ब्रह्मदेश भाग १ : प्रस्तावना भाग २ : मंडले भाग ३ बगान भाग ४ : रंगून
थाईलँड भाग ६ : बँकॉक व परिसर भाग ७ : सुखोथाई भाग ८ : उत्तर सीमा
लाओस भाग ९ : सुवर्णत्रिकोण
कंबोडिया भाग १० : नॉम पेन्ह व परिसर भाग ११ : अंगकोर वट
ब्रह्मदेशाविषयी काही विशेष माहिती या भागात. एकंदर फिरण्यासाठी हा देश सुंदर आहेच त्याचप्रमाणे सामान्य जीवनातील सांस्कृतिक पैलूही विशेष अनुभवण्यासारखे आहेत. लेखमालेचे नाव 'बृहन्भारत' असण्याचे हे कारण, या सर्व प्रदेशाचा भारताशी असलेला अतूट संबंध अशा अनुभवात अधोरेखित होतो. भौगोलिक सीमा या सतत बदलतच असतात परंतु सीमांपलिकडे जगातील एका महान संस्कृतीच्या प्रभावळीने सजलेल्या लोकजीवनाचे हे सहज परंतु शक्य तितक्या वेगवेगळ्या बाजूंनी दर्शन.
धर्म : हिंदू-बौद्ध संस्कृतीचा जिवंत मिलाफ म्हणजे ब्रह्मदेश. बौद्ध धर्माचे प्रमुख तीन पंथ, महायान सर्वात मोठा व इराण च्या पूर्वेकडे सर्वत्र कमी अधिक प्रमाणात टिकून आहे. वज्रयान उत्तरेकडे तिबेट मंगोलिया चीन कोरिया येथे विकास पावला. तिसरा हीनयान भारतात दक्षिणेत प्रसार होत श्रीलंकेत पोहोचला व तेथून राजकीय संबंधातून याची बीजे ब्रह्मदेशात पोहोचली. इथे तो चांगलाच फोफावला व जतनहि करण्यात आला. इथूनच तो पूर्वेकडे पसरला. यालाच थेरवाद असेही म्हणतात. आजही मोठ्या प्रमाणात बौद्ध भिख्खुंचे जीवन येथे बालक-युवक आजीवन व्रतासाठी स्वीकारतात. त्यांचा समाजात मानही खूप मोठा असतो. जीवनशैलीत कालसापेक्ष खूप कमी बदल केलेले हे भिख्खू सकाळी भिक्षेसाठी जाताना भल्या मोठ्या रंगांमध्ये नित्य दिसतात. कुठेही बौद्ध भिख्खू समोर आले तर प्रत्येक नागरिक दोन्ही हात जोडून आदर दर्शवतो.
मंदिराबाहेरील ओळखीची फुले… ओळखीचा दरवळ …
फुले विकणारी एक विक्रेती
मंडले येथील महामुनी मंदिराबाहेरील एक दृश्य
समाजकारण : बऱ्याच प्रमाणात अल्पसंतुष्ट, तुलनेत गरीब, धार्मिक व आत्ममग्न असे काहीसे ब्राह्मी समाजाचे वर्णन करता येईल. बौद्ध संन्याशांचाही सक्रिय समाजकारणात सहभाग. सत्ता उलथवून टाकण्याची क्षमता, इच्छाशक्ती व कार्यशक्ती याचा अलीकडेच घडविलेला प्रयोग हे आधुनिक समाजाचे विशेष. सामान्यतः शांत परंतु वेळ आल्यास पश्चिमेकडच्या धर्मांध मुस्लिमांना त्यांच्याच भाषेत सुस्पष्ट उत्तर देऊन त्यांची बौद्ध देशातील जागा दाखवून देणारा सजग, सक्षम समाज. पूर्वेकडे अधिक कल राहिल्याने डावीकडे झुकणारी मानसिकता. पूर्वापार चालत आलेली राजेशाही ब्रिटिशांनी संपवली तरीही त्या सवयीतून न सावरलेला समाज, त्यामुळे 'सत्तेच्या हाती सेना' नसून 'सेनेच्या हाती सत्ता' हे वास्तव. तथाकथित लोकशाही असली तरीही सेनेच्या २५% जागा दोन्ही सभागृहात राखीव असतात. अलीकडच्या अर्थव्यवस्थेतील बदलांनंतर स्वतःच्या सांस्कृतिक व प्राकृतिक संपन्नतेचे जगातील मूल्य लक्षात घेऊन हळूहळू पर्यटन व औद्योगिकीकरण यातून विकास साधण्याचा प्रयत्न गती पकडत आहे.
