खिडकी पलीकडचं जग भाग 3

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
17 Mar 2017 - 11:51 am

भाग १ : http://www.misalpav.com/node/39159

भाग 2: http://www.misalpav.com/node/39179

खिडकी पलीकडचं जग

भाग ३

मात्र खोल मनात गौरीला कुठेतरी खात्री वाटत होती की तिने त्या मैदानावर मुलांना बघितले होते. ती दुस-या दिवशीच्या संध्याकाळची वाट पाहात होती. साधारण पाचची वेळ झाली आणि तिची आई आणि ती खिडकीतून त्या मैदानाकड़े डोळे लावून बसल्या. पाचचे साडे पाच झाले... साडे पाचचे सहा. पण त्या मैदानावर चिटपाखरुही दिसले नाही. गौरी खूपच हिरमुसली. तिच्या आईने तिची समजूत काढली की आदल्या दिवशी नक्कीच गौरीचा डोळा लागला असणार आणि त्या झोपेत तिला तो भास् झाला असणार. असेच 2-3 दिवस गेले. गौरी रोज संध्याकाळी त्या खिडकीतून बाहेर त्या मैदानाकडे बघत बसत होती. पण तिला परत तिथे कोणीही खेळतानाच काय पण साधे उभे असलेले देखील दिसले नाही. आता मात्र गौरीलासुद्धा आई म्हणते ते खरे वाटायला लागले. तिने त्या मैदानावर आपल्यला कोणी दिसेल या विचाराचा नाद सोडला.

दिवस जात होते. गौरी आता त्या घराला आणि तिच्या खोलीला रुळली होती. ती आता स्वतःहून आपल्या व्हील चेअरवर बसायला लागली होती. आईला लहान लहान कामात काही ना काही मदत करणे आणि चित्र काढत बसणे असे गौरीचे दिवस जात होते. एक दिवस गौरी आणि तिची आई दुपारी गप्पा मारत जेवत होत्या तेव्हा शेजारच्या मावशींनी दार वाजवले. गौरीच्या आईने उठून दार उघडले आणि म्हणाली,"अरे मावशी तुम्ही या वेळेला कशा? बसा ना. जेवता का आमच्या बरोबर?" त्यावर हसत हसत मावशी म्हणल्या, "अहो गौरीची आई बसते कसली, बारीच कामं आहेत. आज न मी हळदी-कुंकु ठेवल आहे संध्याकाळी. त्याचच आमंत्रण करायला आले होते. तुम्ही नक्की या ह." आणि मग गौरीकडे वळून त्या म्हणल्या," गौरी तू पण ये न. तुलाही थोड़ा बदल होईल." काकुंनी प्रेमाने आमंत्रण केले.

"येते ह काकू." गौरी हसत म्हणाली.

संध्याकाळी पाचच्या सुमारास गौरीची आई तयार झाली आणि तिची व्हील चेयर गौरीजवळ आणून म्हणाली,"चल बेटा. मावशी वाट बघत असतील. हळदी-कुंकवाला जाऊन येऊ."

गौरी हसली म्हणाली,"आई तू जाऊन ये. मी घरीच थांबते. अग आज बाबा लवकर येणार म्हणाले आहेत न? उगाच त्यांचा गोंधळ व्हायला नको." गौरीला व्हील चेअरवर बसून अस हळदी-कुंकवाला जायचे नव्हते. कारण मावशी जरी चांगल्या असल्या आणि त्यांनी गौरी समोर कधी तिच्या अपघाताबद्दल विषय काढला नसला तरी नवीन येणाऱ्या बायकांनी तिच्या आईला गौरीबाद्द्ल प्रश्न विचारलेच असते. गौरीला ते सगळे परत एकदा ऐकायचे नव्हते. परत त्याच यातना मनाने औभावाय्च्या नव्हत्या; आणि आईला पण त्याना उत्तर देताना त्रास झाला असता हे गौरीला चांगले माहित होते. म्हणून मग बाबा लवकर येणार आहेत अस सांगून तिने जाण टाळल होते. आईला सुद्धा ते समजले होते. गौरीची आई देखील तिच्या बाबतीत फारच हळवी झाली होती. म्हणून मग ती बर म्हणाली आणि लवकरच येते अस सांगून शेजारच्या मावशींकडे गेली. काही दिवसांपूर्वी गौरीने खिडकी बाहेर जे जीवंत मैदाना बघितल होत, ते तिच्या मनात खोल घर करून बसल होत. त्यामुळे तिने त्याच जस आठवेल तस चित्र काढायला घेतल होत. तिने ड्राइंग बोर्ड पुढे ओढला आणि ती चित्र काढण्यात गढुन गेली.

