खिडकी पलीकडचं जग

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
13 Mar 2017 - 9:37 pm

खिडकी पलीकडचं जग

भाग १

गौरी नावासारखिच गोड, मोहक आणि बड़बडया स्वभावाची मुलगी होती. लाघवी आणि मित्र-मैत्रिणींचा मोठा परिवार असलेली. कायम पहिला नंबर वगैरे नाही... पण तशी हुशार म्हणण्या सारखी. आई-बाबांची एकुलती आणि लाडकी लेक. गौरी उत्तम चित्र काढायची. त्यामुळे शाळेतून तिला वेगवेगळ्या स्पर्धाना देखील पाठवाल जायचं. अनेकदा तिने शाळेला बक्षीस मिळवून दिल होत.

त्या दिवशी गौरीची 10वी च्या परीक्षेचा शेवटचा पेपर होता. त्यामुळे गौरी आणि तिच्या मैत्रिणी जाम खुशीत होत्या. सगळ्या मैत्रिणी मिळून जुहुला भटकायला जाणार होत्या. आता आपण कॉलेज मध्ये जाणार म्हणजे थोडे मोठे झालो अस सगळ्यांच्याच मनात होत. त्यामुळे घरून सर्वानीच बाहेर खाण्यासाठी पैसे घेतले होते. हसत-खिदळत सगळा ग्रुप बीच वर पोहोचला. पाण्यातली धम्माल... भेळ... गोळा... धावाधाव... एकदम खुशीचा माहोल होता. एकूण यासगळयामधे कधी अंधार झाला ते मुलींना कळलच नाही. उशीर झाला आहे हे लक्षात आल्यावर मात्र सगळ्याजणी गड़बडल्या. ज्या मुली एकमेकी जवळ रहाणा-या होत्या त्यांनी सोबतीने जाण्याच्या दृष्टीने एकत्र रिक्शा केल्या आणि दुस-या दिवशी भेटायच ठरवून निघाल्या. गौरी आणि अक्षरा जवळ जवळ रहायच्या त्यामुळे त्यांनी दोघींनी एकच रिक्षा केली होती. अक्षरा अगोदर उतरणार होती तस तिला सोडून गौरीची रिक्शा पुढे गेली त्यावेळी साधारण साडे सात वाजले होते.

"हॅलो अक्षरा आहे का? मी गौरीची आई बोलते." रात्रीचे नऊ वाजले होते आणि अक्षराच्या घरी गौरीच्या आईचा धास्तावलेल्या आवाजातला फोन आला.

"हॅलो काकू.. मी अक्षरा. काय झाल काकू?" अक्षराने फोन घेतला.

"अक्षरा अग मी आत्ता मितालीला फोन केला होता. ती म्हणाली तू आणि गौरी एकत्र निघालात. मग गौरी तुझ्याकडे थांबली आहे का? अजुन ती घरी नाही आलेली." काकुंचा आवाज अस्वस्थ होता.

"अस कस होईल काकु? अहो काकू उशीर झाला होता ना आम्हाला जुहुहून निघताना त्यामुळे आम्ही दोघींनी एकच रिक्षा केली. घरीच गेलेलं बर अस आम्ही ठरवल. म्हणून मी रिक्षातून उतरले आणि गौरी तीच रिक्शा घेऊन पुढे गेली. आम्ही उद्या दुपारी भेटायच ठरवल आहे. काय झाल काकू?" अक्षरा गोंधळून गेली.

"ठीके... काही झाल नाही ग. पण तुला जर गौरीचा फोन आला तर तिला अगोदर मला फोन करायला सांग." अस म्हणून गौरीच्या आईने फोन ठेवला.

अक्षराचा फोन ठेवून गौरीची आई अस्वस्थपणे विचार करत बसली. कारण गौरी अजूनही घरी पोहोचली नव्हती. गौरीचे बाबा कधीचेच तिला शोधायला बाहेर पडले होते. शेवटी काही न सुचुन गौरीची आई पोलिस स्टेशनमधे गेली.

