===================================================================
ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! :
०१ : प्लोव्हरची महाभरारी... ०२ : महाभरार्यांबद्दल थोडेसे...
०३ : प्रवासी पक्षांची दिशादर्शक प्रणाली... ०४ : डोळे हे चुंबकीय गडे !...
०५ : बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात... ०६ : चिमुकल्या साँगबर्डचे नाव छोटे, लक्षण मोठे...
===================================================================
कदाचित, एक चिमुकलासा सुंदर साँगबर्ड हे गुपित उघड करायला शास्त्रज्ञांना मदत करेल !
प्रवासी पक्षांच्या मार्गांचे अनेक नकाशे आतापर्यंत नक्की केले गेलेले आहेत. त्यातले दोन बहुसंशोधित क्षेत्रांवरील मार्गांचे प्रातिनिधिक नकाशे खाली दिले आहेत...
...
डावीकडे : अमेरिका खंडावरून व त्याला लागून असलेल्या समुद्रांवरून जाणारे मार्ग आणि
उजवीकडे : प्रशांत महासागरावरून आणि त्याला लागून असलेल्या भूभागांवरून जाणारे मार्ग
पक्षांच्या वेगाचा त्याचे "शरीर" व "पंखांच्या आकार" यांच्याशी संबंध जरूर असणार हा तार्किक मुद्दा आपल्याला सहजी मान्य होतो. पण तरीही, अश्या सहज शक्य वाटणार्या दाव्यांच्या बाबतीतही, "कारण आणि परिणाम यांचे नाते (cause and effect relationship) सिद्ध करणारे सबळ शास्त्रीय पुरावे हवेतच" असा आधुनिक शास्त्राचा आग्रह असतो. वेगवेगळ्या पक्षांच्या संबंधात ही माहिती मिळण्यासाठी... त्यांची शारीरिक मोजमापे, त्यांचे मार्ग, त्यांनी प्रवासात दर दोन थांब्यामध्ये काटलेली अंतरे, दर थांब्यावर घेतलेला वेळ, त्या थांब्यासाठी असलेली कारणे, दर थांब्यावरचे खाणे, इ... अनेक मोजमापे व माहिती जमवणे आवश्यक ठरते.
वरच्या नकाश्यांतल्या मार्गांपैकी समुद्रावरून महाउड्डाणे करताना, सतत बदलणार्या लहरी हवामानामुळे, पक्षांना एकच एक मार्ग राखणे शक्य नसते. त्याचबरोबर, हवा खराब झाल्यास खाली उतरून, हवा सुधारल्यावर उड्डाण परत सुरू करण्याचीही सोय नसते. त्यामुळे, पक्षांनी काटलेले अंतर आणि त्यांचा वेगवेगळ्या वेळांचा वेग यांचा अंदाज लावणे बरेच कठीण असते. शिवाय पक्षांना प्रत्यक्ष पाहून अथवा पकडून मोजमापे घेणे तर केवळ अशक्य असते.
जमिनीवरून उड्डाण करणार्या पक्षांतही यातल्या बर्याच गोष्टी तुलनेने जास्त सुकर वाटत असल्या तरी प्रत्यक्षात तितक्याश्या सोप्या नसतात. कारण वर सांगितलेली निरीक्षणे आणि मोजमापे एका विशिष्ट पक्षामध्ये केली तरच ती मोजमापे शास्त्रीय विश्लेषणाला लायक असतात. "क्ष" पक्षाची "अ" जागेवरची निरीक्षणे आणि "य" पक्षाची "ब" जागेवरची निरीक्षणे शास्त्रीय विश्लेषणासाठी उपयोगी नाहीत. त्यासाठी "क्ष" या एकाच पक्षाची "अ", "ब", "क", "ड", इ जागांवरची निरीक्षणे आणि त्या प्रत्येक निरीक्षणाची वेळ माहीत असणे जरूरीचे असते.
विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानामुळे जिओलोकेटर सारखी साधनांचे आकार कल्पनेपलीकडे लहान होत चालले असल्याने, यासंबंधातील अनेक अडथळे दूर होत आहेत. अर्थातच जास्त विश्वासू संशोधन शक्य होत आहे.
तंत्रज्ञानाच्या या प्रगतीमुळे शक्य झालेला एक रोचक प्रयोग असा...
चिमुकल्या साँगबर्डचे नाव छोटे, लक्षण मोठे
साँगबर्ड किंवा ओसाईन्स (Oscines) या नावाने ओळखली जाणारी एक छोट्या आकाराच्या पक्षांची जमात आहे. सुमारे ५ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरील सर्व भूभाग गोंडवन नावाने एकत्रित होते तेव्हा ही पक्षीजमात आताच्या ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व अंटार्क्टिका या जागेवर उत्क्रांत झाली आणि नंतर सर्व जगभर पसरली. या पक्षांची लांबी (डोके ते शेपटीचे टोक) साधारणपणे १६ सेमी व विस्तारलेल्या पंखांचा आवाका २३-२९ सेमी असतो. म्हणजे हे पक्षी आकाराने चिमणीपेक्षा थोडेसे मोठे आहेत.
या पक्षीजमातीत अंदाजे ४,००० प्रजाती आहेत आणि त्या जेवढ्या त्यांच्या दृश्य गुणधर्मांवरून (आकार, रंग, पंखाचा विस्तार, इ) ओळखल्या जातात त्यापेक्षा जास्त त्यांच्या कर्णमधुर आणि कलापूर्ण गायनपद्धतीमुळे ओळखल्या जातात... जणू गायकीची वेगवेगळी घराणीच आहेत ती ! :)
...
स्वॅलोचा एक प्रकार (Hirundo_abyssinica) व इस्टर्न यलो रॉबिन (Eopsaltria australis)
आपल्या प्रियेशी संवाद साधण्यासाठी केले जाणारे कर्णमधुर आवाज हे या पक्षीजमातीचे खास वैशिष्ट्य आहे. त्यांच्या जमातीचे "साँगबर्ड" हे नाव त्यावरूनच पडलेले आहे. हे पक्षी पट्टीचे प्रवासीही आहेत. त्यामुळे, या पक्षांत पक्षीशास्त्रज्ञ आणि हौशी पक्षीनिरीक्षक या दोघांनाही भरपूर रस आहे. अर्थातच, या दोघांमधील सहकार्याचा उपयोग प्रवासी पक्षांसंबंधीचे ज्ञान वाढवण्यासाठी झाला आहे.
उत्तर अमेरिकेतले साँगबर्ड उन्हाळ्यात कॅनडात राहतात आणि तेथे थंडीचे दिवस येऊ लागले की दक्षिणेकडील उष्ण प्रदेशांकडे स्थलांतर करतात. त्यातले काही उत्तर अमेरिका खंडाच्या दक्षिण भागापर्यंतच जातात तर काही दक्षिण अमेरिका खंडातील विषुववृत्तीय जंगलांमध्ये पोहोचतात. त्यांच्या लहान आकारामुळे उपग्रह वापरून त्यांचा माग काढणे शक्य होत नाही.
नॅशनल जिओग्राफिक या संस्थेच्या सहकार्याने केलेल्या एका प्रयोगात कॅनडातील टोरोंटो येथील यॉर्क विद्यापीठातील एका Bridget Stutchbury नावाच्या संशोधकाने कल्पकता वापरून पक्षाच्या पाठीवर चिमुकल्या आकाराचे जिओलोकेटर बसवण्याचे तंत्र जगात सर्वप्रथम वापरले.
डाईमच्या (उर्फ १० अमेरिकन सेंट) नाण्यापेक्षाही छोटा (डाईमचा व्यास १७.९१ मिमी, जाडी १.३५ मिमी आणि वजन २.२६८ ग्रॅम असते) असलेला जिओलोकेटर पक्षाच्या दोन पायांना बांधलेल्या दोन चिमुकल्या पट्ट्यांनी पाठीवर असा बसवतात की त्याचा पक्षाच्या उडण्याच्या क्षमतेवर कोणताच परिणाम होत नाही. इतर माहितीबरोबरच जिओलोकेटर आजूबाजूच्या प्रकाशाची माहिती गोळा करतो. या माहितीवरून सूर्योदय-सूर्यास्ताची वेळ व त्यावरून पक्षाच्या स्थानाचे अक्षांश-रेखांश ठरवले जातात.
