आपण गाणी का म्हणतो?

चित्रा's picture
चित्रा in जनातलं, मनातलं
29 Dec 2008 - 6:24 am

इकॉनॉमिस्टच्या या महिन्याच्या अंकात एक " व्हाय म्युझिक" म्हणून एक लेख होता, त्याने लक्ष वेधले. लेख मुळातूनच वाचण्यासारखा आहे, म्हणून इथे दुवा देते. पण थोडक्यात लेखाच्या विषयाबद्दल सांगायचे तर आपल्या (माणसांच्या) आयुष्यात गायन/वादन यांचे एवढे महत्त्व का असावे यावरून मांडलेल्या विचारधारांचा हा एक मनोरंजक माहिती असलेला लेख आहे.

लेखात म्हटल्याप्रमाणे माणसांचे मनोरंजन करणारे अनेक उद्योग आहेत, पण ते माणसाच्या सहज दिसून येणार्‍या भुका सहसा पुरवतात असे दिसते- जसे कामुक साहित्य, किंवा चित्रपट, हे कामवासनेला काही प्रमाणात शमवतात. कामवासना ही नैसर्गिकरित्या मनुष्यप्राण्यात असतेच त्यामुळे ह्या उद्योगांची वाढ होत राहिली तर फारसे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. पण गाण्याच्या बाबतीत हल्लीच्या तरूण मुलामुलींना त्यांच्या जागृतावस्थेतील १/८ वेळ गाणी ऐकण्यात घालवावासा वाटावा अशी कोणती भूक यामुळे भागते आहे, असा एक प्रश्न या लेखातून पुढे आला आहे.

लेखातील काही विचारधारा थोडक्यात सांगायच्या तर अशा सांगता येतील -

१. गायन हे पुनरुत्पादन क्रियेसाठी सहाय्यभूत ठरते. - एक शास्त्रज्ञ डॉ. मिलर यांचे म्हणणे साधारण असे आहे की गायन हे माणसाच्या गरजेचे आहे. गायन हे माणसाच्या जगण्याच्या धडपडीला (सर्व्हायवल) किंवा पुनरुत्पादनाच्या क्रियेला मदत म्हणून असावे, त्यातही मिलर यांना गायनाचा पुनरुत्पादनाच्या प्रेरणेशी संबंध आहे असे वाटते. पक्ष्यांमधील माद्या मिलनाआधी नरांची निवड करण्याआधी त्यांच्या गायनकलेची पारख करतात असे आढळते!

२. गायनाने कामपूर्तीसाठी जोडीदाराच्या निवडीसाठी मदत होण्यापेक्षा व्यक्तीसमूह एकत्र येण्याची क्रिया होते असे मत आहे ते यासंबंधी संशोधन करणारे एक शास्त्रज्ञ डॉ. डनबार यांचे. ह्या मताला पुष्टि मिळावी अशी उदाहरणे आपण अनेकदा पाहतो. धार्मिक बाबतीत तर गायनाचे महत्त्व वेगळे सांगायला नको. देवळांतील भजने, चर्चमधील धीरगंभीर संगीत, सूफी संगीत, ही धार्मिक उदाहरणे आपल्यासमोर असतातच. चित्रपट संगीत, नाटकांमधील संगीत यातून मानवांच्या तात्कालिक भावभावना किंवा प्रेरणा तयार होत असतात असेही दिसते. या सर्वाचे परिणाम म्हणून ते ते व्यक्तीसमूह एकत्र येताना ( आणि एक समूह म्हणून विकसित होताना) दिसतात.

३. याहून वेगळे मत आहे ते म्हणजे डॉ. पिंकर यांचे. त्यांना असे वाटते की गायनप्रक्रिया हा एक अपघात आहे - शब्द (भाषा) आधी तयार झाले, आणि त्यातून गाणे तयार झाले. त्यामुळे गाणे कामप्रेरणा किंवा व्यक्तीसमूहांना एकत्र ठेवण्याच्या "गरजे"साठी तयार झालेले नसून जणू एखाद्या कॅथीड्रलला आकार देणार्‍या कमानींच्या मधली जागा कलाकार जशी सुंदर पण निरर्थक (बांधकामाची गरज नसलेल्या) अशा चित्रांनी किंवा कारागिरीने भरून काढतात, तसेच गाण्याचे आहे असे हे काहीसे मत आहे. गाणे हे मेंदूला शब्द मिळाले की त्याला अर्थ देण्यासाठी सूरतालात बसवण्याचा प्रयत्न तो मेंदू करतो.

