ब्रह्मदेश भाग १ : प्रस्तावना भाग २ : मंडले भाग ४ : रंगून भाग ५ : ब्रह्मदेश लोकजीवन
थाईलँड भाग ६ : बँकॉक व परिसर भाग ७ : सुखोथाई भाग ८ : उत्तर सीमा
लाओस भाग ९ : सुवर्णत्रिकोण
कंबोडिया भाग १० : नॉम पेन्ह व परिसर भाग ११ : अंगकोर वट
मंडलेहून छोट्या बसने साधारण ४ तासांच्या अंतरावरील ह्या पुरातन राजधानीच्या ठिकाणी मुक्काम हलवला. हा या लेखमालेचा मुख्य गाभा होय. या स्थानाविषयी लेखन करायची इच्छा होती म्हणून हा प्रपंच. तुमच्यापैकी काही जणांना माहिती असेलही, परंतु बव्हंशी हे स्थान अपरिचित आहे. आणि इतके आफाट सुंदर असूनही अपरिचित असावे ही आश्चर्यभावना या लेखाची जननी होय. असो…
संक्षिप्त इतिहास : मूळ पुरातन नाव 'अरिमर्दनपुरं', पाऴी भाषेत 'अरिमद्दन', स्थानिक भाषेत 'पुगं' आणि आंग्ल 'बगान'. या स्थानाचा भरभराटीचा काल हा साधारण नवव्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत. उर्वरित जगात मंगोल हैदोस घालू लागले तेव्हा भारत तुलनेत जवळ असूनही अनेक कारणांनी त्यांच्या आक्रमणापासून सुरक्षित राहिला. परंतु त्याच सुमारास बगान चे राज्य कमजोर होत गेले व अतिपुर्वेकडे ब्रह्मदेशात मंगोल घुसले. ते बगान पर्यंत कधीच पोहोचले नाहीत, तरीही सततच्या युद्धाने राज्य खिळखिळे होत शेवटी या शहराचे महत्व कमी होत एका पुरातन तीर्थस्थानाइतकेच उरले. (पुढे कायमच उत्तर व दक्षिण ब्रह्मदेशात वेगवेगळी सत्तास्थाने निर्माण झाली, पण बगान नंतर तितके शक्तिशाली राज्य पुढे तीन शतके झाले नाही. पुढे 'हंसवती' साम्राज्याने पुन्हा सर्व भूभागाचे एकत्रीकरण केले ज्यात त्यांनी थायलँड चे 'अयुत्थया' राज्य बुडविले व उत्तरेकडे मणिपूर सुद्धा जिंकले.)
इरावतीच्या काठी वसलेले हे महानगर निश्चये जागतिक स्थापत्य आश्चर्यांपैकी एक! १०० चौकिमी पेक्षाही अधिक विस्तृत भूभागावर हे महानगर पसरलेले होते. इथल्या संपन्न जनतेने अनेक मंदिरे व स्तूप या ठिकाणी बांधले, १०,००० हूनही जास्त संख्येने असलेली ही पूजास्थाने या शहराची संपन्नता व सौंदर्य यांची कीर्ती दूरवर पसरवत असतील यात शंका नाही. शतकांनंतर आज सुमारे २२०० बांधकामे शिल्लक आहेत, परंतु तेवढीही मूळ वैभवाची कहाणी समर्थपणे सांगत दिमाखात उभी आहेत. आज हा संपूर्ण भूभाग संरक्षित करण्यात आलेला आहे. येथे अनेक हिंदू मंदिरेही होती परंतु आता निश्चित ओळखण्यासारखे एकच विष्णूमंदिर शिल्लक आहे. लहानमोठ्या आकाराची विविध शैलीतली अशी शेकडो मंदिरे क्षितिजापर्यंत पसरलेली पाहणे हा अनोखा अनुभव. पुरातत्वशास्त्र प्रेमींसाठी तर मेजवानी, स्थापत्य उत्क्रांती विशेष अभ्यासनीय! मूळ अमरावती-नागार्जुन (आं.प्र.) स्तुपावर आधारित बौद्ध शैली व नागरी हिंदू मंदिर स्थापत्य दोन्हीचा ब्राह्मी पद्धतीने समांतर विकास तर कुठे मिलाफ पहावयास मिळतो. विविध काळातील मंदिरे कमी अंतरावर पहावयास मिळत असल्याने असा तौलनिक अभ्यास सोपा व फार मजेदार आहे.
