४ वाजतात. मी पीसी बंद करून उठतो, ऑफिस मधल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या जातात. अरे हा आज इतक्या लवकर कलटी? मी त्या नजरा जाणीवपूर्वक टाळतो.आज मनस्थितीच विचित्र असते, त्यात अजून बसून काम करणं मला तरी निदान शक्य नसतं . कामाचं टेन्शन झेपत नाहीये कि बाकीच्या टेन्शन मुळे काम झेपत नाहीये , काहीच कळत नाहीये.
खाली येतो आणि बाहेर चालू लागतो, बाहेर भन्नाट हवा सुटलेली असते, पण सगळे उष्ण वारे , हम्म उन्हाळा सुरु झाला तर मी स्वतःशीच पुटपुटतो. आज चालत जाऊया नाहीतरी लवकर निघालो आहे. उन्हाची तीव्रता आता बरीच कमी झालेली असते, पण सुर्यनारायण मात्र अस्ताला जाण्याआधी मस्त त्याची चित्रकलेची हौस पुरवून घेत असावा, आकाशात केशरी,निळसर, अश्या अनेक रंगांची जणू रंगपंचमी सुरु होती, अहाहा काय निसर्गाचा चमत्कार आहे !!! पण साला मनात कसलं मळभ साठलंय देव जाणे, चालता चालता, विचारांचे घोडे चौखूर उधळलेले असतात.
कधी कधी एखाद्या सकाळी प्रचंड ढग आकाशात गोळा होतात, सोसाट्याचा वारा सुटतो, गडगडत, विजा चमकतात पण अख्खा दिवस पाऊस काही पडत नाही,जीवाची काहिली मात्र होत राहते , तसच काहीस झालंय. भरपूर रडावस वाटतय, पण छ्या, मी आणि रडू ? मनातला पुरुषी बाणा जागा होतो. का रडू नये? पुरुषाला भावना नसतात ? त्या काय फक्त दारू पोटात गेल्यावर बाहेर काढायच्या असं थोडी आहे? अनेक म्याचो म्यान बार मध्ये पोरींच्या वरताण रडताना पाहिलेले आहेत मी.
मनात द्वंद सुरूच असत. गाडीच्या आवाजाने मी दचकतो, विचारांच्या तंद्रीत न बघतच रस्ता क्रोस करत होतो. वा काय गाडी आहे, जवळ जवळ ४०-५० लाखांची सहज असेल, काय आरामदायक आयुष्य आहे यार, गाडी निघून गेल्यावर मी नजरेआड होईपर्यंत बघत बसतो , नक्की कोणीतरी श्रीमंत बापाचा पोरगा असणार , नुसता पैसा! सकाळी उठून रात्री झोपेपर्यंत पैसा कसा खर्च करावा याचाच विचार करत असतील साले.
टिपिकल मध्यमवर्गीय विचार सुरु होतात. नाहीतरी साले आपण रोज सकाळी उठलं कि ७.२८ ची लोकल पकडायची जीवघेणी शर्यत, किडा मुंगी सारख स्वतःलाच चिरडून घ्यायचं, भयानक स्पर्धेत स्वतःला लोटून द्यायचं, दिवसभर गुरासारख राबायचं आणि रात्री कधीतरी दमून असंच चिरून चिरडून घरी यायचं . घरचे बिचारे तोपर्यंत झोपलेले असतात, कोणाशी संवाद नाही , थट्टा मस्करी नाही, काहीच नाही, सगळे मिळून पत्ते खेळून सुद्धा २ ३ वर्ष सहज झाली असतील, हल्ली ऑनलाईन गळाभेटी होतातच, एकमेकांना "लाईक" केलं कि विषय संपला. सालं आरामात जाऊन झोपायला तर अजून हक्काचं घर सुद्धा नाहीये. राहतं घर खाली कराव लागेल कि काय अशी परिस्थिती. आजूबाजूचे गगनचुंबी इमले बघत उगाचच त्यात राहणार्यांचा हेवा वाटतो. मनातला कडवट पण वाढतच असतो, स्टेशन येत तसं गजबजाटाने भानावर येतो. मुकाट खाली मान घालून ट्रेन ची वाट बघत बसतो.
