भर उत्तररात्री थोरल्या वाड्याला जाग आली होती. शिरकाई मंदिरातून देवीच्या नामाचा गजर शरदाच्या थंड वार्यावर ऐकू येत होता, डफ-संबळाचा आवाज घुमत होता. तिथे गेले नऊ दिवस देवीचा जागर चालू होता. शारदीय नवरात्रीचे दिवस. दशमीचा चांदवा अस्ताला चालला होता. गंगासागराशी सातमजली मनोर्यांसोबत त्याचे सुंदर प्रतिबिंब पडलेले. शरदाच्या चांदण्यात गडावर विविधरंगी रानफुलांचा रानसोहळा चालू होता. त्यात सोनकीने ठिकठिकाणी सुवर्णझळाळी आणली होती. भुईरिंगणी, चिरायतीची पखरण गडाच्या सपाटीवर रंग भरत होती. दालनात घुसणार्या थंड वार्यामुळे भान येऊन नुकत्याच स्नान करुन शूचिर्भूत झालेल्या थोरल्या महाराजांनी, शिवरायांनी लोकरी शाल खांद्यावर पांघरली. त्यासरशी त्यांना ती शाल मायेने नजर करणार्या धनगराची आठवण झाली. या नवरात्रात पहिल्या दिवशी गडावर साग्रसंगीत पूजाअर्चा करुन घटात पाच प्रकारच्या धान्याची पखरण करुन शिवरायांनी घटस्थापना केली होती. गडावरल्या या घटस्थापनेनंतर रोज एक याप्रमाणे राजे देशावरल्या किल्ल्यांवर जाऊन किल्ल्यांच्या दुर्गनिवासिनी देवींचे दर्शन आणि स्वराज्याला आशीर्वाद घेऊन आले होते. तसेच स्वराज्यातील साडेतीन शक्तीपीठांना नारळ-वस्त्र-द्रव्याची ओटी रवाना केली होती. खुद्द राजांनी प्रतापगडाहून सुरुवात करुन दुर्गाडी किल्ल्यावरची दुर्गाभवानी, राजगडाची पद्मावती, तोरण्याची तोरणजाई-मेंगाई करुन राजे पहाटे नाळेतून खाली उतरत असताना विसाव्याला थांबले असताना तिथल्या एक धनगराने गारठा वाढलाय म्हणून मोठ्या प्रेमाने “राजं, लई गारटा वाडलाय. तुमी हायसा म्हून तर आमी दोन येळचं सुखानी खातोय” असं म्हणत ती राजांच्या अंगावर पांघरली होती. त्याने आपले दोहो हात हाती घेतले आणि छातीशी कवटाळले होते तेव्हाचा त्याच्या हातांचा राकटपणाही त्यांना या क्षणी जाणवला. जोपर्यंत अशी जीवाला जीव देणारी माणसे आहेत तोपर्यंत आपल्या, नव्हे रयतेच्या या स्वराज्याला कसलीही ददात भासणार नाही हे राजांना मनोमन ठाऊक होते. दुर्गेचा जप ओठांशी आणि गळ्यातल्या कवड्यांची माळ बोटांशी घोळवतच महाराज देवघराकडे निघाले.