"अहो माझी मुलगी अजुन घरी नाही आलेली. आजच 10वी ची परीक्षा झाली आणि सगळ्या मैत्रिणी जुहू बीचवर फिरायला गेल्या होत्या. तिने तिच्या मैत्रिणीला रिक्षाने सोडल आणि ती पुढे गेली; अस तिची मैत्रीण म्हणते. पण माझी मुलगी घरी नाही हो आली." पोलीस स्टेशनला पोहोचल्या पोहोचल्या गौरीच्या आईने बोलायला सुरवात केली. ती फारच रडवेली झाली होती.

त्यांना बसवत आणि हातात पाण्याचा ग्लास देत एका पोलिस अधिकाऱ्याने विचारलं," कुठे रहाता तुम्ही? काय वय आहे तुमच्या मुलीच?"

गौरीच्या आईने दिलेला ग्लास नाकारला आणि म्हणाली, "खार पूर्वेला. 16 वर्षाची आहे हो. गौरी नाव आहे. मी तिचा फोटोसुद्धा आणला आहे. हा बघा." आणि फोटो काढून दाखवला.

फोटो बघताच त्या पोलिस अधिकाऱ्याने गौरीच्या आईला विचारले,"रिक्षात होती का ती?"

"हो साहेब. तुम्हाला काही माहिती आहे का हो?" आता मात्र आईचा धीर सुटायला लागला होता. त्यांचे डोळे वाहायला लागले.

"अहो मॅडम अस रडु नका. तुमच्या मुलीचे वडील कुठे आहेत? हा घ्या फोन आणि त्यांना बोलवा बघू. काळजी करु नका. आपण शोधु तुमच्या मुलीला" पोलीस अधिकारी चांगला होता. त्याने गौरीच्या आईला बसायला सांगितल आणि तिच्या हातात फोन दिला.

गौरीच्या आईने वडीलाना फोन केला. आपली पत्नी पोलीस स्टेशन मधून बोलते आहे आणि पोलिसांनी लग्गेच बोलावले आहे समजले तसे गौरीचे वडील धावत पळत पोलिस स्टेशनला पोहोचले. ते अधिकारी त्यांना घेऊन बाजूला गेले. थोड्या वेळाने गौरीचे बाबा आईजवळ आले आणि म्हणाले,"विजया, एका रिक्षाचा संध्याकाळच्या वेळी आपल्या घराजवळच अपघात झाला आहे. रिक्षात एक मुलगी होती. साधारण आपल्या गौरीच्याच वयाची. अस हे साहेब म्हणताहेत. तिला जवळच्याच् हॉस्पिटल मधे नेले आहे. चल आपण जाऊन बघू या."

हे ऐकून गौरीची आई मटकन खाली बसली. बाबांनी तिला हाताला धरून उठवल आणि ते हॉस्पिटलच्या दिशेने निघाले.

या घटनेला आज 3 महीने झाले होते. गौरीचा रिजल्ट होता. पण तो घ्यायला गौरी जाऊ शकणार नव्हती. त्या अपघातामधे गौरीचे दोन्ही पाय निकामी झाले होते. तिच्या पायांमधली शक्तीच जणूकाही कोणीतरी काढून घेतली होती. ती कमरेखाली पूर्ण अधु झाली होती. खळ-खळ वाहाणा-या झ-यासारखी गौरी गहि-या डोहासारखी शांत झाली होती.

अगोदर सतत येणा-या मित्र-मैत्रिणींचा ओघ रिजल्ट नंतर कमी झाला. सगळे आपापल्या पुढच्या मार्गाला लागले. गौरी त्या अपघातातून पूर्ण सावरली नव्हती आणि आता या नव्या परिस्थितीत पुढे काय करायचं याचा विचारही तिने केला नव्हता. त्यामुळे तिच्या मित्र-मैतीर्णींचे गप्पांचे विषय आता बदलले आणि गौरीचा एकाकीपणा वाढला.

kathaa

प्रतिक्रिया

कौशी's picture

14 Mar 2017 - 6:21 am | कौशी

पु भा प्र...