ब्रह्मदेश भाग १ : प्रस्तावना भाग २ : मंडले भाग ३ : बगान भाग ४ : रंगून भाग ५ : लोकजीवन
थाईलँड भाग ६ : बँकॉक व परिसर भाग ७ : सुखोथाई भाग ८ : उत्तरसीमा
कंबोडिया भाग १० : नॉम पेन्ह व परिसर भाग ११ : अंगकोर वट
या भागात एका अनोख्या भागाची सफर. मेकाँग नदीच्या काठी एक संगमावर ब्रह्मदेश, सयाम व लाओस हे तीन देश एकत्र येतात, त्या गोल्डन ट्रँगल किंवा सुवर्ण त्रिकोण प्रदेशाची ओळख. सुवर्ण त्रिकोण हे नाव खरे अंमली पदार्थाच्या व्यापाराच्या संदर्भात दिलेले आहे. अफगाणिस्तान इराण भागात तसेच या प्रदेशात ओपिअम ची लागवड मोठ्या प्रमाणावर होत असे. आजही बराच प्रदेश बेकायदेशीर पिक घेतो. यासंदर्भात मध्य आशियास ‘गोल्डन क्रेसेंट’ व आग्नेय आशियात ‘गोल्डन ट्रँगल’ अशी संज्ञा प्रचलित आहे. मला या प्रदेशाचे विशेष आकर्षण होते ते त्रिराष्ट्रसीमाबिंदूमुळे. असे विशेष सुंदर 'ट्रायपॉईंट' जगात अगदी थोडे.
मेकाँग नदी लाओस व ब्रह्मदेशाच्या सीमेवरून वाहते तर रुआक नदी सयाम व ब्रह्मदेशाला अलग करते. यांच्या संगमावर हे तीन देश एकत्र येतात. संपूर्ण प्रदेश डोंगराळ व आदिवासी आहे. अलीकडच्या काळात पर्यटनावर डोळा ठेऊन काही विकास झाला आहे. विशेषतः रस्ते अगदी कौतुक करण्यासारखे प्रशस्त व उत्तम दर्जाचे आहेत. ब्रह्मदेश व लाओस दोन्ही ठिकाणी नवीन कॅसिनो चा प्रयोग बराच यशस्वी झालेला दिसतो. ओपिअम चा इतिहास व व्यापाराची कहाणी सांगणारी दोन उत्तम संग्रहालये, काही मोठी मंदिरे, ड्यूफ्री झोन ही नव्याने विकसित इतर पर्यटन आकर्षणे.
येथील प्रवासाची सुरुवात च्यांग राई या शहरापासून केली, प्रवासाची सोय, वेळ व इतर कारणे लक्षात घेता गाडी भाड्याने घेणे उत्तम पर्याय वाटला व तो पुढे अतिशय योग्यही ठरला. गाडी म्हणजे मोठेच धूड मिळाले, पण एक वेगळेच धाडस (आता सगळे पार पडल्यावर नुसतं एका शब्दात लिहायला बरं वाटतंय पण एकंदरीत दुर्गम प्रदेश, तोही परदेशात, त्यात आंतरराष्ट्रीय सीमोल्लंघन व एकट्याने हे पार पाडणे म्हणून 'धाडस') ड्राइव्ह काही फार अशी नाही, दिवसभरात साधारण दोनशे किलोमीटर. पुढे नावेतून सीमापार लाओस मध्ये, तेथे स्थानिक वाहन. नावेतूनच ब्रह्मदेश व परत सयाम. अतिशय शांत प्रदेश, नुकताच पावसाळा संपत आल्याने चहूकडे हिरवीगार भाताची खाचरे, अधेमधे गढूळ ओहोळ व महानदी मेकाँग! अत्यंत सुंदर प्रदेश चित्रातून पहा...
