गिरगाव चौपाटीवर मेक इन इंडिया च्या अंतर्गत महाराष्ट्र रजनी हा कार्यक्रम सुरु असताना स्टेज ला आग लागली व खूप गोंधळ उडाला. त्यावरच प्रहारचे ज्येष्ठ पत्रकार श्यामसुंदर सोन्नर यांनी शेतकऱ्यांच्या वेदनेवर कविता मांडली आहे. श्याम सुंदरसोन्नर यांनी आपल्या कवितेतून सरकारवर आसूड ओढले आहेत, ही कविता सोशल मीडियावर प्रंचड लोकप्रिय होत आहे, फेसबुक तसेच व्हॉटसअॅपवर ही कविता व्हायरल होत आहे.वाचा, श्यामसुंदर सोन्नर यांची कविताशेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं
.....................................
जगाच्या पोशिंद्याचं दुःख
आभाळाला खेटलं
शेतकऱ्याच्या तळतळाटानेच
तुमचं स्टेज पेटलं
उद्योगपतीच्या समोर
तुम्ही नाचवता बायका
शेतकऱ्याला द्यायला
नाही म्हणता पैका
शेतकरी झालं उध्वस्त
ते आयुष्यातून उठलं
शेतकऱ्याच्या तळतळाटानेच
तुमचं स्टेज पेटलं
उद्योगपतींना खुशाल देता
मोठमोठ्या संधी
कांद्याचे जरा भाव वाढले
की निर्यातीवर बंदी
असं दुटप्पी वागणं कसं
तुम्हालाच पटलं
शेतकऱ्याच्या तळतळाटानेच
तुमचं स्टेज पेटलं
मेक इन इंडियाचा
केवढा मोठा बोलबाला
तिकडे शेतकरी मात्र
नुसते कष्ट करून मेला
उद्योगपतीची वाढते ढेरी
अन् शेतकऱ्याचं रक्त आटलं
शेतकऱ्याच्या तळतळाटानेच
तुमचं स्टेज पेटलं
नफेखोर उद्योगपतीसाठी
केवढा तुमचा आटापिटा
जगाला जगविणारा मात्र
मुदलामध्ये सोसतो तोटा
किती मांडू हिशेब सारा
मन पार विटलं
शेतकऱ्याच्या तळतळाटानेच
तुमचं स्टेज पेटलं
- शामसुंदर महाराज सोन्नर
प्रतिक्रिया
16 Feb 2016 - 7:46 pm | मम्बाजी सर्वज्ञ
कविता आवडलीये!
कोण आहेत हे लेखक? नवीन नाव दिसतंय! पुरस्कार वापसित दिसले नाहीत कुठे!!
शेतकरी बहुदा दादा, साहेब, बाहुबली(ते तेल्गीवले), अशोकराव वगरे असावेत.
नाही म्हणजे शेतकर्यांना गेली ५० वर्षे ठेंगा मिळतोय (स्वतःचा आणि घरच्यांचाअनुभव) पण आत्ताच स्टेज वगरे पेटायला लागले म्हणून विचारतोय.
असो.
16 Feb 2016 - 8:52 pm | अमोघ शिंगोर्णीकर
एक नंबर....!!
17 Feb 2016 - 1:43 am | लालगरूड
https://m.facebook.com/marathistar/posts/819444608165495
स्वतः लिहीत जा .
17 Feb 2016 - 1:44 am | लालगरूड
स्वतः लिहलेल्या कविता आवडतील .
17 Feb 2016 - 2:13 am | खटपट्या
कविता आवडली...पण,
शेतकर्यांच्या दु:खासाठी सरकारला आणि बाकी जनतेला कधीपर्यंत जबाबदार धरणार ? नेहमी शेतकर्यांच्या नावाने गळे काढायचे. मान्य आहे शेतकरी दु:खी आहे पण म्हणून बाकीची कामं ठेउन त्यांनाच मांडीवर घेउन बसायचं का? आम्हा चाकरमान्याच्या करामधून जे काही करता येतय ते सरकार करतच आहे की.
आणि आमच्या चाकरमान्यांच्या नोकर्या जातात तेव्हा आमचे तळतळाट कोण ऐकतो. आमच्या तळतळाटाने कोणाचे काही जळू नये असंच आम्हाला वाटतं
17 Feb 2016 - 8:29 am | क्रेझी
+१
17 Feb 2016 - 10:31 am | महासंग्राम
कोण म्हणत त्याला मांडीवर घेऊन बसा म्हणून. त्याला मांडीवर घेऊन बसायचं नाहीच आहे, शेतकर्याला फक्त हक्काचा भाव पाहिजे, बोला देऊ शकता तुम्ही. जेव्हा त्याने कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला कवडीमोल मोल भावाने विकावे लागते काय कराव त्याने, काढू शकता का ग्राहक आणि शेतकर्यामधला मध्यस्थ. साहेब आधी त्यांनी पिकवलेल्या अन्नधान्य-भाजीपाला याचा वापर थांबून जागून दाखवा मग, मांडीवर घेउन बसायचं का याच्या गोष्टी कराव्यात असे वाटते.
लक्षात ठेवा
शेतकरी आहे म्हणून तुम्ही आहात
बाकी
सांगणे न लागे
17 Feb 2016 - 10:12 pm | खटपट्या
अहो भालेराव साहेब,
मीही एक शेतकरी आहे. गेल्या १० वर्षात मला ४ वेळा एवढा तोटा झाला की घरदार गहाण ठेवायची वेळ आली होती. मग मी काय तुमच्याकडे येउन गळा काढू ? की मांडीवर येउन बसू ??
18 Feb 2016 - 11:40 am | वेल
अनुमोदन
17 Feb 2016 - 2:36 am | अर्धवटराव
पण कविता फसवणुक करणारी आहे.
तळतळाटाने आगी लागल्या असत्या तर एव्हाना अवघं मंत्रालय जळुन खाक झालं असतं (तसं ते झालय, पण मुद्दाम आग लावल्या मुळे)
इंडस्ट्रीयल डेव्हलपमेण्ट शेतकरी हिताविरुद्द/शेतकी हिताला इग्नोर करणारी असल्याची ओरड अल्टीमेटली शेतकर्यांचाच घात करेल.
17 Feb 2016 - 8:42 am | नाखु
बरोबर आहे.
याच न्यायाने गेल्या ५-१० वर्षात महाराष्ट्रात अकाली + अपघाती मेलेल्या नेत्या+मंत्र्याच्या मृत्युवरही आशीच विखारी कवीता रचावी धागाकर्त्याने, तेव्हढाच कढ्/उमाळे/जळजळ काढायला तथाकथीतांना संधी मिळेल.
पांढरपेशा चाकरमानी नाखु खिजगणती
17 Feb 2016 - 7:21 am | खटासि खट
कविता आहे. उपमा आहे त्यामुळे समजून घ्यायला अवघड नाही.