४. अमेरिकेतील सॅन डिएगो येथील डॉ. पटेल यांच्या म्हणण्याप्रमाणे, शब्द "लिहीणे" जसे शिकावे लागते, काहीजण लिहीण्याची कला काही प्रश्नांमुळे जशी कधीच शिकू शकत नाहीत किंवा काहींना लिहीणे वाचणे शिकण्यासाठी त्रास होतो, तसेच गाण्याचेही आहे. गाणे हे काही एक प्रयत्न करून शिकावे लागते, ते "बदल घडवून" आणू शकणारे एक "तंत्र" ( transformative technology) आहे असे हे काही मत आहे.

ही सर्व मतमतांतरे वाचली तेव्हा हत्ती आणि सात आंधळ्यांची गोष्ट आठवली. जसे हत्ती नक्की काय आहे हे नुसते त्याच्या एका भागाला स्पर्श करून समजत नाही, तसे वाटले. पण याचा अर्थ असा नाही, की आंधळ्यांनी आपापली निरीक्षणेच नोंदवू नयेत, नाही का? कदाचित सात आंधळ्यांनी निरीक्षणाची देवाणघेवाण केली तर हत्ती खरा कसा आहे कळू शकेलही कदाचित. भारतीय संगिताची परंपरा पुरातन आहे, संगिताला आपल्या आयुष्यात अतुलनीय महत्त्वही आहे. तुम्हाला काय वाटते? गायनकलेचा विचार करण्याची ही पद्धत योग्य आहे का? ज्यांना भारतीय संगितकलेचे थोडेफार ज्ञान आहे, अशांचे मत याबाबतीत काय आहे? हा सर्व वेडेपणा वाटतो, का, असा विचार आपण (एक व्यक्तीसमूह म्हणून) करीत नाही याचे वैषम्य?

क्र. २ चे मत (डॉ. डनबार यांचे) जर खरे असले, आणि भविष्यकाळात गायनाचे असे शास्त्रीय विश्लेषण करीत गायनाचा वापर स्वतःचे समूह विकसित आणि प्रभावशाली करण्यासाठी एखाद्या व्यक्तीसमूहाने (जाणीवपूर्वक) करून घेतला तर जे समाज असे करणार नाहीत त्यांचा प्रभाव कमी होत जाईल का? का हा सर्व कल्पनेचा खेळ आहे?

संगीतलेखमाध्यमवेधविरंगुळा

प्रतिक्रिया

सहज's picture

29 Dec 2008 - 11:21 am | सहज

>>आपण गाणी का म्हणतो?

येथे सर्वसामान्य सगळेच लोक धरले आहेत व ते मनोरंजन, मानसिक समाधान, विरंगुळा, हौस या साठी गातात हे माझे मत. काही विशिष्ट गायक अर्थात पेशा म्हणुन, पैसे मिळवायला. जरा आपला आवाज आजुबाजुच्या श्रोत्यांना पसंत आहे असे कळले तर मग तो गुण दाखवुन स्वताचे समुहात वेगळेपण प्रस्थापीत करण्यासाठी.

>>गायन हे पुनरुत्पादन क्रियेसाठी सहाय्यभूत ठरते - ऍज अ जनरल रुल हे अमान्य

मी गायला लागलो असतो तर जोडीदारीण समोर टिकलीच नसती. हा आता एकदा जोडीदारणीला कोंडीत पकडून गायला सुरवात करतो कदाचित आय वील गेट लकी ऑर किल्ड.

>>तरूण मुलामुलींना त्यांच्या जागृतावस्थेतील १/८ वेळ गाणी ऐकण्यात घालवावासा वाटावा अशी कोणती भूक यामुळे भागते आहे, असा एक प्रश्न ...

हे बहुदा समुहकृती, माझ्याकडे आयपॉड / एम्पीथ्री प्लेयर [वॉकमन] या साधनांची उपलब्धता व संगीत ही मोठी बाजारपेठ. उपभोग्य वस्तु. एकदा हीच तरुण मंडळी मोठी माणसे होउन नेहमीच्या रामरगाड्यात अडकली की ऐकायचे प्रमाण जरा कमी होते इतकेच.

बाकी सर्व डनबार, मिलर, पिंकर, पटेल या विद्यावाचस्पतींच्या कल्पनेचा खेळ. असला प्रश्न आमच्या टकूर्‍यात कधी आला नव्हता.
:-)

विसोबा खेचर's picture

29 Dec 2008 - 2:44 pm | विसोबा खेचर

चित्रावैनी, वरील बरेचसे विश्लेषण खरे सांगायचे तर डोक्यावरूनच गेले. असो..

आता माझे मत -

आपण गाणी का म्हणतो?

मनाला अतिशय आनंद वाटतो म्हणून!

निदान मी तरी याच कारणाकरता गातो. स्वत:च स्वत:चा आनंद मिळवण्याचे जे काही मार्ग आहेत त्या पैकी गाणी म्हणणे हा एक मार्ग आहे..

