जर्मनीत आल्यापासूनच नाताळचा सण कसा साजरा होतो ते पाहण्याची उत्सुकता होती. नाताळ हा जर्मनीतील एक मुख्य सण. आपल्याकडे जशी दिवाळी तसाच इथे नाताळचा सण अतिशय आनंदात, उत्साहात आणि आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करतात असे ऐकून होते. नाताळच्या आधीच्या चार रविवारी ऍडवेंट साजरे केले जात असल्याने साधारण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासूनच सगळीकडे सणाचे वातावरण होऊ लागले होते. बाहेर वातावरणात गुलाबी थंडी तर घराघरांत सर्वत्र झगमाट दिसू लागला. इथे प्रत्येक जण आपले घर सुशोभित करतो. आता घराघरांत दिव्यांच्या माळा आणि आकाशदिवे दिसू लागले. अनेकांनी बागेतली झाडे सुद्धा दिव्यांच्या माळा सोडून उजळवून टाकली. आणि नाताळ येऊन ठेपल्याची वर्दी मिळाली.
हे नाताळी वैभव बघायला संध्याकाळी आम्ही बाजाराचा फेरफटका मारायला गेलो. दुकाने निरनिराळ्या सजावटीच्या वस्तू, चॉकलेटे, बिस्किटे, नाताळचे केक आणि नाताळ दरम्यान येणार्या फळांनी फुलून गेली होती. नाताळसाठी खास अश्या कितीतरी 'आंगेबोट्स' म्हणजेच सवलतींच्या योजना दुकानादुकानात झळकत होत्या आणि बरेच ग्राहक मजेत खरेदीचे बेत रंगवत फिरताना दिसत होते.
म्युन्स्टर शहरातला मध्यवर्ती रस्ता तर आपल्या खानदानी दिमाखात सजला होता. अनेक शतके जुन्या अश्या इमारती ही या मध्यवर्ती भागाची प्रतिष्ठा आहे. खिडक्याखिडक्यांत पणती सारखे विजेचे दिवे लावले होते आणि त्या इमारती फारच सुंदर दिसत होत्या. दुकानांच्या पुढल्या जागांमध्ये टानेनबाऊमची चक्रे म्हणजेच सूचीपर्णी झाडाची फांदी चक्राकार करुन सजवून टांगलेली दिसत होती. दुकानांच्या आतही ख्रिसमस ट्री सजवून ठेवले होते आणि अश्यातच लक्ष वेधून घेत होते खास 'नाताळी बाजार'.
आपल्याकडे जत्रेदरम्यान जशी आकाराने लहान टपरीवजा दुकाने मांडली जातात, तशीच टुमदार दुकाने आपल्या खास नाताळी वस्तू घेऊन शहरातल्या मुख्य चौकात दाटीने मांडली जातात. केवळ चार आठवडे हा बाजार भरलेला असतो. या नाताळी बाजारांना खूप जुनी परंपरा आहे. ही संकल्पना मुळची जर्मनी आणि ऑस्ट्रीयातली. पण आता इतर देशांतही असे बाजार भरू लागले आहेत. सर्वांत पहिला नाताळी बाजार जर्मनीतल्या ड्रेस्डेन गावात १४३४ साली भरवण्यात आला होता. म्युन्स्टरच्या बाजाराला सुद्धा अशीच जुनी परंपरा आहे.
आपल्या तुळशीबागेत असते तशी गर्दी आणि लहान लहान दुकाने पाहून आम्ही एकदम खूष झालो. वातावरण उत्सवी आणि उत्साही झाले होते. लोक सांताक्लॉज सारख्या लाल टोप्या घालून हसत खेळत फिरत होते. लहान मुले, आई-वडील आणि आजी-आजोबा असे सर्वच जण एकदम खुषीत एकत्र फिरताना पाहून मजा येत होती. आजी आजोबा आपल्याला काय भेटवस्तू घेणार याची लहानांच्या चेहर्यावर उत्सुकता दिसत होती. कॉलेजवयीन मुले मुली सुद्धा हातात बिअर किंवा वाईनचे पेले घेऊन मजेत दंगा करत भटकत होती.
छोटी छोटी लाकडाच्या फळ्यांनी उभारलेली दुकाने दाटीने उभी होती. प्रत्येक दुकान आपल्या वैशिष्ट्याने काही वस्तू सजवून होते. नाताळच्या दृष्टीने धार्मिक महत्त्व असलेल्या निकोलाऊस म्हणजेच नाताळबाबाच्या निरनिराळ्या मूर्ती, वाद्य वाजवणारे देवदूत असे साहित्य असलेली काही दुकाने होती. काही जण निराळ्या पद्धतीचे खास चीज विकत होते तर काही दुकानांत रत्ने-खडे यांचे अलंकार सजवून ठेवले होते. विक्रेते सुद्धा हसून स्वागत करुन दुकातल्या वस्तूंची माहिती देत होते आणि नाताळच्या शुभेच्छांची देवाणघेवाण होत होती. इथल्या पारंपारिक पद्धतीने केले जाणारे काही खाद्य पदार्थ विकणारी दुकाने जीभ चाळवत होती.
