भाग १ : http://www.misalpav.com/node/39159
भाग 2: http://www.misalpav.com/node/39179
भाग 3: http://www.misalpav.com/node/39196
भाग 4
http://www.misalpav.com/node/39212
भाग 5
ओरस् आणि गौरी दोघेही दचकले. ओरसने वळून बघितल. शेजारच्या एका मोठ्ठया झाडामागुन एक अत्यंत उंच आणि गोरिपान, तेजस्वी व्यक्ति ओरस च्या शेजारी येऊन उभी राहिली. त्यांनी शुभ्र पांढरा गाऊन घातला होता... क्रिश्चन फादर्स घालतात तसा.... मोठी शुभ्र दाढ़ी होती. पण दिसायला ते म्हातारे नव्हते वाटत. उलट चेहेरा तकतकीत, गंभीर, अत्यंत तेजस्वी आणि तरीही थोड़ा मिशिक्ल होता. मोठ्ठे आश्वासक डोळे होते. छान छाप पडावी अस एकूण व्यक्तिमत्व होत त्याचं. गौरी त्यांना बघुन मंत्रमुग्ध झाली. ओरसला मात्र खूप आनंद झाला.
"दादाजी हीच गौरी. माझी नवी मैत्रीण. खरच तिला आपल्याकडे घेता येईल?" त्याने उत्सुकतेने विचारले.
".....आणि थोड्या वेळात परत पण जाता आले पाहिजे ह..."गौरीने तिच्या मनातला विचार जोडला.
दादाजी दोघांकडे बघुन हसले. "हो... दोन्ही जमेल. पण त्यासाठी गौरीने स्वतः प्रयत्न करावा लागेल. ओरस तिला जे समजल ते तुला पटत नाहिये. आपण दोन वेगळ्या जगांच्या सीमा रेषेवर आहोत. तिला इथे येण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. मी मदतीला आहेच. पण सुरवात तिने करावी लागेल. गौरी मागे अनेक प्रवाहांपूर्वी; म्हणजे तुला कळेल अशा भाषेत सांगायच तर; तुमच्या अनेक वर्षांपूर्वी मी हा प्रयोग केला होता. त्यावेळी ते मला सहज जमल होत. त्यामुळे हे नक्की की तू इथे येऊ शकतेस आणि परत जाऊ ही शकतेस. पण सुरवात तू करायची आहेस. बस एवढच." अस म्हणून दादाजी आश्वासक हसले.
दादाजींच्या आश्वासक हास्याने गौरीला धीर आला. तिने शांतपणे दादाजींकडे बघितल आणि म्हणाली,"दादाजी हा खूप मोठा निर्णय आहे माझ्यासाठी. मला वेळ हवा विचार करायला. खूप आवडेल मला तिथे यायला. पण भिती पण वाटते आहे मनातून."
"मी समजु शकतो गौरी. ठिक आहे. विचार कर. तू तुझा वेळ घे... आम्ही आहोतच इथे." दादाजी म्हणाले आणि ओरसकड़े वळून म्हणाले,"चल ओरस. आपली हाक येईल एवढ़यात. मला तुझ्यासारख पळायच् नाही." आणि मग गौरीला अच्छा करून; लवकर भेटण्याच् सांगून मागे वळले.
"अच्छा गौरी. लवकर विचार करून ठरव आणि इथे ये ह." अस हसत म्हणून ओरस देखिल वळला आणि दादाजीना गाठून त्यांच्या बरोबर गप्पा मारत चालायला लागला. गौरीने मान घरात वळवली. आई यायची वेळ झाली होती; पण अजुन ती आली नव्हती.
'काय कराव बर? खरच दादाजी म्हणतात तस पूर्वी कोणीतरी कधीतरी गेल होत? दादाजी म्हणाले त्यांनीच अस केल होत... असेलही. पण मग मला जमेल? या अशा अवस्थेत? आणि परत कशी येणार मी? नाहीच येऊ शकले तर? आईला सांगू का हे सगळ? तिचा विश्वास बसेल का? काय करू?' गौरीच्या मनात विचारांवर विचार चालु होते. तिच मन पार गोंधळून गेल होत. तिला ओरसच्या जगात जावस तर वाटत होत; पण परत येता येईल की नाही याची शाश्वती वाटत नसल्याने ती गोंधळून गेली होती.