अजून राणीवशाच्या बाजूने लगबगीचा आवाज येत होता, काकणं किणकिणत होती. पाटल्या-बुगड्या बोलत होत्या, पुतळ्या-पैंजणं कुजबूज करत होती. तिकडे अजूनही आवराआवर चालू होती. आऊसाहेबांच्या कक्षाबाहेरुन जाताना त्यांच्या मुखी असलेल्या श्रीसूक्ताचा उद्घोष दालनात घुमला होता. राजे देवघरात प्रवेशते होताना तिथला द्वारपाल सावरुन उभा राहिला. आत गेल्याबरोबर महाराजांचे हात नकळत जोडले गेले आणि छातीशी आले. समोर नवरात्रात अखंड तेवणारा नंदादीप समोरच्या देवघराला उजळवून टाकत होता. देवाचे उजळलेले टाक विड्याच्या मानांवर मांडलेले होते. घट स्थापनेचा कलश फुलांच्या आणि गेल्या नऊ दिवसांच्या पत्रीच्या आच्छादनाने झाकून गेला होता. या घटाच्या पहिल्या दर्शनावेळी नुकतेच खाली मातीशी रुजलेले अंकुर आता तरारुन उंच वाढले होते. त्यांच्या तुर्यांकडे पाहत शिवराय अंतःर्मुख झाले. स्फटिकाचे शिवलिंग, भवानीमातेचा मुखवटा आणि घटाकडे एकवार पाहून सावकाश डोळे मिटून विचार करुन लागले… नवनिर्मितीची, सृजनाची केवढी शक्ती असते या सृष्टीची. त्या एकाच शक्तीमुळेच रोज प्रातःकाळी एक नवीन आशेचा आणि ध्यासाचा जन्म होतो. रोज एक नवी लोकस्वराज्याची कल्पना सुचतेय आणि त्यावर अंमल करण्याचा मार्गही याच सृजनाच्या शक्तीपासून गवसतो. याच आदिशक्तीच्या कृपेने आपण आहे हे ज्ञान साधले, याच रणचंडिकेच्या आशीर्वादाने अनेक मैदाने-मुलुख काबीज केले, याच सरस्वतीच्या गर्भित उपदेशाने स्वराज्यासाठी लोककल्याणकारी कार्ये आपल्या हातून घडावीत, याहून आपले अधिक भाग्य ते काय? राजांचे ध्यान लागले होते. मनात देवीच्या आशीर्वादाने अनेक संकल्प रचले जात होते आणि त्यासोबतच कसलीशी चाहूल लागून महाराजांनी डोळे उघडले.
आऊसाहेब देवघरात आल्या होत्या. शुभ्र रंगाचे वस्त्र आणि मोतिया रंगाची शाल खांद्यावर घेतलेल्या आऊसाहेब हेही अशाच एका आदिशक्तीचं रुप. याच मातेने आपणांवर सुसंस्कार घडवले, आपल्यासोबतच अनेक सवंगड्यांचीही आईपण स्विकारले, त्यांना माया लावली, प्रसंगी चार समजुतीच्या गोष्टीही कान पिळून सांगितल्या. चिखलाच्या गोळ्याला आकार द्यावा तसे सुसंस्कार आपणांवर घडवले. असा विचार राजांच्या मनी तरळला. मघाशी श्रीसूक्त म्हणत असताना पत्री आणि ताजी गेंद्याची फुलं दोर्याशी गाठून आऊसाहेब घटासाठी शेवटची माळ घेऊन आल्या होत्या. पाठोपाठ राणीवसाही देवघरात आला आणि आऊसाहेबांच्या पाठीमागे ओळीत बसला. सेवकांनी पुरणपोळीच्या नैवेद्याची ताटं आणून समोर मांडली. राजांनी त्यातल्याच एका सेवकाला समोर बोलावले. आणि आऊसाहेबांच्या हातून माळ घेऊन त्याच्या हाती दिली आणि ती घटाला अर्पण करण्यासा सांगितले. तो सेवक हरखून पाहतच राहिला. आजवर या गादीची मुदपाकखान्यात चाकरी केली पण हा मान त्याला अगदीच अनपेक्षित होता. परंतु नवरात्रात प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या सेवकांना मान देणे हा राजांचा आणि आऊसाहेबांचा शिरस्ता होता. आऊसाहेबही कृतार्थ नजरेने सर्व काही पाहत होते. सेवकाने