[खो कथा] पोस्ट क्र. ३

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जनातलं, मनातलं
20 Mar 2017 - 8:12 am

[खो कथा] पोस्ट क्र. १

[खो कथा] पोस्ट क्र. २

पॉक पॉक करून गाडी बंद केली आणि किल्ली खिशात टाकली .
मी आत्ता बाहेर पडलो ती इमारत हवेत तरंगत होती!!!..........

नक्की काय चाललंय? आरशात शशिकांत का दिसला? मी आणि शालूमध्ये काय घडलंय? काही कळेना. परवा तो दाढीवाला म्हातारा बुवा कसल्यातरी शापाबद्दल बरळत होता. हीच तर त्या शापाची सुरुवात नाही ना??? पुढं काहीतरी फार अभद्र घडेल असं वाटू लागलं. आणि ते थांबवायचं तर लवकर काहीतरी करायला हवंं होतं. तेही मलाच. कारण आरश्यानं माझीच निवड केली होती. पण काय करायचं? आरसा तर फुटला. आणि तो दाढीवाला बाबा कुठं असेल कोण जाणे. कुठून झाली याची सुरुवात? काही आठवत नव्हतं. The only way out is the only way in. म्हणत गाडीतून खाली पाय ठेवला.

कुठच्या अरी अदृश्य शक्तीनं ओढून घेतल्यासारखा मी त्या ढगांच्या भोवऱ्यात खेचला गेलो. गोल गोल गोल गोल ....... प्रचंड वेगात फिरू लागलो.... मला गरगरायला झालं. ..

जाग आली तेव्हा टळटळीत दुपार होती. मी एका अजस्त्र वृक्षाच्या सावलीत होतो. मी आजूबाजूचा अंदाज घेऊ लागलो. समोरच्या रस्त्यावरून माणसं ये जा करत होती. पण ना कुठचा चेहरा ओळखीचा होता की पेहराव. कुठं येऊन पोचलो बरं? विचार करकरून डोकं दुखायला लागलं होतं. पण काळाचं कोडं काही सुटत नव्हतं. कानात दडे बसल्यासारखं झालं होतं. उठून चालायला लागलो. मैलोनमैल पसरलेला भला भक्कम रुंद दगडी रस्ता होता. कडेला ठराविक अंतरावर डेरेदार झाडं किंवा एखादी पाणपोई. अन मध्येच कुठल्यातरी प्राण्याचं शिल्प असलेला उंचच उंच स्तंभ. अगदी थक्क करणारा.

अचानक डोळ्यावर लखलखीत तिरीप आली. समोरून धारदार पाजळलेल्या कुऱ्हाडीसारखं काहीतरी शस्त्र हातात घेऊन एक बारका माणूस येत होता. मी घाबरलो. त्यानं चमकून वर माझ्याकडं बघितलं. क्षणभर थांबला. हातातली कुऱ्हाड खांद्यावर टाकली आणि पुन्हा मान खाली घालून चालू पडला. माझ्या मनातले विचार त्याला कळले की काय?

तो पूर्ण नजरेआड होईपर्यंत मी जागीच खिळून होतो. मोबाईल मध्ये वेळ बघायला मी खिसा चाचपडला. मोबाईल गाडीत राहिला होता. च्यायला! आता आली का पंचाईत? सिग्रेट पेटवली. चार झुरके मारल्यावर जरा बरं वाटलं. शीळ वाजवायला तोंड उघडलं आणि एकदम ट्यूब पेटली. इतक्या वेळात आपल्या लक्षात कसं नाही आलं? सगळीकडं डबक्यासारखी प्रचंड शांतता साचून राहिली होती. माणसं, पक्षी, झाडं, वारा, आकाश सगळं चिडीचूप. म्हणूनच कान दडपल्यासारखे झाले असणार. मी शीळ वाजवली खरी पण आवाजच फुटेना. पुन्हा पुन्हा प्रयत्न केला पण छे! आता मात्र टरकलो. ती शांतता आपल्याला गिळून टाकतेय की काय असं वाटायला लागलं. इतक्यात समोरून एक बाई येताना दिसली. ती माझ्या समोरच येऊन थांबली. जवळंच गाठोडं उघडायला लागली. आधी तिनं काही शेंदूर फासलेले दगड बाहेर काढले. मग मोडक्या बाहुल्या. मग एक खेळणं. खुळखुळा की काय? हो खुळखुळाच. तिनं तो माझ्या हातात दिला. आणि पुन्हा आपलं गाठोडं बांधून निघून गेली.

खुळ्ळ खुळ्ळ. मी तो वाजवायला लागलो. काय आश्चर्य! मिट्ट शांततेत तो आवाज घुमू लागला. हळूहळू तो आवाज वाढत गेला आणि त्या नादानं सभोवतालच्या ठिकऱ्या उडाल्या. माणसं, झाडं, रस्ता अणुरेणू बनून विखुरले गेले. प्रचंड धुरळा उठला. माझ्या मेंदूचा पण जाम चुरा झाला होता. त्यातून एकेक प्रकाशाच्या ठिणग्या बाहेर पडू लागल्या .. जन्मोजन्मीच्या आठवणी होत्या त्या. चमचमणारे असंख्य काजवेच जणू.