दुर्गम भागात आजही आधुनिकतेचा फारसा स्पर्श नसलेल्या काही आदिवासी जमाती सुखाने नांदत आहेत. थाई सीमेलगत दुर्गम भागात राहणाऱ्या कयान जमातीची एक वृद्धा. अतिशय तलम लोकरीची सुंदर वस्त्रे खूप साध्या उपकरणांनी विणत असताना…
अन्न : मांसाहार व भात हे प्रमुख खाद्य. चीन व भारत यांचा खाद्यसंस्कृती वर प्रभाव आहे. पौर्वात्य प्रभाव मांसाहारात अधिक, लहान चिमण्या, त्यांची अंडी, मोठे कीटक इत्यादी सर्रास सगळीकडे आवडीने खाल्ले जाते. डाळ, भाज्या यांवर भारतीय प्रभाव अधिक. तमिळ, मलबार, उडुपी, आंध्र या प्रत्येक प्रदेशात जशी सांबार ची पाकृ व चव वेगळी असते त्याप्रमाणे रंगून सांबार ही अजून निराळी चव चाखायला मिळाली. बगान मध्ये एका ठिकाणी चिंचेच्या कोवळ्या पाल्याची भाजी विशेष उल्लेखनीय.
चिंचेच्या कोवळ्या पाल्याची भाजी
पौर्वात्य प्रकारचे शहरी खाद्य पदार्थ
ग्रामीण भागातील शाकाहारी खाद्य: भात, भेंडीची भाजी, बॉकचॉय किंवा चीनी कोबी, खारवलेला बांबू
भात व काही व्यंजने
चिमणी-फ्राय व भाजक्या शेंगांप्रमाणे किरकोळ विक्रीस असलेली उकडलेली अंडी
रंगून मध्ये काही जुने प्रसिद्ध कॅफे आहेत. उत्तम प्रतीचा चहा हे ब्रह्मदेशाच्या निर्यातमालापैकी एक. अशाच दोन ठिकाणाची सहजचित्रे
वेशभूषा : स्त्रिया व पुरुष दोघेही गोल 'लॉंघ्यी' वापरतात. रंग नक्षी जरा वेगवेगळी, कपड्याने डोके झाकण्याची प्रथा काही लोकांमध्ये आहे. थंडाव्यासाठी व सनस्क्रीन म्हणून चेहऱ्यावर चंदनासम एका लाकडाचा उगळलेला लेप 'तनुका' लावतात.
वेशभूषा व तनुका
तनुका उगाळणारी स्त्री
बौद्ध भिक्षु तपकिरी रंगाची तर भिक्षुणी फिकट गुलाबी वस्त्रे वापरतात. भिक्षूंची वस्त्रे पूर्वी कमळाच्या देठा पासून बनलेल्या धाग्यापासून बनवलेली असत.
