पाच रुपयांचा फंडा

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
14 Oct 2016 - 1:20 pm

पिंग पिंनिंग ..पिंग पिनिंग ...
मोबाईलात सहाचा गजर झाला. धडपडत उठून ब्रश केलं, तोंड धुतलं आणि फ्रीज उघडल. दुध कालच संपलेलं. पन्नासची नोट आणि कॅरी बॅग घेऊन दुधवाल्याकडे गेले. दुधाचे दुकान कॉलनीच्या त्या टोकाला. लीटरचा पाउच घेतला आणि पन्नासची नोट त्याच्या हातावर टिकवली
‘छे रुपया छुट्टा देव भाबी.’
‘सुबे सुबे कैसा छुट्टा ? अब्बी तो निकली.’
‘तो चार रुपयेका क्या दू बोलो.’
‘कुच्च नको मेरेको..’
‘तो ठैरो अब्बी दुसरा गिराक आये तब लेना.’
घरात पडलेली सकाळची कामं आठवत तिथेच उभी राहिले. पाच सात मिनिटांनी चार रुपये हातात पडले. पळत सुटले.
‘एक कोल्हापूर.’ मी पन्नासची नोट कंडक्टरच्या हातात ठेवली.
‘ओ म्याडम, सहा रुपये द्या की सुट्टे.’
‘नाहीत. एक द्यू का ? पाच द्या परत.’
‘दिले की होते तेवढे पब्लिकला. आता सगळ्यांना कुठल्या कॉईनी वाटू ? टांकसाळ घालायला पायजे.’
‘सुट्टे झाल्यावर द्या.’
कंडक्टर साहेब करवादून गळ्यातला लघु-तिकीट-छापक सावरत पुढे सरकले.
प्रवास संपला. सुट्टे-घेणेकरी, खाली उतरलेल्या कंडक्टरशेजारी लाईन लावून उभे राहिले. काहींना मिळाले काहीना एकमेका साह्य करून आडजस्ट करावे लागले. हिशेब लवकर मिटण्याची लक्षणे दिसेनात, तसे घाईत असलेले काही जण सुट्ट्यांवर पाणी सोडून तसेच पळाले. काही अडेलतट्टू मात्र ‘बा’चा’बा’ची वर आले.
मी ‘घाईत’ वाल्या गटात. पळत जाऊन रिक्षात बसले. हापिसची वेळ जेमतेम गाठली.
‘पंचवीस द्या म्याडम’ रिक्षावाला.
दहाच्या तीन नोटा त्याच्या हातात ठेवल्या.
‘पाच सुट्टे द्या.’ लगेच आकाशवाणी झाली.
‘सुट्टे नाहीत.’
‘सकाळी सकाळी मी कुठून आणू सुट्टे ? भवानी झाली नाय अजून..’
‘तीस सुट्टे होते, ते दिले की. नाहीतर शंभरची नोट दिली असती.’
‘च्यायला सकाळी सकाळी पनवती, सुट्ट्यांची, गिरायकाच्या टायमाला खोळंबा ..’ पुटपुटत रिक्षावाला रस्त्यापलिकडच्या पानपट्टीत गेला. साताठ मिनिटं झाली तरी त्याचा पत्ता नाही. ऑफिसला उशीर म्हणून मी घायकुतीला. अखेर आला बाबा एकदाचा. पाचचे कॉईन हातात ठेवले आणि घुश्शातच टर्रर्र करत गेला.
पाच रुपयांपायी आज तीस मिनिटांचा खोळंबा. लेट मार्क. बॉसची बोलणी.
छ्या ! काय खरं नाय. ऑफिसचं काम सुरु असताना डोक्यात विचार. ‘आयला, हे रोजचंच गाणं झालंय की.’ रोज या तिन्ही चारी ठिकाणी जावंच लागतं. तिकीट, वस्तूंचे दर तेच ! काय करावं, टाईम लै जातो सुट्ट्यांपायी.
दुपारी शिपायाला शंभराची नोट घेऊन कॅशिअरकडे पाठवले. ‘पाच रुपयांची कॉईन आण सगळी.’
पाचच मिनिटात शिपाई परत आला.
‘मॅडम, त्यांच्याकडे तीनच आहेत...तीपण लागतात म्हटले.’