हि सर्व मंदिरे मातीच्या विटांनी बांधलेली आहेत त्यामुळे नैसर्गिक लाल रंग हिरवाईत उठून दिसतो. सूर्योदय व सूर्यास्ताचे रंग अजूनच सौंदर्य खुलवतात. काही महत्वाची मंदिरे पांढऱ्या रंगात रंगवलेली आहेत तर काही सोन्याने मढवलेली आहेत, वेगवेगळ्या कोनातून मंदिरसमुच्चयाची येथील दृश्ये खासच! आधुनिक काळात पर्यटन विभागाने हॉट एअर बलून सेवा सुरु केली आहे, त्यामुळे एका वेगळ्या अनुभवाचा आनंद पर्यटकांना घेत येतो. एका खासगी हॉटेल ने एक उंच मनोरा बांधून अजून एक सोय केली आहे. दूरवर पसरलेला ईरावतीचा प्रवाह, व नजर जाईल तिथवर पसरलेली सुंदर कलात्मक मंदिरे असे किती साठवू नि किती नको असे करून सोडणारे दृश्य!
आता पर्यटन वेगाने वाढत आहे, सोयी सुद्धा आता जागतिक दर्जाच्या उपलब्ध आहेत. सवयीप्रमाणे येथेही एका हॉस्टेलवर राहिलो, तेथेच मंडलेला भेटलेला स्वीडिश मुलगा परत भेटला, आम्ही दोघे व अन्य एक-दोन असे ई-बाईक भाड्याने घेऊन रोज नव्या दिशेने जात असू. हजारो मंदिरे असल्याने कोठे काय बघायचे हा अभ्यास करून जाणे फायद्याचे ठरते. काही मंदिरे भव्यतेसाठी, तर काही कलाकुसरीसाठी विशेष. काही मंदिरांमध्ये भित्तिचित्रेही आहेत तर काही मंदिरांमधून सभोवतीचे दृश्य अतिशय मनोहर दिसते. त्यामुळे कुठले मंदिर सुर्योदयास पहायचे, कुठून सूर्यास्त चांगला दिसतो, कुठे गर्दी अधिक असते इत्यादी गोष्टींचा अभ्यास असला तर वेळ वाया न घालवता सर्वोत्तम ते पाहता येते. वैयक्तिक अनुभवात साधारण दोन महिने या चारही देशांच्या अभ्यासासाठी दिले, त्यातील निम्मा वेळ बगान व अंगकोरलाच लागला. परंतु 'याची देही याची डोळा' पाहण्याच्या गोष्टींच्या यादीतील एक, अतिशय मनसोक्त आनंद घेऊन यादीतून वजा केली. असो… शब्दांना मर्यादा घालतो चित्रेच अधिक बोलतील…
छोट्या समूहापासून सुरुवात
हि चित्रे म्हणजे केवळ एक झरोका
लाल विटांची मंदिरे, अनेकविध शैलीतील मंदिरे असली तरी चित्रातील मंदिर हे खास बगान शैलीतील म्हणता येईल. बहुतांश मंदिरे पुढे यासारखी बांधण्यात आली
काही प्रमुख मंदिरे
आनंद मंदिर : बौद्धमतानुसार एकुण २८ पैकी सध्याच्या युगात ४ बुद्ध होऊन गेले. काश्यप, काकुसंध, कोणागमन व गौतम या चारही बुद्धांच्या सुवर्णलेपित भव्य मूर्ती या मंदिरात आहेत. मंदिराचे बांधकाम सममित व भव्य आहे.
आनंद मंदिर
बुद्धमूर्ती: अनुक्रमे गौतम, काकुसंध, कोणागमन व काश्यप
लोकानंद मंदिर
महाबोधी मंदिर : भारतातील महाबोधी मंदिराची प्रतिकृती.
महाबोधी मंदिर
धम्मयंग्यी मंदिर : ब्राह्मी पिरॅमिड म्हणता येईल अशी रचना, येथील सर्वात मोठे मंदिर
धम्मयंग्यी मंदिर
श्वेझिगोन पागोडा : संपूर्ण सोन्याने मढविलेला पागोडा, बुद्धाचा दात व अस्थीखंड येथे जतन केला असल्याने अतिशय महत्वाचे तीर्थस्थान.
