बहुचर्चित "सैराट"
बहुचर्चित "सैराट" काल बघितला. इतका उशीरा का ? असं काहींच्या मनात आलं सुद्धा असेल, खास करून , माझे काही मित्र मैत्रिणी , ज्यांना हा सिनेमा खूपच भिडलाय. असो. खरं म्हणजे कुठलाही सिनेमा ...अगदी सुपरेस्ट हिट ही का असेना , मला लग्गेच थेटरात जाऊन पहावा असा उत्साह बिलकुल नव्हता, अजूनही नाही.
घरात , रविवारी वगैरे , तो पण सैराट किंवा गेल्या रविवारचा मुं-पुणे-मुंबई :२ वगैरे अगदी गाजलेले चित्रपट असतील तर मात्र घरात , हाफ चड्डी घालून , ऐस पैस बसून मला पाहायला आवडतात. मध्ये मध्ये चहा - खाणं चालूच. जाहिराती ? नो प्रोब्लेम man ! त्या वेळात आपल्या घराचा श्वास असतोच ना सोबतीला (वाय-फाय हो मालक). त्याच्याकडे पाहायचं. मन कसं एकाग्र होवून जातं. हे जमत नाहीये असं वाटलं , तर लग्गेच मी माझ्या मुलांकडे पाहतो आणि माझं “इन्स्पिरेशन” जागरूक ठेवतो. खरंच...मुलांकडून खूपच शिकण्यासारखं असतं . असो.
अभिनय , दिग्दर्शन इ.इ. .....
तर अशा प्रकारे सैराट बघितला. शेवटी दोघे मरतात आणि काहीतरी जातिभेदाचा विषय आहे असं म्हटल्यावर थोडे पूर्वग्रह तयार झाले होते, दोन्ही-तिन्ही,सर्व बाजूंनी. तरीही हे सगळं बाजूला ठेवलं (प्रयत्न) आणि खरोखर एक कलाकृती म्हणून पाहण्याचा यत्न केला. रविवारच्या नसिरुद्दीन शहा च्या मुलाखतीत तो म्हणतो “भूमिकेत शिरून नाही, तर भुमिके”सह” जगा". तसाच चित्रपटात शिरून नाही , तर त्याच्या सोबत पाहण्याचा प्रयत्न केला. सुरेख कोरे करकरीत , मातीतले अभिनय, स्वाभाविक भाषा प्रचंड भावली. निष्कारण , भावनांचे उद्रेक वगैरे दाखवणारे लांब पल्ल्याचे Dialogue ह्या सर्व नाट्यमय गोष्टींना खुबीने फाटा दिलाय. नाही म्हणायला आर्ची – जे सिनेमातालं सर्वाधिक आकर्षक पात्र आहे, तिच्या तोंडी सुधा “मराठीतून बोललेलं कळत न्हाय का ? का इंग्लिश मधून सांगू ?” हे वाक्य भारी वाटतं. तिनी “पाटलाची पोर” भन्नाट वठवलीय. तीच गोष्ट परशाची. अत्यंत संयत,परिस्थितीची जाण असणारा , तसेच आर्ची ला इतर फोन येवू लागताच Violent होणारा पझेसिव्ह प्रियकर परशा त्याच्या बोलक्या डोळ्यांनी आणि अबोल अभिनयाने खास करून लक्षात राहतो.
लोकेशन्स .. व्वा व्वा !
लोकेशन्स तर काय सांगावी. भिगवण-उजनी-करमाळा परिसरात खूप फिरलोय. छान जागा टिपल्यात. हैदराबादची झोपडपट्टी व्यवस्थित , वरून कॅमेरा लावून टिपलीय. “चक्र” ची आठवण झाली. आर्ची काम करत असलेली बाटल्यांची factory अगदी त्यातल्या ब्लोविंग मशीन सकट दाखवलीये. परशा व्यवस्थित कांदा चिरताना वगैरे दाखवलाय. अजून एक प्रसंग आणि लोकेशन कमालीचं आवडलं ते रेल्वे रुळांच्या बाजूला तिघे मित्र खुशीत जीव खाऊन , आनंदात नाचतात , ते. परशा, त्याचे ते मित्र , रेल्वे च्या बाजूला त्यांचा डान्स ... व्वा ! क्या बात है नागराज भाई.