पाठीवर जिओलोकेटर बसवलेला वूड थ्रश प्रकाराचा नर पक्षी
अमेरिकेच्या पेनसिल्व्हानिया राज्यामधील वूड थ्रश प्रजातीच्या १४ आणि पर्पल मार्टीन प्रजातीच्या २० पक्षांच्या पाठीवर २००७ सालच्या विणीच्या हंगामात जिओलोकेटर बसवण्यात आले. विणीचा हंगाम संपल्यानंतर, पानगळीच्या मोसमात या पक्षांनी आपले स्थलांतर सुरू करून ते दक्षिण अमेरिकेत गेले व उत्तर गोलार्धातला २००८ सालचा उन्हाळा सुरू झाल्यावर आपल्या जागी परतले. प्रयोगातल्या परतलेल्यांपैकी वूड थ्रश प्रजातीच्या ५ आणि पर्पल मार्टीन प्रजातीच्या २ पक्षांना पकडण्यात शास्त्रज्ञ यशस्वी झाले. त्यांच्या पाठीवरील जिओलोकेटर्समध्ये साठवलेल्या माहितीवरून त्यांचे प्रवासाचे मार्ग व त्यावरील थांबे ठरवले गेले.
या माहितीचे विश्लेषण केल्यावर अनेक आश्चर्यकारक निष्कर्ष निघाले. त्यापैकी काही खालीलप्रमाणे होते :
१. साँगबर्ड एका दिवसात ५०० किमी पेक्षा जास्त अंतर उडून जाऊ शकतो. पूर्वी हे अंतर साधारणपणे १५० किमी असावे असा समज होता ! (ही माहिती "नेचर" या जर्नलमध्ये प्रकाशित झाली आहे.)
२. साँगबर्ड वसंत ऋतूमध्ये पानगळीच्या ऋतूपेक्षा २ ते ६ पट जास्त वेगाने उडू शकतो. उदाहरणार्थ, एका पर्पल मार्टीनला पानगळीत दक्षिणेकडील त्याच्या स्थानावर जायला ४३ दिवस लागले. पण वसंतातला परतिचा प्रवास त्याने केवळ १३ दिवसांत पुरा केला. हा पक्षी इतक्या वेगाने प्रवास करू शकेल असा अंदाज, या प्रयोगाअगोदर, अविश्वनिय समजला गेला असता !
३. दक्षिणेकडील स्थलांतरात सामान्यपणे मोठ्या वेळांचे (१ ते ६ आठवडे) थांबे असतात. परतिच्या प्रवासातले थांबे कमी लांबींचे असतात.
४. विणीच्या हंगामात एकाच स्थानावर असणारे साँगबर्ड त्यांच्या उष्ण प्रदेशातील गंतव्यस्थानावरही एकमेकाच्या जवळच वस्ती करतात. अर्थातच, असे एखादे स्थान नष्ट झाले तर त्याचा दुष्परिणाम त्या थव्यातील पक्षांच्या संख्येवर होतो. ही माहिती केवळ पक्षीसंवर्धनासाठी उपयोगी नाही तर पर्यावरण र्हासाची सूचक (इंडिकेटर) आहे.
स्थलांतर करणार्या पक्षांच्या अभ्यासात जिओलोकेटर सारख्या नवीन तंत्रांनी क्रांतीकारी बदल घडवले आहेत. पूर्वी अशक्य समजले जाणारे प्रयोग आज शास्त्रीय अचूकतेने केले जाऊ शकत आहेत. त्यातून मिळणारी माहिती केवळ पक्षीजगतालाच नव्हे तर मानवजगतालाही वरदान ठरेल अशीच लक्षणे दिसत आहेत !