अदबीने माळ हाती घेऊन घटास अर्पण केली. पाठोपाठ चार फुलं वाहिली. आणि नमस्कार करुन राजांच्या पायाशी वाकणार तेवढ्यात राजांनी बसल्या जागीच त्याला रोखले आणि त्याचा हात हातात घेऊन जोडला आणि नंतर त्याला छातीशी कवटाळले. सेवक आणि राजे, दोघांचेही डोळे पाणावले. राजांनी त्याला शेजारी बसवले आणि इतरांनाही बसण्यास खुणावले. आता घट हलवण्याचा मुहूर्त होत आला होता. राजांनी जमिनीवर पाण्याचे थेंब सोडून ती वस्त्राने पुसून घेतली, त्यावर नैवेद्याची ताटे ठेवली गेली. वरुन पाण्याचा हात फिरवला आणि नैवेद्याला हळदकुंकू लावले. घटाला दोन्ही हातांनी धरुन थोडेसे हलवले आणि पूर्ववत करुन ठेवले. आरती झाली आणि प्रसादाच्या सुगंधी दुधाचे पेले सर्वांना देण्यात आले. प्रसाद प्राशनानंतर शिवराय उठले आणि आपल्या दालनात गेले. गडावरल्या देवीच्या दर्शनाला निघायचे होते. मदारी मेहतर जिरेटोप तबकात घेऊन वाटच पाहत होता. त्यालाच सोबत घेऊन राजे होळीच्या माळावरल्या शिरकाई देवीच्या मंदिराकडे निघाले. पहाटवारा सुटला होता. ती निरागस धनगरी मायेच्या ऊबेची शाल अजूनही खांद्यावर होतीच. शिरकाईच्या सभामंडपात भजनाचा गजर चालू होता. टाळ वाजत होते. राजांची मंदिरात येण्याची चाहूल लागली तशी एक क्षण भजन क्षीण झाले, पण लगेच राजांनीही टाळ्यांनी ठेका धरला आणि पुन्हा सावरुन तो गजर टिपेला पोचला. भजनानंतर आरती झाली तसे राजे प्रसाद घेऊन पुन्हा वाड्याकडे निघाले. एव्हाना तांबडे फुटायची वेळ झाली होती. उगवतीला बरोबर जगदीश्वराच्या पाठीमागून लाली आसमंतात पसरली होती. जणू काही जगदीश्वरानेच आशीर्वादाचे असंख्य हात विस्तारलेले. गजशाळेच्या बाजूलाच सुरतेकडून आलेल्या कलाकारांची पालं पडली होती. काल रात्री उशिरापर्यंत केलेल्या रास-गरब्याच्या रंगतदार कार्यक्रमामुळे ते कलाकार थकून शांत-निवांत झोपले होते. फक्त पालाच्या आढ्याला टांगलेल्या कंदिलाची वार्याने होणार्या हिंदोळ्यांचीच काय तेवढी जाग दिसत होती.
सूर्य उगवतीला आला तसे राजे सदरेवर आले तेव्हा दफ्तरखान्यात चिटणीस सरस्वतीपूजनाच्या तयारीत गर्क होते. सर्व अष्टप्रधान मंडळ जातीने हजर होते. राजे आल्याबरोबर झटापटीने मुजरे झडले. एका कागदावर सरस्वतीची प्रतिमा चितारलेली. समोर सर्व हिशेबाची बाडं, ग्रंथसंपदा, पत्रव्यवहार, संदर्भ हारीने मांडून ठेवला होता. प्रत्येक गठ्ठ्यावर गेंद्याची फुलं आणि हळदकुंकू वाहिलेलं. गूळ, खोबर्याची वाटी, सुपारी, विड्याचं पान असं प्रत्येक ठिकाणी मांडलेलं, धूपाच्या सुवासानं सगळा आसमंत प्रसन्न झाला होता. राजे आले आणि सरस्वतीवर पुष्पार्पण करुन हात जोडले आणि त्यांनी मंत्र उद्गारला “या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:॥” डोळे मिटून पुन्हा एकदा ध्यान लागले होते. एकदा सरस्वतीने उदारहस्ते दिलेल्या ज्ञानभांडारामुळेच हे स्वराज्याचे कार्य आपल्या हातून घडते आहे. हा वरदहस्त असाच कायम राहू दे. असेच तुझे वास्तव्य आमच्या आणि आमच्या सोबत्यांच्या आसपास नांदू दे.
