नमस्कार, रसिक मायबापहो
चित्रपट हे कायम समाजाचं प्रतिबिंब दाखवतं असं कोणत्या तरी महान माणसाने म्हंटल आहे आणि काही प्रमाणात हे खरंही आहे. 'देऊळ', 'वळू' मधून ग्रामीण जीवनाची झलक दाखवत वेगळे विषय हाताळणार्या गिरीष कुलकर्णीनी यावेळेस थोडा वेगळा पण गावाशीच निगडित असणारा असाच विषय 'जाऊं द्याना बाळासाहेब' मधून मांडला आहे . पैशामुळे येणारी बेफिकीर प्रवृत्ती , गावमधली जाती पातीची उतरंड, फ्लेक्स संस्कृती यासर्वांवर केलेलं खुसखुशीत भाष्य म्हणजे 'जाऊं द्याना बाळासाहेब'. पोराला राजकारणात आणू पाहणारे राजकारणी वडील अण्णासाहेब मारणे, सुखासीन आयुष्य जगणारा पण वास्तवाची जाण नसणारा मुलगा बाळासाहेब हे कथेचे मुख्य पात्र. बापाने राजकारणासाठी लग्नाची गाठ मोडलेली असल्याने मनाला मार लागलेला बाळासाहेब बापाशी उभा दावा मांडतो. पुढे चुकून रंगमंचावरच नाटक पाहतो, आणि तसंच काहीतरी करायचं या विचाराने गावात तो सुद्धा तसंच काहीतरी करू पाहतो त्या अनुषंगाने त्यात झालेले बदल आणि सुरु झालेला आत्मशोधाचा हा प्रवास, यांची हि तशी पाहिली तर सरधोपट गोष्ट. पण हे सर्व मांडण्यासाठी दिग्दर्शकाने फार मोठा फाफट पसारा मांडला आहे, आणि चित्रपटाची लांबी थोडी वाढली जी थोडी कमी करता आली असती.
असं असलं तरी हि गोष्ट सार्वत्रिक आहे. गाव असो वा शहर चित्रपटात दाखवलेल्या गोष्टी आपल्या आजूबाजूला सतत घडत असतात. त्यामुळे आपण याच्याशी पटकन कनेक्ट होतो. जाऊं द्याना बाळासाहेबचा स्ट्रॉंग पॉईंट आहे तो यातले संवाद. "मी शब्द शोधतो दिव्य नव्या तेजाचा", " सारखं आपलं बाळासाहेब, बाळासाहेब" "स्माईल टाक ना तू " यासारखे चुरचुरीत संवाद वेळोवेळी हशा पेरतात.
गाण्यांची गोष्ट म्हणाल तर अजय-अतुल कडे संगीताचा भाग सोपवला कि दिग्दर्शकाला त्या कडे लक्षच देण्याची गरज राहत नाही. इथे पण अगदी असंच अजय-अतुल ने संगीताची जबाबदारी अगदी उत्तमरीत्या हाताळली आहे. तरीही 'मोना डार्लिंग", ‘बेबी ब्रिंग इट ऑन’ सारखी गाणी उगाच कथेत घुसडून लांबी वाढवली आहे असं वाटत राहतं. 'डॉल्बीवाल्या बलाव माझ्या डीजे ला" सारखी गाणी आधीच गाजत आहेत पण खरं कौतुक करावं वाटते ते 'वाट दिसू देगा देवा, वाट दिसू दे' आणि 'लख्ख पडला प्रकाश मशालीचा या गोंधळ स्वरूपातल्या गाण्याचं. हे ऐकतांना मनात एक वेगळंच भारी फिलिंग येतं जे इथे शब्दांत वर्णन करणं शक्यच नाही.
अभिनयाच्या बाजूने जाऊं द्याना बाळासाहेब एकदम तगडा आहे असाच म्हणावं लागेल. मोहन जोशी, दिलीप प्रभावळकर, स्पृहा जोशी, सविता प्रभुणे, भाऊ कदम यासारखे तगडे कलाकार आहेत. त्यामुळे अभिनयाची जुगलबंदी अगदी तुफान झालीये. पण सगळ्यात जास्त कौतुक करावं वाटतं ते 'श्रीकांत यादव ' याच, गिरीष कुलकर्णी आणि श्रीकांत यादव आता जाऊन समीकरणच झालंय. वळू मधला सुरेश असो , देऊळ मधला आप्पा गलांडे असो या माणसाने मागच्या सगळ्या भूमिके प्रमाणे इथे पण विकास नावाची बाळासाहेबांच्या मित्राची भूमिका अगदी चोख निभावली आहे. याचा शेवट बाळासाहेब फार मोठा नेता बनतो, गावातले समस्या सोडवतो वगैरे असा करता आला असता पण, दिग्दर्शकाने तसं न करता तो प्रश्न प्रेक्षकांवर सोपवला आहे.