एका कोपऱ्यात एक भिकारी बाई बसलेली असते साधारण तिशीची, बाजूला एक छोटंसं नंगु पोर, आणि छातीची कवटाळलेलं एक तान्हुल, तिच्या चेहऱ्याची गालफड बसलेली, शरीर फाटके कपडे आहेत , म्हणून दिसतंय एवढी परिस्थिती, केसांचा अवतार, डोळ्यात कसल्याच भावना नाहीत, भिकार्यांच्या डोळ्यात निदान लोचट , पैसे मिळतील अश्या भावना मी बघितलेल्या आहेत, पण अशी स्वप्न शून्य नजर.. बापरे अंगावर शहारा येतो. ते तान्हुलं तिला लुचायचा प्रयत्न करत असतं, आणि माउली तशीच बसून, त्याची भूक कशी भागेल? मी पटकन रिक्षाचे वाचवलेले पैसे त्या नंगु पोराच्या हातात टेकवतो, ते उद्या मारत परत तिच्याकडे जात, पण तिच्या चेहर्यावरची रेषही हलत नाही , मला तो प्रकार असह्य होतो, ट्रेन येतंच असते, मी पटकन आत शिरतो, लवकर निघाल्याने ट्रेन बरीचसी रिकामीच असते , मस्त विंडो सीट मिळते.
लोकल सुसाट सुटते , खिडकीतून वर आल्यावर जरा बरं वाटत. समोर कॉलेजचा कंपू बसलेला असतो, नुसता दंगा माजवलेला असतो त्यांनी, एकमेकांची खेचत, थट्टा मस्करी करत , अख्या डब्याच लक्ष वेधून घेतलेलं असत, मधेच एक दोघे जण माझ्याकडे बघत असतात, मीच त्यांच्यासमोर एवढं खत्रूड आणि निर्विकार थोबाड घेऊन बसलो असेन म्हणून असेल कदाचित
परत पावसाची आठवण येते, त्यांचा आनंद जल्लोष पाहून , बाहेर मुसळधार पाऊस बरसतोय, आणि मी कोरडा राहून खिडकीतून बघतोय , तशीच माझी अवस्था असते . बाजूला लक्ष जात, एक प्रेमी युगुल त्याच्याच विश्वात गुरफटलेलं असत, तो तिला सारख चिडवत असतो, ती मधेच चिडायची, मधेच हसायची, मधेच तोंड फिरवून खिडकी बाहेर बघायची, पण तिचा त्याच्या हातातला हात मात्र तसाच, जणू जन्मोजन्मीची साथ देण्यासाठीच गुंफलेला. तीच लक्ष
माझ्याकडे जात, मी गोंधळून चटकन नजर फिरवतो.
गाडीने ठाणे सोडलेले असते, समोरचा कंपू पण उतरून गेलेला असतो, एखादा कुशल शिंपी ज्याप्रमाणे समोरचं कापड कुशलतेने सरसर कापत जातो, तसाच निसर्गाचा विशाल पट्टा कापत ट्रेन भरधाव निघालेली असते, चला आता २० मिनिटात डोंबिवली! बाहेर खाडी दिसत असते , आणि परत सूर्यनारायणाच दर्शन होत , त्याचा केशरी रंग इतका लोभस दिसत असतो कि बस , खाडीच पाणी सुद्धा केशरी रंगात नटलेल असत, मी पटकन दोन तीन फोटो काढतो मोबाईलवर , पण नीट येत नाहीत , असो शक्य तेवढ्या कटू आठवणी दूर करण्याचा प्रयत्न सुरु असतो. बोगद्यातून गाडी बाहेर येते आणि मुंब्रा देवीचा डोंगर दिसू लागतो .
नकळत हात जोडले जातात, "सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके ........ "
हे त्रम्बिके, नारायणी सर्वांचं मंगल कर. "जो जे वांछील तो ते लाहो" खरं आहे, सर्वांना सर्व काही मिळो, सर्व स्वप्न पूर्ण कर, त्या समोरच्या जोडप्याला कधीही वेगळं करू नकोस, विचार उलट सुलट कोणाबद्दलही येत असतात .