प्लॅन नं. १ चा बोऱ्या वाजला. प्लॅन नं. २.. बँकेत गेले. तिथंही तीच मागणी केली. तिथेही नन्नाचा पाढा. तिथला कॅशिअर ऑफिसवाल्या भाईबंदापेक्षा पोचलेला. तो म्हणाला ‘मॅडम, आमच्याकडे अशी गठ्ठ्याने येत नाहीत हो, कॉईन्स..!’
झाले. आता काय करावे ?
दुसऱ्या दिवशी दुधाला जाताना पन्नासची नोट आणि एक रुपयाचं कॉईन घेतलं.
‘पाच रुपये देणा जरा...’ दूधवाला.
‘एक रुपया दिया है ना ? आप पाच रुपये देदो.’ मी
‘मेरे पास होते तो तुमारेसे क्यू मांगता ?’
झाले. आजपण दहा मिनिटे खोळंबा.
बसमध्ये तोच प्रकार.
रिक्षाचा स्टॉप ठराविक. रिक्षावाला रिक्षात बसायच्या आधीच म्हणाला, ‘मॅडम, पाच सुट्टे आहेत नव्हं ?’
सगळीकडे पाचची पाचर ! आज काहीतरी तजवीज केलीच पाहिजे या पाचांची !
दिवस धावपळीत गेला आणि रात्री झोपताना आठवण झाली सकाळच्या पाचांची. झोप मरणाची आलेली. जाउदे म्हटलं आणि गाढ झोपी गेले.
सकाळी वेगळाच फंडा केला.
दुधवाल्या भय्याला सांगितलं. पन्नास घे आणि वहीत लिहून ठेव आजचे पाच रुपये तुझ्याकडे अनामत. उद्या-परवा कधीतरी दूध घेताना हिशेब कर.
भय्यानं आनंदानं मान्य केलं आणि मी रोजच्यापेक्षा लवकरच दूध घेऊन परत आले.
कंडक्टर मॅडम ना म्हटलं, ‘नाहीत का पाच ? राहूदे तुमच्याकडे. कधीतरी गाठ पडली तर द्या म्हणे परत.
मॅडमनी पहिल्यांदाच माझा चेहेरा नीट निरखून बघितला. ‘आणि नाहीच गाठ पडली तर ?’
‘तर काय ? राहूदे की. माझ्या पाच रुपयांनी काय तुम्ही घरावर माडी बांधणार आहात का मी बांधणार आहे ?’
‘बघा हं, तुम्हीच तक्रार कराल नाहीतर..?’
‘नाही, बाई.’ मी निरागसपणे म्हटले. कंडक्टर मॅडम च्या कपाळावरच्या एकूण चार आठ्यांपैकी दोन विरघळल्या. त्यांचा करवादलेला आवाज जरा मऊ झाला आणि त्या चक्क हसल्या. ‘झाले सुट्टे तर देईन हो उतरताना.’
रिक्षातही तोच प्रकार.
‘भाऊ, ठेवा तुमच्याकडे पाच रुपये. मी रोज या स्टॉपवर येत असते. कधी सुट्टे होतील तेव्हा द्या मला.’
रिक्षावाला प्रसन्न झाला. ‘मॅडम, आठवणीनं देतो हां नंतर.’
...आता दूधवाला पटकन दूध देतो, कंडक्टर हसून नमस्कार करतो आणि झटपट तिकीट हातात ठेवतो.
आणि रिक्षावाल्याला मी तीस रुपये दिले तर सुहास्यवदनाने त्यातले दहा मला परत करतो. ‘मॅडम, तुमचेच पाच आहेत माझ्याकडं, हे ठेवा.’
मी विचार करतेय, असेच कितीतरी रुपये वायफळ खर्च होत असतील, पण हे सोडलेले पाच रुपये मला कायकाय मिळवून देताहेत...?
..हसून नमस्कार करणारा कंडक्टर, दोन केळी जादा घालणारा फळवाला, पार्किंगमध्ये मधली सुरक्षित जागा राखून ठेवणारा पार्किंगबॉय, गेटच्या आत ऑफिसपर्यंत खुशीनं आणून सोडणारा रिक्षावाला, नवीन धान्ये आली की एक पोते बाजूला काढून ठेवणारा डिपार्टमेंटल स्टोरवाला आणि सुट्ट्याचा प्रॉब्लेम म्हणून एकाऐवजी दोन कॅडबर्‍या मिळाल्या म्हणून गोड हसून दोन्ही गालांची पप्पी देणारी तीन वर्षाची गोड भाची.
हे सगळं पाच रुपयांत ..? सौदा महाग आहे म्हणता ... ?? बोला आता !!