पण फेसबुकावर तळतळाटानेच स्टेज पेटलं याची खात्री झाल्याच्या पोस्टी पहायला मिळाल्या. जर आतिशबाजी केली नसती किंवा चोख काळजी घेतली असती तर आग लागली असती का ? या आधीही अनेक कार्यक्रम झाले आहेत. काकासाहेबांना बोलवलं आणि आम्हाला पार्टनर असून कुणी विचारत नाही या तळतळाटातून आग लागली असण्याची शक्यता जास्त वाटते.
17 Feb 2016 - 8:39 am | स्वामी संकेतानंद
गांधीजी आठवले. बिहार भूकंपावेळी म्हणाले की भारतात अस्पृश्यता आहे म्हणूनच भूकंप आला. आपल्या पापांची शिक्षा केली.
एक कळत नाही, मागच्या 2 दशकांत एवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्यांचे हक्काचे पाणी पळवले, तेव्हा का नाही काही झाले? की तळतळाट पण फ़क्त उजव्यांना लागतो?
17 Feb 2016 - 8:41 am | एक सामान्य मानव
हे मजुर घाम गाळतात व मालक ऐष करतात किती दिवस ऐकायचं? स्टेज पेटलं नसतं तर मग सगळं आल्बेल आहे असं असतं का? नफेखोर हा शब्द शिवीसारखा का वापरला आहे? प्रत्येकजण नफा/फायदा मिळतो म्हणूनच काम करतो. हे असले डावे लोक्स डोक्यात जातात. काहीही करा यांच रडगाणं सुरुच. सगळ्या लोकांनी नेहमी एरंडेल पिल्यासारखं तोंड करुन बसावं यांच्यासारखं.
17 Feb 2016 - 11:00 am | llपुण्याचे पेशवेll
सहमत. अगदी १००% सहमत. बाकी शेतकर्याचा भाजीपाला आणि धान्य पुरत नाहीये. बाहेरून आणावे लागत आहे. कदाचित काहि दिवसांनी शेतकरीदादा स्वतःपुरतंच पिकवून खातील बाकीच्याना खायला घालायची गोष्ट लांब राहीली. शेती फायद्यात राहीली नसेल तर विकून दुसरा उद्योग सुरु करा किंवा जो ती फायद्यात करू शकतो त्याला करायला द्या. उगा रडगाणं किती दिवस गात बसायचे.
17 Feb 2016 - 9:12 am | नाना स्कॉच
कोती मनोवृत्ती आहे राव! तिकडे फेसबुकवर सुद्धा दिसतात असले शब्द!
"भारत रशिया ५ अब्ज डॉलर्स चा करार" अशी जरी न्यूज़ असली तरी खाली
"अरे शेतकरी उपाशी आहे" ची बोंब सुरु! आधी जसे काहीच होतच नव्हते!
17 Feb 2016 - 9:37 am | ज्ञानोबाचे पैजार
कवितेचे शीर्षक वाचुनच मनाला फार क्लेश झाले. ज्या महाराष्ट्राचे पुरोगामी विचारांचे राज्य असा अभिमानाने उल्लेख केला जातो तिथे अशा विचारांचे लोकही आहेत याची प्रचंड लाज वाटली.
कोणाचे इतके नैतिक अध:पतन कसे होऊ शकते की त्याने एखाद्या दुर्घटनेमध्ये असा आसुरी आनंद शोधावा?
असे नसेल, तरी सुध्दा केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी असा जळत्या चितेवर पोळी भाजुन घ्यायचा उद्योग कोणी करू नये असे वाटते.
कवितेत मांडलेल्या विखारी विचाराचा मी स्पष्ट शब्दात निषेध करतो आणि ही कविता ज्यांनी लाईक केली आहे त्यांच्या साठी "गेट वेळा सून"
पैजारबुवा,
17 Feb 2016 - 10:00 am | चांदणे संदीप
+१
प्रतिसादाला लाईक!
Sandy
17 Feb 2016 - 10:04 am | मोदक
+11111
17 Feb 2016 - 10:05 am | खेडूत
ते कसले वेल गेट्तायत सून... ते नुस्तेच 'सुन सायबा सुन'!
7 Mar 2016 - 2:48 pm | गणेशा
नेहमी प्रमाणे सहमत !
17 Feb 2016 - 10:09 am | जेपी
कविता एका पत्रकारांने केली आहे..
त्यामुळे कवितेची माझ्यालेखी किंमत शून्य आहे..
17 Feb 2016 - 10:25 am | चांदणे संदीप
आपल्या धाग्यातले हे वाक्य...
आणि, इथला हा प्रतिसाद...
मेळ बसत नाही! :(
लतोमोघा असेल तर आधीच आय माय स्वारी!
Sandy
17 Feb 2016 - 10:10 am | अनुप ढेरे
अत्यंत भिकार कविता.
17 Feb 2016 - 10:28 am | सर्वसाक्षी
आतापर्यंतच्या अनेक प्रतिसादांमध्ये विचारल्याप्रमाणे एकाएकी आताच का हे काव्य स्फुरू लागले? या कवींचे बोलविते धनी कुणीतरी असावेत.
आता दुष्काळाविषयी. शेतकर्यांच्या वेदना समाज निश्चितच समजु शकतो. पुरात, गारपिटीत वा दुष्काळात उभे पीक गमावणार्या शेतकर्याविषयी सर्वांना सहानुभुती आहे. पण त्याचा बादरायण संबंध अन्यत्र लावुन उगा अरण्यरुद्दन करुन सरकारच्या नावे बोटे मोडण्यापेक्षा शेतकर्यांना धीर देणार्या कवीता लिहा, समाजाने त्यांच्यासाठी काय करावे जे सहज शक्य आहे असे काही लिहा.
कविवर्यांना सकाळी सात वाजता साम मराठी वाहिनीवर दाखविला जाणारा अॅग्रोवन हा कार्यक्रम पाहायला सांगा. या कार्यक्रमात दुष्काळावर मात करत अल्प पाण्यात अन्य पीके, फळे, फुले यांचे उत्पादन घेउन यशस्वी झालेल्या शेतकृयांचा मुलाखती, शेतीपद्धती व प्रत्यक्ष शेती दाखवितात.
बाकी हल्ली वॉसप मुळे अनेक कवींनी उच्छाद मांडला आहे, झटपट प्रसार! टाक काडी आणि लाव आग.
17 Feb 2016 - 10:31 am | पैसा
आज सकाळच्या डीडी किसानवर आलेल्या आकड्यांप्रमाणे २०१५-१६ साठी भारतातील अन्नधान्याचे उत्पादन २०१४-१५ पेक्षा जास्त आहे. हे कसे काय? उत्पादन वाढले ते कुठच्या शेतकर्यांमुळे? का महाराष्ट्रातल्यालोकांनी शेती केली किंवा न केली तरी देशाला काहीच फरक पडत नाही??
17 Feb 2016 - 11:29 am | विटेकर
कायम सरकारच्या नावाने गळा काढून ओरडा ! सबसिडी पाहीजे, कर्जमाफी पाहिजे , आरक्षण पाहीजे ! द्या द्या द्या !!! आमचे कर्तृत्व गेले गाढवाच्या ..... !