एका खाद्यपदार्थाच्या दुकानावर लिहिलेल्या 'राकलेट' या नावाने आम्ही त्या दुकानाकडे आकर्षित झालो. कारण राकलेट हा काय पदार्थ आहे याची आम्हाला स्वातीताईच्या लेखावरुन थोडी कल्पना आली होतीच. आम्ही भारतीय आहोत हे पाहून तो विक्रेता एकदम खूश झाला. २५ वर्षांपूर्वी त्याने केलेल्या भारतभेटीचे इत्थंबूत वर्णन त्याने मोठ्यामोठ्या आवाजात उत्साहाने केले. आणि आम्हाला आपणहोऊनच राकलेटची चव देऊ केली. एका छोट्या मांडणीवरती चांगला फूटभर मोठा चिजचा तुकडा ठेऊन त्याला वरील बाजूने थेट ज्वाळांनी वितळवायचे आणि वितळलेला खमंग भाग सुरीने खरवडून एका कुरकुरीत पावावर घालून खायचा, अशी या राकलेटची ओळख त्याने करून दिली. स्वित्झर्लंड मधल्या मेंढपाळांची ही पारंपारिक पाककृती आहे आणि ते वापरतात ते खास चीज त्याने स्वित्झर्लंडहून आणले आहे असेही त्याने सांगितले. प्लेटभर राकलेट खाऊन त्याला धन्यवाद देताना त्याने आम्हाला आपणहोऊनच एक मोठा चीजचा तुकडा भेट म्हणून दिला.
इतक्या छान राकलेट वरती खास नाताळची 'ग्लूवाईन' नाही प्यायली तर बाजाराची भेट अपूर्ण राहिल्यासारखीच होईल. दालचिनी, लवंग आणि काही वनस्पती घालून उकळून तयार केलेली ही वाईन गरम गरम वाफाळत्या कपातून प्यायला फारच मजा येते. ग्लूवाईन या इथल्या खास पेयाचा फक्त या कडाक्याच्या थंडीच्या काळातच आस्वाद घेतला जातो. लोक नाताळ बाजारात ही गरम गरम वाफाळती वाईन पीत तासनतास गप्पा मारत उभे असतात. बर्फगार थंडीमध्ये भणाणा वार्यात ही गरम गरम वाईन प्यायली की थंडी कुठच्या कुठे पळून जाते आणि बाजारची धमाल पहायला पावले पुन्हा चालू लागतात.
-- शाल्मली
माझा हा लेख नुकताच इसकाळच्या पैलतीर पुरवणीमध्ये प्रकाशित झाला आहे.
प्रतिक्रिया
6 Jan 2009 - 2:28 am | चित्रा
छान वर्णन, नाताळी बाजाराचे!
वेगळाच अनुभव. ग्लूवाईन ऍपल सायडरप्रमाणे असते का? दालचिनी घालतात म्हणून म्हटले..
8 Jan 2009 - 3:38 am | लिखाळ
ऍपल सायडर चाखले नाही कधी. पण विकिमध्ये वाचून ते वेगळे आहे असे वाटते.
दालचिनी वगैरे घालून गरम गरम प्यायला देतात का?
ग्लुवाईन तर चक्क वाईनच असते फक्त त्याला वाईनचा काढा म्हणूया :)
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
6 Jan 2009 - 6:51 am | प्राजु
खूप नवी माहिती समजली या लेखातून. नाताळचा बाजार अमेरिकेत कुठे भरतो माहिती नाही. बघायला हवं.. आता एकदम पुढचा वर्षीच खरं.
पुन्हा एकदा राकलेट चा उल्लेख वाचून हा पदार्थ चाखण्याची इच्छा प्रबळ झाली आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
6 Jan 2009 - 7:13 am | सहज
नाताळ उरुस मस्तच की.
ग्लुवाईन अहाहा! तो फोटो टाकायचा की.
8 Jan 2009 - 3:36 am | लिखाळ
ही पहा ग्लुवाईन :)
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
6 Jan 2009 - 7:33 am | अनिल हटेला
जर्मनीचा नाताळ उत्सव आवडला..
ग्लुवाइन आणी राकलेट ओरपण्याची इच्छा प्रबळ झालीये..
पूलेशु..
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
6 Jan 2009 - 7:50 am | शितल
शाल्मली,
नाताळाच्या बाजाराचे फोटो आणि वर्णन ही अगदी छान केले आहेस. :)
6 Jan 2009 - 7:59 am | रेवती
माहितीपूर्ण झाले आहे लेखन. पहिला फोटू मनमोहक आहे.
शब्दांमध्ये थोडा थोडा बदल होवून तिकडच्यासारखीच
नावे असतील अमेरीकेत. जसं निकोलाऊस म्हणजे सेंट निकोलस.
राकलेट प्रकरण माझ्या जिभेला बरेच दिवस त्रास देणार असं दिसतय.
(कधी मिळणार चाखायला कोणास ठावूक?)
अजून राकलेटचा पत्ता नाही आमच्याकडे तर ग्लूवाईनचं नाव आलं पुढे.;)
प्लेटभर राकलेट खाऊन त्याला धन्यवाद देताना त्याने आम्हाला आपणहोऊनच एक मोठा चीजचा तुकडा भेट म्हणून दिला.
