एका सत्यकथेचा काल्पनिक उत्तरार्ध
ट्रेन येण्याची वेळ झालीच होती. आळस झटकत अनिल तयारीत उभा राहिला. आजूबाजूला नजर टाकत असतानाच मोठाली बॅग संभाळत येत असलेल्या त्या स्त्रीकडे त्याची नजर गेली. तिचंही त्याच्याकडे लक्ष गेल आणि नजरभेट झाली.
काही क्षण दोघे थबकले. नंतर स्वतःला सावरत त्याच्या बाजूने निघून ती पुढे गेली आणि काही अंतरावरच उभी राहिली.
अनिलला क्षणभर काही सुचलं नाही , त्याने अस्वस्थ होवून पुन्हा एकदा तिच्या दिशेनं पाहिलं. शंकेला काही वाव नव्ह्ताच ..निशा.. हो, निशाच होती ती. आज दहा वर्षानंतर अचानक ..
अनिलला काहीच सुचत नव्हते , नजर पुन्हा पुन्हा तिलाच बघत होती. पुन्हा एकदा नजर भेट झाली. अनिल चपापला आणि दुसरीकडे पाहू लागला.
मनाने तो दहा वर्षे मागे गेला होता..
निशा..सावळा रंग , सडपातळ बांधा, पाणीदार डोळे.. विशेष सुंदर नसूनही लाघवी व्यक्तीमत्वामुळे असलेली आकर्षकता.
"आताही निशा तशीच दिसत होती का ? की वाढलेल्या वयाच्या काही खुणा होत्या चेहर्यावर ? काही नीट कळलंच नाही. पण तेच पाणीदार डोळे ...कधी काळी त्या डोळ्यात माझ्याबद्दलचा अपार स्नेह, आपुलकी असयची"
"निशाने ओळखले असेल का मला ? ...ओळखलेच असेल म्हणा. न ओळखण्यासारखे काय आहे ? "
"गेली दहा वर्षात तिने कोणताच संपर्क ठेवला नव्हता. आता आज अचानक इथे योगायोगाने समोर आलीये.. कदाचित माझ्याच ट्रेनला असेल..कदाचित का नक्कीच असेल नाहीतर ट्रेन पकडण्याच्या तयारीत का उभी राहिली असती. आणि ट्रेनच काय डबाही एकच असावा...कदाचित सीटपण शेजारीच असेल का ? छे.. मी पण काय विचार करतोय. इतके जास्त योगायोग सिनेमातच होतात...आणि ..नको..नकोच ती शेजारी. मला बाजूला बघून ती कुणासोबत तरी सीट बदलून घेईल नक्कीच किंवा तीन-चार तास शेजारी बसूनही परकीच असेल. त्यापेक्षा नकोच"
नजर पुन्हा तिच्याकडे वळत होती.
तो स्वतःला समजवू लागला "आता सगळं संपलय.. ती बोलणार नाहीये माझ्याशी..कदाचित ओळखणार पण नाही. 'कोण अनिल' हे ही तिला आठवत नसेलच आता... हो नाहीच आठवणार तिला..आणि मलाही आता काही देणं घेणं नाही तिच्याशी.. चलो. त्यापेक्षा उद्याच्या कामाचा विचार करायला हवा ऑफिसमध्ये महत्वाची काम आटपायची आहेत उद्या.." तितक्यात ट्रेन आली.
३ x २ चेअर कारमधल्या २ सीटकडल्या बाजूला त्याची सीट खिडकीजवळ होती. शेजारच्या सीटवर कुणी वयस्कर गृहस्थ बसलेले पाहून त्याला बरे वाटले पण तरी काहीशी हुरहुरसुद्धा वाटली. बसताना त्याची नजर तिला शोधत होती. ती थोडी दूर कुठल्यातरी सीटवर बसताना त्याने पाहिले.
एका दीर्घ श्वास सोडत त्याने मनातले विचार झटकण्याचा प्रयत्न केला. गाडी चालू लागली. त्याने कानाला इअरप्लग लावलेत आणि त्याच्या बोटांनी आपसूकच मोबाईलवर त्या गाण्यापर्यंत पोहोचलीत..
"ढोलक मे ताल है पायल मे छनछन.."