शेतीच केली पाहीजे असे काही सरकारी बंधन नाही ना ? इतका त्रास होतो तर द्या की सोडून शेती करणे, आता गवो गावी शिक्शणाची उत्तम सोय आहे, थोडी प्रगती दाखवली तर शिष्ञ्वृत्ती मिळू शकते, शिका आणि स्वकर्तुत्वावर व्हा की मोठे .. तुमचा हात कुणी धरला आहे का ?
आणि तुम्ही काय फुकट अन्न धान्य विकता का ? चवल्या मोजल्याशिवाय कोथिंबिरीचे पान मिळत नाही ... आम्ही खायला घालतो ही मिजास कशाला ? किती दिवस तुम्हाला दलाल फसवणार ? तुम्ही कधीच शहाणे होणार नाही का ?
आणि तसेही आता खेड्यापाड्यात सुद्धा गुंथ्याला चान्गला भाव मिळतोय... विकली शेती तर आयुष्यभर दुसरा काहीतरी काम धन्दा करुन आरामात पोट भरु शकतील लोक ! मात्र त्यासाठी पैसा जपून वापरायला हवा ... सोण्याची चेन,, अण्गठेया , पोस्टर्स वर आलात तर आयुश्याची माती व्हायला वेळ लागणार नाही .. पण लक्षात कोण घेतो ?
पण कष्ट करण्याची तयारी नाही आणि सरकारच्या नावाने खडे फोडायला सर्वात पुढे !
या कर्जमाफीपेक्षा शासनाची जलयुक्त शिवार योजना खूप खूप चान्गली आहे .. ज्याला स्वतःची प्रगती करायची आहे त्याला सुवर्णसंधी ! कर्जमाफी ने त्या वर्शीचा प्रश्न सुटेल .. जलयुक्त शिवाराने कायमचा !
17 Feb 2016 - 12:17 pm | महासंग्राम
शेतकर्यांनी शेती करणे सोडून दिल्यास आपण प्रतीक्रीर्या द्यायला सुद्धा जिवंत कसे राहणार. अर्थात तो त्याचे मोल घेतो आणि त्याचा हक्क आहे
कापसाचं पिक यायला किती महिने लागतात हे सांगू शकाल काय ???
त्याने कष्टाने पिकवलेला भाजीपाला मग फुकट द्यायचा का ?
मग तो जगणार कसा ?
भाजीपाला महाग विकत तो दलाल शेतकरी नाही हे कधी लक्षात घेणार आपण.
-- शेतकर्याने कधी आरक्षण मागितले ते सांगा ?? शेतकर्याला त्याच्या मालाला फक्त योग्य भाव पाहिजे असतो.
अवांतर- आयुष्यात एकदा तरी बालभारती ९/१० च्या पुस्तकात 'लाल चिखल' म्हणून धडा होता तो वाचण्याचे कष्ट घ्या कदाचीत समजू शकेल तुम्हाला.
17 Feb 2016 - 12:26 pm | पिलीयन रायडर
भालेराव, कळकळ समजतेय. पण तरीही दोन प्रश्न..
१. "आम्ही" नक्की काय करायचं? भाव वगैरे गोष्टी सरकार आणि तुम्ही मिळुन ठरवाल ना? आम्ही बाजारात मिळते त्या भावाने धान्य भाजी घेतो. भाव वाढले की सामान्य माणसा सारखे आरडा ओरडा करतोही, पण गरज असल्याने जे आणि जेवढं परवडेल ते घेतोच.
२. शेतकरी पिकवतो त्या मालाचा भाव, वितरण, नफा इ गोष्टी शेतकर्यानेच संघटना करुन बघितल्या आणि दलालांना बाजुला केले तर शेतकर्याचा फायदा होईल असे वरकरणी वाटते. त्यात नक्की समस्या काय ते माहित नाहीत. माहिती असल्या तरी आमच्या हातात काय हे ही ठाऊक नाही. मग इथे आम्हाला खडसावण्यापेक्षा शेतकर्याला योग्य दर मिळावा म्हणुन नक्की शेतकरी संघटना काय करते? किंवा सरकार काय करतं ह्यावर लक्ष केंद्रित करावे ना?
सरकार उद्योगधंद्यांना आणायचा प्रयत्न करत आहे हे ही चांगले आहेच की. आम्ही चाकरमानी माणसं. आम्हाला नोकर्या मिळतील. आम्ही निषेध का करावा ह्याचा? शेतकर्यांना हक्क मिळाला पाहिजे हे कुणीच नाकारत नाही, पण म्हणुन तळतळटाने स्टेज पेटलं हे चुक आहे. तिथे देशोदेशीचे लोक आले होते. आपल्या महाराष्ट्राची शान राखणे आपलेच काम आहे. डिजास्टर प्लान नीट राबवला गेला, कुणी जखमी झाले नाही ही अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या राज्याचे.. देशाचे नाव राखणे आपले काम आहे. आपण असे विरुद्ध पार्टीत जाऊन नाही बसायचे.
17 Feb 2016 - 12:51 pm | महासंग्राम
पिराताई,
हे आपल्या म्हणण्याशी मी पण सहमत आहेच. कवितेबद्दल न बोललेलंच बर. पण माझा रोख ह्यावर नाही. पण लोकं कवितेवर चर्चा न करता शेतकरी कसा चुकीचा असे ताशेरे झाडतात.
एक प्रतिसादात अशी भाषा आहे हे कसं ऐकून घ्यायचं.
माझा प्रतिसाद मुख्यत: विटेकर यांच्या साठी होता. तुम्ही मांडलेल्या मुद्याशी सहमत आहेच. इथे तुम्हाला खडसावले (अर्थी विटेकर यांना ) ते त्यांनी वापरलेल्या भाषेसाठी. त्यांनी प्रतिसादात वापरलेली उपकाराची भाषा कधीच मान्य होण्यासारखी नाही.
17 Feb 2016 - 1:02 pm | नाखु
उत्तर इथे आहे
तुच तुझ्या जीवनाचा शिल्पकार
जाता जाता थेट प्रश्न :
शेतकर्यांसाठी, शेतकरी कैवारींसाठी आणि शहरी (विशेषतः मिपाकरांवर) आगपा़खड करणार्यांसाठी.
मागे एका ज्वलनशील धाग्यावर मी आवाहन केले होते की शहरी भागातील सोसायटीत थेट विक्रीसाठी किती शेतकरी तयार आहेत? त्यांनी कळवा. आजतागायत एक ही उत्तर नाही.
त्या सोबतच एक आरसा प्रतीसाद डांगेंनी सुभाष पाळेकरांसबधीत धाग्यात दिला होता तोही नजरेखलून घालावा ही विनंती.
आजची ताजी माहीती
प्रक्रिया उद्योगास चालना
आणि आता शेवटचा प्रचिती दाखला:थेट अग्रोवन मधून
जपतोय जमिनीची सुपीकता...
माणिक रासवे
Sunday, February 14, 2016 AT 12:15 AM (IST)
Tags: agro special
परभणी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत सेलू येथे कार्यरत असलेले यांत्रिकी अभियंता प्रदीप केंद्रेकर यांनी नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करीत पीक उत्पादनखर्च कमी केला. प्रयोगशील शेतकरी आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्यांनी जमिनीची सुपीकता जपत पीक उत्पादनात सातत्य ठेवले आहे. शेतमाल विक्रीसाठी स्वतःची बाजारपेठ विकसित केली आहे.
