नर्मदे हर!
काही दिवसांपूर्वी एक मिपाकर आत्मशून्य नर्मदा परिक्रमेच्या उद्देशाने बाहेर पडला. पण काही कारणाने त्याची परिक्रमा पुरी नाही झाली. त्या निमित्ताने सध्या मध्य प्रदेशात रहाणार्या यशवंत कुलकर्णीने एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा ही सुंदर लेखमालिका लिहिली होती. ती वाचताना या नर्मदा परिक्रमेबद्दल कुतुहल जागं झालं. की हे काय प्रकरण आहे? अशी कोणती प्रेरणा आहे, की जिच्यामुळे लोक हजारों मैलांचं अंतर पायी चालून जायला तयार होतात? तसं खूप वर्षांपूर्वी गोनीदांचं 'कुण्या एकाची भ्रमणगाथा' वाचलं होतं. पण मध्यंतरीच्या वर्षात ते कुठेतरी मागे राहून गेलं होतं. यशवंतच्या लेखावर प्रतिक्रिया लिहिणार्यांनी जगनाथ कुंटे यांच्या 'नर्मदे हर' पुस्तकाचा उल्लेख केला होता. आयुष्यात कधी नर्मदा परिक्रमेला जाऊ न जाऊ, निदान प्रत्यक्ष जाऊन आलेल्याचे अनुभव वाचावेत म्हणून पुस्तकाचा शोध सुरू झाला. रत्नागिरीला गेले होते तेव्हा एका दुकानात चौकशी करता पुस्तक सध्या नाही मागवून देऊ असं सांगितलं. आता पुस्तकांच्या दुकानात जाऊन रिकाम्या हाताने परत कसं येणार? बाकी पुस्तक चाळायला सुरुवात केली. सहजच एका पुस्तकाकडे लक्ष गेलं. "नर्मदेच्या तटाकी आणि दक्षिणवारा" लेखक गो. नी. दांडेकर.
-नर्मदेच्या तटाकी-
या पुस्तकाबद्दल ना कधी काही ऐकलं होतं ना वाचलं होतं. पहिली आवृत्ती जुलै १९४९ मग जुलै १९८७ आणि आता तिसरी आवृत्ती जुलै २००९. मध्यंतरी सुमारे २० वर्षे हे पुस्तक बाजारात उपलब्ध नव्हतं. या पुस्तकात गोनीदांनी सुरू केलेल्या आणि अपुर्या राहिलेल्या नर्मदा परिक्रमेबद्दल लिहिलं आहे सुरुवातीच्या उण्यापुर्या ६७ पानांत आणि पुढे दुसर्या भागात म्हणजे 'दक्षिणवारा' मधे त्यांनी १९८४ साली केलेल्या दक्षिण भारताच्या प्रवसाचं प्रवासवर्णन आहे. दक्षिणवारासुद्धा नेहमीच्या रसाळ आणि प्रसन्न गोनीदां शैलीत आहे. पण आता त्याबद्दल काही लिहीत नाही.'नर्मदातटाकी' मधे विद्यार्थी वृत्तीने श्रीधरशास्री पाठक यांच्या धुळे इथल्या आश्रमात गुरुगृही राहात असताना केलेल्या अधुर्या नर्मदा परिक्रमेचा वृत्तांत आहे.
गोनीदां हा माणूस जातिवंत भटक्या. आश्रमात राहिल्यापासून म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून या भटक्यासमोर कोणीतरी नर्मदा परिक्रमेविषयी रोज काहीतरी बोलावे. मग गुरुजींनी नर्मदा परिक्रमा कोण करील म्हणून विचारताच गोनीदांमधला हा भटक्या जागा झाला आणि गोपाल तसाच परिक्रमेला निघाला. बरोबर किती सामान ते! दोन लंगोट्या, एक धोतर, एक तांब्या, एक सतरंजी आणि गीताभाष्य! नर्मदेपर्यंत पोचायला रेल्वेच्या तिकिटाचे पैसे? नव्हतेच! मग गुरूजींनीच सोय केली धुळ्याहून हर्दा, तिथून बसने हांडिया गाठले, आणि गोपालाची परिक्रमा सुरू झाली. नर्मदेच्या पहिल्या दर्शनाने मनी उमटलेले भाव गोनीदांनी अतिशय सुंदर रीतीने वर्णन केले आहेत. ठिकठिकाणची नर्मदेची रूपं, ती पाहून गोनीदांच्या मनात आलेले विचारतरंग, आणि त्यांचं वर्णन करताना ठिकठिकाणी सहजच आलेल्या काव्यपंक्ती, अभंगांच्या ओळी, सूक्ते, श्लोक, अक्षरशः वाचकाला मेजवानी आहे.
पहिल्याच दिवशी पहाटे नर्मदामय्याच्या आरतीने जाग आली आणि मग "ते अद्भुत रूप माझ्या समोर एखादी पैठणीची घडी उपलपावी, तशागत दृश्य केले" अचानक आकाशातला आणि नर्मदामय्यातला चैतन्याचा खेळ पाहताना सगळे विश्व चैतन्यमय आहे असा स्पष्ट बोध एखादा साक्षात्कार व्हावा तसा झाला आणि "अतीव आनंदाने दोन्ही हात वर उभवून गोपाल ओरडू लागला, "हरिरेव जगत| जगदेव हरि:|" एवढ्यात एका पंडताने "कहां के हो महाराज?" म्हणत गोपालाला परत नेहमीच्या जगात आणून सोडले. गोनीदां मग नर्मदामय्याला विनवू लागले, "मय्या मला पुन्हा दे ना मघाचा आनंद!" पण नर्मदामय्याच्या लहरींनी जणू उत्तर दिले, "पोरा, अजून खूप पहायचे आहे तुला. खूप उशीर आहे तिथे पोचायला. तुझी खूपशी भावंडे आहेत. दु:खी, दीन, दुबळी. त्या सगळ्यांना बरोबर घेऊन मगच मगच तू तिथे पोहोचू शकशील!"
