वसंता पोतदार..!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
13 Jan 2009 - 12:59 am

राम राम मंडळी,

अण्णांना भारतरत्न मिळालं, अतिशय आनंद वाटला. आणि त्याच वेळेस माझ्या मनात कुठेतरी वसंता पोतदारची आठवण जागी झाली!

वसंता पोतदार!

"ए तात्या, मला चक्क 'अरे वसंता' असं म्हणायचं बरं का! वसंतराव किंवा अहो-जाहो ची भानगङ नाय पाहिजे!"

वास्तविक वसंता माझ्यापेक्षा वयाने. ज्ञानाने कितीतरी मोठा! तरीही मी त्याला केवळ त्याच्या आग्रहाखातर 'वसंता' अशी एकेरीच हाक मारायचा.

अण्णांचं गाणं आणि त्यावर आत्यंतिक प्रेम हाच माझ्या आणि वसंताच्या मैत्रीचा मुख्य मुद्दा. अण्णांच्या गाण्याला वसंता अनेकदा भेटायचा आणि मग गप्पा रंगायच्या, धमाल चालायची! :)

वसंता हा अत्यंत व्यासंगी आणि विद्वान माणूस. एक चांगला लेखक, उत्तम वक्ता! स्वामिजींवरचं 'योद्धा सन्यासी', भाईकाकांवरचं 'एका पुरुषोत्तमाची गाथा', गाडगेबाबांवरचं 'तोचि साधू ओळखावा', अण्णांवरचं 'भीमसेन' ही त्याची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. वसंता स्वामिजींवर व्याख्यानही फार छान द्यायचा.

अण्णांवर पुस्तक लिहिण्याकरता म्हणून वसंता काही काळ सतत अण्णांसोबत असे. आणि अण्णांचं मुंबईत कुठेही गाणं असलं म्हणजे तिथे आमची हजेरी ही असायचीच. त्यातूनच माझी आणि वसंताची ओळख झाली, परिचय वाढला, दोस्ताना वाढला.

एकदा एका कार्यक्रमाच्या वेळी ग्रीनरूममध्ये साक्षात अण्णांनीच,

"हे अभ्यंकर. मुंबैच्या हायकोर्टात वकील आहेत आणि आमचे चाहते आहेत..!"
(मी मुंबैच्या हायकोर्टात वकील आहे हा अण्णांचा गैरसमज आजही कायम आहे! मी एकदोनदा खुलासा केला होता! असो.)

अशी आपल्या खर्जातल्या धीरगंभीर आवाजात वसंताला माझी ओळख करून दिली होती. वास्तविक मी अण्णांच्या लाखो भक्तांपैकीच एक, तसा नगण्यच! परंतु साक्षात अण्णांनीच ओळख करून दिल्यावर आणखी काय पायजेल?! :)

"क्या बात है, मिलाव हाथ!"

हे त्यावेळचे वसंताचे मनमोकळेपणे आणि आनंदाने उच्चारलेले शब्द मला आजही आठवताहेत! :)

एका कार्यक्रमानंतर चालायला त्रास होत असल्यामुळे मी आणि वसंता अण्णांना सोबत घेऊन जात आहोत. त्यानंतर मुंबैतल्याच अण्णांच्या एका चाहत्याच्या घरी अण्णांचा मुक्काम होता. त्या घरी जाऊन विसावतो न विसावतो तोच बुवांचा पुन्हा मूड लागला आणि तंबोरे गवसणीच्या बाहेर निघाले! आणि काय सांगू मंडळी, पुन्हा एकदा जमलेल्या त्या बहारदार मैफलीबद्दल!

अण्णांनी आमच्या पुढे दरबारीचा अक्षरश: महाल उभा केला होता! ऐकायला गिनेचुने श्रोते. भाईकाकांच्या शब्दात सांगायचं तर बेहोश झाला होता सारा मामला! वसंता आणि मी बाजूबाजूला बसलो होतो आणि अण्णांच्या दरबारीच्या सुरासुरांवर जीव ओवाळून टाकत होतो!

आज वसंता हयात नाही! नाहीतर अण्णांना भारतरत्न मिळाल्याचं जाहीर झाल्याच्या दिवशी त्याचा मला किंवा माझा त्याला नक्की फोन गेला असता! कारण आम्हा दोघांचाही विठोबा एकच होता!