दोन ठिकाणी देवदर्शनास आलेली नुकतेच लग्न झालेली जोडपी भेटली त्यांचे हे फोटो. त्यांच्या कडून लग्न पद्धती विषयी मजेदार माहिती मिळाली, नवरा व बायको यांना प्रत्येकी पाच नियम पाळावे लागतात, यातील काही नियम विशेष! लग्ना नंतरही मुली माहेरची जबाबदारीही पाहतात असे दिसते. ५ नियम :
१. आपल्या पत्नीस ओरडून न बोलणे २. सर्व उत्पन्न आपल्या पत्नीच्या स्वाधीन करणे ३. पत्नीशी एकनिष्ठ राहणे ४. पत्नीस ऐपत/समाजातील स्थानास अनुसरून वस्त्रालंकार करणे ५. प्रेमाविष्कार
१. पतीच्या घरची व्यवस्था पाहणे २. काटकसरी असणे ३. पतीशी एकनिष्ठ राहणे ४. माहेर व सासर दोन्हीमध्ये भेदभाव न करणे (आर्थिक जबाबदारी तसेच भेटवस्तू दोन्हीकडे समान) ५. आळशी नसणे
नवविवाहित दांपत्य
भाषा व लिपी : बामाऽ भासा किंवा बर्मीझ भारतीय भाषांप्रमाणेच संस्कृत व पाऴी-प्राकृत प्रभावित आहे. मूळ पौर्वात्य असून तोही रंगही टिकवून आहे. नमस्ते किंवा हेल्लो समांतर 'मिन्गलाबाS' 'मंगल भव' या पाऴी शब्दावरून आले. बरेच तद्भव शब्द ओळखण्याइतपत स्पष्ट आहेत.
'अख्खार' लिपी अत्यंत सुंदर कलात्मक व समृद्ध आहे. सिंहलि नंतर माझी हि सर्वात आवडती लिपी. अनेकविध पौर्वात्य उच्चारांसाठी विशेष अक्षरे आहेत. भारतीय भाषांत आताशा फारशी प्रचलित नसलेली कठिण अक्षरेही नित्य वापरात असतात, उदा. ञुञू हे मुलाचे नाव, ञोङ्यू (Nyaung-U) हे शहराचे नाव ई. लिपी उदाहरण : မြန်မာအက္ခရာ
या प्रदेशात फिरताना नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग झाला, विशेषतः भाषा ॲप
हस्तकला : लाकूड व कागद वापरून बनवलेल्या रंगीत ब्राह्मी छत्र्या विशेष. सागवानी लाकडावरील काम आधीच्या काही भागात पहिलेच आहे. रंगीत कठपुतळीच्या बाहुल्या अजून एक विशेष.
ब्राह्मी छत्र्या
उपहारगृहातील सजावटीच्या ब्राह्मी छत्र्या
कठपुतळी
बगान ची एक वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैली आहे, काळ्या शाईने प्रथम चित्र साकारून त्यात रंगीत वाळू पासून बनवलेले आकर्षक रंग भरण्यात येतात. एक विशेष अनुभव येथे नमूद करण्यासारखा आहे. एका स्थानिक कलाकाराबरोबर या वेगळ्या शैलीचे प्राथमिक धडे गिरवले. खरे सांगायचे तर वाळूचे रंग इतके आकर्षक असतात हेच माहिती नव्हते त्यामुळे चित्र बनताना पाहण्याची उत्सुकता होती, त्यात मोडके इंग्रजी बोलणारी त्या कलाकाराची मुलगी हा संभाषणातील दुवा बनली व छोटी छोटी काही चित्रे आम्ही गिरवली. पारंपारिक पद्धत वापरून काही आधुनिक शैलीतील चित्रेही आज हे कुटुंब काढते. अशा प्रकारे लोकांच्या आठवणी साठवण्यात खरी प्रवासाची कृतकृत्यता…
संगीत : भारतीय संगीताचा खोलवर प्रभाव. वाद्ये पौर्वात्य असली तरी सुरावटी भारतीय रागांवर आधारित असतात. बगान जवळ एका खेड्यात काही मुले सराव करत असतानाचा एक छान अनुभव मिळाला, साधारण 'तिलक कामोद' ची सुरावट आहे.
शास्त्रीय नृत्यप्रकार 'किन्नय-किन्नयी' (मूळ शब्द सहज समजतो) आपल्याकडील नृत्य प्रकारासारखाच मुद्राप्रधान.