मय्याच्या तटाकी शेकडों हजारों वर्षांच्या परिक्रमींच्या वाटचालीने तयार झालेल्या पावटीवरून चालताना गोपालाचे मन भरून यावे. या वाटेवरून किती ऋषीमुनी चालून गेले असतील, कधीतरी माझी ज्ञानोबामाऊली नामदेवाबरोबर कदाचित या वाटेवर चालली असेल, अशा विचारानी अद्भुत आनंद मिळावा. आणि अशातच एक चटचटत्या दुपारी नर्मदेच्या वाळवंटात एक ७/८ वर्षाचे नागवे लेकरू मय्याचं पाणी आणायला मातीची फुटकी मडकी घेऊन निघालेलं गोपालाने पाहिलं. अशा पेटत्या दुपारी हे काय करते आहे पाहूया म्हणून गोपाल त्याच्या पाठीमागे त्याच्या मोडकळल्या झोपडीपर्यंत गेला, तर झोपडीत लाज राखण्यापुरते पटकूर नेसलेली त्या पोराची आई बसलेली. या दोघांच्या मधे एका खापरात अर्धी वाळकी भाकरी आणि त्या भाकरीच्या तुकड्यासाठी मग त्या मायलेकरात तुंबळ द्वंद्व सुरू झाले. त्या क्षणी गोपालाला साक्षात्कार झाला मोठे बंगले आणि ही मायलेकरे दोन्ही एका समाजपुरुषाची अंगे आहेत. जोपर्यंत तुझा समाजपुरुष आपल्या या जीर्णशीर्ण अंगाचे निरीक्षण करण्याएवढा सावध बनत नाही, तोपर्यंत तुला मोक्षाच्या मागे लागण्याचा अधिकार नाही!
एक विलक्षण अस्वस्थता आली आणि इथून पुढे परिक्रमेबरोबर गोपालाचा आंतरिक प्रवास सुरू झाला. या अस्वस्थतेचं उत्तरही मय्याच्या तटाकी मिळालं. एका ठिकाणी एक काळ्या दगडांचं सुरेख शिल्पांनी अलंकृत केलेलं भव्य मंदिर होतं. त्यावर ते बांधणार्या शिल्पकाराचं नाव नव्हतं काही नाही. बाजूला एक मोडकळीला आलेली धर्मशाळा होती आणि त्यावर पाटी, "कोण्या इनामदाराने ही धर्मशाळा बांधवून तिचा हक्क स्वतः आणि स्वतःच्या वंशजांसाठी राखून ठेवला आहे." आणि त्या क्षणी गोनीदांना अस्वस्थतेचं उत्तर सापडलं. ज्या क्षणी व्यक्ती ही केंद्रबिंदू झाली त्या क्षणी समाजपुरुषाची उपासना थांबली. आणि मोक्षासाठी देवाकडे वशिला लावायला सुरुवात झाली. सगळं मलाच, मला एकट्यालाच पाहिजे! पण हे आमचे तत्त्वज्ञान नव्हेच. आमचे तत्त्वज्ञान आहे त्या हजारों वर्षांच्या मंदिरासारखं. मंदिर उभं केलं आणि बांधणारा शिल्पकार समाजपुरुषात अनाम मिसळून गेला. समाजरूप होण्यातच संतोष आहे!
इथून गोनीदांची परिक्रमा शांत चित्ताने पुढे सुरू झाली. वाटेत महेश्वर पाहून अहल्याबाईंची आठवण जागी झाली. वाटेत नर्मदामय्याची असंख्य विलोभनीय रूपे पाहून गोनीदांना जे वाटलं त्याची वर्णनं मुळातूनच वाचण्यासारखी. नर्मदामय्याच्या कडेच्या पायवाटेवरून कोणकोण महानुभाव गेले असतील त्यांची गोनीदांनी कल्पना केली आहे आणि त्या अनुषंगाने आपले रसाळ अक्षरधन वाचकांवर उधळले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ही परिक्रमा अर्धीच राहिली. पण शेवटी ते म्हणतात, ज्याला ज्याला शक्य आहे त्याने दर वर्षी काही काळ नर्मदामय्याच्या तटाकी घालवावा. ती आतुरतेने आपल्या लेकरांची वाट पहात आहे. ज्याला ऋजु अंतःकरण घेऊन तिजजवळ जाता येईल, अशा प्रत्येकाने तिच्या कुशीत काही काळ आसरा घ्यावा. आणि मग भारतीय संस्कृतीच्या पुनरुद्धाराचा मंत्र घेऊन समाजसन्मुख होऊन परत फिरावे. विचार करतेय, हे जमेल मला?
------------
नर्मदे हरः २
गोनीदांचं हे काहीसं अप्रसिद्ध पुस्तक वाचलं आणि तेवढ्यात आमच्या गावात मॅजेस्टिकचं पुस्तक प्रदर्शन आलं. तिथे जाऊन कुंटे यांचं पुस्तक शोधणं आलंच! एक पुस्तक दिसलं, नाव नर्मदे हर! उचललं तर लेखक श्री. रघुनाथ रामचंद्र गुण्ये. परत कुंटेंच्या पुस्तकाने हुलकावणी दिली. हातात आलेलं 'नर्मदे हर' थोडं चाळलं. विकत घ्यावं वाटलं आणि इतर पुस्तकांबरोबर तेही घरी आलं. घरी आल्याबरोबर गावाला गेलेल्या नवर्याला फोन केला, म्हटलं "गुण्ये नावाच्या माणसाचं पुस्तक विकत आणलंय." तो म्हणे, "त्या लेखकाचं पूर्ण नाव काय?" सांगितलं. अतर्क्य योगायोग असा, की नवरा म्हणाला, "अग ते आजच आपल्या घरी येऊन गेले." सासरे रहातात त्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवधे गावाला लागूनच, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वेरळ गाव आहे. तिथे हे लेखक श्री गुण्ये रहातात. आमच्या गावी आलेल्या एका मित्राला भेटायला ते त्या दिवशी आमच्या घरी येऊन गेले.