शेवट ...
शेवट सुखान्तच असावा वगैरे मी नाही म्हणणार; पण अशा प्रकारे धक्कादायक , अकल्पित शेवट मला जरासा अनाकलनीय वाटला. मुळात आर्ची-परशा जोडीचं लग्न होतं, त्यांना मूल-बील होतं, ते हैदराबादेत चांगले सेटल-बीटल होतात. एव्हाना ३-४ वर्ष तरी निघून गेली असतील, नाही का ? मग अचानक “आर्ची घरून घराण्याची बे-आब्रू करून निघून गेली” हे लक्षात ठेवून इतक्या काळाने तिचा बाप – जो एक ग्रामीण व्यावसायिक आहे – गुंड नव्हे – तो अचानक माणसं पाठवून त्यांना एकदम खतमच करून टाकतो, हे जरा unrealistic – किंवा धक्का देण्याकरिता “खास” तंत्र आहे, असं पाहिल्या पाहिल्या वाटलं. असेलही कदाचित. पण “चला सर्व सुरळीत झालं आणि ते सुखाने नांदू लागले” वगैरे देखील कुठे realistic आहे ? संदेश काय जातो ह्याचा निर्मात्याने-दिग्दर्शकाने विचार करायला हवा का ? करतातच. परंतु प्रेक्षक किंवा दर्शक म्हणून सतत “चला सर्व...” हाच शेवट असण्याची देखील अपेक्षा करणं चुकीचच.किंबहुना , ह्या अशा भावनांच्या तारुवर – कोणाच्याही – आर्ची-परशा काय किंवा पाटील कंपनीच्या काय ; स्वार होवून चालायचं नाही, हे जरूर शिकता येईल. आता म्हणजे काय करायचं – हा देखील प्रश्न खराच आहे. कारण आर्ची नं स्वत:ला तेव्हाच सांभाळलं असतं किंवा परशा आधीच थांबला असता वगैरे ! अहो पण मग हा “सैराट” पणा कसा काय घडता ? असो.
नसिरुद्दिन .. पुन्हा एकदा !
सध्या पुरतं नसिरुद्दीन च्या म्हणण्याप्रमाणे सिनेमात न शिरता (आधी शिरून झालं-कबूल!) सैराट च्या बरोबर राहून पुन्हा एकदा “इत्त्मिनानसे” (म्हणजे निवांतपणे बरंका) सैराट न होता सैराट पहायचं ठरवलंय !
प्रतिक्रिया
3 Oct 2016 - 10:30 am | सामान्य वाचक
माझा आज
3 Oct 2016 - 11:09 am | राजाभाउ
"मी पयला" अस न म्हणल्या मुळे हा फाउल धरण्यात आलेला आहे.
त्यामुळे मी पयला :)
3 Oct 2016 - 6:38 pm | मानस्
सैराट टीव्हीवर आल्यावर सुद्धा त्यावर एक धागा निघतो आणि चर्चा होते हेच तर सैराटचे यश आहे...पहिल्यादा पाहणाऱ्याच्या मनावर गारुड करतो हा सिनेमा.. साधेपणा, उत्तम दिग्दर्शन, आणि सर्वात महत्वाचे परिणामकारक संगीत ह्याच सिनेमाच्या जमेच्या बाबी आहेत
4 Oct 2016 - 8:17 am | १००मित्र
भारुन टाकलंच होतं सिनेमानं. फक्त झेपला नाही.म्हणजे असही होवु शकतं वगैरे...
आता पुन्हा पाहणार आहे एकदा.