ग्रामीण साहित्यातील 'आनंद’ गेला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जनातलं, मनातलं
28 Nov 2016 - 8:14 pm

ग्रामीण साहित्यातील 'आनंद’ गेला.

सकाळीच डॉ.आनंद यादव गेल्याच्या बातमीने धक्काच बसला. डॉ आनंद यादव खूप वर्षापूर्वी औरंगाबादला आले तेव्हा आमच्या मराठवाडा साहित्य परिषदेत त्यांची भेट झाली होती. मिसळपाववर मी आनंद यादवांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यावर त्यांच्या अभिनंदनाचा धागा काढला होता. डॉ. आनंद यादव यांच्या भेटीत फ़ारशी ओळख नसतांनाही काही लेखक मंडळींच्या आणि त्यांच्या गप्पाही रंगल्या होत्या आम्हीही त्यात होतो तेव्हा 'वाचत राहा' हा सल्ला त्यात होता. त्यांच्या गप्पांच्या आठवणींनी आज आत जरा जरा गलबलून आलं होतं.

आनंद यादव डॉ.आनंद यादव

आनंद यादव यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातला कागलचा. कागलपासून सुरु झालेला हा प्रवास काल पुण्यात थांबला. आनंद रत्नाप्पा जकाते. जकाते हे पडनाव, त्यांचे पूर्वज जकात गोळा करायचे त्यावरुन त्यांना जकाते हे नाव पडलं होतं. आडनाव मात्र यादवच होतं. वडीलांची स्वत:ची शेती नव्हती. एका जमीन मालकाच्या शेतावर राबणारे हे कुटुंब. आईचं नाव ताराबाई. एकूण बारा भावंडापैकी आनंद यादव सर्व मुलात मोठे. मोठ्या मुलाने शेतात हातभार लावला पाहिजे ही वडीलांची अपेक्षा. आजुबाजुचं वातावरण कोणत्याही अर्थाने शिक्षणाला पुरक नव्हतं. गुराढोरांमागे किंवा शेताला जाणे याशिवाय दुसरा उद्योग नव्हता. अशा प्रतिकुल परिस्थितीत त्यांना शिक्षणाची ओढ लागली. शिक्षणासाठी मार्गदर्शन करायला कोणी नव्हतं. शिक्षणासाठी कोणतेही हाल अपेष्टा सोसण्याची तयारी शाळेतल्या गुरुजींनी पाहिली आणि त्यांची शाळा सुरु झाली. शाळेसाठी असलेली जिद्द ’झोंबी’ या आत्मचरित्रात वाचायला मिळते. 'शिक्षण कुणब्याचं काम नव्हं' अशी त्यांच्या वडीलांची धारणा होती. अर्थात अशा मानसिकतेस तेव्हाच्या परंपराच जवाबदार होत्या. वडीलांनी त्याचा हा शिक्षणाचा नाद मोडण्याचा प्रयत्न केला. आपल्या कुटुंबाला शिक्षणाची नव्हे तर कुटुंब चालविण्यासाठी पैशांची गरज आहे, हे बिंबवण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला. परंतु याचा काहीही परिणाम आनंद यादवांवर झाला नाही. शिक्षणाची त्यांची उर्मी वाढतच गेली. आईकडून मात्र प्रोत्साहान मिळत होते.