"श्या! असं कसं सांगितलं तिनं शशिकांतला? मी कधी बोललो का माझ्या बायकोला? नाही ना? या बायकांच्या पोटात एक गुपीत राहील तर शपथ. शालूला त्या दिवशी पांडवलेण्यांच्या गुहेत न्यायलाच नको होतं. हजारो वर्षांची परंपरा उगाच मोडली आपण. तिच्या गोड हसण्याला भुललो. "जे पाहिलं ते कुणाला सांगणार नाही. अगदी कुंकवाची शपथ" असं म्हणाली होती ....च्! काही प्रकाश पडेपर्यंत विझलाच तो काजवा .

हे सगळं, असं काही आपल्याच आयुष्यात घडून गेलं होतं यावर विश्वासंच बसेना. बऱ्याचदा स्वप्नात यातलं काहीबाही दिसायचं खरं पण...
बाजूच्या सगळ्या धुरळ्यात ते काजवे आता हरवतात की काय असं वाटू लागलं. त्यांना पकडून ठेवायची मी व्यर्थ धडपड करू लागलो. कारण आता मला पुढची दिशा दाखवायला मम्मद्याचा आरसा नव्हता. माझ्या आठवणींवरंच पुढचा सगळा खेळ अवलंबून होता. मी भराभरा काजवे गोळा करू लागलो. पण गोळा करून ठेवणार कुठं? मेंदूचा तर भुगा झालेला... ते ठेवायला म्हणून मी खिशात हात घातला तर गाडीची की सापडली.. .

पॉक पॉक.

मी पुन्हा गाडीत बसलो होतो. डॅश बोर्डवर मोबाईल तसाच होता. वेळ बघितली . 6 PM. मेसेज बॉक्स मध्ये एक नवीन मेसेज माझी वाट पहात होता.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

20 Mar 2017 - 8:16 am | प्राची अश्विनी

पुढचा खो मी निशदे यांना देत आहे. :)

निशदे's picture

20 Mar 2017 - 9:05 pm | निशदे

स्वीकारला आहे.

पिलीयन रायडर's picture

20 Mar 2017 - 9:30 pm | पिलीयन रायडर

एक तर सटासट लिहीताय म्हणुन जाम मजा येतेय! त्यात काहीच्या काही चाललंय कथेत तरी सगळे मस्त पेलवत आहेत. भारीच!

निशदे ह्यांना कोणत्या भागासाठी खो देताय? ४थ्या? की अजुन कोणत्या?

प्राची अश्विनी's picture

20 Mar 2017 - 10:57 pm | प्राची अश्विनी

चौथा भाग.

मिडास's picture

20 Mar 2017 - 9:24 am | मिडास

एवढा एकच शब्द सूचतोय.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

20 Mar 2017 - 10:18 am | अॅस्ट्रोनाट विनय

शैली व्यवस्थित जुळली. सलगता जाणवत आहे, धागे छान जोडलेत.
गुढरम्यतेच्या ढगांमध्ये मन तरंगायला लागलंय.

Opposite gender च्या दृष्टीकोनातून लिखाण करणे ही अवघड गोष्ट असते. तुम्ही ती उत्तमरित्या पेलली.

इडली डोसा's picture

20 Mar 2017 - 10:31 am | इडली डोसा

हा प्रकार आवडतोय

जव्हेरगंज's picture

20 Mar 2017 - 10:34 am | जव्हेरगंज

जबरी!!! मज्जा आली!!!

खेडूत's picture

20 Mar 2017 - 10:45 am | खेडूत

मस्त मस्त चाललीय कथा..

शेवटचा डाव's picture

20 Mar 2017 - 11:32 am | शेवटचा डाव

कथाने अधभुत वळन घेतले

शेवटचा डाव's picture

20 Mar 2017 - 11:32 am | शेवटचा डाव

कथाने अधभुत वळन घेतले

अजया's picture

20 Mar 2017 - 12:46 pm | अजया

मस्त!

पैसा's picture

20 Mar 2017 - 1:16 pm | पैसा

लै भारी चालू आहे!

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Mar 2017 - 1:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

छान चाललेय ! कल्पनाशक्तीला वार्‍यावर उडत नेणारा प्रकार आहे हा ! :)

अनन्त्_यात्री's picture

20 Mar 2017 - 2:43 pm | अनन्त्_यात्री

surrealism च्या "अवकाशात"च घुटमळतायत सगळे. एखादा भिडू तरी जमिनीवर खो देईल ?

वरुण मोहिते's picture

20 Mar 2017 - 3:36 pm | वरुण मोहिते

चालू आहे .

उगा काहितरीच's picture

20 Mar 2017 - 6:46 pm | उगा काहितरीच

मस्त !

Ranapratap's picture

20 Mar 2017 - 7:11 pm | Ranapratap

खो खो चा खेळ चांगलाच रंगला आहे.

ज्योति अळवणी's picture

20 Mar 2017 - 7:14 pm | ज्योति अळवणी

जबरदस्त... मजा येते आहे. येऊदे पुढचा भाग लवकर

रुस्तम's picture

20 Mar 2017 - 7:52 pm | रुस्तम

पु भा प्र

पुंबा's picture

21 Mar 2017 - 10:48 am | पुंबा

निशदे यांच्या भागाच्या प्रतिक्षेत.

समाधान राऊत's picture

21 Mar 2017 - 7:09 pm | समाधान राऊत

+१

प्राची अश्विनी's picture

21 Mar 2017 - 7:53 pm | प्राची अश्विनी

+11

ऑलमोस्ट तयार झाला आहे. थोड्या वेळात टाकतो.