मूलत: कुठल्याही फाईन आर्टच्या (जसे संगीत, साहित्य, नाट्य, चित्र, शिल्प) अभिव्यक्तितून ती करणार्‍याला आणि तिचा आस्वाद घेणार्‍यांना, दोघांनाही आनंदच होतो.

आपला,
(स्वान्तसुखाय स्वानंदी) तात्या.

आभा-माया's picture

29 Dec 2008 - 9:59 pm | आभा-माया

खूपदा रहावत नाही म्हणुनही गातो........... एकुण काय आनंद मिळन्यासाठी काहीही गायल तरी चालेल

विनायक प्रभू's picture

29 Dec 2008 - 2:49 pm | विनायक प्रभू

आपल तर 'डर लगे तो गाना गा" असे असते बॉ.

राघव's picture

29 Dec 2008 - 3:17 pm | राघव

या विषयावरून -

साहित्य संगीत कलाविहीन
पशूच की तो शृंगावीना

या ओळी आठवल्यात. नीटसे आठवत नाही पण बहुदा वामनपंडीतांनी केलेल्या शतकत्रयीच्या भाषांतरातल्या असाव्यात. जाणकार सांगतीलच!
बाकी तात्यांशी सहमत. :)

मुमुक्षु

धमाल मुलगा's picture

29 Dec 2008 - 3:38 pm | धमाल मुलगा

लेख एकुणच अभ्यासु अंगाचा दिसतोय.
डोक्यावरुन गेला ह्यातच आम्हाला वरील वाक्याची प्रचिती आली..

निदान मीतरी गाणी का म्हणतो ह्याचं उत्तर आहे: आजुबाजुची गर्दी हटवायला. ;)

सुनील's picture

29 Dec 2008 - 3:43 pm | सुनील

पूर्वी समुहाने, वन्य प्राण्यांची शिकार करताना हाकारे घातले जात. कदाचित, इथेच मनुष्याने प्रथम गायला सुरुवात केली असण्याची शक्यता आहे.

डॉ मिलर (पुनरुत्पादन क्रिया) यांचे मत पटत नाही मात्र डॉ डनबार (एकत्र येण्याची क्रिया) हे मात्र पटण्यासारखे आहे. डॉ पटेल यांचे, गाणे हे प्रयत्नपूर्वक शिकावे लागते, हेही मान्य व्हावे. चांगला आवाज ही दैवी देणगी असली तरी त्याला उत्तम प्रकारे तयार करणे, ह्याला प्रयत्न हवेतच.

आता प्रश्न आपण का गातो?

स्वान्त्सुखाय, हे महत्त्वाचे कारण. कुणाचा तो पोटापाण्याचा व्यवसाय असेल तर त्याला/तीला गाण्यावाचून पर्यायच नाही. श्रम-परिहार हेदेखिल समुह गायनाचे एक महत्त्वाचे कारण.

शेवटी काय?

ठंडे ठंडे पानीसे नहाना चाहिये
गाना आये या ना आये, गाना चाहिये!

(महान बाथरूम सिंगर) पंडित सुनीलजी

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

लिखाळ's picture

29 Dec 2008 - 6:06 pm | लिखाळ

वा !
फार सुंदर चर्चा विषय. आपण विषयाची मांडणी सुद्धा फार चांगली केली आहे.

माझ्या मते आपल्या निरनिराळ्या स्फूर्ती, निरनिराळ्या तर्‍हेने अभिव्यक्त होत असतात. जसे कुणाचा आनंद गाण्यातून तर कुणाचा चित्र काढून.
कुणाचा अध्यात्मिक अनुभव काव्यातून तर कुणाचा मूर्ती घडवून. म्हणजे आतून येणारी स्फूर्ती माणसाला अभिव्यक्तीसाठी भाग पाडते आणि त्या अभिव्यक्तीला आपण कला म्हणतो.
मग कामप्रेरणा जशी नृत्यातून साकार होईल तशी गाण्यातून आणि तशीच चित्रांतून.
त्यामुळे गायनाला कुणा एका प्रेरणेचीच फक्त अभिव्यक्ती अथवा अभिव्यक्तीसाठीची गरज असे न म्हणता एक पर्याय असे मी म्हणेन.

काही पक्षी आपल्या जोडीदाराची निवड त्याने बांधलेल्या घरट्याकडे पाहून करतात तर काही त्याच्या आकर्षक रंगाकडे तर काही त्याच्या तुर्‍याकडे अथवा पिसर्‍याकडे. यातच काही पक्षी जोडीदाराची निवड गाण्यावरुन करतात. वंशसातत्य एका विशिष्ट प्रजातीचे कसे टिकेल याचे काही ठराविक संकेत असतात.

समूहगीताचे मह्त्त्व मान्यच आहे. अशी गीते व्यक्ती आणि समाज दोन्हींवर परिणाम करतात.