आज भीमसेन-भक्तिमार्गातला माझा हा वारकरी मित्र माझ्यासोबत नाही!

असो..

-- तात्या अभ्यंकर.

संगीतवाङ्मयअनुभवप्रतिभा

प्रतिक्रिया

अनामिक's picture

13 Jan 2009 - 1:58 am | अनामिक

तात्या, अगदी धावता परिचय झालाय वसंता पोतदारांचा. अजून डिटेल मधे लिहा अशी विनंती.

अनामिक

विसोबा खेचर's picture

13 Jan 2009 - 2:06 am | विसोबा खेचर

त्याचा माझा परिचयही तसा धावताच होता. फक्त अण्णांच्या मैफली पुरताच! :)

अण्णांच्या मैफलीच्या निमित्तानेच काय तो भेटायचा, दाणकन माझ्या पाठीत धपाटा मारून भारंभार बोलायचा, एकत्र चहापाणी व्हायचं, आणि गळाभेट घेऊन आम्ही दोघे एकमेकांचा निरोप घ्यायचो. परत पुढची भेट अण्णांच्या पुण्या-मुंबईतील किंवा नाशकातील एखाद्या मैफलीत. आधेमधे केव्हातरी क्वचित फोनवर बोलणं व्हायचं तेदेखील अण्णांच्या गायकीसंदर्भात!

एक सबंध व्यक्तिचित्र लिहावं इतपत मला वसंता माहीतच नव्हता!

म्हणूनच हा धावता परिचय! :)

तात्या.

संदीप चित्रे's picture

13 Jan 2009 - 2:16 am | संदीप चित्रे

तात्या,
अण्णांबरोबरचे तुझे क्षण सुरेख आहेत फोटोमधे!
माझ्याकडे 'भीमसेन' हे पुस्तक आहे :)

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

सर्किट's picture

13 Jan 2009 - 4:52 am | सर्किट (not verified)

माझ्याकडे पण पोतदारांचे "भीमसेन" हे पुस्तक आहे.

-- सर्किट

पिवळा डांबिस's picture

13 Jan 2009 - 4:36 am | पिवळा डांबिस

तात्या,
फोटो मस्त आहे.
भाग्यवान आहेस!!!
-पिडां

नंदन's picture

13 Jan 2009 - 12:46 pm | नंदन

सहमत आहे. धावता परिचय नि फोटो आवडला.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

छोटा डॉन's picture

13 Jan 2009 - 5:28 pm | छोटा डॉन

>>धावता परिचय नि फोटो आवडला.
असेच म्हणतो.

बाकी फोटो पाहुन भाग्याचा हेवा वाटला, फारच थोड्या नशिबवान व्यक्तींच्या नशिबी असते हे भाग्य.
असो.
------
छोटा डॉन

मीनल's picture

13 Jan 2009 - 5:21 am | मीनल

एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाशी एवढा परिचय हे सुधा भाग्यच लक्षण.
मीनल.

सहज's picture

13 Jan 2009 - 7:20 am | सहज

ऑफीसला जाताना एकाच वेळची लोकल, बस पकडल्यावर त्या डब्यातले काही चेहरे ओळखीचे होतात, विशेष परिचय असा नसला तर एक ओळख, आपुलकी होते. तसे तुमचे व तुमच्या वसंताचे नाते होते. :-)

फोटो सहीच! :-)

मराठी_माणूस's picture

13 Jan 2009 - 8:55 am | मराठी_माणूस

'अनिल बिस्वास ते आर डी बर्मन' हे पुस्तक त्यांचेच का ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jan 2009 - 9:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या, फोटो लै भारी ! वसंत पोतदारांचा परिचय लै थोडक्यात दिला, पण आवडला !