बहुतेक अवघी 5मिनिट झाली असतील-नसतील आणि खिडकीबाहेरुन ऐकु मुलांच्या खेळण्याचा कोलाहल ऐकू यायला लागला. त्या गोंगाटाने गौरी दचकली. तिची नजर खिड़की बाहेर वळली आणि तिला आश्चर्याचा धक्का बसला. तिने काही दिवसांपूर्वी बघितलेल जीवंत मैदाना परत तसच मुला-माणसांनी भरल होत. तोच गोंगाट... तसेच मुलांनी खेळ खेळण.. मोठ्या लोकांच बसून गप्पा मारण. गौरीला आश्चर्याचा धक्का बसला आणि त्याचवेळी खूप आनंद देखील झाला. ती टक लावून त्या नजा-याकडे बघत बसली. बराच वेळ झाला. हळूहळू अंधार पडायला लागला. एक-एक करत सगळे मैदानावरुन बाहेर पडायला लागले. मैदानाच्या आजूबाजूला असलेल्या घरांमधून लुकलुकते दिवे दिसायला लागले. तेव्हा गौरीच्या लक्षात आल की त्या मैदानाच्या आजू-बाजूला थोडी दूर वाटतील अशी घरं देखील आहेत. ती घरं बघून गौरी थोडीशी गोंधळली. एरवी ही घरं आपल्यला कशी दिसली नाहीत असा विचार तिच्या मनात आला. हळूहळू तिथली सगळी मंडळी निघून गेली आणि ते मैदाना रिकामं झालं. आता त्या मैदानावरचा अंधार देखील भलताच दाटला होता.

'बहुतेक तीन-एक तास आपण त्या मैदानावरच्या मुलांच्या खेळाकडे बघण्यात रमलो होतो वाटत. अरे! इतका वेळ झाला असला तर मग अजुन आई कशी नाही आली?' गौरीच्या मनात आल. तिने मैदानावरची नजर हटवली आणि घड्याळात बघितल. ती घड्याळ बघुन दचकली. जेम-तेम साडे सहा झाले होते. म्हणजे आई जाऊन फ़क्त दिड तास!

'हे कस शक्य आहे? मी कित्तितरी वेळ बसले होते मैदानावरची गम्मत बघत. अगदी मैदानावर अंधार होईपर्यंत. आणि तरी फ़क्त दीड तासच झाला?' गौरी विचार करत होती. तिने परत मैदानाकड़े वळून बघितल. आता मैदाना रिकाम झाल होत; पण ते आता रिकामं आणि एकट वाटत नव्हत. मस्ती करून दमलेल्या लहान मुलासारख शांत झाल होत. मैदानाच्या आजूबाजूच्या पण थोडं दूर असणाऱ्या घरांमधून येणारा मंद प्रकाश तिला जाणवत होता.

"गौरी काय बघते आहेस ग त्या मैदानाकड़े? मी दोनदा हाक मारली. पण तुझ लक्षच नाही." गौरीच्या आईने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हंटल. गौरी आईच्या आवाजाने भानावर आली. तिने आईकडे बघितल. तिच्या मनात आल की सांगून टाकावा आपला अनुभव आईला. पण मग ती थांबली. अजुन तिलाही हा नक्की काय प्रकार आहे ते समजल नव्हतं. आज तिने जे बघितल होत ते खर होत. कोणताही भास् किंवा स्वप्न किंवा कल्पनाविलास नव्हता. याची तिला खात्री होती. पण मग मधले काही दिवस आपल्याला ते मैदाना अस चेहेल-पेहेल असलेल का नाही दिसल? तिला या प्रश्नाच उत्तर शोधायच होत. म्हणून मग तिने ठरवल की नीट उलगडा होईपर्यंत कोणालाही काहीच सांगायच नाही. असा विचार करत असताना तिची नजर परत एकदा त्या मैदानाच्या दिशेने वळली आणि परत एकदा तिला आश्चर्याचा धक्का बसला. कारण काही वेळा पूर्वी गौरीने त्या मैदानाच्या आजूबाजूला जी घरं बघितली होती आणि त्या घरांमधला मंद उजेड तिच्या डोळ्यांना दिसला होता ती घरं आता तिथे नव्हती. मग मात्र तिच्या मनातला विचार अगदीच पक्का झाला.