अत्यंत साधा निगर्वी मनुष्य. आयुष्यात सुरुवातीला काही वर्षे सिव्हिल इंजिनिअर म्हणून सरकारी नोकरी केली. मग परमार्थात लक्ष गेलं. स्वामी स्वरूपानंदांचं शिष्यत्व लाभलं. प्रपंच केला नाही तरी रूढार्थाने संन्यासही घेतला नाही. त्यांनी अध्यात्मावर आणखीही पुस्तकं लिहिली आहेत. पण मी वाचलेलं हे एकच "नर्मदे हर". १९८२-८३ साली त्यांना नर्मदा परिक्रमेची ऊर्मी आली. त्यामागे कोणताही भाविक, धार्मिक उद्देश नव्हता. पण एक आंतरिक मस्ती होती, जी त्यांना नर्मदामय्याकडे ओढून घेऊन गेली. पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि कळलं की कुंटे यांना जे पुस्तक वाचून नर्मदा परिक्रमा करायची प्रेरणा मिळाली तेच हे पुस्तक!
आताच्यासारखे परिक्रमा सुरू करताना गुण्ये यांनी धार्मिक विधी वगैरे केले नाहीत, तर नेमावर इथून सरळ चालायला सुरुवात केली! फक्त स्वतःपुरते काही नियम त्यांनी बांधून घेतले, ते म्हणजे, अंगावरचे २/३ काय ते तेवढेच कपडे, एक पंचा, एक पातळशी शाल, एक तांब्या, एक वही (दैनंदिनी लिहिण्यासाठी), आणि बॉलपेन इतकंच काय ते सामान! स्वतः स्वयंपाक करायचा नाही. त्यामुळे कोणी शिधा दिला तरी उपयोग नाही. शिजवलेलं शुद्ध, कांदालसूण नसलेलं अन्न मिळेल ते खायचं, चहा कॉफी प्यायची नाही. भिक्षा मागायची नाही. नर्मदामय्याचं स्नान करून रोज रुद्राची एकादष्णी करायची. पिण्यासाठी नर्मदेचं पाणी वापरायचं. रोख पैसे जवळ ठेवायचे नाहीत! नेमावरला पोचताना गुण्येंजवळ ४० रुपये राहिले होते, ते त्यांनी ब्रह्मचारी विश्वनाथजींच्या आश्रमाला दान केले आणि गुण्ये परिक्रमेला तयार झाले!
रोज साधारण १८/२० किमी अंतर चालून गुण्ये यांनी १६० दिवसांत सुमारे ३२०० कि.मी. अंतराची परिक्रमा पूर्ण केली. ९ जानेवारी १९८३ ला सुरू झालेली परिक्रमा १० जून १९८३ ला पूर्ण झाली. वाटेत अनेक अडचणी आल्याच. शक्यतः आश्रमातून रहायचं पण जिथे अशी सोय होणार नाही तिथे कुणा गृहस्थाने बोलावलं तर त्याच्या घरी रात्र काढायची. एकट्याने चालायला सुरुवात केली होती पण वाटेत कोणी ना कोणी साथीदार थोड्या थोड्या अंतरात मिळत राहिले. आजारपणातून शुश्रुषा करणारे कोणी कोणी भेटत राहिले, जेवायला वाढणारे हात भेटत राहिले. ज्या प्रदेशात वस्ती नही पण शिधा उपलब्ध होता तिथे अन्न शिजवून वाढणारे परिक्रमीही भेटत राहिले. अगदी भिल्लांच्या प्रदेशातही जेवणाची व्यवस्था झाली. एकही दिवस आपल्यावर उपाशी झोपायची वेळ आली नाही आणि नर्मदामय्यानेच हे घडवलं अशी त्यांची श्रद्धा. एका खेडेगावात उपाशी झोपायची वेळ आली होती, पण जिथे स्त्रियांनी परपुरुषासमोर यायचं नाही अशी पद्धत त्या जागीही कोणा स्त्रीने रात्रीच्या अंधारात पुढ्यात येऊन प्रसादाचा लाडू खाऊ घातला. असेही अनुभव आले.
परिक्रमेत आलेल अनेक अनुभव गुण्यांनी अतिशय सजगपणे घेतले आणि मग वाचकांसमोर ठेवले. संन्याशानी स्वतः भरपेट जेवावे पण अतिथीला काही देऊ नये, तर कोणा हरिजनाने शक्य तेवढे करून गुण्यांना काहीतरी खाऊ घालावे असे अनुभव. अन्न कोणत्या जातीच्या माणसाने दिले आहे याचा गुण्ये यांनी विचार केला नाही. अतिशय थंडी असेल त्यावेळी कोण्या आश्रमात साधूने दिलेले ब्लँकेट घेण्याचा विवेकीपणा दाखवला आणि जेव्हा कुडकुडणारा दुसरा माणूस पाहिला तेव्हा ते ब्लँकेट त्या माणसाला द्यायला एका मिनिटाचाही विचार केला नाही. ही निर्मळता आपल्याला संपूर्ण पुस्तकात ठिकठिकाणी भेटते. पावसच्या स्वामी स्वरूपानंदांच्या चेहर्यावर दिसणारी शांतता या त्यांच्या शिष्याच्या लिखाणात सगळीकडे दिसून येते.
शूलपाणीच्या जंगलात भिल्लांशी गाठ पडलीच. अगदी मातीचं मडकं आणि भोपळ्याचा तुंब्या काढून घेतलाच पण अंगावरची लंगोटीही काढून घ्यायचा प्रयत्न झाला. त्या भागात दारिद्र्य काय भयानक प्रमाणात असेल याची ही चुणूक. जंगलाच्या आधीच्या गावात डायरी ठेवल्यामुळे ती वाचली. आणि नंतर हे प्रवासवर्णन लिहायला ती उपयोगी पडली. पण आपलं सगळं सामान चोरीला गेलं म्हणून रडणारा "संन्याशी"ही त्यांना इथे भेटला! फक्त भगवे कपडे घालणार्या संन्याशांची गुण्यांनी माफक थट्टा केली आहे, त्याचवेळी मुलाला पाजणार्या एका भिल्ल स्त्रीला पाहून आपलं चित्त विचलित झालं होतं हा अनुभवही प्रांजळपणे सांगितला आहे.