एकाच वेळी उत्साह आणि वेदना व्यक्त करणारा उदितचा स्वर ऐकताना त्याची बोट ताल धरु लागली
"प्यार मिला प्रीत मिली..मेरे यारको ...बडी प्यारी जीत मिली मेरे यारको"
निशाच्या लग्नाच्या वेळी मनात निर्माण झालेली हुरहुर पुन्हा एकदा जाणवली
"साथी सखिया बचपन का ये अंगना, गुडिया झुले कोईभी तो होगा संग ना, छुपाउंगी आसू कैसे भिगेगे कंगना"
... डोळे मिटून अलका याज्ञिकचा स्वर ऐकताना मंदिरात लग्नाच्यावेळी हळवी झालेली निशा आठवली...
इतक्यात शेजारी कसलीशी हालचाल जाणवली त्याने डोळे उघडले , इअरप्लग काढलेत.शेजारचे गृहस्थ वरुन बॅग काढून चालू लागले होते आणि बाजूलाच उभी असलेली निशा त्यांना "थॅंक यू काका..थँक्स अ लॉट" म्हणत त्या जागेवर बसली.
"चालेल ना मी इथे बसले तर ?" गोंधळलेल्या अनिलकडे बघत निशाने विचारले.
त्याच्या तोंडून शब्दच फुटू शकला नाही.
"असं का बघतोयस माझ्याकडे ? ओळखलं नाहीयेस का मला ?" काहिसा ताण तिच्याही चेहर्यावर निश्चितच जाणवत होता.
त्याच्या थंड पडलेल्या हातांना कंप जाणवत होता.
"ओळखलं ना" तो कसंबसं बोलला. इअरप्लग्ज गुंडाळून त्याने बॅगेत ठेवले आणि खिडकीतून बाहेर बघू लागला.
काही वेळ तसाच गेला.
"अनिल..." त्याचं नाव घेवून हाक मारण्याची तिची एक खास लकब होती. तिने त्याचं नाव उच्चारलं की खूप आपलेपणा वाटायचा त्याला ते ऐकताना. आजही तोच आवाज, तीच हाक कानी पडत होती.
त्याने तिच्याकडे पाहिले पण तिचे नाव त्याच्या तोंडून उच्चारु शकत नव्हता. त्याच्या सर्व भावनांना कुणीतरी सक्तीने बांध घातले होते.. आता तिचे नाव उच्चारणेही त्याला शक्य होत नव्हते.
"मी इथे बसलेली तुला नाही आवडलं का ? मी जावू का दुसरीकडे"
तिच्या प्रश्नात तक्रार वा नाराजी नव्हती. पण तो तिचं उत्तर नाही देवू शकला.
त्याच्या डोळ्यात पाणी तरारलं.
तिच मन हेलावलं, त्याचे हात हातात घेण्यासाठी तिने हात पुढे केले. पण आपसूकच पुन्हा मागे घेतले.
अनिल.. तिच्या आयुष्यातला सर्वात जवळचा, सर्वात विश्वासाचा मित्र..ज्याच्याशी ती सगळे सुखदःख हक्काने वाटायची तो तिचा आधार. अतिशय हळवा पण तिच्या पाठीशी उभा राहताना तितकाच खंबीर. इतरांशी अनेकदा तुटकपणे , सडेतोडपणे वागणारा अनिल तिच्यासमोर जणू मऊ लोण्याचा गोळा व्हायचा.
"या वेदना त्याला मीच दिल्या आहेत. पण आता त्या जखमांवर इतक्या वर्षांनी फुंकर घालणं इतकं सोपं नाही.." अपराधीपणाची भावना निशाला अस्वस्थ करीत होती.
"पण आज मला बोलायला हवं.. अपराधीपणाची ही खदखद अनेक वर्ष माझी सोबत करत आहे..पण आता नको.."
"अनिल.." निशाचा स्वर हळवा झाला होता
पाणावलेल्या डोळ्यांना आवरु पहात अनिलने तिच्याकडे पाहिले.
"अनिल..बोल ना रे..."
"कशी आहेस ?"
अनिलने अंतःकरणापासून विचारलेल्या साध्याशा प्रश्नाने निशा अजूनच हळवी झाली.
"मी छान आहे रे..अगदी मजेत. तू कसा आहेस ?"
"मी पण मजेत.."