विविध काळातील स्तूप
सुरुवातीच्या काळातील मंदिर, हिंदू मंदिराचा साचा
सुलामनी मंदिर : विकसित ब्राह्मी शैली
हिंदू मंदिरातील आदिनारायण मूर्ती
हिंदू देवता
धम्मजायिका स्तूप
पुरातन भित्तीचित्राचे उदाहरण
सुर्योदयाचे रंग
सुंदर व नेटके मंदिर समूह
दूरवर पसरलेल्या या पुरातन मंदिरनगरीची काही मनोहर दृश्ये
राजप्रासाद (अर्वाचीन)
बौद्ध विहार
ई-बाईक त्रयी, हॉलंड चा हम्झा, स्वीडिश जॉन व मी. येथे भटकण्याचे उत्तम व स्वस्त साधन
इरावतीचे विशाल पात्र
इरावतीचे विशाल पात्र
इरावतीच्या काठी सूर्यास्त
शेवटी, काही विशेष चित्रे. तंत्रसहाय्य, नेमकी वेळ व नेमके ठिकाण या सर्वांचा समन्वय झाल्याने विशेष. खास छपाई साठी असल्याने रॉ रंग गडद करण्यात आले आहेत. मोठ्या आकारात खरी मजा
अवांतर १ : बगान येथील मंदिरे पाहण्याचा उत्तम मार्ग हॉट एअर बलून असला तरी तो प्रचंड महाग आहे. ३००$ एका फेरीसाठी लागतात. अर्थात, उगा विमानातून कुठेतरी उडी मारायलासुद्धा इतकेच पैसे मोजावे लागतात, त्यापेक्षा हा अनुभव नक्कीच कैक पटींनी सुंदर व वसूल आहे.
अवांतर २ : बरीच चित्रे मोठ्या आकारात बघण्यात मजा आहे, विशेषतः "सुंदर व नेटके मंदिर समूह" या विभागातील. तेव्हा अशा चित्रांवर राईट क्लिक द्वारे प्रॉपर्टिझ मधून लिंक घ्या व नवीन ब्राउझर मध्ये वेळ असला तर आवर्जून पहा.
अन्य भटकंती : दक्षिण अमेरिका - पेरू, दक्षिण अमेरिका - अमेझॉन ब्राझील, मध्य अमेरिका - ग्वाटेमाला होंडुरास एल साल्वाडोर बेलीझ, ईशान्य भारत - मणिपूर, ईशान्य भारत -त्रिपुरा, आग्नेय आशिया - ब्रह्मदेश थाईलँड लाओस कंबोडिया मध्य व पश्चिम आशिया - उझबेकिस्तान ताजिकिस्तान अफगाणिस्तान अझरबैजान तुर्कस्तान
प्रतिक्रिया
16 Mar 2016 - 2:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
हा भाग खास आवडला ! फोटो अप्रतिम !!
ब्रम्हदेश बघायला जाता येईल तेव्हा या भागात ५-७ दिवस ठिय्या मारून बसायचे ठरवले आहे :)
16 Mar 2016 - 2:34 pm | बोका-ए-आझम
महाबोधी मंदिराचा फोटो पाहताना अंगकोरवाटची आठवण झाली आणि हिंदू मंदिराचा साचा पाहताना कोणार्कची.शैलीत काही साधर्म्य आहे का हे प्रचेतसभौंसारखे experts सांगू शकतील.
16 Mar 2016 - 5:22 pm | प्रचेतस
शैलीत तसा फरक आहे बराच. वेगवेगळ्या शैलींचं मिश्रण आहे.
भारतातल्या प्राचीन मंदिरांबद्दल मला थोडंसं सांगता येईल मात्र इकडील जरा वेगळीच आहेत. हिंदू मंदिर मात्र इकडील मंदिरांसारखंच काहीसं आहे.
16 Mar 2016 - 2:54 pm | बेकार तरुण
मस्त लेख आणी फोटो
जमलं तर नक्की ह्या गोष्टी पाहणार ! माहिती करुन दिल्याबद्दल अनेक धन्यवाद
पुढील भागाच्या प्रतिक्षेत !!!
16 Mar 2016 - 4:10 pm | नन्दादीप
सुंदर.. दुसरे शब्दच नाहीत वर्णन करायला....
फोटोग्राफी पण उत्तम...
16 Mar 2016 - 4:15 pm | अनुप ढेरे
अप्रतिम फोटो!