गायन प्रक्रिया हा मला अपघात वाटत नसून ती तर एक न टाळता येण्यासारखी घटना वाटते. शब्द नीट रचून भाषा आजच्यासारखी बनायच्या आधीच झर्‍याचा वार्‍याचा आवज ऐकून त्याची नक्कल करायचा मोह कुणालाही होईल. पक्ष्यांची गाणी, कोल्हेकुई हे प्रकार तर रोजचेच अनुभवाचे आणि नक्कल करायला मोह पाडणारे. गाणे हे भाषा नीर्मितीच्या आधीचेच असावे असे मला वाटते.

क्र. २ चे मत (डॉ. डनबार यांचे) जर खरे असले, आणि भविष्यकाळात गायनाचे असे शास्त्रीय विश्लेषण करीत गायनाचा वापर स्वतःचे समूह विकसित आणि प्रभावशाली करण्यासाठी एखाद्या व्यक्तीसमूहाने (जाणीवपूर्वक) करून घेतला तर जे समाज असे करणार नाहीत त्यांचा प्रभाव कमी होत जाईल का? का हा सर्व कल्पनेचा खेळ आहे?

हा कल्पनेचा खेळ वाटत नाही. सामगायनापासून आजच्या काळातल्या भजन, सिने संगीता पर्यंत मानवाने हे जाणलेले दिसते की गाणे समूहाला एकत्र बांधते. वंदे मातरम सारखी गीते समूह मनावर प्रचंड परिणाम करतात तर अभंगांसारखे प्रकार समूहमन एका दिशेने हांकते. गाणे हे समूहातल्या घटकांच्या मना मनांना गुंफणारा धागा आहे असे वाटते. ( 'जावे त्यांच्या देशा' या पुस्तकांत हंगेरीच्या वर्णनात एक वाक्य आहे की ज्या देशांत तरुणांच्या ओठांवर देशभक्तीचे गाणे नसेल त्या देशाचे भविष्य चांगले नसेल. अश्या अर्थाचे. नीट वाचून खात्री करीन.)

'धन्य ती गायनी कला' असे समर्थ म्हणाले आहेत. :)

-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

केशवराव's picture

29 Dec 2008 - 6:46 pm | केशवराव

' हर दिल जो प्यार करेगा वो गाना गाएगा' बस आपल्याला एवढेच कळते!

विकास's picture

29 Dec 2008 - 8:51 pm | विकास

आपण गाणे का म्हणतो याचा बर्‍याच पद्धतीने विचार करता येईल. वर मूळ लेखात जे विचार विविध तज्ञांचे आहेत त्याच धरतीवर हे विचार आपल्याला इतरत्र दिसून येतील.

एक पटकन डोक्यात आलेले गाणे, "हर दिल जो प्यार करेगा, वो गाना गायेगा" हे वर केशवराव यांनी सांगितले आहेच. थोडक्यात मनातले प्रेम, हे गीत आणि संगीत यातून व्यक्त होते, असे म्हणायचे आहे...

तसेच दुसरे पटकट आठवते त्यात "साउंड ऑफ मुझिक" मधे ज्युली अँड्र्यूज "when you know the notes to sing, you can sing most anything" हे "डो रे मी फा..." च्या चालीत म्हणून दाखवते आणि तीचा उद्देश हा आनंदात जगताना गाणे सुचू शकते असा काहीसा आहे.

शंकराभरणम मधे त्यातील नायक - संगीत गुरू - शंकर शास्त्री, ह्याच्या दृष्टीने शास्त्रीय संगीत ही पूजा असल्यासारखी आहे. त्यात एकदा त्याच्या शास्त्रीय संगीताच्या तपस्येवर तो "पॉप मुझिक" चे वेड असलेल्या तरूणाला त्याच्याहूनही छान पद्धतीने ते ऐकवून दाखवल्याचा एक किस्सा आहे.

लिखाळ नी वर सामवेद सांगितला आहे. सामवेद हा भारतीय संगीतातील पहीला अध्याय आहे असे काहीसे समजले जाते... म्हणूनच श्रीकृष्णाने गीतेत "वेदांमधे मी सामवेद आहे" असे म्हणले आहे.

कुधीतरी कुठेतरी एक वाक्य वाचल्याचे आठवले: Our sweetest songs are those that tell of saddest thought. गुगल्यावर चक्क ते आत्ता मिळाले ते Percy Bysshe Shelley चे आहे. तसे म्हणाल तर ज्यांना सैगल/मुकेश पासून ते किशोर कुमार यात कुणाचीही गाणी आठवतील त्यांना या वाक्यात चपखल बसतील अशी अनेक गाणी आठवतील... उ.दा. - जिंदा हू इस तरह के गमे पासून ते जिंदगी के सफर मे गुजर जाते है.. पर्यंत अनेक...

