अनवट किल्ले: गंभीरगडाची सफर

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
1 Apr 2017 - 8:22 pm

बहुतेक ट्रेकर किल्ले फिरायचे ठरविले कि पुणे, रायगड, नगर , नाशिक, सातारा किंवा कोल्हापुर या जिल्ह्यातले किल्ले फिरतात. पण प्रंचड आडव्या तिडव्या पसरलेल्या या महाराष्ट्रात बाकीच्या जिल्ह्यातही तितकेच प्रेक्षणीय किल्ले आहेत, त्यांची ओळख या लेखमालेतून आपण करुन घेउ.
आजचा पहिला किल्ला जो आपण पाहणार आहोत तो आहे, ठाणे जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातिल गंभीरगड. तसा महाराष्ट्राच्या एका कोपर्‍यात असलेला हा गड, आपल्याला भेटीत अतिशय आनंद देउन जातो. गंभीरगड, कोहोज आणि अशेरी अशी दुर्ग त्रिकुटाची यात्रा करण्यासठी मी व माझा मामे भाउ संकेत डहाणू गावात दाखल झालो. ईथून मुंबई- अहमदाबाद हायवेवरील चारोटी नाक्यावर जाण्यासाठी बस पकडली. चारोटी नाक्यावर लॉज, दुकानांची गजबज आहे. काही खरेदी करायची असल्यास ती इथेच करता येते. डहाणूवरुन चारोटी कडे येताना "आशागड" नावाचे गाव लागते. इथे कोणताहि किल्ला नाही, परंतु जव्हार संस्थानाच्या राणी आशादेवी याच्यांसाठी बांधलेला वाडा आहे. चारोटीहुन पुढे अहमदाबादच्या दिशेने गेल्यास महालक्ष्मी सुळक्याकडे तसेच सेगवाह, कण्हेरी व बल्लालगड हे किल्ले पहाता येतात, त्यांच्याविषयी परत कधीतरी.
गंभीरगडला जाण्यासाठी चारोटीहुन प्रथम पुर्वेला असलेल्या कासा या गावी जावे लागते. फक्त दोन कि.मी. वर हे गाव आहे. यानंतर जायचे आहे, "सायवन" या गावी. नशिबात असेल तर बस नाहीतर खाजगी जीप आहेतच. पाउण तासात आपण २० कि.मी. वरच्या सायवन गावात दाखल होतो. इथून समोरच गंभीरगड दिसत असतो, पण अदयाप ५ कि.मी. वरच्या पायथ्याच्या व्याहाळी( पाटीलपाडा) गावी जायचे असते. आम्ही सरळ रिक्षा केली. रिक्षा ड्रायवरने आम्हाला काही माहिती दिली, त्यानुसार गंभीरगडाच्या विकासासाठी २ कोटी मंजूर झालेत असे कळले, बघूया आता गंभीरगडाचे अच्छे दिन येताहेत का?
पायथ्याच्या व्याहाळी गावात उतरलो, हा अदिवासी पाडा आहे, मुक्कामाला अजिबात सोयीचा नाही. गडावरही मुक्कामा योग्य जागा नाही, तेव्हा त्या द्रुष्टीनेच हा ट्रेक प्लॅन करावा. फारतर कासा किंवा चारोटीला मुक्काम करता येइल. व्याहाळी हे लहान घरांचे आणि ताडीच्या झाडानी वेढलेल गाव आहे.
Gambhirgad from base
पाड्यावरुन थेट समोर गंभीरगड दिसत असतो. गडाच्या दिशेने निघाल्यावर एका शिळेवर पावले कोरलेली दिसतात, गावकरी ती "सीतेची पावले" आहेत असे सांगतात. बहुतेक कोणाची तरी सतिशीळा असावी.
Top of Gambhirgad
जवळ पास एक कि.मी. ची वाट्चाल केल्यानंतर गडाची चढण सुरु झाली. सुरवातीचा भाग झाडी भरला आहे, मात्र दोन तॄतीयांश चढण संपल्यानंतर उजाड भाग आहे. एव्हाना माथा जवळ दिसू लागतो.
Fortification