आनंदाला शिक्शणाची आवड आहे तर शिकू द्या, असा भोळाभावही आईकडे मनातल्य मनात होता. आनंदाला अप्रत्यक्ष मदत करणा-या पत्नीवरही रत्नप्पा राग काढ्त असे. आनंदाला शेतीकामात त्यांनी इतकं जखडून टाकलं होतं की त्याला अभ्यासाला वेळ मिळु नये, म्हणुन त्यांच्या वडीलांनी पूर्ण प्रयत्न केला. पण अभ्यासाची आवड आणि जिद्दीमुळे मिळालेल्या वेळातही आनंद यादव पुस्तके मिळवत आणि ते वाचून काढत असत. शेतीचे ढोरकाम करता करता आनंद यादव गावात येणारे तमाशे बघायचे, त्यातले संवाद म्हणायचे, नकला करायचे, गाणी म्हणायचे असा उद्योगही त्यांचा चालू असायचा. कविता वाचून वाचून आपण कविता लिहू शकतो ही जाणीव त्यांना झाली. चौथ्या इयत्तेत असतांना त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली. वाचन सुरु असल्यामुळे त्यांची बाल्यवस्था तशी संपूनच गेली ते फ़ार लवकर मोठे झाले. शालेय शिक्षण गावात पूर्ण झाल्यानंतर वडीलांना आता आपला मुलगा नोकरीला लागेल आणि संसाराला हातभार लावेल असे त्यांना वाटत होते. पण आनंद यादव आता थांबणार नव्हते त्यांनी पळून जाऊन कोल्हापूर गाठले. उपासमार, केळीची सालं खाऊन आनंद यादवांनी ते दिवस काढले. पुढे काही स्वातंत्र्य सैनिकांच्या मदतीने त्यांनी रत्नागिरी गाठली. सर्वोदय छात्रालयात राहून त्यांनी आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. कवी प्राचार्य य.द.भावे, प्रा. रा.वा. चिटणीस यांचा सहवास त्यांना लाभला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कवितेचे त्यांचे वाचन वाढले. कविता लेखनास बळही मिळाले. प्राचार्य य.द.भावे यांनी पु.ल.देशपांडे यांची भेटही घडवून आणली. पुलंचा हात त्यांच्या पाठीवरुन फ़िरला ही त्यांच्या जीवनातील महत्वाची घटना होती. महाविद्यालयीन शिक्षण चालू असतांना ते रत्नागिरीहून पुन्हा कोल्हापुरला आले. 'हीरवे जग' मधे संकलीत झालेल्या कविता त्यांनी इथेच लिहिल्या. कोल्हापुरच्या वास्तव्यात त्यांना अनेक नामवंत मोठी लेखक मंडळी भेटली. लेखकांच्या प्रोत्साहानाने त्यांनी ’मातीखालची माती’ हे व्यक्तीचित्रही इथेच लिहिले. बी.ए. झाल्यावर यादवांनी आकाशवाणी केंद्रावर नोकरी केली. पुढे एम. ए. झाल्यावर त्यांनी प्राध्यापकाचा पेशा स्वेच्छेनेच स्वीकारला. आपल्या लेखन वाचनास हाच पेशा अनुकुल आहे याची त्यांना खात्री होती. कविता, कथा, कादंबरी या क्रमाने त्यांनी वाड्मय प्रकार हाताळायला सुरुवात केली. त्याचबरोबर संशोधन आणि समीक्षालेखनही त्यांनी केले. 'पाणभवरे' मधील ललित लेखन अभ्यासनीय होते.

'जानपद' गितांमधून आणि ग्रामीण साहित्यातून खरे ग्रामजीवनाचे चित्रण येत नाही अशी त्यांची प्रामाणिक धारणा होती. म्हणुनच त्यांनी ग्रामजीवन वास्तवपूर्ण लिहिण्याचा प्रारंभ केला. स्वातंत्र्योत्तर काळात तरी ग्रामीण बहुजनसमाजाचे शोषण संपेल असे वाटले होते परंतु ते संपले नाही. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळे दलित साहित्याचा एक नवा झंजावात उसळला. दलित साहित्य मराठी साहित्यापुढे एक आव्हान म्हणुन उभे राहीले होते. ग्रामीण समाजात शिक्षणाने एक नवी पिढी निर्माण केली त्या पिढीचे भान आणि प्रतिनिधित्व आनंद यादवांकडे होते म्हणूनच त्यांनी आधुनिक ग्रामीण साहित्याची चळवळ सुरु केली. ग्रामीण साहित्याच्या वास्तववादाला एक सामाजिक अधिष्ठान देण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