-दिलीप बिरुटे

मी याला व्यक्तिचित्र म्हणणार नाही कारण खूपच धावपळीत लिहिले आहे असे वाटले.
खूप थोडक्यात आटोपले. असो..
फोटो खूप छान आला आहे.
तात्या, आपण खरंच खूप भाग्यवान आहात. राहून राहून हेवा मात्र फार वाटतो आपला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

दिपक's picture

13 Jan 2009 - 9:39 am | दिपक

हेच म्हणतो :)

समिधा's picture

13 Jan 2009 - 10:19 am | समिधा

आपले नशिब खुप चांगले आहे =D>

समिधा's picture

13 Jan 2009 - 10:19 am | समिधा

आपले नशिब खुप चांगले आहे =D>

सुनील's picture

13 Jan 2009 - 10:34 am | सुनील

धावता परिचय आवडला.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अनंत छंदी's picture

13 Jan 2009 - 10:41 am | अनंत छंदी

तात्या
भारतभर भटकंती करणारे पोतदार ते हेच का? तसे असेल तर त्यांनी त्यांच्या भटकंतीवर लिहिलेले एक पुस्तक माझ्या वाचनात आले होते, आणि ते खूपच आवडले होते.

अवलिया's picture

13 Jan 2009 - 11:08 am | अवलिया

उत्तम. परिचय आवडला.

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

विसोबा खेचर's picture

13 Jan 2009 - 1:17 pm | विसोबा खेचर

बाकी काय पण म्हणा, आमच्या तिघांत अण्णाच सर्वात स्मार्ट दिसताहेत! :)

दुर्मिळ फोटू! मराठी आंतरजालरत्न (!) आणि व्यासंगी वसंता यांच्यामध्ये भारतरत्न! :)

नंदन's picture

13 Jan 2009 - 1:46 pm | नंदन

किंवा 'ठाणे'दार-पोतदारांमध्ये सुरांचा सम्राट :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

शंकरराव's picture

13 Jan 2009 - 6:35 pm | शंकरराव

तात्यानु लै भारी

भिमसेनजीं चा सहवास
व ते आनंदाचे पुण्यवान क्षण टिपणारा फोटो दोन्ही गोष्टी अनमोल आहेत
हा ठेवा मिपाकरां सोबत शेअर केल्याबद्दल आभारी आहोत :-)

शंकरराव

तात्या,
वसंतराव मूळचे (आमच्या) इंदूरचे. आणि नंतर स्थलांतरीत झाले (पुन्हा आमच्याच) नाशिकला. (आता आम्ही हे कॅसलिंग केलंय) त्यांचं इंदूरवर रामबाग टोळी नावाचं पुस्तकही आहे. रामबाग नावाच्या इंदूरमधील त्या काळातील मराठी वस्तीवरचं ते आठवणी वजा पुस्तक आहे. वसंतराव मुळात भटके. खूप फिरले आणि त्यावर आधारीत विपूल लेखन केलं. वसंतराव नाशिककर झाले तरी ते तिथल्या साहित्य वर्तुळाशी फटकून राहिले. त्यांचा स्वभावही रोखठोक खरं तर काहीसा फटकळ होता. पण साहित्याच्या बाबतीत त्या माणसाने फार मोलाचं कार्य केलंय. भीमसेन, योद्धा संन्यासी ही पुस्तकंही वाचनीय आहेत. सावरकरांवरही ते छान व्याख्यान द्यायचे. सर्व स्वातंत्र्यवीरांवरही त्यांचा कार्यक्रम होता.

(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/

विनायक पाचलग's picture

13 Jan 2009 - 7:35 pm | विनायक पाचलग

आम्हाला फक्त भीमसीनजीना(कानाला हात लावुन्)एकदाच ऐकायचे भाग्य मिळाले दील खुश हुवा
असो लेख कसा झालाय माहिती आहे का
अगदी ट्वेंटी ट्वेंटी सारखा
म्हणजे सगळी मजा येते मात्र अजुन मिळावी असे साअरखे वाटत राहते
असो
आपला,
(तुमचा हेवा सतत करणारा)विनायक

विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले

कै. श्री. वसंत पोतदार हे हिंदुस्थान समाजवादी प्रजासत्ताक सेनेचे सैनिक आणि हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा आजाद ईत्यादींचे सहकारी श्री. गजाननराव पोतदार यांचे चुलत बंधु.