परिक्रमा करणारे काय काय उद्देशाने परिक्रमा करतात याचं छान वर्णन या पुस्तकात आहे. तसंच वाटेत भेटणार्या अनेक साधू संन्याशांबरोबर झालेल्या चर्चा आपल्यापुढे ठेवल्या आहेत, पण हे कुठेही कंटाळवाणं होत नाही. तशीच अनेक व्यक्तींची लोभसवाणी चित्रं आपल्यापुढे उभी केली आहेत. गुण्ये यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथाचे वाचन केले आहे, मोठ्या प्रमाणात पाठांतर केले आहे. या सगळ्याची उदाहरणे पुस्तकात ठिकठिकाणी विखुरलेली आहेत. अनवाणी चालताना पायात घुसणारे काटे, आजारपण यांचं वर्णन करताना तीच निर्लेप वृत्ती जी त्यांना मोठेपणा देऊ पहाणार्या लोकांशी वागताना आहे. वाटेत लागलेल्या महेश्वर, मांडूगड यांचं सुरेख वर्णन आहे तसंच भकास आणि उपेक्षित अवस्थेत असलेल्या रावेरखेड इथल्या राऊंच्या समाधीचं वर्णन आहे. अमरकंटक, भेडाघाट यांचं वर्णन करताना गुण्ये यांची प्रासादिक शैली आणखीच सुंदर वाटू लागते.
"गृहस्वामिनी पंचविशीच्या आतली युवती. प्रसन्नवदना. परिक्रमावासी पाहून हरखलेली. चंद्रमौळी झोपडी. हातपाय पसरायला मिळेल एवढीच काय ती जागा.त्यात सगळा संसार." अशा प्रकारची छोटी छोटी चित्रदर्शी वाक्य सगळ्या पुस्तकभर विखुरलेली. वाटेत आलेल्या सगळ्या आश्रमांची आणि गावांची वर्णने या पुस्तकात आहेत. पुस्तक संपताना परिशिष्ट म्हणून या गावांची यादी आणि कोणत्या गावी किती चालून मुक्काम केला याचे तपशील आहेत. परिक्रमेच्या मार्गाचा उत्तम नकाशा आहे. परिक्रमेला जाऊ इच्छिणार्या लोकांना हे पुस्तक वाचून बरीच माहिती मिळेलच पण निव्वळ प्रवासवर्णन म्हणून वाचणार्यांची निराशा होणार नाही. मुळात व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर असल्यामुळे सरदार सरोवर प्रकल्पाकडे गुण्ये यांचं लक्ष गेलं नाही तर नवल! विस्थापितांच्या प्रश्नाबद्दल "एक मोठे शून्य नजरेसमोर उभे आहे." असं ते लिहितात. या योजनांचा लाभ काही लोकांना होईल पण जास्त लोकांना तोटाच आहे. लाभार्थींची काही जमीन विस्थापितांना द्यावी असा अभिनव उपाय ते सुचवतात, तेही इतक्या वर्षांपूर्वी! चालताना अनेक लोक धरणाची चौकशी करायचे आणि "नर्मदामैय्या प्रचंड पहाड फोडून येते, ती ही धरणे टिकू देणार नाही" असा विश्वास व्यक्त करायचे! ती सगळी मंडळी आज कुठे आहेत मय्याच जाणे!
या धरणांमुळे परिक्रमेचा मार्ग बदलला आहे, त्याचबरोबर या साध्यासुध्या लोकांच्या श्रद्धेलाही धक्का लागला असेलच. अनेक गावं, पेशवा सरकार राऊंची समाधी, जंगलं सारंकाही एक दिवस नर्मदार्पण होणार आहे, तेव्हा विस्थापितांबरोबरच त्या जंगलातले लहान ससे, भेकरं, या सार्यांचा आक्रोश कोणाच्या कानी पडणार आहे? तरीही नर्मदामैय्या वाहते आहे आणि आपल्या लेकरांना परिक्रमेला बोलावते आहे. या शेकडों हजारों वर्षांपूर्वीच्या रक्तातल्या हाकेला ओ देऊन कोणीतरी गुण्ये नाहीतर आत्मशून्य एक दिवस आपल्या अटींवर ती वाट चालू लागेल आणि परत आल्यावर आपले अनुभव आमच्याबरोबर वाटून घेईल. तोपर्यंत "नर्मदे हर!!"
प्रतिक्रिया
18 Mar 2012 - 2:06 pm | यकु
सुंदर!
दोन्ही पुस्तकांचा परिचय फार म्हणजे फारच लोभस झाला आहे.
नर्मदाकिनारचं जग एक पूर्णतः वेगळं जग आहे, ते बघण्यासाठी, जगण्यासाठी चितारण्यासाठी जेवढे गेले तेवढे स्वतःच निर्मळ झाले.
बाकी नर्मदा तुम्हाला बोलावते आहे अशी स्पष्ट चिन्हं आहेत बुवा.
18 Mar 2012 - 2:20 pm | धन्या
छान ओळख करुन दिली आहे पुस्तकांची.
बाकी "नर्मदे हर" आम्ही हौसेनं आणलं, आणि काही पाने पलटल्यानंतर कंटाळा आला. सारखं मी हे केलं, मी ते केलं, माझं असं झालं आणि तसं झालं हे किती वेळ मन लावून वाचणार म्हणा.
20 Mar 2012 - 3:57 pm | नगरीनिरंजन
दोन्ही पुस्तकांचा परिचय अत्यंत सुंदर आणि हृद्य भाषेत करून दिला आहेत.
गोनीदांचे "कोण्या एकाची भ्रमणगाथा" वाचले तेव्हा आवडले होते. त्यानंतर परिक्रमेबद्द्ल उत्सुकता निर्माण झाल्याने कुंट्यांचे नर्मदे हर वाचले आणि फार निराशा झाली.
धनाजीराव म्हणतात ते बरोबर आहे.
एका सन्यस्त वृत्तीच्या माणसाने सतत स्वतःबद्दल आणि सिगारेट, खाणे वगैरेबद्दल लिहावे हे खटकते. पुढील मुक्कामी मोतिचूर लाडू मिळण्याचे भाकित करण्याच्या प्रसंगानंतर मी पुस्तक वाचायचे सोडले.
प्रत्येकाचे मत असे असेल असे नाही त्यामुळे मिळाल्यास वाचावे.