क्रीडा : उल्लेखनीय असा खेळ म्हणजे 'चीन्लोन'. वेतापासून बनविलेल्या पोकळ चेंडूनी हा खेळ खेळतात. विशेष असे की या खेळात स्पर्धाभाव नसून नृत्यासम कलात्मकता आणण्याचा प्रयत्न असतो. रंगूनच्या एका गल्लीत टिपलेली ही खेळाची काही क्षणचित्रे.
असे हे ब्रह्मदेशाचे विविध रंग. आग्नेय-आशियामध्ये कमी माहिती असलेल्या या प्रदेशाची हि चित्रयात्रा. लेखमालेत पुढे केवळ अल्प परिचित थायलँड, उत्तर सीमावर्ती भाग.
अन्य भटकंती : दक्षिण अमेरिका - पेरू, दक्षिण अमेरिका - अमेझॉन ब्राझील, मध्य अमेरिका - ग्वाटेमाला होंडुरास एल साल्वाडोर बेलीझ, ईशान्य भारत - मणिपूर, ईशान्य भारत -त्रिपुरा, आग्नेय आशिया - ब्रह्मदेश थाईलँड लाओस कंबोडिया मध्य व पश्चिम आशिया - उझबेकिस्तान ताजिकिस्तान अफगाणिस्तान अझरबैजान तुर्कस्तान
प्रतिक्रिया
5 Apr 2016 - 7:45 am | यशोधरा
सुरेख फोटो व धागा. तनुका भारी आहे!
कमळाच्या देठापासून बनवलेली वस्त्रे! केळीच्या बुंध्याचा भाग वापरुन केलेले वस्त्र पाहिले आहे, तलम असते. ही कशी असतात?
5 Apr 2016 - 9:28 pm | समर्पक
हि तशी रखरखीत असतात, परंतु हेच त्यांचे प्रयोजन असावे, भिख्खू हे कोणत्याही देहिक सुखापासून अलिप्त राहत असल्याने वस्त्राचे सुखही दूर ठेवत असावेत. अन्यथा कपाशीचे उत्पादन येथेही होते.
5 Apr 2016 - 7:48 am | यशोधरा
आणि एक राहिले - त्या आदिवासी वृद्धेने गळ्यात जे घातले आहे, त्याने मान, खांदे वगैरेंना त्रास होत नाही का?
कठपुतळ्या, कापडावरचे काम, छत्र्या सगळेच देखणे.
5 Apr 2016 - 6:50 pm | अभ्या..
मस्त धागा आणि अप्रतिम फोटोज.
यशोमैय्या उंच मान असणे सौन्दर्याचे लक्षण मानले जाते, त्यासाठी लहानपणापासून त्या रिंगा गळ्यात घालून हळूहळू वय वाढेल तशा संख्येने वाढवल्या जातात असे वाचल्याचे स्मरते. हा तोच प्रकार असावा.
चीन की जपानात स्त्रियांची सौन्दर्यलक्षणासाठी छोटी पावले ठेवण्यासाठी अशीच कृत्रिमरित्या बांधून ठेवली जातात म्हणे.
