देव्हारा...२
"म्हणजे! हुशार, सुंदर, बोलकी. पण तू एकटीच! त्या आदेश आणि अभिजितला नको हं!" तो बजावत म्हणाला.
"का?" तिने आश्चर्याने विचारले.
"हे बघ, आमचा ग्रुप खुप शिस्तप्रिय आणि अभ्यासू आहे." तो फुशारकी मारत उत्तरला. त्याच्यापासून पिच्छा सोडवावा म्हणून तनूने वह्या आवरल्या आणि ती लायब्ररीबाहेर आली. संदिप पण तिच्या पाठोपाठ बाहेर आला. ती काही बोलली नाही याचा अर्थ त्याने होकारार्थी घेतला.>>>>
"आता तूच बघ ना, आदेश ठिक आहे. पण तो आहे त्या अभिजितचा जानी दोस्त! आणि अभिजित म्हणजे... श्रीमंत बापाचा लाडावलेला कार्टा! काहीतरी ताळतंत्र आहे का त्याला? कधीही येतो कॉलेजला, लेक्चर बंक करतो. वर सगळ्या मुली त्याच्याच मागे! आता मुलीच मागे येतात म्हटल्यावर तो काय ब्रम्हचारी तर नाही ना!" संदीपची फालतू बडबड ऐकणे तिला असह्य झाले होते आणि अभिजितला टार्गेट बनवले म्हटल्यावर ती भडकलीच.
"इनफ! संदीप, तू आणि तुझा ग्रुप्! एकजात सर्व लंपट आहात. मुलींशी बोलायला मिळावे म्हणून तुम्ही वेगवेगळ्या समित्यात सामील होत असता, अभ्यासूपणाच्या गोष्टी तू मला सांगू नकोस. एटीकेटी मिळवून कसेबसे पुढच्या वर्षात जातात बिचारे! आणि अभिजित दरवर्षी टॉपरच असतो. तो इथे आहे म्हणुन मुलीं सुरक्षित आहेत. नाहीतर तुमच्यासारखे टोळभैरव त्यांना शिकू पण देणार नाहीत. अभिजीत कसा आहे आणि काय आहे ते मला तुझ्याकडून ऐकायची गरज नाहीये. आणि हे सर्व जर मी अभिला सांगीतले तर तुझे काय होईल याचा तू..." तनूने वाक्य पूर्ण करण्याआधीच संदिप तिथून गायब झाला होता.
"मूर्ख, ईडियट!" ती, तो गेला त्या दिशेला पहात उद्गारली.
"कोण गं?" मागून येणार्या आदेशने विचारले.तिने वळून पाहीले. दोन्ही खिशात हात घालून अभिजीत त्याच्या पाठोपाठ होताच.
"कुठे कोण?" तिने खांदे उडवत विचारले.
"तनू..." आदेशने गंभीरपणे विचारले.
"काय फरक पडतो, आदेश! जो तो स्वतःला पाहीजे तसेच वागतो ना!" ती आदेशला ओलांडून लायब्ररीच्या दाराकडे गेली. अभिने तिची वाट अडवली. तिने त्याच्याकडे पाहीले.
"सॉरी!" अभिजीत दोन्ही हातांनी कान पकडत म्हणाला.
"अभिऽ" ती त्याचे हात खाली ओढत पुटपुटली. खिशातून कॅडबरी काढून त्याने तिच्यासमोर धरली. तिने ती पटकन घेतली.
"बघ मी म्हटले नव्हते, हिला पटवणे माझा डाव्या हाताचा मळ आहे." अभि आदेशला म्हणाला तसे ती मोठ्या डोळ्यांनी दोघांकडे पाहू लागली.
"काही नाही गं! चल रे!" आदेशने त्याच्या पाठीवर थाप मारली. अभिजीत हसू लागला, तनूने पण स्मित केले. तिघेही क्लासरुमकडे चालू लागले. चहाच्या पेल्यातले वादळ संपले होते.
आदेश लेक्चर अटेंड करत होता. तो तनूचा विषय नसल्याने ती बाहेरच होती. खरे तर तिला एक महत्वाचे पुस्तक आणायला जायचे होते. अभि येण्याची वेळ झाली होती. त्यामुळे ती पार्किंगकडे चालू लागली. कॉलेजच्या गेटजवळच शेड घालून पार्किंग बनवले होते. मधले गेट ओलांडून ती पुढे आली. समोरुन येणारा कुणाल तिच्याकडे पाहून हसला.
"हॅलो! कशी आहेस?" त्याने विचारले.