26 Mar 2012 - 9:24 pm | मेघवेडा
दोन्ही पुस्तकांचा परिचय आवडला.
तंतोतंत.
माझ्या दृष्टीनं धार्मिक, आध्यात्मिक बाबी बाजूस ठेवून परिक्रमेकडे एक जीवनानुभव म्हणून पाहणे योग्य आहे. यशोनं मागं उल्लेखल्यापासून 'अंतर्यात्रा' वाचायचं आहेच, आता तू लिहिलेल्या या सुरेख परिचयानं गुण्यांचंही पुस्तक यादीत अॅडवलं आहे.
18 Mar 2012 - 2:44 pm | प्रचेतस
सुंदर परिचय.
गोनीदांचे 'कुण्या एकाची भ्रमणगाथा' वाचलेले आहेच. पण 'नर्मदेच्या तटाकी'चा पण आता सुंदर परिचय झाला.
19 Mar 2012 - 1:47 pm | मूकवाचक
+१
18 Mar 2012 - 3:11 pm | योगप्रभू
अवांतर - नर्मदा परिक्रमा अट्टहासाने पायीच करायची, असा काही नियम नाही. ज्येष्ठ नागरिक, सहकुटूंब अशा लोकांना ही परिक्रमा बसने करण्याची सोय आहे. त्यात चालण्याचाही आनंद/थकावट मिळते. पुन्हा हा प्रवास अत्यंत सुरक्षित आणि आनंददायी असतो. (भडोचला मात्र नर्मदामय्या समुद्राला मिळते तिथे नावेचा प्रवास रखडवणारा आणि त्रासदायक आहे.) बसनेही परिक्रमा करायची तरी साधारणपणे २१ दिवस लागतातच आणि दहा-बारा हजार रुपये माणशी खर्च येतो. इंदूरला एका मराठी कुटूंबाची ट्रॅव्हल एजन्सी आहे, जी ही परिक्रमा अत्यंत निगुतीने घडवून आणते. नुकतेच माझ्या नात्यातील २ ज्येष्ठ नागरिक त्यांच्या ४० जणांच्या ग्रुपसमवेत समाधानपूर्वक बसने परिक्रमा करुन आले.
18 Mar 2012 - 3:49 pm | श्रावण मोडक
पॉपकॉर्न खात असतानाच हा प्रतिसाद वाचला. थोडं पॉपकॉर्न उद्यासाठी शिल्लक ठेवले आहेत.
18 Mar 2012 - 3:58 pm | अन्या दातार
एकतर या लोकांना नव्हती कामं! कुठतरी भटकत बसायचे, अन नंतर पानं नासवत रहायचे. साध्यासुध्या गोष्टींचे उदात्तीकरण करत बसायचे, आपण केलं हे न सांगता उगीच "ही सगळी त्याची (इथे वरती बोट दाखवत आहे असे कल्पावे) कृपा!" म्हणायचे. झालेल्या भासांना "नर्मदामैय्याकी देन" म्हणायचे. कसला हिट्ट फॉर्म्युला! मग लोक वाचत बसतात, तुमच्या (मूळ लेखकांच्या) पाया वगैरे पडतात. धनही मिळते, मानही मिळतोच मिळतो.
18 Mar 2012 - 4:23 pm | यकु
भेदक निरीक्षण आहे रे अन्या तुझं.
अपनेकू भौत पसंद आया.
18 Mar 2012 - 7:58 pm | विश्वनाथ मेहेंदळे
शतकाची सुपारी घेतलीस काय रे ??
21 Mar 2012 - 3:49 am | अर्धवटराव
पटेश !!
अर्धवटराव
18 Mar 2012 - 5:02 pm | कलंत्री
बर्याच वेळेस चांगले पुस्तक वाचुन काहीतरी लिहावेसे वाटते आणि रोजच्या जीवनक्रमात विसरायालाही होते. येथे पुस्तक परिचय वाचूनच पुस्तक वाचावेसे वाटते आणि नकळतच नर्मदेच्या तिरावरून कधीतरी ज्यायला मिळेल का असाही विचार तरळून जातो, तुर्त नर्मदे हर.
18 Mar 2012 - 5:47 pm | चित्रेचा तारा
सर्वच लोकांना पुस्तकात लिहिले आहेत तसे अनुभव येतील हे शक्य नाही. काही कालावधी नंतर पुन्हा वाचन करुन बघा. कालावधी कितीही असु शकतो.
18 Mar 2012 - 5:56 pm | कवितानागेश
भारती पांडेंचे परिक्रमेवरचे पुस्तक देखिल वाचनीय आहे.
25 Mar 2012 - 1:52 pm | यशोधरा
भारती ठाकूर म्हणायचे आहे का? त्यांचे नर्मदा परिक्रमा = एक अंतर्यात्रा हे अतिशय सुरेख पुस्तक आहे.
18 Mar 2012 - 6:31 pm | स्पंदना
मला गोनिदा वाचायला आवडतात. अन काम धंदा नसतो म्हणुन कोणी नर्मदा वारी करता निघत असेल अस मला तर नाही वाटत. ही परिक्रमा हा बहुतेक " आपुला संवाद आपुणाशी" मध्ये मोडणारा प्रकार वाटतो मला. आपणच आपले नियम ठरवत काटेकोर पणे पाळत एखादा उपक्रम पुरा कराय्चा प्रयत्न करणे हा स्वतःला जोखायचाच भाग झाला. अर्थात हे माझ मत. उगा कोणालाही नावठेवुन मोकळ होउ नये इतकच.
23 Sep 2016 - 3:53 am | निनाद
अतिशय सुंदर प्रतिसाद दिला आहे. आवडला...
18 Mar 2012 - 7:39 pm | स्मिता.
दोन्ही पुस्तकांचा खूप छान परिचय करून दिला आहे. यकुनी लिहिल्यापासून या नर्मदा परिक्रमेबद्दल मनात खूपच कुतूहल निर्माण झालंय. आता हा लेख वाचून ते पुन्हा जागृत झालं :)
21 Mar 2012 - 4:15 am | चित्रा
सुरेख परिचय.