"अग काधिपासून हाक मारते आहे बेटा. कुठल्या विचारात बुडली आहेस? " गौरीची आई तिला हलवत म्हणाली.
"अं? अरे आईं तू कधी आलीस?" दचकुन गौरी म्हणाली.
"झाला थोडा वेळ. आज काकुंना बर नाही म्हणून लवकर आटपल आम्ही. पाहिल तर खिड़की बाहेर बघुन स्वतःशीच बोलत होतीस तू. मी बाहेर नजर टाकली तर कोणीच नव्हतं, पण तू मात्र दोघ-तिघ असल्यासारखी बोलत होतीस. हसत होतीस. खुश होतीस ग राणी. तुला अस खूप दिवसानी हसताना बघुन डोळ्यात पाणी आल... मग तुला हाक मारावीशी वाटली नाही आणि मी स्वयंपाकघरात वळले. पण मग अचानक शांत झालीस आणि विचार करत बसलीस. म्हणून मग हाक मारली." आई तिच्या केसातून हात फिरवत म्हणाली.
याचा अर्थ आज आई खोलीत होती तरी गौरीला ते जग आणि ओरस आणि दादाजी दिसाले होते. पण मग त्यावेळी गौरीला तिची आई आणि आईची हाक नव्हती लक्षात आली. किंबहुना तिला आई दिसली देखील नव्हती. हा अजून एक वेगळा झालेला अस बदल होता. जेव्हा ती त्या जगाच्या संपर्कात येत होती त्यावेळी ती या जगाच्या संपर्कातून तुटत होती. म्हणजे त्या काळासाठी ती तिच्या आईपासून तुटत होती. या विचाराने देखील गौरी बावरली. समोर आईला बघून गौरीला एकदम भरून आल. आईच्या कुशीत शिरत ती म्हणाली,"आईं मी न तुला सोडून कुठठे कुठठे जाणार नाही. मी तुझ्याजवळ खूप खुश आहे ग."
आईला कळेच ना काय झाल अचानक गौरीला. तिला जवळ घेऊन थोपटत ती म्हणाली,"बेटा कोण आणि का नेईल तुला माझ्यापासून दूर? आणि मी तरी अस होऊ देईन का? अज्जीबात घाबरु नकोस ह. स्वप्न पड़ल का काही तुला राणी?"
"हो.. स्वप्नच... खूप छानस... हवहवस वाटेल अस स्वप्न. जाऊ दे न पण तो विषय. चल आज तू लवकर आली आहेस तर काहीतरी खास पदार्थ ब बनवुया बाबांसाठी. मी पण मदत करते तुला." डोळे पूसत गौरी म्हणाली आणि स्वतःची व्हील चेयर जवळ ओढुन त्यात बसायला तिने सुरवात केली देखिल.
आई थोड़ी गोंधळली. पण ती शक्यतोवर गौरीला दुखवायची नाही. त्यामुळे जास्त प्रश्न न विचारता तिला मदत करायला लागली. आईने गौरीला तिच्या खुर्चीत बसवलं आणि काहीतरी बोलत स्वयंपाक घराच्या दिशेने वळली. गौरीने तिच्या खुर्चीची व्हील्स पुढे केली आणि परत एकदा क्षणभरासाठी मागे वळून त्या खिडकीकडे बघितल. पण मग तिने काहीसा विचार केला आणि ती स्वयंपाकघराच्या दिशेने वळली. दोघी माय लेकी हसत-गप्पा मारत काहीतरी नवीन पदार्थ करायला लागल्या.
अजूनही आई संध्याकाळी काकुंकड़े जात होती; पण गौरी मोह होऊनही त्या खिड़कीपासून आणि ओरस पासून लांब राहत होती. तिने मनातल्या मनात एक निर्णय घेतला होता. त्यामुळे ठरवून ती त्या खिडकीपासून लांब राहात होती. एरवी दिवसभर ती खिडकीतून बाहेर काही दिसत आहे का याचा अंदाज घ्यायची. पण आई निघायच्या वेळेस खिड़की ओढुन घेऊन ती तिचा चित्राचा कॅनवास घेऊन बसायची.
असेच दोन आठवडे गेले.
