भाग १ : http://www.misalpav.com/node/39159
भाग 2: http://www.misalpav.com/node/39179
भाग 3: http://www.misalpav.com/node/39196
भाग 4
"ए बॉल तुझ्या खिड़कीत आला आहे. टाक ना...." त्या आवाजाने आणि समोर कंबरेवर हात ठेऊन उभ्या मुलाकडे बघुन मात्र गौरी पुरती गडबडली.
"क...काय? कोण?..... मी? म्हणजे ... मला म्हणालास?" गौरीने अडखळत विचारल. ती पुरती गोंधळून गेली होती. तिच्या मनातला समज चुकीचा आहे हे तिच्या लक्षात येऊनही तिला पचत नव्हते.
"हो... कमाल करतेस. खिड़कीत तूच बसली आहेस न? मग दुस-या कोणाला कस सांगेन?" तो मुलगा सहज आवाजात म्हणाला.
"तुला मी दिसते आहे?" तिने आश्चर्याने विचारल.
"तू वेडी आहेस का? तू दिसत नसतीस तर मी काय हवेशी बोलतो आहे का?" त्याने हसत उत्तर दिल. " नेहमीच बघतो मी तुला. तशी रोज दिसतेस अलीकडे. पण अगोदर जेव्हा दिसली होतीस तेव्हा मला आश्चर्य वाटल होत. तुझ्याशी बोलायचं ठरवल होत, पण मग तू दुसऱ्या दिवशी दिसलीच नाहीस. मग मधेच एक दिवस दिसलीस. परत गायब. मग मी तुझा नाद सोडला. अलीकडे मात्र रोज दिसत असतेस. पण तू कधी खेळायला येत नाहीस. एकदा येणार पण होतो तुला विचारायला. पण दादाजी नको म्हणाले. आणि तसंही हे मैदान म्हणजे आमची सीमा रेषा आहे असं म्हंटल जात. इथपर्यंत येण्याची वेगळी परवानगी घ्यावी लागते. म्हणून मग उगाच माझ्या हातून काही चूक व्हायला नको असा विचार केला आणि मग नाही आलो. शिवाय दादाजी म्हणाले तू आपणहुन हाक मारशील आणि येशिल तेच चांगल. पटल ते मला. म्हणून तू हाक मारायची वाट बघत होतो. आज मात्र आमचा बॉल आला आहे तुझ्या खिडकीजवळ. त्या निमित्ताने निदान तुझ्याशी बोलतो तरी आहे. बर ते जाऊ दे. तो बॉल टाक. आमचा खेळ खोळंबला आहे" तो मुलगा रोजची ओळख असल्या सारखा गौरीशी बोलत होता. गौरी मात्र आश्चर्याने पार गारद झाली होती. तिने काही न बोलता बॉल टाकला. त्या मुलाने झेलला आणि परत मैदानाकड़े पळाला.
'मी पण त्यांना दिसते? गेले अनेक दिवस....? अस तो मुलगा म्हणाला खरं. पण अस कस? दादाजी कोण असतील? त्यांनी अस का सांगितल की मी हाक मारेपर्यंत थांबायच? तो मुलगा म्हणाला हे मैदान एक सीमारेषा आहे... म्हणजे नक्की काय? हे एकूण काय असेल?' गौरी जाम गोंधळली होती; पण घाबरली मात्र नव्हती. ती विचार करत होती. विचार करण्यात किती वेळ गेला ते तिच्या लक्षात आल नाही. पण थोड्या वेळाने तिची आई आली आणि मग बाबा देखील आले. आई-बाबा असताना त्यांच्याशी अगदी नेहेमीसारख वागत-बोलत होती ती. पण तिच आंतर मन सतत विचार करत होत. तिच वयच अस होत की तिची उत्सुकता तिला स्वस्थ बसु देत नव्हती. आणि मग तिने स्वतःच हाक मारायच ठरवल.
"ए..... ए... शुक-शुक... ए मुलगा......" गौरीने हाक मारली.
काल बॉल घेऊन जाणा-या त्या मुलाने वळून बघितल. त्याने तिच्या दिशेने हात हलवला आणि धावत येऊन तिच्या समोर उभा राहिला.
"ए शुक-शुक काय? मला नाव आहे." कंबरेवर हात ठेऊन तो म्हणाला.
"अरे पण मला माहीत नाही न तुझ नाव..." गौरी हसत म्हणाली.