18 Mar 2012 - 9:40 pm | अत्रुप्त आत्मा
उत्तम पुस्तक परिचय... :-) पुन्हा एकदा सावकाश वाचणार आहे...
18 Mar 2012 - 10:16 pm | देविदस्खोत
मी नुकताच २१ दिवसांची बसने "नर्मदा परिक्रमा" करुन आलो आहे. एक अतिशय विल क्षण, आत्मिक, सुंदर असा अनुभव मिळाला......................!!!!!!!!! "नर्मदे हर"
18 Mar 2012 - 11:56 pm | रेवती
छान पुस्तकपरिचय.
पहिल्या पुस्तकाची ओळख करून देतानाचा शेवटच्या प्यारा ;) छान झालाय.
एसवंतरावांनी सहज म्हणून सुरु केलेल्या विषयाची चांगली आठवण ठेवलीयेस.
आशूची परिक्रमा पूर्ण होऊ शकली नाही हे माहीत नव्हते.
19 Mar 2012 - 12:07 am | कवितानागेश
आज सकाळी हे वाचले आणि संध्याकाळी 'गजर' पाहिला.
खोलवर हललंय काहीतरी...............
19 Mar 2012 - 8:38 am | स्पा
झकास पैसा तै.. पुस्तक परिचय फार सुदंर करून दिलेला आहेस
19 Mar 2012 - 9:14 am | अन्या दातार
सुदंर म्हणजे काय रे भाऊ??
(निरागस) अन्या
20 Mar 2012 - 4:15 pm | ५० फक्त
ते थ्रीडी का काय ते असतं रे, आपल्याला नाय कळायचं, जाउ दे.
19 Mar 2012 - 12:47 pm | सुहास..
चांगला परिचय आणि अपर्णाच्या शेवटच्या वाक्याशी सहमत !!
बाकी मला पण एकदा मुळा-मुठा प्रदक्षिणेला जायचे आहे, येतय का कोण सोबत ;)
19 Mar 2012 - 1:34 pm | धन्या
अपर्णातैंच्या प्रतिसादात
हे नाही वाचलं का?
जर कुणी सोबत असेल तर मग परीक्रमा करताना त्याच्याशी (किंवा तिच्याशी. हो, लिहिलेलं बरं नाही तर च्यायला स्त्रीपुरुष समानतावाले मोर्चा घेऊन यायचे हिंजवडी फेज २ ला.) गप्पा नाही का मारणार? मग "आपुला संवाद आपणाशी" कसा काय होणार?
बादवे, मुळा - मुठाची प्रदक्षिणा तितकीशी चांगली नसावी. (कारण माझ्या घरापासून जेमतेम २ - ३ मिनिटांच्या अंतरावर असणार्या मुठा नदीचं बाल्कनीतून होणारं सकाळचं दर्शन अजिबात चांगलं नसतं. ;) )
19 Mar 2012 - 1:49 pm | सुहास..
माझ्या घरापासून जेमतेम २ - ३ मिनिटांच्या अंतरावर असणार्या मुठा नदीचं बाल्कनीतून होणारं सकाळचं दर्शन अजिबात चांगलं नसतं >>>
कृपया " संध्याकाळच दर्शन " यावर ही प्रकाश टाकावा ;)
19 Mar 2012 - 2:16 pm | धन्या
संध्याकाळच्या दर्शनासाठी मुठा नदीच्या थोडे वरच्या अंगाला जो वेडावाकडा साकव आहे तिकडे जावे लागते.
या साकवाची निर्मीती जाणूनबुजून केली असावी असे वाटते. यदाकदाचित भविष्यात कुणी नर्मदा परिक्रमेच्या धर्तीवर मुठा परिक्रमा केलीच तर त्या साधकाच्या साधकवृत्तीचा खरेपणा तपासून पाहण्यासाठी या साकवाचा वापर करता येईल असा काहीसा उद्देश त्यामागे दिसतो.
19 Mar 2012 - 8:55 pm | गणेशा
दोन्ही पुस्तकांबद्दल छान लिहिले आहेच..
वाचुन आपण ही आता नर्मदेला भेट द्यावी असे वाटते आहे.
दूसर्या पुस्तकाबद्दल काहीच माहिती नव्हते.
आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात एकदातरी नर्मदेला फेरी मारण्याचे ठरवुन टाकले आहे.
20 Mar 2012 - 1:02 pm | अक्षया
छान !!!
दोन्ही पुस्तकांबद्दल छान लिहिले आहे..
माझा ओळखीचे एक जण जाऊन आले... अतिशय अवघड आहे हि परिक्रमा..
20 Mar 2012 - 1:10 pm | sneharani
दोन्ही पुस्तकांची ओळख छान करून दिली आहेस.
नर्मदा परिक्रमेवरच एखादं पुस्तक वाचायला हवं आता!!
:)
20 Mar 2012 - 2:39 pm | प्रीत-मोहर
मस्त पुस्तक्परिचय.
अभी वाचना मंगता .
20 Mar 2012 - 3:15 pm | स्वाती दिनेश
दोन्ही पुस्तकांचा परिचय आवडला ज्योती,
स्वाती
20 Mar 2012 - 5:06 pm | गणपा
अगदी असेच म्हणतो.
20 Mar 2012 - 5:34 pm | सुहास झेले
अप्रतिम... एकदम सुंदर पुस्तक परीक्षण. आता मागवतो लवकरचं :) :)
21 Mar 2012 - 8:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अतिशय छान अशा लेखनशैलीतल्या दोन्हीही पुस्तकांची ओळख आवडली.
अजून येऊ द्या.
-दिलीप बिरुटे
25 Mar 2012 - 8:51 am | पैसा
सर्व वाचक आणि प्रतिसादकांना धन्यवाद! इथे या दोन्ही पुस्तकांची ओळख करून द्यावी इतकाच मर्यादित उद्देश होता. धाग्याचा "काकू" होतोय की काय अशी पुसटशी शंका आली आणि श्रामोंनी पॉपकॉर्नसुद्धा आणले पण सुदैवाने तसं काही झालं नाही. धागा काश्मिरला जाऊन पोचला नाही याबद्दल प्रतिसाद देणार्या आणि न देणार्यांचे विशेष आभार! :D
25 Mar 2012 - 1:54 pm | यशोधरा
>> ही परिक्रमा हा बहुतेक " आपुला संवाद आपुणाशी" मध्ये मोडणारा प्रकार वाटतो मला >> +१
खूप सुरेख परिचय ज्योतीताई.