या महान व्यक्तिमत्वाचा क्रांतिव्यासंग अफाट होता. त्यांनी आपल्या बंधूंच्या सहाय्याने स्वातंत्र्योत्तर काळात हिंसप्रसे च्या हयात सदस्यांच्या भेटी घेउन क्रांतिपर्वातील हिंसप्रसे अध्यायाचा गाढा अभ्यास केला. त्या महान विभूतींचे कार्य उभ्या हिंदुस्थानला कथन करण्यासाठी त्यांनी ५ वर्षे देश पालथा घातला होता. त्यांचा एक कार्यक्रम कृष्ण-धवल दूरदर्शनच्या काळात पाहायला मिळाला होता. या सद्गृहस्थाने क्रांतिकारकांवर विपुल लेखन केले आहे, त्यांचे 'अग्निपुत्र' म्हणजे तर अमोल ठेवा! त्यांनी क्रांती आणि क्रांतिकारक व त्यांचे स्वतंत्र भारतासाठीचे कार्य यावर वर्तमानपत्रात तसेच अनेक नियतकालिकात लेखन केले होते.

२७ फेब्रुवारी या हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांच्या हौतात्म्य दिनाचे औचित्य साधुन त्यांनी २७ फेब्रुवारी १९६५ रोजी बाळासाहेबांकडुन खास परवनगी काढुन 'मार्मिक' चा 'आजाद विशेषांक' काढला होता.

अशा महान व्यक्तिमत्वाची मैत्री लाभली म्हणजे तु फार भाग्यवान!

विकास's picture

14 Jan 2009 - 12:59 am | विकास

पोतदार आमच्याकडे बॉस्टनला १९९९ साली राहायला आले होते. फिरस्ता, मुशाफीर वगैरेला साजेसे वागणे असल्याने ते नाशिकहून मुंबईला चार दिवसासाठी उगाच जावे तसे अमेरिकेस आले होते. काही मर्यादीत कार्यक्रम ठरलेले पण बाकी वेळ मोकळा...

वॉशिंग्टन डिसीहून एका ओळखिच्या ज्येष्ठ व्यक्तीचा फोन आला की अरे पोतदारांची गाठ पडली, असामी माणूस आहे. बॉस्टनच्या मंडळात काही कार्यक्रम होऊ शकेल का म्हणून. त्यावेळेस समर चालू असल्याने आधीच माणसे कमी (मी देखील एकटाच होतो घरात!) त्यात तीन लागोपाठ कार्यक्रम आधीच ठरवलेले असल्याने अवघड होते. तरी देखील पोतदारांना म्हणले नुसते तरी बॉस्टनला या तेव्हढेच बघणे होईल. ते सात दिवस अविस्मरणीय होते. अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. आठवणीप्रमाणे खाली सांगतो:

वर सर्वसाक्षींनी त्यांची माहीती दिलीच. त्यात सांगितलेले गजाननराव पोतदार ह्यांना चंद्रशेखर आझादांचे उजवे हात समजले जायचे. त्याचे बाँब करण्याचे कौशल्य पाहून ब्रिटीशांनी त्यांना त्यावेळेस ४०० रुपयाचा पगार असलेली नोकरी तुरूंगात जाण्याऐवजी देऊ केली, कारण त्यांना जर्मन मेकचे बाँब करता येयचे. पण त्यांनी ती स्विकारली नाही. त्यांच्या भावाने तुरूंगात देशभक्तांना/राजबंद्यांना योग्य वागणूक मिळत नाही म्हणून आमरण उपोषण चालू केले - मरणोन्मुख झाल्यावर, पोलीसांनी तो अत्यवस्थ आहे सांगत त्यांच्या आईला दूरच्या गावाहून बोलावले. त्या लहान वसंताला (का त्यांच्या दुसर्‍या बहीणीस/भावास) कडेवर घेऊन रेल्वे-बस करत गेल्या. तिकडे गेल्यावर पोलीसांनी सांगितले की त्याचे आमरण उपोषण चालू आहे आणि त्याला आता तुम्हीच (म्हणजे आई) थांबवू शकाल. ती महान आई म्हणाली, की त्याला बरे वाटावे असे मला नक्कीच वाटते पण तो एका ध्येयाने आणि कारणाने तुरूंगात आहे आणि उपोषण करत आहे. त्याला मी त्याच्या यशप्राप्तीच्या धडपडीत मधे येऊन आडवणार नाही. आणि पुढच्या गाडीने ती (काळजावर दगड ठेवून) परत घरी निघून गेली. सुदैवाने भावाला यश आले...