राजांनी डोळे उघडल्यावर प्रसन्नवदने आपल्या अष्टप्रधान मंत्र्यांकडे पाहिले. तसे सरनोबत पुढे झाले आणि त्यांना शस्त्रशाळेकडे सोबत घेऊन निघाले. जाता जाता सरनोबतांशी राजे विविध मुलुखातील सामरिक प्रगतीचा आढावा घेत होते, प्रसंगी काही सल्ले देत होते. सरनोबतही नजीकच्या गतकाळात यशस्वी केलेल्या मोहिमांमुळे जरा जास्तच खुश होते. अधूनमधून त्यांचा हात झुपकेबाज कल्लेदार मिशांकडे वळत होता. अठरा कारखाने आणि बारा महाल मागे टाकून शस्त्रशाळेत पोचले तेव्हा सर्व कारागिर, ओतकाम करणारे लोहार, तलवारी घडवणारे शिकलगार, नजाकतदार मुठी तयार करणारे तांबट सारे अदबीने उभे राहिले. पुन्हा एकदा राजांनी सभोवार नजर टाकली. समशेरी, दांडपट्टे, बिचव्या, खंजीर असे सगळे एका गडद रेशमी वस्त्रावर हारीने मांडून ठेवले होते. त्यातच लक्ष वेधून घेत होत्या ते नुकत्याच टोपीकर आणि फिरंग यांच्यावर जरब बसवून त्यांच्याकडून हस्तगत केलेल्या ठासणीच्या बंदुका. दोन्ही बाजूला छोटेखानी तोफा ओळीने मांडून ठेवल्या होत्या. पुढील काळातले युद्ध हे समशेरीने समोरासमोर लढले जाणार नसून ते जरा दुरुनच बंदुका-तोफांच्या सहाय्यानेच लढले जाईल हे राजांना ज्ञात होते. त्यासाठीच शिवरायांनी तळकोकण मुलखातून एक कसबी माणूस आणवून त्याकरवी एक बंदूक उघडून त्याची रेखाटने तयार करवली होती. हरहुन्नरी कारागिरांकडून त्याबरहुकूम साधने घडवून, ते जोडून त्याच्या चाचण्या रोज होत असत. ती रेखाटनेही पूजेत मांडली होती. राजांनी पुन्हा एकवार सर्व शस्त्रशाळेकडे नजर टाकली आणि गडावरील शस्त्रसामर्थ्याचा अंदाज घेतला. एका अनामिक समाधानाने त्यांचे चित्त प्रसन्न झाले. पुन्हा एकदा तिथल्याच एका कारागिराच्या हस्ते शस्त्रपूजा बांधली गेली आणि त्यासमोर राजे डोळे मिटून बसले. हे रणचंडिके, आई भवानी, आज या सगळ्या दौलतीचं, माझ्या रयतेचं, माझ्या सवंगड्यांचं, लक्ष्मीचं-सरस्वतीचं अस्तित्त्व फक्त तुझ्या आशीर्वादावर तरुन आहे. ही सोबतची जिवाची माणसं, एकेकाच्या नावे देवाचा टाक घडवून नित्यपूजेला देव्हार्यात मांडावा अशी कर्तबगार. हा वरदहस्त असाच राहू दे आणि आमच्या मनगटात असेच बळ घालीत रहा, आमच्या शस्त्रांच्या धारेच्या रुपाने सदैव आमच्या सोबत रहा. “या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:॥”
एव्हाना दुपार झाली होती. मध्यान्हीच्या भोजनास सार्यांना सोबत घेऊन राजे पंगतीला बसले. चौरंग-पाट, सभोवताली रांगोळीचे गालिचे, केशराच्या सुगंधाने सिद्ध केलेले शीतल जल आणि सुगंधी उदबत्त्यांचा सुवास असा साग्रसंगीत पंगतीचा थाट होता. पुरणपोळी, कटाची आमटी, साजूक तुपाच्या वाट्या, सुगंधी दुधाचे पेले, सुवासिक तांदळाचा भात अगदी मुदपाकखान्यातील, गजशाळेतील, अश्वशाळेतील सेवकांनाही पंगतीचा मान होता. खुद्द आऊसाहेब, राणीवसा आणि खाजगीतल्या सेविका आग्रह करकरुन वाढण्याचे काम करत होत्या. अवघी पंगत अगदी तृप्त झाली. भोजनानंतर शिवरायांनी एकट्याने काहीकाळ सदरेला सुट्टी असूनही स्वतः काही कागदपत्रे जातीने नजरेखालून घातली. त्यात जायबंदी सैनिकांची इनामपत्रे आणि बलिदान केलेल्या योध्यांच्या विधवांच्या तनख्याची आज्ञापत्रे होती. ती सर्व कागदपत्रे घेऊन तिथल्या जावक नोंदवहीत नोंदवून आपल्या दालनात गेले. त्यांच्या मनीचा ठाव काही तिथल्या सेवकाला लागला नाही. अर्धा घटका विश्रांती घेतली आणि राजे शिलंगणाला तयारी करु लागले. मदारी मेहतरने पोशाख काढून ठेवला होता. रेशमी तुमान आणि भरजरी कशिद्याचा अंगरखा चढवून त्यावर