प्रदीप सुधाकरराव केंद्रेकर यांचे मूळ गाव झरी (जि. परभणी). त्यांची सनपुरी (जि. परभणी) शिवारात आठ एकर वडिलोपार्जित जमीन आहे. शालेय जीवनापासून त्यांना शेतीची आवड असल्याने त्यांनी वडिलोपार्जित शेतीमध्ये विविध पीक लागवडीचे प्रयोग सुरू ठेवले. सन १९८६ मध्ये प्रदीप केंद्रेकर परभणी जिल्हा परिषदेच्या सेवेत अभियंता म्हणून रुजू झाले. सेवा काळात त्यांची विविध ठिकाणी बदली झाली. परंतु त्यांची शेतीची आवड कायम आहे. त्यामुळे दर रविवारी ते शेतावर जाऊन पीक नियोजन करतात. तसेच परिसरातील शेतकऱ्यांशी पीक व्यवस्थापन, विक्री व्यवस्थेबाबत चर्चा करतात. परिसरातील शेतीमधील प्रयोग पाहून स्वतःच्या शेतीमध्ये अवलंब करतात. पाच वर्षांपूर्वी श्री. केंद्रेकर आठ एकर क्षेत्रावर कापूस, तूर, मूग, ज्वारी या पिकांची लागवड करीत होते. रासायनिक खते, कीटकनाशके, संकरित बियाण्यांचा ते वापर करायचे. त्यासाठी त्यांना वार्षिक ८० हजार ते एक लाख रुपये खर्च येत होता. त्या वेळी खर्च आणि उत्पादनाची जेमतेम बरोबरी व्हायची. नफा शिल्लक राहायचा नाही. परंतु नोकरी असल्यामुळे आर्थिक ताण फारसा जाणवायचा नाही. सन २००५ मध्ये श्री. केंद्रेकर यांनी कार्यालयातील सहकाऱ्यांच्या समवेत आर्ट आॅफ लिव्हिंगचा कोर्स केला. या माध्यमातून त्यांना नैसर्गिक पद्धतीने शेतीबाबत माहिती मिळाली. मधल्या काळात त्यांनी या शेतीपद्धतीबाबत माहिती गोळा केली. सन २०१० मध्ये त्यांनी नैसर्गिक शेती करण्यास सुरवात केली. या वेळी त्यांना सुभाष पाळेकर यांच्या चर्चासत्रातून जमिनीची सुपीकता, पीक व्यवस्थापनाबाबत माहिती मिळाली. शाश्वत सिंचनासाठी शेतापासून काही अंतरावरील दुधना नदीवरून आणलेले पाणी त्यांनी सामूहिक शेततळ्यात साठवले आहे. या शेततळ्यातून ठिबक सिंचन पद्धतीने पाणी पिकांना दिले जाते. श्री. केंद्रेकर पीक व्यवस्थापनाच्या जमाखर्चाचा हिशेब ठेवतात. त्यामुळे खर्चात बचत करणे शक्य होते. नोकरी करत असल्याने एका मजुराबरोबरीने चौथाही हिश्श्याने पीक व्यवस्थापन ते करतात. जनावरे आणि पीक व्यवस्थापनासाठी एक मजूर रोजंदारीवर असतो. पीक व्यवस्थापनाच्या गरजेनुसार मजूर घेतले जातात. येत्या काळात गीर गाईंची संख्या वाढवून तूपनिर्मिती करण्याचा त्यांचा विचार आहे.
असे आहे पीक व्यवस्थापन ः
१) केंद्रेकर यांची आठ एकर शेती आहे. यामध्ये खरिपात सोयाबीन, तूर, कापूस, बाजरी, अंबाडी आणि हळद लागवड असते. रब्बी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा, तसेच मिरची, टोमॅटो या पिकांची लागवड असते. श्री. केंद्रेकर ज्वारी, गहू, तूर, हरभरा या पिकांच्या सरळ वाणांची लागवड करतात. त्यामुळे त्यांच्याकडे स्वतःचे बियाणे उपलब्ध असते. पूर्वी ते बीटी कपाशीची लागवड करायचे. परंतु यंदाच्या वर्षापासून त्यांनी सरळ वाणाची लागवड केली. कपाशीमध्ये बाजरी, अंबाडीचे सापळा पीक लावले जाते. एकात्मिक पद्धतीने कीड नियंत्रणावर त्यांचा भर आहे. बांधावर झाडोरा आहे, तसेच शेतात सापळा पिकांची लागवड असते. त्यावर पक्षी येतात. हे पक्षी कापूस व तुरीवरील कीड खातात. त्यामुळे पक्ष्यांकडूनच कीड नियंत्रण होते. यंदा त्यांना दोन एकरात आठ क्विंटल कापसाचे उत्पादन झाले.
२) गेल्या पाच वर्षांपासून हळदीच्या सेलम वाणाची सरी वरंबा पद्धतीने दोन एकर क्षेत्रावर लागवड असते. एक आड एक सरीवर ते तुरीचे बी टोकतात. गेल्या वर्षी त्यांना एकरी ओल्या हळदीचे १०० क्विंटल उत्पादन मिळाले. २५०० ते ३००० रुपये क्विंटल या दराने बेणे म्हणून त्यांनी विक्री केली. सध्या हळदीची काढणी होणार आहे. आंतरपीक तुरीची काढणी झालेली आहे. दोन एकरांतून १० क्विंटल तुरीचे उत्पादन मिळाले. तुरीची डाळ करून परभणी शहरात विक्रीचे त्यांनी नियोजन केले आहे.
३) दर वर्षी रब्बी ज्वारीचे एकरी दहा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. ज्वारीची तीन हजार रुपये क्विंटल या दराने ग्राहकांना थेट विक्री केली जाते.
४) गेल्या वर्षी पाण्याच्या ताणामुळे बन्सी गव्हाचे एकरी फक्त ३.५ क्विंटल उत्पादन मिळाले. यंदा २८ गुंठ्यांवर गव्हाची लागवड केलेली आहे. गेल्या तीन वर्षांपासून केंद्रेकर परिसरातील चार- पाच शेतकऱ्यांच्या बरोबरीने एकत्रित गव्हाची विक्री करतात. सरासरी चार हजार रुपये क्विंटल या दराने थेट ग्राहकांना विक्री केली जाते. काही प्रमाणात बियाण्यांची विक्री ते करतात.
५) गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे आठ एकरांतून खर्च वजा जाता दोन लाखांचा नफा शिल्लक राहिला. हा नफा ते शेतीच्या व्यवस्थापनात गुंतवितात.
दर रविवारी शिवारफेरी
केंद्रेकर हे जिल्हा परिषदेच्या सेवेत आहेत. त्यांच्याकडे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांचा शेतकऱ्यांशी थेट संपर्क येतो. आता त्यांनी शेतकरी गट तयार केला आहे. या गटात २०० शेतकरी आहेत. दर रविवारी शेतातील कामाचे नियोजन करून ते स्वतःच्या शेतावर किंवा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतावर शिवारफेरीचे आयोजन करतात. या शिवारफेरीत पीक व्यवस्थापन, सेंद्रिय खतांचा वापर, जनावरांचे व्यवस्थापन, शेतमाल विक्रीबाबत चर्चा होते. या चर्चेतून अनुभवांची देवाणघेवाण होते. त्याचा पीक उत्पादनवाढीसाठी फायदा होतो.