"एकटीच ? कुठे चाललीयेस ?"
"हं.. अरे सासरी चाललीये. सासरी एक समारंभ आहे छोटासा. भास्करला सुटी नाही, प्रतिकच्या पण परीक्षा चालू आहेत म्हणून मी एकटीच.. "
"प्रतिक ?"
"माझा मुलगा.. आता सहा वर्षांचा आहे"
"हं.."
"तू कुठे ?"
"इकडे काही कामाने आलो होतो. आता घरी परततोय.."
"हं.. बायको छान आहे तुझी मी फोटो पाहिला होता"
अनिलने प्रश्नार्थक नजरेनं तिच्याकडे पाहिलं
"फेसबुकवर .."
अनिलच्या नजरेत अजूनही प्रश्न होतेच..
पुन्हा काही नि:शब्द क्षण ..
"अनिल.. बोल ना अजून.."
"काय बोलू ?" तो शुन्यात बघत म्हणाला
"हं.. ते ही खरंय.. पण मला बोलायचंय. खूप काही बोलायचंय, सांगायचंय तुला"
अनिल काहीच बोलला नाही.
निशाला खूप काही बोलायचं होतं पण कशी सुरुवात करावी ते कळेना.
"काय झालं निशा ? बोल ना"
त्याने भेटल्यापासून पहिल्यांदाच तिचं नाव उच्चारलं होतं. तिला बळ मिळालं.
"अनिल मी अशी का वागले ?..तुला वाटत असेल मी स्वार्थी आहे तुझ्याकडून मिळायची तितकी मदत मिळाल्यावर तुला विसरुन गेले.."
.....
"अनिल मी स्वार्थी नव्हते रे कधीच... हं त्यावेळी आपल्यात वाद होवू लागलेत तेव्हा मला तुझा राग यायचा हे खरं आहे. पण मी त्यामुळे फक्त तुझ्याशी संबंध तोडले नाहीत"
तो फक्त तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं बघत राहिला.
"अनिल, आपण भेटलो, आपली चांगली मैत्री झाली. खूप काही बोलयचो आपण.. किती वेळ एकमेकांच्या सहवासात घालवायचो. ....हे सगळं मैत्रीच्या पलीकडलं आहे हे मला समजत होतं ..मलाही तुझा सहवासात खूप छान वाटायचं...पण मी तुला भास्करबद्दल फार आधीच सांगितलं होतं.. तुझाही मला पाठिंबा होताच, आधारही होता. पण मध्येच कधी कधी काही दिवस आपला संपर्क नाही झाला तर तुझं अस्वस्थ होण , माझ्याशी वाद घालणं ह्यामुळे मला काही कळेनास होई की तुझ्या मनात नेमकं काय आहे.. कधी वाटायचं की माझ्या वागण्याने तू माझ्याकडे ओढला जातोयस ही माझीच चुक तर नाही ? याने तुझं भावनिक नुकसान आणि भास्करची फसवणूक तर मी करत नाही ना ? अर्थात भास्करचा कधी आपल्या मैत्रीवर आक्षेप नव्हताच. पण नंतर तू स्मिताशी लग्न करायचं ठरवलंस. मला बरं वाटलं. मला वाटलं तू प्रॅक्टिकल आहेस. माझ्याकडून तुझ्या मनात काही वेगळ्या भावना नाहीत. पुढे आमचं लग्न झालं. तू खूप मदत केलीस, खरं सांगायचं तर तू होतास म्हणूनच होवू शकलं.."
अनिल काहीच बोलला नाही.
"आणि तेव्हा पुन्हा एकदा खात्री पटली की तुझ्या मनात माझ्याबद्दल वेगळ्या काही भावना नाहीत. आपल्या दाट मैत्रीचा मला खूप अभिमान होता.. तू परीक्षा झाल्यावर लग्न करायचं ठरवलं होतस, मलापण वाटायचं आता तू लवकरात लवकर लग्न करावंस. पण सगळं वेगळंच घडत गेलं, तुझं ठरत असलेलं लग्न मोडलं मला खूप वाईट वाटलं. त्याच दरम्यान तू मला एकदा म्हणाला होतास की 'स्मिताला आपल्या मैत्रीबद्दल खटकायचं म्हणून'"
"हो, पण ती जुनी गोष्ट होती. नंतर मी तिला समजावलं होतं आणि तिनंही ते डोक्यातून काढून टाकलं होत. परीक्षेनंतर आम्ही दोघं तुला भेटायला आलो होतो ना"
"तरीपण मी जेव्हा 'मी स्मिताशी बोलू का' असं तुला विचारलं तेव्हा तू नाही म्हणालास कारण मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला तर तिला कदाचित ते आवडणार नाही असंच तुलाही तेव्हा वाटलं होतं ना.."
