताब्यात घेतला, मात्र लगेच
पोर्तुगीजांनी परत तो मिळवीला. पण मराठ्यानी मे १६८४ मधे फिरून अशेरी
जिंकला, अर्थात ऑक्टोबर १६८७ मधे परत पोर्तुगीज अंमल सुरु झाला. हा खो खो
चा खेळ पुढे १७३८ मधे संपला.चिमाजी आप्पाच्या स्वारीत मराठ्यानी गडाला वेढा
घालून मोर्चे पार कड्याजवळ नेले. अखेर बरीच मेहनत घेतल्यानंतर २४ जानेवारी
१७३८ मधे अशेरी शरण आला. पेशव्यानी तो ब्रिटीश सत्ता येइपर्यंत तो ताब्यात ठेवला.
१८१८ मधे कॅप्टन डिकीन्सनने ब्रिटीश अंमलाखाली आणला. पुढे १८८१ च्या
उल्लेखाप्रमाणे किल्ल्याचा दरवाजा उध्वस्त स्थितीत होता.
खोडकोना फाट्यावरून गाव सुमारे एक कि.मी. आत आहे. ओढ्यावरचा पुल
ओलांडुन आम्ही गावात पोहचलो,
ash2
गावातुन समोरच गड दिसत होता. ( गडावर जाणारी वाट लाल रेषेत दाखवली आहे )
डावीकडे दिसणार्या खिंडीतुन वर जाण्याची वाट
आहे. जवळ पास २ कि.मी ची तंगडतोड करुन आपण खिंडीत पोहचतो, इथे बुर्हाणपुर गावातून
येणारी वाट मिळ्ते. एक वाट पश्चिमेच्या डोंगराकडे जाते, मात्र आपण
पुर्वेकड्ची वाट पकडून अशेरीच्या माथ्याकडे निघायचे.
ash3
आधी एक लाकडी खांब व त्यावर कोरलेले वाघाचे शिल्प दिसते. हा आहे आदिवासीचा
देव. पुढे गेल्यानंतर या कातळ कोरीव पायर्या दिसतात.
ash3
या पायर्या म्हणजे गडाच्या प्राचीनत्वावर शिक्कामोर्तब्च. कातळकडा
डावीकडे ठेवत थोडे चालल्यानंतर एका बुरुजासारख्या गोल कातळाला वळसा
घातल्यानंतर आपण पोहचतो एका अवघड ठिकाणी.
ash4
इथली चढायची वाट उध्वस्त झाल्याने पुर्वी असे प्रस्तरारोहण करायला लागायचे.
यामुळे पावसाळ्यात अशेरीला जाणे धोक्याचे होते. ( प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार )
ash5
मात्र आता हि लोखंडी शिडी बसविल्याने हा ट्प्पा सोपा झाला आहे.
ash7
त्यानंतर या कातळ कोरीव मार्गाने आपला बालेकिल्ल्यावर प्रवेश होतो.
ash8
समोर आपणास हे पोर्तुगीज राजचिन्ह पहाण्यास मिळते. भोळे भाबडे आदिवासी
याचीहि पुजा करतात. त्याच्यां बापजाद्य्याना ह्याच पोर्तुगीजानी किती छळले
याची त्याना कल्पना नसावी. असेच राजचिन्ह वसई किल्ल्यावर पहाण्यास मिळते.
ash8
पुढे माथ्यावर जाण्यासाठी या कातळ कोर्रीव सोपानाचा वापर करावा लागतो.
ash8
याच्यानंतर उजव्या बाजूला काही कोरीव पाण्याची टाकी लागतात. मात्र यातले
पाणी खराब आहे. पाण्यासाठी आपल्याला बालेकिल्ल्याच्या मध्यावर असलेल्या
घळीत असलेल्या टाक्यावर अवलंबून रहावे लागते, यासाठी अशेरी गडाच्या
ट्रेकवेळी पुरेसे पाणी सोबत ठेवणे आवश्यक आहे आणि मुख्य म्हणजे पिण्याच्या
पाण्याची टाकी सापडत नाहीत तो पर्यंत ते पुरवणे आवश्यक आहे.
ash74
पावसात पडलेल्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे यासाठी कातळात असे चर
खणलेले आहेत.
ash85
बालेकिल्ल्याच्या पुर्व भागाकडे निघालो कि डाव्या हाताला दरीसारखा भाग
लागतो, तिथेच कातळात खोदलेली पाण्याची टाकी आहेत.
ash8
पिण्यायोग्य पाणी फक्त याच टाक्यात आहे.
पाणी भरून पुर्व टोकाशी निघालो कि सपाटी लागते.
ash41
इथे राजवाड्याचे अवशेष दिसतात.
ash23
एक उखळी तोफही दिसते.
ash45
जरा पुढे गेले कि हि कातळ कोरीव गुहा किंवा लेणे दिसते.
ash62
आतमधे एका देवीची अनगड मुर्ती दिसते. अशेरीवर मुक्काम करायचा असल्यास हि
गुंफा एकदम बेष्ट. आता इथे संगमरवरी लाद्याही घातलेल्या आहेत. आम्ही इथे
थोडावेळ वामकुक्षी घेतली
( अर्थात पुणे स्टाइल नाही, नाहीतर आमच्या ट्रेकचा बोर्या वाजला असता.)
ash75
हा कोरीव काम केलेला एक खांब.
लेणे बघून थोडे आग्नेय कोपर्याकडे गेले कि एक घळ दिसते. ह्या घळीतून आपण
थेट खोडकोना गावात किंवा हायवेवर उतरू शकतो. पण नवख्यानी हे धाडस न केलेले
चांगले. इथून महामार्गावरची गाड्यांची वर्द्ळ दिसते.
ash5
सर्वोच्च माथ्याकडे निघालो कि काही घराचे चौथरे दिसतात.
ash8
अशेरीच्या माथ्यावर दोन मोठी तळी आहेत. पण विशेष आकर्षण म्हणजे हे तळे.
आपल्या ध्यानीमनी नसताना असंख्य कमळांनी भरलेले हे तळे आपल्याला खुष करुन
टाकते.
ash77
बहुधा २०१४ ला देशात कमळ उमलणार हे मला २०११ ला च समजले.
गडमाथ्यावरुन विस्त्रुत परिसर दिसतो. उत्तरेला महालक्ष्मी सुळका व
सेगवाह किल्ला, ईशान्येला गंभीरगड व सूर्या नदी, पश्चिमेला पिंजाल नदीचे पात्र, आग्नेयेला कोहोज किल्ला,
दक्षिणेला टकमक किल्ला व वैतरणा नदी तर नैक्रुत्येला काळदुर्ग दिसतो.
गड्फेरी उरकून प्रसन्नचित्ताने आम्ही खोडकोना गावात उतरलो. खरेतर आडसूळे
देखील बघण्याचा आमचा प्लॅन होता, पण अशेरीने इतका वेळ घेतला कि तो रद्द
करावा लागला.
ash1
मागे वळुन बघितल्यावर मावळतीच्या किरणात न्हाउन निघणारा अशेरी
आम्हाला निरोप देत होता.
ash85
तर पाण्यात प्रतिबिंब पहाणारा अडसुळ भेटीचे आमंत्रण देत होता.