सेंद्रिय खतांच्या वापरावर भर ः
केंद्रेकर यांनी रासायनिक खतांचा वापर बंद केला आहे. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी शेणखत, जीवामृताच्या वापरावर त्यांनी भर दिला आहे. शेतीला पुरेसे शेणखत उपलब्ध होण्यासाठी त्यांनी लालकंधारी आणि गीर गाईंचे पालन केले आहे. सध्या त्यांच्या गोठ्यात १५ जनावरे आहेत.
आता सांगा भालेराव साहेब ???
एक ईंचही शेती नसलेला शहरी चाकरमानी नाखु
17 Feb 2016 - 1:54 pm | महासंग्राम
मालक मी शेतकऱ्यांचा कैवारी नाही. आक्षेप आहे तो फक्त वापरलेल्या भाषेवर. क्रेझी नावाच्या आयडीने
हि भाषा कशी स्वीकारणार ???? बाकी तुमच्या प्रतिसादातील पहिल्या भागतल्या गोष्टी मान्य आहेत डांगे अण्णा यांनी दिलेला प्रतिसाद भाग २ वाचतो आहे
काही समजले नसल्यास नक्कीच विचारेन.
17 Feb 2016 - 2:03 pm | महासंग्राम
खटपट्या
17 Feb 2016 - 2:19 pm | चाणक्य
मागच्या की त्याच्या मागच्या आठवड्यात लोकसत्तामधे गडचिरोलीतील एका तरूण शेतक-याची यशोगाथा आली होती. त्या पठ्ठ्याने 'मोत्यांची' शेती केलीये. सरकारनेही दखल घेतलीये त्याच्या या प्रयोगाची. मानलं पाहिजे राव त्या शेतक-याला. प्रचलित पीके, शेती याला फाटा देत त्याने नवीन काहितरी घडवलं आणि परिस्थितीला यशस्वी झुंज दिली.
17 Feb 2016 - 1:25 pm | श्रीगुरुजी
विटेकरांच्या प्रतिसादाला +१
हेच वाक्य इतर व्यावसायिकांच्या संदर्भात सुद्धा लागू पडते.
उदा. शिंप्यांनी कपडे शिवायचे थांबविल्यास कोणालाही घरातून बाहेर सुद्धा पडता येणार नाही. मग अन्नधान्य पिकविण्याकरीता शेतावर जाणे लांबच राहिले. किंवा सुतारांनी नांगर बनविण्याचे थांबविल्यास शेतच नांगरता येणार नाही किंवा चांभारांनी पादत्राणे तयार करण्याचे बंद केले तर रस्त्यावर चालताचे येणार नाही.
समाजात प्रत्येक जण दुसर्यांवर अवलंबून असतो. फक्त शेतकरीच अशी भाषा करतात की आम्ही शेती करण्याचे थांबविल्यास भारत उपाशी मरेल. प्रत्येकाचे काम महत्त्वाचे आहे.
17 Feb 2016 - 1:57 pm | महासंग्राम
हे वाक्य बहुतेक तुमच्या/आमच्या सारख्या लोकांनी तयार केलेले आहे. माझ्या पाहण्यात तरी कोणत्याही शेतकर्याने असे बोललेले नाही.
17 Feb 2016 - 11:16 pm | श्रीगुरुजी
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकर्यांनी शेती करणे थांबविल्यास जग उपाशी मरेल अशा अर्थाची वाक्ये अनेक लेखातून वाचल्याचे आठवते. शेतकर्यांचे नेते राजू शेट्टी यांनी जाहिररित्या असे उद्गार काढल्याचे वृत्तवाहिन्यांवर पाहिले आहे.
फक्त आपल्या कामावरच/व्यवसायावर जग चालते अशी शेतकर्यांची समजूत आहे का? इतर व्यावसायिकांच्या कामाला कमी महत्त्व आहे का? म्हणूनच मी शिंप्यांचे उदाहरण दिले.
कालौघात अनेक जुने व्यवसाय नष्ट झाले व अंगात दुसरे कौशल्य नसल्याने ते व्यावसायिक प्रचंड अडचणीत सापडले. कल्हईवाले, स्टोव्ह दुरूस्ती करणारे, छत्र्या दुरूस्ती करणारे, कोपर्याकोपर्यावर एखादा हवा भरण्याचा पंप घेऊन किरकोळ सायकल दुरूस्ती करणारे अशा अनेक व्यावसायिकांच्या व्यवसायावर आधुनिक काळात गदा आली. अनेक व्यवसाय कायमस्वरूपी बंद पडले. परंतु त्यांच्यापैकी कोणीही सामूहिक आत्महत्या केल्याचे ऐकिवात नाही. शेतकर्याकडे निदान स्वतःची जमीन तरी असते. कल्हईवाल्यांचा व्यवसायच बंद झाल्यावर त्यांनी कसे जगायचे होते? त्यांना सरकारी मदत सुद्धा शून्य होती. त्यांनी नक्कीच जगण्यासाठी वेगळा मार्ग शोधला असणार. जर शेती ही कायमच दरवर्षी तोट्यातच जात असेल तर असा तोट्यातला व्यवसाय थांबवून वेगळा मार्ग नको का शोधायला? किती दिवस सरकारच्या नावाने बोटे मोडणार?
17 Feb 2016 - 11:49 am | पिलीयन रायडर
शेतकर्यांचे प्रॉब्लेम्स मोठे असतीलही.. पण असं किती दिवस दुसर्यावर अवलंबुन रहाणार? "व्यवसाय" कसा करायचा हे अजुनही शेतकर्यांनी (संघटना असुनही) शोधले नसेल आणि अजुनही "भाव मिळत नाही" हीच व्यथा असेल तर ह्यात शेतकर्यांचीही काही चुक असेल असे वाटत नाही का?
धान्य-भाज्यांना रास्त भाव द्यायला काही हरकत नाहीचे.. पण मधले दलाल तो पैसा खात असतील तर व्यवसायिक म्हणुन तुम्ही काय केले आजवर? त्याचाही विचार व्हावा.
बाकी मोदी सरकार जितक्या जोमाने इंडस्त्रियलिस्ट लोकांसाठी काम करत आहे तसेच शेती ह्याक्षेत्रात काय सुधारणा करत आहे? कुणाकडे माहिती असल्यास द्यावी.
17 Feb 2016 - 3:03 pm | sagarpdy
पुढील ३ दुवे पाहावेत
१ २ ३
19 Feb 2016 - 4:41 pm | जयंत कुलकर्णी
इंडस्ट्रियलायझेशन इतके वाढले पाहिजे की शेतकरी व शेतमजुर कुटुंबातील एका तरी माणसाला इंडस्ट्रीमधे नोकरी मिळाली पाहिजे. अर्थात तो अडीअडचणीच्यावेळी घरच्यांना मदत करेल असे गृहीत धरले आहे. ते कदाचित चूक असेल. आजकाल मी पाहिले आहे की याची सुरवात झाली आहे. कोकणात हे फार पूर्वीपासून झाले आहे हे सर्वजण जाणतातच.
