साधारणपणे आपण एखाद्या व्यक्तीस त्याच्या कमाई बद्दल विचारपुस करतो तेव्हा त्याचा अर्थ म्हणजे ती व्यक्ती काय काम करते आणि त्या कामापायी त्याला दर महिन्याकाठी किती आर्थिक मोबदला मिळतो, असे असते. माझे मत सुद्धा काही वेगळे नाही पण माझ्या मित्रासोबत झालेल्या एका प्रसंगावरुन “कमाई” या शब्दाचा एक वेगळा अर्थ मला समजला, तोच प्रसंग इथे शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करतोय-
मी २०१३ मध्ये हैदराबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकारी म्हणून काम करत होतो, जून मधल्या एका रात्रीच्या शिफ्टमधे एका फ्लाईटमधून आलेल्या संयुक्त संस्थानातल्या प्रवाश्यांचे इमीग्रेशन-इन क्लिअर करणे चालू होते. इमीग्रेशन काउन्टर वरील अधिकाऱ्याने एका प्रवाश्याला, ज्याला सं.सं. मधून डीपोर्ट करून भारतात परत पाठवण्यात आले होते माझ्याकडे पाठविले. २०१० मधे त्याचा पासपोर्ट एक्स्पायर झाला होता, तीन वर्ष सं.सं.च्या इमिग्रेशन डीपार्टमेंट पासून लपाछपी चालू होती. अखेर जुन २०१३ मधे त्याला डीपोर्ट करण्यात आले होते.
साधीशी प्यांट, पांढरा सदरा आणि चामड्याची चप्पल घातलेला अंदाजे ४५ वर्षाचा सावळासा इसम डाव्या हातात एक ब्याग, आणि उजव्या हातात पासपोर्ट घेऊन माझ्या समोर उभा होता. मला तो गालातल्या गालात हसत असल्याचा भ्रमही झाला. अमेरिकेतून डीपोर्ट होऊन आल्याची कोणतीही खुण अथवा दुखः त्याच्या चेहऱ्यावर, वागण्यात दिसत नव्हती. प्रवासाच्या थकव्याने फक्त त्याचे डोळे तारवटलेले आणि केशरचना विस्कटली होती, पण हे आंतरराष्ट्रीय विमानतळ जणू काही त्याच्या घराचा दरवाजा आहे तो पार केला की घरात- या भावनेनं त्याच्यात तरतरी आली होती आणि काही अंशी हे खरंच होतं. विमानतळावर काम करत नसतो तर त्याला पाहून जन्मात विश्वास नसता केला की समोर उभा असलेला माणुस तेरा वर्षं अ.सं.सं.त राहून परत येतोय.
मी त्याचा पासपोर्ट व इतर कागद बघितले व त्याला माझ्या सिनीअरकडे (नाथ सरांकडे) घेऊन गेलो, त्यांनी त्या प्रवाश्यास त्रासिक नजरेने न्याहळले. डीपोर्ट झाल्यानंतर लागणारे कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी मला काही सूचना केल्या. ऑफिस टेबलच्या एका बाजूस बसून ते माझा आणि त्या प्रवाश्याचा संवाद ऐकू लागले-
मी- “एम पेरू?”
तो- “अमको इंदी आता सार.” माझ्या हिंदी-तेलगु उच्चारावरून त्याच्या लक्षात आलं असावं की मला जुजबी तेलगु येतं. तर तेलगुतून हिंदीत आलो, तो दक्षिणभारतीय उच्चाराने हिंदीत उत्तरे देऊ लागला.
मी- “नाम क्या है आप का?”
तो- “एम स्रीनिवासा, उमर ४७ साल, जनमतारिक xxxxxx, वारंगळ का रयनेवाला हे सार, एड्रेस xxxxxxxx.”
हा प्रवासी आम्ही न विचारलेल्या प्रश्नांची डिटेल उत्तरे व्हायवा मधल्या एखाद्या अतिहुशार विद्यार्थ्याच्या उत्साहाने देत होता. एकतर डीपोर्ट झालेला, त्यातून रात्रीच्या २-३ वाजता आम्हाला जास्तीचे काम लावणारा अशी आगाऊ उत्तरे देत आहे हे पाहून काहीसे चिडलेले नाथ साहेब त्याला थोडे दरडावत-
“अमरिका क्यो गया था?”
स्री.-“साब सब लोगां काम करणे को जाता उदर.....अम बी गया था तुतौसंडवाण (२००१) मे”
भुवया उडवत नाथ सर- “अच्छा?.....क्या काम करता था उधर?”