ती आईकडे बघुन हसली आणि म्हणाली,"काही नाही ग; चित्र काढण्यात मग्न होते. तर त्याबाजूने काहीतरी आवाज आला अस वाटल म्हणून बघत होते; तेवढ्यात तू आलीस." आई तिच्याकडे बघुन हसली आणि 'बर' म्हणाली. मग त्या दोघी गप्पा मारत बसल्या. थोड्या वेळात बाबा पण आले आणि एकूण घरातला माहोल बदलून गेला. इच्छा असुही गौरी तिला आलेल्या अनुभवाचा विचार करू शकली नाही किंवा मानतल आई-बाबांकडे बोलू देखील शकली नाही.

रात्री आई-बाबांबरोबर जेवण वगैरे सगळ आटपुन गौरी आपल्या गादीवर आडवी झाली आणि मग तिला तिच्या संध्याकाळच्या अनुभवावर विचार करायला वेळ मिळाला. 'काय होत ते? चार दिवसांपूर्वी आपल्याला ते मैदाना गजबजलेल दिसल आणि आज पण. मग मधले दिवस का नाही दिसल? हा नक्की काय प्रकार आहे?' गौरी विचार करत होती. ती तशी समंजस मुलगी होती. त्यामुळे उगाच भुताटकी असेल असा विचारही तिच्या मनाला शिवला नाही. मात्र हे असं मध्येच मैदानावर खूपसे लोक दिसतात आणि ते ही रोज नाही तर अचानक एखाद्या दिवशी हे का? त्याचा उलगडा तिला होत नव्हता. असाच विचार करताना तिच्या अचानक लक्षात आल की पहिल्यांदा तिला तिथे माणसं दिसली तेव्हा ती तिच्या घरात एकटीच् होती. आणि आज पण तिची आई हळदी कुंकवासाठी गेली होती त्यामुळे गौरी घरात एकटीच होती. पहिल्यांदा तिला जेव्हा त्या मैदानावर लोक दिसले हे तिने आईला सांगितल त्यानंतर ते परत दिसतात का याची वाट तिने आणि आईने मिळून बघितली होती. दोघीही खिडकीत बसून गप्पा मारत त्या मैदानाकडे बघायच्या; हे गौरीला लक्षात आल. मात्र दोन्ही वेळेला गौरी जेव्हा घरात एकटी होती तेव्हा तिला ते जिवंत मैदाना दिसलं होत.

'म्हणजे फ़क्त मला दिसत ते सगळ!' हां विचार मनात येताच गौरी एकदम खुलली. अवघी 16-17 वर्षाची मुलगी. एका अपघाताने कायमची अधु झालेली. नवीन जागा. ना मित्र-मैत्रिणी... ना कुठे जाण-येण. त्यामुळे अपघातानंतर तिच्या आयुष्यात यापुढे कधी काहीतरी वेगळं... थरारक अस काही घडेल याची तिने आशाच सोडली होती. आणि अचानक हे एक वेगळ गुपित... फ़क्त तिचच अस.... तिला मिळाल होत. त्या नवीन शोधामुळे खूप खुश झाली होती गौरी. मात्र आता आपल्याला लागलेल्या या शोधाची खात्री करून घ्यायला हवी हे देखील तिच्या मनात आलं. दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ कधी एकदा होते याचा विचार करत करतच गौरी त्या रात्री झोपली. झोपेत सुद्धा तिला त्या मैदानाची स्वप्न पडत होती आणि ती खुदखुदून हसत होती.