संदर्भासाठी नकाशा
सफरीस सुरुवात, उत्तम हवामान व सुंदर निसर्ग, मी आणि हे धूड
वाटेवरचे ओहोळ, भातशेती व सागवानाची लागवड
"रस्ता" चित्रलेखात व स्पर्धेच्या अवांतर सदरात पूर्वप्रसिद्ध चित्र
उत्कृष्ठ रस्ते, नक्कीच येथील सरकारचे कौतुक.
वाटेवरचे सुखावणारे दृश्य
सायामचे हे उत्तरेकडील प्रवेशद्वार, श्री गणेशाची स्थापना, उजव्या बाजूस मेकाँग हात जोडून उभा आहे व त्याच्या भोवती असलेले तीन कॅटफिश (शिंगळा) हे तीन देशांचे प्रतीक. या नदीत निवास करणारा हा सर्वात मोठा जलचर होय. मागे मेकाँग चा प्रवाह व दूरवर ब्रह्मदेश टेकड्या
संदर्भासाठी नकाशा
सुवर्णत्रिकोण : सयाम मधून घेतलेले चित्र, उजवीकडे वर लाओस ची भूमी, मेकाँग, डावीकडे दोन नद्यांच्या मध्ये ब्रह्मदेश, व खाली सयाम
सुवर्णत्रिकोण : सयाम मधून लाओस भूमीचे दृश्य, दोन देशांना अलग करणारी मेकाँग.
सुवर्णत्रिकोण : सयाम मधून ब्रह्मदेश भूमीचे दृश्य, दोन देशांना अलग करणारी रुआक.
सीमापार लाओस मध्ये जाण्यासाठी नांव तयार करताना
नदीतून लाओस ची भूमी
नदीतून सयाम ची भूमी
लाओस भूमीवरून राष्ट्रत्रय, डावीकडून बुद्धमूर्तीपर्यंत सयाम, दूरवरचे पर्वत व मध्यभाग ब्रह्मदेश, उजवीकडे लाओस
लाओसमध्ये स्वागत
मोठ्या शिळेवर बांधलेला लाओ स्तूप
लाओ पारंपरिक घर
नदीवर अवलंबित दैनंदिन ग्रामीण जीवन
लाओसची प्रसिद्ध कोब्रा वाईन
बाजारातील एक दृश्य, काही रेशमी वस्त्रे वगळता बराचसा माल चीन वरून आलेला. इथे विणली जाणारी रेशमी वस्त्रे मात्र विशेष!
ब्रह्मदेशाकडे जाताना, पलीकडल्या काठावर सयाम
व नंतर ब्रह्मदेश
ब्रह्मदेश : अनेक आकर्षक बौद्ध धर्मस्थळे व हिरवाईने नटलेला प्रदेश
ब्रह्मदेश : आकर्षक बौद्ध धर्मस्थळे व हिरवाई
पुनश्च वाटेवरची नयनरम्य दृश्ये
काही अंतरावर ब्रह्मदेशातील तचिलेक व सयाम मधील में साई ही एकमेकात बेमालूमपणे मिसळून गेलेली शहरे. मधून फक्त एक बारीक रूआक नदी वाहते.
हाऊस ऑफ ओपिअम संग्रहालय: येथे ओपिअमचा इतिहास, ते पिकवणारे आदिवासी, त्यांची जीवनशैली, ओपिअम युद्धाच्या कथा, स्थानिक दंतकथा अशी बरीच रंजक माहिती मिळते.
ओपिअमच्या जन्माची स्थानिक दंतकथा
नशापानाचे 'सर्वात लाभदायी' आसन, आखा वनवासी
येथील निसर्गच इतका सुंदर आहे की या लोकांनी आणखी नशा का शोधून काढली हे ते लोकच जाणोत. असो, या नितांतसुंदर प्रदेशाची एक ओळख असा या लेखमालेचा उद्देश बऱ्यापैकी पूर्ण होत आला आहे. पुढे कंबोडिया विषयी चित्रलेखांबरोबर लेखमालेची सांगता.
अवांतर: नयनरम्य आंतरराष्ट्रीय सीमांच्या विषयाच्या निमित्ताने, अजून एक असाच निसर्गाच्या कुशीतला 'ट्रायपॉईंट', त्या प्रदेशाविषयी सविस्तर पुन्हा केव्हातरी...