समाजमौजमजाप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

ओम शतानन्द's picture

14 Oct 2016 - 1:31 pm | ओम शतानन्द

लेख आवडला

IT वाले याच कारणाने शिव्या खातात ;)

लेख मस्त, नेहमीप्रमाणेच.

एस's picture

14 Oct 2016 - 1:56 pm | एस

गोष्ट आवडली.

यशोधरा's picture

14 Oct 2016 - 1:58 pm | यशोधरा

मस्त लिहिले आहेस. आवडले.

राजाभाउ's picture

14 Oct 2016 - 1:58 pm | राजाभाउ

मस्त लेख आहे. खरच कधी कधी फुटकळ कारणावरनं आपण स्वता:ला लई ताप करून घेतो.

मी-सौरभ's picture

14 Oct 2016 - 2:03 pm | मी-सौरभ

मुक्तक आवडले. चार-पाच रूपये सुट्टे नसतील तर न भांडता सोडून दिलेले ऊत्तम

नाखु's picture

14 Oct 2016 - 2:05 pm | नाखु

उत्तरांची सुफळ संपुर्ण कहाणी आवडली,

उत्तो नको मातू नको घेतला वसा टाकू नको असे व्रत आहे हे.
हे व्रत दुधासाठी सध्या नियमीत वापरत आहे दूद दर नेमका ५१ रू प्र्.लि. आहे मग काय एक्दाच साठ देऊन ठिवायचे ते, थेट दहाव्या दिवशी पुन्हा ६०.

पाचा मुखी परमेश्वरवाला नाखु

महासंग्राम's picture

14 Oct 2016 - 2:05 pm | महासंग्राम

सुट्ट्याचा प्रॉब्लेम म्हणून एकाऐवजी दोन कॅडबर्‍या मिळाल्या म्हणून गोड हसून दोन्ही गालांची पप्पी देणारी तीन वर्षाची गोड भाची.
हे सगळं पाच रुपयांत ..? सौदा फायद्यात नाही म्हणता ...

पूर्ण लेख सुंदरच पण, विशेषतः शेवटचं वाक्य आवडलंय .

तेजस आठवले's picture

14 Oct 2016 - 2:08 pm | तेजस आठवले

चांगला लेख आहे. असे मनात येणारे विचार कागदावर सहज सुंदर रीतीने उतरवणे प्रत्येकाला जमत नाही.

आदूबाळ's picture

14 Oct 2016 - 2:25 pm | आदूबाळ

मस्त लिहिलंय.

मी पूर्वी नोकरी करत असे तिथला कॅशियर एसबीआयच्या नरिमन पॉईंटच्या ट्रेझरीतून नाण्यांचे मोठमोठे पॅक घेऊन येत असे. त्याला बंदे दिले की पाहिजे तितके सुट्टे बिनतक्रार मिळत. मला त्याच्या या समाजकार्याचं कौतुक वाटत असे.

नंतर एका जाणत्या माणसाकडून कळलं की एसबीआय हे पॅक वजनावर भरत असे. त्यामुळे त्यात थोडे पैसे कॅशियरबुवांना 'सुटत' असत. कालांतराने एसबीआयकडे नाणी मोजायचं यंत्र आलं आणि हा कुटिरोद्योग बंद पडला.

स्वाती दिनेश's picture

14 Oct 2016 - 2:30 pm | स्वाती दिनेश

पाच रुपयांची गोष्ट आवडली,
स्वाती

पद्मावति's picture

14 Oct 2016 - 2:39 pm | पद्मावति

खूप छान लिहिलंय. आवडला लेख.