कुणाल तिच्यापेक्षा सिनीयर होता. अकरावीलाच तिची त्याच्याशी ओळख झाली होती आणि चार वर्षात चांगली मैत्री ही जुळली होती. पुर्ण कॉलेजमधे त्याचे नाव बदनाम होते. प्रिन्सिपलपासून प्युनपर्यंत सर्वजण त्याला टरकून होते. तनू मात्र त्याचा नेहमी आदरच करत असे. त्याच्या स्वभावाचा चांगला भाग तिने पाहीला होता. त्यामुळे आत्ताही त्याला पाहून ती थांबली.
"मी ठीक आहे, तू कसा आहेस? दिसला नाहीस बरेच दिवस?" तिने चौकशी केली.
"गावाला गेलो होतो. कालच आलो. बाकी अभ्यास जोरात दिसतोय." त्यांचे बोलणे चालू होते. काही तरी विनोद झाला आणि तनू खळखळून हसली. बाईकवर पार्कींगमधे शिरलेल्या अभिने तिकडे नजर टाकली. तिला कुणालबरोबर बोलताना पाहून त्याच्या कपाळावर आठया पडल्या.
"चल भेटूया परत!" ती निरोप घेत म्हणाली. अभिजीत आलेला कुणालने पण पाहीले होते. तनूला त्याला भेटण्याची घाई आहे हे त्याला चट्कन उमगले. तो हसून पुढे निघून गेला. ती पार्किंगमधे आली तेव्हा अभि गाडीच्या आरशात बघून केस नीट करत होता.
"अभि, 'मॉडर्न' मधून मला एक पुस्तक आणायचे आहे, चल ना!"
"कुणालला घेऊन जा." तो तुसडेपणे उत्तरला.
"एवढे काय झाले तुला चिडायला? चांगला मुलगा आहे तो!" ती म्हणाली.
"म्हणून तर सांगतोय ना, त्याला घेऊन जा!"
"गेले असते रे... पण त्याच्याकडे रेसर बाईक नाही ना ...तुझ्यासारखी!" ती हसू दाबत मुद्दामच उद्गारली.
"बाईकसाठी गरज पडते का तुला माझी?" अभिजीतच्या कपाळावरची शीर ताडताड उडू लागली. आता मात्र तनूची तारांबळ उडाली. तो चिडणार हे तिला माहीत होते. पण त्याला शांत करताना तिच्या नाकीनऊ आले.
"गंमत केली रे! चल ना." ती लाडी गोडी लावत म्हणाली. जरा रागातच त्याने बाईक सुसाट बाहेर काढली. तनू त्याच्या खांद्यांना धरुन बसली होती. समोरुन एखादी गाडी येताना दिसली की ती त्याचा खांदा घट्ट धरुन ठेवायची. दुकानाजवळ बाईक थांबली आणि ती खाली उतरली.
"मला कशाला मागे ओढतेस गं?" त्याने रागानेच विचारले. ही गोष्ट तिच्या लक्षात पण आली नव्हती, त्यामुळे त्याचा प्रश्न तिला समजलाच नाही.
"कोण?" तिने भाबडेपणाने विचारले. त्याच्यापासून थोड्या अंतरावर एक सुंदर तरुणी बाईक पार्क करत होती.
"ती!" अभिने तिच्याकडे निर्देश केला. तनू फिसकन हसली. अभि चिडलेला आहे हे लक्षात येवून तिने हसणे दाबले, पण अभिचा चेहरा पाहून तिला हसण्याची अजून जोरात उबळ आली. अभिजीत पण राग विसरुन तिच्याबरोबर हसू लागला.
पुस्तक घेऊन ते कॉलेजमधे परत आले. आदेश त्यांचीच वाट पहात होता.
"चला रे कॅन्टीनला!" अभि म्हणाला.
"तुम्ही चला पुढे! मी लायब्ररीत जाऊन येते." तनू पर्स उचलून निघून गेली. दोघेजण रमत गमत कॅन्टीनकडे चालू लागले.
" आदेश, रात्री मी ब्रुसलीची मुव्ही बघीतली. काय फंटास्टीक होती."
"अभि, परिक्षा जवळ आली आहे. अभ्यास कधी करतोस?" आदेशने विचारले.
"करतो रे! कंटाळा आला तरच! तुला माहीत आहे ना, कॉस्टिंगमधे स्पेशलायझेशन करणार आहे मी. तू आणि तनू जाल फायनान्सला! पण आमच्या बिझनेसच्या दृष्टीकोनातुन मला कॉस्टिंग शिकले पाहीजे. पपांची फार इच्छा आहे! पुढच्या वर्षी फायनल इयर ! मग मी परत घरी आणि तुम्ही? पण आपण वर्षातून एकदा तरी भेटायचेच, कुठे ही असलो तरी! " अभिजीत आज फार भावनाशील झाला होता.