बालकवींचे (लतामुळे) प्रसिद्ध झालेल्या "माझे गाणे" मधे त्यांनी गाणे अजून एका उच्च कोटीला नेऊन ठेवले: "ही मोक्षाची, स्वातंत्र्याची उन्नतीची माला, सौभाग्याची तार लागलो मी ही छेडायाला
हे नंदनवन ही स्वर्भूमी एक पहा झाली, मंगल मंगल मद्गानाची गती ही शेवटली"

----

पण हे सर्व थोरांच्या गोष्टी झाल्या...

गाण्याची / संगीताची उत्पत्ती कशी झाली हे पहायचे असेल तर येथे (साधारण ६:५५ पर्यंत ओढून) पुढे पहा...(हिस्टरी ऑफ वर्ल्ड - मेल ब्रुक्स). :-)

आणि मी (आणि माझ्या सारखे इतर) गाणे का म्हणतो (म्हणतात) याचे कारण जास्त महत्वाचे आहे - जितके गाणे म्हणतो, तितके साबण नीट लावून अंघोळ होते :-)

रामदास's picture

30 Dec 2008 - 12:03 am | रामदास

है सबसे मधुर वो गीत जिसे हम दर्द के सुरमे गाते है हे तलत मेहेमूदचं गानही तेच सांगतंय नाही का .?

विकास's picture

30 Dec 2008 - 12:14 am | विकास

है सबसे मधुर वो गीत जिसे हम दर्द के सुरमे गाते है हे तलत मेहेमूदचं गानही तेच सांगतंय नाही का .?

खरचं की! आठवणीबद्दल धन्यवाद!

चित्रा's picture

29 Dec 2008 - 9:54 pm | चित्रा

हा लेख नाही, धड समीक्षाही नाही, कौलही नाही. चर्चा म्हणून वर्गीकरण करायला हवे होते. तरी प्रतिक्रियांबद्द्ल धन्यवाद.

सहज म्हणतात, तरूण मुले गातात कारण समूहकृतीचा परिणाम. म्हणजेच ही मुले एखाद्या समूहात सामील होण्यासाठी गाणे स्विकारतात, आयपॉड विकत घेतात. म्हणजे डनबार यांच्या मताप्रमाणे हे झाले, नाही का? व्यक्तीसमूह तयार करण्याचाच हा एक मार्ग. एकदा समूह तयार झाले की त्यांच्याकरवी संस्कृतीचा, उत्पादनांचा प्रसार करणे सोपे असावे. अर्थात कोणी जाणीवपूर्वक असे करते का आपोआपच एकदा गरज तयार झाली की बाजाराच्या योग्य अशा वस्तू बनायला लागतात हे विचार करण्यासारखे असू शकेल.

मी लागलो असतो तर जोडीदारीण समोर टिकलीच नसती. हा आता एकदा जोडीदारणीला कोंडीत पकडून गायला सुरवात करतो कदाचित आय वील गेट लकी ऑर किल्ड.

हाहा! पण खरे तर शास्त्रज्ञ असे म्हणतायत की तुमच्या जोडीदारणीने तुमचा आवाज आधीच आवडल्याची नोंद नकळत केली असावी. हां, आताही फक्त तिच्यासाठीच म्हणून केवळ गायलात तर लकीच ठराल असे वाटते. जोडीदारापर्यंत भावना पोहोचवायला एखाद्या सुरेल गाण्याहून अधिक प्रभावी माध्यमे किती असतील?

तात्या म्हणतात, वरील बरेचसे विश्लेषण खरे सांगायचे तर डोक्यावरूनच गेले.
विश्लेषण तात्यांच्या डोक्यावरून गेले असे शक्य नाही, असे वाटते. जर रागदारी समजते, गाण्यातल्या जागा कळतात, तर हे विश्लेषण डोक्यावरून गेले आहे हे मान्य नाही. तुम्हाला गाण्याचे अशा प्रकारे विश्लेषण करू नयेसे वाटते का? मलाही आधी वाटले, की एवढे विश्लेषण करण्याची गरज आहे का? गाण्याचा आनंद त्यामागील शास्त्र न समजता घेता येऊ शकतो की. आणि कोणाला त्यामुळे त्रासही होत नाही. पण हिमेसभाईंचे गाणेही या जगात आहे, भीमसेनांचेही, आणि ढँटढॅण म्युजीकही. त्यातले कोणते गाणे का आणि कधी आवडते, नक्की अमूक वेळेला तमूकच राग का म्हणावा, यामागेही शास्त्र असावे, किंवा काही निरीक्षणे असावीत. हे पटत असले तर शास्त्राचा वेगळ्या अंगाने अभ्यास करणेही पटावे. असे सर्व ज्ञान मला तरी नाही, आणि कोणी यासंबंधी कुतुहल वाटून माहिती मिळवत असेल तर ती माहिती वाचायला मला आवडते एवढेच म्हणते.