आधुनिक ग्रामीण साहित्याची भूमिका यादवांनी मांड्ली. त्यासाठी ग्रामीण साहित्य संमेलने, मेळावे, परिसंवाद घडवून आणले. १९७५ च्या सुमारास ग्रामीण कथेवर लिहिणारी एक पिढी त्यांनी उभी केली. खेड्यातला नवा लेखक लिहिता झाला पाहिजे ही त्यांची भूमिका होती, त्यांच्या लेखनाचे त्यांनी संपादनेही केली. १९७५ च्या या ग्रामीण चळवळीला पाहुन डॉ.गं.ना.जोगळेकर म्हणाले होते की आनंद यादव यांनी मराठी साहित्यात 'यादवकाळ' सुरु केला होता. 'तिस-या पिढीची ग्रामीण कथा' संग्रह संपादित करुन त्यांनी त्यास प्रस्तावना लिहिली आहे. ग्रामीण साहित्य चळवळीचा सतत पाठपुरावा केला. ग्रामीण साहित्य चळवळीस विरोध करणार्‍या विरोधकांचाही त्यांनी समाचार घेतला आणि हे करत असतांना एका सामान्य शेतक-याच्या मुलाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन यश मिळविले हे त्यांनी 'झोंबी' आणि 'नांगरणी' आत्मचरित्रामधुन दाखवून दिले. या दोन्ही पुस्तकांना पुढे अमाप लोकप्रियताही मिळाली. शिक्षणाच्या माध्यमातून जीवन घडविणा-यांना ती कथा आपली जवळची वाटली. ’हिरवे जग कविता संग्रह १९६० ला त्यांनी लिहिला. तीन कविता संग्रह, सहा कथा संग्रह, एक व्यकीचित्र, सात कादंब-या दोन ललित लेख, एक वग नाट्य, चार समीक्षा ग्रंथ दोन संपादने. असे त्यांचे भरभरुन लेखन आहे.

'संतसूर्य तुकाराम' या कादंबरीच्या निमित्ताने विनाकारण वाद निर्माण झाला. वारक-यांनी हल्लाबोल करुन २००९ चे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या मानापासून त्यांना वंचित केले. विद्येच्या माहेरघरात लेखन परत घेत आहे, असे त्यांना म्हणावे लागले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीने ते सर्व समर्थनीय नव्हतं. तरीही डॉ. आनंद यादव आपल्या लेखनाने रसिक वाचकांच्या कायम स्मृतीत राहतील, यात काही वाद नाही.

डॉ. आनंद यादव यांना मिपापरिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

संदर्भ : ग्रामीणता साहित्य आणि वास्तव : आनंद यादव.       २) आनंद यादव व्यक्ती आणि वाड्मय : डॉ.रविंद्र ठाकूर.

संस्कृतीकलावाङ्मयविचार

प्रतिक्रिया

आनंद यादवांना भावपूर्ण श्रद्धांजली!

jp_pankaj's picture

28 Nov 2016 - 8:22 pm | jp_pankaj

_/\_

यशोधरा's picture

28 Nov 2016 - 8:26 pm | यशोधरा

समयोचित लेखन. डॉ. यादव ह्यांना श्रद्धांजली.

आनंद यादव ह्यांना श्रद्धांजली.

उत्तम परिचय करून दिलात सर.

आनंद यादवांचा प्रथम परिचय शाळेत असतांना बालभारतीच्या, कुमारभारतीच्या पुस्तकांमधून झाला. दोन ते तीन इयत्तांत त्यांच्या कथा/ ललित लेखन वाचल्याचं आठवतंय.

नंतर झोंबी हे पुस्तक वाचून काढलं, ते ही आवडलं. मात्र ग्रामीण बाजाच्या कथा फारशा आवडत नसल्याने यादवांचे इतर लेखन कधी वाचले गेले नाही.

अनुप ढेरे's picture

28 Nov 2016 - 8:30 pm | अनुप ढेरे

श्रद्धांजली!