शेला कटीस बांधला. टपोर्या मोतियांच्या माळा आज मुद्दाम अधिक घातल्या होत्या हे तेथल्या हिरोजीच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नाही, पण त्याने काही विचारण्याचे धाडस केले नाही. तबकातील जिरेटोप चढवला आणि भवानी तलवार प्रथम भाळी लावली आणि नंतर कमरेस शेल्यात खोचली. सर्व आटोपल्यावर पुन्हा पेटिकेतून कवड्यांची माळ घेऊन तिला भाळी लावून परिधान केली. आई तुळजाभवानीचा दास, भुत्या म्हणून शिवरायांनी स्वतः ती कवड्य़ांची माळ अंगिकारली होती. रयतेच्या सुखासाठी अवघ्या मुलुखात जोगवा मागत फिरेन असे वचन त्यांनी त्या आदिशक्तीला दिले होते. आणि आजवर क्षणभरही आपल्याला त्याचा विसर पडला नाही म्हणून शिवरायांच्या मनी कर्तव्यपूर्तीची झळाळी होती. राजांचे ते साजिरे रुपडे पाहून कुणाची नजर न लागो असे मनोमन हिरोजीला वाटून गेले. राजे देवघरात गेले. तिथल्या घटातून काही तुरे काढून त्यांनी जिरेटोपाशी खोवले. आणि पुन्हा एकदा आदिशक्तीला नमन करुन शिलंगणासाठी बाहेर पडले.
शिलंगणाचा कार्यक्रम जगदीश्वराच्या मंदिराच्या पलीकडे माळावर होणार होता. वाड्यातून निघून राजे झपाझप जगदीश्वराची वाट चालू लागले. मदारीही सोबत होताच, शिवाय दोन अंगरक्षकही. राजे निघाले तसे राणीवशातूनही भोयांनीही मेणे जगदीश्वराकडे उचलले. जगदीश्वराचे दर्शन घेऊन शिवराय सोबत्यांशी चर्चा मसलत करतच माळावर आले. तोवर राणीवसा जगदीश्वराचे दर्शन घेऊन आसनस्थ झाला होता. समोर गडवासियांचा मोठा समुदाय जमला होता. गडाची सारी शिबंदी, प्रभावळीतील किल्लेदार, सरदार, गडाखालील गावांतले पाटील-देशमुख, राव-रंक, कसबी-कारागिर, बारा बलुतेदार, कुणबी-शेतकरी आणि बाकी सगळी प्रजा गर्दीने उभी होती. डावीकडे दूरवर राणीवसा एका शामियानात आऊसाहेबांसह विराजमान झालेला. गर्दीच्या मधून हाताच्या उंचीवर एक दोर आडवा बांधला होता. त्याला ठिकठिकाणी आपट्याच्या पानांच्या डहाळ्या टांगलेल्या. शिवराय उठून उभे राहिले तशी ती समोरची गर्दी सावरुन उभी राहिली. जोडे काढून राजांनी समोरच्या कलशातून थोडे पाणी पायावर घेतले आणि ओली बोटे डोळ्यांना लावली. व्यासपीठावर जाऊन त्यांनी भवानी तलवार उपसली आणि गर्दीने श्वास रोखला. जशी राजांनी समशेर त्या दोरीवरच्या एका आपट्याच्या डहाळीला स्पर्शिली तशी गर्दी त्या संपूर्ण दोरीच्या डहाळ्यांवर तुटून पडली. शिलंगणाचे सोने लुटायला. ज्याला जेवढे हाती लागेल तेवढे सगळ्यांनी सोने मुठी भरभरुन लुटले. प्रत्येकाच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता. ती समाधानी रयत पाहून कुठल्या राजाचा ऊर अभिमानाने भरुन येणार नाही? तसे राजांचेही झाले. त्यांच्या मनी विचार आला आज विजयादशमी. धर्माचा अधर्मावर, सत्याचा असत्यावर विजयाचा सोहळा. आपल्या हातून या कार्यातलाच काही अंश का होईना तुळजाभवानीने करवून घेतला. रयतेच्या रुपाने देवीने या भुत्याकडून सेवा करवून घेतली, कर्म करविले, हे आपले आणि आपल्या पूर्वजांचे अहोभाग्य म्हणूनच. प्रत्येकाच्या डोळी तरळणारे समाधान हाच खरा मराठी दौलतीचा पाया. याच पायावर आपण सत्तेचे शिलंगण करुन राजाभिषेकाचा कळस चढवला तो या रयतेच्या भल्यापायीच. या दौलतीसाठी कित्येक सोबत्यांनी आपल्या घरादारावर पाणी सोडले, काही जायबंदी झाले तर काहींनी बलिदान केले. त्यांचा आठव येताच महाराजांचा हात कमरेच्या चंचीशी गेला त्यातून त्यांनी काही कागद बाहेर काढले. आणि व्यासपीठावर उभे राहिले. एक लखोटा त्यांनी चोपदाराकडे दिला आणि तो एकेक नाव पुकारु लागले.