सुनील म्हणतात, पूर्वी समुहाने, वन्य प्राण्यांची शिकार करताना हाकारे घातले जात. कदाचित, इथेच मनुष्याने प्रथम गायला सुरुवात केली असण्याची शक्यता आहे.
ह्या दुव्यावर ऐका. आणि हाही दुवा माहितीपूर्ण आहे.. समूहाने एकत्र गायले की वन्य प्राण्यांना समूहशक्तीचा अंदाज येत असून ते अधिक त्रास देत नाहीत, पकडता येत असावे असे असू शकेल. म्हणजेच गाण्यामध्ये काही नियंत्रण करण्याचे एक सामर्थ्य आहे.

मागे एक विज्ञानकथा वाचली होती, त्यात एक शास्त्रज्ञ (मला वाटते जगाच्या बेसुमार वाढलेल्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी) अशी एक भारून टाकणारी सुरावट जगाला ऐकवण्याचा प्रयत्न करतो ज्यामुळे अनेक माणसे एकाच वेळी भारून जाऊन मृत्युमुखी पडतील (हो, आहे खरी भेवडवणारी कल्पना).आणि मग त्याची एक विद्यार्थिनी हा प्रयत्न अमानुष असल्याने बलिदान करून जगाला या अमानुष कृत्यापासून वाचवते. आता अशा प्रकारे दुष्टांनी जर संगितकलेचा अभ्यास केला तर त्यपेक्षा जगाचे भले यात नाही का, की सर्व सज्जनांनीही असा अभ्यास करावा?

लिखाळांनी लेखातील विचारांचा घेतलेला मागोवा नेटकेपणे घेतला आहे.
वंदे मातरम सारखी गीते समूह मनावर प्रचंड परिणाम करतात तर अभंगांसारखे प्रकार समूहमन एका दिशेने हांकते. - नेमके हेच मनात आले होते, स्वातंत्र्यलढ्यात प्रभातफेर्‍यांमध्ये गाणी म्हणणे हेही याच पठडीतले असावे. ते त्या काळाच्या पुढार्‍यांनी मुद्दाम समजून केले असे म्हणायचे नाही, पण माणसाला गाण्यांचे महत्त्व नकळत पटलेच आहे. हल्लीच्या काळात याचा विचार अधिक खोलात जाऊन होतो आहे एवढेच.

त्यामुळे गायनाला कुणा एका प्रेरणेचीच फक्त अभिव्यक्ती अथवा अभिव्यक्तीसाठीची गरज असे न म्हणता एक पर्याय असे मी म्हणेन.
ह्याच्याशी जवळपास सहमत.


गाणे हे भाषा नीर्मितीच्या आधीचेच असावे असे मला वाटते.
- आधी गाणे आणि मग भाषा असाही एक मतप्रवाह आहेच. पण पि़कर म्हणतात तसे जर गाणे ही कारागिरी असली तर तिचे महत्त्व केवळ सौंदर्य एवढाच आहे, ते जगण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असेल पण पुनरुत्पादनाप्रमाणे माणसाच्या गरजेचे नाही असेही एक मत आहे.

पण कुठचाही नवरा गाण्याच्या निमित्ताने का होईना, आंघोळ स्वच्छ, सुवासिक साबणाने करीत असेल तर पुनरुत्पादन प्रक्रियेला झाली तर मदतच होईल एवढे मात्र खरे.. ;)

धनंजय's picture

30 Dec 2008 - 4:38 am | धनंजय

विचार करायला लावतो.

मला वाटते की संदर्भानुसार वेगवेगळी उत्तरे असू शकतात.

जीवशास्त्रीय उत्तरांपैकी साधारण दोन प्रवाह दिसतील
१. संगीतप्रेम असलेले लोक प्रेम नसलेल्या लोकांपेक्षा अधिक जगतात, प्रजोत्पादन करतात. (मिलर, डनबार)
२. संगीतप्रेम असलेल्या लोकांपाशी दुसरे असे काही अवश्यसंबंधाने असते, त्या दुसर्‍या गुणामुळे संगीतप्रेम नसलेल्या लोकांपेक्षा अधिक जगतात, प्रजोत्पादन करतात. (पिंकर)
३. संगीत हे जीवशास्त्रीय नाही, समाजशास्त्रातले आहे (पटेल) संगीत असलेले समाज टिकाऊ असतात - प्रत्येक व्यक्तीला संगीत जमले नाही तरी त्या व्यक्तीचे जीवशास्त्र ठीकच चालते.
(२ आणि ३ हे एकमेकांच्या फार जवळ आहेत - जीवशास्त्रातून नाद करू शकणारा, बोल उच्चारणारा गळा मिळाला आहे - मग मधुर नाद आणि तालाचे बोल उत्पन्न होऊ शकतील. प्रशिक्षणाने आणखी गुंतागुंतीचे होऊ शकतील...)