"हो.. पण आमचं लग्न मोडायचं कारण तु नव्हतीस..त्याच दरम्यान माझ्या भावाचा संसार मोडला...आणि ते माहित पडल्यावर स्मिताच्या आईला माझ्याबद्दल, माझ्या घरच्यांबद्दल विश्वास वाटेनासा झाला होता"
"मला माहित आहे ते अनिल. पण तरी तुझ्या आणि स्मिताच्या मध्ये मी ना आलेलीच बरी होते. आधीच असलेल्या अडचणींमध्ये भर घालण्यात अर्थ नव्हता ना."
"पण नंतर आमचं लग्न मोडलंच होतं ना. त्यानंतरही तू मला टाळत राहिलीस...खरं तर तेव्हा मला तुझ्या आधाराची...जावून दे मी तरी आता हे का बोलतोय.." अनिलने खिडकीतून बाहेर बघू लागला.
"हो.. नकोच बोलूस तू. कारण तुला वाटतंय मी तुला तेव्हा समजून घेतलं नाही आणि आताही समजून घेणार नाहीच. असंच ना ?"
अनिल निशाकडे पाहू लागला ..दोघांचेही डोळे पाणावले होते.
"निशा..पण मग तुला काय वाटतं ते तरी तू मला सांगितलं असतस मला समजावलं असतंस, हवं तर रागावली असतीस ..."
"अनिल अरे माझाही संघर्ष चालूच होता ना. भास्कर परदेशी निघून गेला होता, मी एकटीच राहून घर, नोकरी, रोजच्या प्रवासाची दगदग संभाळत होते. तिकडे ताई माझ्याशी अजून बोलत नव्हती. इकडे भास्करची कधी चिडचिड होत रहायची. लग्न होवून असा दुरावा होता. माझं चित्त तरी कुठे थार्यावर असायचं? त्यात तुझ्या मनात माझ्याबद्दल मैत्रीपलीकडे ही काही भावना आहेत हे समजून मी अस्वस्थ होत होते. तुझ्याशी बोलत राहून मी तुझ्याशी अधिक जवळीक वाढवणं मला योग्य वाटेना.”
"पण निशा, मी कधीच तुझ्याकडून वेगळी काही अपेक्षा केली नाही. माझ्या मनात तुझं नेहमीच एक वेगळं स्थान होतं हे खरं पण मी कधीच तुझी अभिलाषा मनात बाळगली नाही. तुला मिळविण्याचा विचारही माझ्या मनात कधी आला नाही..तूच सांग, तुला माझं वागणं कधी वावगं वाटलं होतं का ?"
"नाही रे.. म्हणून तर माझा तुझ्यावर इतका विश्वास होता. कितीतरी वेळा माझ्याघरी आपण दोघेच असायचो. ताईलाही कधी काही गैर वाटायचे नाही त्यात. तुझ्यावर खूप विश्वास होता ताईचा. आणि बाहेरही कितीदा भटकलो आपण एकत्र."
"मग माझं लग्न मोडल्यावरच असं काय झालं की तुझा माझ्यावरचा विश्वास डळमळीत झाला ?"
"असं मी कधी म्हणाले होते रे तुला ?"
"नाही तसं म्हणाली नव्हतीस. पण तुझ्या वागण्यातून तसंच जणवत होतं"
"तू तसा अर्थ काढलास.."