हॉटेलला असताना एक पोतराज आणि एक पानपट्टीवाला दर महिन्याला लहान पोतेभर गिन्न्या घेऊन यायचा. १००० ला ९५० भावाने देऊन जायचा. सुट्ट्यासाठी तंडत बसण्यापेक्षा हे बरे.

जगणंं सोपंं करून देणारा हा फायद्याचा सौदा आवडला.

गिरिजा देशपांडे's picture

14 Oct 2016 - 3:21 pm | गिरिजा देशपांडे

मस्त लिहिलंय!!!!!!!!

संत घोडेकर's picture

14 Oct 2016 - 3:24 pm | संत घोडेकर

आवडले

स्नेहल महेश's picture

14 Oct 2016 - 3:51 pm | स्नेहल महेश

लेख मस्त

विशुमित's picture

14 Oct 2016 - 4:02 pm | विशुमित

" वढ पाचची " डायलॉग आठवला.

छान लिहलंय, रोजच्या जीवनातील तरंग उमटले.

तुषार काळभोर's picture

14 Oct 2016 - 4:18 pm | तुषार काळभोर

चांगला हिशोब आहे पाच रुपयांचा.

तुषार काळभोर's picture

14 Oct 2016 - 4:18 pm | तुषार काळभोर

चांगला हिशोब आहे पाच रुपयांचा.

amit१२३'s picture

14 Oct 2016 - 4:24 pm | amit१२३

आवडला लेख आपल्याला

पैसा's picture

14 Oct 2016 - 4:40 pm | पैसा

दूधवाल्याकडून रोज दोन रुपयांची फालतू स्ट्रॉबेरी चॉकलेट घेण्यापेक्षा "लक्षात ठेवा आणि उद्या अ‍ॅडजस्ट करा" हा उपाय मी बरेच दिवस अमलात आणला आहे. बसला वगैरे सुट्टे असणे अत्यंत आवश्यक. कारण सुट्टे परत देणारे कंडक्टर फारच कमी भेटतात.

बादवे इचलकरंजी कोल्हापुरात दूधवाला हिंदी बोलणारा? अंमळ धक्का बसला.

सस्नेह's picture

14 Oct 2016 - 4:41 pm | सस्नेह

मारवाडी आहे गं !

पैसा's picture

14 Oct 2016 - 4:43 pm | पैसा

ओक्के! मला वाटले भय्ये लोक यत्र तत्र सर्वत्र असतात तसे तिकडेही पोचले का! गोव्यातले मारवाडी मात्र उत्तम मराठीत बोलतात आपल्याशी.

शब्दबम्बाळ's picture

14 Oct 2016 - 4:59 pm | शब्दबम्बाळ

चांगलं लिहिलंय, इकडे जर्मनी मध्ये आलं कि उलटा घोळ सुरु होतो...
हे लोक सुट्टे वाटतच फिरत असतात! आता थैली भरून सेन्ट पडलेत, दरवेळी कमी करायचे म्ह्णून काहीतरी खरेदी करायला जातो आणि अजून वाढवून येतो...
पण काही लोक मात्र बिल भरताना अत्यंत शांतपणे, आपल्या मागे अजून 10 लोक वाट बघत उभे आहेत याचे जराही दडपण न घेता 1-1 सेन्ट काढून देतात! अशांचे अप्रूप वाटत! :P

काही लोक मात्र बिल भरताना अत्यंत शांतपणे, आपल्या मागे अजून 10 लोक वाट बघत उभे आहेत याचे जराही दडपण न घेता 1-1 सेन्ट काढून देतात! अशांचे अप्रूप वाटत!

मक्याचा 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' जर्मनीत पण पोह्चला काय?