स्री.- “साब उधर gas स्टेशन पे काम करा मई..पयले एक गंटे का ४ डालर मिलता था अबी ७ डालर मिलता...६ गंटे एक स्टेशन पे काम करता था, और ६ गंटे दुसरे पे.”
नाथ सरांनी बोटांवर डालरxतासxदिवस इत्यादी गुणिले भारतीय चलनाचा हिशोब चालवला तेवढ्या वेळात मी स्रीनिवासाला फॉर्म मधले आणखी काही प्रश्न विचारले.
-“डीपोर्ट क्यू किया गया?”
स्री.- “पासपोर्ट एक्सपायर हो गया सार...तूतौउसंड टेण (२०१०) मे”
मी- “तो फिर इतने दिन कैसे रहे? वहा के इमिग्रेशनवालोसे कैसे बच के रहे?”
स्री.- “gas स्टेशन का मलिक बहुत अच्चा था साब उसकी वजह से बचा रहा”
नाथ साहेबांचा हिशोब झाला होता, कपाळावरच्या आठ्यावरून उत्तराचा अंदाज येत होता- “दस साल राहा तुम उधर?”
स्री. “थर्टीन यीयर्स साब” आकड्यांवर जोर देत त्याने साहेबांचा हिशोब बरोबर करण्याचा प्रयत्न केला. साहेब पुन्हा ३ वर्षाचा हिशोब लावत बसले तेव्हा मी पुढचा प्रश्न विचारला-
“घर मी कितने लोग है? बिवी बच्चे?”
स्री.- “वायफ है सार और दो बेटी, अमरा अन्ना, बडा बैय्या तुतौसंडत्रि (२००३) मे मार गया तो उसका येक बेटी ओर बेटा....गांवमेच रयते वो”
एव्हाना साहेबांचा आकडेमोड पुर्ण झाली होती कपाळावरच्या आठ्यांचे जाळे थोडे आणखी दाट झाले होते. आकडा पुटपुटत ते म्हणाले
“अर्रे बहुत पैसा कमाया तुमने तो?....क्या किया इतने पैसे का?”
स्री.- “कर्चा बी बऊत होता सार अमरिका मे”
नाथ सर- “तो फिर तू इतना साल बिवी बच्चो से दूर रहकर जो कमाया सब खर्चा हो गया? कुछ नाही बचाया, जमा किया?”
स्री.- “गांवका गर (घर) टिक किया सार और बैय्या का बेटी का मेरेज बी करवाया, उनका बेटा अबी इंजिनिअरिंग कर्रा, सेकंडं यीयरं मे हे वो”
साहेबांना आता त्याची कीव आली, कारण त्याच्या ठायी सगळा पैसा व्यर्थ गेल्या सारखा होता पण ‘स्री’ च्या चेहऱ्यावर ‘घरी’ पोचल्याचा आनंद ओसंडून राहिला होता. आणखी एक दोन प्रश्न विचारल्या गेले ज्यांचे समाधानकारक उत्तर स्री ने दिले. मी नाथ सरांना ‘डीपोर्टी’चे भरलेले फॉर्म्स दिले त्यांनी त्यावर स्री चे आवश्यक त्या जागी सह्या घेतल्या. बाकीचे दस्तावेज पूर्ण करण्यासाठी मी आतल्या विंग आणि काउंटरवर जाऊन आलो. तेवढ्या वेळात स्री सरांच्या परवानगीने ‘फ्रेश’ होऊन आला होता. केसांचा व्यवस्थित भांग पडला होता गालातले हसू आणखी स्पष्ट झळकत होते. नाथ सरांनी ‘कम्प्लीट’ झालेले पेपर्स एकदा चेक केले, माझ्याकडे सुटकेचा एक श्वास टाकत म्हणाले-
“जाने दो इसको.”
मी “आपका बाकी समान कहा है?”
स्री “ये कापडेका ब्यागीच है सार...दुसरा कूच नई”
उत्तरावर मी आणखी चकीत होत सरांच्या रोखीने पाहू लागलो
नाथ सर चिडक्या स्वरात-“अर्रे इतना दिन तुम अमरिका मे रहा, इतना पैसा अपने बाल बच्चो को लगाया...खुद के लिये क्या कमाया अपने फ्युचर के लिये, बुढापे के लिये क्या कमाई की?”
-यावर ‘स्री’ कडून हसण्या शिवाय दुसरे उत्तर येणार नाही असे मला वाटले, पण त्याने दिलेले उत्तर नाथ सरांना अंतर्मुख करणारे व मला ‘कमाई’ या शब्दाचा आणि जीवनातील जबाबदारीचा अर्थ समजावून जाणारे होते.