"पण मग तू काहीच का बोलत नव्हतीस.. तुझ्या मनात काही वेगळं असेलही. पण ते समजायचा काही मार्ग नव्हता"
"अनिल..." निशाचा स्वर हळवा झाला होता. "कसं सांगू मी तुला माझ्या मनात त्यावेळी काय चालू होतं ते... तेव्हाच काय नंतर परदेशी निघून जाण्यापुर्वीसुद्धा मी तुला एकदाही भेटले नाही, फोनही केला नाही. काही महिन्यांनी माझा तिकडचा नंबरही तू शोधून काढलास, मला फोन करायचास. पण मी कधी तुझा फोन घेत नसे. जेव्हा क्वचित घेतला तेव्हाही नीट बोलले नाही. चिडून , रागावूनच बोलायची. अनिल अरे मला काय खूप छान वाटत होतं का ते सगळं ? माझाही जिवाभावाचा मित्र माझ्यापासून दुरावत होता. "
"पण मग... निशा तू का असं करत होतीस ? भास्करला आपली मैत्री खटकत होती का ?"
निशाने नकारार्थी मान हलवली..
"मग काय झालं होतं... सांगशील का आता ?"
"हं.. तेच सांगायचा प्रयत्न करायचा आहे मला आज. मला माहीत नाही पण तुला ते कितपत पटेल. मी जे केलं ते त्यावेळी खूप गरजेचं होतं..तुझ्यासाठी"
"निशा मला तुझ्या मैत्रीची , तुझ्या आधाराची गरज होती.."
"म्हणजे नेमकं काय अपेक्षित होतं तुला ?"
"तुला माहितीये.. तू फक्त माझ्याशी बोलत रहावीस, क्वचित भेटावीस इतकीच माझी अपेक्षा होती. तुझी सुखदु:ख मला सांगावीस, माझ्या सुखदु:खात सहभागी व्हावंस इतकंच हवं होतं मला तुझ्याकडून"
"इतकंच .. ?"
"हो.. का ? तुला विश्वास नाही वाटत ?"
"आणि मी तुझ्यासाठी खुप महत्वाची होते. हो ना ?"
"हं..." निशा काय म्हणू पहात आहे हे अनिलला समजत नव्हते.
"अनिल तू स्मिताशी लग्न करायचा निर्णय घेतला त्याला तेव्हा एक वर्ष होवून गेलं होतं. जरी दूर रहात असलात तरी तुम्ही अधूनमधून भेटत होता. बाकी फोनवर नेहमीच बोलत होता?"
"हो.."
"पण तरीही स्मिताने आईच्या सांगण्यावरुन लग्न मोडले"
"हो.. "
"कधी विचार केलायस याचा ? फक्त तिच्या आईचाच की तिचाही विश्वास डळमळीत झाला होता ?"
"मला नाही माहित..."
"अनिल जरी तू तिच्याशी लग्न ठरवलंस तरी तुझ्यासाठी मीच जास्त महत्वाची होते. कुठेतरी तिच्याशी असलेली तुझी कमिटमेंट कमी पडत असल्याच तिला जाणवत असेल.."
"मला नाही असं वाटंत."
"तू मुद्दाम असं करत असशील असं नाही म्हणत मी. पण तुझ्यासाठी मीच जास्त महत्वाची होते. त्यामुळे मी आणि माझी सुखदु:ख यापाशीच तू अडकला होतास. माझं तुझ्यासाठी इतकं महत्वाचं असणंच मला खटकू लागलं होतं"
"पण का ? हो.. होतीस तू महत्वाची. मी नेहमी तुझाच विचार करायचो. पण मला माझ्या , आपल्या मैत्रीच्या मर्यादा माहित होत्या. आणि मी माझ्या मर्यादा कधीच ओलांडल्या नसत्या"
"अनिल हेच मला म्हणायचय...आणि मला हीच भिती वाटत होती..."
"माझ्याकडून ?कसली भिती ? "
"तुझ्याकडून नाही रे.. पण तुझ्याबाबत.."
"म्हणजे ?"
"आपल्या मैत्रीतच तु तुझ्या आयुष्याचं पुर्णत्व शोधत होतास..नव्हे शोधलं होतसं. आणि मला तेच नको होतं. फक्त एका मैत्रिणीसाठी तुझं आयुष्य अडकून पडायला नको होतं. मी तुझी टॉप प्रायोरिटी असायला मला नको होतं"
"पण का ? चांगल्या मैत्रीत हे होवू शकत नाही का ?"