19 Feb 2016 - 9:51 pm | खटपट्या
खरंय !!
17 Feb 2016 - 12:31 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
आँ अच्चं आये का ते शगलं? नै मंजे गेली कैक दशकं म्हाराष्ट्रात जेंची सत्ता होती त्यांची ष्टेजं कच्ची नै जल्ली मोग? का स्टेज बर्निंग वॉज ष्टेज्ड बाय समवन हु लॉस्ट पॉवर अँड कान्ट लिव्ह विदाउट? आपला डौट्ट आहे ब्रे.
17 Feb 2016 - 1:28 pm | नाना स्कॉच
कुठले सरकार कधी होते मग तुमच्यावेळी काय अन आमच्यावेळी काय हा प्रश्न काहीवेळ बाजूला नाही ठेवता येणार का? त्याने शब्दाला शब्द वाढतो अन निष्पन्न काहीच होत नाही
17 Feb 2016 - 2:21 pm | सुमीत भातखंडे
जमून आल्ये पण आशय पटला नाही
17 Feb 2016 - 2:30 pm | जेपी
चर्चा कविते वर झाली तर बरय..
कुठल्याही शेतकर्यांने सदरील पत्रकाराला बॉंड पेपर दिला नाही की,"बाबा माझा कैवार घे आणी कविता लिही".
सब मनकी बाता..
17 Feb 2016 - 2:42 pm | पैसा
चोरीचा माल आहे ना?
17 Feb 2016 - 9:54 pm | खटपट्या
हायला,
माझ्या वरील वाक्याने बरीच वादावादी झालेली दीसतेय. काय करावे ब्रे.
17 Feb 2016 - 11:45 pm | धर्मराजमुटके
धाग्यावर अवांतर आहे पण शेती फक्त लग्न झालेल्या माणसांनीच करावी. आजकाल तरुणांनी शेतीत करीयर करायचे ठरवले तर शेतकर्यांच्याच पोरी त्यांना नापसंत करतात. त्यांना शहरात राहणारा आणि १० ते ६ नोकरी करणाराच नवरा हवाय ! (सरसकटीकरण करत नाहिये. अपवाद आहेतच.)
त्यावर उपाय म्हणून आमच्या गावाकडची पोरं लग्नाचं वय झालं की कुठेतरी एमआयडीसीत नोकरी करतात. लग्न झालं की सहा महिन्यांनी बॅक टु पॅव्हेलीयन. पण हा ही फंडा काम करत नाहिये आता. लग्नाच फार औघड झालयं बाबांनो !!
जाऊ द्या.
18 Feb 2016 - 12:28 pm | अभ्या..
आमच्या एका देखण्या एम्बीए मित्राला चांगली नोकरी असताना केवळ घरची शेती नाहे म्हणून नकार आलाय. पोराने शेती करु नये पण घरची शेती असावी हा आगरह विचित्र झालाय सध्या.
18 Feb 2016 - 5:34 am | नगरीनिरंजन
हास्यास्पद कविता आहे. थोडक्यात ह्या तथाकथित शेतकर्यांना मुक्त बाजारपेठ हवी आहे म्हणजे कांद्याबिंद्याचे भाव कडाडले तरी सरकारने हस्तक्षेप करायला नकोय.
पण कर्जमाफीसाठी किंवा दुष्काळ/अतिवृष्टी झाल्यास सरकारकडून मदत मागायला हे सगळ्यात पुढे.
शिवाय इनोव्हेशन वगैरे ह्यांना सांगायचं नाही. कांद्याला भाव आला तर सगळे मेंढरांसारखे कांदेच पेरत सुटतात.
मिपावर मध्यंतरी विदर्भातल्या(च) समधानी शेतकर्याचा लेख आला होता. त्यांच्याकडून शिका थोडंफार जमल्यास.
18 Feb 2016 - 12:22 pm | वेल
एकच बाजू मांडायची असेल तर छान आहे ही कविता. पण ह्या कवितेचा अर्थ असा निघतो की बाकी जग मजा मारतय आणि शेतकरी एकटाच जळतोय.
शेतकरी जळतो आहे ही गोष्ट कधीच कोणालाच अमान्य नव्हती आणि नसेलही. पण जळतोय तो फक्त एकटा शेतकरी नाही अनेक व्यावसायिक जळत आहेत. कोणाचं काय चुकतय हेही पाहायला हवं ना.
गेली अनेक वर्ष रासायनिक खते आणी किटकनाशके वापरली ऊस, कापूस, सोयाबिन अशी पाणी जास्त लागणारी पिके सतत घेऊन जमिनीचा कस कमी झाला, जमिनीमधलं पाणी कमी झालं. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत असलेली त़ई, तलाव, विहिरी अनेक ठिकाणी बुजवले गेले किम्वा त्यातला गाळ काढला गेला नाही. ज्वारी, बाजरी अशी पारंपारिक धान्ये, भाज्या ह्यांची लागवड कमी झाली. ह्यात शेतकर्यांना भूल घालणार्या कंपन्यांचाही दोष आहे. त्यांना इतक्या वर्षात सरकारने अडवलं नाही हा सरकारचा दोष, जल नियोजन केलं नाही हा सरकारचा दोष, पण फक्त आजच्या सरकारचा दोष नाही हा. ह्या गेल्या अनेक वर्षांमध्ये झालेल्या चुका आहेत. आणि ह्या निस्तरल्या गेल्या नाहीत तर पुढच्या काही वर्षात अजून वाईट परिस्थिती निर्माण होणार.
मला वाटतं आक्षेप ह्याला आहे की शेतकरी आत्महत्या करत आहे तेव्हा इतके पैसे खर्च करुन इतका मोठा कार्यक्रम केला, जळजळ आहे कोणाची कसली ते माहित नाही मला.
पण का करायचा नाही असा कार्यक्रम? असा कितीसा खर्च झाला की जो वाचला असता तर महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकर्यांना अगदी सोन्याचे सोडा पण स्टीलचे आणि लाकडाचे दिवस तरी पाहायला मिळाले असते असा समज आहे का?
मग ह्याचा अर्थ असा घ्यायचा का की जेव्हा एखाद्या गावात एखादा शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा त्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी त्या गावात कोणतेच सण समारंभ होत नाहीत का? लग्न, बारशी, अजून काय नी अजून काय? की त्या गावातले शेतकरी आणि इतर व्यावसायिक बंधूजत्रा, तमाशे, चित्रपट असे काहीच बघायला जात नाहीत का वर्षभर?