ती नावे होती ती जायबंदी सैनिकांची, बलिदान केलेल्या योद्ध्यांच्या विधवांची. आणि त्या सर्वांना राजांनी दोन दिवस आधीच खास दूत पाठवून गडावर बोलावून घेतले होते. त्याचा दरबारातल्या कुणासही पत्ताही नव्हता. प्रत्येक जायबंदी झालेल्या सैनिकास राजे आवेगाने मिठी मारत, विधवांना मनःपूर्वक नमन करत आणि त्यांची इनामपत्रे आणि तनख्याची आज्ञापत्रे सुपूर्द करीत. शिवाय विशेष पराक्रम केलेल्या काही योद्ध्यांचा गळ्यातून मोत्याचा कंठा देऊन सन्मानही करत. काही माळा जास्त का परिधान केल्या होत्या हे मदारी आणि हिरोजीला समजून चुकले होते. नकळतच त्यांच्या मनात राजांबद्दलचा आदर दुणावला होता. पलीकडल्या शामियान्यातून आऊसाहेब आपल्या पराक्रमी पुत्राचे मोठे मन अश्रूभरल्या डोळ्यांनी अंधूक होईपर्यंत होत्या. कवी भूषणचे शब्द आऊसाहेबांना आठवले…
जै जयंति जै आदि सकति जै कालि कपर्दिनी ।
जै मधुकैटभ – छलनि देवि जै महिषविमर्दिनि ।
जै चमुंड जै चंड मुंड भंडासूर खंडिनि ।
जै सुरक्त जै रक्तबीज बिड्डाल – विहंडिनि ।
जै जै निसुंभ सुंभद्दलनि भनि भूषन जै जै भननि ।
सरजा समत्थ सिवराज कहॅं देहि बिजय जै जग-जननि ॥
हे आदिशक्ति ! हे कालिके ! हे कपर्दिनि (गौरी) ! हे मधुकैटभ महिषासूरमर्दिनि देवी ! हे चामुंड देवी ! हे भंडासूर्खंडिनी ! हे बिडाल विध्वंसिनी ! हे शुंभ-निशुंभ – निर्दालिनी देवी ! तुझा जयजयकार असो ! भूषण म्हणतो हे जगज्जननी ! सिंहासमान शूर अशा शिवरायास विजय देत जा.
राणीवसा वाड्याकडे निघाला होता. एकएक करत सर्व आज्ञापत्रे संपवून राजे पुन्हा वाड्याकडे निघाले. निरोपाचे मुजरे झडले त्याचा स्वीकार करत राजे जगदीश्वरासमोरुन पुन्हा वाड्याकडे निघाले. समोर शिरकाईच्या मंदिराच्या मागे सूर्य अस्ताला चाललेला. त्याची आभा सर्व आकाश व्यापून उरली होती. क्षात्रधर्माचे विरक्त केशरच जणू. सर्व जगरहाटीला बळ देऊन सूर्य मागे कुणाचीच तमा न करता त्याच्या विरक्तीकडे मार्गस्थ होत होता.