गौरी दुस-या दिवशी सकाळपासूनच संध्याकाळचे पाच वाजायची वाट पाहात होती. आज तिच कशातही लक्ष लागत नव्हत. आईशी गप्पा तर ती मारत होती पण तरीही तिच लक्ष सारख घड्याळाकडे लागलं होत. एकदा तर आईने तिला विचारलं देखील,"काय ग गौरी सारखं घड्याळाकडे का बघते आहेस?" आईने अस विचारता क्षणीच आपली अधीरता आईच्या लक्षात आली तर कदचीत आपल्या मनात असलेल आपल्याला करता येणार नाही; हे गौरीच्या लक्षात आल. मग उगाच सारवासारव केल्यासारखी ती म्हणाली,"काही नाही ग आई... आज थोडा कंटाळाच आला आहे. आजचा दिवस फारच सावकाश सरकतो आहे अस वाटत आहे. म्हणून मी सारखी घड्याळाकडे बघते आहे इतकच." आईला खरच वाटल की आज गौरी कंटाळलेली आहे. त्यामुळे तिने मनात ठरवलं की आज गौरीला घेऊन कुठेतरी बाहेर जायचं संध्याकाळी. अर्थात आईला माहित नव्हत की गौरीने संध्याकाळसाठी काय करायचं ते अगोदरच ठरवून ठेवलं आहे.

कारण साधारण पावणे पाच वाजता तिने आईला हाक मारली आणि म्हणाली, "आई, अग माझे ऑइल पेंट्स संपले आहेत. आणून देतेस का ग?"

गौरीच्या आईला कळेना की अचानक गौरी ओईल पेंट्स का मागते आहे. ती गौरी जवळ येऊन म्हणाली,"अग आता गेले तर उशीर होईल. ऑइल पेंट्स जवळ नाही न मिळत. एक काम करुया. तू पण तयार हो. आपण दोघी जाऊन घेऊन येऊ. त्या निमित्ताने तू घराबाहेर पडशील आणि तुला देखील बर वाटेल. ठीके?" आईच बोलणं एकून गौरीची पंचाईत झाली. कारण गौरीला आईने एकटीनेच जायलाच हव होत. त्यामुळे मग तिने हट्ट धरला. "मला आत्ताच हवेत ते कलर्स. अस काय करतेस? मी तयार होणार आणि मग आपण निघणार. त्यात कितीतरी वेळ जाईल. मला आताच त्या कलर्सनी रंगवायच आहे हे चित्र. तू एकटीच गेलीस तर तासाभरात येशीलसुद्धा. आण न प्लीज."

आईला तिच मन मोडवेना म्हणून मग तिने एकटीनेच जाऊन येण मान्य केल. म्हणाली,"बर मी पटकन जाऊन येते. शेजारच्या मावशीना सांगून जाते. त्यांना हाक मार ह काही लागल तर."गौरी खुशीत 'हो' म्हणाली आणि तिची आई पटकन तयारी करून बाहेर पडली. आईने दरवाजा ओढुन घेतला आणि गौरीने एक्साइट होऊन मैदानाच्या दिशेने मान वळवली...........................

............................................मैदानावर मुलांचा खेळ रंगात आला होता. मोठी माणसं कुठे गप्पा... कुठे पाय मोकळे करायला चालण अशी विखुरली होती. ते दृश्य बघून गौरी हरकून घेली. 'आपला अंदाज बरोबर आहे तर. आई असताना हे दृश्य नाही दिसत.' तिच्या मनात आल,'पण मला तर रोज हे बघायला आवडेल. मी आता खेळू शकत नसले, तरी या मुलांना खेळताना बघून खूप बर वाटेल मला.' गौरी मनात विचार करत हसत होती. आणि अचानक तिच्या मनात आल,'पण रोज कस आईला बाहेर पाठवणार? आणि तिला हे सांगितल तरी तिला हे कुठे पटणार?' गौरी विचारात पडली. ती त्या मैदानाकड़े बघत बसली होती. थोड्यावेळाने तिला घराच् दार उघडण्याचा आवाज आला म्हणून तिने वळून दाराकडे बघितल. आई काहीतरी बोलत गौरीच्या खोलीच्या दिशेने येत होती. आई आलेली बघून गौरीने परत मैदानाच्या दिशेने मान फिरवली. ते रिकाम होत. स्विच ऑफ करून जसा आपण टी. व्ही. बंद करतो... तस काहिस. गौरीला मनातून माहित होत की हे असंच होणार आहे. पण तरीही ती थोड़ी हिरमुसली. अर्थात ते तिने आईला कळू दिल नाही. कारण बिचारी आई केवळ गौरीने हट्ट केला होता म्हणून बाजारात जाऊन तिचे ऑइल कलर्स घेऊन आली होती. त्यामुळे तिने हसत आईकडे बघितल आणि तिने आणलेले ओईल पेंट घेऊन पुढ्यातल चित्र रंगवायला घेतल.