डावीकडे अर्जेंटिना, पुढे इग्वाझू व पराना नदीचा संगम, पराना नदीच्या पलीकडे उजव्या बाजूस पॅराग्वे, चित्र ब्राझीलच्या भूमीवरून काढल्याने खालील भाग ब्राझील
संदर्भासाठी नकाशा
अन्य भटकंती : दक्षिण अमेरिका - पेरू, दक्षिण अमेरिका - अमेझॉन ब्राझील, मध्य अमेरिका - ग्वाटेमाला होंडुरास एल साल्वाडोर बेलीझ, ईशान्य भारत - मणिपूर, ईशान्य भारत -त्रिपुरा, आग्नेय आशिया - ब्रह्मदेश थाईलँड लाओस कंबोडिया मध्य व पश्चिम आशिया - उझबेकिस्तान ताजिकिस्तान अफगाणिस्तान अझरबैजान तुर्कस्तान
प्रतिक्रिया
14 Jul 2016 - 12:29 pm | एस
अतिशय नयनरम्य. प्रत्येक भागात जर त्या प्रदेशाचा नकाशा आणि पूर्ण देशाच्या तुलनेत तो भाग कुठेशिक येतो हे नकाशाद्वारे दाखवले असते तर बरे झाले असते.
हे दोन्ही ट्रायपॉइंट छान आहेत.
14 Jul 2016 - 12:30 pm | एस
अतिशय नयनरम्य. प्रत्येक भागात जर त्या प्रदेशाचा नकाशा आणि पूर्ण देशाच्या तुलनेत तो भाग कुठेशिक येतो हे नकाशाद्वारे दाखवले असते तर बरे झाले असते.
हे दोन्ही ट्रायपॉइंट छान आहेत.
14 Jul 2016 - 9:10 pm | समर्पक
सुधारणा केली
14 Jul 2016 - 1:28 pm | अभ्या..
रुआक नदीचा फोटो प्रचंड आवडलाय.
कोब्रा वाईन काय प्रकार आहे. अॅक्चुअली साप आहेत की काय त्या बाटल्यात? की प्रिंट आहे चित्र?
बाकी लाल, सोनेरी आणि हिरव्या रंगसंगतीतले सारेच भारी दिसतेय.
15 Jul 2016 - 8:47 am | समर्पक
कोब्रा वाईन हा आग्नेय आशियातील खास प्रकार. विषारी साप व कीटक दारू मध्ये मुरत ठेवतात. हे विषारी असले तरी अल्कोहोल मुळे विषाची प्रथिने निष्क्रिय होतात व तसेही हे विष रक्तात मिसळले तरच अपाय करते, पचन संस्था ही पचवू शकते. हे साप व विंचू असेच मुरत ठेवलेलं आहेत. याचा औषध म्हणूनही उपयोग करतात, विशेषतः बाबा बंगाली टाईप 'शक्ती वर्धक' म्हणून...
16 Jul 2016 - 5:54 pm | अभ्या..
वाचले नेटवर माहीती काढून.
पहायचे सुध्दा झेपणार नाही मला असले काही.
14 Jul 2016 - 1:37 pm | सिरुसेरि
अतिशय सुंदर फोटो व प्रवास लेख
14 Jul 2016 - 9:25 pm | राघवेंद्र
+१
14 Jul 2016 - 2:24 pm | शिद
तुमचे प्रवासवर्णन तर छान असतंच पण फोटो अतिशय सरस असतात. प्रत्येक फ्रेम अतिशय काळजीपुर्वक घेतली असते.
14 Jul 2016 - 9:30 pm | यशोधरा
फोटो सुरेख. प्रदेशांचे वर्णन, तिथल्या लोकांसोबत वावरण्याचे अनुभव आले असतील तर त्याबद्दल लिहिले तर अजून उत्तम होईल, असे सुचवते.