का कुणास ठाऊक राजांच्या मनीही असाच विचार स्पर्शून गेला. वाड्याच्या दाराशी राणीवसा आडवा आला. औक्षणाचे ताट आणले गेले. सर्वांनी राजांना ओवाळले. ताटांत मोहरांची आणि आपट्याच्या सोन्याची ओवाळणी पडली. अशा वेळी सईबाईंची पुन्हा एकदा शिवरायांना अधिक तीव्रतेने आठवण झाली.
वाड्यावर दसर्याचे सोने देण्यासाठी रीघ लागली होती. जवळपास दोनतीनशे माणूस त्यादिवशी वाड्यावर येऊन गेला. प्रत्येकाच्या मुखी काहीना काही गोड घास पडावा याकडे आऊसाहेबांचं जातीने लक्ष होतं. रात्र झाली तशी गर्दी ओसरली आणि राजेही जरा विसावले. दिवसभराच्या दगदगीने राजे थकले होते, पण रयतेच्या डोळ्यांतले समाधान आणि आपल्या राजाचं कौतुक त्यांच्या डोळ्यांपुढून हटत नव्हते. संध्याकाळी फक्त एक फळ आणि पेलाभर दूध घेऊन ते शयनकक्षात गेले. साज-सरंजाम उतरवला. आणि सुती अंगी घालून खिडकीशी आले. गंगासागर, पलीकडे हत्ती तलाव आणि उजवीकडे दूरवर जगदीश्वर. अंधारात खालच्या गावातले कंदील चमकत होते. जणू रयतेच्या मनातला आशेचेच प्रतीक. प्रत्येकाच्या मनात तेवणारी आशा, राजानं सातासमुद्रापार शिलंगण करावं, सोनं लुटावं आणि सुखी रहावं. मराठी रियासतीचंही असंच शिलंगण व्हावं… आई जगदंबेनं त्यासाठी उदंड आशीर्वाद द्यावेत. जगदंब… जगदंब… जगदंब…!! थंड वार्यासोबत दूरवरुन डफ-संबळाचा आवाज येतच होता. भवानीआईचा हा भुत्या खिडकीशी रयतेच्या सुखाचा अखंड जोगवा मागत होता !!!
संपूर्णपणे काल्पनिक असलेले वर्णन हे यथाशक्ती माझ्या कल्पनेत असलेल्या शिवारायांच्या रायगडावरील दसर्याच्या दिवसाबद्दल लिहिलेले आहे. स्थल-काल-व्यक्ती संदर्भ कदाचित चुकीचे असूही शकतात. सांभाळून घ्या.
पूर्वप्रकाशन- http://www.pankajz.com/2015/10/dassera-in-shivajis-era.html
प्रतिक्रिया
12 Oct 2016 - 9:37 am | एस
सुंदर. एक लहानशी शंका आहे. शिवरायांनी दारुगोळा नेहमीच इंग्रजांकडून विकत घेतला. त्यांच्या धामधुमीच्या कारकिर्दीत शस्त्रास्त्रांचे कारखाने निर्माण करण्यास बहुतेक वेळा मिळाला नसावा. कारण तसा उल्लेख मला कुठे सापडला नाही. थोरल्या माधवराव पेशव्यांनी तोफा व बंदुका ओतण्याचे काही प्रयत्न केलेले सापडतात. त्या आधी मराठी रियासतीत असे उल्लेख मला तरी आढळले नाहीत. बहुधा माझी माहिती चुकीची वा अपूर्ण असू शकते. मराठयांच्या तोफा लाकडी असत. एकदा बार उडवला की काम झाले. पण त्या अतिशय हलक्या असल्याने अवजड लोखंडी तोफांच्या तुलनेत त्या वाहून न्यायला आणि डोंगरावर चढवायला सोप्या असत. ठासणीच्या बंदुका बाबराने वापरल्या. त्यानंतर मुघल व इतर राज्यकर्त्यांनी त्यांचा वापर केला. पण त्या बनवण्याचे तंत्रज्ञान काही प्रमाणात मुघल आणि मुख्यत्वे युरोपियन सत्तांकडे होते. अर्थात शिवरायांनी तसा प्रयत्न नक्कीच केला असणार.
12 Oct 2016 - 9:48 am | भटकंती अनलिमिटेड
म्हणूनच सगळ्यात शेवटी ती टीप लिहिली.
मला वाटलं केलं/करवलं असेल महाराजांनी थोडंफार रिव्हर्स इंजिनियरिंग.