ठाकुर्ली येत मी उतरतो . घरी पोहोचल्यावर आई दरवाजा उघडते ,
" अरे मन्या तू? इतक्या लवकर ? तब्येत बरी आहे ना? थांब पाणी आणते, बाबा सुद्धा आलेले असतात, ते सुद्धा विचारतात का रे असा दिस्तोयेस , बॉस ने झापला कि काय? मी हसतो. आई बाहेर येत म्हणते , अहो आता तो आलाय ना लवकर बरंय ना, रोज ११ वाजतात बिचाऱ्याला, मन्या तुला मस्त चहा टाकते हे पण घेतील अर्धा कप ! पोहे करू का पटकन ? बाबा पटकन पोहे आणा ना जरा खालून ,संपलेत आणि मला कॉफी ची दोन पाकीट पण आणा, आईची धावपळ बघतच बसतो, बाबा कधीच खाली सटकलेले असतात, मी हातपाय धुवून ग्यालरीत उभा राहतो, समोरची झाड केशरी उन्हात रंगलेली असतात, एका फांदीवर घरट्यात चिमणा चिमणी आणि त्यांचं पिल्लू चिवचिवाट करत असतात,
.
.
.
.
.
.
आणि आत, मनात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली असते
प्रतिक्रिया
18 Mar 2011 - 7:36 am | चित्रा
फारच छान. लेखन आवडले.
18 Mar 2011 - 7:39 am | अर्धवट
>> आणि आत, मनात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली असते
मस्त..
18 Mar 2011 - 7:48 am | गणेशा
लेखन आणि प्रत्येक गोष्टीतील बारीकता आवडली ..
18 Mar 2011 - 7:48 am | शिल्पा ब
छान लिहिलंय...एकदम सेंटी!!
18 Mar 2011 - 7:54 am | विनायक बेलापुरे
दुनिया बनाने वाल्ले
क्या तेरे मन मै समायी
काहे को दुनिया बनायी
:)
18 Mar 2011 - 8:09 am | मनीषा
मनातला पाऊस ... आवडला !
18 Mar 2011 - 8:55 am | नगरीनिरंजन
व्वा, स्पावड्या! रोजच्या आयुष्यातले (हिंदीत याला चपखलपणे रोजमर्राकी जिंदगी म्हणतात) अनुभव मस्त लिहीलास. तुझ्या लिखाणातल्या प्रामाणिक साधेपणामुळे ते अगदी निर्लेप वाटते.
बाकी आयुष्यात ऊन-पाऊस चालायचेच रे.
9 Jan 2014 - 7:36 pm | राजेंद्र मेहेंदळे
स्पा
मानवी स्वभाव जरा विचित्र आहे. माणुस प्रथम चाकोरीत रुळायला धडपडतो आणि मग त्याच त्या चाकोरीचा त्याला कंटाळा येउ लागतो. मला वाटते तुमची चाकोरीबाहेर पडायची वेळ झाली आहे..मग ती व्यक्तिगत आयुष्यात असो किवा कॉर्पोरेट.....घे भरारी
18 Mar 2011 - 9:18 am | प्रचेतस
एव्हढंच सांगतो.......
स्पावड्या रॉक्स.........!
18 Mar 2011 - 9:50 am | कुंदन
भारी लिवलयस रे .
18 Mar 2011 - 9:57 am | सहज
लेख आवडला.
18 Mar 2011 - 9:59 am | गोगोल
सुंदर लिहिलय.
हरू नको..लढत रहा.
18 Mar 2011 - 10:27 am | मी_ओंकार
मस्त...
- ओंकार.
18 Mar 2011 - 10:33 am | अभिज्ञ
मस्तच.
मुक्तक फार आवडले.
अजून येउ द्यात.
अभिज्ञ
18 Mar 2011 - 10:42 am | sneharani
सुंदर लिहलय! मस्तच!
18 Mar 2011 - 10:44 am | चावटमेला
मस्तच!!! खूप आवडले..
18 Mar 2011 - 10:57 am | प्रीत-मोहर
मस्तच रे मन्या स्पायल्या :P
18 Mar 2011 - 11:05 am | इरसाल
अतिशय सुन्दर छान
18 Mar 2011 - 11:24 am | मुलूखावेगळी
असेच कायम पावसात भिजत रहा. :)
मस्त लिहिलेस.
18 Mar 2011 - 11:31 am | वपाडाव
अव्वल....
18 Mar 2011 - 11:37 am | ब्रिटिश टिंग्या
मस्त!
18 Mar 2011 - 12:06 pm | पियुशा
मस्त लिहिलय
मनाला भिडलय !
:)
18 Mar 2011 - 12:34 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
सुंदर लेख..... भिडला मनाला.....
18 Mar 2011 - 12:41 pm | सविता००१
मस्त लेख . अतिशय आवडला.
18 Mar 2011 - 12:41 pm | सूड
छान !!