(समाप्त)
===================================================================
मुख्य संदर्भ :
०१. https://en.wikipedia.org/wiki/Plover
०२. https://www.allaboutbirds.org/guide/Wilsons_Plover/id
०३. https://cosmosmagazine.com/life-sciences/epic-journeys-plover
०४. https://cosmosmagazine.com/life-sciences/built-compass-helps-birds-find-...
०५. https://cosmosmagazine.com/life-sciences/why-do-birds-fly-v-formations
०६. https://en.wikipedia.org/wiki/Northern_bald_ibis
०७. https://www.learner.org/jnorth/weather/aborn/News.html
०८. http://phys.org/news/2009-02-songbirds-faster-video.html
०९. http://degruyteropen.com/researchers-relate-migration-performance-to-bod...
१०. https://en.wikipedia.org/wiki/Songbird
===================================================================
ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! :
०१ : प्लोव्हरची महाभरारी... ०२ : महाभरार्यांबद्दल थोडेसे...
०३ : प्रवासी पक्षांची दिशादर्शक प्रणाली... ०४ : डोळे हे चुंबकीय गडे !...
०५ : बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात... ०६ : चिमुकल्या साँगबर्डचे नाव छोटे, लक्षण मोठे...
===================================================================
लेखमालेतील सर्व फोटो लेखाखाली दिलेल्या यादीत उर्धृत केलेल्या जालावरील संदर्भलेखांतून
किंवा इतर जलस्रोतावरून घेतलेले आहेत.
===================================================================
प्रतिक्रिया
9 May 2016 - 9:45 am | प्रचेतस
हा भागही माहितीपूर्ण.
9 May 2016 - 10:21 am | एस
चौथा मुद्दा खरोखरच चिंतेचा विषय आहे. पुभाप्र.
9 May 2016 - 11:53 am | नाखु
माहीती तीही ललीत स्वरूपात दिल्याने जास्त मस्त वाटली नाहीतर एखाद सरकारी माहीतीप्त्रक वाटले असते.
9 May 2016 - 12:33 pm | मुक्त विहारि
+ १
9 May 2016 - 4:37 pm | सुखी
छान व वेगळी माहिती मिळत आहे या लेखमालेतुन...
9 May 2016 - 5:03 pm | अप्पा जोगळेकर
मस्तच.
9 May 2016 - 5:11 pm | शलभ
खूपच छान लेखमाला. तुमच्या सर्वात मोठ्या प्रवासाच्या लेखमालेची आठवण आली.
10 May 2016 - 1:09 pm | ज्ञानोबाचे पैजार
मस्त हा लेखही आवडला.
क्र. ४ च्या निष्कर्षावर खरोखरच गंभीर पणे विचार झाला पाहिजे.
पैजारबुवा,
13 May 2016 - 8:36 am | डॉ सुहास म्हात्रे
सर्व वाचकांसाठी आणि प्रतिसादकांसाठी धन्यवाद !
13 May 2016 - 10:11 am | पैसा
अतिशय माहितीपूर्ण
13 May 2016 - 6:13 pm | सुबोध खरे
खूपच छान लेखमाला.
सहाही भाग आतुरतेने वाचून काढले होते
प्रतिसाद देण्यासाठी उशीर झायाबाद्द्ल क्षमस्व
१०० भागापर्यंत मालिका चालूच ठेवा अशी विनंती.
16 May 2016 - 5:53 pm | पद्मावति
खूप माहितीपूर्ण.
9 Sep 2016 - 12:11 pm | डॉ सुहास म्हात्रे
46-birds-fall-from-sky-in-Boston/articleshow/54210878.cms">46 birds fall from sky in Boston
मॅसेच्युसेट्सच्या डोरचेस्टर प्रभागात ४६ सॉंगबर्ड्स आकाशात उडताना खाली पडलेले सापडले. त्यातले काही मृत पावले होते तर काही आजारी होते. शहराचा आरोग्यविभाग असे का झाले असावे याबाबत तपास करत आहे.