झोंबी आणि नांगरणी ही पुस्तकं वाचली आहेत. वाचून आपलं बालपण स्वर्गीय वातावरणार गेलं असं वाटलं होतं.

कंजूस's picture

28 Nov 2016 - 8:33 pm | कंजूस

सहजसुंदर परिचय.

वरुण मोहिते's picture

28 Nov 2016 - 8:55 pm | वरुण मोहिते

त्या वेळी झोंबी वाचून भारावलेलो.त्यांना विस्तृत पत्र लिहिलं होतं. १६ दिवसांनी चक्क त्यांचं उत्तर आलं. पोस्ट कार्ड वर छान लिहिलेलं मला वाचन कसं कर काय कर याबद्दल त्यांनी .आजही तो पत्ता आठवतो ५ कला नगर धनकवडी . घरी ये बोले पुढे कधीच भेटणं जमलं नाही . काचवेल जमलं नाही असं माझं मत किंबहुना झोंबी नंतर चे बाकीचे भाग जरा कमी जमले . नटरंग च पुरेसं श्रेय त्यांना मिळालं नाही आणि साहित्य संमेलनाच्या च्या वादामुळे खूप वाईट वाटलं त्यांच्यासाठी कारण क्रांतिसूर्य तुकाराम यासाठी त्यांनी बरीच मेहनत घेतली होती . नेहमी वाटायचं मी लिहिलेलं पत्र घेऊन त्यांना परत भेटायला जावं पण कधीच नाही जमलं . श्रद्धांजली.

रघुनाथ.केरकर's picture

29 Nov 2016 - 11:49 am | रघुनाथ.केरकर

संतसूर्य तुकाराम

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Nov 2016 - 6:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पत्रोत्तराच्या बाबतीत ते जरा अधिक जागरुक होते असे वाटते. न चुकता त्यांनी अनेकांना पत्र लिहिली असावीत असे वाटते.
कालपासून अनेकांनी डॉ.आनंद यादव यांचे आलेली पत्रं दाखवली. एका लेखकाचं पत्र येतं तेव्हा त्याचं एक समाधान लाभतं. आनंद वाटतो. एक सुंदर आठवण असते. एका मित्राला आलेल्या पत्रावरची एक स्वाक्षरी.

Screenshot_20161129-084214

-दिलीप बिरुटे

काचवेल जमलं नाही असं माझं मत किंबहुना झोंबी नंतर चे बाकीचे भाग जरा कमी जमले

झोंबी, नांगरणी, घरभिंती आणि काचवेल हे चारही एकाच आत्मचरित्रात्मक लेखनाचे भाग असले तरी तुलना होऊ शकत नाही. झोंबीमध्ये अत्यंत तीव्र संघर्ष आणि ठसठशीत दिसेल असं नाट्य होतं. पुस्तकात उल्लेख आहे त्याप्रमाणे प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपुचं नातं ! मात्र तो एक टप्पा पार पडल्यावर उरलेल्या पुस्तकांमधला त्यांचा आणि घरादाराचा प्रवास हा एका मैलाच्या दगडापासून दुसर्‍या पर्यंत झालाय. पहिल्या दगडापाशी पोहोचायला लागलेला वेळ आणि संघर्ष हळु हळु कमी होत गेलाय तसं नाट्य देखील सटल होत गेलंय. त्यामुळे उरलेली पुस्तके तशी वाटु शकतात. मी झोंबी शाळेत असताना वाचलं पण मधे काही वर्षं गेल्यावर उरलेली वाचली त्यामुळे ही असेल कदाचित पण मला तो पूर्ण प्रवास फार विलक्षण वाटला होता. नुसती गरीबी वेगळी आणि पूर्णपणे प्रवाहाच्या विरुद्ध पोहुन इतकं काम करणं, ज्यांनी एवढा त्रास दिला त्याच कुटुंबियांशी एवढी बांधिलकी असणं हे तर मला खुपच कौतुकास्पद वाटलं. साहित्यिक मुल्य म्हणाल तर प्रवाही लेखन , माझी वैयक्तिक आवड आहे. कितीही साध्या भाषेत पण प्रवाही लिहिलं असेल तर ते मला आवडतंच.