26 Mar 2012 - 8:36 am | बिपिन कार्यकर्ते
परिचय आवडले आहेतच.
कृपया ही दोन्ही पुस्तकं पाठवून देणे. ही विनंती नाही! ;)
26 Mar 2012 - 10:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> कृपया ही दोन्ही पुस्तकं पाठवून देणे.
दोन्हीही पुस्तकाची झेरॉक्स प्रत पाठविली तरी चालेल.
-दिलीप बिरुटे
27 Nov 2013 - 12:47 pm | विटेकर
गुण्येंचे पुस्तक मिळवून वाचण्यात येईल. गोनिदांचे भ्रमणगाथा शालेत असतानाच वाचले त्यामुळेच परिक्रमेची इच्छा झाली. यापूर्वी अनेकवेळा मय्याचे दर्शन घेतले पण " उठून चालावे दिगंतराशी" असे झाले नाही.
भारती ठाकूरांचे पुस्तक क्लासच ! तिच्याशी पत्रव्यवहार ही केला आहे. तिच्या सखीसारखा संवाद जमावा हे पण एक इच्छा !
जगन्नाथ कुंटे मात्र अगदीच निराश करतात. त्यांची पुढची पुस्तके ही वाचणेबल नाहीत.
27 Nov 2013 - 2:20 pm | राजेंद्र मेहेंदळे
फक्त नक्कल हाती यावी आणि अस्सल नंतर माहीत व्हावे तसे प्रथम कुंट्यांची पुस्तके हाती पडली आणि नर्मदा परीक्रमेविषयी कुतूहल जागे झाले.
तिकडे जाणे लवकर जमेलसे वाटत नाही म्हणजे आता गोनीदा आणि गुण्यांची पुस्तके मिळवुन वाचणे आले.
29 Nov 2013 - 4:28 pm | अनिल तापकीर
गुणेंचे पुस्तक वाचायचे आहे बाकी जगन्नाथ कुंटे, सुहास लिमये,भारती ठाकुर, गोनिदां इत्यादिंची वाचली आहेत छान परिचय नर्मदे हर हर ........
29 Nov 2013 - 4:54 pm | अग्निकोल्हा
नक्कीच! कारण सरदार सरोवर मधूनच एक पन्नास मीटर जाडिचा केनोल काढला आहे जो ओलांडल्या शिवाय प्रदक्षिणा करताच येत नाही. आताअमरकंटकला नदीचे विविध ओहोळ थोड्या वेग्वेग्ळ्या मार्गाने प्रवाहित असताना यातील एकही ओहोळ चुकुनही ओलांडला जाऊ नये याची श्रध्दाळु लोक प्रचंड काळजी घेत असताना हा भला थोरला अखंड वर्ष वाहता प्रवाह ओलांड़ने अपरिहार्य ठरते तेथेच प्रदक्षिणा खंडित झाल्याचा भाव निर्माण होतो असे एका परीचितानी म्हट्ल्याचे स्मरते.
29 Nov 2013 - 6:14 pm | परिंदा
मी जेव्हा कुंट्यांचे पुस्तक वाचले होते तेव्हा देखील हाच प्रश्न मनात आला होता.
जिथे नर्मदेची पाण्याची चिंचोळी पट्टी देखील ओलांडायची नाही, प्रवाहापासुन दुर असलेल्या ज्या कुंडात नर्मदा प्रकटली होती ते कुंड(मांडव गढ), त्यात स्नान देखील चुकवायचे नाहीत असे नियम आहेत, मग नर्मदेतून काढलेले कालवे, पाईपलाईन्स वगैरे ओलांडले तर चालतील का?
29 Nov 2013 - 8:28 pm | म्हैस
असा काही नियम नहिये. बस ने सुधा परिक्रमा करता येते . पण जे अनुभव चालत परिक्रमा करण्यामध्ये येतात ते पायी करण्यामध्ये येत नाहीत . कारण हि १ अध्यात्मिक परिक्रमा अहे. trip नव्हे .
पैसाताई … जगन्नाथ कुंटेन ची ४ अत्यंत सुंदर आणि अद्भुत पुस्तके खाली दिलेल्या क्रमाने वाचलीत तर वेगळाच आनंद मिलेल. एकदा पुस्तक हातात घेतल तर खाली ठेववणार नहि.
१. नर्मदे हर
२. साधनामस्त
३. धुनी
४. नित्य निरंजन
पुस्तकं मिळण्यात अडचणी येत असतील तर तुम्ही couriar करवून मागू शकता .
22 Sep 2016 - 3:11 pm | पथिक
'नर्मदे हर!' हे शीर्षक वाचून थबकलो अन पुढचं वाचलं. जगन्नाथ कुंटेंच्या पुस्तकाने माझीपण निराशा केली होती. पण गोनिदांचे आणि गुणे यांचे पुस्तक वाचणार आता.
22 Sep 2016 - 5:52 pm | बोका-ए-आझम
यकुंच्या नर्मदा परिक्रमेविषयीच्या लेखमालेचा मी फॅन आहेच. मागे खुशी यांनी लिहिलेली लेखमालाही छान होती. मला स्वतःला ने्मदेची ओढ लागते वगैरे गोष्टी पटायच्या नाहीत पण याच वर्षी मे महिन्यात काही कामानिमित्त भरुचला नर्मदेच्या काठावरच राहायचा योग आला आणि नर्मदेच्या एवढ्या जवळून झालेल्या दर्शनाने भारावून गेलो आणि परिक्रमा केल्याशिवाय बादलीला लाथ मारायची नाही हे ठरवलं. आता याला ओढ म्हणा किंवा काही इतर नाव द्या. पण आता मी नर्मदेची ओढ वाटते असं म्हणणाऱ्यांकडे गांभीर्याने पाहतो. बाकी जेव्हा कधी परिक्रमा करीन तेव्हा नदी न ओलांडणं वगैरे ' शास्त्रशुद्ध ' फालतूपणा फाट्यावरच मारणार आहे हे ठरवलेलं आहे.