15 Jul 2016 - 3:58 am | समर्पक
धन्यवाद, एक प्रयत्न : http://www.misalpav.com/node/35583
14 Jul 2016 - 9:34 pm | अजया
अप्रतिम फोटो आणि अनवट जागांची माहिती असा अलभ्य लाभ असतो तुमची लेखमाला म्हणजे.
14 Jul 2016 - 10:08 pm | प्रचेतस
अद्भूत आणि अनोखी भटकंती.
16 Jul 2016 - 8:06 am | सुधीर कांदळकर
वरील एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे खरोखरच प्रत्येक प्रकाशचित्र डोळ्याचे पारणे फेडणारे आहे. त्रिकोण मला भुरळ घालताहेत. अनवट ठिकाणी फिरतांना सुरक्षिततेला धोका कधी जाणवला का? खासकरून अंमली पदार्थांच्या विळख्यातल्या प्रदेशात? सहकुटुंब जावे की एकटेच जावे? म्हणजे आपल्या मताप्रमाणे % रिस्क काय असेल? प्रसिद्ध ठिकाणांपेक्षा जास्त तर असेलच. पण दुप्पट, तिप्पट?
16 Jul 2016 - 8:50 pm | समर्पक
या भागात तशी रिस्क वाटली नाही. अगदी खरे सांगायचे तर यापेक्षा अमेरिकेतील जुन्या मोठ्या शहरांची डाऊनटाऊन अधिक भीतीदायक व धोकादायक वाटली. येथील लोक शहरीकरणापासून दूर असल्याने हपापलेले नाहीत, त्यामुळे बँकॉक सारख्या मोठ्या पर्यटन स्थळी आढळणारी फसवणुकीची वृत्तीही फार दिसून आली नाही. ब्रह्मदेशात या सीमा भागात थोडे जपून राहावे लागते, मोठ्या शहरात नाही. पण कोणी सहकुटुंब फारसे दिसले नाही.
अंमली पदार्थाचा थेट संबंध यायचा प्रसंग फार मजेशीर, शाकाहारी खाणे शोधताना कधीकधी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे पिझ्झा. इथल्या काही ग्रामीण भागातही, विशेषतः कंबोडियामध्ये, पिझ्झा विकत असलेले पाहून तसे आश्चर्य वाटले. मेनू कार्ड वरची नावे ही मजेदार, 'हॅपी पिझ्झा', 'हर्ब पिझ्झा' अशी. थोडक्यात गांजा व तत्सम टॉपिंग असलेला हा पिझ्झा. 'तत्सम' मध्ये काय काय येते याची कल्पना नाही, व त्यामुळे किती 'हॅपी' व्हाल हे सांगता येत नाही. पण माजखोर पाश्चात्य पर्यटकांमुळे हे एकंदर फार फोफावले प्रकरण वाटले. त्यांना तसेही बाकी कशाशी देणेघेणे नसते, स्वस्तात 'हॅपी' होण्यासाठी महिनोन्महिने इथे पडलेले असतात. पण असे पदार्थ विकून लुटण्याचे प्रकार घडत असावेत, नशा व गुन्हेगारी तसेही एकामागोमाग एक येतातच.
16 Jul 2016 - 9:05 am | बोका-ए-आझम
आणि तितकेच अप्रतिम फोटो! रस्ते तर फारच सुंदर दिसताहेत. असे रस्ते आपल्याकडे कधी येतील? असो. एकमेकांत मिसळून गेलेल्या शहरांबद्दल वाचायला आवडेल. त्याबद्दल लिहावे अशी विनंती.
16 Jul 2016 - 10:22 am | पद्मावति
सुरेख!
16 Jul 2016 - 4:48 pm | अभिजीत अवलिया
ब्रह्मदेश म्हणजे एक मागास देश असेल असे मला अगोदर वाटले असते. पण ह्या लेखातले रस्ते आणी मागच्या एक भागातील रंगून चे रस्ते पाहून हा देश खूप पुढे जाईल असे वाटतेय.