तुटली सतार पण मी गाते म्हणून आहे
या मैफलीत मीही,'नाते' म्हणून आहे!
निर्व्याज सोबतीच्या भेटी गहाळ झाल्या
नाते अता खरेतर 'खाते' म्हणून आहे!
जेवण,चुडा नि साड्या,देतोच ना मला तो
खात्यात नाव त्याचे,'दाते' म्हणून आहे!
गजरा गुलाब अत्तर,निर्गंध होत गेले
शृंगारही अताशा,'न्हाते' म्हणून आहे!
स्मरते नि छिन्न करते,एकेक गीत त्याचे
या काळजात फिरते पाते म्हणून आहे!
या लेखणीस कितिदा,तोडून पाहते पण
माझ्यासवेच तीही,'जाते' म्हणून आहे!
—सत्यजित
प्रतिक्रिया
28 Mar 2017 - 9:59 am | प्राची अश्विनी
वाह! क्या बात!
आधीच्या काफियाला अलगद दुस-या शेरात वळवलंय ,हे प्रथमच बघितलं, आवडलं.
एकच शंका, "खात्यात नाव त्याचे,'दाते' म्हणून आहे!"
इथे एकतर त्यांचे हवं किंवा दाता हवं ना?
28 Mar 2017 - 10:14 am | पैसा
सुरेख!
28 Mar 2017 - 11:46 am | संजय क्षीरसागर
यमक जुळवण्याच्या प्रयासात चांगल्या कल्पनांतलं काव्य हरवून गेलंय.
28 Mar 2017 - 2:29 pm | सत्यजित...
आ.संजयजी,
आपल्या स्पष्ट मताबद्दल मनःपूर्वक आभार!नोंद घेतली आहे!बेहतर लिखाणाचे प्रयत्न सुरु राहतील!आपले मार्गदर्शन लाभत राहील या अपेक्षेसह एक छोटेसे स्पष्टीकरण लिहितो आहे!
आपला प्रतिसाद वाचल्यानंतर,आपणांस यमक जुळवण्याचा प्रयास करावा लागला,असं का वाटलं असेल?असाच प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला! खरेतर दुसऱ्या नि तिसऱ्या शेराच्या दुसऱ्या ओळी...'खाते' नि 'दाते' एक सलग मतलाच सुचावा अश्या सुचल्या होत्या! 'न्हाते' हा शेर या गझलेचा मला सुचलेला पहिलाच शेर होता,गझल तिथूनच आकार घेती झाली,तेंव्हा त्यात यमक जुळवावं लागलं नाहीच! शेवटचा समारोपाचा शेर,'हे सारं माझ्यासोबतच असणार आहे' अश्या काहिश्या विचारातून आला आहे! फिरत्या पात्याचा विचार करताना मात्र खयाल शोधावा लागलेला!
धन्यवाद!
29 Mar 2017 - 1:35 am | संजय क्षीरसागर
गुस्ताखी माफ !
तुटल्यात सर्व तारा, तरीही मी गात आहे,
मैफिल रंगलेली, मी ‘असते’ म्हणून आहे|
निर्व्याज सोबतीच्या भेटी गहाळ झाल्या,
घर रेशमीच आपुले ‘राहाते’ तसेच आहे |
जेवण, चुडा नि साड्या, देतोच ना मला तो,
हृदयात नांव त्याचे, ‘जपते’ म्हणून आहे ।
गजरा गुलाब अत्तर, निर्गंध होत गेले
शृंगारगंध हलकासा, ‘लाजते’ म्हणून आहे!
स्मरते नि छिन्न करते, एकेक गीत त्याचे
हे दु:ख काळजात, ‘शिरते’ म्हणून आहे!
29 Mar 2017 - 1:37 am | संजय क्षीरसागर
या लेखणीस कितिदा, तोडून पाहते पण
माझ्यासवेच तीही, 'झुरते' म्हणून आहे !
29 Mar 2017 - 10:13 pm | संदीप-लेले
व्वा व्वा व्वा !
29 Mar 2017 - 7:13 am | चौकटराजा
माशाल्ला! कुर्बान !
29 Mar 2017 - 7:49 pm | चतुरंग
बरोबर.
28 Mar 2017 - 12:25 pm | अत्रुप्त आत्मा
ते दाते चं बघा तेव्हढं. बाकी गझल तर अप्रतिमच!
28 Mar 2017 - 1:00 pm | संजय क्षीरसागर
त्यात बदल केला तर ....खातं बंद होईल !
28 Mar 2017 - 1:29 pm | सत्यजित...
सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार!
'दाते'बद्दल...
'दाता'म्हणायचं म्हंटल्यावर एकेरी म्हणनं कसं बरं वाटेल हो??
म्हणून ते असं आदरार्थी बहुवचनी(अर्थात उपहासात्मक) आहे.आमचे दाते रा.रा. वगैरे!
28 Mar 2017 - 3:15 pm | चौकटराजा
सतार फुटेल हो तुटणार नाही. तार तुटेल फुटणार नाही. आपल्याला तार तोडायची आहे की सतार ..... ? रूतलीच तान असं काही बसतंय का ? बाकीचे शेरे मस्त जुळलेत.
28 Mar 2017 - 4:06 pm | सत्यजित...
राजे 'फुटली' पण बसतंय की!वाचा 'फुटली सतार..'!
बाकी वाद्यांचा माझा संबंध लक्षात आलाच असेल एव्हाना!त्यावरुन तार नाही तरी तारेच तुटलेत माझ्याकडून असं दिसतंय!कृ.ह.घ्या!
28 Mar 2017 - 5:48 pm | चौकटराजा
मी तळेगावी रहात असताना तिथे आमच्या आळीत एक उदयोन्मुख कवि आमच्या कडे येत व आपली नवी कविता मोठ्या आग्रहाने मला ऐकवीत. एका कवितेत अतिशय खिन्न भिन्न अशी अवस्था दाखवायची होती त्याना. मृदंगाच्या तुटल्या तारा.. अशी शब्दकळा पाहून मी त्याना म्हणालो " अहो साहेब मृदंगाला कोठे तारा असतात का .. निदान मृदंगाच्या तुटल्या वाद्या असे तरी म्हणा..... "
29 Mar 2017 - 7:48 pm | चतुरंग
मृदंगाच्या तारा हे लै भारी! ;)
28 Mar 2017 - 4:09 pm | शार्दुल_हातोळकर
फक्त गझल थोडीशी वेगळ्या धाटणीची वाटल्यामुळे सुरुवातीला जरासा गोंधळ उडाला. :)
29 Mar 2017 - 7:51 pm | चतुरंग
जामच जुळवाजुळवी झाली आहे....
10 May 2017 - 9:24 am | सत्यजित...
शार्दूलजी,चतुरंगजी प्रतिसादाबद्दल धन्यवाद!