18 Mar 2011 - 12:48 pm | सुधीर१३७
नि:शब्द..................
18 Mar 2011 - 12:49 pm | इंटरनेटस्नेही
मस्त! मस्त! मस्त! मनातल्या भावना कागदवर उतरवण्यात स्पा नेहमी प्रमाणे यशस्वी झाला आहे. आजुबाजुच्या जीवनाचे चित्रण तर अप्रतिमच!
मस्त! कथा आवडली! :)
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
18 Mar 2011 - 12:50 pm | गणपा
मुक्तक आवडले. :)
18 Mar 2011 - 1:07 pm | अवलिया
मस्त !!
18 Mar 2011 - 1:18 pm | महेश हतोळकर
मस्त रे! आवडलं
18 Mar 2011 - 1:26 pm | मृत्युन्जय
स्पावड्या मस्त लिहितोस की रे. आवडले एकदम.
18 Mar 2011 - 1:43 pm | योगेश सुदाम शिन्दे
झक्कास ....
18 Mar 2011 - 2:20 pm | स्मिता.
मुक्तक खूप आवडले.
खरंच कधीकधी मनाची अशीच अवस्था होत असते. तीला शब्दात मांडणं तसं अवघड आहे. पण हे वाचताना वाटत होतं की मी ते सगळं अनुभवतेय!
18 Mar 2011 - 2:20 pm | परिकथेतील राजकुमार
स्पावड्या भावड्या मनातले सगळे अगदी सुंदर कागदावर उतरवले आहेस :)
लेखन एकदम भावले.
*शक्य झाल्यास थोडे पॅरिग्राफ वगैरे सोडून सुटसुटीत लिहायचा प्रयत्न कर. खुप गिचमीड वाटत आहे हे*
18 Mar 2011 - 5:22 pm | गवि
स्पा..
सुंदर.
Lovely..
18 Mar 2011 - 5:29 pm | सुहास..
भावले लिखाण !!
18 Mar 2011 - 6:48 pm | निनाद मुक्काम प...
मन्या तुला मस्त चहा टाकते हे पण घेतील अर्धा कप ! पोहे करू का पटकन ?
''आणी काय हवे रे मन्या तुला ?
गाडीने ठाणे सोडलेले असते, समोरचा कंपू पण उतरून गेलेला असतो, एखादा कुशल शिंपी ज्याप्रमाणे समोरचं कापड कुशलतेने सरसर कापत जातो, तसाच निसर्गाचा विशाल पट्टा कापत ट्रेन भरधाव निघालेली असते, चला आता २० मिनिटात डोंबिवली! बाहेर खाडी दिसत असते , आणि परत सूर्यनारायणाच दर्शन होत , त्याचा केशरी रंग इतका लोभस दिसत असतो कि बस , खाडीच पाणी सुद्धा केशरी रंगात नटलेल असत, मी पटकन दोन तीन फोटो काढतो मोबाईलवर , पण नीट येत नाहीत , असो शक्य तेवढ्या कटू आठवणी दूर करण्याचा प्रयत्न सुरु असतो. बोगद्यातून गाडी बाहेर येते आणि मुंब्रा देवीचा डोंगर दिसू लागतो . नकळत हात जोडले जातात,
ह्यासाठीच कुर्ला ते डोंबिवली प्रवास मी दरवाजाला लटकून करतो .अगदी बसायला खिडकी मिळाली तरी सुद्धा .
दिव्याला दादू हाल्याची खानावळ हा बोर्ड लहानपणापासून वाचत आलो आहे .पण कधी तेथे उतरून जायचा धीर झाला नाही .
जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद
18 Mar 2011 - 7:21 pm | श्रीराम गावडे
खुप सुंदर
खुप दर्जेदार
लगे रहो स्पाभाई.
18 Mar 2011 - 7:25 pm | पैसा
छान रंगवलीस "एक संध्याकाळ" जी रोजच नव्याने येते!
18 Mar 2011 - 7:40 pm | टारझन
तुमच्यात चांगलं लिहीण्याची ताकद दिसली .
- पा
18 Mar 2011 - 9:29 pm | प्राजु
हा लेख म्हणजे रीड बिटविन्न द लाईन्स आहे..
जबरदस्त!! खूप सुंदर लिहिले आहेस...
घरी असे वातावरण अनुभवल्यावर मनातला दडपलेला पाऊस कोसळायलाच हवा!! :) जियो!!
