बृहन्भारत (आग्नेय आशिया) : भाग ९ – सुवर्णत्रिकोण, लाओस
या भागात एका अनोख्या भागाची सफर. मेकाँग नदीच्या काठी एक संगमावर ब्रह्मदेश, सयाम व लाओस हे तीन देश एकत्र येतात, त्या गोल्डन ट्रँगल किंवा सुवर्ण त्रिकोण प्रदेशाची ओळख. सुवर्ण त्रिकोण हे नाव खरे अंमली पदार्थाच्या व्यापाराच्या संदर्भात दिलेले आहे. अफगाणिस्तान इराण भागात तसेच या प्रदेशात ओपिअम ची लागवड मोठ्या प्रमाणावर होत असे. आजही बराच प्रदेश बेकायदेशीर पिक घेतो. यासंदर्भात मध्य आशियास ‘गोल्डन क्रेसेंट’ व आग्नेय आशियात ‘गोल्डन ट्रँगल’ अशी संज्ञा प्रचलित आहे. मला या प्रदेशाचे विशेष आकर्षण होते ते त्रिराष्ट्रसीमाबिंदूमुळे. असे विशेष सुंदर 'ट्रायपॉईंट' जगात अगदी थोडे.
मेकाँग नदी लाओस व ब्रह्मदेशाच्या सीमेवरून वाहते तर रुआक नदी सयाम व ब्रह्मदेशाला अलग करते. यांच्या संगमावर हे तीन देश एकत्र येतात. संपूर्ण प्रदेश डोंगराळ व आदिवासी आहे. अलीकडच्या काळात पर्यटनावर डोळा ठेऊन काही विकास झाला आहे. विशेषतः रस्ते अगदी कौतुक करण्यासारखे प्रशस्त व उत्तम दर्जाचे आहेत. ब्रह्मदेश व लाओस दोन्ही ठिकाणी नवीन कॅसिनो चा प्रयोग बराच यशस्वी झालेला दिसतो. ओपिअम चा इतिहास व व्यापाराची कहाणी सांगणारी दोन उत्तम संग्रहालये, काही मोठी मंदिरे, ड्यूफ्री झोन ही नव्याने विकसित इतर पर्यटन आकर्षणे.
येथील प्रवासाची सुरुवात च्यांग राई या शहरापासून केली, प्रवासाची सोय, वेळ व इतर कारणे लक्षात घेता गाडी भाड्याने घेणे उत्तम पर्याय वाटला व तो पुढे अतिशय योग्यही ठरला. गाडी म्हणजे मोठेच धूड मिळाले, पण एक वेगळेच धाडस (आता सगळे पार पडल्यावर नुसतं एका शब्दात लिहायला बरं वाटतंय पण एकंदरीत दुर्गम प्रदेश, तोही परदेशात, त्यात आंतरराष्ट्रीय सीमोल्लंघन व एकट्याने हे पार पाडणे म्हणून 'धाडस') ड्राइव्ह काही फार अशी नाही, दिवसभरात साधारण दोनशे किलोमीटर. पुढे नावेतून सीमापार लाओस मध्ये, तेथे स्थानिक वाहन. नावेतूनच ब्रह्मदेश व परत सयाम. अतिशय शांत प्रदेश, नुकताच पावसाळा संपत आल्याने चहूकडे हिरवीगार भाताची खाचरे, अधेमधे गढूळ ओहोळ व महानदी मेकाँग! अत्यंत सुंदर प्रदेश चित्रातून पहा...
येथील निसर्गच इतका सुंदर आहे की या लोकांनी आणखी नशा का शोधून काढली हे ते लोकच जाणोत. असो, या नितांतसुंदर प्रदेशाची एक ओळख असा या लेखमालेचा उद्देश बऱ्यापैकी पूर्ण होत आला आहे. पुढे कंबोडिया विषयी चित्रलेखांबरोबर लेखमालेची सांगता.
अवांतर: नयनरम्य आंतरराष्ट्रीय सीमांच्या विषयाच्या निमित्ताने, अजून एक असाच निसर्गाच्या कुशीतला 'ट्रायपॉईंट', त्या प्रदेशाविषयी सविस्तर पुन्हा केव्हातरी...
अन्य भटकंती : दक्षिण अमेरिका - पेरू, दक्षिण अमेरिका - अमेझॉन ब्राझील, मध्य अमेरिका - ग्वाटेमाला होंडुरास एल साल्वाडोर बेलीझ, ईशान्य भारत - मणिपूर, ईशान्य भारत -त्रिपुरा, आग्नेय आशिया - ब्रह्मदेश थाईलँड लाओस कंबोडिया मध्य व पश्चिम आशिया - उझबेकिस्तान ताजिकिस्तान अफगाणिस्तान अझरबैजान तुर्कस्तान