काही चुकत असेल तर हे की ह्या लोकांचं प्रबोधन होत नाही आहे. पारंपारिक आणि आधुनिक पद्धतींचा मेळ कसा घालायचा हे त्यांना कोणी शिकवत नाही आहे. आणि शिकवत असलेच तर असेही अनेक शहाणे आहेत की जे तु कोण मला शिकवणार असं म्हणतात. मुलींच्या लग्नात भारंभार खर्च करु नका, हुंदा घेऊ देऊ नका हे सांगितलं तर ऐकतात का हो हे? मुलगा हवा ह्यासाठी गावापासून लांब लांब वर जाऊन गर्भ चिकित्सा करणं मुलगा व्हावा ह्यासाठी उपचार करणं ह्यात क्वॅक्स कडून चुकीचे वैद्यकिय उपचार करुन घेण्यापासून गंडे दोरे बांधणार्यांकडे जाण्ं हे सगळं आलं. हे सगळे खर्च कमी केले का? मुलगा आहे असे सोनोग्राफीमध्ये कळल्यावर तो गर्भ पाडायला लावणं ह्यात आईच्या जीवाची हेळसांड आणि मग तिच्या आरोग्यावर खर्च (जो जनरली माहेरचेच करतात, कारण त्याम्ना मुलगी जिवंत हवी असते) मग ह्या अशा खर्चासाठी उधार उसनवार कर्ज... इत्यादी इत्यादी... हे सगळं शहरातल्या लोकांनी आणि सरकारने कसं बदलायचं.
बरं महालक्ष्मी सरस सारख्या प्रदर्शनांमध्ये किती शेतकरी माल घेऊन जातात? किती तरी वेळा एखाद्या स्टॉलधारकाचा माल संपला की तो स्टॉल रिकामा असतो त्यावेळी ते स्टॉल धारक शेतकरी, बचत गट आपल्या गावातल्या किंवा आजूबाजूच्या गावामधल्या इतर लोकांचा माल घेउन तो स्टॉल शेवटच्या दिवसापर्यंत का नाही चालू ठेवत? (अर्थात अशी प्रदर्शने शहरो शहरी भरली पाहिजेत)
मला मान्य आहे की मॅन्युफॅक्चररला स्वतः जेव्हा विक्री किंवा विपणन करावम लागतं तेव्हा मॅन्युफॅक्चरिंग कडे दुर्लक्ष होतं त्यामुळे दलाल अडते ह्यांचे पाय धरावेच लागतात. पण प्रत्येक गावातून अशी एखादी टीम उभी राहू शकत नाही का जी फक्त विक्री आनि विपणन बघेल? आणि दलालांचा मक्ता मोडून काढेल. इथे दलालांना देशोधडीलाच लावायचे ही भावना नाही पण दलालांनीही कमी कष्टात अधिक पैसा अजून आणि अजून पैसा आणि शेतकर्याला नफा न मिळता मलाच मिळावा ही मानसिकता बाजूला ठेवून काम करणे अपेक्षित आहे आणि तसे होत नसेल तर गावाने स्वतःची सपोर्ट सिस्टीम उभी करावी आणि अशा फसवणूक करणार्या दलालांचा मक्ता मोडून काढावा.
चौपाटीवर झालेला आगीचा उद्रेक ही अत्यंत गंभीर आणि शरमेची बाब होती. पण तो कार्यक्रम होणं ही महत्वाची बाब होती. ह्याचा शेतकर्यांच्या त्रासाशी कुठलाही संबंध लावणे आणि ते त्रासात असताना तुन्म्ही उधळपट्टी करताय म्हणून हे असे झाले अशी मानसिकता ठेवणे पूर्णपणे चूक आहे.
धान्य पिकले नाही तर शहरी माणूस कसा सर्वाईव्ह होणार हा प्रश्न आहेच. पण शहरी माणसाकडून शेतकर्यांच्या अपेक्षा काय हेही शेतकर्यांनी स्पष्ट करावे. शहरी माणूस आपल्या अन्नदात्या शेतकर्यासाठी नव्हे तर स्वतःला अन्न मिळावे म्हणून काहीही करायला तयार आहे. पण अपेक्षा काय आहेत ते न सांगता फक्त बोंबाबोंब करणे चूक आहे. हे कोणताही शेतकरी एकटा करत नाही तर शेतकरी संघटना आणि राजकीय हेतूने प्रेरित असे पुढारी आणि मिडीयावाले करतात असं माझं मत आहे. कोणालाच प्रश्न सोडवायचा नाही कारण सोडवला तर पुढार्यांचं महत्त्व आणि मिडियाला टीआरपी वाल्या बातम्या कशा मिळणार?
18 Feb 2016 - 12:29 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अतिशय मुद्देसुद प्रतिसाद.
18 Feb 2016 - 12:51 pm | इरसाल
"वेल" सेड !
18 Feb 2016 - 1:42 pm | पैसा
+१
18 Feb 2016 - 1:10 pm | चांदणे संदीप
वेल, जबरदस्त लिहिलेय!
:)
Sandy
18 Feb 2016 - 4:31 pm | रंगासेठ
मस्त प्रतिसाद दिलाय.
विचार करण्यासारखा आहे.
18 Feb 2016 - 4:35 pm | मृत्युन्जय
वेल व्हेरी वेल.
मस्त प्रतिसाद
18 Feb 2016 - 5:53 pm | बॅटमॅन
वेल डन, एकच नंबर!!!!!
19 Feb 2016 - 3:11 pm | सुमीत भातखंडे
.
19 Feb 2016 - 9:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
मुद्देसुद लेखन ! मुख्य म्हणजे मांडलेले मुद्दे खरे आहेत आणि ते समतोलपणे मांडलेले आहेत.
आजकालच्या एकांगी वादविवादांच्या वादळांच्या जमान्यात अशी सुखद झुळुक फार कमी वेळेस अनुभवायला मिळते !
19 Feb 2016 - 9:34 pm | सुहास झेले
प्रचंड सहमत... प्रतिसाद आवडला !!
19 Feb 2016 - 9:36 pm | विजय पुरोहित
+11111
प्रतिसाद आवडला...
19 Feb 2016 - 9:43 pm | यशोधरा
उत्तम प्रतिसाद!
18 Feb 2016 - 12:25 pm | वेल
ही कविता लिहिणार्या ज्येष्ठ पत्रकाराने कविता लिहिण्यापलिकडे शेतमालाला पैसा नाही शेतमालाची उचल नाही म्हणून जळणार्या शेतकर्यांसाठी काय केले आहे ते जरा कळेल का? की उगाच उचलली लेखणी लावली कागदाला?
18 Feb 2016 - 12:43 pm | जेपी
हाफशेंच्युरी निमीत्त सर्वांना' फायर ब्रिगेड मंगवाले तु" गाण्याची सिडी देऊन करण्यात येत आहे.
-*खिलाडी 786
18 Feb 2016 - 2:24 pm | _मनश्री_
आम्ही गावी शेतीच करतो , गावी आमच १६ माणसांच कुटुंब आहे ,मी सुद्धा बारावीपर्यंत गावीच होते ,त्यामुळे सगळ जवळून पाहिलंय
आमच्या कडे रासायनिक खत अजिबात वापरली जात नाहीत , आम्ही फक्त गायी म्हशी यांच्या शेणापासून आणि गोमुत्र वापरून बनवलेलं खत वापरतो
आणि मी हे स्वानुभवातून सांगते कि योग्य नियोजन असेल तर शेतीसारखा भारी दुसरा उद्योग नाही ,
18 Feb 2016 - 2:35 pm | नाखु
कृपया.. आपल्या सवडीने का होईना या शेतीतील प्रयोगांवर लिहाच ही आर्जवी विनंती.
