मिपा विडंबन स्पर्धा - मतदान : राजकारण

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in जनातलं, मनातलं
19 Mar 2016 - 7:05 pm

मिपाकरहो नमस्कार,

मिपा विडंबन स्पर्धा, या एका आगळ्यावेगळ्या आणि काहीशा अनवट स्पर्धेला अनेक मिपाकरांनी हिरिरीने प्रतिसाद दिलेला आहे. प्रेम, राजकारण, फजिती या तीनही विषयांवर आधारित विडंबनांच्या प्रवेशिकांचा ओघ उत्साहवर्धक असा होता. विडंबनपटूंनी रंगांची उधळण तर करून झालेली आहे; आता वेळ आहे कुठला रंग सगळ्यात उठून दिसतो ते ठरवण्याची. आणि ही जबाबदारी स्पर्धेच्या धाग्यात म्हटल्याप्रमाणे सगळ्या मिपाकरांची आहे.

मतदान ! आलेली एकापेक्षा एक सरस विडंबनं बघता, विडंबन करण्याइतकंच आव्हानात्मक हे मतदान असणार आहे. तेंव्हा सर्वप्रथम तीन विषयांकरिता असलेल्या तीन स्वतंत्र मतदान धाग्यांचा आस्वाद घ्या; हसा, वाहवा द्या, आणि सरतेशेवटी मतं द्या.

प्रवेशिका पाठवण्याची मुदत एक दिवस वाढवल्याने मतदान करण्याकरिता आता २५ तारखेपर्यंत वेळ आहे. मतदान करताना तीन क्रमांक निवडणे अपेक्षित आहे. (उदाहरणार्थ - क्रमांक १ - विडंबन क्र य, क्रमांक २ - विडंबन क्र क्ष, या प्रमाणे). मतांची मोजणी करून अंतिम विजेत्याची निवड होईल.
निकाल घेऊन ठरल्याप्रमाणे २८ तारखेला हजर होऊ.

पण तत्पूर्वी, विडंबनकार मिपाकरांचे कौतुक आणि आभार.

या धाग्यात 'राजकारण' या विषयाला धरून आलेली विडंबन काव्य दिलेली आहेत. इतर विषयांसाठी स्वतंत्र धागे खालीलप्रमाणे
विषय: प्रेम
विषयः फजिती

विडंबन क्र. १

मूळ काव्यः
चिंतामणी त्र्यंबक खानोलकर (आरती प्रभू)

गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्यापास आता कळ्या आणि थोडी ओली पाने

आलो होतो हासत मी काही श्वासांसाठी फक्त
दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र शोषी रक्त

आता मनाचा दगड घेतो कण्हत उशाला
होते कळ्यांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा

विडंबनः
ठकतंत्रांचे देणे...

गेले द्यायचे राहून तुझे करोडोंचे देणे
माझ्यापास आता खळ्या आणि कॅलेंडर पाने

झालो होतो नाचत मी, काही खासांसाठी फक्त
हव्यासांचे ओझे आता, हा तर मात्र शोधी ट्विट

आता बीअरचा 'मग'ड ,घेतो म्हणत कशाला
होते मूल्यांचे (मल्याचे ?)निर्माल्य आणि विमानांचा पाचोळा

----------------------------------------------

विडंबन क्र. २

मूळ काव्यः
जगदीश खेबुडकर

अहो ऐका चतुर अध्यात्माची कहाणी
किस्‍नाने भुलविल्या यमुनेवर गौळणी

ऐन दुपारी गौळण नारी आल्या यमुनेवरी
खुशाल सोडून दिल्या जळावर नक्षीच्या घागरी
वसने सुटली अलगद पडली ओल्या काठावरी
ठुमकत गोपी जळात शिरल्या उठली का शिर्शिरी

गोपी न्हाण्यात होत्या दंग
तोच आला सखा श्रीरंग
गोळा करुन वस्‍त्रं सारी
बसला चढून कळंबावरी

नको न्याहाळू नितळ काया ओलेती उघडी
दे रे कान्हा, चोळी अन्‌ लुगडी

बालपणीची अल्लड नाती
मला कवळिले तू एकांती
अजून का तुज त्या खेळाच्या, छंदाची आवडी ?