पोतदारांचा जन्म ३९ सालचा. त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्य युद्धात भाग घेण्याचा संभवच नव्हता. म्हणूनच ती तहान भागवण्यासाठी ते स्वातंत्र्यानंतर क्रांतिकारकांना शोधायला लागले आणि त्यांच्या मुलाखती वगैरे घेऊ लागले. त्यांनी सांगितलेली एक आठवण ही आजही लिहीत असताना अस्वस्थ करते (ती त्यांच्या पुस्तकात पण आहे): भगतसिंग फासावर गेला (त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्याला आणि राजगुरू-सुखदेवना आदल्याच दिवशी गोळ्याघालून मारले आणि त्यांचे देह अर्धवट जळलेल्या अवस्थेत रावीनदीच्या काठावर टाकून दिले. या भगतसिंगाने त्याच्या आईला शेवटच्या भेटीत सांगितले की. 'मी जरी जात असलो तरी तुझा दुसरा मुलगा तुरूंगातून परतणार आहे.' तो दुसरा (मानलेला) मुलगा होता बटूकेश्वर दत्त. त्यांची तुरुंगातून सुटका झाली स्वातंत्र्याच्या आसपास झाली. पण त्यांना भगतसिंगाच्या आईचा काहीच ठावठिकाणा माहीत नव्हता आणि ते भेटू शकत नव्हते. स्वातंत्र्यसैनीक म्हणून कुठलीच अपेक्षा न ठेवता, साधे जीवन उत्तरभारतात व्यतित करू लागले. एका शिक्षिकेशी लग्न पण केले. जन्मठेपेमुळे तब्येत खालावली होती. एकदिवस अचानक सार्वजनीक ठिकाणी चित्रपट पहात असताना आधीच्या भारतीय समाचार चित्रा मधे त्यांना भगतसिंगाची आई दिसली (मला वाटते १९६०च्या दशकात). मग त्यांनी तिला शोधून काढले. त्यांची अवस्था पाहून त्या आईला कसेसेच झाले. त्या मग या त्यांच्या मानसपुत्राला वैद्यकीय उपचाराला मदत मिळावी म्हणून हिंड्त पैसे गोळा करू लागल्या. हा प्रकार मध्यप्रदेशात झाला आणि पोतदार पण त्यांच्याबरोबर रस्यावर भटकत त्यांची भाषणे, गाणी यांचे प्रयोग करत पैसे गोळा करू लागले. अर्थात सामान्यांचे लक्ष थोडेफार गेले तरी सरकार आणि राजकारणी उपेक्षाच करत राहीले. जे व्हायचे तेच झाले आणि बटूकेश्वर दत्तांचे निधन झाले. त्यांच्या शेवटच्या इच्छेप्रमाणे जेथे भगतसिंग, राजगुरू सुखदेव यांची समाधी आहे, तेथेच अत्यंसंस्कार करण्याचे ठरवून त्यांना रेल्वेच्या डब्यातून नेण्यात आले. प्रत्येक स्टेशनावर रेल्वे थांबत होती, मंत्र्यापासून संत्र्यापर्यंत दर्शनाला येऊन हार आणि पैसे ठेवून जात होते...

अशीच दुसरी आठवण त्यांनी ते सी रामचंद्रांचे पिए असतानाची सांगितली. १९६५च्या युद्धानंतर ऐ मेरे वतन के लोगो सारखेच दुसरे गाणे बसवले आणि शास्त्रींसमोर आशाने म्हणून दाखवले. म्हणून झाल्यावर दागिन्याने मढून आलेल्या आशाने सर्व दागिने अंगावर काढून सैनिकांच्या विधवा फंडाला तसेच्या तसे न बोलता दिले. ते गाणे जाहीर आणि रेकॉर्ड होणार होते - शास्त्री ताश्कंदहून परत आल्यावर... शास्त्री आलेच नाहीत आणि गाणे कधी रेकॉर्ड झालेच नाही. पोतदारांनी ते आठवणीतून म्हणून दाखवले. आज वाईट वाटते, एरव्ही सर्व लिहून अथवा लक्षात ठेवण्याची हौस असून त्यावेळेस मला सुचले नाही.

एकदा शिवाजीपार्क जवळ सावरकरांची त्यांनी लाऊडस्पिकरवर नक्कल करून दाखवली. (ती नक्कल त्यांनी मला देखील तेव्हढ्याच खर्ड्या आवाजात करून दाखवली). एक माणूस बोलवायला आला. त्याच्याबरोबर ते गेले, सावरकर त्यांची वाट पहात होते. गंभिरमुद्रेनेच कौतुक केले... पोतदारांनी नमस्कार केला आणि परतले.