@ धागा: समयोचित लेखन आवडलं. तुम्हाला त्यांना भेटता आलं हा एक सुयोग च म्हणावा लागेल.

यशोधरा's picture

29 Nov 2016 - 10:20 pm | यशोधरा

मम म्हणते.

इशा१२३'s picture

2 Dec 2016 - 6:52 pm | इशा१२३

+१ असच म्हणते.झोंबी आवडत पुस्तक. आणि त्यानंतरचे तीनही भाग वाचलेत.आवडलेत.संग्रहात हि आणि त्यांची इतर पुस्तकहि आहेतच.पुणे विद्यापीठात मराठी विभागात त्यांची आणि कोत्तापल्ले सरांची काहि कार्यक्रमादरम्यान भेट झालेली.छान बोलले होते ते विद्यार्थ्यांशी.साधा आणि कष्ट घेतलेला लेखक भेटल्याचा अत्यंत आनंद आजही वाटतो.

विचित्रा's picture

28 Nov 2016 - 9:19 pm | विचित्रा

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या वादात त्यांच्यावर अन्याय झाला असं वाटतं.

नाखु's picture

30 Nov 2016 - 8:53 am | नाखु

अगदी माफी मागूनही आणि पुस्तक परत घेऊनही, निव्वळ तत्कालीन राज्यकर्त्यांशी जवळीक आणि त्यांच्याशी तोंडपुंजेपणा नसल्याने कुणीही खंबीर पाठींबा दिला नाही.

विनम्र श्रद्धांजली

आनंदयात्री's picture

28 Nov 2016 - 9:34 pm | आनंदयात्री

डॉ. आनंद यादव ह्यांना श्रद्धांजली. आणि या लेखाबद्दल बिरुटे सरांचे आभार.

चांदणे संदीप's picture

29 Nov 2016 - 8:43 am | चांदणे संदीप

लेखक कवी, डॉ. आनंद यादव यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!

Sandy

भावपूर्ण श्रद्धांजली

__/\__

मित्रहो's picture

28 Nov 2016 - 11:07 pm | मित्रहो

आनंद यादव यांना भावपूर्ण श्रद्धांजली

डॉ. आनंद यादवांना श्रद्धांजली.

झोंबी आणि नटरंग एवढंच लेखन त्यांनी केलं असतं तरीही ते अजरामर झाले असते असं वैयक्तिक मत!

निनाद's picture

29 Nov 2016 - 9:37 am | निनाद

फार छान ओळख करून दिली आहे सरांनी. झोंबी वाचले आहे पण आठवत नाही म्हणजे परत वाचले पाहिजे. नटरंग कधीचे आणून पडले आहे पण वाचणे झालेच नाही. त्यामुळे तशी या लेखकाची ओळख झालीच नव्हती. सरांनी ओळख करून दिल्याने अनेक पैलू उजेडात आले.

बंट्या's picture

29 Nov 2016 - 11:20 am | बंट्या

श्रद्धांजली

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 Nov 2016 - 11:44 am | ज्ञानोबाचे पैजार

बिरुटेसरांनीही त्यांचा करुन दिलेला परिचय समयोचित आहे.
पैजारबुवा,

सानझरी's picture

29 Nov 2016 - 11:47 am | सानझरी

मी शाळेत असताना आनंद यादवांच्या शेजारी रहायचे. पुस्तकात धडा होता एक त्यांचा, त्यांच्या मुलीने गच्चीवर रोपे लावलेली असा काहीतरी आशय होता. मग एक दिवस बाबा मला त्यांना भेटायला घेऊन गेलेले.. त्यांची सही घेतलेली मी त्या धड्यावरच..

ग्रेंजर's picture

29 Nov 2016 - 2:35 pm | ग्रेंजर

आनंद यादवांना भावपूर्ण श्रद्धांजली _/\_, त्यांची सगळी आत्मचरित्रात्मक पुस्तक वाचली आहेत, परत झोंबी पासून सुरुवात करायला हवी आता.