माथ्याआधी अतिअल्प तटबंदीचे अवशेष दिसू लागतात. गंभीरगडाची उंची २०५० फुट आहे. त्यामुळे पायथ्याच्या व्याहाळी गावापासून ते माथ्यापर्यंत पोहचायला किमान दोन ते अडीच तास लागतात. इथे एक मेट आहे, ज्यावर चांदमाता देवीचे मंदिर आहे.
map
गंभीरगडाचा नकाशा
या उध्वस्त तटबंदीवरून आपला किल्ल्यावर प्रवेश होतो. गावातुन इथवर येण्यासाठी दिड तास लागतो. गंभीरगड माची ब बालेकिल्ला अशा दोन भागात विभागला असुन किल्ल्याचा डोंगर C आकारात ४० एकर परिसरात पुर्वपश्चिम पसरलेला आहे. माचीवर मोठ्या प्रमाणात जंगल वाढले असल्याने माचीवरील अवशेष त्यात लुप्त झाले आहेत. माथ्याचे खडक विदारीत म्हणजेच ठिसूळ असल्याने थेट माथ्याखाली मुक्काम योग्य नाही, तसेच माथ्यावरही बिलकूल सपाटी नाही.
Panyache Take
डाव्या कोपर्‍यात खडकात कोरून काढलेल पाण्याचे टाके आहे, त्यासाठी थोडे प्रस्तरारोहण करत टाक्यावर चढावे लागते, तसेच पाणी खोल असल्याने पोहरा आवश्यक आहे. अर्थात गावकर्यानी तिथे एक पोहरा ठेवलेला आहेच, तरी तो नसेल हे गॄहीत धरून जाताना लांब दोरी नेली तर पाण्याची गैरसोय होणार नाही.
ghg
आत्तापर्यंतच्या दोन तासाच्या चढाइने थकलेलो आम्ही दोघे वरच्या भर्राट वार्याने सुखावलो. माथा विलक्षण खडकाळ आहे, अजिबात सपाटी नाही, त्यामुळे वास्तुंचे अवशेष बघायला मिळत नाहीत. वाटेत काही कोरीव शिळा व दगड तसेच कमळाचे फुल कोरलेला एक कोरीव दगड दिसुन येतो.माथ्यावर फक्त हे आदिवासींच्या देवीचे, जाखमातेचे मंदिर पहाण्यास मिळते.
Water kristen
बाकी डावीकडील टोकाकडे असणारे मनोर्यासारखे हे सुळके जबरदस्त आहेत. उजवीकडे सपाट कातळमाथा नजरेस पडतो. या दोन माथ्यांच्या मधील भागाच्या दिशेने वाटचाल केल्यावर अर्ध्या तासात आपण गडाच्या उध्वस्त तटबंदी समोर पोहोचतो. इथे आम्हाला पायथ्याच्या गावातील काही मुले भेटली, त्यानी आम्हाला बरीच माहिती दिली, जी कदाचित आम्हाला एरवी मिळू शकली नसती. तटबंदीखाली असलेल्या बांधीव पायऱ्या पहाता गडाचा दरवाजा देखील याच भागात असावा पण सध्या दरवाजाचे कोणतेही अवशेष वा खुणा दिसुन येत नाही. माचीवर असलेल्या या उध्वस्त तटबंदीत ढासळलेले तीन बुरुज पहायला मिळतात. माचीवरील तटबंदीला समांतर वाटेने काही अंतर गेले असता एका ठिकाणी मोठया प्रमाणात गडाची ढासळलेली तटबंदी दिसुन येते. त्या मुलाना" तोफा कोठे आहेत ?" हे विचारल्यावर," या ठिकाणी तटावर दोन तोफा होत्या, पण आता दिसत नाहीत" हे त्या मुलानी सांगितले. पण १५ ते २० वर्षापुर्वी हा तट कोसळला असुन त्या तोफा या दगडाखाली गाडल्या असाव्यात किंवा दरीत कोसळल्या असाव्यात. महाराष्ट्रातील किल्ल्यांचे हे दुर्दैव म्हणायला हवे, आपल्या बापजाद्यानी घाम गाळून निर्माण केलेला ठेवा आपण जपु शकु नाही.
uuu