"ओरस..." तो शांतपणे म्हणाला.
"काय?" गौरी गोंधळून म्हणाली.
"माझ नाव ग... ओ...र...स... आणि तुझ?" तो म्हणाला.
"गौरी" तिने उत्तर दिल.
"काय? ग...व...री? अस कस नाव?" त्याचा चेहरा गोंधळाला होता. "बर. ते जाऊ दे. येतेस खेळायला?" त्याने विचारले आणि एकदम दाताखाली जीभ चावली. त्याने कसानुसा चेहेरा करत इथे-तिथे बघितल.
"नाही जमणार रे..." गौरी दुःखी होत म्हणाली. "आणि असा का केलास चेहेरा?" तिने विचारले.
"अग मी तुला पहिल्यांदा बघितल ना तेव्हा मला खूप आश्चर्य वाटल होत. मग अचानक तू गायब होतिस काही दिवस. मग एक दीवस परत दिसलिस आणि मग रोज दिसायला लागलीस. मी हे सगळ दादाजिंना सांगितल....." ओरस बोलत होता. त्याला मध्येच थांबवत गौरीने विचारलं,"हे दादाजी कोण रे?"
"आहेत... अsssss.... म्हणजे ते एक आहेत त्यांना आम्ही सगळेच दादाजी म्हणतो. सगळे म्हणजे माझ्याहून मोठे सुद्धा आणि माझ्याहून लहानसुद्धा. ते आमच्यातले खूप काहीतरी आहेत. त्यांना मी जेव्हा सांगितल तू दिसतेस तेव्हा ते म्हणाले अस होत कधी-कधी. नकळत एखादी खिड़की दिसते उघडलेली. जरी ती खिडकी दोन्ही बाजूनी उघडलेली असली तरी आमच्या बाजूने बोलायला सुरवात कारण योग्य नाही अस ते म्हणाले. आणि म्हणाले की तू स्वतः बोलेपर्यंत नाही बोलायच. म्हणून तर मी खूप वाट बघितली की तू बोलशील. पण तू नुसतीच् बघत बसलेली असायचीस. एक गंमत सांगू? कोणाला सांगू नकोस ह... पण मी काल मुद्धाम बॉल इथे मारला आणि त्या निमित्ताने आलो इथे तुझ्यासमोर. बघ, झाला की नाही उपयोग. लागलो की नाही आपण बोलायला. मला वाटलं होत कोणाला कळणार नाही मी मुद्दाम बॉल याबजुला मारला आहे. पण दादाजिंपासून काहीच लपत नाही. दादाजींच्या ते लक्षात आल की मी मुद्धाम बॉल इथे मारला होता. ते म्हणाले मला ... ओरस मला कळल बर का... बास इतकच! तसा मी त्यांचा लाडका आहे न. त्यामुळे रागावले नाहीत." तो....ओरस... हसत म्हणाला.
ते सगळ ऐकून गौरी थोड़ी गोंधळली. पण मग हसून म्हणाली,"बर झालं तू स्वतःहून मला हाक मारलीस. अरे मला वाटायच की फ़क्त मलाच तुम्ही दिसता. तुम्हाला मी दिसत असेन अस वाटलच नाही; नाहीतर कधीच हाक मारली असती."
त्यावर ओरस हसला. "ग.....व.....री... चल येतेस खेळायला?" अस ओरसने विचारल आणि गौरी एकदम गप्प झाली.
"का ग तुला खेळायला नाही आवडत?" तिला अस अचानक गप झालेलं बघून त्याने विचारल.
"ओरस माझ नाव न गौरी आहे रे... ग...व...री... नको ना म्हणुस. शेणाच्या गव-यांसारख वाटत." गौरी म्हणाली... "आणि किनै मला पण खूप आवडत खेळायला. पण... पण किनै मी कंबरेखालुन अधु आहे. त्यामुळे मी नाही येऊ शकणार खेळायला." गौरीने खालच्या आवाजात सांगितल.
"अधु? म्हणजे?" ओरसने गोंधळून विचारल. अगोदर गौरीला वाटल तो तिच्या अधू असण्याची चेष्टा करतो आहे आणि तिला राग आला. पण मग त्याचा गोंधळलेला चेहेरा बघुन ती म्हणाली,"अरे म्हणजे मी कमरेखालुन हलु शकत नाही."
"अरे?अस कस? का नाही? सगळेच कमरे खालून हळू शकतात. मग तू का नाही?" आता ओरस अजुन गोंधळला.