समाजशास्त्रातून किंवा सौंदर्यशास्त्रातून उत्तर द्यायचा प्रयत्न केला, तर वेगळेच (पण तरीसुद्धा समर्पक उत्तर मिळू शकेल). तात्यांचे उत्तर सौंदर्यशास्त्रातून दिलेले आहे. (पण फार थोडक्यात दिलेले आहे :-) )

पुरातन "ग्राम" पद्धतीचे संगीत लोकांना फारसे आवडेना का झाले? हल्लीचे शास्त्रीय संगीत अधिक रंजक का वाटू लागले? काहींना हिमेसभाईंचे संगीत अधिक का आवडू लागले आहे? अशा प्रकारच्या विचाराने समाजशास्त्रातून काही उत्तर मिळू शकेल.

इकॉनॉमिस्टमधला लेख आणि चित्रा यांचा चर्चाप्रस्ताव दोन्ही मस्त. धन्यवाद!

(अवांतर : वेगवेगळी समर्पक उत्तरे म्हणजे आंधळ्यांच्या हत्तीसारखी नसतात. वेगवेगळ्या प्रसंगांत एक-एक करून पूर्णपणे बरोबर असू शकतात - माझे मत.
जिलबी इतकी लोकप्रिय "आजची खादाडी" का आहे? याचे जीवशास्त्रीय उत्तर "मनुष्याला गोड-तुपकट अन्न कसे काय आवडते?" या दिशेने जाईल. पण ते उत्तर हलवायाच्या दृष्टीने सर्वथा निरुपयोगी आहे. "पीठ अमुक इतके सरबरीत भिजवले,... पाक दोन तारी केला पाहिजे, ..., मग जिलबी आवडते, नाहीतर कडक/लेचीपेची लोकांना आवडत नाही" हे हलवायाला उपयोगी उत्तर छायाचित्रकारासाठी अत्यंत निरुपयोगी आहे. "अमुक रंगाची जिलबी असेल, कॅमेरा तमुक प्रकारे वापरला, तर फोटो बघणार्‍याची लाळ टपटप गळते" हे छायाचित्रकाराला उपयोगी उत्तर आणखी कोणाला निरुपयोगी आहे. पण तरी त्या-त्या व्यक्तीला ते-ते उत्तरच सर्वाधिक योग्य आहे. सर्व उत्तरे जोडून पूर्ण "हत्ती" बनवलाच तर उलट कोणालाच उपयोग होणार नाही.)

मुक्तसुनीत's picture

30 Dec 2008 - 4:45 am | मुक्तसुनीत

लेख आवडला. संगीतासारख्या एखाद्या विषयावर इतक्या वेगळ्या अंगाने विचार केल्याचे पाहून कौतुक वाटते.

चतुरंग's picture

30 Dec 2008 - 5:04 am | चतुरंग

शब्द आणि सूर हे माणसाचे आदिम साथीदार आहेत असं मला वाटतं. संगीताची भाषा ही जागतिक आहे. तिथे शब्द समजायलाच हवेत असे नाही तसे असते तर सवाई गंधर्वला फरिनरांची गर्दी झाली नसती!लहान मुलाला अंगाई गीत म्हणून झोपवताना सूर लागायलाच हवा, आवाज छान असायलाच हवा असे नाही (हे स्वानुभवसिद्ध आहे, नाहीतर मी 'लिंबोणीच्या झाडामागे' हे गाणं म्हणताना माझा मुलगा कधीच झोपला नसता ;) ). गाण्यामधे माणसाला, समूहाला आकर्षून घेण्याची शक्ती असते. गणपतीच्या दिवसात आपण सारे समूहाने आरत्या म्हणतो त्यावेळचा माहोल आठवून बघा अंगावर काटा उभा रहातो! मनाला एकप्रकारची तरतरी देणारे परिणाम संगीताने साधतात. 'म्यूझिक थेरपी' सुद्धा ह्याच तत्त्वावर काम करते.
ठराविक सूर आणि भावना ह्यांचाही अमूर्त असा पण पक्का संबंध असतो. भैरवीचे स्वर ऐकले की डोळ्यात पाणी आले नाही असे होत नाही.
पाश्चात्य संगीतातही ठेका, ताल त्याने नाचायची होणारी ऊर्मी आणि त्यातून समूहाने एकत्र येऊन तो प्रसंग अंतर्बाह्य अनुभवणे हे होत असावे असा माझा अंदाज आहे. हा एक प्रकारचा मनोकायिक उपचारच आहे. आनंद देणारा अनुभव आहे.
केवळ पुनुरुत्पादन, किंवा वंशसातत्य टिकवणे एवढ्याच सीमित आदिम भावनेतून मानव समूह नक्कीच एकत्र येत नाही.
माझ्यासारखा बाथरुम सिंगर हा टबात गाताना किशोरकुमार गातोय एवढा समरसूनच गातो. कारण ते गाणे माझे माझ्यासाठी असते. इतरांसाठी नाही.