"सतत माझा विचार करत राहून तु दुसर्या कुणा मुलीला कमिटमेंट कशी देवू शकला असतास ? त्यावेळी मी तुझ्या आयुष्यात राहिले असते तर तु कदाचित लग्नाचा विचारही केला नसतास, किंवा लग्न करुनही मीच तुझ्यासाठी जास्त महत्वाची राहिले असते तर सुखाने संसार केला असतास ?"
अनिल विचारात पडला.
"अनिल मला तुझ्या मनाचा थांग लागला होता. आणि माझ्या या छान मित्राचं आयुष्य माझ्यासाठी झुरत अधांतरी राहू नये असंच मला वाटत होत रे"
"पण मी अजिबात झुरत नव्हतो गं. तुला आनंदात पाहून मला बरं वाटायचं"
"म्हणूनच तु आनंदाने माझं लग्न लावून दिलंस.. पण किती दिवस, किती वर्ष मी फक्त एका मैत्रिणीचा विचार करत तू जगणार होतास ? मी तुझ्या आसपास राहिले असते तर तुझ्या भावनिक जगात दुसर्या कुणाला स्थान तरी मिळालं असतं का ? मी तुझं जे मिळवायचं नाही असं धेय्य बनले होते जे योग्य नव्हतं. थोडक्यात माझ्यामुळे तु धेय्यहीन बनत होतास..."
अनिलला काहीच सुचेना.
"निशा तू तेव्हा इतका विचार केला होतास माझा ?"
"अरे वा ?मग विचार करायची सगळी मक्तेदारी तुझी एकटयाचीच होती का ?"
"पण मग तु तेव्हाच मला हे का नाही बोललीस ?"
"मी तेव्हा तुला हा सगळा विचार सांगण शक्यच नव्हतं. एकतर तुला ते पटलं नसत किंवा अपेक्षित परिणाम झालाच नसता."
"असं का वाटतं तुला ? तु नीट समजावलं असतंस तर समजलो असतो.."
"तु ना.. ? मुलखाचा हट्टी होतास तू आणि म्हणे समजलो असतो" निशा हसू लागली
"काही..काय..? तुझं ऐकायचो मी.."
"हं.. माहितीये माहितीये... पण खरच मी तुला काय सांगणार होते तेव्हा 'अनिल तू मला टॉपप्रायोरिटीवरुन सेकंड प्रायोरिटीवर हलव' आणि असं झालं असतं ? नाही रे.. तुझ्या 'टॉप प्रायोरिटीवरुन बाजूला होण्यासाठी मी 'नो प्रायोरिटि' होणंच भाग होतं
"निशा...खरंच मी किती चुकीचा विचार करत होतो तुझ्याविषयी.. मला वाटायचं की तुला माझी जी मदत व्हायची ती झाली आता तुला माझ्या मैत्रीची गरज नाही. सॉरी निशा.. तुला समजून न घेता मी तुझ्याशी भांडत राहिलो.."
निशाने अनिलचा हात हलकेच हातात घेतला.. "अनिल..अरे इटस ओके. बघ त्यावेळी माझ्या वागण्याबद्दल तुझी ती सहज प्रतिक्रिया होती. तुझं फार काही चुकलं नाही. पण पुढे जावून तु लग्न केलंस , संसारात स्थिरावलास आणि माझ्या मनाची घालमेल संपली."
"म्हणजे तु माझी चिंता वहात होतीस तर.."
"वाटत रहायच रे नेहमी की तु माझ्याकरिता इतकं केलंस. आणि आता स्वतः असा चाचपडत आहेस पण मी तुझ्याकरिता काही करु नाही शकत. दरवर्षी माझ्या लग्नाच्या वाढदिवसाला तर इतकं दाटून यायचं..तुला आठवतंय.. मी भास्करसोबत निघून चालली असताना खूप हळवी झाली होते. खूप भितीपण होती मनात. त्यावेळी तू आम्हाला भेटायला आलास. आम्हाला धीर दिलास. त्यावेळी तु मला एक गणपतीची मुर्ती भेट दिली होतीस."
"हो.. ती मुर्ती मला एका चांगल्या मैत्रिणीने भेट दिली होती. तिला माहितच नव्हतं की मी अगदी नास्तिक आहे. पण तिने चांगल्या मनाने दिली म्हणून मी जपून ठेवली. त्यावेळी मला वाटलं तुला हि मुर्ती भावनिक आधार देईल."
