पाऊस कधीचा कोसळतो अंतरात
काहूर अनामिक एक, दाटते स्पंदनांत...
'पाऊस' ह्या निसर्गाच्या अविष्कारातच जणू मला एक प्रकारची गूढरम्यता वाटते. परीक्षेत निबंध लेखनासाठी माझा आवडता ऋतू असा विषय असला की पावसाळा सोडून दुसरं काही खरडल्याचं स्मरणात नाही. आधी दादा, आणि नंतर लक्ष्मण, द्रविड, तेंडुलकर असे एक एक रथी महारथी एका पाठोपाठ निवृत्त झाल्यानंतर, मरगळून गेलेल्या भारतीय टीम मध्ये अचानक कुठूनसा विराट कोहली उगवावा (हो, कितीही उध्दट आणि माजोरडा असला तरी एक फलंदाज म्हणून तो आवडतो) आणि त्याने लाजवाब फटक्यांची आतषबाजी चालू करावी अगदी असंच काहीसं होतं जेव्हा ऊन्हाळ्यातल्या आग ओकणार्या सूर्याने रापलेल्या, म्लान होऊ घातलेल्या मातीवर टपोर्या थेंबांचा शिडकावा होतो आणि अक्षरशः वेड लावणारा मृद्गंध रंध्रारंध्रांत व्यापून जातो, महागडे, इम्पोर्टेड असली बिरुदावली मिरवणारे परफ्युम्स सुध्दा तिथे झक मारतात्. माझी एक फँटसी आहे, घराला मोठी गॅलरी असावी, बाहेर मस्त पाऊस चालू असावा, आणि हातात कॉफीचा वाफाळता मग घेवून खुर्चीत बसून , बशीतली गरम गरम कांदा भजी खात खात ( पाऊस , कॉफी अन भजी, काय होली ट्रिनीटी आहे ना )तासन तास फक्त बाहेर न्याहाळत बसावं. झाडांच्या फांद्यांवरून, पानापानांवरून ओघळणारा, रस्त्याच्या कडेने नागमोडी वळणे घेत वाहणारा, रिमझिम, मुसळधार, संततधार, भीषण, रौद्र अशा असंख्य रुपांनी बरसणारा पाऊस मनात साठवावा. एरवी येवढ्याश्या आवाजाने त्रासून जाणारा मी , पण खाली गळालेल्या शुष्क पानांवर जलधारा आपटल्यावर जो टप टप चा लयबध्द नाद होतो त्याने मात्र सुखावून जातो. मुळात पावसाची जातकुळी रोमॅन्टीक असावी, म्हणूनच तो कित्येक कवी, लेखक, गीतकारांना इन्स्पायर करतो, प्रियकराला प्रेयसीच्या जास्ती जवळ आणतो, जातीचाच सुंदर गुलाब, पण पाकळ्यांवर पावसाचे एक-दोनच थेंब पडले की एखादी लावण्यवती गालावरच्या तीळामुळे आणखीनच गोड दिसते तसाच टवटवीत होवून जातो. एरवी ओकेबोके वाटणारे डोंगर सुद्धा अगदी ब्युटी पार्लर मध्ये जावून आल्यासारखे दिसायला लागतात. ह्या पावसाला कधी कधी हुलकावणी द्यायची खोड येते, एखाद्या दिवशी असं अचानक अंधारून येतं, काळे कुळकुळीत ढग कुंद आभाळात दाटून येतात, मधूनच एखादी वीज लपंडाव खेळून जाते, सोसाट्याचा बोचरा वारा अंगात शिरशिरी भरतो. पण थोड्याच वेळात सगळं पुन्हा नॉर्मल. एखाद्या फ़ास्ट बॉलर ने जीवाच्या आकांताने धावत येवून सुंदर यॉर्कर टाकावा, फ़लंदाजाचा बूट चाटत त्याला काही कळायच्या आत त्याची दांडी वाकवावी आणि जल्लोष सुरू होतोय तेवढ्यात अगदी चंद्रचूड सिंग पेक्षाही मख्ख चेहऱ्याने अंपायरने नो बॉल चा इशारा करावा, असंच काहीसं होतं.