16 Mar 2016 - 5:18 pm | प्रचेतस
अहाहाहा...!!!!
प्रचंड सुंदर.
मंदिरांचं शहर. भयानक आवडलं.
16 Mar 2016 - 5:47 pm | खेडूत
अप्रतिम...
वाचत आहे.
16 Mar 2016 - 7:24 pm | राघवेंद्र
सुरेख फोटो. खरच जायला पाहिजे इथे.
मोठ्या आकारातील फोटो Desktop Background म्हणुन खुप मस्त दिसत आहे. ( वापरु का विचारयाचे राहिले ? )
16 Mar 2016 - 10:28 pm | समर्पक
आवडले असेल तर खुशाल वापरा... चित्रांचे सर्व अधिकार पहाणा-याचे स्वाधीन
16 Mar 2016 - 7:30 pm | इडली डोसा
एवढ्या छान ठिकाणाची ओळख करुन दिल्यबद्दल धन्यवाद समर्पकजी... तुमच्याबरोबर फिरायला आवडेल आम्हाला :)
16 Mar 2016 - 7:45 pm | अजया
काय सुंदर शहर आहे.कधीही ऐकले नव्हते असा प्रदेश.या लेखमालेसाठी धन्यवाद.
16 Mar 2016 - 11:27 pm | टिवटिव
सुंदर फोटो व लेखमालेसाठी धन्यवाद
17 Mar 2016 - 12:22 am | अभ्या..
ओह्ह्ह्ह.
जबरदस्त.
मायथॉलॉजिकल फिल्मसला आदर्श असे लोकेशन आहे. ग्रेट.
मस्त माहीती. मस्त फोटोज.
17 Mar 2016 - 5:10 pm | पक्षी
भाग १ आणि २ च्या लिंक वर click केल्या वर "Page not found" error येत आहे.
22 Mar 2016 - 12:53 pm | समर्पक
दुरुस्ती केली
18 Mar 2016 - 12:42 pm | पैसा
अगदी संपूर्ण नवीन प्रदेश आणि मंदिरांची ओळख करून दिलीत!
18 Mar 2016 - 3:35 pm | पद्मावति
अगदी नवीन प्रदेशाची इतकी सुंदर ओळख करून देत आहात त्याबदद्ल तुमचे मन:पूर्वक आभार.
18 Mar 2016 - 7:01 pm | नया है वह
आफाट सुंदर!
20 Mar 2016 - 2:04 pm | शेखरमोघे
सुरेख लेखन आणि चित्रे! अगदी स्वत: फिरायला गेल्यासारखे वाटले !! अभिनन्दन !!!
एक शन्का किन्वा तज्ञाना विचारपूर्वक विचारलेला प्रश्न - शीर्षकातील "बृहन्भारत" हा शब्द "बृहद्भारत" असा नको का? मूळ शब्द आहेत - "बृहत" + "भारत" म्हणून.
"बृहत" + "महाराष्ट्र" च्या बाबतीत, दुसर्या शब्दातल्या "म" ने होणार्या सुरवातीमुळे, सन्धीनन्तरचा शब्द "बृहन्महाराष्ट्र" होतो. दुसर्या शब्दाची सुरवात जशी असेल तशी सन्धी बदलेल.दुसर्या शब्दाची सुरवात जर "म" असेल तरच सन्धी "बृहन....." अशी होइल.
तज्ञान्साठी आणखी एक प्रश्न - "पाय मोडके अक्षर" कसे टन्कायचे? जरी वर "बृहत" असे लिहिले आहे तरी त्यातील शेवटचे अक्षर "अर्धे" आहे आणि म्हणून "त" मोडक्या पायाचे असायला हवे.
25 Mar 2016 - 6:03 am | भंकस बाबा
समर्पकजी अशीच भटकंती करत जा, फोटोग्राफी अप्रतिम, लेख देखिल माहितीपूर्ण.
25 Mar 2016 - 6:08 am | यशोधरा
ऑस्सम!
25 Mar 2016 - 8:16 pm | सुधीर कांदळकर
झकास. मजा आली.
आणखी वाचायला आवडेल.
9 Jun 2016 - 5:09 pm | उल्का
एकापेक्षा एक सुन्दर फोटो आहे.
10 Jun 2016 - 1:33 am | अंतु बर्वा
वाह! डोळ्याचे पारणे फेडलेत!