".. अजूनही ती मुर्ती माझ्याकडे आहे. कधी तुझी आठवण आली तर मी त्या मुर्तीसमोर हात जोडते आणि म्हणते 'देवा, अनिलला त्याच्या आयुष्यात खूप प्रेम करणारी बायको मिळू देत, मला दिलंस तसंच सुख त्यालाही लाभू दे'"
"निशा.. तू मला पुन्हा एकदा जिंकलस गं" निशाचा हात घट्ट धरत अनिल म्हणाला
"ए वेड्या... पण आता तू तुझ्या संसारात स्थिरावलायसं.. आता नेहमी तुझी बायकोच तुझ्यासाठी सर्वात महत्वाची असायला हवी..मी फक्त एक मैत्रीण आहे. माझ्या सुखदु:खाचा जास्त विचार करायचा नाहीस.. मी सुखातच आहे. आणि तुझं सुख तुझ्या संसारातच आहे हे विसरु नकोस"
अनिलने होकारार्थी मान डोलावली.
'बरं चल. .. आता तर माझ्यावरचा राग गेला ना तुझा ? आता अजून दीड दोन तास आहेत आपल्याकडे गप्पा मारायला..मला खूप खूप गप्पा मारायच्या आहेत तुझ्याशी. अगदी पुर्वीसारख्याच..."
"आपल्या दहा वर्षांच्या गप्पा बाकी आहेत... दीड-दोन तासांत होतील ?" अनिलने हसत विचारले...
प्रतिक्रिया
26 Mar 2016 - 8:29 pm | भरत्_पलुसकर
भारी! आता पूर्वार्ध वाचतो.
27 Mar 2016 - 2:42 pm | मराठी कथालेखक
धन्यवाद
27 Mar 2016 - 7:46 am | भाऊंचे भाऊ
.
27 Mar 2016 - 11:01 am | DEADPOOL
बोरिंग
28 Mar 2016 - 11:18 am | पैसा
कथा पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद! अनेक गोष्टींना असा क्लोजर कधी मिळत नाही.
28 Mar 2016 - 11:36 am | मराठी कथालेखक
खरयं तुमचं..पण इथेही हा क्लोजर निव्वळ काल्पनिक आहे... अनिल आणि निशाची अशी काही भेट झालेली नाही,,
30 Mar 2016 - 9:59 am | राजू
जरी खरी भेट झाली नसेल तरी ते भेटले असता असेच काहिसे घडले असते असे वाटते आहे.
31 Mar 2016 - 3:51 pm | मराठी कथालेखक
धन्यवाद.
30 Mar 2016 - 11:31 am | विजुभाऊ
Deadpool काकांशी सहमत.
गोष्ट यावेळी बरी लिहिलीये मात्र थोडीशी लांबल्यासारखी वाटली.अर्थात अशा गोष्टीना शेवट नसतोच
प्रयत्न करत रहा. पुढच्या वेळेस चांगली कथा लिहु शकाल.
18 Apr 2016 - 8:12 am | मुक्त विहारि
कथा आवडली....
18 Apr 2016 - 4:13 pm | मराठी कथालेखक
धन्यवाद
19 Apr 2016 - 1:17 am | अमित भोकरकर
छान कथा आहे. सारखी कथा नसेल तरिही Oh My Friend या tollywood चित्रपटची आठवण झाली.
19 Apr 2016 - 1:59 pm | मराठी कथालेखक
पण तसं म्हंटल तर ही कथा नाहीच..
आधीच्या भागात मी एक कथा (हकीकत) सांगितली. त्यात अनिलच्या बाजूने विचार करता निशा वर स्वार्थीपणाने वागल्याचा दोष येत होता. नंतर वाटले निशाचीही काही बाजू असू शकेल. इतकी दाट मैत्री , जिव्हाळा असताना तिने अगदी सहजच सगळं काही तोडलं असेल का ? निदान एक शक्यता तरी असू शकते ना की तिच्या तसं वागण्यालाही काही कारण असेल.
आणि जर असं काही असेल तर ते अनिलपर्यंत पोहोचायला हि हवं , मग ही काल्पनिक भेट सुचली.
वास्तवात अनिल अजूनहि वाट बघतो आहे कधीतरी निशा हाक देईल याची.