काही लोकांना पाऊस आवडत नाही. पावसाने रस्ते घसरडे होतात, सगळीकडे चिखल होतो, खड्ड्यांमध्ये पाणी साठते, गटारे तुंबतात, पूर येतात, सगळीकडे घाणेघाण होते, डास होतात, रोगराई पसरते इ. इ. अशा एक ना अनेक तक्रारी करतात. पण मला कधी ह्याचा त्रास वाटला नाही. कुठेतरी पावसाबद्दल एक प्रकारचा आपलेपणा जाणवतो. त्याला काहीतरी सांगायचं असतं, ढगांच्या पोटांत साठून साठून एक दिवस तो अनावर होतो आणि उभा आसमंत कवेत घेत घेत सहस्त्र धारांनी बरसत मनं आणि शरीरं दोन्ही चिंब इ करत सुटतो. माझं सुध्दा असंच होतं थोडंफार, खूप काही बोलायचं असतं, सांगायचं असतं, पण ब्रम्हदेवाने एक म्यान्युफ्याक्चरिंग डिफ़ेक्ट ठेवला कदाचित आणि बोलकेपणाचा कॉम्पोनंट टाकायला विसरला बापडा, असंच मग सगळं साठत जातं, आणि एकदिवस ढगफुटी होते आणि सगळं अस्ताव्यस्त कागदावर पसरतं.
पाऊस कितीही जोरात आणि भरभरून असला ना, तरी ना ओंजळीत पकडता येतो ना तो कधी अळवाच्या पानावर थांबतो, अगदी क्षणिक सुखासारखा, कितीही पकडायचा प्रयत्न केला तरी शेवटी तेच कोरडे पान आणि तीच रीती ओंजळ. ह्या क्षणिक सुखाच्या आठवणी मात्र एकदम उलट असतात, रेंगाळतच राहतात. ह्या तथाकथित सुखद आठवणीच डोळ्यांत पाणी का आणतात कोण जाणे , ओंजळ सोडून गेलेलं पाणी डोळ्यांतून बाहेर पडत असावं बहुतेक.
लहानपणापासून जसं मला आठवतं तसं आमचं राहतं घर पावसात खूप गळायचं, जागोजागी वाट्या, पातेली ठेवलेली असायची घर जास्त ओलं होवू नये म्हणून, तरीही भिंतींमधून ओल न चुकता हजेरी लावायचीच. ह्याचा सगळ्यांत जास्त त्रास आईला आणि आजीला व्हायचा. आजीचा दमा वाढायचा, आणि आईचं काम. मग आम्हीही कामाला लागायचो. तरीसुद्धा ना मला कधी त्या घराचा तिटकारा वाटला ना पावसाचा. वडील गेल्यानंतर जेव्हा ते घर विकायला काढलं, तेव्हा सौदा करताना शेवटी पाऊसच डोळ्यांत धावून आला.
असो, बाहेरचा पाऊस, अगदी चेरापुंजीतला सुध्दा दोन महिने तरी विश्रांती घेतो. पण आतल्या पावसाचं काय करायचं, तो तर सतत कोसळतच असतो, अगदी अविश्रांत….
प्रतिक्रिया
8 Jan 2014 - 9:26 pm | शुचि
काहीच्या काही सुरेख लिहीले आहे. खूपच आवडले.
8 Jan 2014 - 11:47 pm | कवितानागेश
खूपसे पाउस एकदमच आठवलेत...
8 Jan 2014 - 9:39 pm | वडापाव
खूप सुंदर!!
8 Jan 2014 - 10:06 pm | जेनी...
का विकलत ते घर ? ... दर वर्षीच्या नव्यानं बरसनार्या पावसातली मजा घ्यायला २ दिवसाची सुट्टी टाकुन जायला मिळालं असतं ...