अशा बर्‍याच आठवणी पोतडीतून ऐकत असताना सात दिवस कधी संपले ते समजले नाही. कधी सी रामचंद्र, कधी दादा कोंडके, कधी पुल तर कधी सुनीताबाई, कधी अचानक कुठला तरी क्रांतिकारक तर कधी बंगाली लेखक मित्र,... मराठी मंडळात कार्यक्रम करू शकलो नाही तरी भारतीयांच्या एका ग्रुपमधे एका खाजगी बैठकीत कार्यक्रम केला. लोकांनी मलाच दहादा धन्यवाद म्हणले!

निघताना पोतदार म्हणाले होते की मी तुला पत्र पाठवेन म्हणून. ते काही पाठवले नाही...पण अचानक परत दोन एक वर्षांनी बॉस्टनहून फोन की मी येथे एका विद्यार्थ्याकडे एम आय टी मधे आलो आहे. मुलगी झाल्याचे सांगितल्यावर ताबडतोब भेटायला आले. २-३ तास मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि मग त्यांना विमानतळावर सोडायला गेलो. तेंव्हा देखील वेगवेगळ्या गोष्टी सांगत होते.

नंतर त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यावर वाईट वाटले. अचानक भेट झालेला हा माणूस कुठेतरी कायमचा मनात घर करून राहीला आणि काळाच्या पडद्याआड जरी गेला असला तरी विस्मृतीत नक्कीच गेला नाही... आज तात्यांमुळे त्यांच्या स्मृती परत एकदा जागृक झाल्या...

विसोबा खेचर's picture

14 Jan 2009 - 1:10 am | विसोबा खेचर

विकासराव आणि साक्षी,

आपल्या दोघांच्या विस्तृत आणि माहीतीपूर्ण प्रतिसादाबद्दल खरंच आभारी आहे!

माझ्या पाठीत प्रेमाने धपाटा हाणणारा आणि अण्णांच्या प्रत्येक मैफलीच्या दरम्यान ती मैफल मला शेजारी बसवून मनसोक्त एन्जॉय करणारा आणि नंतर माझ्यासोबत यथेच्छ गप्पा मारून खादाडी करणारा वसंता खरंच ग्रेट होता!

अजूनही त्याचा उल्लेख वसंतराव असा करावासा वाटतो परंतु तो मी करणार नाही! खुद्द वसंतानेच मला तशी ताकीद दिली होती! एकदा नव्हे तर अनेकदा! असो..

तात्या.

अशी एकेक माणसे लाभणे हे पूर्वसुकृतच म्हटले पाहिजे!

चतुरंग

भडकमकर मास्तर's picture

29 Jan 2009 - 12:12 am | भडकमकर मास्तर

तात्या, साक्षीजी आणि विकासराव...
तुमच्या आठवणी फारच छान आहेत...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

प्रभाकर पेठकर's picture

29 Jan 2009 - 9:08 am | प्रभाकर पेठकर

तात्या,
भाग्यवान आहात. अशा थोरामोठ्यांच्या सहवासात आपलेही जीवन समृद्ध झाले आहे असे जाणवते.

आनंदयात्री's picture

29 Jan 2009 - 11:23 am | आनंदयात्री

छान ओळख. नेहमीच्याच तात्या शैलीतली !
लिखाण आवडले.

कधी आपल्याला भेटण्याचा योग आला तर तर डाव्या हाताने हस्तांदोलन करीन मी.
साक्षात भीमसेनांना भेटणं सोडाच पण दुरून बघणं सुद्धा नशीबी नसल्याने निदान
ज्या हाताने भीमसेनांना आधार दिला होता तो हातात घेतल्याचं समाधान!

विसोबा खेचर's picture

29 Jan 2009 - 3:06 pm | विसोबा खेचर

निदान ज्या हाताने भीमसेनांना आधार दिला होता तो हातात घेतल्याचं समाधान!

सुंदर प्रतिसाद. आपल्या भावनांना प्रणाम!

प्रतिसाद देणार्‍या इतरही सर्व वाचकवरांचे आभार..

आपला,
(कृतज्ञ) तात्या.