असेच अजून दोन-तीन दिवस गेले. आई घरातच असल्याने गौरीला मैदानावर खेळणारी मुल दिसली नव्हती; आणि त्या विचाराने गौरी मनातून थोडी दु:खी होती. मात्र तिने ते आईला कळू दिल नव्हत. गौरीची आई त्यादिवाशी सकाळी कोप-यावरच्या वाण्याकडे गेली होती. नेमका अवेळी अचानक पाऊस आला होता आणि त्यात ती भिजली होती. त्यामुळे गौरीच्या आईला दुपारी अंगात जरा कणकण जाणवली. म्हणून मग गौरीला सांगून आणि औषध घेऊन तिची आई दुस-या खोलीत झोपली होती. चारचा सुमार होता. गौरी तिच चित्र पूर्ण करत बसली होती. गौरीच सहज मैदानाकडे लक्ष गेल आणि तिला धक्काच बसला. कारण नेहेमीची सवाय असल्यासारखी हळूहळू मैदानावर मूल जमायला लागली होती. फ़क्त मुलच नाही तर नेहेमी प्रमाणे मोठी माणस देखिल मैदानावर आली होती. आता मात्र गौरीच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. घरात आई आहे आणि तरीही आपल्यला या मैदानावरची ही सर्व मंडळी कशी दिसत आहेत? त्यात आता जेमतेम चार वाजलेत आणि इतक्या लवकर कशी आली ही मुलं खेळायला? गौरीच्या मनात एका मागून एक विचार यायला लागले. पण मग गौरीच्या लक्षात आल की बाहेर मैदाना जवळ उन्हाचा तडाखा चार सारखा वाटत नव्हता. मात्र घरातलं घड्याळ चारची वेळ दाखवत होतं आणि एरवी चार वाजता जसं वातावरण असत तसच वातावरण घरात होत. हा वेळेचा फरक कसा ते गौरीला कळेना. ती विचार करायला लागली आणि तिच्या लक्षात आल की मागच्या दोन्ही वेळेला आपल्याकडे संध्याकाळचे सहा वाजतात न वाजतात तोवर हे मैदान मोकळ व्हायला लागल होतं. म्हणजे कदाचित याचं घड्याळ आपल्या पेक्षा थोड पुढे आहे की काय?

मैदानावर नजर खिळवून गौरी विचार करत होती. समोर जी लोकं दिसत होती त्यांच्या घडाळ्यात किती वाजले असतील याचा अंदाज तिला नव्हता. पण तिच्या घरातल्या घडाळ्यात जेम तेम चारच वाजले होते. याचा अर्थ त्याचं घडयाळ आपल्यापेक्षा थोड पुढे आहे हे तिच्या लक्षात आल होत. हा विचार मनात पक्का झाला आणि मग मात्र गौरीने स्वतःचे असे ठोकताळे बांधायला सुरवात केली. एक म्हणजे फ़क्त तिलाच ते जीवंत मैदान, तिथे खेळणारी मुलं आणि माणसं दिसतात. आज आई घरात आहे पण ती दुसऱ्या खोलीत झोपलेली आहे. म्हणजे ही लोकं ज्यावेळी या मैदानावर यायला सुरवात करतात त्यावेळी गौरी खोलीत एकटी हवी आणि सारख कोणी डिस्टर्ब करणार नको. आता गौरीला त्या एकूण प्रकारचा विचार करण्यात आणि त्या मैदानावरच्या लोकांचा शोध घेण्यात अजुन गम्मत वाटायला लागली. आता तिला तिची उत्सुकता स्वस्थ बसु देत नव्हती. पण त्या लोकांबद्दल अजून जाणून घ्यायचं तर गौरीला घरात एकट असण आवश्यक होत. कारण आज आईला बर नव्हत म्हणून ती दुसऱ्या खोलीत झोपलेली होती. नाहीतर तिची आई सतत गौरीच्या भोवतीच असायची. आणि आई घरात असताना गौरी काहीच करू शकत नव्हती.