त्या दिवशी रात्री चंद्र खूपच मोठ्ठा दिसत होता. पौर्णिमा होती.मात्र वारा अज्जीबात नव्हता. पण तरीही उकड़त नव्हतं. आज बाबांनी मस्त कुल्फी आणली होती घरी. जेवण झाल्यावर गौरी आणि आई-बाबा तिच्या खोलीत गप्पा मारत कुल्फी खात होते. सहज गौरीच लक्ष खिड़कीतून बाहेर गेल आणि ती दचकली. खिड़कीच्या समोरच जे झाड़ होत त्याला टेकुन कोणीतरी उभ होत. अगोदर तिला वाटल भास् होतो आहे. पण मग तिथे हालचाल झाली आणि तिच्या लक्षात आल की खरच कोणीतरी उभ आहे. तिने त्या व्यक्तीला बघितल हे त्या व्यक्तीच्या देखील लक्षात आल. कारण खिडकी बाहेर होणारी हालचाल थोडी वाढली. आता गौरीच मन गप्पात रमना. सारखी तिची नजर बाहेर जात होती. शेवटी ती म्हणाली,"आई बाबा झोपुया का आता? मला झोप येते आहे." असा अचानक तिचा मूड का बदलावा हे त्यांच्या लक्षात नाही आल. पण तसा उशीरही झाला होता. म्हणून मग तिला नीट आडव व्हायला मदत करून ते दोघे त्यांच्या खोलीत गेले.
त्यांच्या खोलीचा दिवा बंद झाला आणि त्याक्षणी गौरीला तिच्या नावाने मारलेली हाक एकु आली.
"गौरी... गौरी..." आवाज गंभीर आणि खोल होता. ते दादाजी होते. गौरी उठून बसली. तिने खिडकीचा बंद दरवाजा उघडला.
"दादाजी? तुम्ही आहात का?" गौरीने हलक्या आवाजात विचारले.
"हो गौरी. मी.... ओरसचा दादाजी." दादाजी पुढे आले. चंद्राच्या उजेडात. त्यांचे पाणीदार डोळे आज जास्तच चमकत होते.
"काय झाल दादाजी? तुम्ही आज असे या वेळी कसे काय येऊ शकलात? आई-बाबा झोपेपर्यंत तुम्ही थांबलात ते माझ्या लक्षात आल. याचा अर्थ तुम्हाला इथल सगळ दिसत होत न? आणि मुख्य म्हणजे आई-बाबांशी बोलत असताना मला तुम्ही दिसलात. म्हणजे या जगातली माणस त्या जगाकडे बघताना देखील दिसतात का?" गौरीने त्यांना विचारल. ती पार गोंधळून गेली होती.
"गौरी.. मला इथलच काय.. इतरही खूप काही दिसत. सोय म्हणून मी स्वतः ला दादाजी म्हणून घेतो. पण माझा प्रवाह... म्हणजे मी जगलेला काळ.... कोणालाही सांगता येणार नाही इतका आहे."दादाजी त्याच गंभीर आणि खोल शांत आवाजात बोलत होते. बोलता बोलता ते खिडकीच्या खूपच जवळ आले.
आता तिला थोड़ी भिती वाटायला लागली होती. काहीतरी वेगळ आहे दादाजींमध्ये. असा विचार करत गौरीने दादाजींच्या त्या घोळदार झग्याचे निरीक्षण केले आणि तिच्या लक्षात आल की त्यांच्या पायाकडे हलकासा निळसर प्रकाश आहे. आता तिचा उर धपापायला लागला होता. तिची भिती खूप वाढली होती.
"गौरी... घाबरु नकोस. मी तुला काही करणार नाही. करूच शकत नाही. आपण दोन भिन्न जगातील एकक आहोत." दादाजिंना तिची अस्वस्थता जाणवली आणि ते थोड़े हसत म्हणाले.
"एकक म्हणजे काय दादाजी? आणि तुम्हाला अजुन काय काय दिसत दादाजी? तुम्ही आज इथे या वेळी कसे आणि का आला आहात?" गौरीने धीर करून एका मागोमाग एक प्रश्न विचारले.