शेती बाबत मिपावरची बोलघेवड्यांची कोल्हे कुई पाहता तुमची आणि आनंदीता माहीती-अनुभवांची फार निकड आहे.
शेतीत चांगले काम करणार्या पथदर्शी लोकांबाबत मला कायम आदर आहे आणि राहिलच !
जय जवान! जय किसान !
अकृषक पांढरपेशा चाकरमानी नाखु
18 Feb 2016 - 2:46 pm | _मनश्री_
धन्यवाद , १५ दिवसांनी यात्रेसाठी गावी जाणार आहे तेव्हा भावाकडून सगळी माहिती घेते आणि मग इथे लिहीन .
27 Jul 2016 - 1:06 pm | मोदक
नमस्कार,
लेखमालेच्या प्रतिक्षेत आहे.
18 Feb 2016 - 2:36 pm | कपिलमुनी
मागच्या ४९ दिवसात १२५ मूर्खांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्यात. करो बिचारे !
मस्त बँकेचा कर्ज बुडवायचा , तसा ही १.१४ लाख कोटी बुडीत होउ देणार्या बँकांना काय फरक पडला असता
18 Feb 2016 - 2:39 pm | नाव आडनाव
:(
18 Feb 2016 - 2:55 pm | प्रसाद_कुलकर्णी
अप्रतिम कविता आहे. मी फेसबुक वर शेर केली होती, पण कवी माहित नव्हते. माहितीसाठी आभारी आहे.
18 Feb 2016 - 3:42 pm | चिगो
कविता म्हणून जमलीय कविता.. पण त्यातल्या भावाशी आणि आशयाशी सहमत नाहीये.. उगाच शेतकर्यांचा कैवार घेणे हे सोशलमिडीयावर 'अपमार्केट' आहे म्हणून लिहील्यासारखी वाटतेय..
बाकी साला ह्या 'लहानपण, गुरुजनांची/आईवडीलांची थोरवी/ गरिबीच कशी ग्रेट/ गावाकडची माती/शेतकरी' वाल्या व्हॉट्सॅपी/फेसबुकी उमाळ्यांनी उबग आणलाय आता..
18 Feb 2016 - 5:33 pm | धनावडे
ते वीर मराठे, शिवाजी महाराज,अच्छे दिन राहिले की
18 Feb 2016 - 5:50 pm | चिगो
यादी बरीच लांबलचक आहे हो.. ;-)
19 Feb 2016 - 4:44 pm | श्री गावसेना प्रमुख
मागच्या सरकारच्या कार्यकाळात बुलढाण्याचे कॉंग्रेस चे आमदार दिलीप सानंदा ह्यांच्यावर अवैध सावकारी मध्ये शेतकऱ्यांच्या जमीनी ताब्यात घेण्याचा आरोप झाला होता।विलासराव मुख्यमंत्री होते त्यांनी त्यांच्या विरुद्ध कारवाई करायला नकार दिल होता।हायकोर्टाने दटया दिल्यावर कार्यवाही झाली होती ,वर 2लाख दंडहि ठोठावला होता।तेव्हा कोणत्याही वामपंथी खान्ग्रेसी राष्ट्रवादी सेक्युलर कविने अशी कविता लिहिली नव्हती
19 Feb 2016 - 4:48 pm | नाखु
तेव्हां तर अगदी "राम राज्य " होते हो !
लोक्सत्तावरची (ई आवृत्तीतली)बातमीच गायब केली गेली आहे जाणत्या राजाचे विखारी विचार "महाराष्ट्राला ब्राम्हण मुख्यमंत्री होणे परवडणारे /योग्य नाही" म्हणून.
बरेच दिवस शोधतोय कुणाला मिळाला तर देणे दुवा(=संदर्भ) मी त्याला दुवा(=धन्यवाद) देईन
19 Feb 2016 - 5:01 pm | होबासराव
बास नाम हि काफि है ! असा कुठला काळा धंदा आहे जो हे महाशय करत नाहित.
19 Feb 2016 - 5:47 pm | बोका-ए-आझम
संपूर्ण गिरणगाव उध्वस्त झालं. लोकांच्या नोक-या गेल्या, लोक अक्षरशः रस्त्यावर आले. एक आख्खी पिढी बरबाद झाली. पण त्यामध्ये पोळलेल्या कुणीही आत्महत्या केल्याचं ऐकिवात नाही आणि केल्या असतील तर त्याचं कुणीही उदात्तीकरणही केलं नाही.असो.
हे सगळं सुरु झालं पी. साईनाथ यांच्यामुळे. साईनाथ स्वतः एक उत्कृष्ट पत्रकार आणि लेखक. डाव्या विचारांचे असले तरी ज्यांच्या लेखनाविषयी सर्वांना आदर आहे अशा काही मोजक्या लोकांपैकी एक. २००१-०२ मध्ये त्यांनी या आत्महत्यांबद्दल - विशेषतः आंध्र, तामिळनाडू, ओरिसा आणि महाराष्ट्रातील विदर्भ - लिहायला सुरूवात केली आणि त्यावर लोकांमध्ये एक जागरूकता निर्माण केली. तेव्हा भाजपचं सरकार होतं हा योगायोग नजरेआड करता येण्यासारखा नाहीये. नंतर २००४ ते २०१४ - साईनाथांनी लिखाण केलं पण त्यात २००१-०२ सारखा अावेश नव्हता. आता २०१४ नंतर परत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय पुढे येतोय. जणू मधल्या काळात सगळं आलबेल होतं. हा bias अत्यंत धोकादायक आहे कारण त्यामुळे प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता तर कमी झाली आहेच आणि शिवाय सारख्या अशा बातम्यांचा भडिमार होत असल्याने समाज मानसिकदृष्ट्या बधिर होण्याच्या मार्गावर चाललेला आहे.
19 Feb 2016 - 10:42 pm | तर्राट जोकर
कवी जो कोणी आहे. पागल झालेला आहे. राजकिय मानसिकता आहे. कुठल्या चिंधी कुठे आनुन पेटवतो आहे. १५ लख कोटींचे व्यवहार झालेत, पुढे या फायदा घ्या. मेक इन इंडिय म्हणजे काय फक्त कारखानदारीच आहे, असे काही नाही. शेतकार्यांचे किती पार्टीशिपेशन आहे ते बोला ह्यात. उगा फासाला लटकत मुर्खासारखे आत्महत्या कर्णार. व्यवसाय करणार्आंअन बोल लावण्याआढी एक पानटपरी चालवून दाखवावी हरामखोरांनी. सरकारच्या जीवावर शेती करायला काय सरकार आमंत्रण देत नाय.
18 Mar 2016 - 7:37 pm | ईश्वरसर्वसाक्षी
हे म्हणजे ''रणगाडे चालवा हरामखोरांवर" का असलाच तुमचा प्रतिसाद होता नाहि का डांगे साहेब.