18 Mar 2011 - 10:02 pm | स्पंदना
जीयो भाय !! जीयो !
18 Mar 2011 - 10:45 pm | पुष्करिणी
मस्तच रे स्पावड्या , छान लिहिलयस !
18 Mar 2011 - 10:56 pm | आनंदयात्री
अरे वा. इतके छान लिहतोस माहिती नव्हते.
मस्त लिहलं आहेस ? एकटाकी लिहलं ना ?
19 Mar 2011 - 12:01 am | नंदन
छान लिहिलं आहेस रे, स्पावड्या. प्रामाणिक, आतून आलेलं मुक्तक.
19 Mar 2011 - 6:01 pm | प्रदीप
म्हणतो. अगदी आतून आलेले मुक्तक आवडले.
19 Mar 2011 - 7:14 am | बिपिन कार्यकर्ते
सुंदर! सुंदर!! सुंदर!!!
19 Mar 2011 - 2:34 pm | अप्पा जोगळेकर
काय भारी लिहिलंय राव. १०० पैकी १०० मार्क.
वर्किंग डे ला रिकाम्या लोकलचा प्रवास म्हणजे मनामधे विचारांची गर्दी हे समीकरण अगदी पक्क आहे.
19 Mar 2011 - 2:48 pm | पर्नल नेने मराठे
छान ल्हिलेस !!!
19 Mar 2011 - 3:26 pm | ५० फक्त
स्पावड्या, लई भारी लिहिलं आहेस, असे विचार मनात येत असतात ते कुठंतरी उतरवत जा. असे विचार मनात साठले ना की युष्य फार अवघड वाटायला लागतं उगाचच.
बाकी आज होळी उद्या सुट्टी काय बेत आहे, डोंबिवली एमाय्डिसिच्या नाक्यावरचं हॉटॅल नंदि पॅलेस ना तिथं पुजा आणि पार्टी असते असं ऐकलंय मी. जा बेट्या ऐश कर ऐश कर.
19 Mar 2011 - 10:27 pm | चिगो
मस्तच लिहीलयंस स्पाऊ भाऊ...
आवडेश..
20 Mar 2011 - 1:16 am | मेघवेडा
वा रे वा! अतिशय सुरेख, प्रामाणिक मुक्तक. छान लिहिलं आहेस. असंच लिहीत राहा. :)
20 Mar 2011 - 2:21 am | रेवती
मस्त लेखन!
21 Mar 2011 - 9:05 am | स्पा
सर्वांचे मनापासून आभार....
21 Mar 2011 - 3:27 pm | जागु
छानच रंगवल आहे मध्यमवर्गिय जिवन.
21 Mar 2011 - 3:50 pm | धमाल मुलगा
एकदम झक्कास रे!
च्यायला, इतकं जगात भारी लिहितोस खरं, मग नेहमी का नाही लिहीत रे? :)
बाकी, लेख वाचताना एक सल, एक जिद्द, एक आशा ह्यांचा सुरेख साक्षात्कार होत राहतो आहे.
और भी लिख्खो स्पा! :)
21 Mar 2011 - 9:17 pm | मराठमोळा
सिंपली सुपर्ब... :) मस्त.. एकदम आवडेश.
22 Mar 2011 - 11:44 am | हरिप्रिया_
मस्त लिहिलय....
:)
15 Jul 2011 - 4:31 pm | कवितानागेश
आधी वर काढलेल्या धाग्यांपेक्षा हे मुक्तक जास्त छान आहे!
:)
15 Jul 2011 - 5:14 pm | आत्मशून्य
असच, उगीच, सहजच पण मस्त (कूल) लेखन.
9 Jan 2014 - 12:20 pm | प्यारे१
स्पावड्या रॉक्स!
9 Jan 2014 - 1:03 pm | विटेकर
प्यारे भौ . इतका सुंदर लेख वर काढल्याबद्दल धन्स !
अत्यंत चित्रदर्शी !
परम मूर्खामाजी मूर्ख| जो संसारीं मानी सुख |या संसारदुःखा ऐसें दुःख| आणीक नाहीं ||४०||
9 Jan 2014 - 4:03 pm | मूकवाचक
+१
9 Jan 2014 - 2:29 pm | शरभ
मस्त स्पा. लोकलचा प्रवास म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. बर्याच आठ्वणींना उजाळा मिळाला. आणि लवकर निघुन घरी येई पर्यंतचा वेळ म्हणजे एकतर विचार नाहीतर झोप ! (अमंळ "शेलू"ची आठवण जाहली...)