12 Oct 2016 - 11:26 am | रातराणी
सुरेख लिहिलंय!
12 Oct 2016 - 11:37 am | नीलमोहर
सुंदर लेख, आवडला.
12 Oct 2016 - 11:54 am | गामा पैलवान
भअ,
काल्पनिक असलं तरी लेखन ओघवतं झालं आहे. महाराजांची दैनंदिनी वाचल्यासारखं वाटतंय. :-) दसऱ्याचा भपका आजिबात नाही. म्हणूनंच हा राजा जनतेला आपला वाटतो.
आ.न.,
-गा.पै.
12 Oct 2016 - 12:42 pm | नाखु
महाराज, विलक्षण प्रेम-असोशी अस्ल्याखेरीज असे लिखाण होणे नाही...
शिवरायाचा आठवावा प्रताप या भू मंडळी.
12 Oct 2016 - 2:02 pm | स्मिता_१३
+१११
12 Oct 2016 - 1:19 pm | पद्मावति
अप्रतिम लिहिलंय _/\_
+१
12 Oct 2016 - 1:35 pm | यशोधरा
किती सुरेख लिहिलंय!
12 Oct 2016 - 2:31 pm | सुखीमाणूस
शिवरायान्चे आठवावे रूप _/\_ _/\_
12 Oct 2016 - 2:37 pm | किसन शिंदे
आधी वाचले होतेच, आज पुन्हा वाचले.
12 Oct 2016 - 2:40 pm | पी. के.
तू नेहमीचं अप्रतिम लिहितोस.
आज पुन्हा एकदा वाचला.
तुझा कोंबडी वरचा लेख वाचून वाचून पाठ झालाय.
आज विजयादशमी. अधर्माचा धर्मावर, सत्याचा असत्यावर विजयाचा सोहळा.
"धर्माचा अधर्मावर" आस म्हणायचं होता का?
12 Oct 2016 - 3:15 pm | भटकंती अनलिमिटेड
हा, ते चुकलंय खरं. पण मला एडिट करता येत नाहीये आता.
12 Oct 2016 - 2:40 pm | बबन ताम्बे
शिवकाळ मुर्तीमंत उभा केलाय.
12 Oct 2016 - 2:59 pm | वरुण मोहिते
छान लिहिलंय
12 Oct 2016 - 3:09 pm | अनुप देशमुख
लेख नेहमीप्रमाणे मस्तच! परत वाचला आणि नव्याने उमगला..
कटाच्या आमटीचा उल्लेख भारीच... वेलकम ब्याक..
12 Oct 2016 - 4:25 pm | अभ्या..
II आईराजा उदे उदे II
हे गर्जताच डोळ्यासमोर उभी राहते आमची जागॄत नेत्राची आई तुळजाभवानी.
सोबत असतात प्रजेसाठी आईचे काळीज न दैत्यनिर्दालनाचा वसा घेतलेले शिवबा.
जिजाउसंगे शिवराय म्हणजे आईराजाच.
कवड्याची माळ घातलेल्या ह्या भोप्याला मानाचा मुजरा
II आईराजा उदे उदे II
12 Oct 2016 - 7:34 pm | आनंदयात्री
लेख छान झालाय. त्या काळात राजे कसे वागले असतील, त्यांची दिनचर्या कशी असेल वैगेरे वैगेरे कुतूहल प्रत्येकाच्या मनात असतेच. हा लेख वाचुन त्या काळात डोकावल्यासारखे वाटले. धन्यवाद.
12 Oct 2016 - 9:14 pm | अर्धवटराव
छानच झालाय लेख.
ललित लेखनाला ऐतिहासीक संदर्भांपासुन थोडीफार लिबर्टी घेता येते. ति मर्यादा लेखात सांभाळली गेली आहे.
कीप इट अप.
13 Oct 2016 - 10:12 am | अनिरुद्ध.वैद्य
अगदी शिवकाळात नेउन ठेवल्यासारखं वाटल!
13 Oct 2016 - 10:56 am | गौतमी
खुपच सुंदर.... अगदी तो काळ डोळ्यांसमोर येऊन गेला.
13 Oct 2016 - 12:56 pm | सस्नेह
छान लिहिलंय. शिवकाल मूर्तिमंत उभा केलाय.