शब्दबम्बाळ's picture

14 Oct 2016 - 5:09 pm | शब्दबम्बाळ

हाहा! एक्क नंबर आहे तो!
सयाजी शिंदे भारीच! :D

स्वाती दिनेश's picture

14 Oct 2016 - 6:01 pm | स्वाती दिनेश

पैसे इतके होतात की पर्स जड होऊ लागते, त्याकरता मी एक एक युरोच्या पुरचुंड्या करून ठेवल्या होत्या, त्या संपवायच्या एकेक करून. लोक बिल भरताना रांगेत उभे असतात आणि पुढचा शांतपणे एकेक सेंट काढून देतो, ते मी ही करते खूप गर्दी नसली तर, :)
स्वाती

मराठी कथालेखक's picture

14 Oct 2016 - 6:07 pm | मराठी कथालेखक

#Paytmkaro

जयन्त बा शिम्पि's picture

14 Oct 2016 - 6:28 pm | जयन्त बा शिम्पि

छान लेख. पाचचा फंडा, " ठेवा तुमच्याकडे, नंतर द्या परत " आवडला. पण असं वाटतं , हे नेहमी नेहमी जमणार नाही.

सोनुली's picture

14 Oct 2016 - 6:32 pm | सोनुली

किती गोड लिहिलेय. आवडले

पाटीलभाऊ's picture

14 Oct 2016 - 6:42 pm | पाटीलभाऊ

मस्त लिहिलंय...फायद्याचाच सौदा...!

सुबोध खरे's picture

14 Oct 2016 - 6:47 pm | सुबोध खरे

आमचे आजोबा पुण्यात सोमवार पेठेत राहत होते. त्यांनी आपल्या सुट्ट्या पैशांचा प्रश्न उत्तम रीतीने सोडवला होता.
त्यांच्या गल्लीच्या टोकाशी असलेल्या मंदिराच्या बाहेर बसणाऱ्या भिकाऱ्याकडून ते ५० रुपयांच्या दोन नोटा देऊन ९९ रुपयांची मोड देत असत.
त्यांच्या कडे गेलो असताना मला पाहिजे तेवढी सुट्या पैशांची नाणी मिळत असत.
इथे मुंबईत हा प्रश्न आमच्या एका रुग्णाने सोडवला आहे. त्याचे पाव बिस्किटांचे दुकान आहे. त्याला सतत भरपूर मोड/ सुटे पैसे लागतात म्हणून तो ठाण्याच्या एका प्रख्यात मंदिरातून सुटे पैसे/ किरकोळ नोटा उचलतो. त्यांची अट अशी आहे कि तुम्ही कमीतकमी ५०,०००/- रुपयांची मोड उचलली पाहिजे. त्यामुळे त्याने सांगितलेले आहे कि डॉक्टर तुम्हाला कधीही कितीही सुटे लागतील तर मी देइन.

त्यांची अट अशी आहे कि तुम्ही कमीतकमी ५०,०००/- रुपयांची मोड उचलली पाहिजे.

बाबौ!

आणि याची फ्रीक्वेन्सी काय? पंधरवड्यातून एकदा?

सुबोध खरे's picture

14 Oct 2016 - 8:01 pm | सुबोध खरे

ते विचारावे लागेल

जव्हेरगंज's picture

14 Oct 2016 - 7:23 pm | जव्हेरगंज

वाहवा! भारी लेख!

अजया's picture

14 Oct 2016 - 7:27 pm | अजया

मस्त लेख.
आमच्याकडे दोन पिशव्या गोकुळ गाय ४२रु. होतात.मग दहा देऊन ठेवुन पाच दिवस चाळीस असा आमचा हिशेब आहे! अजून तरी बरा चाललाय!

सुखीमाणूस's picture

14 Oct 2016 - 8:49 pm | सुखीमाणूस

खूप छान लिहीला आहे

अभिजीत अवलिया's picture

14 Oct 2016 - 9:35 pm | अभिजीत अवलिया

चांगले लिहिलेय.
शब्दबम्बाळ/स्वाती दिनेश ह्यांनी जे लिहिले आहे ते परदेशात अनुभवास येते. कितीही फुटकळ खरेदी करा आणि तगडी नोट द्या. सुट्टे नाहीत हे उत्तर कधीच ऐकू येणार नाही. खिसा सुट्ट्या पैशानी भरून जातो.

भारतात सुट्ट्या पैशांचा इतका प्रश्न का आहे ही विचार करण्याची गोष्ट आहे.
नाणी तयार करायचा खर्च नाण्याच्या किमतीपेक्षा जास्त असणे हे कारण संभवते.
त्यामुळे कार्ड पेमेंट ही गोष्ट खूप खालच्या स्तरावर लवकरात लवकर चालू होण्याची गरज आहे.