हे वाचल्यावर असं वाटलं की प्लेट्भर भेळ खाऊन झाल्यावर तिखट लागल्यामुळे दोन पुर्या जसा तो भेळवाला हातावर ठेवतो तसं.
अर्थात तुमचा राकलेटवाला भलताच प्रेमळ दिसतोय.
रेवती
6 Jan 2009 - 10:51 am | पिवळा डांबिस
राकलेट प्रकरण माझ्या जिभेला बरेच दिवस त्रास देणार असं दिसतय.
चाकलेटला रात्रभर राकेलमध्ये बुडवून ठेवा आणि सक्काळी खा...
झालं राकलेट, सालं आहे काय त्यात!!!!
:)
6 Jan 2009 - 11:34 am | सुनील
चाकलेटला रात्रभर राकेलमध्ये बुडवून ठेवा आणि सक्काळी खा...
झालं राकलेट, सालं आहे काय त्यात!!!!
एकदा सचित्र पाकृ द्याकी!!
म्हणजे बनवताना राकलेटचे फोटो आणि खाल्यानंतर तुमचे फोटो!!
;)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
6 Jan 2009 - 9:44 pm | रेवती
वा!! पिडाकाका.
काय रेसिपी आहे. काकूंच्या हातचे चविष्ट पदार्थ तुम्ही खा आणि आम्हाला मात्र हे असं काय?
आता काकूंची एखादी फर्मास पाकृ टाका बुवा तुम्ही.
रेवती
6 Jan 2009 - 5:29 pm | शाल्मली
लग्गेच जर्मनीचं तिकिट काढून टाक.. स्वातीताई आणि मी.. दोन दोन घरं आहेत तुला राकलेट खाण्यासाठी..
हा हा ! हे एकदम आवडलं :)
--शाल्मली
6 Jan 2009 - 9:52 am | यशोधरा
शाल्मली, मस्तच गं लेख. सकाळमधे पण दिला आहेस का? प्रकाशित झालाय मला वाटतं... :)
फोटोही मस्तच!
6 Jan 2009 - 7:15 pm | शाल्मली
हो.. गं सकाळमधे हाच माझा लेख प्रकाशित झाला आहे.
पैलतीर सदरात..
--शाल्मली.
6 Jan 2009 - 11:20 am | मनस्वी
मस्तच आहे नाताळी बाजार!
फोटोही छान.
6 Jan 2009 - 2:28 pm | वल्लरी
असेच म्हणते... :)
---वल्लरी
6 Jan 2009 - 11:27 am | ऋषिकेश
मस्त वर्णन.. नाताळ एकदम दणक्यात झाला तर ! :)
- ऋषिकेश
6 Jan 2009 - 11:43 am | सुनील
फोटो आणि वर्णन एकदम छान.
जर्मनीचा नाताळचा अनुभव नाही पण तीन नाताळ इंग्लंडात पाहिले. अगदी २४ डिसेंबरपर्यंत नाताळच्या खरेदीसाठी उत्साहाने ओसंडून वाहणारा देश, २५ तारखेला चिडीचूप होऊन जातो. सगळे जण आपापल्या घरात, कुटुंबीयांसमवेत नाताळ साजरा करीत असतात आणि बाहेर रस्यावर चिटपाखरूदेखिल नसते!
असेच अजून लेख येउदेत.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
6 Jan 2009 - 11:58 am | सारंग
जर्मनीत असल्यासारख वाटलं.
6 Jan 2009 - 12:16 pm | झेल्या
धमाल दिसतोय जर्मनीचा नाताळी बाजार..!
सुरेख शब्दांकन.
-झेल्या
काय वाट्टेल ते...!
विसंगतींचे संदर्भ...!
6 Jan 2009 - 9:17 pm | मदनबाण
मस्त लेख.. :)
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
7 Jan 2009 - 12:27 am | विसोबा खेचर
शाल्मलीतै,
चित्रे आणि वर्णन लै भारी..
औरभी आने दो..
तात्या.
8 Jan 2009 - 4:59 pm | शाल्मली
प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद! :)
--शाल्मली.
8 Jan 2009 - 5:08 pm | प्रभाकर पेठकर
जर्मन नाताळाचे वातावरण शब्दरुपाने समोर उभे ठाकले. मजा आली आणि हेवाही वाटला तुमचा.
ह्या जन्मात कधी जमले तर येईनच जर्मनीला राकलेट आणि ग्लुवाईन हादडायला.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
8 Jan 2009 - 6:05 pm | शाल्मली
जरूर या.. आग्रहाचे आमंत्रण आहे तुम्हाला.
--शाल्मली.
8 Jan 2009 - 7:23 pm | बिपिन कार्यकर्ते
मला पण जर्मनीला यायचंय... :) नाताळ बाजार झ्याक.
बिपिन कार्यकर्ते
8 Jan 2009 - 7:26 pm | लिखाळ
या की, तुमच्यासाठी पेठकरकाका स्पेशल पावभाजी :)
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.