ते घर असतं तर ...
9 Jan 2014 - 12:33 am | बहुगुणी
आज पाऊसही चालू आहे, घराला पडवी आहे, वाफाळती कॉफी आणि कांदा भजी पैदा करणंही जमू शकेल...
पर वो कंबख़्त वक़्त कहांसे पैदा करें :-( ??
9 Jan 2014 - 4:31 am | अर्धवटराव
कुठल्या परिच्छेदाला जास्त दाद द्यावी... ठरवणं कठीण आहे. अगदी सरीत बरसला अंतर्यामी पाऊस.
9 Jan 2014 - 6:09 am | इन्दुसुता
मुक्तक आवडले.
पण आतल्या पावसाचं काय करायचं, तो तर सतत कोसळतच असतो, अगदी अविश्रांत….blockquote>
तंतोतंत!!
9 Jan 2014 - 11:23 am | प्रचेतस
सुरेख मुक्तक.
स्पावड्याचे एक असेच सुरेख ललित आठवले.
एक संध्याकाळ
9 Jan 2014 - 11:28 am | मिसळलेला काव्यप्रेमी
झकासच लिहीले आहे.
हे वाचून मला माझा पाऊस आठवला.
9 Jan 2014 - 11:41 am | michmadhura
पण आतल्या पावसाचं काय करायचं, तो तर सतत कोसळतच असतो, अगदी अविश्रांत…...////हे खासच.
9 Jan 2014 - 12:13 pm | अनुप ढेरे
व्वा.. मजा आली वाचून! मस्तं!
9 Jan 2014 - 12:21 pm | प्यारे१
सु रे ख!
9 Jan 2014 - 3:30 pm | सूड
छान !! आता पर्यंतचे सर्व पावसाळे डोळ्यासमोरुन गेले.
9 Jan 2014 - 3:47 pm | अजया
आवडलं!
9 Jan 2014 - 4:22 pm | प्रभाकर पेठकर
सुंदर प्रकटन. पावसाच्या भावानांना फार छान शब्दबद्ध केलं आहे.
>>>>वडील गेल्यानंतर जेव्हा ते घर विकायला काढलं, तेव्हा सौदा करताना शेवटी पाऊसच डोळ्यांत धावून आला.
हृदयस्पर्शी....
15 Jan 2014 - 10:56 am | पैसा
खासच लिहिलंय!
15 Jan 2014 - 11:46 am | प्रीत-मोहर
खरोखरच मस्त लेख. माझा स्पेशल पाउस आठवला....
16 Jan 2014 - 12:02 am | निनाद मुक्काम प...
पाऊस , कॉफी अन भजी,
काहीच्या काही
हे म्हणजे उद्या जर्मन केक्स सोबत चहा क्या बात हे असे म्हणणे होईल.
कांद्याची भजी व वाफाळता चहा ह्याला तोड नाही
बाकी लेख आवडला.
16 Jan 2014 - 12:56 am | नेहा_ग
क्या बात है.. सुरेख
17 Jan 2014 - 10:53 am | बर्फाळलांडगा
खरोखर भिजवून टाकलत।
17 Jan 2014 - 12:03 pm | सस्नेह
सहमत !
17 Jan 2014 - 12:06 pm | बरखा
"प्रियकराला प्रेयसीच्या जास्ती जवळ आणतो"
रिमझिम बरसण्या-या पावसाच्या सरीत
दोघा॑नी ओलेचि॑ब व्ह्यायचे आहे,
मग थोडावेळ झाडाच्या अडोशाला बसायचे आहे,
गारव्याने शहारण्या-या तुझ्या देहाला
माझ्या मिठीच्या ऊबेने था॑बवायचे आहे,
रिमझिम बरसण्या-या सरी था॑बे पर्य्॑त
तास न तास असेच बसायचे आहे... :-[