वरून उत्तरेला गुजरात मधील वापी मधला मधुबन तलाव व त्याच्या मधोमध असणारा बेटावरचा वेताळगड किल्ला दिसतो. पश्चिमेला सेगवाह व कन्हेरा हे किल्ले तसेच महालक्ष्मी सुळका दिसतो. पुर्वेला जव्हार,मोखाड्याचा परिसर दिसतो. तसेच हर्षगड दिसतो. वायव्येला डहाणू, उबंरगाव, संजाण पंर्यतची समुद्राची किनार तर दुर दक्षीणेला अशेरी, अडसुळ यांची कातरलेली डोंगररांग दिसते.
gambir
या शिवाय माथ्यावर पाण्याची कोरीव तीन टाकी दिसतात. पाणी अर्थातच खराब आहे.
h
पुर्वेकडून गिरीथड या गावातून देखील या किल्ल्यावर येता येते. आजुबाजूला असलेले जंगल व त्यात पट्टेरी वाघ, बिबट्या, कोल्हे अश्या वन्यप्राण्यांचा वावर, एकूण अनवट निसर्ग आहे.
या किल्ल्याच्या माथ्यावर एक भुयारही दिसते, त्याचा संबध गावकरी इतिहासाशी जोडतात. अर्थात गंभीरगडाचा इतिहास फारसा उपलब्ध नाही. दक्षिणेकडे मुसुलमानी अंमल सुरु होण्यापूर्वी उत्तरकोंकणचा बराचसा भाग कोळी व वारली जहागिरदारांच्या ताब्यांत होता. जव्हार येथें वारली राजा गादीवर असताना थळघाटाजवळ मुकणें या गांवीं पापेरा अथवा जयबा नांवाचा एक कोळी जमीनदार होता. त्याने कोळी लोक जमवून पेंढ,धरमपूर हीं गांवें ताब्यात घेतली व काठेवाडांत सात वर्षे राहिला. तेथुन परतल्यावर त्याने जव्हारच्या वारली राजाकडून कपटाने त्याचे राज्य घेतलें व त्याला जव्हारपासून ६ कोसांवरील गंभीरगड व त्याच्या भोंवतालचा प्रदेश जहागिरीदाखल दिला. या वारली राजाने गंभीरगडची काही प्रमाणात दुरुस्ती केली. त्यानंतर मुघल आक्रमणावेळी मुकणे राजाने मुघलांशी संधान साधुन वारली राजाला गंभीरगडावर कैद करुन त्याचा खुन केला व गंभीरगड संस्थान जव्हार संस्थानात सामील केले. शिवाजी महाराजांनी दुरुस्त केलेल्या किल्ल्यांच्या यादीत गंभीरगडचा संदर्भ आढळतो. इ.स.१६७२-७७ दरम्यान मोरोपंत पिंगळे यांनी सेगवा गडाबरोबर गंभीरगडही स्वराज्यात आणला. छत्रपती संभाजीराजे यांनी इ.स.१६८३ रोजी उत्तर कोकणावर स्वारी केली असता त्यांनी तारापूर, अशेरीगडासह गंभीरगडही जिंकून घेतल्याची नोंद आहे. इ.स. १७३७-३९ मधील वसई मोहिमेत चिमाजीअप्पांनी ठाण्यातील इतर किल्ल्यांबरोबर गंभीरगडही जिंकून घेतला. १६ मे १७३९ रोजी शेवटचा हल्ला वसई किल्ल्यावर करून पोर्तुगीजांचे उत्तर कोकणातुन कायमचे उच्चाटन केले. नंतरच्या काळात हा किल्ला जव्हारकरांच्या ताब्यात गेला असावा कारण २४ फेब्रुवारी १७५० रोजी गंभीरगड किल्ला व त्याखालील महाल रामदेव राणा रामगीरकर कोळी यांजकडून राघोबा नारायण यांनी जिंकुन घेतल्याची नोंद पेशवे दफ्तरात आढळते.
Area map
गंभीरगड परिसर
पायथ्यापासुन गड फिरून इथवर येण्यास चार तास लागतात. गंभीरगडावर याशिवाय तलासरीहून नाशीकरोडने उधवा नाक्याकडे येताना दापसरीहुन येता येते. इथे धरण आहे आणी बॅकवॉटरमधे पक्षांची जत्रा भरलेली असते. एकूणच एक रम्य परिसरातला दिवस कारणी लागतो.
gnh
गंभीरगडावर निसर्गाने निर्माण केलेला मानवी चेहरा ( प्रकाशचित्र आंतरजालावरून)