5 Apr 2016 - 6:52 pm | अभ्या..
नवदांपत्यानी साधलेली कलरस्कीम आणि मॅचिंग अप्रतिम. लव्हेंडर वाल्यांसाठी तर मनापासून दाद. ग्रेट
5 Apr 2016 - 11:11 pm | समर्पक
टाय-पिन, साडी-पिन सारखी 'लुंगी-पिन' विशेष :-)
5 Apr 2016 - 9:38 pm | समर्पक
लहानपणापासूनच या कड्या बसवलेल्या असतात आणि हळूहळू त्या खांद्याची हाडे वजनाने खाली धासवतात. कालांतराने बगळ्याप्रमाणे मान उंच दिसू लागते. आधी असा समज होता की कड्यांमुळे त्यांच्या मणक्यात बदल होत असावेत, पण अधिक शोधाअंती असे दिसले कि छातीचा पिंजरा व खांद्याची हाडे यात बदल होतात परंतु मणक्यात नाही. व याचा त्यांना फारसा त्रास असा होत नाही पण पगडी प्रमाणे बंधनाचे त्रास जे असतात ते मात्र होतात. (उदा खाज सुटणे)
गावात एक अनुभवी स्त्री या कड्या बसवण्यास, वाढवण्यास व (काही अपरिहार्य कारण असल्यास) काढून घेण्यास अधिकारी असते
5 Apr 2016 - 10:17 pm | राघवेंद्र
+१
5 Apr 2016 - 11:20 pm | सुखी
मागे एका discovery वरच्या कार्यक्रमात बघितलेल आठवतय, या मार्गे स्त्री रुपी धन वाचवुन ठेवायचे. (जसे "चीन की जपानात स्त्रियांची सौन्दर्यलक्षणासाठी छोटी पावले ठेवण्यासाठी अशीच कृत्रिमरित्या बांधून ठेवली जातात म्हणे." सौन्दर्य म्हणायला, पण खरा कार्यकारण भाव म्हणजे त्या स्त्रियांना पळुन जाता येउ नये.) तसेच हे!!
अजुन एक उपयोग म्हणजे, जर कुणी स्त्री "३. पतीशी एकनिष्ठ राहणे" या धर्माचे पालन नाही करु शकली कि सर्व रिंगा काढुन टाकत. रिंगाच्या आधाराची सवय झालेली मान मग तग धरु शकायची नाही अन मग ती स्त्री कायम स्वरुपी अपंग रहायची किंवा मरण कवटाळायची.
5 Apr 2016 - 5:14 pm | एस
अत्यंत रोचक. तुमच्या छायाचित्रणाला दाद!
पुभाप्र.
5 Apr 2016 - 8:49 pm | पैसा
अत्यंत सुंदर! हा भाग खूप आवडला, एक ते 'चिमणी फ्राय' सोडून. :(
5 Apr 2016 - 10:38 pm | माहितगार
रोचक ! माहितीपूर्ण लेखन आवडले
5 Apr 2016 - 11:13 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं सफर ! सुंदर वर्णन, सुंदर फोटो !
6 Apr 2016 - 12:10 am | बोका-ए-आझम
अप्रतिम फोटो! पुभाप्र!
6 Apr 2016 - 2:51 pm | जगप्रवासी
मस्त भाग, पुलेशु
6 Apr 2016 - 9:30 pm | अजया
अप्रतिम!
9 Jun 2016 - 5:28 pm | उल्का
सुन्दर मस्त अप्रतिम छान असे सग्ळे शब्द आधीच्या चार भागात वापरले आहेत. ते सर्व एकत्रित्पणे इथे परत एकदा.
सर्व भागातील फोटो पहिल्यावर आंम्ही ब्र्ह्मदेश फिरुन आल्यासारखे वाटते आहे.
कोणत्या कॅमेर्याने काढता तुम्ही इतके सुन्दर फोटो?
हरकत नसेल तर सांगा.
10 Jun 2016 - 10:29 am | समर्पक
Canon T3i व मोबाईल फोन
9 Jun 2016 - 7:50 pm | आनंदी गोपाळ
वा! सहसा न पाहिलेल्या प्रदेशातील प्रवासाचे अत्यंत सुंदर डॉक्युमेंटेशन. आमच्याशी शेयर केल्याबद्दल धन्यवाद!
18 Jul 2016 - 4:47 pm | ज्ञ
तुम्ही जो खेळ लिहिला आहे त्याचे एक व्हर्जन आशियाई खेळांमध्ये सेपाक टक्राव (https://en.wikipedia.org/wiki/Sepak_takraw) ह्या नावाने खेळले जाते.. भारत सुद्धा ह्या खेळसाठी टीम पाठवतो.