9 Jan 2014 - 3:58 pm | बॅटमॅन
स्पावड्याचा इतका नितांतसुम्दर लेख वर काढल्याबद्दल प्यारे यांना बहुत धन्यवाद!!!
मस्त लेख रे. आवडेश जबराट!!!! लोकल प्रवासाचे भाग्य कधी वाट्यास आलेले नसले तरी असे वातावरण बघत गावाबाहेर सैकल ताबडवत जायचो ते दिवस आठवले....पंढरपूर रोड आणि मी व माझी सायकल. संध्याकाळची वेळ , दूरवर दिसणारा दंडोबाचा डोंगर आणि हळूहळू काळे होत जाणारे आकाश...ते सर्व मनात भरून घेत मग घरी पोहोचायचो. झोपताना पुन्हा मनात सगळं तस्संच...
छ्या राव, प्री-इंटरनेट दिवसांची आठवण करून दिलीत...पुण्यात ***** किमान वीसेक किमी दूर गेल्याशिवाय निसर्गच सुरू होत नै, लै डोस्कं फिरतं :(
9 Jan 2014 - 4:05 pm | कवितानागेश
येस. प्री-इंटरनेट दिवस!! :)
9 Jan 2014 - 5:51 pm | स्पा
बरोबर दोन वर्षापूर्वी लिहिलेलं आज एकदम वर आलं
प्यारे काका , आणि वल्ली धन्स :)
लीमौ म्हणते तसं प्री-इंटरनेट दिवस
आता सांगायला हरकत नाही , ह्या दिवशी कंपनीने हातात "हाकलपट्टी पत्र " ठेवलेलं होतं, बरोबर एक महिन्याच्या पगारासकट
( अर्थात देवाच्या कृपेने नंतर काही महिने मी अजून काम केलं तिथे ) पण आता दोन वर्षांनी आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन पूर्ण बदलला आहे
प्रत्येक क्षण भरभरून जगा बस्स...
जो दिवस येईल त्याकडे एक आव्हान म्हणून बघा
भविष्याची काळजी करा, चिंता करू नका
:)
9 Jan 2014 - 4:05 pm | अजया
ठाकुर्ली,आमचे स्टेशन...:( पावसाळे,संध्याकाळी,रोजची ६:५०ची स्लो...
9 Jan 2014 - 4:13 pm | वेल्लाभट
जियो !...........
काय लिहिलंयस मित्रा.....जबर्....
तुझ्या लेखनरूपी मल्हाराने आमच्या मनातही पाऊस कोसळला मित्रा.. क्लास.
9 Jan 2014 - 4:46 pm | प्यारे१
विटेकर काका, +१ मूवा, बॅटमॅन नि इतर.
आभार मानायचेच तर मा. श्री. वल्ली ह्यांचे मानावेत. खरा हक्क त्यांचा आहे.
त्यांनी http://misalpav.com/node/26690 'पाऊस असा रुणझुणता' वर स्पा च्या लेखाचा दुवा दिला होता.
9 Jan 2014 - 6:43 pm | प्रचेतस
:)
9 Jan 2014 - 8:37 pm | अत्रुप्त आत्मा
पांडुब्बाचं स्व भावपूर्ण लेखन. :)
10 Jan 2014 - 2:17 pm | नाखु
स्पा पेशल लिखाण.
1 May 2016 - 7:02 pm | Rahul D
"पण साला मनात कसलं मळभ साठलंय देव जाणे, चालता चालता, विचारांचे घोडे चौखूर उधळलेले असतात.
कधी कधी एखाद्या सकाळी प्रचंड ढग आकाशात गोळा होतात, सोसाट्याचा वारा सुटतो, गडगडत, विजा चमकतात पण अख्खा दिवस पाऊस काही पडत नाही,जीवाची काहिली मात्र होत राहते , तसच काहीस झालंय. भरपूर रडावस वाटतय."
हे आमच्या बाबतीत होत आहे.
1 May 2016 - 7:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
स्पा चांगलं लिहिता कि तुम्ही. तेवढं "तें"च्याकडे लक्ष दिलं असतत तर मनास मणभर संतोष जाहला असता.
1 May 2016 - 7:22 pm | वैभव जाधव
स्पा यांचे सुंदर मनापासून आलेले लिखाण!