प्रभाकर पेठकर's picture

20 Oct 2016 - 1:39 pm | प्रभाकर पेठकर

नाणी तयार करायचा खर्च नाण्याच्या किमतीपेक्षा जास्त असणे हे कारण संभवते.

पूर्वी, १ पैसा, ३, ५, १० पैसे ही नाणी अ‍ॅल्यूमिनियमची होती. ती पुन्हा चालू केली पाहीजेत. (१ आणि ३ वगळून).

कविता१९७८'s picture

14 Oct 2016 - 10:32 pm | कविता१९७८

मस्तच

रातराणी's picture

14 Oct 2016 - 11:36 pm | रातराणी

भारी !

चाणक्य's picture

14 Oct 2016 - 11:45 pm | चाणक्य

आवडलं...लिखाणही आणि दृष्टीकोनही.

पिशी अबोली's picture

14 Oct 2016 - 11:56 pm | पिशी अबोली

हा हा. भारी. आमचा दूधवाला कधीच त्रास नाही देत. तगडा भैया आहे. पण कंडक्टर म्हणजे, रामा शिवा गोविंदा. माझा मूड खराब असेल तर मी फार करवादते असल्या कंडक्टरांवर. इथे पुण्यात एक तर अजब तऱ्हा आहे तिकिटांची. सुट्ट्यांचे घोळ होतात म्हणून सगळी तिकिटं 5 च्या पटीत असतात. तरी भुजंगसारखे कंडक्टर 5च्या नाण्यांवर अडून असतात. मी कधीकधी खूप जमवून जमवून 1-1 रुपया अशी 20 ची वगैरे नाणी देते मग खडूस कंडक्टर दिसला की.. ;)
हॉस्टेलला तर नाण्यांची फार गंमत होती. आमच्या कॉफी मशीनला 5 टाकावे लागायचे. आणि मोबाईल बंदी असल्याने कॉइन बॉक्सला 1-1. मग आम्ही डोळा ठेऊन असायचो की रेक्टर ऑफिसवाले येऊन नाणी कधी नेतात. लगेच आमच्या धाडी पडायच्या रेक्टर ऑफिसमध्ये आणि आम्ही नोटा देऊन पिशव्या भरून नाणी आणायचो. :)

सौदा चांगला आहे. लेखन आवडले.

लेख एकदम मस्त. सुरुवातीच्या हैद्राबादीमधल्या संभाषणापासून!
शेवट तर बेस्ट! :)

मस्त लिहलयं... कोल्हापुरात कळकट मळकट फाटक्या दोन तुकडे झालेल्या नोटा सुद्धा चालतात ! ;)
बाकी या धाग्यामुळे नान्या आठवला !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Why the world fears Russia’s S-400 Triumf missile defence system that India is buying

सस्नेह's picture

15 Oct 2016 - 10:22 am | सस्नेह

भारी व्हिडो =))

बाजीप्रभू's picture

15 Oct 2016 - 8:04 am | बाजीप्रभू

आवडला लेख

किसन शिंदे's picture

15 Oct 2016 - 10:59 am | किसन शिंदे

भारी लेख !! बाकी इजारीच्या कुठल्या ना कुठल्या खिशात पाच रूपयांची एक/दोन नाणी असतातच अशा वेळी, त्यामुळे सुट्ट्या पैशांचा तसा काय प्रॉब्लेम नाय ब्वॉ.

सस्नेह's picture

15 Oct 2016 - 11:07 am | सस्नेह

मला रोज पाच लागतात !
..पार्सल करतोस ? :)

इरसाल's picture

15 Oct 2016 - 2:08 pm | इरसाल

नसले सुट्टे की तेव्हढी किंमत लिहीलेले खाजगी कुपन देतात. ते त्याच दुकानावर चालते, सतत तिथेच दुध वगैरे घेत असल्याने अडचण नाही.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

15 Oct 2016 - 3:55 pm | भाग्यश्री कुलकर्णी

मस्त ले़ख.माझे सुट्ट्या पैशांवरुन एका कंडक्टर काकांशी जाम वाजलेले. आता तिकीट 10 झाले आमच्या रुटवर आणि तेच आता सुट्टे पैसे देतात आणि पर्स जड होते माझी म्हणून मी रिक्षावाल्या भाऊंना देते.