"माझा एक अपघात झाला होता." तिने उत्तर दिल.
"अपघात? म्हणजे?" त्याने परत विचारल. आता मात्र गौरी थोड़ी वैतागली. "जा विचार तुझ्या त्या दादाजिंना. तू म्हणतोस न त्यांना सगळ कळत? मग त्यांना अपघात म्हणजे काय ते पण सांगता येईल तुला. मला याहून जास्त नाही समजावता येत." अस म्हणून गप बसली.
"हो ग. त्यांना न सगळ कळत आणि माहीत असत. त्यांनी खूप जास्त प्रवाह बघितले आहेत." ओरस म्हणाला.
"प्रवाह? म्हणजे? तुमच्याकडे खूप नद्या आहेत का?" आता न समजण्याची पाळी गौरीची होती.
"अग नद्या नाही ग. अग प्रवाह.. म्हणजे हा जो आहे तो.. म्हणजे आपण हे जे करतो ते..." ओरस त्याच्या परीने समजावत होता. आता समजावायची पाळी त्याची होती न. त्यांच्या गप्पा अजूनही लांबल्या असत्या. पण अचानक एक मोठी शीळ वाजली आणि त्याने डोळे विस्फारुन मैदानाच्या दिशेने वळून बघितल. शिळेचा आवाज एकताच सगळे परत निघाले होते. त्याने तिला घाइघाइने अच्छा असा हात केला आणि बोलतानाच वाक्य अर्धवट सोडून तो मैदानाच्या दिशेने धुम पळाला.
गौरीने पण "बाय" म्हंटल. पण बहुतेक त्याला ते एकु नाही गेल. तिने मान आत वळवुन घरात बघितल. अजुन आई आली नव्हती. तिने हलकासा निश्वास टाकला. 'ओरसशी बोलण्याच्या नादात आपण आपल घर आणि आई-बाबा विसरलो होतो. हे बरोबर नाही. सांभाळल पाहिजे.' तिच्या मनात आल. तेवढ्यात आई आलीच आणि मग इतर विचार बाजूला ठेवत गौरी आईशी गप्पा मारण्यात मग्न झाली.
असेच काही दिवस गेले. ओरस तिच्या खिडकीकडे रोज यायला लागला होता. तो आणि गौरी रोज गप्पा मारायला लागले होते. आता गौरीची ओरसशी छान गट्टी देखील जमली होती. त्याचे दादाजी म्हणजे त्याचे खरे आजोबा नव्हते हे एव्हाना गौरीच्या लक्षात आले होते. ते त्यांच्या जगातले एक अत्यंत जुने गृहस्थ होते. त्याना सगळेच 'दादाजी' म्हणायचे कारण त्यांनी त्या जगातल्या अनेक पिढ्या बघितल्या होत्या. पण दिसायला ते वृद्ध नव्हते अस ओरसच मत होत. त्यांच्याकडे ट्रॅफिक.... मोठ्ठे आवाज... भांडण.... अपघात..... अस काहीच नव्हतं म्हणे. कारण ती असं काही सांगायला लागली की ओरस गोंधळून जात असे. हे सगळ समजून गौरीला थोड़ विचित्रच वाटल.
तिने तिच्या जगाची माहिती दिली. त्यात मोठ्ठे आवाज होते; गोंधळ-कलकलाट होते; अपघात होते.... ओरसच्या मते ते सगळ खर नव्हतच. कारण त्याला या सगळ्याची कल्पना करताच येत नव्हती.
हळूहळू गौरीची आणि ओरसची चांगली दोस्ती झाली होती. दोघांनाही आता हे लक्षात आल होत की ते दोघे वेगवेगळ्या जगातले होते. गौरीच्या खिडकीमध्ये काहीतारी होत की ज्यामुळे ती ओरसच्या जगाला बघू शकत होती, आणि ते जग... त्यातला ओरस...... तिला बघू शकत होता. गेला आठवडाभर ते दोघे गप्पा मारत होते. खर सांगायच तर एकमेकांच्या वेगळेपणाचा अंदाज घेत माहिती गोळा करत होते. तो तास-दीड तास म्हणजे गौरीच्या रुक्ष आयुष्यातल एक सुन्दर हिरव वळण होत. फ़क्त तिच्यासाठी उघडल गेलेल; याची तिला पूर्ण कल्पना आली होती. ती या आणि त्या जगाच्या उंबरठ्यावर उभी होती याची तिला आतापर्यंत कल्पना आली होती.