28 Sep 2016 - 3:01 pm | सुखी
हे जरा विस्कटुन सांगाल काय?
30 Sep 2016 - 1:06 am | आदूबाळ
Kicking the bucket
23 Sep 2016 - 3:55 am | निनाद
गुण्ये वगळता उल्लेखलेली पुस्तके वाचली आहेत.
पैसाताईंनी पुस्तकांचे खुप छान विवेचन केले आहे.
मैय्या मला ही कधीतरी बोलावणार अशी आशा आहे...
23 Sep 2016 - 6:54 am | लीना कनाटा
नर्मदे हर पुस्तकाचे लेखक नक्की कोण आहेत?
यशवंतच्या लेखावर प्रतिक्रिया लिहिणार्यांनी जगनाथ कुंटे यांच्या 'नर्मदे हर' पुस्तकाचा उल्लेख केला होता.
एक पुस्तक दिसलं, नाव नर्मदे हर! उचललं तर लेखक श्री. रघुनाथ रामचंद्र गुण्ये. परत कुंटेंच्या पुस्तकाने हुलकावणी दिली.
23 Sep 2016 - 8:32 am | पैसा
ही एका नावाची दोन वेगळी पुस्तके आहेत. कदाचित अजूनही असतील.
23 Sep 2016 - 2:59 pm | भटकीभिंगरी
नर्मदे हर.. नाव वाचलम्हनुणुन लेख वाचायला सुरवात केलि.नर्मदा परिक्रमा करायचे माझ्य्झ्झ्हि मनात आहेच. खुप छान पुस्तक परिचय करुन दिलात. अस काहि वाचल की मनातली परिक्रमेची इछा परत जाग्रुत होते. पाहुया केव्हा योग येतो ते.
23 Sep 2016 - 2:59 pm | भटकीभिंगरी
नर्मदे हर.. नाव वाचलम्हनुणुन लेख वाचायला सुरवात केलि.नर्मदा परिक्रमा करायचे माझ्य्झ्झ्हि मनात आहेच. खुप छान पुस्तक परिचय करुन दिलात. अस काहि वाचल की मनातली परिक्रमेची इछा परत जाग्रुत होते. पाहुया केव्हा योग येतो ते.
23 Sep 2016 - 2:59 pm | भटकीभिंगरी
नर्मदे हर.. नाव वाचलम्हनुणुन लेख वाचायला सुरवात केलि.नर्मदा परिक्रमा करायचे माझ्य्झ्झ्हि मनात आहेच. खुप छान पुस्तक परिचय करुन दिलात. अस काहि वाचल की मनातली परिक्रमेची इछा परत जाग्रुत होते. पाहुया केव्हा योग येतो ते.
23 Sep 2016 - 7:00 pm | कंजूस
गुण्येंचं वाचीन मिळालं की.दक्षिणवारा आहे माझ्याकडे पण गोनिदांनी केलेल्या ग्रुप टुअरचे वर्णन आहे .खास नाही.
23 Sep 2016 - 7:18 pm | पद्मावति
अतिशय सुरेख परिचय.
28 Sep 2016 - 12:15 pm | विचित्रा
दांडेकर, कुंटे, गुण्येे तिन्ही परिक्रमा वाचल्या, नि वेगवेगळ्या कारणांसाठी आवडल्या...श्रद्धाळू नसूनही..
28 Sep 2016 - 3:41 pm | पामर
गेल्या काही वर्षात नर्मदा परिक्रमा करुन आलेले,परिक्रमेला जाउ इत्छिणारे यांची संख्या विशेष वाढ्लेली जाणवते आहे. अनेक लोक अमुक दिवसात परिक्रमा पुर्ण केली, भिक्षा मागुन वा शिजवुन कशी खाल्ली, शुलपाणिच जंगल तिथले आदिवासी,लुटारु, आलेले दैवी अनुभव- नर्मदा मैयाचे दर्शन/ अनुभुती, न मागता मिळालेले अन्न वा भोजन,अश्वत्थामा दिसणे वगैरे वगैरेचे अनुभव सांगत असतात. नक्की हा प्रकार कधी सुरु झाला? आपल्याकडे तो लोकप्रिय गो.नि.दां मुळे झाला की आधिपसुनच हे प्रचलित होते?? नर्मदे सारखी अजुन कोणत्या नदीची अशी परिक्रमा असते का ?
28 Sep 2016 - 7:29 pm | पैसा
परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा. इतर कोणत्या नड्यांच्या परिक्रमेबद्दल माहिती मिळत नाही. कृष्णा नदीच्या परिक्रमेबद्दल काही त्रोटक उल्लेख दिसतात, पण नर्मदेइतक्या प्रमाणात नाही. इंदौर आणि नर्मदेच्या काठी इतर बर्याच भागात मराठ्यांची सत्ता असल्याने नर्मदा परिक्रमा महाराष्ट्रात बरीच प्रचलित असावी असा अंदाज. बाकी काशी यात्रा वगैरेही पूर्वापार पायी करत असत. तसाच नर्मदा परिक्रमेचा उगम कधी झाला सांगता येणार नाही. शूलपाणीच्या जंगलात भिल्ल लोक रहातात ते स्वत;ला एकलव्याचे वंशज समजतात. आणि एकलव्याने पांडवाना लुटले होते तेव्हापासून आपल्याला लोकाना लुटायचा हक्क आहे असे सांगतात. कथा सोडून दिली तरी परिक्रमेची चाल खूप जुनी आहे हे नक्की.
30 Sep 2016 - 2:10 am | रुपी
सुंदर परिचय!
30 Sep 2016 - 2:41 am | सही रे सई
पैताई, खुप सुंदर लिहिलं आहेस ग.
ती दोन्ही पुस्तक जेव्हढी चांगली असतील तेव्हढाच तुझा पुस्तक परीचय पण ओघवता आणि एकदा सुरु केला की वाचतच रहावा असा झाला आहे. लेख संपला की वाटत की अरेच्चा, संपला सुधा, अजून असायला हवा होता.
30 Sep 2016 - 4:46 am | खटपट्या
चांगला लेख