ऐन वयाची किमया सारी
लाजवंति मी भोळि बावरी
कशि येऊ मी काठावरती मदनाची लालडी ?

तूच दिली ही यौवनकांती
कशी लोचने आतुर होती
देहाहुन ही मुक्त भावना शरणागत बापुडी !

हात जोडिता बंधन तुटले
अता जीवाला मीपण कुठले ?
आत्म्याने जणु परमात्म्याला अर्पण केली कुडी !

विडंबनः
मीडिया बटकिणी

अहो ऐका चतुर राज्कार्नाची कहाणी
किस्‍नाने भुलविल्या जेनयुवर बटकिणी

ऐन दुपारी मीडिया बटकी आल्या जेनयुवरी
खुशाल सोडून दिले जनांवर व्हिडियोंची डॉक्टरी
लज्जा सुटली अलगद पडली ट्यार्पीच्या पदरी
'देशद्रोही गळात धरला' उठली ललकारी

मीडिया बोंबलण्यात दंग
धरला मग सखा श्रीरंग
कोर्टाबाहेर गर्दी जमुनी
मारला त्याला काळ्याडगल्यांनी

बटकीण दावी नितळ क्लिव्हेजी, खोल अन् उघडी
घे रे कान्हा चोळी लुगडी

पूर्वीपासुनी अशीच माझी
विक्रीसाठी काया माझी
सवंग चर्चा, कर्कश भाषा, अर्णबी बडबडी
घे रे कान्हा चोळी लुगडी

फक्त ट्यार्पीची मी भूकेली
निर्लज्जा अन् देहलिलावी
जो देइल मज प्रेक्षकडोळे, त्याची मी जुगडी
घे रे कान्हा चोळी लुगडी

काल तुला मी काळे केले
कृष्णा तुज ते पालिश झाले
झळाळ उठली काया तुझिही, चमके अन् छबडी
घे रे कान्हा चोळी लुगडी

तुला कवळता मिटले सारे
इतरजनांसम तूही यार रे
झालेगेले विसरुन सारे, मिठित मज पकडी
घे रे कान्हा चोळी लुगडी

--------------------------------------------------------

विडंबन क्र. ३

मूळ काव्यः
जगदीश खेबूडकर

देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा
उघड दार देवा आता, उघड दार देवा

पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची
मनीं चोरट्याच्या का रे भीती चांदण्याची
सरावल्या हातांनाही कंप का सुटावा

उजेडात होते पुण्य अंधारात पाप
ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप
दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा

स्वार्थ जणु भिंतीवरचा आरसा बिलोरी
आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी
घडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा

तुझ्या हाती पांडुरंगा तिजोरी फुटावि
मुक्तपणे भक्ती माझी, तुझी तू लुटावि
मार्ग तुझ्या राउळाचा, मला आकळावा

भलेपणासाठी कोणी बुरेपणा केला
बंधनात असुनी वेडा जगी मुक्त झाला
आपुल्याच सौख्यालागी करील तो हेवा

विडंबनः
परत ये रे मल्ल्या...

बँकांची तिजोरी, तुझ्याकडे किल्ल्या
परत येरे मल्ल्या आता, परत येरे मल्ल्या

देते कर्ज डोळे मिटूनी जात बॅंकर्साची
मनी तुमच्या का नसे रे भीती आरबीआयची
तू गेल्यावर त्या बँकांना कंप का सुटावा

उजेडात करतो मजा अंधारात मौज
दारात उभी असते तुझिया मॉडेल्सची फौज
अर्धनग्न कॅलेन्डर्सची कसली लोकसेवा

स्वार्थ तुझा देशासाठी ठरतसे विषारी
आपुलाच खास्दार होतो आपुलाच वैरी
तुझ्या कंपन्यांनी कैसा तोल सावरावा

तुझ्या मनी मल्ल्या आता बुद्धी पालवावी
स्वतःहून कर्जे सारी, तुझी तू भरावी
खरा मार्ग व्यवसायाचा, तुला आकळावा

पगारदारांसाठी तू जर स्वार्थत्याग केला
वापरूनी अपुला पैसा मुक्त कर स्वतःला
तुझ्या किंग ऑफ गुड टाईम्स चा करू सारे हेवा