वाट दिसू देगा देवा, वाट दिसू दे
गाठ सुटू देगा देवा, गाठ सुटू दे
असं म्हणत जगताना वेगळी वाट शोधायची प्रेरणा देणारा 'जाऊ द्या ना बाळासाहेब' , 'पॉलिटिकल सटायर' हि आहे असं म्हणायला हरकत नाही . चित्रपटाची लांबी जरी मोठी असली तरी तो दोष दिग्दर्शकाचा न राहता संकलनाचा आहे असे कायम वाटत राहते. एकुणात काय जाऊं द्याना बाळासाहेब हा त्याच्या गाण्यासाठी, गिरीश कुलकर्णी, भाऊ कदम यांच्या डायलॉगबाजी साठी वन टाईम वॉच नक्कीच आहे.
अवांतर : याचे सुरवातीचे श्रेय नामावली (क्रेडिट्स) नक्कीच चुकवू नका .
फोटो : आंतरजाल साभार
प्रतिक्रिया
9 Oct 2016 - 9:17 pm | एस
पाहायला पाहिजे.
9 Oct 2016 - 9:59 pm | पद्मावति
मस्तं परीक्षण. आवडलं.
9 Oct 2016 - 10:17 pm | बॅटमॅन
कालच पाहिला हा पिच्चर. थोडा अंमळ जास्त स्वप्नाळू आहे असे वाटले पण चित्रीकरण एक नंबर घेतलेय. खूप आवडला. हा पिच्चर जरूर पहावा असे सुचवेन.
10 Oct 2016 - 9:03 am | महासंग्राम
बरोबर, पण हा दोष संकलकाचा आहे असे वाटून जाते.
10 Oct 2016 - 11:02 am | राजाभाउ
सहमत
10 Oct 2016 - 12:23 pm | मालोजीराव
चित्रपट बघितला, बरेच कलाकार अक्षरशः वाया घालवलेत, गिरीश कुलकर्णी उत्तम कलाकार आहे पण त्याने दिग्दर्शन करू नये. चित्रपट पाहून आमच्याही 'मनाला मार' लागलेला आहे याची नोंद घ्यावी
10 Oct 2016 - 12:42 pm | महासंग्राम
मालोजी राव आपली प्रतिक्रिया आली आम्ही धन्य झालो देवा !!!
9 Oct 2016 - 10:46 pm | रेवती
जालावर आल्यास पाहता येईल.
10 Oct 2016 - 3:25 pm | मोहनराव
नक्कीच पाहु
9 Oct 2016 - 11:01 pm | सतिश गावडे
काल पाहीला. आवडला. आवर्जून पाहण्यासारखा आहे हा चित्रपट.
10 Oct 2016 - 8:19 am | यशोधरा
बघणार आहे हा सिनेमा, परिक्षण आवडले.
10 Oct 2016 - 8:26 am | नाखु
वरती मित्रांनी सांगीतलय म्हटल्यावर तर नक्कीच, बाल्कांची सुट्टी साजरी करायची संधी सोडणार नाही.
10 Oct 2016 - 9:40 am | अजया
वर सर्व रथी महारथी बघा म्हणतात तर बघायलाच हवा चित्रपट!
10 Oct 2016 - 10:09 am | रातराणी
नक्की पाहणार!
10 Oct 2016 - 10:31 am | तुषार काळभोर
आवर्जून पाहण्यासारखा आहे.
थोडंफार सैराटशी साम्य असं आहे: बरेच लोक्स गाणी बघून फुल्ल्टू टैमपाससाठी जातात, अन् सैराटचा शेवट पाहून सुन्न होतात. बाळासाहेबच्या शेवटी सुन्न नाही झाली तरी गंंभीर नक्कीच होतात. विशेषतः शेवटी नाटकाला बाळासाहेबांच्या निवेदनाच्यावेळी.
10 Oct 2016 - 11:01 am | राजाभाउ
परवा पाहीला. छान आहे, एकदातरी पाहण्यासारखा आहे हा चित्रपट. अभिनय, संवाद आणि चित्रीकरण खासच. काही प्रसंगात तोच तोच पणा आला आहे त्यामुळे चित्रपटाची लांबी थोडी वाढली आहे व मध्यंतरापुर्वी चित्रपट थोडा संथ होतो. पण यापेक्षाही मला थोडीशी(च) खटकलेली एक गोष्ट म्हणजे चित्रपटाचा संदेश फारच थेट थेट मांडल्या मुळे तो जरा बाळबोध वाटतो. देउळ, वळु मध्ये तो एकदम सटली दिल्यामुळे तो जास्त भीडत होता. तरीही चित्र्पट एकदम सुखद अनुभव आहे.