चतुरंग

नंदन's picture

30 Dec 2008 - 6:01 am | नंदन

चर्चाविषय/लेख आवडला. लिखाळ म्हणतात तसे, अभिव्यक्तीसाठी गाणे हे सर्वात मुख्य कारण असावे. शब्द तोकडे पडू शकतात, एक चित्र हजार शब्दांएवढा आशय सांगत असले तरी सूर त्यापलीकडेही झेप घेऊ शकतात. 'सार्‍या कलांना संगीत व्हायचे असते' हे विधान या संदर्भात आठवले.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Dec 2008 - 8:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विचार आवडले ! कोणती तरी मानसिक भूक भागते पण ती हीच का ? हे काही सांगता येणार नाही.
तसेच गायनाने लोक एकत्र येतात हे मान्य पण...''गायन हे माणसाच्या जगण्याच्या धडपडीला (सर्व्हायवल) किंवा पुनरुत्पादनाच्या क्रियेला मदत करते '' हे जरा मला नवीनच वाटले. असो, लेख विचार करायला लावणारा आहे.

( काही आठवले तर पुन्हा खरडेन )

-दिलीप बिरुटे

चित्रा's picture

30 Dec 2008 - 8:53 am | चित्रा

चर्चा विषय आवडल्याचे कळवल्याबद्दल आभारी आहे. स्वतः गाणे का म्हणतो ते सांगणार्‍यांनाही धन्यवाद.

धनंजय यांचे उत्तर चर्चाविषय अधिक सुस्पष्ट करणारे, मूळ लेखातील मुद्दे अधिक उलगडून दाखवणारे असे आहे. जीवशास्त्र आणि समाजशास्त्राची सांगड घातली जात असते असे दिसते.
तात्यांचे उत्तर सौंदर्यशास्त्रातून दिलेले आहे. (पण फार थोडक्यात दिलेले आहे)
सौंदर्यशास्त्रातून तात्यांनी काही लिहावे हीच तर अपेक्षा होती, पण ते केवळ मला कळत नाही, मला मनाला बरे वाटते म्हणून मी गातो (स्वान्तसुखाय) असे म्हणून मोकळे झाले :)

ठराविक सूर आणि भावना ह्यांचाही अमूर्त असा पण पक्का संबंध असतो.
अगदी मान्य. तोच का असतो, हे काहींना शोधण्यासारखे वाटत असावे.

केवळ पुनुरुत्पादन, किंवा वंशसातत्य टिकवणे एवढ्याच सीमित आदिम भावनेतून मानव समूह नक्कीच एकत्र येत नाही.
प्रत्येक गोष्टीचे उत्तर हे जीवशास्त्रीय कारणांत शोधणे, डार्विनच्या सिद्धांताशी मेळ घालणे हे योग्य आहे का ह्यासंबंधी प्रश्न असू शकतात. पण त्यासंबंधी मी अधिक वाचलेले नाही. मानवसमूहाची एकत्रित उद्दिष्टे मात्र असू शकतात, आणि त्यातील घटकांची स्वतःची अशी काही उद्दिष्टे. गायनकलेचे विचार हे असे वेगवेगळ्या घटकांच्या निमित्ताने आणि त्यांच्यापुरते होऊ शकतात असे दिसते. (धनंजयांच्या अवांतरप्रमाणे).


सार्‍या कलांना संगीत व्हायचे असते'

सुरेख वाक्य. माहिती नव्हते.

'गायन हे माणसाच्या जगण्याच्या धडपडीला (सर्व्हायवल) किंवा पुनरुत्पादनाच्या क्रियेला मदत करते '' हे जरा मला नवीनच वाटले.
मलाही. पण आवाजावरून माणसाच्या स्वभावाची कल्पना करणे असे अनुभव बरेचदा येताना दिसतात. माद्या नरांची निवड आवाजाच्या प्रतीवरून किंवा इतर वैशिष्ट्यांवरून करीत असतील असे निरीक्षण नोंदवले गेले आहे. आणि हे केवळ नरमादी निवड (सिलेक्शन) च्या बाबतीत होत असेल असे नाही, नोकरी मिळवताना किंवा इतरही जेथे निवडप्रक्रिया असते तेथेही होत असते. त्यामुळे चांगले आवाज/गायन यांचा लांबचा का होईना जगण्याच्या धडपडीशी/पुनरुत्पादनाशी संबंध असावा असे समजण्यास जागा आहे असे वाटते. पण तो तेवढाच केवळ आहे असे वाटत नाही.