गौरीने विचार करून गप्पा मारताना हळूहळू आईला पटवून दिल की तिने सतत गौरीचा विचार करत राहाण बरोबर नाही. थोडं घराबाहेर पड़ल पाहिजे. गौरीमुळे ती खूप अडकून पडली आहे. पूर्वी मुंबईला असताना तिची आई एका सेवाभावी संस्थेमध्ये मदत म्हणून त्यांच ऑफिस सांभाळायला जायची रोज. ३-४ तासाच काम होत. पण त्यामुळे तिची आईदेखील थोडी बिझी असायची. तसच इथे देखील तिने काही कराव अस गौरीने सुचवाल. पण तिची आई गौरीला सोडून कुठे लांब जायला तयार नव्हती. पण मग यावर गौरीनेच एक तोडगा शोधून काढला.

रोज संध्याकाळी शेजारच्या मावशींकडे आजुबाजूची मूलं गणपती स्तोत्र, मारुती स्तोत्र, पाढे वगैरे म्हणायला जमायची. तास-दीड तासाचा कार्यक्रम. गौरेने आईला सुचवलं की ती मावशीना मदत करायला शेजारी जाऊ शकते. मावशींच घर शेजारीच होत. त्यामुळे आई कुठे लांब जाण्याच्या प्रश्न नव्हता. आणि गौरी अगोदर 2-3 दिवस आईबरोबर गेली. आईला ते सगळ आवडत आहे हे लक्षात आल्यावर हळूच तिने अंग काढून घेतल. तिने आईला समजावलं की अस खूप वेळ व्हील चेअर मध्ये बसायची तिला सवय नसल्याने तिला त्रास होतो. आईलादेखील ते पटल. आणि मग गौरी घरीच थांबली; आणि आईला जायला भाग पाडल. हळूहळू आईला पण सवय झाली. आणि गौरीला स्वर्ग सापडल्याचा आनंद झाला.

मग मात्र गौरी रोज संध्याकाळी आई गेल्या बरोबर खिडकीत बसून त्या मुलांच् निरिक्षण करायची. त्याच मैदानाची वेगवेगळी चित्र काढायला तिने सुरवात केली. प्रत्येक वेळचे चित्रातले बारकावे वेगळे असायचे. एक दिवस ती अशीच निरिक्षण करत बसली होती; आणि अचानक त्या मैदानावर फुटबॉल खेळणा-या मुलांचा बॉल गौरीच्या खिड़कीच्या दिशेने आला. गौरी थोड़ी दचकली. पण तिच मत होत की ती काही त्यांना दिसणार नाही. कारण आतापर्यंत तिला हे लक्षात आल होत की ते जग वेगळ होत. तिची खिड़की हा केवळ त्या जगात डोकावायचा एक लहानसा झरोका होता. तिच त्या जगात काहीही स्थान नव्हत. त्यामुळे तिला कोणी बघू देखील शकणार नव्हत. म्हणून मग बॉल तिच्या दिशेने येऊनही गौरी शांत होती.

कथा

प्रतिक्रिया

रोचक. वाचतोय. पुभाप्र.

प्रचेतस's picture

17 Mar 2017 - 12:19 pm | प्रचेतस

रत्नाकर मतकरी ह्यांच्या एका कथेची आठवण आली, बहुधा रस्ता किंवा मृत्युंजयी. नाव नेमकं आठवत नाही.

ज्योति अळवणी's picture

17 Mar 2017 - 1:51 pm | ज्योति अळवणी

एक कथा आहे रस्ता. पण या कथेतले twists वेगळे आहेत. पुढे लक्षात येईलच वाचकांना

सस्नेह's picture

17 Mar 2017 - 4:01 pm | सस्नेह

छान लिहित आहात . पुभाप्र.

हम्म, वाचतोय. येवू द्या अजून.
.
(क्रमशः टाकायचे राहिलेय का?)

मराठी कथालेखक's picture

17 Mar 2017 - 5:01 pm | मराठी कथालेखक

छान लिहित आहात

ज्योति अळवणी's picture

17 Mar 2017 - 6:01 pm | ज्योति अळवणी

होय. क्रमशः आहे. पुढील भाग लवकरच टाकते आहे

टवाळ कार्टा's picture

17 Mar 2017 - 6:18 pm | टवाळ कार्टा

Rochak

स्रुजा's picture

17 Mar 2017 - 9:51 pm | स्रुजा

ह्म्म्म.. उत्कंठावर्धक.. येऊ द्या पटापट.

कौशी's picture

18 Mar 2017 - 12:10 am | कौशी

वाचतेय. पु भा लवकर लिहा.

जगप्रवासी's picture

18 Mar 2017 - 12:16 pm | जगप्रवासी

लवकर टाका पुढचा भाग