नाथ सरांचा प्रश्न ऐकुन स्री डाव्या हातात आपली कापडाची ब्याग उचलत हसला, उजव्या हातातील एक्स्पायर झालेला पासपोर्ट आणि इतर कागद सांभाळत म्हणाला-
“साब इतने साल मे मयने क्या कमाया ये तो नय जांता पर मेरा दोनो बच्ची पडाई मे बहुत अच्चा था उनको डॉक्टर का पडाई पुरा कारवाया, बडा बेटी का MBBS हो गया हे अगले साल छोटा बेटी बी MBBS पास कर जायेगा.....शायद यईचं मेरा ‘कमाई’ हे”
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(सत्यघटनेवरील आधारित, व्यक्तींची नावे व प्रसंग जसे मला सांगितल्या गेले तसेच लिहल्या गेले आहेत, थोड्याफार फरकाने संवाद कथानुरूप करण्याचा प्रयत्न केला आहे.)
प्रतिक्रिया
11 Jul 2016 - 8:11 am | जयन्त बा शिम्पि
हा खरा सच्चा भारतीय असला पाहिजे, नाहीतर आमच्या भारतात " कमाई " चे दोनच प्रकार संभवतात , एक स्कॉउट ची मुले / मुली करतात ती " खरी कमाई " आणि , गल्ली ते दिल्ली पर्यंत नेते व सरकारी बाबू करतात ती " उपर कि कमाई " ! !
11 Jul 2016 - 9:07 am | रेवती
काही अनुभव अंतर्मुख करणारे असतात खरे!
12 Jul 2016 - 11:32 pm | बहुगुणी
असंच म्हणतो.
लिखाणाची शैली आवडली.
11 Jul 2016 - 12:49 pm | विअर्ड विक्स
अनुभव आवडला ....
11 Jul 2016 - 2:20 pm | राजा मनाचा
"आमच्या" भारतात 90% लोक हीच कमाई करतात आणि त्याच लठ्ठ पगार घेणार्या मुलाकडे आश्रित म्हणून रहातात.
11 Jul 2016 - 4:49 pm | नाखु
बोले तो एक्दम झक्कास.
त्याचे अनधिकृत राहणे चूक्/बेकायदेशीर असेलही (आहेच) पण कुटुंबाकरिता करीत असलेली धडपड आणि साधा हिशोब फार महत्वाचा आहे. आणि ज्या अर्थी अगदी श्र्माचे काम करतो म्हणजे फार उच्चशि़क्षीत नसावा पण शहाणा नक्कीच आहे.
पुलेशु
11 Jul 2016 - 5:02 pm | असंका
किस्सा मस्त सांगितलात!
धन्यवाद!
11 Jul 2016 - 5:03 pm | अभ्या..
अवघडे खरच.
11 Jul 2016 - 6:51 pm | सुंड्या
जयन्त भाऊ, रेवती तै, विवि , राम 'राजे' , नाखु दा, असंका, आणि अभ्या.. आपणा सगळयांस धन्सवाद,
@नाखु - "उच्चशि़क्षीत नसावा पण शहाणा नक्कीच आहे." या बाबतीतला एक कीस्सा/अनुभव लीहला आहे, लवकरच डीकवतो.
12 Jul 2016 - 1:59 pm | शलभ
छान अनुभव. आणि लिहिलात ही छान.
12 Jul 2016 - 2:22 pm | कैलासवासी सोन्याबापु
हा अनुभव आपणांस कोणी सांगितला सुंड्या साहेब!?
(आपली परवानगी गृहीत धरून प्रश्न विचारतोय)
12 Jul 2016 - 6:48 pm | जव्हेरगंज
मस्त!
12 Jul 2016 - 11:08 pm | सुंड्या
शलभराव, जव्हेरगंज साहेब प्रतीसादाबद्दल धन्यवाद,..
@सोन्याबापू- मला 'साहेब' उपाधी लावल्याबद्दल धन्यवाद आणि या लिखाणाबाबत- प्रश्न टीका टिप्पणी शुद्धलेखन सूचना इत्यादी जे काही असेल ते परखडपणे व्यक्त करणे वाचकाचा हक्क आहे असे मी मानतो तेव्हा 'परवानगीची' तमा न बाळगता वाचकांनी त्यांचे मत/प्रश्न इथे मांडावे, जसे जमेल तसे उत्तर/सुधारणा करण्याचा मी प्रयत्न करेन.(आपल्या प्रश्नाचे उत्तर व्यनि द्वारे देतोय.)