"नक्कीच! आपण म्हातारे झालो तरी सुध्दा दर वर्षी भेटायचेच. पहीले आपल्या बायका बरोबर असतील, मग मुले, मग सुना-जावई, नंतर नातवंडे!" आदेश म्हणाला आणि दोघेही खोऽ खोऽ हसू लागले. लांबून येणारी तनू दिसली तसे अभिजीतने हसू जरा आवरले.
"आदेश, तुला गंमत सांगतो. आज बाईकवर तनूला घेऊन गेलो. बाईक जरा वेगात निघाली की मी मागे खेचला जायचो. मला आधी कळलेच नाही असे काय होतेय? नंतर लक्षात आले, या बाईसाहेब खांद्याला धरुन बसल्या होत्या, त्या मला मागे खेचायच्या आणि उतरल्यावर 'असं काय करतेस?' म्हणून विचारले तर 'कोण?' म्हणून मलाच विचारतेय." हसून हसून आदेशच्या डोळ्यांत पाणी आले. तनू तिथे पोहोचली तसे, आदेशने तिला 'कोण?' म्हणून वेडावले.
"सांगितलंच लगेच!" तिने अभिच्या पाठीत बुक्का घातला. आलेले हसू तिला ही आवरता आले नाही.
"तनू, आज आम्ही एक निर्णय घेतला आहे. कॉलेज संपले तरी आपण वर्षातून एकदा तरी भेटायचे." आदेश म्हणाला
"हो ना, खरंच! किती छान आयडीया. म्हणजे आपण नेहमी एकमेकांच्या संपर्कातच राहू." आनंदाने तिचे डोळे लकाकले.
"पण आदेश , हिच्या नवर्याने परवानगी दिली नाही तर..?" अभिने रास्त शंका मांडली.
"हो रे! तू म्हणतोस ते बरोबर आहे."
"का नाही देणार परवानगी? " तिने मुद्दा खोडत विचारले.
"म्हणजे कसे बघ, तू आहेस मुलगी. आम्हाला भेटायचे म्हटल्यावर तुझा नवरा हजार गोष्टी विचारणार. कोण? कसे? कशाला? इत्यादी. त्यात आम्ही दोघे पण एवढे स्मार्ट, हॅन्डसम! म्हणजे संशयाला जागाच! त्यात पण हिला कसला नवरा मिळतोय काय माहीती?" अभिजीत चिडवत म्हणाला.
"काहीही झाले तरी आपण दर वर्षी भेटायचेच." ती हट्टीपणाने म्हणाली.
"बघ बुवा! हिचा नवरा पोलिसबिलीस असेल तर काही खरे नाही, म्हणजे आपण बोलत बसलो की तो आपल्या चारी बाजुने घिरट्या घालत फिरणार. वकिल असला तर लगेच दावा लावणार."
"पण हे दोन प्रोफेशनच का? अजून पण आहेत ना, शाळेत गुरुजी आहेत, पोस्टमन आहे. अजुन काय गं तनू?" आत्तापर्यंत हे दोघे आपली फिरकी घेत आहेत हे तिच्या लक्षात आले होते.
"अजून ना! तुमच्या दोघांच्या ढालगज बायका काय हैदोस घालतायेत ते मी पण बघेन. आणि या राजाधिराजांना त्यांची पडदाशीन बायको कशी सांभाळतेय ते पण मला बघायचय." तिचा रोख अभिकडे होता.
"सांभाळेल, सांभाळेल. तुला नको काळजी! " अभि आदेशला डोळा मारत म्हणाला.
"मी कशाला काळजी करु? ती पण तुझी!" ती नाक उडवत म्हणाली.
लेक्चरची वेळ झाली म्हणून तिघेही उठले.
(क्रमशः)
प्रतिक्रिया
8 Apr 2017 - 10:52 am | संजय क्षीरसागर
आणि लेखनशैलीपण छाने !
8 Apr 2017 - 11:06 am | रातराणी
पुभाप्र!
8 Apr 2017 - 11:12 am | पैसा
वाचत आहे
8 Apr 2017 - 11:20 am | विनिता००२
मनःपूर्वक धन्यवाद ___/\___
10 Apr 2017 - 2:58 pm | ५० फक्त
बरीच मॅच्युअर्ड विद्यार्थी दिसतात, उगाच डोळ्यासमोर स्वप्निल जोशी आणि अम्रुता खानविलकर आले.