अशेरी किल्ल्याचा नकाशा
ash64
अशेरी परिसराचा नकाशा
ash85
हायवे वरुन चक्क एका इनोव्हाची लिफ्ट घेउन आम्ही मस्तान नाक्याच्या
दिशेने निघालो. कारण दुसर्या दिवशीचा प्लॅन होता, किल्ले कोहोज. पुढच्या
आठवड्यात तिथे जाउ या.
सदर्भ ग्रंथः-
१ ) दुर्गसंपदा ठाण्याची- सदाशिव टेटविलकर
२ ) शिवछत्रपतीच्या दुर्गाचां शोध - गुरुसिध्द अक्कलकोट
३ ) ठाणे जिल्हा गॅझेटिअर
४ ) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स
५ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
६ ) डोगंरयात्रा- आनंद पाळंदे
७ ) डोगंरयामैत्री- आनंद पाळंदे

प्रतिक्रिया

'सांगाती सह्याद्रीचा' आहे तुमच्याकडे? मागे मला मिळालं नव्हतं.

फारच छान माहिती दिलीत. फोटोही छान. पुढील गडाच्या प्रतीक्षेत.

दुर्गविहारी's picture

7 Apr 2017 - 8:46 pm | दुर्गविहारी

सांगाती सह्याद्रीचा मी २००२ साली घेतले होते. बहुतेक आता मिळत नाही.

स्वच्छंदी_मनोज's picture

10 Apr 2017 - 5:05 pm | स्वच्छंदी_मनोज

नक्की खात्री नाही पण बहुतेक मिळते. पण दुसरी एडीशन न छापल्याने पहील्या एडीशनमधील फार फार कमी प्रती राहील्या असाव्यात.

खरेतर त्याकाळात अत्यंत कमी साधने असताना फारच मोठे डोंगराएवढे काम यंग झिंगारोच्या लोकांनी करून ठेवले आहे पण ह्याची सद्यस्थितीतील माही अपडेट करून सुधारीत आवृत्ती निघावी अशी जाम ईच्छा आहे.

प्रचेतस's picture

10 Apr 2017 - 5:47 pm | प्रचेतस

मलाही जवळपास १२/१३ वर्षांपूर्वी मोठ्या मुश्किलीनं मिळालं होतं.