10 Oct 2016 - 12:19 pm | स्वाती दिनेश
परीक्षण छान!
चित्रपट बघण्याचा योग कधी आणि कसा येतो ते पाहू.
स्वाती
10 Oct 2016 - 1:52 pm | अनन्न्या
पण पहायला हवा असे वाटतेय.बघू कधी येतोय रत्नांग्रीस!
10 Oct 2016 - 2:30 pm | पुंबा
उद्या बघायला जाणार आहे.. सांगतो कसा वाटला ते.
10 Oct 2016 - 3:15 pm | गणेशा
कालच पाहिला .. ग्रेट पिक्चर.. निखळ विनोद .. हसुन हसुन पुरेवाट .. नक्की पहावा असाच..
परिक्षण छान .. सिनेमा त्या पेक्षा छान आहे मात्र ...
पुन्हा पाहणार आहे
11 Oct 2016 - 1:23 pm | बोका-ए-आझम
नक्की पाहा. मालोजीरावांशी सहमत! गिरीश कुलकर्णी अभिनेता म्हणून चांगला आहे पण स्वतःच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याचे तोटे जास्त. त्याने अग्ली मध्ये अनुराग कश्यपच्या दिग्दर्शनाखाली जसा अभिनय केला होता तसा इथे झाला नाही हे तितकंच खरं आहे. पण हे असूनही चित्रपट भारी आहे.पोष्टर बाॅईज नंतर इतका धमाल विनोदी पण अंतर्मुख करणारा चित्रपट पाहायला मिळाला.
11 Oct 2016 - 7:24 pm | अभ्या..
च्यमारी, ह्यानी तर पोस्टरला पण आपली कॉपी मारलीए राव.
असुंद्या. पिक्चर बघणार थेट्रात जाऊनच.
12 Oct 2016 - 12:48 am | वरुण मोहिते
बघण्यासारखा आहे जरूर
19 Oct 2016 - 4:18 pm | जगप्रवासी
परीक्षण खूप चांगलं लिहिलं आहे. बरेचसे मुद्दे पटले नाहीत. असो.
कालच चित्रपट पाहिला, वळू देऊळ सारखे चित्रपट बनवणारे कुलकर्णी जोडीने हा तद्दन फालतू चित्रपट बनवला आहे यावर विश्वास बसत नव्हता. सैराट मधील झिंगाट गाण्याचा पुनः प्रत्यय देण्यासाठी मोना डार्लिंग गाणं बनवलंय असं वाटत राहील बघताना. म्हणजे कुठलंही कारण नसताना वाजत असणारी, अजय अतुल प्रोडक्शन आहे म्हणून जबरदस्तीने घुसवलेली गाणी. "वाट दिसू दे" आणि "गोंधळ" ही गाणी सोडली तर दुसरं एक ही गाणं आठवणीत राहत नाही. शेवटी सर्व लोक उमेशच्या मागून चालतात कशासाठी माहित नाही? त्याने असं काय काम केलं आहे की लोक त्याच्या पाठीशी चालतात तेच कळत नाही. नाटकात त्याच स्वगत ऐकून लोकांना काय आवडलं म्हणून ते टाळ्या वाजवतात ते कळलं नाही. चित्रपट रेंगाळत राहतो.
या झाल्या चित्रपटातील खटकलेल्या गोष्टी, आता आवडलेल्या गोष्टी. नाटकातील ह्यूमर भारी आहे. भाऊच डोळे मिचकवून निरागसतेने केलेलं काम, मोहन जोशींनी रंगवलेला राजकारणी बाप, अधे मध्ये असलेले विनोदी प्रसंग, उमेशने मनात होत असणारी घुसमट व्यवस्थित सादर केली आहे.
19 Oct 2016 - 6:21 pm | अत्रुप्त आत्मा
बघितला! आवडला..
27 Oct 2016 - 2:17 pm | भडकमकर मास्तर
आवडला ...
शेवटाला गडबडगुंडा झालाय ... या गोष्टीचं नक्की काय आणि कसं करायचं, असा गोंधळ वाटतो, गाणी घुसडलेली आहेत ... पण पहिला भाग जास्त आवडला, झोप येण्यासाठी बाळासाहेबाने जड जड लेखन भाऊकडून वाचून घेणे हा प्रसंग जबरदस्त जमला आहे...