------------------------------------------------------

विडंबन क्र. ४

मूळ काव्यः
शांता शेळके

जीवनगाणे गातच रहावे

जीवनगाणे गातच रहावे
झाले गेले विसरुनि जावे, पुढे पुढे चालावे
जीवनगाणे गातच रहावे !
सात सुरांचा हा मेळा व्यापुन उरला विश्वाला
हृदये हलता वरखाली ताल मिळे या गाण्याला
तुमच्यामाझ्या श्वासांमधुनी आकारा यावे
जीवनगाणे गातच रहावे !
चिमणाबाई हिरमुसली, गाल फुगवुनी का बसली ?
सान बाहुली ही इवली, लटकीलटकी का रुसली ?
रुसलीरुसली, खुदकन हसली, पापे किति घ्यावे !
जीवनगाणे गातच रहावे !
मातीमधुनी अंकुरली चैतन्याची दीपकळी
आनंदाने थरथरली कधी अंतरी गहिवरली
या मातीला, या प्रीतिला हितगुज सांगावे
जीवनगाणे गातच रहावे !

विडंबनः
तुणतुणे

आपलेच तुणतुणे वाजवीत रहावे!
गाडले मुद्दे, न विसरावे, पुन्हा पुन्हा उकरावे!
आपलेच तुणतुणे वाजवीत रहावे!

मेगाबायटि प्रतिसादांचा चाळा, व्यापून उरला 'मिपा'ला
धागे हलता वरखाली, चाल मिळे या खेळाला
तुमच्यामाझ्या प्रतिसादामधुनि स्वीकारा व्हावे !
आपलेच तुणतुणे वाजवीत रहावे !

'आयडी'बाई हिरमुसली, डुआयडीमागे लपुनी का बसली?
काळतोंडी आयडी ही नवली, लटकी लटकी का रुसली?
रुसली रुसली, तरी परतली, चावे किती घ्यावे !
आपलेच तुणतुणे वाजवीत रहावे !

धाग्यामधुनि अंकुरली लावालावीची 'काडी'कळी
रागाने फुरफुरली कधी फुसकुली तिची झाली
या काडीला, या कळीला प्रतिउत्तर त्वरे सांगावे!
आपलेच तुणतुणे वाजवीत रहावे !

------------------------------------------------------

विडंबन क्र. ५

मूळ काव्यः
संत रामदास

मनाचे श्लोक

विडंबनः
मताचे श्लोक

मताचे श्लोक

मताधीश तॊ अर्क रॆ दुर्गुणांचा
सदाभ्रष्ट तॊ दुष्ट कि हीन साचा
करी भाषणॆ बहु मधाळ वाचा
नसॆ त्यामधॆ अंशही वास्तवाचा

सदा सर्वदा भ्रष्ट पंथॆची जावॆ
तरी लक्षुमी पावतॆची स्वभावॆ
मना फंड तॊ मस्त दाबॊनी खावा
जना भार तॊ कर रुपॆ जडावा

प्रभातॆ मनी दाम चिंतीत जावा
सदा दॆणगी वा निधी साचवावा
दुराचार तॊ कधी छापॊनी यॆतॊ
मना क्लॆश त्याचा कदापी न हॊतॊ

मना आसना कम्प हॊऊ नयॆ रॆ
मना पक्षश्रॆष्ठी दुखावु न यॆरॆ
मनी कॆधवा भिती राखू नकॊ हॊ
धनी तॊ पक्षाचा सदा तुष्ट राहॊ

मना मालसंकल्प चित्ती धरावा
धना स्विस बॅंकी सुखॆ पाठवावा
मनी धासती का वसॆ सीबीआयची
पडॆ धाड जरी का तरी हॊय गॊची

नकॊ रॆ मना रॊष वा कारवाई
सुखी ठॆवी सारॆ नॆतॆ नी भाई
नकॊ रॆ मना पॆग तू जास्त मारु
जिव्हा वारु उधळी अति दुष्ट दारु

मना बा वरिष्ठा कचॆरी पुजावॆ
मना आपलॆ स्थान पक्कॆ करावॆ
जरी नावडॆ नम्र वाचॆ वदावॆ
मना पक्ष श्रॆष्ठींस रॆ रिझवावॆ

करॊनी मना त्वा समुदाय गॊळा
बळॆ मार्ग रॊखॊनी रस्त्यात लॊळा
समाजाप्रती दाखवाया उमाळा
मना सज्ज ठॆवी टी शर्ट काळा

जरी व्हावयाचॆ तुला दॆशभक्त
मना तॆही एका रुपयात फक्त
तरी सांगतॊ शॆवटी सॊपी युक्ति
खिशामाजी ठॆवी सदा मॆणबत्ती

------------------------------------------------------

विडंबन क्र. ६

मूळ काव्यः
शांता शेळके

काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी
मज फूलही रुतावे हा दैवयोग आहे !

सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची ?
चिरदाह वेदनेचा मज श्राप हाच आहे !

काही करु पहातो रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणेही विपरीत होत आहे !

हा स्‍नेह, वंचना की, काहीच आकळेना
आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे !

विडंबनः

देता मते कुणाला खाती बहुत लोणी
मज सुखही न भावे हा दैवयोग आहे !

सांगू कसे कुणाला फळ आपल्या मताचे?
मिळतात भ्रष्ट नेते मज श्राप हाच आहे!

मंत्री जिथे पहावे रुजतात स्वार्थ तेथे
त्यांचेच बोलणेही विपरीत होत आहे!

हा देश, लोकशाही, काहीच आकळेना
स्वातंत्र्य ते मिळोनी मी रिक्तहस्त आहे!

------------------------------------------------------

विडंबन क्र. ७

मूळ काव्यः
ग्रेस

सूर्य बुडे, ऊन ढळे
उचल पाय चल गं ! बये !
चिखलावर कमळांचा
भार कधी टाकू नये

घाटातुन घंटांचे
घोर नाद थरथरती;
पणतीला वाऱ्याचा
धाक कधी घालु नये

ताऱ्यांची दीर्घ शीळ
संध्येची गगनहाक;
चंद्रावर चंद्राचा
अस्तउदय लादू नये!

संगनमत सरितांचे
लहरींचा बहरतोल;
पाण्यावर तृष्णेचा
पेच नवा ठेवु नये

विडंबनः
छद्मबंध

हत्ति डुले , हात हले
उचल सायकल गं बये !
झाडूने कमळांची
रास कधी झाडू नये

घाटातून घडीचे
चोर काटे कुजबुजती
बाणाला इंजिनचा
धाक कधी घालू नये

'गोदो'ची तीच रीळ
'स्यूडो'ची गगनहाक
हातावर हाताचा
अस्तउदय लादू नये

संगनमत ललितांचे
ममताचा असमतोल
जनतेवर डाव्यांचा
पेच नवा ठेवू नये

------------------------------------------------------

विडंबन क्र. ८

मूळ काव्यः
नवनाग स्त्रोत्र

अनंतं वासुकि शेष पद्मनाभं च कम्बलम् ।
शड्खपाल धार्तराष्ट्र तक्षकं कालियं तथा ।।
एतानि नव नामानि नागानां च महात्मनाम् ।
सायंकाले पठेन्नित्यं प्रातः काले विशेषतः ।।
तस्मे विषभयं नास्ति सर्वत्र विजयीं भवेत् ।''

विडंबनः
छद्मबंध

अनंत मुर्ती, दिग्विजय, अरविंद, मायावती, ममता
मुलायम, लालु, नितिश, सवे राहुलबाबाला स्मरता
नाग सापही पळती लांब ही नावे नुसती उच्चारता
विषही त्यांचे होते पाणी, छायाचित्र यांचे दिसता,
हा श्लोक दिनरात बरळणे, ठरेल मोठे घातक
गरळ ओकीत फुत्कारही टाकु लागेल साधक

------------------------------------------------------

विडंबन क्र. ९

मूळ काव्यः
सुधीर मोघे

कुठल्या देशीं, कुठल्या वेशीं, कुठल्या रूपात ?
देवा, तुला शोधू कुठं ?

तेहतीस कोटी रूपे तुझी, तेहतीस कोटी नामे तुझी
परि तू अज्ञात
देवा, तुला शोधू कुठं ?

कोठे असशी तू आकाशीं, कुठल्या गावी कोठे वसशी ?
कुण्या देवळात ?
देवा, तुला शोधू कुठं ?

भले-बुरे जे दिसते भंवतीं, भले-बुरे जे घडते भंवतीं
तिथे तुझा हात
देवा, तुला शोधू कुठं ?