आता मात्र आपली गंभीर मुद्रा सोडून दादाजी आकाशाकडे बघत मोठ्ठयाने हसले. "हाssहाssहाss! गौरी किती प्रश्न? पण मी समजू शकतो. ठिक... एका एका प्रश्नाच् उत्तर देतो. एकक! एकक म्हणजे... तुझ्या भाषेत व्यक्ति. प्रश्न दोन; मला काय काय दिसत. मला पुढचा प्रवाह दिसतो. पण तो सांगण्याचा अधिकार मला नाही.... कोणालाच नाही गौरी! प्रवाह जगायचा असतो आणि अर्थात जे मला दिसत ते सापेक्ष असत. म्हणजे सर्वसाधारणपणे एकक आयुष्यात जे निर्णय घेऊ शकतात त्याचा विचार करून जो प्रवाह तयार होतो; तो मला दिसतो. पण जर एखाद्या एककाने निर्णय बदलला तर संपूर्ण प्रवाह बदलतो. प्रवाह म्हणजे काळ बरका! आता तुझा शेवटचा प्रश्न... आज मी इथे या वेळी कसा आणि का आलो आहे! हम्... हे मात्र खूप महत्वाच् आहे गौरी. नीट ऐक. तू आमच्या जगात येणार की नाही हा संपूर्ण तुझाच निर्णय आहे; हे मी अगोदरच मान्य केल होत. पण माझा ओरस अजुन वहन-प्रवाहात नाही आला. तुला समजेल अशा भाषेत सांगायच तर; ओरस अजुन पूर्ण समजुतदार नाही झाला. जवाबदारीने आपले निर्णय घेण्यासारखा नाही झाला. मात्र तो त्या प्रवासाला निघायच्या उंबरठ्यावर असताना तू भेटलीस त्याला. त्याचा तुझ्यावर जीव जडला आहे. ख़ास मैत्रीण मानतो तो तुला.
आता तुझ्याशिवाय राहु नाही शकत तो. मला हे मान्य आहे की तू तुझ्या जगाप्रमाणे अजुन बरीच लहान आहेस.... पण मूली तू खूप हुशार आहेस. आमच्या जगातील भाषेत सांगायच तर हे जग चालवण्याच शिक्षण ज्या मोजक्या मुलांना दिल ज़ात, त्यातील सर्वात वरच्या फळीतली एक तू होऊ शकतेस. माझ्या ओरससारखी! तुझ गणितही बरोबर आहे. आमच जग तुमच्या जगातील प्रवाहापेक्षा... काळापेक्षा... थोड़ पुढे पळत.... तर त्यामुळे तुझ्या काळात जरी फ़क्त 2 आठवडे झाले असले तरी आमचा प्रवाह जास्त पुढे सरकला आहे. तू कदाचित् अजुन तुझा निर्णय घेतला नसशील. किंवा असा निर्णय घेतला असशील की आमच्या जगात नाही येणार; पण अजुन ओरसला सांगण्याची हिम्मत नसेल तुझ्यात. म्हणून तू तुझी खिड़की बंद करून बसतेस. पण त्याचा फार वाईट परिणाम ओरसवर झाला आहे. आमच्या जगात अस्वस्थता ही भावना माहीत नाही. त्यामुळे तू न दिसल्याने अस्वस्थ झालेला ओरस काही सांगता येत नसल्याने स्वस्थ बसून असतो. इतरांना काही कळत नसल्याने ते येता-जाता त्याला प्रश्न विचारतात. तो त्यांना त्याची अस्वस्थता सांगू शकत नाही आणि इथले कोणी त्याला समजू शकत नाहीत. केवळ मी त्याला समजू शकतो आणि म्हणून मी आज मुद्दाम तुला भेटायला आलो आहे." एवढ बोलून दादाजी क्षणभर थांबले आणि मग त्यांनी अचानक गौरीला विचारले," गौरी तू काय ठरवल आहेस? तू इथे येणार आहेस की नाही?"
क्रमश:
प्रतिक्रिया
20 Mar 2017 - 1:41 am | स्रुजा
इंट्रेस्टिंग !
20 Mar 2017 - 12:11 pm | दाह
parallel युनिव्हर्स किंवा अदर डायमेन्शन. भन्नाट
20 Mar 2017 - 3:06 pm | सुचेता
थांबाव वाटत नाही वाचताना
20 Mar 2017 - 6:32 pm | मराठी कथालेखक
मस्त चाललीये ... नेहमीच्या इतर गूढकथांपेक्षा एकदम वेगळी...
20 Mar 2017 - 7:16 pm | ज्योति अळवणी
धन्यवाद. आपल्या सर्वांचा प्रतिसाद वाचून खूप बरं वाटलं