अस्वस्थामा's picture

29 Nov 2016 - 5:47 pm | अस्वस्थामा

आनंद यादवांचे 'झोंबी' शाळेत असताना होते. धड्याच्या शेवटी पास झाल्याचा निकाल घेतानाची 'मनातले बाहेर उड्या मारु पाहणारे बेडूक' अशा आशयाची उपमा भलतीच आवडली होती. अजूनही एखाद्या अशा प्रसंगी नक्कीच आठवते.

त्यांची तिन्ही आत्मचरित्रात्मक पुस्तकं तेव्हाच वाचली होती आणि झोंबीशिवाय इतर तितकी भावली नाहीत (त्यातल्या आत्मस्तुतीचा परिणाम असावा).
पण नंतर जेव्हा त्यांचं 'गोतावळा' पुस्तक हाती आलं तेव्हा अक्षरशः एका बैठकीत संपवलं. एक तर वाडीतल्या आजूबाजूच्या वातावरणातली उदाहरणं अश्शी समोर येऊ लागली. गोतावळा माझ्यासाठी तरी 'ग्रामीण साहित्य' वगैरे जे काही म्हणतेत त्यानुसार उत्तम तर आहेच पण एकंदरीत कथामूल्य ही अतिशय उत्तम आहे .
रानातच राहणारा एक पूर्णवेळ रोजावरचा गडी (ज्याचा स्वतःचा काहीच परिवार, नाती नाहीत) आणि त्याच्या आजूबाजूची जनावरं यांच्या गोतावळ्याची गोष्ट माझ्यासाठी यादवांचं (मी वाचलेल्यापैकी) सर्वोत्तम आहे आणि या पुस्तकासाठी मी नेहमीच त्यांचा ऋणी राहीन.
त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.

नीलमोहर's picture

29 Nov 2016 - 10:45 pm | नीलमोहर

डॉ. आनंद यादव ह्यांना श्रद्धांजली.
त्यांचे इतर साहित्य जास्त वाचले नाही, मात्र झोंबी अगदी लहानपणी वाचले होते आणि त्याने प्रभावित होऊन
नंतर त्याची अनेक पारायणेही झाली. साहित्य संमेलन आणि संतसूर्यचा वाद मात्र घडायला नको होता असं वाटतं,
एकूणच फार वाईट, अकारण प्रकार होता तो सगळा.

गौरी कुलकर्णी २३'s picture

30 Nov 2016 - 9:40 am | गौरी कुलकर्णी २३

डॉ. आनंद यादव यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! लहानपणी " पाटीची करामत " हा त्यांचा धडा अभ्यासक्रमाला होता , तेव्हा आनंदाचा शाळा प्रवेश, त्या नंतर प्रतिकूल परिस्थितीमूळे शिक्षणातून माघार घ्यावी लागणार हे दिसत असतानाही तिला शरण न जाता प्रयत्नांची पराकाष्ठा करुन शिकत राहणारे आनंद यादव सर , सारंच विलक्षण, प्रेरणादायी ! त्यांच्या ह्या जिद्दीला मानाचा मुजरा !!

जव्हेरगंज's picture

1 Dec 2016 - 6:38 pm | जव्हेरगंज

__/\__

डॉ. यादव यांना श्रद्धांजली

ड़ाॅ. आनंद यादव यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
मी प्रथम नटरंग सिनेमा पाहिला व त्यानंतर त्यांची नटरंग कादंबरी वाचली. मला सिनेमा तसेच कादंबरी दोन्हीही गोष्टी आवड़ल्या . संतसूर्य तुकाराम या वादात त्यांनी घेतलेली माघार मनाला चटका लावून गेली. ज्याच जळत त्याला कळत.इतरांना त्याच काय?
प्रा.ड़ाॅ दिलीप बिरूटे यांनीही त्यांचा चांगला परिचय करून दिला. ते नेहमीच छान लिहीतात. धन्यवाद.