संदीप डांगे's picture

16 Oct 2016 - 1:06 am | संदीप डांगे

लेख सुंदर!

माझे नशीब चांगले असावे, सुट्टे नेहमी असतात दहापैकी नऊ वेळा. जेव्हा नसतात तेव्हा विक्रेताच सोडून देतो, नंतर कधी द्या म्हणतो. चेहऱ्यावरून मी प्रामाणिक वाटत असेल ;)

आजचीच गोष्ट, शर्ट इस्त्रीला टाकला, तासाभराने आणायला गेलो, तो पाकीट विसरलो होतो घरी. त्याला म्हटले नंतर देतो, ओळखत नसूनही हो म्हणाला, ;)

इशा१२३'s picture

16 Oct 2016 - 8:19 am | इशा१२३

आवडले मुक्तक!

स्वीट टॉकर's picture

16 Oct 2016 - 1:13 pm | स्वीट टॉकर

स्नेहाताइ, तुम्ही छान लिहिता त्यामुळे तुम्ही लेख लिहिलात. ज्याला यात बिझनेस ऑपॉर्चुनिटी दिसली त्यानी 'पेटीएम' सुरू केलं.

अनुप ढेरे's picture

16 Oct 2016 - 3:17 pm | अनुप ढेरे

छान लिहिलय!

नूतन's picture

18 Oct 2016 - 10:03 am | नूतन

गोष्ट आणि विचार दोन्ही आवडलं

खटपट्या's picture

18 Oct 2016 - 11:08 pm | खटपट्या

लेख आवडला.

लेख आवडेश... अगदी पटेश..... बर्याचदा मी हेच करेश... व्वा...

अनन्न्या's picture

19 Oct 2016 - 6:58 pm | अनन्न्या

खरय खूपदा वेळ वाया जातो या सुट्ट्या पैशांपायी! दुकानात नेहमी एक सेल घ्यायला पण लोक पाचशेची नोट देतात. त्यामुळे काही गुरूजी मंडळींना कायमचे सांगून ठेवले आहे सुट्टे पैसे आणून द्यायला! पण नाणी बघून घ्यावी लागतात. कारण पूजेसमोर न खपणारी नाणी खपवली जातात.

आतिवास's picture

20 Oct 2016 - 11:10 am | आतिवास

छान लिहिलं आहे!

टर्मीनेटर's picture

20 Oct 2016 - 11:53 am | टर्मीनेटर

सध्या रेल्वे च्या उपनगरीय लोकल प्रवासाची सगळी भाडी ५, १०, १५, २०, २५, ३०, ३५, ४०. अशी राउंड फिगर मध्ये आहेत. तरी पण बुकिंग क्लार्क ५ रुपये सुट्टे द्या म्हणून अडून बसतात आणि रोज प्रवाशांच्या शिव्या खातात. अर्थात आधी जेव्हा भाडी ४, ६, ७, ८, ९, ११, अशी होती तेव्हा जेवढी बाचाबाची रोज व्हायची ते प्रमाण कमी झालंय.

लेखन आवडल.

प्रभाकर पेठकर's picture

20 Oct 2016 - 1:42 pm | प्रभाकर पेठकर

परदेशात रेल्वे स्थानकावर सुटी नाणी देणारी मशीन्स असतात. तुम्ही नोट त्या मशीन मध्ये सरकवा लगेच तुम्हाला नाणी मिळतात. सरकारने ही व्यवस्था सर्वत्र करावी.

अमरप्रेम's picture

26 Oct 2016 - 3:38 pm | अमरप्रेम

पुण्यामध्ये पी एम टी साठी ५ रुपये सुट्टे नसल्यावर कंडक्टर साहेब नंतर उतरताना सुट्टे झाल्यावर देतो म्हणतात पण भरपूर वेळा त्याच्याकडून मिळाले नाहीत आणि अगणित वेळा स्टॉप आल्यावर उतरायच्या गडबडीत आम्ही घ्यायला विसरतो.