प्रचेतस's picture

10 Apr 2017 - 5:48 pm | प्रचेतस

मलाही जवळपास १२/१३ वर्षांपूर्वी मोठ्या मुश्किलीनं मिळालं होतं.

वेल्लाभट's picture

7 Apr 2017 - 7:11 pm | वेल्लाभट

जबर. जबर.. मस्त माहिती. वाह. अजून येऊदेत :) मजा येतेय वाचायला.

अतिशय सुरेख लिहिलंय. तपशीलवार आणि छायाचित्रेही पूरक आणि सुरेख.

उत्तर कोकणात शिलाहारांचे वर्चस्व
असताना, भोज राजाने हा दुर्ग बांधलेला आहे असे मानले जाते.

उत्तर कोकण शिलाहारामध्ये भोज राजा नव्हता. भोज पहिला आणि भोज दुसरा हे कोल्हापूर शिलाहार शाखेत होऊन गेले. भोज दुसऱ्याच्या नावावर सातारा, कराड, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील काही किल्ल्यांचं पालकत्व जातं. उदा. वैराटगड, पांडवगड, कमळगड, पन्हाळा, रोहिडा, दातेगड, गुणवंतगड, वल्लभगड, सामानगड इत्यादी.

आपणास हे पोर्तुगीज राजचिन्ह पहाण्यास मिळते

त्याला पोर्तुगीज कोट ऑफ आर्म्स असे म्हणतात. वसई, कोर्लईत ही राजचिन्हे आहेत, गोव्यात तर विपुलतेने दिसतात.

पन्हाळ्याच्या दुसर्‍या भोज राजाने हा किल्ला बांधल्याचे मानले जाते.
बाकी प्रतिसादाबध्द्ल एस, वेल्लाभट आणि वल्लीदाचें आभार

त्या शाखेने इकडे कधीच राज्य केलं नाही. हा भाग उत्तर कोकण च्या शिलाहारांच्याच ताब्यात होता.

पैसा's picture

7 Apr 2017 - 10:11 pm | पैसा

मालिका मस्त चालू आहे.

इरसाल कार्टं's picture

8 Apr 2017 - 10:58 am | इरसाल कार्टं

कामलं बघितली कि प्रसन्न वाटते.

किसन शिंदे's picture

8 Apr 2017 - 11:37 am | किसन शिंदे

अतिशय विस्तृत माहिती दिली आहे या किल्ल्याबद्दल. छायाचित्रेही आवडली.

अत्रुप्त आत्मा's picture

8 Apr 2017 - 9:36 pm | अत्रुप्त आत्मा

प्लस वण!

कपिलमुनी's picture

8 Apr 2017 - 1:38 pm | कपिलमुनी

माहितीपूर्ण भटकंती आवडली.

नीलमोहर's picture

8 Apr 2017 - 2:52 pm | नीलमोहर

लेखमाला वाचत आहेच,
तुमच्याबरोबर आम्हालाही अशा अनवट ठिकाणांची सैर
घडवून आणल्याबद्दल धन्यवाद :)

पाटीलभाऊ's picture

10 Apr 2017 - 10:29 am | पाटीलभाऊ

अजून येऊ द्या...!

दुर्गविहारी's picture

10 Apr 2017 - 10:46 am | दुर्गविहारी

सर्वच प्रतिसादकांचे मनापासून आभार. या सर्व दिग्गजाना माझे वेडेवाकडे लिखाण आवडतय हे बघून मला लिहीण्याबद्दल प्रोत्साहन मिळाले. जर फार काही अडचण आली नाही तर पुढच्या अडीच तीन वर्षे लिहू शकेन इतकी माहीति माझ्याकडे आहे. शक्य तितके नियमित लिहीण्याचा प्रयत्न करेन.
या शुक्रवारी कोहोजवर लेख येईलच.

स्वच्छंदी_मनोज's picture

10 Apr 2017 - 5:08 pm | स्वच्छंदी_मनोज

थोडासा आडवाटेचा पण सुंदर असा किल्ला आहे. आमच्या ८ वर्षांपुर्वी केलेल्या ह्या किल्ल्याच्या भटकंतीची आठवण आली.

यशोधरा's picture

10 Apr 2017 - 6:39 pm | यशोधरा

मस्त लिहिलेय. काय दिसत असेल ते कमळांनी भरलेले तळे!
पहिले दोन फोटो दिसत नाहीयेत.
आवडलं लिखाण.

इरसाल कार्टं's picture

20 Apr 2017 - 2:57 pm | इरसाल कार्टं

गुगल मॅप्स वर सेव्ह करणेत आले आहे, माहुलीनंतर इकडे मोहीम आखली जाईल.