स्वच्छंदी तू स्वत:चा सखा, येथे रमसी सांग उगा का ?
या बाजारात
देवा, तुला शोधू कुठं ?

विडंबनः
माल्या तुला शोधू कुठं

कुठल्या देशीं, कुठल्या वेशीं, कुठल्या रूपात ?
माल्या, तुला शोधू कुठं ?

कित्येक कोटी कर्जे तुझी, कित्येक कोटीचे फ्रॉड
परि तू अज्ञात
माल्या, तुला शोधू कुठं ?

उडून जाशी तू आकाशीं, लंडन गावी लपून बसशी ?
कुण्या इंग्लड देशात ?
माल्या, तुला शोधू कुठं ?

ज्या ज्या कर्जबाजारी बँका दिसती भवती, भले-बुरे तू त्यांचे हाल करशी
चोहिकडे तुझा हात
माल्या, तुला शोधू कुठं ?

स्वच्छंदी तू किंगफिशरचा सखा, येथे रमसी सांग उगा का ?
या देशात
माल्या, तुला शोधू कुठं ? शोधू कुठं

------------------------------------------------------

विडंबन क्र. १०

मूळ काव्यः प्रभू तू दयाळू
उमाकांत काणेकर

प्रभू तू दयाळू कृपावंत दाता
दया मागतो रे तुझी मी अनंता

जगविण्यास देहा दिली एक रोटी
नमस्कार माझे तुला कोटी कोटी
वासना कशाची नसे अन्य चित्ता
दया मागतो रे तुझी मी अनंता
प्रभू तू दयाळू कृपावंत दाता

तुझ्या पावलांशी लाभता निवारा
निघे शीण सारा मिळे प्रेमधारा
सर्व नष्ट होती मनातील खंता
दया मागतो रे तुझी मी अनंता
प्रभू तू दयाळू कृपावंत दात

ज्ञान काय ठावे मला पामराला
मनी शुद्ध माझ्या असे भाव भोळा
तुझे नाम ओठी नको वेदगीता
दया मागतो रे तुझी मी अनंता
प्रभू तू दयाळू कृपावंत दाता

विडंबनः
नेते ते करीती

जन्म जणू त्यांचा पैशासाठी
नेते ते करीती विकासाच्या गोष्टी

जन्म जणू त्यांचा पैशासाठी
न्यायहक्का अमुच्या, दिली मतपेटी
मतावर होता अमुच्या, तुम्ही अरबोपती
हाती मात्र अमुच्या, राहते करोटी
जन्म जणू त्यांचा पैशासाठी
नेते ते करीती…..

चमच्यावरी तुमची राहे कृपादृष्टी
ते ही खाती तुमच्यासंगे मस्त तुपरोटी
आम्ही मात्र निजतो सदा अर्धपोटी
जन्म जणू त्यांचा पैशासाठी
नेते ते करीती......

नाही कळे आम्हा तुमची कामे मोठी
जन्म सरे अमुचा पैशासाठी
तरी ना मिळता, नाही दु:खीकष्टी
जन्म जणू त्यांचा पैशासाठी
नेते ते करीती......

------------------------------------------------------

विडंबन क्र. ११

मूळ काव्यः कुठे शोधिसी रामेश्वर
मंगेश पाडगांवकर

कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी
हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी

झाड फुलांनी आले बहरुन, तू न पाहिले डोळे उघडुन
वर्षाकाळी पाऊस धारा, तुला न दिसला त्यात इशारा
काय तुला उपयोग आंधळ्या, दीप असून उशाशी

रुद्राक्षांच्या गळ्यांत माळा, लाविलेस तू भस्म कपाळा
कधी न घेऊन नांगर हाती, पिकविलेस मातीतुन मोती
हाय अभाग्या भगवे नेसुन घर संन्यासुन जाशी

देव बोलतो बाळ मुखांतुन, देव डोलतो उंच पिकांतुन
कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आर्त पुकारी
अवती भवती असुन दिसेना, शोधितोस आकाशी

विडंबनः
कुठे शोधिसी मल्ल्या आता

कुठे शोधिसी मल्ल्या आता, करून गेला काशी
देशातिल "कर"वंत राहिला देशातून उपाशी

कर्ज कोटींचे आले बहरून, तू न पाहिले डोळे उघडून
हजर राहिला राज्यसभेला, तुला न दिसला त्यात इशारा
काय तुला उपयोग आंधळ्या कोर्ट असून खिशाशी