गौरीचा जीव आई-बाबांमधे जितका रमायचा तितकाच् तो आता ओरसबरोबर गप्पा मारताना खुलायचा. ओरस देखिल तिला बघितल की खेळ सोडून धावत यायचा. कधीतरी तिची आई घरीच थांबायची गौरीला बर वाटाव म्हणून. मग गौरीदेखील काही म्हणायची नाही. ती आईशी गप्पा मारताना सारखि खिड़कीबाहेर बघायची. पण तिथे ओरस आणि त्याच जग दोन्ही नाही दिसायच. अर्थात त्याची तिला कल्पना होती. तिला हे देखील लक्षात आल होत की तिची आई असताना जरी गौरी खिडकीमद्धे बसली तरी ओरसला ती दिसत नव्हती.
असाच अनेक दिवसांपैकी एक दिवस होता. ओरस आणि गौरी गप्पा मारत होते. आणि अचानक ओरस म्हणाला,"गौरी किती दिवस आपण अस गप्पा मारणार? ये न इथे. आपण एकत्र खेळूया." गौरी काही न बोलता गप बसली. तिच गप बसण म्हणजे होकार आहे अस ओरसला वाटल आणि मग ओरस् तिच्या मागेच् लागला.
त्याचा आग्रह वाढला तशी गौरी म्हणाली,"अरे ओरस् कस समजाऊ तुला. मला नाही येता येणार तिथे. मुळात मला एकटीने हलताच येत नाही. आणि मी प्रयत्न करून आलेच तिथे तरी तुमच जग माझ्या जगापेक्षा वेगळ आहे. मी परत येऊच नाही शकले तर? माझ्या आई-बाबांच कस होईल अस मला अचानक गायब झालेल बघुन? अरे अजुन तुझ्या लक्षात नाही का आल? आपण दोघे एका अशा सीमारेषेवर उभे आहोत. की मी तिथे आले तर परत येऊ शकेन याची मला शाश्वती नाही आहे." गौरीने त्याला शांत करत उत्तर दिल.
त्यावार ओरस म्हणाला,"मी दादाजीना विचारल."
"काय म्हणाले ते?" तिने उत्सुकतेने विचारल.
"तुझ्या परत जाण्याबद्दल ते काहीच म्हणाले नाहीत. ते म्हणाले इथे येण्याचा निर्णय तुला स्वतः ला एकटीने घ्यायचा आहे. त्यांनी मला तुझा निर्णय विचारायला सांगितले आहे." तो म्हणाला.
त्याच बोलण एकून गौरी थोडी गंभीर झाली. "समजा मी म्हणाले हो येते तर? तुझे दादाजी मला मदत करतील? मला परत इथे माझ्या आई-बाबांकड़े येता येईल? मला चालता येत नाही. फार तर खिड़कीत चढु शकेन; मला ते तिकडे उतरवून घेऊ शकतील? ओरस तुला लक्षात आल आहे का ते माहित नाही, पण तुमच जग आमच्या जगापेक्षा अनेक बाबतीत पुढे आहे. तुम्ही जास्त प्रगत आहात. तुमचं कालमापन आमच्यापेक्षा थोड वेगळ आहे. आमचा तास म्हणजे तुमच्या कडचा बहुतेक दीड तास असावा; असा माझा अंदाज आहे. हे सगळ वेळेच गणित तुझे दादाजी जमवू शकतील? ओरस मलाही तिथे तुमच्या जगात यावास वाटत रे. पण परतीची वाट बंद होईल की काय या भितीने मी तिथे येण्याचा विचार देखील करत नाही. आणि अर्थात हे माझ अधू असण देखील एक मोठा प्रश्न आहे...... या सगळ्याची उत्तर तुझे दादाजी देऊ शकतील?" तिने एका मागोमाग एक प्रश्न विचारले.
ओरसला काय बोलाव ते सुचत नव्हत. तो गौरीकडे बघत होता आणि गौरी त्याच्याकडे.... आईन अचानक एक खूप गंभीर आणि खोल खर्जातला आवाज आला..."हो गौरी! सगळ जमेल"
क्रमश:
प्रतिक्रिया
18 Mar 2017 - 9:38 pm | भीमराव
खिडकीचा प्रकार नार्निया सारखा वाटतोय, चालुद्या मस्त.