गंभीरगडाची व्हिडीओतून सफर
संदर्भः-
१) दुर्गसंपदा ठाण्याची :- सदशिव टेटविलकर
२) डोंगरयात्रा:- आनंद पाळंदे
३) ठाणे जिल्ह्याचे गॅझेटीयर
४) भटकंती- मिलिंद गुणाजी

प्रतिक्रिया

वा! फारच अनवट. पुण्याहून हा किल्ला किंवा आजूबाजूचेही किल्ले करायचे असल्यास कसे जावे व कशा पद्धतीने नियोजन करावे?

दुर्गविहारी's picture

2 Apr 2017 - 3:19 pm | दुर्गविहारी

पुण्याहून यावयाचे झाल्यास भिंवडी बायपास, अहमदाबाद हायवेने चारोटी नाक्याला यायचे. पुढचा रस्ता दिलेला आहेच, किंवा रेल्वेने यायचे असल्यास, बोरिवली किंवा मुंबई सेंट्रलहून अहमदाबादकडे जाणारी गाडी पकडून डहाणू रोड स्टेशनला उतरावे, तिथून डहाणु गावात जाउन चारोटीला जाणारी बस पकडावी. खाली दिलेले नकाशे उपयोगी पडतील.
गंभीरगडाचा नकाशा
Gambhir top
हा परिसराचा नकाशा
parisar
या भागात आल्यास गंभीरगडाबरोबरच अशेरी, सेग्वाह, कण्हेरी, कोहोज, अडसूळ, कालदुर्ग व महालक्ष्मी सुळका हे बघता येते, शिवाय डहाणू, तारापूर, शिरगाव हे समुद्री किल्ले बघता येतील.
माझ्या या लेखमालेत मी त्याविषयी लिहीणारच आहे,

वा! या माहितीबद्दल आणि आगामी लेखमालिकेबद्दल धन्यवाद!

मस्त! शेवटच्या प्रचिमध्ये दगडांची घडण एखाद्या चेहर्‍याप्रमाणे दिसते आहे!

प्रचेतस's picture

1 Apr 2017 - 10:13 pm | प्रचेतस

फारच छान.
किल्ला अतिशय उजाड, भकास दिसतोय.

मला असेच किल्ले जास्त आवडतात. कावळ्या किल्ला (वरंध घाटातला) हाही एक असाच.

प्रचेतस's picture

3 Apr 2017 - 8:59 am | प्रचेतस

सह्याद्रीचा खरा राकटपणा त्यांच्यातूनच दिसतो :)

हे अनवट किल्ले टाळले जातात याशी सहमत.

दुर्गविहारी's picture

2 Apr 2017 - 3:23 pm | दुर्गविहारी

मिसळपाव वरच्या माझ्या ह्या पहिल्याच धाग्याचे स्वागत झाले, याचा आनंद आहे, शक्यतो दर आठवड्याला अशाच अनवट किल्ल्याविषयी लेख लिहीत जाइन. एस, यशोधरा, वल्ली व कंजुसकाका यांना धन्यवाद

शक्यतो दर आठवड्याला अशाच अनवट किल्ल्याविषयी लेख लिहीत जाइन.

वा, छान. जरुर लिहा. वाट बघत आहे.

अनवट किल्ले नावाची मालिकाच कर ना मित्रा ! मस्त होईल.

अप्रतिम वर्णन. अप्रतिम किल्ला. सध्या ट्रेकिंगचा विसर पडल्याने सुरुवातीला जळजळ वाटली पण छान वाटलं. :)

पैसा's picture

2 Apr 2017 - 4:56 pm | पैसा

सुंदर लिहिलय! येऊ दे असेच अजून लेख!

ठिकाणाचा रेखा नकाशा फार कामाचा आहे.

ऋतु हिरवा's picture

2 Apr 2017 - 7:23 pm | ऋतु हिरवा

लेख आणि फोटो छान. सुळके आणि तुटलेल्या दगडांच्या कपार्या मस्तच

आषाढ_दर्द_गाणे's picture

3 Apr 2017 - 8:47 am | आषाढ_दर्द_गाणे

असे किल्ले सर करायची मजाच वेगळी असेल, नई?
लेखमालिका नक्की चालू ठेवा...

पाटीलभाऊ's picture

3 Apr 2017 - 9:44 am | पाटीलभाऊ

फार सुंदर वर्णन आणि फोटो...!

दुर्गविहारी's picture

3 Apr 2017 - 10:50 am | दुर्गविहारी

सर्वच प्रतिसादकांचे आभार. पुढच्या लेखात सुस्पष्ट नकाशे देत जाइन. त्याचा नंतर जाण्याराना उपयोग होईल. या आठवड्यात भेटुया शिलाहारकालीन अशेरी गडावर

जगप्रवासी's picture

3 Apr 2017 - 5:47 pm | जगप्रवासी

यानिमित्ताने नेहमीचे किल्ले सोडून नवीन गडांची माहिती होईल. फोटोंमध्ये कंजूसपणा करू नका, भरपूर फोटो येऊ द्या आणि लिहीत रहा.

रुपी's picture

15 Jun 2017 - 4:04 am | रुपी

छान माहिती.