फुलाफुलांच्या गळ्यात माळा, लावुनिया "श्री" भस्म कपाळा
कधी तो घेउन बीअर हाती, उडवितसे विमाने मोठी
हाय अभाग्या "भगवे" नेसुन गेला जिरवुनि खाशी

विजय बोलतो ट्विट मुखातुन, विजय डोलतो प्रसादांतून
कधी होउनी विजय भिकारी, मुदतीसाठी आर्त पुकारी
अवतीभवती असुन दिसेना, शोधितोस आकाशी

-----------------------------------------
-----------------------------------------

विडंबनप्रतिक्रियासमीक्षामत

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

19 Mar 2016 - 7:12 pm | अभ्या..

छा गया मल्ल्या.

जव्हेरगंज's picture

19 Mar 2016 - 7:23 pm | जव्हेरगंज

छ्या, गया मल्ल्या.

तर्राट जोकर's picture

19 Mar 2016 - 8:21 pm | तर्राट जोकर

मल्यांवरची विडंबने राजकारण सदरात कशी मोडतात हा प्रश्न मजला पडे.

आणि एक विडंबन प्रत्यक्ष राजकारण आहे. =)) ;-)

बाकी मत्दान सवडीने.

निशांत_खाडे's picture

20 Mar 2016 - 12:40 am | निशांत_खाडे

क्र.११

मिपाकरांनी तीन क्रमांक निवडणे अपेक्षित आहे. (उदाहरणार्थ - क्रमांक १ - विडंबन क्र य, क्रमांक २ - विडंबन क्र क्ष, या प्रमाणे). मतांची मोजणी करून अंतिम विजेत्याची निवड होईल.

यशोधरा's picture

20 Mar 2016 - 6:37 am | यशोधरा

क्र १ - विडंबन ५
क्र २ - विडंबन ६
क्र ३ - विडंबन ४

अत्रुप्त आत्मा's picture

20 Mar 2016 - 10:31 am | अत्रुप्त आत्मा

५ - निर्विवाद प्रथम
६ - द्वितीय
११- तृतीय

विश्वजित रामदास जाधव's picture

20 Mar 2016 - 12:49 pm | विश्वजित रामदास जाधव

१. विडंबन ४ (तुणतुणे)
२. विडंबन ५ (मताचे श्लोक)
३. विडंबन ३ (परत ये रे मल्ल्या)

भाते's picture

20 Mar 2016 - 3:20 pm | भाते

१) विडंबन क्र. १
२) विडंबन क्र. ३
३) विडंबन क्र. ५

नाखु's picture

21 Mar 2016 - 9:32 am | नाखु

पाने.
५-३-२ नाही पत्ते नाहीत तर पसंती...

१) विडंबन क्र. ५
२) विडंबन क्र. ३
३) विडंबन क्र. २

अजया's picture

21 Mar 2016 - 10:21 am | अजया

१.३
२.५
३.६

भाऊंचे भाऊ's picture

21 Mar 2016 - 10:53 am | भाऊंचे भाऊ

.

मोहन's picture

21 Mar 2016 - 11:07 am | मोहन

क्र.१ - ५
क्र.२ - ३

भरत्_पलुसकर's picture

21 Mar 2016 - 11:13 am | भरत्_पलुसकर

क्र 1 - मताचे श्लोक
क्र 2 - परत ये रे म्ल्ल्या
क्र 3 - तुणतुणे

पैसा's picture

24 Mar 2016 - 12:07 am | पैसा



११

मित्रहो's picture

24 Mar 2016 - 9:38 am | मित्रहो

१. ६
२. ७
३. ५

sagarpdy's picture

24 Mar 2016 - 10:19 am | sagarpdy

१. ६
२. ५
३. ११

माझे मतः



११

याच क्रमाने.

वेल्लाभट's picture

25 Mar 2016 - 11:10 am | वेल्लाभट

मतदानाचा आजचा शेवटचा दिवस !

मधुरा देशपांडे's picture

26 Mar 2016 - 1:22 am | मधुरा देशपांडे

विडंबन क्रमांक ३, ५, ६